Friday, January 26, 2024

३ll अखंडित वाचीत जावे ll

(३) अखंडित वाचीत जावे l

 " पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक विनाकारण नतमस्तक होत नाही." असा विचार ज्यांचं साहित्य वाचून उमगतो असे नाशिकचे जेष्ठ साहित्यिक,ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांची काही पुस्तक वाचण्यात आली. " वाचल्याशिवाय माणूस कळत नाही,"याचा प्रत्यय आला.
  १९६० नंतरचा मराठी साहित्याचा काळ हा विविध साहित्य प्रवाहांचा काळ मानला जातो. ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी ,इत्यादी साहित्यांचे प्रवाह या काळात निर्माण झाले.या सर्वांत दलित साहित्याची चळवळ अधिक प्रभावी होती. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा त्यामागे होती. बाबुराव बागुल, शंकरराव खरात, अर्जुन डांगळे, नामदेव ढसाळ, केशव मेश्राम, नारायण सुर्वे, रां. चिं.ढेरे,रावसाहेब कसबे यांसारखे प्रतिभावंत साहित्य या काळात उदयास आले. आपल्या लेखणी आणि विचारांनी त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले.या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मराठी साहित्यात मोलाचे योगदान देण्यात उत्तम कांबळे यांचा अग्रक्रम आहे.
   उत्तम कांबळे यांनी कथा, कादंबरी, आत्मकथन, स्फुट लेखन अशा साहित्याच्या सर्वच प्रांतात मुशाफिरी केली आहे. माणूस आणि मानवता हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे.समाजाच्या व्यथा- वेदना त्यांनी साहित्यातून मांडल्या.सामाजिक न्यायाची भूमिका त्यांच्या लेखनातून अभिव्यक्त होते.
   पत्रकारितेच्या निमित्ताने उत्तम कांबळे नाशिकमध्ये स्थायिक झाले. एक निर्भीड, नि:पक्ष आणि उदारमतवादी भूमिका स्वीकारून पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा त्यांनी उमटवला. पत्रकारिता करीत असताना आलेले अनुभव, भेटलेली माणसे, समाज, चालीरीती, श्रद्धा -अंधश्रद्धा , इत्यादी त्यांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या दिसतात.माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे, ही निकोप दृष्टी त्यांच्या लेखनातून जाणवते.
   मुबलक साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांचे आतापावेतो पाच कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. रंग माणसांचे( १९९५),कावळे आणि माणसं (१९९८) कथा माणसांच्या (२००१), न दिसणारी लढाई (२००८), परत्या(२०१०) या सर्व कथासंग्रहात माणूस आणि मानवता हाच गाभा राहिलेला आहे. समाजाने नाकारलेली शोषित,पीडित, माणसे त्यांच्या कथांचे नायक होतात.थोडक्यात त्यांची लेखणी माणसाभोवतीच घिरट्या घालताना दिसते.
   उत्तम कांबळे यांच्या रंग माणसांचे व कावळे आणि माणसं या दोन कथासंग्रहाची थोडक्यात ओळख या लेखाच्या निमित्ताने करण्याचा हा छोटासा प्रयत्न! 
  १९९५ मध्ये सुगावा प्रकाशने, १९९८ मध्ये मॅजेस्टिकने तर २०११ मध्ये मनोविकासने रंग माणसांचे या कथासंग्रहाच्या आवृत्ती प्रकाशित केल्या. यात विविध स्वभावाच्या माणसांच्या 32 कथा आहेत. या संग्रहाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. काही कथांवर नाटिका, लघुपट तयार झाले. काही कथा शाळा महाविद्यालयांच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी आल्या.
  या कथांमधून भेटणारी माणसं ही समाजाच्या विविध स्तरांतून आलेली आहेत. स्त्री - पुरुष, शिक्षित - अडाणी,उघड्यावर राहणारे,भटके, श्रीमंत,शिक्षक, नोकरदार,राजकीय पुढारी,समाजसेवक इत्यादी माणसे वाचकांना भेटतात. यांतील काही माणसे बुरसट रुढीपरंपरा जपणारे तर काही विद्रोह करणारे आहेत. इतर साहित्यिक आणि उत्तम कांबळे यांच्यात एक प्रमुख फरक हा लक्षात येतो की, काही साहित्यिक समाजाच्या व्यथा वेदना आक्रस्ताळेपणे लेखनातून मांडतात.त्यांचे कथांतील नायक व्यथा वेदना सहन करणारी आहेत. तर उत्तम कांबळे यांच्या साहित्यातील माणूस केवळ सहन न करता विद्रोह - उठाव करतो. आपल्या कथांमधून उत्तम कांबळे वस्तुस्थितीवर नेमकेपणाने भाष्य करतात. म्हणून त्यांची कथा मनोरंजनापुरती न राहता ती वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. परिणामकारक शेवट हे त्यांच्या कथांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
  आशयाच्या दृष्टीने या कथासंग्रहातील कथा भिन्न असल्या तरी माणसांचे स्वभाव या एका सूत्राखाली त्या बांधल्या गेल्या आहेत.
  ऑफिस मधील साहेबाचा राग घरी बायकोवर काढणारा ' साहेब ' मधील सावंत, "तिकीट ' मधील श्रद्धेचा गैरफायदा घेणारी अंगात आलेली स्त्री, ' माणूस ' मधील महारोगी, ' नाते अश्रूंचे ' मधील माणूसपण हरवलेली माणसे, ' दुष्काळ ' मधील राजकारण्यांची मानसिकता, ' पुण्य ' पदरात पाडून घेण्यासाठी वाटेल ते करणारे माणिकलाल व हिरालाल,' घुंगरू ' मधील व्यसनी सोनूशेठ, ' सिद्धी' कथेतील गोपाळ चांभार, ' करिअर ' मधील दिखाऊपणा,' लांडगा' कथेतील जिवंत आणि मृत माणसांची तुलना, इत्यादी कथा अतिशय संवेदनशीलपणे लेखकाने लिहिल्या आहेत. माणसांचे चांगले आणि वाईट स्वभाव अशी तुलना वाचक स्वतःच करू लागतो.' शापित सुख ' ही भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी कथा आहे. समाजाने स्त्रीची बाजू समजून घेऊन तिचा स्वीकार करावा,असा संदेश देणारी ' विकृत ' ही कथा समाजातलं दाहक वास्तव मांडते. माणसाला पैशाच्या पलीकडे जाऊन प्रेम आपुलकीची अधिक गरज असते,हे सांगणारी' मनीऑर्डर ' कथा वाचकांचे मन हेलावणारी आहे. शासकीय 'रेस्टहाऊस' मधील बाजीराव वाचकांचे मन जिंकतो. निखळ प्रेमाची आणि त्यागाची ' अपघात ' ही कथा हृदय पिळवटून टाकणारी आहे. ' आजी ' ही कथा एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व विशद करणारी कथा आहे.' नंदीबैल' ही कथा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात हेलकावे खाते. ' ड्रायव्हरची बायको ' ही एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा असून अंतर्मनातून प्रेम समजून घेणे किती महत्त्वाचे आहे, ते स्पष्ट करते. ' लेखणी 'मधील दरिद्री पत्रकार, 'बेलदार ' मधील दुष्काळ, ' सुमीला हवा होता माणूस' मधील प्रा. चौधरी, ' वेडा 'कथेतील संजयची व्यथा,' कवी' मधील घटस्फोटीत स्वप्निलकुमार,ही पात्रे त्यांच्यातील स्वभाव गुणांमुळे लक्षात राहतात. ' वन रूम किचन ' मधून वयोवृद्धांची व्यथा लेखकाने मांडली आहे. ' निकाल ' मधून शिक्षण क्षेत्रातील गोंधळावर लेखकाने प्रकाश टाकला असून 'अश्रू जपून ठेवा ' ही धर्मांध लोकांना आरसा दाखवणारी भावनिक, संवेदनशील कथा आहे. स्वप्न आणि वास्तव यांची जाणीव करून देणारी ' कलेक्टर ' ही कथा वाचनीय आहे. ' संवेदना 'ही अन्याय सहन करणाऱ्या एका गवंड्याची कथा असून फुला कथेतील संगीतबारी वर नाचणाऱ्या व शेवटी भीक मागणाऱ्या स्त्रीची व्यथा वाचून वाचकांचे मन हेलावते.
  माणसांच्या विविध प्रकारच्या स्वभावांची ओळख करून देणाऱ्या या वाचकप्रिय कथासंग्रहास बाबुराव बागुल पुरस्कार (१९९७),ग.दि. माडगूळकर पुरस्कार (१९९७), कुसुमाग्रज पुरस्कार, संत ज्ञानेश्वर पुरस्कार इत्यादी साहित्य क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
  कावळे आणि माणसं हा देखील वाचक प्रिय कथासंग्रह १९९९ मध्ये मनोविकास प्रकाशनने प्रकाशित केला.माणूस आणि त्यांच्या जगण्याचा संघर्ष याचा शोध घेण्याचा प्रयत्न या कथासंग्रहातून केला आहे. यात २१ कथांचा समावेश असून कावळे आणि माणसं ही दीर्घकथा आहे. स्वतः पत्रकार असल्याने उत्तम कांबळे यांचे अनुभवक्षेत्र व्यापक आहे.अवतीभवतीच्या जीवनानुभवाचे प्रतिबिंब त्यांच्या कथांतून उमटते. कल्पनाविलासापेक्षा त्यांच्या कथा वास्तवावर भर देतात. समाजातील सामान्य, पीडित- शोषित माणूस त्यांच्या कथांचे नायक बनतात.
  मेलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा शिवला की, आत्म्याला मोक्ष प्राप्ती होते,अशी श्रद्धा भारतीय समाजात रूढ आहे. पिंडाला कावळा शिवावा म्हणून माणसांची धडपड आणि भुकेने व्याकुळ झालेला माणूस यातील विरोधाभासावर , स्मशानाच्या पार्श्वभूमीवर कावळा आणि माणसं ही कथा घडत गेली आहे.
  ' दरोडेखोर ' मधील दगडूमामा, ' रांग ' मधील माणसांची सहनशीलता, ' भय ' मधील मृत्यूचे भय, ' आंधळ प्रेम ' मधील चंगळवाद, ' दिवा लागला पणती विझली ' मधील माणसांच्या पुत्रप्राप्तीसाठीचा अट्टहास, ' बातमी ' मधील स्वातंत्र्यसैनिकाचा स्वभाव,' संत ' मधील लोकांची लुबाडणूक करणारा मोक्षदानंद, ' पाऊस ' मधील अंधश्रद्धा, ' चकवा ' मधील वडिलांची फसवणूक करणारी सुमित्रा,' एक वर्तुळ पूर्ण झालं ' मधील वाट चुकलेला तरुण, 'देवाची बाई ' मधील देवदासी, ' सूड 'मधील सोनू , ' बक्षीस ' मधील पोलीस खात्यातील भ्रष्टाचार, ' परीक्षा ' मधील फुलाबाई,' पमी आणि बंटी' मध्ये विभक्त कुटुंबाची शोकांतिका, ' उपवास ' मधील आईचा संघर्ष आणि त्याग, इत्यादी कथा विषय लेखकाने कथांतून मांडले आहेत.
   उत्तम कांबळे यांच्या कथांतील भाषा साधी, सरळ व आकलनास सुलभ आहे,तरीही आशय प्रभावीपणे व्यक्त करणारी आहे. माणसांचे स्वभाव, त्यांचे भलेभुरे परिणाम, वृत्ती प्रवृत्ती हा त्यांच्या कथांचा आत्मा आहे. त्यांच्या कथांतील घटना, प्रसंग, पात्र वाचकांना परिचयाची वाटतात. आवश्यक तेथे प्रतीके, उपहास, विरोधाभास,अलंकारिक शब्द, म्हणी, प्रसंगांनुरूप वाक्प्रचारांचा वापर करून भाषेचे सौंदर्य लेखक खुलवतात. कथालेखन करताना आशयानुकूल वातावरण निर्मिती करण्यात कांबळे यशस्वी ठरले आहेत.
    थोडक्यात उत्तम कांबळे एक प्रतिभावंत साहित्यिक असून मराठी साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली आहे, हे नि :संशय !

शैलेश अशोक पाटोळे
नाशिक
२७/१/२४

Thursday, January 25, 2024

१llअखंडित वाचीत जावे ll१

 १llअखंडित वाचीत जावे ll१
नमस्कार
    आपल्या स्फुट काव्यात समर्थ रामदासांनी केलेला  "दिसामाजि कांहीतरी ते ल्याहावें  l प्रसंगी अखंडित वाचीत जावे l" हा उपदेश लक्षात घेता सुरू झालेल्या वाचनाच्या उपक्रमात सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयातून ' गंधार 'हाती लागले. 
     साहित्य, समीक्षा ,संशोधन आणि शिक्षण अशा विविध प्रांतात मुसाफिरी करणारे नाशिकचे प्रा. डॉ.चंद्रकांत वर्तकांचा गंधार हा कथासंग्रह ज्योती प्रकाशनने २००९ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहाच्या आकर्षक मुखपृष्ठाची रचना नाशिकचे ख्यातनाम चित्रकार श्री.धनंजय गोवर्धने यांनी केली आहे. १७४ पानांच्या या संग्रहात १२ विविध विषयांवरील कथांचा समावेश आहे. डॉ. चंद्रकांत वर्तक नाशिक मधील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवारत होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील महाड होय. 
      प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, आठ कथासंग्रह, इ. विविधांगी लेखन वर्तकांनी केले आहे. प्राध्यापक म्हणून नोकरी करताना आलेले अनुभव, मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था, स्त्री-पुरुषांची मानसिकता,माणसांच्या स्वभावातील गुणदोष, नातेसंबंध, राग - लोभ - द्वेष इत्यादी त्यांच्या कथांचे विषय बनले आहेत. समाजातले वास्तव, भावभावना, प्रेम - वासना, भावनिक कोंडमारा, ऐन तारुण्यातील वैधव्य, इत्यादी विषय त्यांच्या कथांमधून डोकावतात. विषयांतील वैविध्य डॉ. वर्तकांची वैचारिक प्रगल्भता दर्शविते. जीवनातील साधे साधे प्रसंग वर्तकांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहेत. म्हणूनच  मराठी कथा प्रांतात डॉ. वर्तकांच्या कथांना विशेष स्थान आहे. प्रारंभापासून शेवटपर्यंत त्यांच्या कथा कुतूहल टिकवून ठेवणाऱ्या आहेत. आशयानुकुल भाषा, वाचकांना खिळवून ठेवणारे कथानक तसेच साधेपणा ही डॉक्टर वर्तकांच्या कथेची वैशिष्ट्ये ठरतात. प्रतिमांची निर्मिती हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
   गंधार मधील कथांचे वर्णन करताना स्वतः वर्तकांनी असे म्हटले आहे की,  " आयुष्यातील तीव्र अनुभवांचे चिंतन म्हणजे या कथा होत."  या संग्रहातील कथा विषयांच्या अनुषंगाने भिन्न असल्या तरी मानवी मन, स्वभाव, नातेसंबंध हा त्यांतील समान धागा आहे.
  ' गर्भसत्य ' मधून साहित्य लेखनात होणाऱ्या चौर्यकर्माकडे वाचकांचे लक्ष लेखक वेधतात.शरदचंद्र या प्रथितयश साहित्यिकाचे खरे रूप कथेत पहावयास मिळते. ' आजोळ 'ही भावनिक कथा असून प्रत्येकालाच असलेली आजोळची ओढ हे या कथेचे आशयसूत्र आहे.लेखकाला चीन प्रवासात भेटलेल्या मेरीची संघर्षगाथा ' शांघायच्या मेरीची गोष्ट' मध्ये आहे. ' पंचवटी एक्सप्रेस'  ही एक आगळी वेगळी कथा असून निसर्ग आणि माणसांच्या मनातील संघर्ष या कथेतून लेखक अधोरेखित करतात. गृहस्थाश्रम आणि संन्याशाश्रम या दोन किनाऱ्यावर हिंदोळे घेणारी  ' पाश '  ही कथा वाचकांना आनंद देते. समर्थ रामदासांनी सांगितलेले," आधी प्रपंच करावा नेटका, "असे सांगूनही त्यांचे अनुयायी मात्र ढोंगीपणाने वागताना, देखावा करताना दिसतात.प्रेम भावनेचं संवेदनशील वर्णन ' त्याची मावशी आणि तो'  मध्ये आहे. ' लागेबांधे :  जुळलेले ओघळलेले !' ही दोन समवयस्क परंतु भिन्न स्वभावाच्या मित्रांची कथा आहे. स्त्रियांवर वर्चस्व गाजू पाहणाऱ्या पुरुषी मानसिकतेची' जाग ' ही कथा सुनंदाला लढण्याचे बळ देते. ' द्वैत ' कथेतून एका स्त्रीच्या अंतर्मनाची व्यथा उलगडून लेखकाने उलगडून दाखवली आहे..  ' बंध अनुबंध ' मधून महाडच्या बालपणीच्या आठवणी लेखकाने वर्णिल्या आहेत.लग्नानंतरचा आईचा सर्वच पातळ्यांवरील संघर्ष ' बाई ' या कथेत लेखक मांडतात.व्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या व्रतस्थ, प्रामाणिक वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमाताई '  व्रती ' या कथेतून भेटतात.
   गंधार या संग्रहात स्त्री प्रतिमा आधुनिक विचाराच्या, पुढारलेल्या, संवेदनशील,धाडसी, संघर्ष करण्यास सज्ज असलेल्या डॉ. वर्तकांनी मांडल्या आहेत. कथांमधील स्त्री चित्रण कमी प्रमाणात असले तरी अतिशय संवेदनशीलपणे केलेले दिसून येते.
  गंधार मधील भाषा आशय नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारी आहे. अधून मधून केलेली तात्विक मांडणी वाचकांच्या मनाला भिडणारी आहे. भाषेत जिवंतपणा असल्याचे जाणवते. काही प्रमाणात उपमा - उत्प्रेक्षादी अलंकार, म्हणी, वाक्प्रचारांचा वापर केलेला दिसतो. त्यामुळे भाषेचे सौंदर्य निश्चितच वाढलेले आहे.
   गंधार मधील कथांच्या वाचनातून एक श्रेष्ठ कथा लेखक म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा उल्लेख का होतो, ते आपसूकच कळते.
  रसिक वाचकांना अलवार, संवेदनशील कथांचा '    गंधार ' निश्चितच सुखावेल यात शंका नाही !

✍️✍️✍️✍️✍️✍️
शैलेश अशोक पाटोळे
  नाशिक
१८ जानेवारी २०२४
   

२ll अखंडित वाचीत जावे ll२

*अखंडित वाचीत जावे l* 
 नमस्कार,
 पुस्तक वाचनाबद्दल व.पु.काळे यांनी असे म्हटले की," वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो, तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं..."  या उद्देशानेच नाशिकचे जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांच्या अनित्य आणि ब्रह्मडोह या दोन कथासंग्रहाबद्दल रसिक वाचकांशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न !
  १९६० नंतरच्या काळात मराठी साहित्यात विशेषतः कथा व कादंबरीक्षेत्रात मोलाची भर घालणारे मनोहर शहाणे एक जाणकार समीक्षक म्हणूनही ओळखले जातात. स्वप्नरंजन आणि काल्पनिक लेखनापेक्षा वास्तव लेखनाकडे त्यांचा कल अधिक आहे. विविध साहित्य चळवळी आणि प्रसिद्धीपासून शहाणे लांब राहिलेले दिसून येतात. आजपर्यंत अकरा कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, एक नाटक, चार एकांकिका त्यांनी लिहिल्या असून त्यांच्या काही कथांचा इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतही अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. शालेय जीवनात शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी क्रांती नावाचे नाटक त्यांनी लिहिले होते. पुढे वर्तमानपत्रात सेवा करीत असताना वर्तमानपत्राच्या गरजेतून त्यांनी लेखन प्रपंच सुरू ठेवला. वर्तमानपत्रातून प्रारंभी त्यांच्या कथा " श्रीमश " या टोपण नावाने प्रसिद्ध होत. ज्येष्ठ कथालेखक अ.वा. वर्टी यांच्याबरोबर अमृत चे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
   १९६१ मध्ये त्यांचा शहाण्यांच्या गोष्टी हा कथासंग्रह अभिनव प्रकाशनने प्रकाशित केला. १९८७ मध्ये अनित्य आणि १९९९ मध्ये ब्रह्मडोह, मनमित प्रकाशनने प्रसिद्ध केला. तिन्ही कथासंग्रह मिळून मनोहर शहाणे यांनी ४५ कथा लिहिल्या आहेत. सहजता आणि वास्तव हे त्यांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य दिसून येते.
   अनित्य या संग्रहात बारा कथांचा समावेश आहे. पुण्याच्या चिरायू प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे. त्यातील क्रियाकर,चित्रसापळा, फरास आणि अंधारावर पाल या कथा मृत्यूवर आधारित आहेत. तिसऱ्याची आई,अनित्य या कथा दारिद्र्य आणि मैत्रीवर तर अन्नदान, लेणं, फेडआउट या कथा प्रेम -  प्रेयसी - प्रियकर या विषयांवर बेतलेल्या आहेत. तेरेद्वार आणि धुई ह्या कथा जीवनातील संघर्षांवर आधारित आहेत. रूळ वाहतात ही कथा रेल्वे स्थानकावरील अस्वस्थ नायकाच्या मनाचे चित्रण करणारी कथा आहे.
   ब्रह्मडोह हा शहाणेंचा तिसरा कथासंग्रह १९९९ मध्ये प्रकाशित झाला. पद्मगंधाने २०१५ मध्ये या संग्रहाची दुसरी आवृत्ती काढली. यात विविध विषयांवरील १७ कथांचा समावेश आहे.प्रेम- प्रेमभंग, एकट जगणं,मरणाकडे होणारा प्रवास, बदलता काळ, आशा - अपेक्षा, बीभत्स दृष्टी ,राग, लोभ, गर्व इत्यादी कथा विषय झाले आहेत.
   ब्रह्मडोह ही शीर्षक कथा आहे. दादा आणि उपासनी अशा दोन मित्रांची ही कथा असून आयुष्यात विरह, एकटेपणा सहन न झाल्याने उपासनी मृत्यूचा मार्ग स्वीकारतो. पोहोता येत नसूनही पुरात उडी घेतो. अपराचिपरा ही कथा कृष्णराव या वयस्क असणाऱ्या पात्राची मनोदिशा व्यक्त करणारी कथा आहे. तावदानं ही सुद्धा बेहराम आणि झिल्लू या वयस्क  पती-पत्नीची कथा असून मृत्यू हा अटळ विषय यात हाताळला आहे. ऊन कवडसा ही जगन्नाथ या वेडगळ तरुणाची कथा असून त्याच्या वेडगळ वागण्याचं कारण जाणून घेण्यात वाचकांचे कुतुहल जागृत होते. सूर्यउभा मध्ये तरुण मुलाचे निधन झाल्याने व्यथीत झालेल्या पित्याची करून कहाणी आहे. बामणाच्या काचाही देखील एका वेडसर काचा खाणाऱ्या मुलाची कथा आहे.मुलाच्या वेडसरपणामुळे हाताश झालेल्या आईचे भावविश्व शहाणेंनी अतिशय संवेदनशीलपणे रेखाटले आहे.कालबाह्य कथेतून बदलत्या काळात कालबाह्य झालेल्या व्यक्तीची अवस्था लेखक वर्णन करतात. झाड या कथेत स्त्रीच्या भावभावनांचे चित्रण लेखक करतात. वासना आणि बीभत्सपणा यांचा अतिरेक न होऊ देता लेखक व्यक्त झालेले दिसतात. माशांचा थवा ही कथा नुकत्याच वयात आलेल्या दत्तू आणि सुशीची प्रेम कथा आहे. खुजा ही कथा सर्कशीतल्या विदूषकाची मनोव्यथा आहे. इरिंग-मिरिंग, आर्त ,चांडाळ,विटंबना काळातील  गेंगाण्या या कथा आशयाच्या दृष्टीने वाचनीय आहेत. विसंगत ही भिन्न स्वभावाच्या पती-पत्नीची वैचारिक वादाची कथा आहे.
   थोडक्यात मनोहर शहाण्यांच्या कथांतून सर्वसामान्यांच्या आयुष्यातले प्रसंग कथाविषय होऊन अवतरतात. दारिद्र्य, उपासमार, लाचारी यांसारख्या विषयांना ते प्राधान्य देतात. वृद्धत्व, स्वभावातील बदल, उतारवयातील वर्तन या विषयांकडे त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. विविधअंगी विषय हाताळणारे मनोहर शहाणे गंभीर , तात्विक आणि वैचारिक लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्यांच्या कथेतील आशय, अनुभव आणि त्यात योजलेली पात्रे, प्रसंग, घटना, सर्वसामान्य वाचकांच्या परिचयाच्या असून वाचकांना कथेतील प्रसंगआपल्या अवतीभवती घडत असल्याचा भास होतो. त्यांची निवेदन पद्धती प्रवाही असून कुठेही रटाळपणा येणार नाही याची काळजी लेखकाने घेतलेली दिसते. मोजकी आणि आवश्यक पात्र संख्या, अलंकारिक भाषा,वाक्प्रचार म्हणींचा योग्य ठिकाणी वापर केला असून कुठेही अतिरेक झालेला नाही.
  नाशिकच्या परिघात घडलेल्या या साहित्यिकाचे लेखन खरोखरच मनाला भावणारे आहे. जे पाहिले, अनुभवले तेच साहित्यात त्यांनी मांडल्यामुळे त्यात जिवंतपणा आहे.नाशिकच्या या उत्तुंग साहित्य प्रतिभा लाभलेल्या साहित्यिकाचा निश्चितच नाशिककर म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान अव्हेरुन कसे चालेल..?

शैलेश अशोक पाटोळे
नाशिक
२५/१/२०२४

Wednesday, January 24, 2024

सातपुड्याची राणी : पचमढी

            सातपुड्याची राणी : पचमढी
 संस्थेच्या विविध शाळांतील स्काऊट्स आणि गाईडच्या विद्यार्थ्यांच्या ॲडवेंचर कॅम्पचे आयोजन कल्पक आणि स्काऊट साठी समर्पणाची भावना असलेले पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कैलास पाटील यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली यावर्षी पचमढी - मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता. जवळपास १०० विद्यार्थी १० शिक्षकांबरोबर आम्हालाही त्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली. तसा मला लांबच्या प्रवासाचा मनस्वी कंटाळा ; परंतु मित्रांचा आग्रही आदेश मला टाळता आला नाही. जर मी काहीतरी कारण सांगून जाणं टाळलं असतं, तर आयुष्यातील निसर्ग निवासाची मोठी संधी गमावल्याचा पश्चाताप मला निश्चितच झाला असता !
  मुख्याध्यापक कैलास पाटील आणि दहा शिक्षकांची टीम स्काऊटर्स आणि गायडर्स यांना घेऊन आधीच रेल्वेने रवाना झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी आमचा चमू पूर्वतयारीनिशी पचमढीवर स्वारी करण्यास निघाला. रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाल्याचा आनंद रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर मात्र पार विरून गेला. रिवा सुपरफास्ट एक्सप्रेस चक्क चार तास उशिराने नाशिक रोड स्टेशनवर आली. रेल्वेची वाट पाहणे म्हणजे आमच्या सहनशीलतेची परीक्षाच ! स्टेशनवर येणारी जाणारी माणसं, त्यांची लगबग, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, जवळून जाताना त्यांचा कर्ण कर्कश आवाज, मित्रा मित्रांची चेष्टा मस्करी,सारं भांडवल संपत आलं... साधारण रात्री नऊच्या सुमारास लोह गजगामिनी स्टेशनवर दाखल झाली. स्वेटर ,टोपी इत्यादी उगाच अंगावर चढवले असे झाले. आधी पोहोचलेल्यांनी थंडीची दहशत मनात भरवली होती; म्हणून जाड जुड लोकरी कपडे अंगात घातली. जवळपास भुसावळ जंक्शन येईपर्यंत या गाडीला सुपरफास्ट असं का म्हणत असावेत यावर चित्र विचित्र चर्चा झाली.विनोद, चेष्टा- मस्करी यात वेळ कळत नव्हता.पण तरीही गाडी नक्की कधी पोहोचेल ? असा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होताच. नाशिक ते पिपरिया जंक्शन असा जवळपास नऊशे किलोमीटरचे अंतर पार करायचं होतं. भुसावळ येईपर्यंत सर्वजण निद्राधीन झाले. सहा साडेसहा वाजता जाग आल्यावर कळलं आपण पिपरिया येथे पोहोचलो आहोत.रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. प्रचंड धूके, कडाक्याची थंडी आणि जोरदार पाऊस असा वातावरणाचा अनुभव घेण्याची ही पहिलीच वेळ ! होते नव्हते ते सारे उबदार कपडे, शाल अंगावर पांघरली. अशावेळी कशाचीही लाज वाटली नाही. पाऊस आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी अंगावर घेतलेले पांघरून, कपडे यामुळे आमचा अवतार एखाद्या चित्रपटातील डाकू दरोडे खोरांसारखा वाटत होता ! आम्हीच एकमेकांकडे पाहून हसत होतो.अशाही स्थितीत फोटो घेण्याचा मोह मात्र टाळता आला नाही !
  पिपरिया ते पचमढी हे मोटारीतून सव्वा दीड तासांचे अंतर आम्ही पार केले. दरम्यान समुद्रसपाटीपासून आपण उंचावर जात असल्याचे सहजी लक्षात आले. तीव्र नागमोडी वळणे तरीही नेहमीचे ड्रायव्हर अत्यंत सफाईदारपणे गाडी चालवत होते. दरम्यान लांबच लांब गव्हाची शेते आणि त्यावर पडणारा सूर्यप्रकाश.. अतिशय नयनरम्य दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारं होतं. जसजशी मोटार गाडी पुढे पुढे जाऊ लागली तसतशी शेती जाऊन घनदाट जंगल क्षेत्र सुरू झालं. उंच उंच वाढणारी विविध प्रकारची झाडी आणि वळणदार रस्ते काश्मीर आणि केरळची आठवण करून देत होते. दरम्यान एका ढाब्यावर खाल्लेला आलू पराठा आणि गरमागरम चहा शरीर आणि मनाला उब देऊन गेला. साधारणपणे आम्ही पोहोचलो तोपर्यंत धुकं जाऊन उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. प्रवासाला विलंब झाला असला तरी दाट धुके, पावसाळी सर्द हवा, हवेतला गारवा उंच उंच वाढलेली झादे, लांबलचक गव्हाची शेते, शुद्ध - स्वच्छ हवा, सारं काही आल्हाददायक होतं. त्यात समविचारी मित्रांची विनोदाची साथ होतीच! वय- हुद्दा- पद-प्रतिष्ठा सारं सोडूनआम्ही सर्वजण निसर्गाचा आनंद लुटत होतो.
   ॲडवेंचर कॅम्प मधील सहभागी मुलांची राहण्याची व्यवस्था स्काऊट्सच्या नियमाप्रमाणे छान आणि भक्कम अशा तंबूत केलेली होती. जंगल क्षेत्र असूनही सुरक्षित व्यवस्था होती. आजूबाजूंनी जंगलाने वेढलेला हा परिसर अतिशय शांत निवांत आहे. विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठीची सोय जवळच केलेली दिसली. उंच वाढलेल्या झाडांवर माणसांपेक्षा माकडांची संख्या कितीतरी पटीने अधिक! माणसांकडे पाहून आपल्याला काहीतरी मिळेल या आशेने विशिष्ट आवाज काढणारी, या फांदीवरून त्या फांदीवर झोके घेणारी, कधीकधी दात विचकावणारी असंख्य लहान मोठी लाल काळया तोंडाची माकडे दिसून आली. आमचे सामान आम्ही एका झाडाला केलेल्या गोलाकार ओट्यावर ठेवून चहा घेण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेलो. पेट्रोलिंगची जबाबदारी असणारी दोन सातवीतली बालवीरांवर (मुले) लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या ट्रूप लीडरने दिली.चहा पिऊन परत येईपर्यंत आमच्या जेवणाच्या डब्याची पिशवी माकडांनी फस्त केली होती. छोट्या दिसणाऱ्या या माकडांनी आपली ताकद दाखवूनच आमचे स्वागत केले! 
  भारत स्काऊट गाईडच्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात आम्ही आता आलो होतो. एकूण ५६ एकरचा परिसर. दाट झाडं झुडपं आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त इमारती, ऑफिस- कार्यालये, १९५६ मध्ये मध्य प्रदेशातील पचमढीची भौगोलिक स्थिती,नैसर्गिक परिसर, कॅम्पिंगसाठी उपयुक्त परिसर इत्यादी कारणांमुळे तत्कालीन स्काऊटचे राष्ट्रीय आयुक्त डॉ. हृदयनाथ कुंझरू यांच्या प्रयत्नामुळे या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. मुळात हा लष्कराचा परिसर असून तेथे स्काऊटच्या वूड बॅचचे प्रशिक्षण दिले जाते. येथील सुंदर इमारती अतिशय नियोजनपूर्वक असून अमेरिकन आर्किटेक्ट मिस्टर पोलक् यांनी या सेंटरचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. येथे प्रशासकीय ब्लॉक, बीपी मेमोरियल भवन, कुंजरू कम्युनिटी हॉल, थूर्मन पार्क , क्विनी पार्क नगाझिया पार्क, इन्स्टिट्यूट लक्ष्मी मुजुमदार पार्क इत्यादी देखण्या इमारती आहेत. शेठ किरोडीमल भवन ही प्रशासकीय इमारत आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५६ मध्ये बीपी मेमोरियल गाईड भवनची पायाभरणी केली होती; तर १९६१ मध्ये लेडी बेडन पॉवेल यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. येथील प्रत्येक खोलीला भारतातील राज्यांची नावे देण्यात आली आहेत हे विशेष ! 
   या ठिकाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात कॅम्पिंगचे उपक्रम होतात साधारणपणे एका वेळी ७०० ते ८०० विद्यार्थी येथे सहभागी होऊ शकतात.निवासाची उत्तम सोय, पाण्याची स्वतंत्र व मुबलक व्यवस्था, कॅन्टीन, मेडिकल स्टोअर, स्काऊटशी संबंधित वस्तूंचे दुकान, बँक शाखा, पोस्ट ऑफिस इत्यादी महत्त्वाच्या सुविधा येथे सहज उपलब्ध आहेत.
   या सेंटर मधील फेरीस लायब्ररी हे महत्त्वाचे आकर्षणाचे केंद्र मला जाणवले. क्वीनी पार्क मध्ये ही लायब्ररी असून अतिशय दुर्मिळ पुस्तके तसेच स्काऊट गाईड चळवळीशी संबंधित आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान विभूतींनी स्वहस्ताक्षरात लिहिलेला पत्रव्यवहार येथे पहावयास मिळतो.
  आमची निवासाची सोय बीपी मेमोरियल भवनात झाली.एका ऐतिहासिक वास्तूत निवास करताना अंगावर रोमांच उभे राहिले. उत्तम भोजन,शांत परिसर, स्वच्छ शुद्ध ताजी हवा यामुळे मन उल्हासित झाले. दुपारच्या भोजनानंतर आम्ही पचमढी कॅम्प परिसरात भटकंती केली. सूर्यनमस्कार गार्डन,राजेंद्र गिरी, झील इत्यादी ठिकाणी कधी जिप्सी तर कधी पायी जाऊन भेटी दिल्या.
   राजेंद्र गिरी हे निसर्गरम्य ठिकाण आहे. येथून सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते. दर्या खोऱ्यांनी, दाट झाडांनी बहरलेला हा परिसर असून येथे उंचावर एक उद्यान आहे. या उद्यानातून पचमढीचे दर्शन होते. येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी लावलेला १९५३ सालच्या एका वटवृक्षाचे जतन येथे केलेले दिसून येते. सातपुडा पर्वताचे हे शेवटचे टोक असून उंच उंच टेकड्या पहावयास मिळतात. राजेंद्र गिरीकडे जाताना काही व्ह्यू पॉईंट्स पाहायला मिळतात. जसे पांडव गुहा, हंडी खो, प्रियदर्शनी, बडा महादेव मंदिर, गुप्त महादेव मंदिर, इ. ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाणी भेटी देताना मन तृप्त होत होते. जिप्सी आणि गाईडचे नाममात्र शुल्क भरून आम्ही भेटीचा आणि सफरीचा मनमुराद आनंद लुटला.
   दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजता पंचमढी बायोस्फियर रिझर्व जंगल सफारीसाठी आम्ही सज्ज झालो. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेतील हे संवर्धनक्षेत्र युनेस्कोने २००९ मध्ये बायोस्फियर रिझर्व म्हणून घोषित केले. प्रचंड थंडी आणि धुक्यातून वाट काढित जिप्सी वळणावळणाने मार्गक्रमण करीत होती. जंगलात सागवानी झाडांचे प्रमाण अधिक होते. जंगली आंबा, जांभूळ, अर्जुन, बदाम इत्यादींची झाडे मुबलक आहेत. या राखीव वनक्षेत्रात वाघ, बिबट्या, अस्वल, चितळ, हरिण, सांबर, निलगाय,लांडगा, उडणारी खार, इत्यादी प्राणी असल्याचे गाईड मार्फत कळले.आम्हाला वाघाचे दर्शन होईल ह्या अपेक्षेने आम्ही कडाक्याची थंडी सहन करीत जीव मुठीत धरून प्रवास करीत होतो. मोर, नीलगाय, हरिण, रानगवा, तसेच काही पक्षांचे दर्शन झाले. एका पाण्याच्या ओढ्याजवळ वाघाच्या पावलांचे ठसे पाहूनच समाधान मानावे लागले ! अतिशय दाट झाडी, निसर्गाने नटलेला परिसर पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.
  दुपारच्या भोजनानंतर जटाशंकर ही पवित्र गुफा पाहण्यासाठी निघालो. भगवान शंकराचे प्राकृतिक शिवलिंग तेथे असून निसर्गाचा एक चमत्कार म्हणून या ठिकाणाकडे पाहिले जाते.पुढे पांडव गुफा,महादेव गुफा,चौरागड इत्यादी क्षेत्रांना भेटी दिल्या. त्यानंतर कॅम्प क्षेत्रात परत आल्यावर स्काऊटर्स सोबत विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेतला.जसे रॉक क्लाइंबिंग, पॅरासेलिंग, बॅलन्सिंग,बोटिंग, घोड्यांवर रपेट इत्यादी उपक्रमात विद्यार्थ्यांबरोबर आनंद लुटला.
  पचमढी हे मध्य प्रदेशातील नर्मदापुरम किंवा होशंगाबाद जिल्ह्यातील सातपुडा पर्वतराजीतील एक थंड हवेचे ठिकाण असून साधारण समुद्रसपाटीपासून १०६७ मीटर उंचीवरील हे ठिकाण पाच पुरातन गुहांवरून त्याला पचमढी हे नाव पडले आहे. येथील शांत नयनरम्य परिसर, शुद्ध हवा,स्वच्छ सूर्यप्रकाश, निसर्ग इत्यादीमुळे पंचमढीला सातपुड्याची राणी म्हणून संबोधले जाते. कॅम्प मध्ये सहभागी मुले ही साधारण ११ ते १५ वयोगटातील स्काउट्स आणि गाईड्स होते. घरापासून लांब असूनही मुलं सर्वार्थाने आनंदी होते. शिस्त आणि स्वावलंबन याचा अवलंब करताना दिसत होते.कॅम्प फायर, शेकोटी, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत होते. त्यांच्यासोबत असणारे स्काऊट मास्टर ट्रेनर कैलास पाटील, चिन्मय देशपांडे,भरत खत्री, राहुल सोनवणे, प्रणव अहिरे, विकास खंबाईत,भाऊसाहेब भोंडवे मंगेश बोढाई, सौ.संगीता सोनार, सौ.धांडे यांचे आणि विद्यार्थ्यांचे मैत्रीपूर्ण संबंधांमुळे एक कौटुंबिक वातावरण तेथे निर्माण झाले होते. एकमेकांशी मिळून मिसळून राहणे, आपल्यापेक्षा इतरांची काळजी घेण्यात सर्वजण पुढाकार घेत होते. नॅशनल ट्रेनिंग सेंटर मधील प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची टीम अतिशय तत्पर आणि आदरपूर्वक सेवा देत होते. घरापासून हजार किलोमीटर दूर राहूनही प्रत्येकाला कौटुंबिक जिव्हाळा येथे मिळत होता.
  ॲडव्हेंचर कॅम्प मध्ये सहभागी मुलांकडे पाहून आम्हाला खरे तर त्यांचा हेवा वाटू लागला.शालेय जीवनात अशी संधी आपल्याला का नाही मिळू शकली?
  अतिशय जड अंतकरणाने आम्ही या सातपुड्याच्या राणीचा निरोप घेतला...

शैलेश अशोक पाटोळे
पेठे विद्यालय नाशिक
२४/४/२४
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

Monday, January 1, 2024

संकल्प नववर्षाचा....


                     संकल्प नववर्षाचा...
नववर्षाचा संकल्प ही पाश्चिमात्य संकल्पना असली तरी भारत आणि जगभरात ती रूढ झाली आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी पासून प्राचीन बॅबिलोनिअन्स लोक मार्च महिन्याच्या मध्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाला प्रतिज्ञा किंवा संकल्प करून प्रारंभ करीत असत.राजाप्रती निष्ठा आणि देवाला दिलेले वचन असे त्या संकल्पाचे स्वरूप असे. पुढे ज्युलियस सिझरने कॅलेंडरमध्ये सुधारणा केल्यानंतर नववर्षाचा प्रारंभ एक जानेवारीपासून सुरू झाला.त्याला त्याने जानुस म्हणजे सरत्या वर्षाला धन्यवाद देणारे आणि येणाऱ्या वर्षाला वचन देणारे असे नाव व दोन चेहऱ्यांचे प्रतिकात्मक चिन्ह दिले. पुढील काळात नवीन वर्ष संकल्पना दृढ होऊन देश,राजा, ईश्वर असे स्वरूप हळूहळू कमी होत जाऊन संकल्प स्वतः पुरता मर्यादित झाला.
   पाश्चात्यांच्या अनुकरणातून भारतातही ही प्रथा रूढ झाली. नववर्षाचा संकल्प.. न्यू इयर रिझोल्युशन हा शब्द १८१३ पासून वापरला जात आहे.
  नववर्षाचा संकल्प करणे ही संकल्पना चांगली आहे. कारण त्या निमित्ताने एखादी कृती करण्यास आपण प्रवृत्त होतो, सरसावतो. आपल्या भविष्याकडे आशावादी,सकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहू लागतो.भूतकाळात म्हणजे मागील वर्षांत घडलेल्या घटना विशेषतः चुका आपण सुधारू शकत नाही; मात्र नववर्षात असा संकल्प केल्याने वर्तमान आणि भविष्यात उत्तम आनंददायी आयुष्य जगण्याची संधी उपलब्ध होते.म्हणजे संकल्प प्रगतीसाठी पूरक ठरतो. संकल्प म्हणजे निर्णय, वचन हे आपण घेतलेले असते.ते आपल्यावर लादलेले नसते .आपलं जीवन सुधारण्यासाठी आपणच स्वतःला वचन देत असतो. आपल्या स्वतःसाठी ठरवलेले ते उद्दिष्ट असते. परिश्रमपूर्वक सकारात्मक राहून ठरवलेले संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास ते आपल्या सवयीचे होते. आनंद आणि यश दोन्हींची प्राप्ती यामुळे होऊ शकते. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतो.अर्थात यात निर्धार फार महत्त्वाचा असतो. उत्साहाच्या भरात केलेले संकल्प, इतरांचे अनुकरण करत केलेले संकल्प, लादलेले संकल्प, इर्षेपोटी केलेले संकल्प दीर्घकाळ टिकत नाहीत. परंतु काही लोकांचे संकल्प वर्षानुवर्षे पाळले जातात. त्यात ते खंड पडू देत नाहीत, अशा लोकांचे जीवन चांगल्या अर्थाने बदललेले दिसून येते. संकल्प कसे असावेत? यात स्वतःचा उत्कर्ष साधेल, आनंद मिळेल, आपल्याला उत्तम सवयी लागतील, आपले आरोग्य चांगले राहील अशा बाबींचा समावेश असावा. किंबहुना आपल्या संकल्पामुळे आपले कुटुंबीय मित्रपरिवार शेजारी पाजारी इतरांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे अत्यावश्यक असते.
  संकल्प आणि कृतींचा एकमेकांशी घनिष्ट संबंध आहे. संकल्प केल्याशिवाय कृती आणि कृतीचे स्पष्टीकरण संकल्पनेशिवाय होत नाही. म्हणजेच नववर्षाच्या संकल्पाला कृतीची जोड देणे गरजेचे असते. म्हणून ' एक ना धड भाराभर चिंध्या ' असे आपल्या संकल्पाचे होऊ द्यायचे नसल्यास छोट्या छोट्या गोष्टी, सहज साध्य बाबींपासून संकल्प करावेत.कमीत कमी संकल्प करावेत. म्हणजे संकल्प पूर्ण करण्याचे दडपण किंवा दबाव मनावर येत नाही. कारण संकल्प ही मानसिक क्रिया असून त्याला शारीरिक कृतींची जोड दिल्याशिवाय संकल्प सिद्धी होत नाही.आपण ठरवलेल्या उद्दिष्टांप्रती कायम सकारात्मक राहून ध्येयापर्यंत पोहोचता येऊ शकते. असे न झाल्यास संकल्पपूर्ती होण्यापेक्षा संकल्प मोडल्याची यादी वर्षानुवर्षे वाढत जाते. संकल्प पूर्तीसाठी काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता असते.
   नवीन वर्षाचे संकल्प हे केवळ तरुण प्रौढांसाठीच असतात असे नाही; तर ते लहान मुले,शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील उपयुक्त ठरतात. परंतु लहान मुलांकडून हे संकल्प पूर्ण करून घेण्यासाठी पालकांना धडपड करणे गरजेचे असते.सध्याच्या मोबाईल युगात मुलांची वाचनाची, लेखनाची, ऐकण्याची, बोलून व्यक्त होण्याची सवय मोडत चालली आहे. त्याचा विपरीत परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीवर होताना दिसत आहे. अशावेळी मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठीचे संकल्प सुचवावेत. शारीरिक हालचाली आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्याबाबत सांगावे. जंक फूड, फास्ट फूड यांचे प्रमाण कमी करणे, भाज्या फळे इत्यादींचा जेवणात समावेश करणे, इतरांचा आदर करणे,झोपण्यापूर्वी वाचनाची सवय लावणे, घरात सर्वांनी एकाच वेळी जेवणास बसणे, मुलांशी संवाद साधने,त्यांच्याबरोबर खेळ खेळणे, मुलांसोबत आकाशवाणी, दूरदर्शन youtube वरील चांगले कार्यक्रम पाहणे किंवा ऐकणे. अशा सवयींसाठी संकल्प शालेय विद्यार्थी आणि पालक यांनी करावे जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल.
   बैठ्या जीवनशैलीमुळे आणि फास्ट फूडमुळे लहान मुलांप्रमाणेच तरुणांमध्ये ही स्थूलत्वाचे प्रमाण वाढत चालले आहे.व्यायाम आणि आरोग्य याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, नोकरी व्यवसायातील चढ उतार यामुळे ताणतणाव वाढत आहेत. त्याचा विपरीत परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर व शारीरिक हालचालींवर होऊ लागला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी दिवसभरातून स्वतःसाठी काही वेळ राखून ठेवून छंद जोपासण्याची गरज आहे. छंदांमुळे ताण कमी होण्यास मदत होते. संगीत ,नृत्य नाट्य,गायन, चित्रकला, लेखन इत्यादींचा छंद या काळात जोपासता येईल.सतत सकारात्मक राहण्याचा संकल्प देखील उपयुक्त ठरू शकतो .यामुळे आपला आत्मविश्वास दुणावतो. कामाची यशस्विता वाढते. कठीण परिस्थितीशी दोन हात करण्याची हिम्मत प्राप्त होते. आळस झटकून स्वतःचे काम स्वतः करण्याचा संकल्प ऊर्जादायी ठरतो.पुस्तकांची मैत्री, पैशांची काटकसर किंवा बचत, सकाळी लवकर उठणे, सकाळी अथवा सायंकाळी फिरायला जाणे, कोणत्याही एका कलेशी मैत्री करणे, इत्यादी छोटे - छोटे संकल्प आपल्या आयुष्याला चांगल्या अर्थाने कलाटणी देऊ शकतात .
  ' भले बुरे जे घडून गेले
   विसरून जाऊ सारे क्षणभर..'
            असे म्हणून मागील वर्षी भूतकाळात काय घडले याचा विचार न करता संकल्पावर लक्ष केंद्रित करावे.
   चला तर मग छोटासा का होईना एखादा संकल्प करून त्याच्या पूर्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहूया ! कितीही अडचणी आल्या ,संकटे आली तरीदेखील संकल्पपूर्तीसाठी निश्चल राहूयात.....
  जिंदगी मे एक अरमान लेकर चले है
  मुश्किलो को हम फरमान देकर चले है l
  मंजीलो को हम पाकर रहेंगे
  चुनौतियो को हम हरा कर रहेंगे l
  माना कि लंबे रास्ते अनेकों कठीनाई हैं
  लेकिन हमने भी आसमा को छूने की कसम खाई हैl
    सर्वांना नूतन वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा !

लेखन:
शैलेश अशोक पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक 
९८६०७४९७९०

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...