Sunday, August 22, 2021

क्षण : नवा पेशवे वाड्यातील !

            मंतरलेले क्षण ....

     सन.२००० च्या सप्टेंबर महिन्याचा पहिला दिवस. नवीन इंग्रजी शाळा ओझर या शाळेतून काही सहकाऱ्यांबरोबर माझी देखील बदली झाली होती. नवा पेशवे वाडा अर्थात पेठे विद्यालयातील तो माझा पहिला दिवस.संस्थेच्या मुख्य शाखेत बदली झाल्याचा आनंद आणि भीती ! शाळेची नूतन वास्तू नुकतीच बांधून झाली होती.
   आजपर्यंत पेठे विद्यालयाबद्दल खूप ऐकले होते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही जागा परंपरा जपत शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. शाळेबद्दल कुतूहल होतेच....
     १९११ मध्ये मुंबईच्या रॉबर्ट मनी या मिशनरी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करणारे कै. दादासाहेब पुणतांबेकर यांनी नाशिक मध्ये इंग्रजी शिक्षणाचा वर्ग सुरू करण्याचे ठरविले. सुधारणावादी दृष्टिकोन असलेले नाशिक मधील उत्साही व कार्यतत्पर रेव्हरंड शिंदे यांनी त्या इंग्रजी वर्गाची जबाबदारी स्वीकारली. नाशिकमधील मिशनरी सोसायटीने त्यास सहाय्य केले. अल्पावधीतच ख्रिस्ती मिशनरी सोसायटीच्या प्रयत्नांमुळे त्या इंग्रजी शिक्षण वर्गाचे रूपांतर सेंट जॉर्जेस हायस्कूल मध्ये झाले. नाशिक मधील मेन रोड वरील चित्रमंदिर सिनेमा शेजारील राजेबहाद्दर वाड्यात ही शाळा भरू लागली.परंतु नाशिक सारख्या धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या या परिसरात मिशनरी शाळा दीर्घ काळ सुरू राहणे शक्य नव्हते. अनंत अडचणी निर्माण होऊ लागल्या. शाळा बंद पडण्याची स्थिती देखील निर्माण झाली. अशा प्रसंगी काही नामवंत शिक्षण धुरिणांनी सेंट जॉर्जेस हायस्कूलची जबाबदारी स्वीकारली. मोठ्या धैर्याने शाळा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले. थोड्याच अवधीत या शाळेचे मॅट्रीक पर्यंतचे वर्ग सुरू झाले. या काळात कै.वि.म. केसकर, कै. नानासाहेब गाडगीळ, कै.शिवरामपंत कळवणकर यांसारखे उत्तम शिक्षक शाळेला लाभले.
    १९२३ मध्ये ख्रिस्ती मिशनरी संस्थेने सेंट जॉर्जेस हायस्कूल चालविण्यास असमर्थ असल्याचे सांगून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सेंट जॉर्जेस हायस्कूल मध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनी न डगमगता स्वतःच्या हिमतीवर शाळा चालू ठेवण्याचा निर्णय घेऊन, दि.१ एप्रिल १९२३ रोजी नाशिक एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून सेंट जॉर्जेस हायस्कूलचे कामकाज सुरू झाले.
    नाशिक एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष म्हणून कै. रावबहादूर वि. अ. गुप्ते यांनी १९४० पर्यंत संस्थेचे यशस्वी नेतृत्व केले. तसेच कै. श्री.मो.रा. गोडबोले हे पहिले मुख्याध्यापक होते. आजीव सदस्य मंडळाकडून संस्थेचा कारभार सुरू झाला.या मंडळातील काही सदस्य हे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
   नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाल्यापासून जवळपास वीस-बावीस वर्षांचा काळ संस्थेची परीक्षा पाहणारा ठरला. संस्थेला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. खर्चासाठी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे पगार करिता निधी अपुरा पडे. आजीव सदस्य मंडळातील काहीजण पदरमोड करून खर्च भागवीत.संस्थेची आर्थिक गरज भागविण्याकरिता प्रसंगी स्वतःचे घर गहाण ठेवण्याची तयारी दर्शविणारे कै. रा.के. तथा अण्णा वैद्य ज्ञानदानाच्या कार्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे सद्गृहस्थ होते. अशा शिक्षकांमुळे संस्था टिकून होती.
   त्याकाळी पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण केवळ नगरपालिकेच्या सरकारी शाळांमधून दिले जात होते. १९३८ साली आपल्या संस्थेचे प्राथमिक शिक्षण देणारे विद्यालय असावे,असे वाटून प्राथमिक शिक्षण मंदिर सुरू करण्यात आले.राजेबहादुर वाड्यात आता प्राथमिक शिक्षण मंदिर आणि सेंट जॉर्जेस हायस्कूल असे पहिली ते अकरावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय नाशिक एज्युकेशन सोसायटीने उपलब्ध करून दिली. हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागल्याने जागेची निकड निर्माण होऊ लागली.
   या दरम्यान मुंबई इलाख्याचे पहिले लोकनियुक्त मुख्यमंत्री कै. नामदार बाळासाहेब खेर नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नाशिकला आले होते. त्याप्रसंगी तत्कालिन नाशिकचे आमदार कै. गो.ह. देशपांडे, श्री. वामनराव यार्दी, ॲड. काकासाहेब रहाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संस्थेची जागेची अडचण लक्षात आणून दिली.तसेच रविवार पेठेतील पूर्वीचा कै. रायरीकर सावकारांचा, परंतु नंतर पेशवे सरकारकडे आलेला वाडा शाळेसाठी सुचविला. खुद्द पेशवे या वाड्यात राहत असत. आता या वाड्यात सरकारी कोर्ट वगैरे भरत होते. थोड्याच अवधीत पेशवेवाडा हे नाव कायम ठेवण्याच्या अटीवर नाशिक एज्युकेशन सोसायटीस हा पेशवेवाडा शाळा चालविणे करिता मिळाला.
   संस्थेचे निस्वार्थी आजीव सदस्य मंडळ, निरपेक्ष भावनेने ज्ञानदानाचे कार्य करणारे व्यासंगी शिक्षक यांनी अथक परिश्रमाने शाळा नावारूपास आणण्यासाठी प्रयत्न केले. सर्व शिक्षकांच्या कळकळीमुळे आणि कर्तबगारीने विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली. सरकार कडून मिळालेल्या जागेवर इमारत बांधणे आता गरजेचे वाटू लागले होते. पेशवे वाड्याच्या जागेवर इमारत बांधण्यासाठी निधी कसा उपलब्ध करावा? असा प्रश्न निर्माण झाला. त्याप्रसंगी संस्थेचे प्रति सहानुभूती असणाऱ्या सह्याद्री विमा कंपनीने जागा तारण ठेवून २०हजार रुपयांचे कर्ज दिले.१९४२ साली नव्या इमारतीचा पाया घातला गेला. मूळचे नाशिकचे असलेले कै. श्रीमान वामन हरी पेठे व कै. श्रीमान गणेश हरी पेठे बंधू यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत स्वतःच्या कर्तबगारीने मुंबई इलाख्यात सोन्या-चांदीचे व्यापारी म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. संस्थेची पैशांची निकड लक्षात घेऊन संस्थेचे एक माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध वकील ॲड. कै. रामचंद्र विष्णू तथा काकासाहेब रहाळकर यांनी पेठे बंधूंना वैयक्तिक विनंती करून संस्थेसाठी वीस हजार रुपयांची देणगी मिळवली. पेठे बंधूंनी देखील उदारहस्ते देणगी देऊन संस्थेला मदत केली. पेठे बंधूंच्या देणगीमुळे संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली. त्याचाच एक भाग म्हणून सेंट जॉर्जेस हायस्कूलचे नामकरण पेठे विद्यालय असे करण्याचे निश्चित झाले. हा समारंभ दि.१५जानेवारी १९४४ रोजी पुणे विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरू बॅ.बाबासाहेब जयकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
   पेठे विद्यालयाचा स्टाफ रूम मधला पहिला दिवस. मी पुरता गांगरलेला. एकाच कक्षात पार्टिशन करून शिक्षक आणि शिक्षिका यांची विश्रामिका. श्री.दि.कृ.गोटखिंडीकर, श्री.पां. म. अकोलकर,श्री.चंद्रशेखर वाड,श्री.डी.एस.कुलकर्णी, सौ.अनघा काशीकर, सौ.निशा देवळे, सौ.तारा रत्नपारखी, श्री.नवीन तांबट, श्री.चंद्रकांत भालेराव यांसारखे दिग्गज शिक्षक ! त्यांच्या गप्पा आणि हास्यविनोदात मी कोपरा धरून बसलो होतो. कर्मचारी श्री.काशिनाथ तूपलोंढे सर्वांना चहा देत होते. मी स्वभावानुसार चहासाठी नाही म्हटले. तितक्यात श्री.अकोलकर सर रागावले." का नाही घेत ? " चहा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत आणि त्याला नाही म्हणतोस म्हणजे काय !  तुमच्यासारख्या तरुणांनी चहाला नाही म्हणणं म्हणजे चहा चा अपमान ! त्यांच्या बोलण्याने छातीत धस्स झाले. मुकाटपणे चहाचा कप घेऊन भिंतीकडे तोंड करून चहा प्यायलो. श्री.धों. मो. अहिरे सर जवळ आले. त्यांच्या हातात वर्तमानपत्र होते. त्यातली एक बातमी दाखवत त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हटले. "भाऊ  हा तूच आहेस का? मी अधिकच घाबरलो. बातमी वाचली. फोटो तर माझाच होता. मी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याची बातमी फोटोसह वर्तमानपत्रात छापून आली होती.माझ्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. श्री.अकोलकर सरांनी ती बातमी सर्वांना वाचून दाखवली. अभिनंदनाचा वर्षाव झाला. श्री.अकोलकर सरांनी एक गुलाबाचे फुल देऊन माझे कौतुक केले. त्यामुळे माझ्या मनातील भीती दूर झाली.मुख्याध्यापक श्री. वि.भा.देशपांडे सरांचा मुख्याध्यापक म्हणून तो पहिलाच दिवस होता. दुपारी त्यांनी ऑफिस मध्ये बोलावून माझे कौतुक केले.मी त्यांना नमस्कार केला. पेठे विद्यालयातला माझा पहिला दिवस मला प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा ठरला.
   नवीन इंग्रजी शाळेतून बदलून आलेला म्हणून माझ्या कडे पाहण्याचा प्रारंभीचा दृष्टिकोण आता बदलला होता .माझे वर्गमित्र श्री. दीपक कडाळे आणि मी आता एकाच स्टाफरूममध्ये शिक्षक म्हणून वावरू लागलो.  पेठेच्या विद्यार्थ्यांनी काही दिवस माझीच परीक्षा घेतली. ओझरच्या शाळेपेक्षा या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच फरक होता. परंतु, मी देखील हार मानणाऱ्यातला नव्हतो. थोड्याच कालावधीत स्वतःला सावरले. ग्रंथालयाशी मैत्री केली .स्वतःच्या नोट्स काढून उत्तम कसे शिकविता येईल याचा विचार करू लागलो आणि लवकरच मुलांवर पकड घेण्यात यशस्वी झालो. मुख्याध्यापक व इतर ज्येष्ठ गुरुजन यांच्या कौतुकास पात्र ठरू लागलो.अभ्यासाबरोबरच इतरही उपक्रमांमध्ये पुढाकार घेऊ लागलो. शिष्यवृत्ती, एम.टी.एस. विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाकरिता मार्गदर्शन करू लागलो . मुलांना शिकवता शिकवता माझेही अध्ययन होऊ लागले.
  पेठे हायस्कूलच्या परंपरेनुसार आठवड्यातून एक दिवस मुलांना स्टेजवरून गोष्ट सांगायला सुरुवात केली. नवीन इंग्रजी शाळेतले अनुभव येथे मला कामी आले. आत्मविश्वासाने कोणतेही काम वेळेत पूर्ण करण्याची सवय लागली. इतरांच्या तुलनेने वयाने लहान असल्याने सर्वांचा कौतुकाचा विषय ठरू लागलो. त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी ऊर्जा मिळू लागली .पेठे विद्यालयातील शिक्षक वृंद खरोखरच पेठे हायस्कूलच्या लौकिकास साजेसा असाच होता.त्यामुळे आपण एका नामवंत शाळेत शिक्षक म्हणून काम करतो याचा अभिमान वाटू लागला.
   दरवर्षी मराठी दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी जिन्यावरून अचानक एंट्री घेणारे नटसम्राट दत्ता नागपुरे सर ! पंधरा-वीस मिनिटे अप्पासाहेब बेलवलकर यांच्या भूमिकेतून ते बाहेर पडत नसत. आप्पासाहेबांची व्यक्तिरेखा प्रत्यक्ष पाहण्याचा आणि अनुभवण्याचा माझा तो पहिला प्रसंग होता. नागपुरे सरांचे वक्तृत्व, शब्दफेक काळजाचा ठाव घेत असे. दत्ता नागपुरे सर हाडाचे कलावंत. मधल्या सुट्टीत त्यांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल ते आमच्याशी चर्चा करीत. स्टाफ रूम मध्ये वातावरण शैक्षणिक आणि सांस्कृतिक गप्पांनी भारलेले असे.
 कधीतरी एक दिवस काठी टेकत टेकत एक गृहस्थ आले.शिक्षक विश्रामिकेत सर्वजण उठून उभे राहिले. दत्ता नागपुरे आणि नवीन तांबट सरांनी त्यांच्या पायाला स्पर्श केला. थोड्या वेळा नंतर ते निघून गेले. आम्हाला नंतर कळले. ते नाशिक मधील ज्येष्ठ कलावंत आणि पेठ हायस्कूल मधील निवृत्त शिक्षक श्री.बाळ भाटे होते! चित्रपटासाठी गाणी लिहिणारा गाणारा अस्सल कलावंत!! तांबट सर भरभरून त्यांच्याबद्दल बोलत होते. मनात आले, अरे आपण का नाही त्यांच्या पायाला स्पर्श केला ?  ती खंत आजही मनात घर करून आहे. शाळेत असे कलाप्रेमी आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे शिक्षक होते. ते हळूहळू कळू लागले. शाळेप्रती आत्मीयता आणि अभिमान दिवसागणिक वाढत गेला.आम्हा तरुण शिक्षकांना पेठेतील नामवंत शिक्षकांबद्दल ज्येष्ठ शिक्षकांकडून खूप ऐकायला मिळाले.
   श्री.दत्ता नागपुरे सर यांनी स्टेजवर उभे राहण्याचा आत्मविश्वास दिला.श्री.नागपुरे सर रजेवर असले की मी माइकचा ताबा घेत असे. गरजेनुसार माझ्या वाचनाचा आवाका वाढू लागला.दर शुक्रवारी नवीन गोष्ट मुलांना सांगू लागलो. हळूहळू संस्था स्तरावरील कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मिळू लागली.
   मुख्याध्यापक म्हणून श्री.वि.भा.देशपांडे सरांनी माझ्यावर अनेक कामांची जबाबदारी विश्वासाने सोपवून माझा आत्मविश्वास वाढविण्याची संधी दिली. श्री.डी.एस.कुलकर्णी सरांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थाने एक शिक्षक म्हणून माझी ओळख निर्माण होऊ शकली. शाळेबरोबरच शासकीय, खाजगी प्रशिक्षणासाठी रिसोर्स पर्सन म्हणून जाण्याची संधी या काळात मला मिळाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्रात काम करण्यास कुलकर्णी सरांनी मला प्रोत्साहन दिले. सरांच्या निवृत्तीनंतर केंद्र संयोजक म्हणून संस्थेने माझ्यावर जबाबदारी दिली. याच काळात शाळांतील विविध समित्या, पालक शिक्षक संघ, अनेक उत्सव आणि समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन याचे सूत्रसंचालन करता आले.श्री . वि.नि. बोडके सर यांनी पत्राचे उत्तम ड्राफ्टिंग शिकवले.समित्यांचे इतिवृत्त लिहिण्यातील बारकावे समजावून सांगितले. शाळेचे काम सांभाळून संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू लागली. तत्कालीन संस्थेचे कार्यवाह यांनी संस्थेच्या विविध महत्त्वाच्या समित्यांचे इतिवृत्त ,माझे अक्षर बरे असल्यामुळे लिहिण्याची संधी दिली. त्यातून इतिवृत्त लेखनाचा चांगला सराव माझा होऊ शकला. 
    पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक अशा विविध भूमिकांमधून काम करीत संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असलेले श्री.चंद्रशेखर वाड सर यांच्याबरोबर व मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी आमच्या पिढीला प्राप्त झाली. ती खरोखरच भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे. इंग्रजी विषयाचे व्यासंगी शिक्षक, एक संवेदनशील अध्यापक म्हणून श्री.वाड सरांची ख्याती आहे. केवळ पेठे विद्यालयातच नव्हे तर नाशिक शहरातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सरांच्या ज्ञानाचा लाभ झाला आहे. चोवीसतास अध्ययन आणि अध्यापनात श्री.वाड सर गढलेले असत.वर्गात वाड सर उभे राहिले की, कठीण विषय सोपा ते करून सांगत.व्याकरण दृष्ट्या शुद्ध बोलण्याचा त्यांचा हट्ट असे.वर्ग नियंत्रणाचा फारसा त्रास त्यांना होत नसे. कारण मायेच्या ममतेने त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद असे. अत्यंत मधुर ते बोलत. विद्यार्थ्यांना समजून घेत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मदत करीत. कधीकधी स्वतः भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यांच्या कडा  पाणावत.शिक्षकांशी देखील त्यांचे अत्यंत उत्तम संबंध असे.जुनियर शिक्षकांना प्रगतीसाठी ते मार्गदर्शन करीत. मुख्याध्यापक असताना सर्वांकडून उत्तम काम त्यांनी करून घेतले. वाड सरांनी शाळेत अध्यापनाचे काम करीत असताना संस्थेचे सहकार्यवाह म्हणून अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली.पत्रव्यवहार आणि शासकीय कामे तसेच इतिवृत्त लेखनात सर तरबेज आहेत. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक मंडळाचे अध्यक्षपद सरांनी भूषविले. स्वतः मध्ये असलेली तल्लख बुद्धी आणि विश्वासूपणा वाड सरांच्या जमेच्या बाजू आहेत.
    श्री.रमेश देशमुख सर यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. काम करताना प्रशासनातील अनेक क्लुप्त्या समजल्या.
  सन.२०१४ ते २०१७ च्या वार्षिक निवडणुकीत पेठे विद्यालयाच्या शिक्षक प्रतिनिधीपदी माझी बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्यवाह (अर्थ) म्हणून जबाबदारी सोपवली.अर्थ विषयाची बाराखडी देखील मला ठाऊक नव्हती .संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके सर यांनी मला अर्थ साक्षर केले.
   २०१७ च्या त्रैवार्षिक कार्यकाळात माझी ओळख श्री.राजेंद्र निकम यांच्याशी झाली. त्याआधी संस्थेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थेत विविध सभांच्या दरम्यान येणारे कडक स्वभावाचे निकम सर, अशी ओळख होती. परंतु, पर्वताजवळ गेल्याशिवाय त्याच्या उंचीचा प्रत्यय येत नाही.तसे निकम सरांच्या बाबतीत झाले. या कार्यकाळात त्यांना अत्यंत जवळून अनुभवता आले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक.त्यामुळे शिक्षणाचा वारसा त्यांना लाभला आहे. तसे म्हटले तर शीघ्रकोपी असलेला त्यांचा स्वभाव हा देखील त्यांना मिळालेला वारसाच! 
       मूळ शेतीचा पारंपरिक व्यवसाय करून कष्टाने त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. व्यावसायिक अध्यापन शास्त्रातील पदविकेचे शिक्षण पूर्ण करून नाशिक एज्युकेशन सोसायटीत शिक्षक म्हणून प्राथमिक शाळेत नोकरीला सुरुवात केली. उत्तम अध्यापक, प्रामाणिक सहकारी आणि दिलदार मित्र अशी त्यांनी ओळख निर्माण केली. स्वभावाने तापट असले तरी अंत:करण निर्मळ आहे. शिक्षक असताना शाळा विद्यार्थी आणि संस्था हिताला त्यांनी प्राधान्य दिले.  कमी कालावधीत त्यांना मुख्याध्यापक होण्याची संधी लाभली. तरुण मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ शिक्षक वर्ग या दोन्ही गोष्टींचा उत्तम मेळ त्यांनी  साधला. ज्येष्ठ शिक्षकांशी त्यांचा स्नेह आजही कायम आहे. ज्येष्ठांनी देखील सरांच्या आज्ञेचे उल्लंघन केले नाही. मुख्याध्यापक म्हणून चांगलीच छाप त्यांनी सोडली. विशेष म्हणजे मराठी शाळांचे प्रवेश वाढविण्यासाठी अनेक क्लुप्त्या त्यांनी शोधून त्याची अंमलबजावणी केली.याच कार्यकाळात राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे कुशल नेतृत्व त्यांनी केले. राज्यभर त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांच्यातील कामाची तडप आणि विश्वासार्हता या गुणांमुळे संस्थेतील शिक्षक मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे त्यांनी सन्मानाने भूषविली. संस्थेच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करू शकले आहेत. नाशिक जिल्हा भारत स्काऊट गाईडचे सचिव पद त्यांनी अनेक वर्षे भूषविले.स्काउट गाइड संघटनेला जिल्हा आणि राज्यभरात मजबूत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पदाची लालसा आणि गर्व त्यांना नाही. श्री.निकम सरांना माणसे जोडायला खूप आवडते. संघटन करण्याचे उत्तम कौशल्य त्यांच्या अंगी आहे. वेळोवेळी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा त्यांच्यातील मोठा गुण आहे. कोणत्याही कामाचे श्रेय ते स्वतःकडे घेत नाही. आपल्या हाताशी असलेल्या व्यक्तींपैकी योग्य व्यक्तीची निवड करण्याचे कौशल्य आणि दृष्टी त्यांच्याकडे आहे.  खरे तर त्यांचा स्वभाव म्हणजे नारळ - फणसा सारखा ! जितके तापट- रागीट ते वाटतात,तितकेच संवेदनशील, मृदू भावनिक, प्रेमळ ते अंत:करणातून आहेत. संस्थेवर नितांत श्रद्धा असणाऱ्यापैकी एक म्हणजे श्री.राजेंद्र निकम .कार्यवाह म्हणून अत्यंत कौशल्याने ते नेतृत्व करीत आहेत. शासकीय किंवा राजकीय तसेच अनेक क्षेत्रांतील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यांचा निश्चितच संस्था हितासाठी लाभ होतो. सतत कामात राहणे ते पसंत करतात. पारंपरिक शेतीत कष्टने हा त्यांचा छंद ! त्यासाठी ते वेळ राखून ठेवतात.सध्यातरी संस्था आणि शेती दोघांची उत्तम मशागत ते करीत आहेत!
   शाळेचा आणि संस्थेचा लौकिक वाढविण्यात यांसारख्या अनेकांचा हातभार लागला आहे.
   सन.२०२२-२०२३ हे नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाचे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे. व्यक्ती मुळे संस्था की संस्थेमुळे व्यक्ती ..हा वादाचा विषय होऊ शकेल. परंतु,संस्थेमुळे ओळख निर्माण झालेल्या अनेक नामवंत शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांमुळे संस्थेची वाटचाल शतकोत्तर देखील यशोशिखराकडे होत राहील. यात शंका नाही...

श्री.शैलेश पाटोळे 
पेठे विद्यालय ,नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️



Monday, August 16, 2021

अष्टावधानी : प्रा. सूर्यकांत रहाळकर

       
        अष्टावधानी : प्रा.सूर्यकांत रहाळकर

 
   दि.१ एप्रिल १९२३ ते आजपर्यंत, म्हणजे या शंभर वर्षांच्या काळात नाशिक एज्युकेशन सोसायटीने अनेक स्थित्यंतरे अनुभवली. कठीण प्रसंगांना तोंड दिले. परंतु, वेळोवेळी लाभलेले उत्साही, धैर्यशील, कर्तुत्ववान संस्थाचालक तसेच व्यासंगी आणि स्वतःला झोकून देऊन त्यागमय जीवन व्यतीत करणाऱ्या शिक्षकांमुळे आणि पुढे नामवंत व कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांमुळे संस्था आणि शाळा प्रगतीकडे वाटचाल करू शकली.
  नाशिक एज्युकेशन सोसायटीला अध्यक्षांच्या रूपाने लाभलेला वारसा खूप मोठा आहे. प्रथम पासून लाभलेले अध्यक्षांनी त्यांच्या कार्यकालात निस्पृहपणे संस्थेची धुरा सांभाळली. सतत कार्यमग्न असणारे कै.वसंतराव गुप्ते, हरएक काम वेळेत होण्यासाठी प्रयत्नशील असणारे कै. एम.जे.तथा बाबासाहेब दीक्षित, लोकप्रिय खासदार कै. गो.ह. देशपांडे, अत्यंत काटेकोरपणे कार्यशैली असलेले कै.श्री.कां. पू. तथा अण्णासाहेब वैशंपायन, सौजन्यशील मार्गदर्शक कै. श्री.ग.ज.म्हात्रे, सहकारातील अग्रणी कै. श्रीमान बाबुशेठ राठी, साहित्यिक कै. डॉ. अ.वा.वर्टी,दूरदृष्टी असणारे कै.श्री.बापूसाहेब उपाध्ये, कै. श्री. नानासाहेब प्रधान, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. कै. श्री.मधुकर तोष्निवाल, सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर या सर्व ज्येष्ठांचा वारसा पुढे चालवत, संस्थेला परंपरांचे जतन करून आधुनिक दृष्टी प्रदान करणारे विद्यमान अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर !
   माजी विद्यार्थी ते संस्था अध्यक्ष अशा विविध भूमिकांमधून नाशिक एज्युकेशन सोसायटीशी जवळपास ६५ वर्षांपेक्षाही जास्त काळ संबंध प्रा. रहाळकर यांचा आला आहे. विशेष म्हणजे संस्थेत नोकरी न करता हा संबंध त्यांनी जतन केला. नाशिक एज्युकेशन सोसायटी या मातृसंस्थेवर त्यांची नितांत श्रद्धा आहे.
   साधारणपणे तीनशे वर्षांपूर्वी रहाळकर कुटुंबीय नाशिकमध्ये स्थायिक झाले असावेत. पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या काळापासून पेशव्यांचे ज्योतिषी म्हणून पूर्वजांनी पेशव्यांचा विश्वास संपादन केला. त्याकाळी पेशव्यांनी राहता वाडा आणि काही जमीन रहाळकर कुटुंबीयांना इनाम म्हणून दिली. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर पुढच्या पिढीतील लोकांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला दिसून येतो. आजोबा कै. श्रीमान विष्णू रावजी रहाळकर यांचा ज्योतिष आणि पंचांगाचा दांडगा व्यासंग होता. महाराष्ट्र आणि बाहेरील प्रांतातही याबाबतीत त्यांची ख्याती होती. अलीकडच्या काळात पंचांगकर्ते एक वर्षाचे पंचांग तयार करू शकतात. परंतु,कै. श्रीमान विष्णू रावजी रहाळकर हे पाच वर्षांचे पंचांग तयार करीत ! यावरून त्यांचा ज्योतिषशास्त्राचा व्यासंग दांडगा होता.हे दिसून येते. ब्रिटिश अमदानीच्या काळात कै. विष्णू रावजी रहाळकर चाळीस वर्षे नाशिक नगरपालिकेचे सन्माननीय सदस्य होते. त्यासाठी त्यांना निवडणुका लढवाव्या लागला नाहीत, हे विशेष! 
  सरांचे वडील ॲड. कै. श्रीमान रामचंद्र विष्णू तथा काकासाहेब रहाळकर नाशिक मधील सुविख्यात वकील म्हणून प्रसिद्ध पावले होते.खासदार कै. गो.ह. देशपांडे नासिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असताना काकासाहेब रहाळकर संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच नाशिक नगरपालिकेचे दहा वर्षे सदस्य होते. काही काळ नगरपालिकेचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषविले होते.त्यांच्या काळात नाशिक नगरपालिकेत जकातीचे प्रचंड कलेक्शन वाढले होते.त्यामुळे नाशिक नगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. अत्यंत काटेकोर आणि काटकसरीने ते कार्यरत असत. शासकीय सोयी सुविधांचा त्यांनी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी कधीही उपयोग केला नाही. दिवसभर वकिली व्यवसाय करून सायंकाळी ते नगरपालिकेच्या कार्यालयात कामासाठी जात.नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचे देखील अध्यक्षपद त्यांनी भूषवले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांनी एका समारंभासाठी आमंत्रित केले होते. नाशिक एज्युकेशन सोसायटी या संस्थेशी त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. त्यांचे शिक्षण याच संस्थेत पूर्वीच्या सेंट जॉर्जेस हायस्कूलमध्ये झाले. संस्थेच्या आजीव सदस्य मंडळात त्यांचा समावेश होता. संस्थेचे उपाध्यक्ष असताना जुना पेशवे वाडा संस्थेला मिळवून देण्यात कै. काकासाहेब रहाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.त्यानंतर मुंबईच्या पेठे बंधूंकडून संस्थेला अडचणीच्या काळात वीस हजार रुपयांची बहुमोल देणगी त्यांनी मिळवून दिली. त्यातून जुन्या पेशवेवाड्याचे नव्या पेशवेवाड्यात रूपांतर होऊ शकले .भौतिक आणि गुणात्मक दृष्ट्या संस्थेच्या प्रगतीसाठी ते कायम अग्रेसर राहिले. संस्थेच्या अत्यंत कठीण काळात शिक्षकांच्या पगारासाठी निधी अपुरा पडत असताना कै.काकासाहेब रहाळकर यांनी सढळ हाताने मदत केली. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नाशिक नगरपालिकेत केवळ लोकाग्रहास्तव व नगरपालिकेशी असलेला जिव्हाळा टिकून ठेवण्यासाठी व पालिकेच्या विकासासाठी निवडणुकीत ते भाग घेत असत.
    सरांच्या मातोश्री कै. सौ.कमलाबाई या ठाणे जिल्ह्यातील वसई येथील शेंडे कुटुंबातील. शेंडे कुटुंबियांचा मिठाचा व्यापार होता. काँग्रेस पक्षाशी त्यांचा निकटचा संबंध होता. सौ.कमलाबाई या लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होत्या. त्याकाळी ठाणे जिल्ह्यातून व्हर्णाक्युलर फायनल परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या.
   १५ नोव्हेंबर १९५० रोजी कै. श्रीमान काकासाहेब रहाळकर यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. जन्मत:च अत्यंत तेजस्वी या पुत्राचे नामकरण सूर्यकांत असेच करण्यात आले. लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते .तसेच अभ्यासात एकपाठी होते. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शिक्षण मंदिर पासून ते पेठे विद्यालयात मॅट्रिक म्हणजे अकरावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.शाळेत त्यांना उत्तमोत्तम शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बुद्धिकौशल्य,चातुर्य,सभाधीटपणा याचे संस्कार त्यांना परंपरेने प्राप्त झाले.
   शाळेत चित्रकला विषयात त्यांना विशेष आवड आणि प्रगती होती. शालेय जीवनात चित्रकला स्पर्धेतील मोठे बक्षीस त्यांना मिळाले होते.कलेत रूची असणाऱ्या रहाळकर सरांना मातीचे गणपती बनविण्याचा छंद होता. गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी स्वतः बनवलेल्या गणेशाच्या मूर्तीची राहत्या वाड्यात प्रतिष्ठापना केली जात असे. श्रीगणेश या आराध्य दैवताबद्दल उपजत निष्ठा आणि भक्ती त्यांच्यात असून ती आजही कायम आहे. मातीच्या सुंदर गणेश मुर्ती ते हुबेहूब बनवत.
   पेठे हायस्कूल मधील शिक्षकांमुळे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाचनाची त्यांना गोडी लागली. विविध वक्तृत्व, निबंध,पाठांतर स्पर्धांमध्ये सहभागी होऊन बक्षिसे मिळवत.शाळेत असताना पासून विद्यार्थ्यांचे संघटन आणि नेतृत्व करण्याची आवड त्यांना होती. घर आणि शाळेतील पोषक वातावरण यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उत्तम विकास झाला. पेठे विद्यालयाचा तो काळ उत्कर्षाचा, प्रगतीचा होता.अभ्यासाबरोबर सर्वांगीण विकासासाठी आवश्यक व्यवहार कौशल्याचे संस्कार शिक्षकांकडून त्यांचेवर झाले.वाचनाबरोबरच लेखनाची आवड निर्माण झाली. पेठे विद्यालयाच्या आराधना अंकात सतत लेख लिहीत. अध्यात्माचा वारसा त्यांना कुटुंबातूनच मिळाला होता. तसेच कै. श्रीमान वकील सर हे त्यांचे गुरु होते.
   आजोबा , वडील  सामाजिक ,राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक बड्या मंडळींचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळत असे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे शिस्त आणि संस्कार तसेच जिव्हाळा-  नातेसंबंध तसेच एकतेचा संस्कार त्यांच्यावर झाला. त्यातून त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानाची कक्षा रुंदावल्या. एकत्र कुटुंब पद्धती मुळे जनसंपर्क आणि नातेसंबंध टिकून ठेवण्याच्या संस्कार त्यांच्यावर झाला.
   पुढे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर.वाय.के. महाविद्यालयातून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली.महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यातील उपजत कौशल्य गुणांना खतपाणी मिळाले. वादविवाद स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा त्यांनी गाजवल्या. महाविद्यालयीन जीवनात ते युथ न्यूज नावाचे मॅगझीन चालवायचे .त्या काळात तरुणांना या  मॅगझीनने भुरळ पाडली. विविध विद्यार्थी संघटनांनी सरांना नेतृत्व करण्यासाठी गळ घातली. परंतु, कोणत्याही संघटनांच्या चौकटीत अडकून पडण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने त्यांनी ते नाकारले. पुढे गोखले एज्युकेशन सोसायटीतून एम. बी. ए. पदवी संपादन केली.त्याप्रसंगी डॉ. मो. स. गोसावी यांच्याशी त्यांचा संपर्क आला.शिक्षण घेत असताना त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे त्यांच्या सार्वजनिक जीवन कार्याला सुरुवात झाली. वर्तमानपत्रात सतत वैचारिक,अध्यात्मिक इ.विषयांवर सातत्याने ते लेखन करीत. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाच्या पब्लिसिटी डिपार्टमेंट मध्ये वर्ग १ पदाकरिता आवश्यक परीक्षा ते उत्तीर्ण झाले.परंतु शासकीय नोकरी करून सार्वजनिक कार्यात काम करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी नोकरी करणे पसंत केले नाही. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची विशेष रुची त्यांना होती. पुढे त्यांनी विधी शाखेतील पदव्युत्तर पदवी मिळविली. तरुणांशी संपर्क रहावा व ज्ञान साधना करता यावी याकरिता गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एच.पी.टी. महाविद्यालयातील मार्केटिंग विभागात प्राध्यापकाची नोकरी त्यांनी स्वीकारली. वरिष्ठ महाविद्यालयात संधी असूनही ते त्यांनी जाणीवपूर्वक टाळले.
   नोकरी सांभाळून पारंपरिक व्यवसाय सर सांभाळत. अमोघ वक्तृत्वाच्या गुणांमुळे ते समोरच्याला लगेच आपलेसे करून घेतात. त्यांच्या आकर्षक आणि देखण्या व्यक्तिमत्त्वाची अनेकांना अक्षरशः भुरळ पडते.
  स्वतःच्या कर्तुत्वावर त्यांनी प्रचंड जनसंपर्क वाढविला.नाशिकमधील पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक म्हणून बँकेला उर्जितावस्था मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्याबरोबर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी त्यांचे वागणे अत्यंत समतोल असे असते. l
   लोकमान्य टिळकांचे नातू डॉ. केतकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत.प्रा. रहाळकर सरांचे काका देखील फर्ग्युसनचे विद्यार्थी. त्यामुळे डॉ. केतकरांशी सरांचा स्नेह निर्माण झाला. त्यांच्यातील नेतृत्वगुण आणि अभ्यासूवृत्ती बद्दल डॉ. केतकर जाणून होते.भारतीय स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेली, अभिनव भारत संघटनेची नाशिक मधील जबाबदारी डॉ. केतकर यांच्या मुळे प्रा.रहाळकर सरांवर आली. या संघटनेचे कार्य त्यांनी पुढे सुरू ठेवले. आजही अभिनव भारत संघटनेचे प्रमुख विश्वस्त म्हणून सर तरुणांना मार्गदर्शन करीत आहेत.
  राजकारणाचा वारसा असूनही सरांना राजकारणातील छळ-कपट, हेवेदावे, इर्षा- मत्सर, आवडत नसल्याने,त्यापासून कायमच लांब राहिले. तरीही अनुभव, अभ्यासू, तल्लख बुद्धी, अचूक निष्कर्ष आणि भविष्याचा नेमका वेध घेण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती आहे. कोणत्याही राजकीय इव्हेंटमध्ये उतरण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक सरांचे आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच  येतात.
   व्यवसायाच्या निमित्ताने समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक प्रकारच्या लोकांशी सरांचा संपर्क येतो. संस्थांच्या विकासासाठी अशा संबंधांचा सरांनी कौशल्याने उपयोग केला आहे.
   नाशिक मधील मोजक्याच परंतु महत्त्वपूर्ण संस्थांचे नेतृत्व सरांनी केले. चित्पावन ब्राह्मण संघ, पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक, विश्वास को ऑपरेटिव्ह बँक, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक, जनलक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँक या सारख्या सहकार क्षेत्रातील नामवंत संस्थांचे संचालक,सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून सरांनी काम पाहिले आहे.
   नाशिकमधील रविवार कारंजा मित्र मंडळाच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. रविवार पेठेतील नाशिककरांचे  श्रद्धास्थान असलेल्या चांदीचा गणपती मूर्ती प्रतिष्ठापना सरांच्या पुढाकाराने झाली आहे. तसेच धर्मार्थ दवाखाना गोरगरीबांच्या सेवेकरिता संस्थेच्या माध्यमातून उभारला आहे. विशेष म्हणजे ते स्वतः देखील त्या धर्मार्थ दवाखान्यात उपचारासाठी जातात.त्यामुळे गरीब- श्रीमंतीची दरी कमी होण्यास मदत होते. यातून अखिल मानव जात एक आहोत ही भावना लोकांमध्ये दृढ होण्यास निश्चित मदत होते.
    नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, रेड क्रॉस सेवाभावी संस्था, प्रज्ञासा सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून सर सामाजिक सेवा करतात. तसेच लोकांचे प्रबोधन देखील करतात.
   शालेय जीवनापासून असलेली कबड्डी-खोखो  खेळाची आवड त्यांनी संघटनेच्या कामातून जतन केली आहे.
  संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांप्रती त्यांना नितांत श्रद्धा आहे. गेल्या तीस वर्षांपासून निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे प्रमुख सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.श्रीक्षेत्र कावनई तीर्थक्षेत्र विकासात सर तन-मन-धनाने सहभागी झाले. त्याबाबत माहिती पुस्तिकेचे लेखन सरांनी केले आहे. श्रीक्षेत्र नस्तनपुर ला देणगी स्वरूपात त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. नाशिक आणि परिसरातील मंदिरांची इत्यंभूत माहिती सरांना आहे. जणु मंदिरांचा संदर्भकोश ! महाराष्ट्रातील आणि देशभरातील तीर्थक्षेत्रे हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांप्रमाणेच श्रीशंकर महाराज यांचेवर देखील सरांची नितांत श्रद्धा आहे.
    गरजू अडचणीत असलेल्यांना हक्काची जागा म्हणजे प्रा.रहाळकर सर ! सहजासहजी कोणाला रिकाम्या हाताने त्यांच्याकडून परत जावे लागत नाही. अनेकांना योग्य मार्गदर्शन करीत अनेक कुटुंबांचा उद्धार त्यांनी केला आहे.होतकरू तरुणांना योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते. अनेकांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ते करीत असतात. परंतु,केलेल्या मदतीची वाच्यता फारशी केलेली त्यांना आवडत नाही. धर्म आणि जातीपातीच्या बेडयांमध्ये ते कधी अडकले नाही.त्रंबकेश्वर रस्त्यावरील अनाथाश्रमाला नित्यनेमाने ते दानधर्म करीत असतात.
  १९८४ ते १९९९ पर्यंत सर नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते काही वर्षे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. संस्था आणि शाळा विकासासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले.१९९९ पासून आजतागायत संस्थेचे अध्यक्षपद सर भूषवित आहेत.
  या अर्थाने जवळपास चाळीस वर्षे संस्थेचे नेतृत्व ते करीत आहेत. संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या विकासासाठी अनेकविध योजना सरांच्या मार्गदर्शनाने राबविल्या गेल्या. आपली संस्था बहुजनांना शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली आहे,असे सर नेहमी सांगतात. समाजातील गरीब लोकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे.यासाठी ते प्रयत्नशील असतात.याच अंत:प्रेरणेतून आश्रमशाळा वेळुंजे ची स्थापना झाली.परिसरातील दहा बारा पाडे आणि वस्त्यांवरील विद्यार्थ्यांना निवासी राहून शिक्षण घेण्याची सोय या शाळेमुळे झाली.शिक्षक आणि विद्यार्थी हितासाठी सर कायम तत्पर असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आश्रमशाळा नावारूपास आली आहे. मराठी शाळांच्या बाबतीत शासनाचे धोरण फारसे अनुकूल नसताना शाळांच्या भौतिक गरजा भागविणे,त्यासाठी लागणारा खर्च ही फार मोठी समस्या असते. अशा वेळी स्वतःच्या जनसंपर्कातून देणगीदारांकडून आवश्यक निधी किंवा देणगी सर कौशल्याने मिळवतात. संस्थेच्या प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संगणक साक्षर करण्यासाठी सरांनी प्रथम पुढाकार घेतला. शाळांच्या गुणात्मक विकासासाठी मार्गदर्शकाची उत्तम भूमिका सर निभावतात. राजकीय, सामाजिक आणि शासकीय स्तरांवरील त्यांचे निकोप संबंध संस्था हितासाठी कौशल्याने सर उपयोगात आणतात.संस्थेचा, शाळांचा विकास साधतांना नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या परंपरेला त्यांनी धक्का लागू दिला नाही. केवळ संख्यात्मक विकासाला त्यांनी कधीच प्राधान्य दिले नाही.अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर त्यांनी संस्थेच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची छान घडी बसवली. शाळांच्या सर्व इमारती सुविधांनी युक्त बांधण्यास प्राधान्य दिले.. संस्था प्रशासनात शिस्त आणली.अध्यक्ष म्हणून संस्थेसाठी ते वेळ देऊ लागले. प्राथमिक शिक्षण मंदिर ही शाळा पुढे सागरमल मोदी म्हणून नव्या इमारतीत भरू लागली. महाराष्ट्रातील गुणवत्ता आणि विद्यार्थी संख्या जास्त असलेली सर्वात मोठी शाळा म्हणून सागरमल मोदी शाळा नावारुपास आणण्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. सरांनी कायम संस्थेच्या प्राथमिक शाळांच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली. तेथील कार्यरत शिक्षक, कर्मचारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध आहेत. संस्थेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक- कर्मचाऱ्यांशी त्यांचे कायमच उत्तम संबंध निर्माण झाले आहेत. त्यांना अडचणीत सर मदत करीत असतात. शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करताना विद्यार्थी सुरक्षेला त्यांनी प्राधान्यक्रम दिला. संस्थेच्या विकासासाठी निधी उभा करणे सर्वात कठीण काम असते. सरांनी विविध कंपन्यांचे सी.एस.आर.निधी संस्थेसाठी मिळविला.
   प्रा. रहाळकर सर स्वतः अतिशय संयमी आणि शांत आहेत.सभेमध्ये इतरांना आपले मत मांडण्याची ते संधी देतात. पालकांशी आणि माजी विद्यार्थ्यांची त्यांचा घनिष्ठ संपर्क असतो. शाळा किंवा संस्थेबद्दल चांगले अथवा वाईट त्यांना सर्वात आधी पालकांकडून कळते.
   सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात त्यांनी कुटुंब प्रमुखांच्या भूमिकेतून सर्व शिक्षक कर्मचारी आणि कुटुंबीयांची काळजी घेतली. शक्य तेवढ्या लोकांना फोनवर संपर्क करून मानसिक आधार दिला.अनेकांना आर्थिक मदत केली. हॉस्पिटल बेड उपलब्ध करून दिले. स्वतःचे वय विसरून इतरांसाठी कोरोना काळात ते आधारस्तंभ बनले. शिक्षक - कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी संस्थेच्या खर्चातून सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कोविड चाचण्या करून घेतल्या.
   शाळा समाजाचा आरसा असतो. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याची जबाबदारी शाळांनी नाकारून चालणार नाही, असे मानून विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी ते सर्वांना प्रेरित करतात. पाण्याचे भविष्यातील महत्त्व लक्षात घेऊन पाणी बचतीसाठी अनेकविध संकल्पना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सरांनी राबविल्या.जलदुत म्हणून संस्थेतील पंचवीस हजार विद्यार्थ्यांना जबाबदारी सोपविली. पाणी बचतीचे पासबुक ही संकल्पना सरांनी राबविली. या उपक्रमाचे महाराष्ट्र शासनाने दखल घेत कौतुक केले. पाणी बचतीचे प्रणेते जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या बरोबर महाराष्ट्रभर जलसाहित्य संमेलनाच्या माध्यमातून जल बचतीचा संस्कार घराघरात त्यांनी पोहोचविला. नाशिक येथील जलसाहित्य संमेलनाचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले. याकरिता व्याख्यानांतून लोकांचे प्रबोधन ते करतात.शाळा-शाळांमध्ये स्वच्छतेची जागरूकता यावी याकरिता शाळा आणि विद्यार्थी यांच्यात स्पर्धेची घोषणा त्यांनी केली.संस्थेच्या शाळांमध्ये संपूर्ण प्लास्टिक मुक्तीची घोषणा केली. या सर्व उपक्रमांमधून पर्यावरण वाचवण्याची त्यांची तळमळ दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते अभ्यासाबरोबरच खेळाला देखील तेवढेच महत्त्व देतात.
  सौ.स्नेहल रहाळकर या प्रा. सूर्यकांत रहाळकर सर यांच्या सुविद्य पत्नी. नाशकातील एका नामांकित महाविद्यालयात गणिताच्या तज्ज्ञ प्राध्यापिका म्हणून त्यांनी लौकिक मिळविला आहे. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. म्हणूनच परिस्थितीही शिक्षणात अडसर ठरू नये, असे त्यांना मनापासून वाटते. कदाचित याच अंत:प्रेरणेतून होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांकरीता शिक्षणाचा खर्च, वाच्यता न होऊ देता आनंदाने उचलतात. दातृत्वाचा रहळकर कुटुंबियांचा गुण त्यांच्यात आपसूक आला आहे.
  श्री.किरण रहाळकर हे सरांचे चिरंजीव , वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. वन्यजीवांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात उत्तम काम करतात. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी डॉग युनिट चा वापर करण्याची अभिनव कल्पना श्री.किरण रहाळकर यांच्या माध्यमातून शासनस्तरावर राबविली जात आहे.
     सामाजिक कार्याच्या जाणिवेतून ते स्काऊट-गाईड चळवळीत सहभागी झाले .नाशिक भारत स्काऊट आणि गाईड या संस्थेचे उपाध्यक्ष पद तसेच राज्य कार्यालयाचे आयुक्त म्हणून सर कार्यरत होते.त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याचा गौरव आजवर अनेक संस्थांनी केला आहे. सकाळ वृत्तसमूहाने जलयोद्धा पुरस्काराने, जे.सी.आय. तर्फे Outstanding Young Person, गोखले एज्युकेशन सोसायटी तर्फे Academic Excellence Award, आदर्श शिक्षण शिरोमणी, समाज भूषण यांसारख्या पुरस्कारांनी प्रा. रहाळकर सरांच्या कार्याची दखल घेतली आहे.
  वाणी रसवती यस्य:, यस्य श्रमवती क्रिया l
   लक्ष्मी: दानवती यस्य , सफलं तस्य जीवितं ll
ज्या व्यक्तीची वाणी गोड असते. ज्याचे कार्य परिश्रमाने भरलेले असते. ज्याचे धन दानासाठी उपयोगात आणले जाते. त्या व्यक्तीचे जीवन सफल असते. असे सफल आयुष्य प्रा. रहाळकर सर व्यतीत करीत आहेत. 
      सरांच्या नेतृत्वाने संस्थेची अधिकाधिक भरभराट होवो , हीच सदिच्छा.

लेखन,
श्री.शैलेश पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
     

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...