१llअखंडित वाचीत जावे ll१
नमस्कार
आपल्या स्फुट काव्यात समर्थ रामदासांनी केलेला "दिसामाजि कांहीतरी ते ल्याहावें l प्रसंगी अखंडित वाचीत जावे l" हा उपदेश लक्षात घेता सुरू झालेल्या वाचनाच्या उपक्रमात सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयातून ' गंधार 'हाती लागले.
साहित्य, समीक्षा ,संशोधन आणि शिक्षण अशा विविध प्रांतात मुसाफिरी करणारे नाशिकचे प्रा. डॉ.चंद्रकांत वर्तकांचा गंधार हा कथासंग्रह ज्योती प्रकाशनने २००९ मध्ये प्रकाशित केला. या कथासंग्रहाच्या आकर्षक मुखपृष्ठाची रचना नाशिकचे ख्यातनाम चित्रकार श्री.धनंजय गोवर्धने यांनी केली आहे. १७४ पानांच्या या संग्रहात १२ विविध विषयांवरील कथांचा समावेश आहे. डॉ. चंद्रकांत वर्तक नाशिक मधील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवारत होते. त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील महाड होय.
प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, आठ कथासंग्रह, इ. विविधांगी लेखन वर्तकांनी केले आहे. प्राध्यापक म्हणून नोकरी करताना आलेले अनुभव, मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था, स्त्री-पुरुषांची मानसिकता,माणसांच्या स्वभावातील गुणदोष, नातेसंबंध, राग - लोभ - द्वेष इत्यादी त्यांच्या कथांचे विषय बनले आहेत. समाजातले वास्तव, भावभावना, प्रेम - वासना, भावनिक कोंडमारा, ऐन तारुण्यातील वैधव्य, इत्यादी विषय त्यांच्या कथांमधून डोकावतात. विषयांतील वैविध्य डॉ. वर्तकांची वैचारिक प्रगल्भता दर्शविते. जीवनातील साधे साधे प्रसंग वर्तकांनी अतिशय सुंदर रीतीने वर्णन केले आहेत. म्हणूनच मराठी कथा प्रांतात डॉ. वर्तकांच्या कथांना विशेष स्थान आहे. प्रारंभापासून शेवटपर्यंत त्यांच्या कथा कुतूहल टिकवून ठेवणाऱ्या आहेत. आशयानुकुल भाषा, वाचकांना खिळवून ठेवणारे कथानक तसेच साधेपणा ही डॉक्टर वर्तकांच्या कथेची वैशिष्ट्ये ठरतात. प्रतिमांची निर्मिती हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.
गंधार मधील कथांचे वर्णन करताना स्वतः वर्तकांनी असे म्हटले आहे की, " आयुष्यातील तीव्र अनुभवांचे चिंतन म्हणजे या कथा होत." या संग्रहातील कथा विषयांच्या अनुषंगाने भिन्न असल्या तरी मानवी मन, स्वभाव, नातेसंबंध हा त्यांतील समान धागा आहे.
' गर्भसत्य ' मधून साहित्य लेखनात होणाऱ्या चौर्यकर्माकडे वाचकांचे लक्ष लेखक वेधतात.शरदचंद्र या प्रथितयश साहित्यिकाचे खरे रूप कथेत पहावयास मिळते. ' आजोळ 'ही भावनिक कथा असून प्रत्येकालाच असलेली आजोळची ओढ हे या कथेचे आशयसूत्र आहे.लेखकाला चीन प्रवासात भेटलेल्या मेरीची संघर्षगाथा ' शांघायच्या मेरीची गोष्ट' मध्ये आहे. ' पंचवटी एक्सप्रेस' ही एक आगळी वेगळी कथा असून निसर्ग आणि माणसांच्या मनातील संघर्ष या कथेतून लेखक अधोरेखित करतात. गृहस्थाश्रम आणि संन्याशाश्रम या दोन किनाऱ्यावर हिंदोळे घेणारी ' पाश ' ही कथा वाचकांना आनंद देते. समर्थ रामदासांनी सांगितलेले," आधी प्रपंच करावा नेटका, "असे सांगूनही त्यांचे अनुयायी मात्र ढोंगीपणाने वागताना, देखावा करताना दिसतात.प्रेम भावनेचं संवेदनशील वर्णन ' त्याची मावशी आणि तो' मध्ये आहे. ' लागेबांधे : जुळलेले ओघळलेले !' ही दोन समवयस्क परंतु भिन्न स्वभावाच्या मित्रांची कथा आहे. स्त्रियांवर वर्चस्व गाजू पाहणाऱ्या पुरुषी मानसिकतेची' जाग ' ही कथा सुनंदाला लढण्याचे बळ देते. ' द्वैत ' कथेतून एका स्त्रीच्या अंतर्मनाची व्यथा उलगडून लेखकाने उलगडून दाखवली आहे.. ' बंध अनुबंध ' मधून महाडच्या बालपणीच्या आठवणी लेखकाने वर्णिल्या आहेत.लग्नानंतरचा आईचा सर्वच पातळ्यांवरील संघर्ष ' बाई ' या कथेत लेखक मांडतात.व्यवस्थेविरुद्ध लढा देणाऱ्या व्रतस्थ, प्रामाणिक वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमाताई ' व्रती ' या कथेतून भेटतात.
गंधार या संग्रहात स्त्री प्रतिमा आधुनिक विचाराच्या, पुढारलेल्या, संवेदनशील,धाडसी, संघर्ष करण्यास सज्ज असलेल्या डॉ. वर्तकांनी मांडल्या आहेत. कथांमधील स्त्री चित्रण कमी प्रमाणात असले तरी अतिशय संवेदनशीलपणे केलेले दिसून येते.
गंधार मधील भाषा आशय नेमकेपणाने वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणारी आहे. अधून मधून केलेली तात्विक मांडणी वाचकांच्या मनाला भिडणारी आहे. भाषेत जिवंतपणा असल्याचे जाणवते. काही प्रमाणात उपमा - उत्प्रेक्षादी अलंकार, म्हणी, वाक्प्रचारांचा वापर केलेला दिसतो. त्यामुळे भाषेचे सौंदर्य निश्चितच वाढलेले आहे.
गंधार मधील कथांच्या वाचनातून एक श्रेष्ठ कथा लेखक म्हणून प्रा. डॉ. चंद्रकांत वर्तक यांचा उल्लेख का होतो, ते आपसूकच कळते.
रसिक वाचकांना अलवार, संवेदनशील कथांचा ' गंधार ' निश्चितच सुखावेल यात शंका नाही !
✍️✍️✍️✍️✍️✍️
शैलेश अशोक पाटोळे
नाशिक
१८ जानेवारी २०२४
No comments:
Post a Comment