*अखंडित वाचीत जावे l*
नमस्कार,
पुस्तक वाचनाबद्दल व.पु.काळे यांनी असे म्हटले की," वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो, तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं..." या उद्देशानेच नाशिकचे जेष्ठ साहित्यिक मनोहर शहाणे यांच्या अनित्य आणि ब्रह्मडोह या दोन कथासंग्रहाबद्दल रसिक वाचकांशी संवाद साधण्याचा हा छोटासा प्रयत्न !
१९६० नंतरच्या काळात मराठी साहित्यात विशेषतः कथा व कादंबरीक्षेत्रात मोलाची भर घालणारे मनोहर शहाणे एक जाणकार समीक्षक म्हणूनही ओळखले जातात. स्वप्नरंजन आणि काल्पनिक लेखनापेक्षा वास्तव लेखनाकडे त्यांचा कल अधिक आहे. विविध साहित्य चळवळी आणि प्रसिद्धीपासून शहाणे लांब राहिलेले दिसून येतात. आजपर्यंत अकरा कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, एक नाटक, चार एकांकिका त्यांनी लिहिल्या असून त्यांच्या काही कथांचा इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतही अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. शालेय जीवनात शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी क्रांती नावाचे नाटक त्यांनी लिहिले होते. पुढे वर्तमानपत्रात सेवा करीत असताना वर्तमानपत्राच्या गरजेतून त्यांनी लेखन प्रपंच सुरू ठेवला. वर्तमानपत्रातून प्रारंभी त्यांच्या कथा " श्रीमश " या टोपण नावाने प्रसिद्ध होत. ज्येष्ठ कथालेखक अ.वा. वर्टी यांच्याबरोबर अमृत चे सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.
१९६१ मध्ये त्यांचा शहाण्यांच्या गोष्टी हा कथासंग्रह अभिनव प्रकाशनने प्रकाशित केला. १९८७ मध्ये अनित्य आणि १९९९ मध्ये ब्रह्मडोह, मनमित प्रकाशनने प्रसिद्ध केला. तिन्ही कथासंग्रह मिळून मनोहर शहाणे यांनी ४५ कथा लिहिल्या आहेत. सहजता आणि वास्तव हे त्यांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य दिसून येते.
अनित्य या संग्रहात बारा कथांचा समावेश आहे. पुण्याच्या चिरायू प्रकाशनने तो प्रकाशित केला आहे. त्यातील क्रियाकर,चित्रसापळा, फरास आणि अंधारावर पाल या कथा मृत्यूवर आधारित आहेत. तिसऱ्याची आई,अनित्य या कथा दारिद्र्य आणि मैत्रीवर तर अन्नदान, लेणं, फेडआउट या कथा प्रेम - प्रेयसी - प्रियकर या विषयांवर बेतलेल्या आहेत. तेरेद्वार आणि धुई ह्या कथा जीवनातील संघर्षांवर आधारित आहेत. रूळ वाहतात ही कथा रेल्वे स्थानकावरील अस्वस्थ नायकाच्या मनाचे चित्रण करणारी कथा आहे.
ब्रह्मडोह हा शहाणेंचा तिसरा कथासंग्रह १९९९ मध्ये प्रकाशित झाला. पद्मगंधाने २०१५ मध्ये या संग्रहाची दुसरी आवृत्ती काढली. यात विविध विषयांवरील १७ कथांचा समावेश आहे.प्रेम- प्रेमभंग, एकट जगणं,मरणाकडे होणारा प्रवास, बदलता काळ, आशा - अपेक्षा, बीभत्स दृष्टी ,राग, लोभ, गर्व इत्यादी कथा विषय झाले आहेत.
ब्रह्मडोह ही शीर्षक कथा आहे. दादा आणि उपासनी अशा दोन मित्रांची ही कथा असून आयुष्यात विरह, एकटेपणा सहन न झाल्याने उपासनी मृत्यूचा मार्ग स्वीकारतो. पोहोता येत नसूनही पुरात उडी घेतो. अपराचिपरा ही कथा कृष्णराव या वयस्क असणाऱ्या पात्राची मनोदिशा व्यक्त करणारी कथा आहे. तावदानं ही सुद्धा बेहराम आणि झिल्लू या वयस्क पती-पत्नीची कथा असून मृत्यू हा अटळ विषय यात हाताळला आहे. ऊन कवडसा ही जगन्नाथ या वेडगळ तरुणाची कथा असून त्याच्या वेडगळ वागण्याचं कारण जाणून घेण्यात वाचकांचे कुतुहल जागृत होते. सूर्यउभा मध्ये तरुण मुलाचे निधन झाल्याने व्यथीत झालेल्या पित्याची करून कहाणी आहे. बामणाच्या काचाही देखील एका वेडसर काचा खाणाऱ्या मुलाची कथा आहे.मुलाच्या वेडसरपणामुळे हाताश झालेल्या आईचे भावविश्व शहाणेंनी अतिशय संवेदनशीलपणे रेखाटले आहे.कालबाह्य कथेतून बदलत्या काळात कालबाह्य झालेल्या व्यक्तीची अवस्था लेखक वर्णन करतात. झाड या कथेत स्त्रीच्या भावभावनांचे चित्रण लेखक करतात. वासना आणि बीभत्सपणा यांचा अतिरेक न होऊ देता लेखक व्यक्त झालेले दिसतात. माशांचा थवा ही कथा नुकत्याच वयात आलेल्या दत्तू आणि सुशीची प्रेम कथा आहे. खुजा ही कथा सर्कशीतल्या विदूषकाची मनोव्यथा आहे. इरिंग-मिरिंग, आर्त ,चांडाळ,विटंबना काळातील गेंगाण्या या कथा आशयाच्या दृष्टीने वाचनीय आहेत. विसंगत ही भिन्न स्वभावाच्या पती-पत्नीची वैचारिक वादाची कथा आहे.
थोडक्यात मनोहर शहाण्यांच्या कथांतून सर्वसामान्यांच्या आयुष्यातले प्रसंग कथाविषय होऊन अवतरतात. दारिद्र्य, उपासमार, लाचारी यांसारख्या विषयांना ते प्राधान्य देतात. वृद्धत्व, स्वभावातील बदल, उतारवयातील वर्तन या विषयांकडे त्यांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. विविधअंगी विषय हाताळणारे मनोहर शहाणे गंभीर , तात्विक आणि वैचारिक लेखन करणारे साहित्यिक आहेत. त्यांच्या कथेतील आशय, अनुभव आणि त्यात योजलेली पात्रे, प्रसंग, घटना, सर्वसामान्य वाचकांच्या परिचयाच्या असून वाचकांना कथेतील प्रसंगआपल्या अवतीभवती घडत असल्याचा भास होतो. त्यांची निवेदन पद्धती प्रवाही असून कुठेही रटाळपणा येणार नाही याची काळजी लेखकाने घेतलेली दिसते. मोजकी आणि आवश्यक पात्र संख्या, अलंकारिक भाषा,वाक्प्रचार म्हणींचा योग्य ठिकाणी वापर केला असून कुठेही अतिरेक झालेला नाही.
नाशिकच्या परिघात घडलेल्या या साहित्यिकाचे लेखन खरोखरच मनाला भावणारे आहे. जे पाहिले, अनुभवले तेच साहित्यात त्यांनी मांडल्यामुळे त्यात जिवंतपणा आहे.नाशिकच्या या उत्तुंग साहित्य प्रतिभा लाभलेल्या साहित्यिकाचा निश्चितच नाशिककर म्हणून आपल्याला अभिमान वाटतो. मराठी साहित्यातील त्यांचे योगदान अव्हेरुन कसे चालेल..?
शैलेश अशोक पाटोळे
नाशिक
२५/१/२०२४
No comments:
Post a Comment