Friday, September 18, 2020

अजात शत्रू व्यक्तिमत्व.. श्री एकनाथ कडाळे

   ___________________________         एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व 
    ......श्री एकनाथ कडाळे  _____________________________       रात्रीचे अकरा वाजले असतील.फोन खणखणला. इतक्या उशिरा फोन आल्यावर नेहमीप्रमाणे छातीत धडकी भरली.समोरून श्री.साहेबराव पवार बोलले."सर, आपले कडाळे सर गेले !"दोन मिनिटे मन सुन्न झाले. काय बोलावे,हे सुचेनासे झाले.अशा वेळी कोणी तरी मित्र समोर असता तर त्याच्या गळ्यात पडून धाय मोकलून रडावे, असे झाले. परंतु रात्रीची वेळ.स्वतःला सावरले. काय करावे सुचेना. कंठ दाटून आला. डोळे बंद करून तसाच पडून राहिलो. परंतु,मन मात्र आठवणींचे अश्रू ढाळू लागले!
   श्री.एकनाथ कडाळे सर व मी ,नाशिक एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून १९९५ साली बरोबर नोकरीला लागलो. १९९७ ला त्यांची ओझरच्या नवीन इंग्रजी शाळेत उपशिक्षक म्हणून बदली झाली. लवकरच शाळेच्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतले. आम्ही दोघेही नाशिकहुन शाळेत ये-जा करत असू. आम्हा दोघांचीही पार्श्वभूमी खेड्यातली असल्याकारणाने मैत्री लवकर जमली. त्यांच्या रूपाने एक मार्गदर्शक मित्र मला लाभला.
   उंची बेताचीच, अंगकाठी ने कृश, तसे त्यांचे वागणे बोलणे देखील शरीरयष्टी ला साजेसे असेच होते. त्यांचे राहणीमान अत्यंत नीटनेटके होते.
   नाशिक जिल्ह्यातील,निफाड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी वसलेले कोठुरे हे त्यांचे मूळ गाव. वडील व आई बेताची असलेली शेती करत. कधीकधी मोलमजुरी करत. शेतात राहता राहता सरांचे वडील कोठुरे गावात गोदावरी काठी असलेल्या बाणेश्र्वर मंदिराची देखभाल करीत.
त्यामुळे घरात अध्यात्माचा वारसा होता. आई आणि वडील दोघेही अशिक्षित. त्यांना दोन मुले व तीन मुली होत्या. परिस्थिती मुळे तसेच मार्गदर्शनाच्या अभावी मुलांना शिक्षण मिळाले नाही. मुलामुलींची लग्न झाली. या सर्वांमध्ये श्री. एकनाथ कडाळे मात्र परिस्थितीवर मात करून शिकले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबात ते एकटेच शिकून पूर्ण कुटुंबाचा आधार बनले.
    कोठुरे येथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण करून निफाड येथे महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी घेतले. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शिक्षण पूर्ण केले.
हुशार विद्यार्थी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. कष्ट करण्याची सवय आणि जिद्द यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण केले.पुढे मित्रांच्या सल्ल्यानुसार नाशिक येथे बी.एड. कोर्स सरांनी पूर्ण केला. उत्तम गुणांनी कोर्स पूर्ण केल्यानंतर नाशिक एज्युकेशन सोसायटी मध्ये त्यांना गुणवत्तेच्या निकषावर उपशिक्षक म्हणून नोकरी मिळाली.
   नोकरी लागण्यापूर्वीच त्यांचे सौ.कुसुमबाई यांच्याशी विवाह झाला. चि. विलास, चि. सुवर्णा चि. ऋषिकेश अशी तीन अपत्ये त्यांना झाली. १९९८ यावर्षी ते नासिक मध्ये स्थायिक झाले.
  मुलांवर त्यांनी उत्तम संस्कार केले. शाळा ही आपली अन्नदाता आहे.शाळा हेच आपले दैवत आहे. तिथे प्रामाणिकपणे आपण सेवा केली पाहिजे,असे त्यांचे मत होते. शाळेतील विद्यार्थ्यांवर त्यांनी पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. गरीब विद्यार्थ्यांशी ते अधिक जिव्हाळ्याने वागत. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असत. अत्यंत पोटतिडकीने अध्यापनाचे कार्य करीत. शिक्षा करणे कधी त्यांना जमले नाही. परंतु,बेशिस्त विद्यार्थ्यांना संस्कारांचे डोस पाजताना कडाळे सर नेहमी दिसत. कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण व्हावे,असा त्यांचा अट्टहास असे .त्यांचे टाचण वही, कॅटलॉग, दप्तर नीटनेटके असे.
सर शांत स्वभावाचे आणि मितभाषी होते. मराठी आणि भूगोल हे दोन विषय तळमळीने विद्यार्थ्यांना शिकवीत असत. संतांचे साहित्य, अभंग,ओव्या यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर सुसंस्कार ते करीत. वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मायेच्या ममतेने आणि शांत स्वरात ते समज देत. विद्यार्थ्यांवर कधी आवाज चढवलेला त्यांना आम्ही पाहिले नाही.
  श्री.कडाळे सर एक उत्तम अध्यापक होते. प्रामाणिकपणा,विश्वासू,भीडस्त, सुस्वभावी, निर्मळ अंतःकरण, असे नानाविध गुण त्यांच्यात ठासून भरलेले होते. इतरांबद्दल राग,द्वेष,मत्सर त्यांच्या ठाई अजिबात नव्हता. सर्वांशी मित्रत्वाचे संबंध त्यांनी जपले.
   अगदी कमी कालावधीत त्यांना उपमुख्याध्यापक पदाची संधी मिळाली. पदाधिकारी झाल्यानंतर देखील त्यांच्या स्वभावात तसूभर देखील बदल झाला नाही. व्यवस्थापनात सर तरबेज नसले तरी,अनुभव आणि स्वभावामुळे उत्तम काम कडाळे सरांनी करून दाखविले. शिक्षकांवर विश्वासाने जबाबदारी टाकून ते काम करून घेत.
    याच कालावधीत,त्यांची नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक मंडळावर निवड होऊन पहिल्यांदाच संस्थेचे अर्थ सहकार्यवाह पद मिळाले. संपूर्ण शालेय कामकाज सांभाळून संस्थेतील जबाबदारी पार पाडली. त्यांच्या स्वभावातील नम्रता या गुणामुळे त्यांना पदाधिकारी म्हणून काम करताना फारशा अडचणींना तोंड द्यावे लागले नाही.
    कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण करण्याची त्यांना सवय होती. काम हातावेगळे केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.
   आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही.याची ते अधिक काळजी घेत असत. कोणाशी भांडण तंटा कधी केला नाही. सर्वांशी प्रेमाने बोलायचे.
कधीकधी विनोद निर्माण करून इतरांचे मनोरंजन देखील ते करीत. वय विसरून तरुण शिक्षकांमध्ये मिसळून जात. स्वतःवर झालेला विनोद पचवण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. त्यादृष्टीने श्री.कडाळे सर ताकदवान होते!
  लोकांशी संवाद साधताना नेहमी वादविवाद टाळायचे. सौम्य शब्दात संवाद साधायचे. अहंकार, पदाचा गर्व याचा लवलेशही त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसत नव्हता.ग्रामीण भागातील आणि विशेषतः गरीब कुटुंबातील मुलांना उत्तम पद्धतीचे शिक्षण मिळावे,यासाठी ते खूप प्रयत्न करीत. बेताच्या आर्थिक परिस्थितीतही अधिक चांगलं काय करता येऊ शकेल,यांचा नेहमी ते विचार करत.
  नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अर्थ सहकार्यवाह पदी काम करत असताना अधिकाधिक काम संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान नाही,ते जाणून घेण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न कडाळे सरांनी केले. आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या कडून देखील विविध गोष्टी समजावून घेताना त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही.
   त्यांच्यातील नम्रता,विश्वासूपणा, शांत आणि निगर्वी स्वभाव यामुळे संस्थेने त्यांना दुसऱ्यांदा अर्थ सहकार्यवाह पदाची जबाबदारी दिली. साधारण एक वर्षापूर्वी मुख्याध्यापक म्हणून संस्थेच्या ति. झं. विद्यामंदिर भगूर येथे त्यांची नेमणूक झाली होती.संस्थेबद्दल आणि संस्था पदाधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात होती. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर सर तसेच उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके सर यांना ते गुरुस्थानी मानत. संस्थेचे कार्यवाह श्री. राजेंद्र निकम यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याप्रती दाखविलेला विश्वास कडाळे सरांनी सार्थ ठरविला.
    माणूस काही गोष्टीत कितीही कच्चा असला तरी चालेल.परंतु ,तो माणूसकीत पक्का असला पाहिजे. कडाळे सर माणुसकी जपणारे होते.
  देव आपल्याला देतो तो चेहरा आणि आपण निर्माण करतो ती ओळख ! कडाळे सरांनी आपल्या वागण्या बोलण्यातून आणि व्यवहारातून स्वतःची उत्तम ओळख निर्माण केली होती.
   सर्वांना सुखी ठेवणं आपल्या हाती नसलं तरी आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही,हे आपल्या हातात आहे,असं ते नेहमी सांगायचे.
   साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच आजाराची चाहूल त्यांना लागली होती. परंतु नेहमीच्या स्वभावाने स्वतःच्या आजारपणाकडे त्यांनी फारसे गांभीर्याने पाहिले नाही. थोड्या उशीरानेच ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले. साऱ्या जगाला भेडसावणाऱ्या कोरोना ने त्यांनाही ग्रासले ! प्राणवायूची कमतरता भरून काढण्याचा दहा-बारा दिवस प्रयत्न झाला. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नांना अपयश येऊन दि. १६ सप्टेंबर २०२० रोजी श्री.कडाळे सर यांची प्राणज्योत मालवली. नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि सरांचा मित्रपरिवार अखंड सरांच्या वैद्यकीय उपचारासाठी झटत होते. श्री.कडाळे सरांच्या जाण्याने संपूर्ण संस्था आणि त्यांचा मित्र परिवार शोकसागरात बुडाला. एक हसतमुख, सौजन्यशील आणि जगमित्र आम्हाला सोडून गेला... खूप सारी वेदना आणि हळ हळ मनी दाटून येते ...एक दोस्त मध्येच निघून गेला!!
    माणसाचं जगणं सुंदर हे त्याच्या विचारांनी होत असतं. त्याचे विचार हे जर सुंदर आणि सकारात्मक असतील तर सर्वच त्याची नेहमी आठवण ठेवतात. कडाळे सर हे त्यांच्या विचारांमुळे चिरंतन आपल्या स्मरणात राहतील.
  एक आदर्श पुत्र,जबाबदार पिता,आदर्श व संस्कारी शिक्षक,सच्चा दोस्त, मार्गदर्शक श्री. कडाळे सरांच्या जाण्याने हरवून बसलो आहोत!
 असे म्हणतात की, एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही आणि जग थांबत नाही. पण हे कोणालाच कसे समजत नाही,की लाख मित्र असले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही! खरोखर जीवन हे क्षणभंगुर आहे. आपल्या जीवनात कितीतरी व्यक्ती येतात आणि मनात घर करुन राहतात. काहीजणांना आपला जीवन प्रवास मधूनच सोडून द्यावा लागतो.या व्यक्ती अशा ठिकाणी कायमचे निघून जातात,तेथून त्यांना कोणीही परत बोलवू शकत नाही.जसे त्यांच्या असण्याने आपल्या जीवनात उल्हास असतो,तसे त्यांच्या जाण्याने एक न भरणारी पोकळी निर्माण होते..... श्री.एकनाथ कडाळे सर यांच्या आकस्मित निधनाने ,नाशिक एज्युकेशन सोसायटीचे मोठे नुकसान झाले आहे.
      

श्री.शैलेश पाटोळे
उपशिक्षक
पेठे विद्यालय,नाशिक.
दिनांक..१८ सप्टेंबर२०२०

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...