Monday, May 17, 2021

त्यागमूर्ती : श्रीम.ताराबाई पंढरीनाथ सूर्यवंशी

           
                    ll त्यागमूर्ती ll
        (श्रीम.ताराबाई पंढरीनाथ सूर्यवंशी)

   काळजाचा तुकडा गेल्या काही दिवसांपासून दवाखान्यात दाखल होता. ताराबाई दारातच बसून कोणाची तरी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होती. चित्त थाऱ्यावर नव्हतं. जे ऐकलं त्यावर विश्वास बसेना. परमेश्वराच्या कृपेने जे ऐकलं, ते सगळं खोटं ठरावे.तिचा प्राण कंठाशी आला होता. तेवढ्यात जे नको होतं तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येऊन प्रत्यक्षात उभा राहिला.तिचा मोठा मुलगा दिलीपचं शव दवाखान्यातून ॲम्बुलन्स घेऊन दारात उभी राहिली .तिने हंबरडा फोडला. आईच ती ! ज्या प्रेमानं आई मुला-  मुलींसाठी करते त्याची सर कशालाच येऊ शकत नाही.श्री.दिलीप यांची मुलं,पत्नी साऱ्यांवर दुःखाचााा डोंगर कोसळला. किंबहुना गेल्या अनेक दिवसांपासून त्याची प्रकृती थोडी चिंताजनक होती. मृत्यूची चाहूल लागली होती . दिलीपच्या मृत्युनं ताराबाईवर आभाळ कोसळले. ती धाय मोकलून रडत होती. काही वर्षांपूर्वी तिचं कुंकू असंच आजारपणाने पुसलं गेलं !  त्यानंतर हा दुसरा धक्का! नऊ महिने पोटात वागविलेला आणि त्याचा प्रेमाने बालपणी केलेला सांभाळ. त्याचं दुडुदुडु चालणं, बोबडे बोल,अंगाखांद्यावर घेऊन फिरणं ,त्याचे लाड करणे, कौतुक करणं, त्याच्या सार्‍या गरजा पूर्ण करणे, त्याला भूक लागताच तिला सुटलेला पान्हा ! सार सार काही तिच्या नजरेसमोर तरळून लागलं.त्याच लाडक्या दिलीपचे कलेवर पाहून तिचा श्वास रोखला गेला. घसा कोरडा पडला.नको नको ते विचार त्या क्षणी तिच्या मनात येऊन गेले. काय करावे आणि काय नको, असे तिला झाले.एवढं करूनही लोकांची सहानुभूती बायकापोरानाच ! आईचे कष्ट कोणी पाहिले? तिच्या यातना कोणी जोखल्या? मुलांनी कितीही कृतघ्नता दाखवली तरी आईच्या हृदयातून केवळ प्रेमच पाझरत असते. असे अजब रसायन परमेश्वरानं आईच्या रूपात तयार केले आहे.मुलांच्या असंख्य चुका पदरात घेणारी , काही केले तरी माझा मुलगा निष्पाप आहे, असे छातीठोकपणे सांगणारी आईच असते. ताराबाई आता शून्य नजरेने प्रेताकडे पाहात होती. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत होती. पदराने त्याचा चेहरा पुसत होती."माझा दिलीप. कुठे रे गेला.. कधी भेटशील ...काय करू तुझ्यासाठी ...तुझ्या ऐवजी देवाने मला का नाही नेले..? तिच्या या सार्‍या प्रश्नांची उत्तरे आता ईश्वर देखील देऊ शकत नव्हता. ज्यावेळी आई बापाच्या आधी मुलाचं अघटित जाणं होतं. यापेक्षा आई-वडिलांच्या आयुष्यात वाईट काय असू शकतं...!! 
        रूढीप्रमाणे अंत्यसंस्काराचे विधी आटोपले. ताराबाईंच्या मन तिला खात होतं. शेवटची त्याची माझी भेट झाली असती, तर बरे झाले असते.. काय बर आवडायचे त्याला ..? त्याची आवड- निवड, त्याचं वागणं - बोलणं .,सारं काही तिला आठवू लागलं. ती गतस्मृतीत गेली...
    नाशिक जिल्ह्यातील पेठ या तालुक्याच्या गावी श्री.पठाडे हे फॉरेस्ट अधिकारी होते. इंग्रजांच्या आमदानीत फॉरेस्ट अधिकारी हे तसे मानाचे पद होते. त्यांच्या अपत्यांपैकी श्री.हरिभाऊ पठाडे हे सर्कल ऑफिसर म्हणून महसूल खात्यात नोकरी करीत. महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभरात आणि समाजात मोठा मानमरातब होता. आर्थिक स्थिती तशी भक्कम होती. वडिलांकडून शिक्षणाचा वारसा मिळाला होता. त्यामुळे आपोआपच सर्व मुले शिकली. श्री. हरिभाऊ व सौ.सोजाबाई यांना चार मुले व दोन मुली अशी अपत्ये झाली. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, मागास समाजात जन्म आणि त्यात शिक्षण म्हणजे खूप मोठी, अभिमानाची गोष्ट होती. त्यात ताराबाई या सर्वात मोठ्या. त्यांचा जन्म १९३९ सालचा. ताराबाई दिसायला गोऱ्यापान, रेखीव, सुंदर,मध्यम उंचीअसलेल्या.आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेली ताराबाई  सरकारी शाळेत साहेबांची मुलगी म्हणून शिकू लागली. परंतु शिक्षण जरी मिळालं तरी समाज चालीरीती विसरला नव्हता. मुलगी म्हणून दुजाभावाची वागणूक घरातूनच मिळत होती. मुलगी म्हणजे चूल आणि मूल सांभाळणे एवढेच तिचे काम ! याच विचारांचे तिचे वडील होते. म्हणून इयत्ता चौथी पर्यंत तिचे शिक्षण झालं आणि रुढी परंपरेने तिचं शिक्षण बंद झालं.आता तिचे हात पिवळे केले पाहिजेत. म्हणून सर्वजण तयारीला लागले.शाळा बंद झाली. 
       नोकरीच्या निमित्ताने असलेल्या ओळखीतून,    वयाच्या सोळाव्या वर्षी दिंडोरी तालुक्यातील आंबे वरखेडे येथील एक स्थळ त्यांच्या नजरेस पडले. श्री. मल्हारी सूर्यवंशी हे वरखेडे येथे गावातच गटई काम करून कुटुंबाची गुजराण करीत होते.कुटुंब मोठं होतं. त्यात गरिबी .शिक्षण फारसे नव्हते. अडाणीच म्हणाना !  त्यात तीन बायकांचा प्रपंच! त्यांचा मोठा मुलगा श्री.पंढरीनाथ(जन्म १९३२) सातवी पास होऊन एका धान्य गोदामात डोअरकीपर म्हणून नोकरी करीत होता. त्याकाळी मुलगा सातवी शिकलेला आणि सरकारी नोकरी करतो, हे पाहून परिस्थिती हळूहळू सुधारेल,असे समजून श्री. हरिभाऊ पठाडे यांनी आपल्या मोठ्या मुलीचे म्हणजे ताराबाईंचे लग्न श्री.पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्याशी आंबे वरखेडे येथे लावून दिले.सोळा वर्षीय ताराबाई आणि पंढरीनाथ पंचवीस वर्षाचे होते.संसार सुरू झाला.
     ऊन सावली प्रमाणे आयुष्यात सुख दुःख चालूच असते.श्री.पंढरीनाथ ज्या धान्य गोदामात डोअरकीपर म्हणून काम करीत होते, त्या गोदामाला आग लागून ते जळाले. त्याबरोबरच त्यांची नोकरी गेली.कुटुंबाला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली .परंतु ,त्याकाळी सातवीपर्यंत शिक्षण झाले असल्याने एका सदगृहस्थाच्या ओळखीने एका खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. त्या नोकरीचे आयुष्य सात-आठ महिन्यांच्या पलीकडे गेले नाही.
      दुर्दैवाने नोकरी टिकत नसली तरी पंढरीनाथ यांना शिक्षणामुळे एकामागून एक संधी देखील मिळत होत्या.
   आता नाशिकच्या करन्सी नोट प्रेस येथे त्यांना नोकरी मिळाली. काही दिवस आंबे वरखेड येथे ये - जा  करून नोकरी केली .परंतु जाण्या-येण्याचा खर्च आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी त्यांनी नाशिक रोड येथे घर भाड्याने घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. पगार फारसा नव्हता. काही दिवसानंतर प्रेसचे क्वार्टर राहण्यासाठी उपलब्ध झाले. नोकरीच्या पगारातून केवळ घरखर्च भागत असे. अशावेळी आपली उन्नती होणार नाही, हे श्री.पंढरीनाथ यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांचा संसार बहरला होता. श्री.पंढरीनाथ आणि ताराबाई यांना मंगला, दिलीप, शीला, रोहिणी, माया आणि संतोष अशी सहा अपत्ये झाली. त्याआधी प्रारंभीची दोन अपत्ये योग्य औषधोपचार न मिळाल्याने दगावली होती. खाणारी तोंडे वाढली.परंतु कमावणारे हात केवळ दोनच !  कुटुंबाची ओढाताण होऊ लागली.श्री.पंढरीनाथ हे मुळातच स्वाभिमानी असल्याने त्यांनी कोणाकडे हात पसरले नाहीत. सासरकडची परिस्थिती श्रीमंतीची असूनही कधी त्यांच्या दारात ते गेले नाहीत.
    आपल्या मुलीचे जीवन हलाखीचे आहे. तिला आर्थिक चणचण आहे.हे आई-वडिलांना ठाऊक होते.परंतु आम्ही तुझे लग्न लावून दिले आहे.आता तू आणि तुझे नशीब ! त्यात आम्ही काही करू शकत नाही.असे म्हणून वडिलांनी आपली जबाबदारी झटकली.
    ताराबाईंचे माहेर त्या अर्थाने श्रीमंतीत नांदत होते. वडील सर्कल अधिकारी, भाऊ श्री.अरविंद वकीली करत.श्री.गोपीचंद हे बंधू येवला येथे नोकरी करीत.श्री.बाळासाहेब हे शिक्षक होते. तर धाकटे प्रकाश हे म.न.पा. नाशिक येथे अभियंता म्हणून कार्यरत होते.लहान बहीण सौ.सुलोचना, नांदगाव येथे सुस्थितीत होती. तिचे घरचे रेल्वे स्टेशन तिकीट मास्टर म्हणून नोकरीस होते. या सर्व भावंडांमध्ये ताराबाईंची आर्थिक स्थिती तशी हालाखीची. परंतु पतीचा कडक स्वभाव आणि स्वाभिमानी वृत्ती तिला ठाऊक होती.ताराबाईंनी देखील आपल्या पतीचा स्वाभिमान दुखावणार नाही ,या करिता माहेरी हात पसरला नाही. मिळेल त्यात कुटुंबाचा गाडा ते दोघेही पती-पत्नी ओढत होते.
    स्वतःचे हक्काचे घर घ्यावे, असा विचार श्री. पंढरीनाथ यांच्या मनात आला. परंतु त्यासाठी कर्ज काढूनही पुरेशी रक्कम त्यांच्याकडे नव्हती. अशावेळी पतीची परवानगी घेऊन, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, काही काळ माहेरची मदत घेण्याचे ताराबाईंनी ठरविले. परंतु तिच्या माहेरच्यांनी याप्रसंगी तिला मदत करण्याचे स्पष्टपणे नाकारले. तू जर कष्टात दिवस काढत असशील, तर मूलबाळ सोडून तू परत माहेरी ये. आम्ही आयुष्यभर तुला सुखात ठेवू. असा  सल्ला देखील दिला. परंतु अशा प्रसंगी ताराबाईंचा स्वाभिमान जागा झाला. रागाच्या भरात ती नाशिकला परत आली. घडलेला प्रकार पतीला कथन केला.आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील आणि कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःचे घर घेऊ, अशी हिम्मत पतीला तिने दिली.
     श्री.पंढरीनाथ नोट प्रेस मध्ये आठ ते दहा तास काम करीत. उरलेल्या वेळेत फुटपाथवर गटई काम ते करू लागले.दिवसभर ते मेहनत करीत.आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावं,ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती.त्यासाठी वाटेल तेवढी मेहनत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
     ताराबाईंनी देखील नवऱ्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली.श्रीमंतीत वाढलेली ताराबाई आता ...आपलं घरदार ..मुलं-बाळं सांभाळून लोकांकडे धुणीभांडी ,स्वयंपाकाची कामं करू लागली. अशावेळी मंगला आणि शीला या मुली देखील शाळा शिकता शिकता लोकांची धुणीभांडी करून आई वडिलांना मदत करू लागल्या. जेल रोडच्या कोठारी कन्या शाळेत या दोन्ही मुली शिकत असत .शाळेतील मधली सुट्टी झाली की, मंगला आणि शीला दोन घरची धुणी-भांड्याचे काम करून पुन्हा शाळेत हजर होत असत .दिलीप डोक्यावर टोपली घेऊन भाजीपाला, फळे,गल्लीबोळातून विक्री करीत. संपूर्ण कुटुंब वडिलांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटू लागलं. 
    एकीचे बळ फळाला आलं .सर्वांच्या कष्टातून आणि काटकसरी तून स्वतःचे घर श्री. पंढरीनाथ यांनी घेतले. सर्वांना अत्यानंद झाला. परंतु, आपली बहिण लोकांच्या कामाला जाते .हे आई वडिलांना व भावांना आवडले नाही.परंतु कोणाकडूनही भीक मागायची नाही .अस या सर्वांनी ठरवले होते. कामाची कोणतीही लाज ताराबाईने बाळगली नाही.
     दरम्यानच्या काळात श्री.पंढरीनाथ यांनी नोकरी बरोबरच कष्टाने गटईच्या जागेवर एक टपरी करार तत्वावर मिळवली.श्री.दिलीप त्या कामात तरबेज झाले. पै..पै..जमवला. मुला मुलींची लग्न केली.
   नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील श्री.यादवराव त्र्यंबक घोलप यांच्याशी मोठी मुलगी मंगला हिचा विवाह रूढी परंपरेप्रमाणे आणि परिस्थिती अनुरुप लावून दिला. श्री.यादवराव, बॉम्बे मुन्सिपल कॉर्पोरेशन (BMC)मध्ये नोकरी करीत. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईतील भायखळा परिसरात राहात. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. जावई म्हणून ते कधी वागले नाहीत.
     दहावीपर्यंत शिकलेल्या शीला या मुलीचा विवाह निफाड तालुक्यातील सुप्रतिष्ठित भागशिक्षण अधिकारी व ओझर येथे स्थायिक झालेले श्री.दादा (मास्तर) गांगुर्डे यांचे चिरंजीव श्री.चंद्रकांत यांच्याशी केला. श्री.चंद्रकांत हे एअर फोर्स मध्ये MES विभागात नोकरी करीत होते. वडिलांच्या शिस्तीत वाढल्यामुळे व मिलिटरी परिसरात वावरल्यामुळे श्री.चंद्रकांत यांचा स्वभाव कडक होता. परंतु ते अत्यंत समजदारसंवेदनशील देखील आहेत.
  जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील व सध्या मुंबई येथे शासकीय तंत्रनिकेतन प्रशिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरीत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले प्रा.श्री.राजेंद्र वाघ यांचेशी रोहिणी या मुलीचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. लग्नापूर्वी रोहिणी यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते.
   पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील उद्धट या गावातील प्रसिद्ध शेतकरी व बागायतदार श्री. काशिनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्री.अनिल यांच्याशी माया या मुलीचा विवाह झाला. श्री.अनिल यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित, सुसंस्कारित व उच्चशिक्षित आहे. स्वतः अनिल एल. एल. बी. झाले. परंतु पारंपरिक शेती व्यवसायाकडे लक्ष देणारे कोणी नसल्यामुळे शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला. आज एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी लौकिक मिळवला आहे.
   श्री.पंढरीनाथ व ताराबाई यांच्या दोन मुलांपैकी श्री. दिलीप यांचा विवाह मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावी स्थायिक असलेल्या श्री.काळू यमाजी मोरे यांच्या कुटुंबातील सरला यांच्याशी झाला. तर लहान मुलगा श्री.संतोष यांचा विवाह निफाड तालुक्यातील दुगाव येथील श्री. पठाडे यांच्या सविता या मुलीशी झाला. मुला मुलींची लग्न करताना आर्थिक स्थिती पेक्षा सुसंस्कार, सुशिक्षितपणा यांना त्यांनी प्राधान्य दिले. 
   संपूर्ण कुटुंबाने खूप कष्टात दिवस काढले. ताराबाई जेथे धुणी - भांडी करायला जाई. तेथून शिळेपाके अन्न तिला मिळे. त्यावर कुटुंबाची गुजराण होत असे. मुलांना नवीन कपडे फारसे माहीत नव्हते. परिस्थिती हालाखीची असली तरी श्री.पंढरीनाथ यांनी मुलांचे शिक्षण मात्र थांबवले नाही.कामे करून मुले शिकत होती.
    हुंड्याची पद्धत समाजात रूढ होतीच. लग्न खर्च भागवण्यासाठी मोठ्या कष्टाने घेतलेलं घर मुलीच्या लग्नाकरिता सावकाराकडे गहाण ठेवावे लागले ! लग्नानंतर हळूहळू ते पूर्ण कर्ज व्याजासकट त्यांनी फेडलं. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी ते घर त्यांना उपयोगी पडलं.सर्व मुलींची ..मुलांची लग्ने झाली. जावई-  सुना समजदार मिळाल्या. नातवंडे- पतवंडे आली. काळ पुढे सरकत होता. या सर्व काळात एकाच गोष्टीने मात्र त्यांची साथ कधीच सोडली नाही....ती म्हणजे गरिबीने ! त्याचे कारण काहीही असो. कुटुंबाचा पसारा वाढलेला होताच. त्यामुळे गरजा वाढत गेल्या.उत्पन्नाचा स्रोत मात्र वाढला नाही. कुटुंबासाठी बारा चौदा- तास काम श्री.पंढरीनाथ यांना करावे लागे.खाण्यापिण्याची वेळ निश्चित नसायची. अशा कारणांमुळे मधुमेहाने त्यांच्याशी मैत्री केली !  आपल्या नंतर मुलाच्या नोकरीसाठी त्यांनी नोट प्रेस मध्ये उपोषण केले. दिलीपला नोकरी मिळवून दिली.२००५ साली मधुमेहाचा त्रास जडलेला असताना अचानक छातीत त्रास जाणवू लागला आणि श्री.पंढरीनाथ यांनी गरीबीचा अखेर निरोप घेतला ! कुटुंबाचा आधारवड गेला. तोपर्यंत दोन्ही मुलं हाताशी आली होती.श्री.दिलीप नोट प्रेस मध्ये नोकरी करून वडिलांनी शिकवलेलं पारंपरिक गटई काम आणि बॅग रिपेरिंग करी. लहानगा संतोष वडिलांनी थाटलेलं,परंतु मालकीचं नसलेल्या दुकानात व्यवसाय करत आहे.
    आई - वडील होते तोपर्यंत घरावर त्यांचे नियंत्रण होतं. घर एकसंघ होतं. वडील गेले तसेच कुटुंबावर चे नियंत्रणही !  दोन्ही भावांची मनाने वाटणी झाली. शेजारी राहून मन मात्र कोसो मैल दूर गेलं ! ते शेवटपर्यंत एकमेकांशी मनाने जवळीक साधू शकले नाहीत.जेव्हा घरात खायला अन्न नव्हतं, पैसाअडका नव्हता, तेव्हा घर चालवण्यासाठी सर्वांनी घाम गाळला. रक्ताचं पाणी केलं .एकोप्याने नांदले आणि आज दोन पैसे गाठीशी आले तर त्यांच्यातला इगो जागा झाला. तेव्हा,कष्टाची आणि व्यवसायाची लाज वाटली नाही. आज एकमेकांच्या सुखदुःखात सुद्धा तटस्थ राहण्याची बुद्धी देव कशी देऊ शकतो ?  देव जाणे !
     पतीच्या निधनानंतर ताराबाईंचा आधार गेला. आपण आपले सर्वस्व गमावल्याची भावना त्यांना झाली. स्त्रीला शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तिने स्वतःला सावरलं.लहान मुलावर तिची जबाबदारी आली.श्री.पंढरीनाथ यांचे काही पेन्शन मिळते, तेवढाच कुटुंबाला आधार ! 
    सदैव हसरा चेहरा,दुसऱ्यांना आग्रह करून खाऊ घालण्याचा स्वभाव, पक्वान्न गोड गोड बनवणे तिच्या आवडीचे काम !  अन्नपूर्णा जणूकाही ती !! थकत नाही. मुलीं - नाती यांच्यावर तिचं जिवापाड प्रेम.आज वयाची ८२ वर्षे झाली तरी कोणावर बोजा त्या झाल्या नाहीत.भरपूर गप्पा करणं, हसणं आणि हसवणे याचा त्यांना छंद आहे.
    मुलगी म्हणून आई-वडिलांकडून फारसे प्रेम त्यांना मिळालं नसलं तरी उत्तम संस्कार मात्र मिळाले.त्याचा पतीचा संसार सावरताना खूप उपयोग झाला. ताराबाईंच्या वाईट काळात भावांची फारशी साथ लाभली नसली तरी आई-वडील भाऊ यांच्याबद्दल प्रचंड अभिमान ताराबाईंना आहे. त्यांच्या सर्वांच्या बद्दल त्या कौतुकाने.. भरभरून बोलतात. कधी बोलताना दुखी असल्याचं जाणवत नाही.भावांनीही बहिणीचा स्वभाव समजायला थोडा उशीर केला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचा लहान बंधू श्री.प्रकाश यांनी त्यांना सणावाराला साडीचोळी केली. मान सन्मान दिला.वारंवार विचारपूस करून अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी धावून येऊ लागले. आज पर्यंत त्यांनी बहिणीला कधी अंतर दिले नाही.
    पतीने आणि ताराबाईंच्या कुटुंबाने मोठ्या कष्टाने आणि स्वाभिमानाने घेतलेल्या छोटेखानी घराच्या जागेवर आज मोठी इमारत उभी राहिली आहे. याकामी ताराबाई यांचे लहान बंधू श्री.प्रकाश पठाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट मिळाला. स्वकष्टाने, घाम गाळून विकत घेतलली ही वास्तू ...वडिलांच्या प्रेमाची साक्ष देत आहे.अनेक अडचणींच्या  प्रसंगात या वास्तूनेच त्यांना सहारा दिला आहे. श्री.प्रकाश पठाडे यांच्यामुळे ताराबाई यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे.
     वयोमानाप्रमाणे रक्तदाब आणि मधुमेह यांच्याशी थोडीफार मैत्री ताराबाईंनी देखील केली आहे.परंतु आपल्या आधी पती आणि नंतर मुलाच्या निधनाचे दुःख अंतःकरणात ठेवून चेहऱ्यावर हास्य दाखवत आयुष्याची संध्याकाळ ताराबाई घालवत आहेत.
    काळ बदलला.तशी लोकांमधील विचार करण्याची पद्धत बदलली. सहनशीलता कमी झाली. अलीकडे संस्कृती आणि नीतिमूल्ये देखील काही प्रमाणात लोप पावत चालली आहेत.आई-वडिलांकडे श्रीमंती असूनही नवऱ्याकडे दरिद्री अवस्थेत राहणे ताराबाईनी स्वीकारले. आज असा प्रसंग आला तर इतकी सहनशीलता नव्या पिढीकडे आहे का ? इतके कष्ट करण्याची तयारी आहे का? या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारात्मक असतील !
    श्रीमती ताराबाई यांच्याकडून ही सहनशीलता घ्यावी . संवेदनशीलता घ्यावी  कुटुंब कशाला म्हणतात... ते टिकवण्यासाठी किती श्रम करावे लागतात.. ते त्यांच्याकडून शिकावे. त्या नशिबाला दोष देत बसल्या नाहीत. परिस्थितीतून मार्ग काढायला शिकल्या.संकटे येतात तसे जातातही. काळ कोणासाठी थांबत नाही.
    आज ताराबाईंच्या अंगावर दागिने फारसें नसतील कदाचित... परंतु त्यांचे अवघे जीवन नीतिमूल्यांच्या अलंकारांनी खुलून दिसते.
    श्रीमती ताराबाई यांना ईश्वर दीर्घायुरारोग्य प्रदान करो याच सदिच्छा !

लेखन
श्री.शैलेश पाटोळे
नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

Friday, May 14, 2021

सहकारातील तेजस्वी तारा

                  सहकारातील तेजस्वी तारा
        (श्री.भास्कर- आबा कोठावदे)

नमस्कार,
आज - काल नव्या पिढीच्या समोर आदर्शांची वानवा आहे, असे शब्द कायम कानावर पडतात. मात्र समाजात असे अनेक आदर्श आहेत की, ज्यांच्या कर्तुत्वावर नजर टाकली तरी नवी पिढी योग्य मार्गाने उत्कर्ष साधू शकेल. परंतु त्यासाठी आपली नजर पारखी असली पाहिजे. अंत:चक्षू जागरूक असले पाहिजेत. म्हणजे अशा आदर्श व्यक्ती आपल्या सहज नजरेस पडू शकतात. भरकटू पाहणाऱ्या नव्या पिढीला योग्य दिशा दर्शन होऊ शकते. सत्याच्या मार्गावर चालून इतरांची फसवणूक अथवा लबाडी न करता देखील यशस्वी होता येऊ शकते.याकरिता गरज असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि आत्मविश्वासाची ! पाच- सात वर्षांपूर्वी अशाच एका कर्तृत्वसंपन्न व्यक्तीशी माझी ओळख झाली.एकंदरीतच त्यांचा अनुभव,आचार विचार, व्यवहार, व्यक्तिमत्व या सर्वांनी मन आकर्षित झाले. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून आशयाचा केवळ अंदाज केला जाऊ शकतो. त्याप्रमाणे मनुष्याच्या केवळ दिसण्याने त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळख होणे शक्य नसते. व्यक्तीच्या संपर्कातून त्याचे अंतरंग जाणून घेण्यास मदत होते.
    मी ज्यांच्याविषयी बोलतो आहे, ते म्हणजे सहकार क्षेत्रातील अग्रणी श्री.भास्कर (आबा) कृष्णा कोठावदे ! 
   शून्यातून विश्व निर्माण करणे, ही म्हण साहित्यात ऐकणे आणि प्रत्यक्षात अनुभवणे यात फरक आहे. आबांच्या कार्य कर्तुत्वावर नजर टाकल्यानंतर या म्हणीची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. १५ मे १९४९ रोजी नाशिक जिल्ह्यातील पश्चिम उत्तर भागातील आदिवासीबहुल कळवण तालुक्यातील जुनी बेज या गावी आबांचा जन्म झाला. वडील श्री. कृष्णाजी भिकाजी कोठावदे, हे त्या काळी व्हर्णा क्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. त्यामुळे शिक्षणाचा वारसा जन्मजात त्यांना मिळाला होता. आई सौ.राधाबाई अडाणी असल्या तरी अत्यंत संस्कारी होत्या. आबांचे वडील सावकाराकडे मुनीमजी म्हणून हिशोब लेखनाचे काम करीत. कुटुंबात चार बहिणी तीन भाऊ, आई वडील असा परिवार होता. उत्पन्नाचेेेे दुसरे साधन नव्हते.त्यामुळे घरची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती.
    आबांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मोठ्या बहिणीकडे अंतापूर ता. बागलाण येथील प्राथमिक शाळेत झाले.पुढे आठवी ते अकरावी पर्यंत शिक्षण मूळ बेज या गावी महात्मा फुले हायस्कूल  मध्ये झाले. शिक्षण घेता- घेता एका किराणा दुकानात सकाळ संध्याकाळ काम ते करीत. हळूहळू कुटुंबाच्या गरजा वाढत गेल्या. रोजगार फारसा मिळत नसे. म्हणून रोजगारासाठी त्यांनी गाव सोडायचे ठरवले. जुनी मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी नाशिक गाठले.
   नाशिक जिल्ह्याचे ठिकाण, पूर्णपणे अनभिज्ञ शहर, ओळख नाही, परिचय नाही. परंतु काही केले तरी रोजगार मिळवणे कुटुंबासाठी अत्यावश्यक होते. राहण्याची सोय नव्हती. जेवण कुठे मिळेल, कसे मिळेल, मिळेल की नाही, याची शास्वती नव्हती. खिशात दमडी देखील नव्हती. ईश्वराच्या भरवश्यावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने आबांनी नाशिक शहर गाठले.
   त्यावेळी, दिवसा ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम शोधत. रात्रीच्या वेळी एस.टी. स्टॅंडवर झोपत असत. कामाच्या शोधात असताना त्याकाळी नासिक मध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री.वालजीभाई पटेल यांच्या फॅक्टरीत सायकलने घरोघरी साबण पोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळाली. त्यातून ५० रुपये महिना मिळत असे. दिवसभर राबराब राबायचे. मिळेल तिथे मिसळ पाव खाऊन रात्री पुन्हा एस.टी. स्टँड वर झोपायला जायचे. नाशिकमधील प्रारंभीचे ६२ दिवस त्यांनी असे काढले. दरम्यानच्या काळात त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या गावकरी प्रेसचे श्री.दादासाहेब पोतनीस यांनी पहाटे घरोघरी जाऊन पेपर वाटण्याचे काम दिले. पहाटे उठून पेपर टाकण्याचे काम, दिवसभर घरोघरी साबणाची डिलिव्हरी करणे, यामुळे त्यांना प्रचंड थकवा येई. परंतु, आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखवायचे असेल तर त्यांना थांबून चालणार नव्हते. शरीराने थकत असले तरी मनाने ते ताजेतवाने राहत असत. दरम्यानच्या काळात अकरावी मॅट्रीकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मिळणाऱ्या पगारातून संध्याकाळी टायपिंगचा क्लास त्यांनी लावला.
   पहाटे एस.टी.स्टॅन्ड वरून उठायचे, पायी चालत वकील वाडी, तेथून रविवार कारंजा, गावकरी प्रेस मधून पेपर टाकण्याचे काम करून गंगेवर जायचे. एकच ड्रेस अंगावर असल्याने आंघोळ झाल्यावर कपडे वाळले की पुन्हा श्री.वालजीभाई पटेल यांच्या दुकानात कामासाठी हजर व्हायचे. असा त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि सचोटी या गुणांना हेरून वालजीभाई यांनी साबण विक्रीवर काही प्रमाणात कमिशन द्यायला सुरुवात केली. तरी ते पैसे कुटुंबासाठी पुरेसे नव्हते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती. परंतु पैशाअभावी ते शक्य नव्हते. म्हणून त्यांनी नाशिक सोडले आणि मालेगाव गाठले.
     मालेगाव येथे कापडाच्या एका व्यापाऱ्याकडे नव्वद रुपये महिना नोकरी स्वीकारली. काही मित्र मिळून खोली करून ते राहू लागले. रात्रंदिवस ते मेहनत करीत. मिळेल ते अन्न पोटात ढकलत. सात-आठ महिन्यांच्या काळातच त्यांना अनियमित जेवणामुळे अल्सरचा त्रास सुरू झाला. त्या काळात सुप्रसिद्ध डॉ. बळीराम हिरे यांच्याकडे ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट बरोबर त्यांनी कापड दुकानातील नोकरी सोडण्याचा आपुलकीचा सल्ला देखील दिला. आबा पुन्हा आपल्या मूळ गावी बेज येथे परतले. जुन्या किराणा दुकानात काम करू लागले. आजारी असले तरीदेखील कुटुंबासाठी काम धंदा करणे अत्यावश्यक होते. आता त्यांचे वय १८ वर्षे झाले.
     दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन या शासन पुरस्कृत सहकारी संस्थेची रोजगार बाबतची जाहीरात वर्तमानपत्रात आल्याचे कुणीतरी सांगितले. त्याकाळी राजकारणात सुविख्यात असलेले श्री.पंडित धर्माजी पाटील यांनी शब्द टाकल्यामुळे नोकरी मिळाली. नाशिक मधील मालेगाव स्टँड येथे ते कार्यालय होते. रुपये १८५ प्रतिमाह पगार सुरू झाला. नोकरी फिरतीची होती. काही कालावधीनंतर दोन पैशांची आवक सुरू झाली. परंतु दुर्दैव असे १९६८ मध्ये शासनाने ही योजना बंद केली. नोकरी जाण्याची वेळ आली. दरम्यानच्या काळात चुलत भावाच्या ओळखीने गिरणारे येथील राईस मिल वर प्रतिनियुक्तीने नोकरी मिळाली. तेथे श्री. नारायणराव पिंगळे हे मुख्य व्यवस्थापक होते. त्यांच्या हाताखाली काम करीत असताना मार्केटिंग या विषयात रुची निर्माण झाली. श्री.पिंगळे यांनी आबांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
    काही दिवसांनी राईस मिल देखील बंद पडली. त्याकाळी श्री.बाबुराव भारस्कर हे समाज कल्याण मंत्री होते. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण बोर्डाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी नाशिक मध्ये एक शाळा सुरू केली होती. त्यांच्याकडे नोकरीचा अर्ज आबांनी केला. सुंदर,सुवाच्य अक्षरातील अर्ज पाहून श्री. भारस्कर यांनी लेखनिकाची नोकरी आबांना दिली. सर्व काही आलबेल सुरू होते. 
         १९६९ मध्ये नाशिकला महापूर आला. सगळीकडे रोगराई पसरली. लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. आबांना टायफाईड नंतर न्यूमोनिया झाला. ते शाळेत उपस्थित राहू शकत नव्हते. दरम्यानच्या कालावधीत शाळेत काहीतरी विपरीत घडले आणि त्याचे खापर हितशत्रूंनी आबांवर फोडले. आपल्यावर झालेला खोटा आरोप स्वाभिमानी असलेल्या आबांना सहन झाला नाही. त्यांनी ओळख झालेल्या एका वकिलाकडून कोर्ट केस संस्थेविरुद्ध दाखल करण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराच्या विरोधात केस दाखल करण्याचे धारिष्ट्य आबांनी दाखविले. या गोष्टीचे आमदार श्री. बाबुराव भारस्कर यांना फार कौतुक वाटले. वेगळ्या पद्धतीने केस मागे घेण्यास विनंती केली. त्यानंतर आबांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आमदार भारस्कर यांनी आबांना मुंबईला नेले. त्यांच्या निवासी स्वीय सहाय्यक म्हणून आबांची नेमणूक केली. आबांकडे असलेला प्रामाणिकपणा, हुशारी, अन्याया विरुद्धची चीड, स्वाभिमान या गुणांमुळे आमदार भारस्कर प्रभावित झाले होते. मला अशाच तरुणाची गरज आहे,असे श्री.भारस्कर म्हणाले. श्री भारस्कर यांनी आबांना इंग्रजी बोलण्यासाठी तसेच आवश्यक पत्र व्यवहार करता येण्यासाठी क्लास लावून दिले. मेहनतीने ते शिकले. १९७० ते १९७२ यादरम्यान आबांनी आपल्या कामाने श्री.भारस्कर यांचे मन जिंकले. पत्राचे ड्राफ्टिंग आणि इंग्रजीतून संभाषण यावर त्यांनी कमांड मिळवली. 
       पुन्हा दुर्दैवाच्या चक्रात आबा सापडले. त्याकाळी झालेल्या निवडणुकीत आमदार भारस्कर यांची आमदारकी गेली. परंतु,श्री.भारस्कर यांनी आबांना नोकरीवरून न काढता नाशिकच्या शाळेत क्लार्क म्हणून पुन्हा पाठविले. स्वीय सहाय्यक म्हणून आमदाराबरोबर काम करत असताना आणि क्लार्क म्हणून शाळेत काम करत असताना आबांना तडजोड करणे शक्य होत नव्हते.
    दरम्यानच्या काळात १९७३ मध्ये सटाणा तालुक्यातील अंबासन येथील सौ.मालतीबाई यांच्याशी आबांचा शुभविवाह झाला. गृहलक्ष्मी सुखी - समाधानी आणि आनंदी स्वभावाची होती. काटकसरीची मुळातच त्यांना सवय होती. कमी पगारात उत्तम संसार त्यांनी केला. आबांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. सर्व प्रकारच्या परिस्थितीत विशेष करून वाईट दिवसात देखील आबांना मानसिक आधार दिला.
   १९७५ यावर्षी काही कारणामुळे शाळा बंद होण्याच्या स्थितीत आली. कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनामार्फत झाले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या डी.एस. कोठारी कन्या शाळेत क्लार्क म्हणून आबांचे समायोजन झाले होते. परंतु आबांनी आता नोकरी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. श्री.नारायणराव पिंगळे,आमदार श्री.बाबुराव भारस्कर, काही मित्र परिवार यांचे मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य आणि स्वतःमधला आत्मविश्वास यांच्या जोरावर मालेगाव स्टँड येथे श्री.भास्कर ब्रदर्स- गव्हर्मेंट अँड इंडस्ट्रीज ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ही स्वतःची फर्म सुरू केली. याकामी स्वतःचा भाऊ त्यांच्याबरोबर होता. दोघांनी मिळून प्रचंड मेहनतीने हे फर्म नावारूपाला आणले. अवघ्या पाच वर्षांच्या काळात ट्रान्सपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या नऊ ट्रक आबांनी स्वतःच्या मालकीच्या घेतल्या. व्यवसाय बहरला. दोन पैसे गाठीशी राहू लागले. त्याबरोबर थोडा लौकिकही वाढला. परंतु,दुर्दैवाचे दुष्टचक्र काही थांबेना. ट्रान्सपोर्ट व्यवसायाला उतरती कळा लागली. तोट्यात सर्व गाड्या विकाव्या लागल्या. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बंद पडला.
    परंतु परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या आबांनी श्री.भास्कर ब्रदर्स - जनरल मर्चंट अंड कमिशन एजंट नावाचे दुकान थाटले. साधारण १९९४ पर्यंत हा व्यवसाय ते करीत होते. हा व्यवसाय भरभराटीस आला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यानिमित्ताने फिरावे लागत होते. हळूहळू वयाप्रमाणे त्यांना फिरणे आता शक्य होत नव्हते. म्हणून भावाकडे या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी देऊन त्यांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला.
   नंतर रियल इस्टेट कन्सल्टंट या व्यवसायाची कल्पना त्यांना आली आणि एक छोटेसे ऑफिस मध्ये त्यांनी रियल इस्टेट कन्सल्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. स्वतःची हुशारी आणि चिकाटी या गुणांमुळे या व्यवसायातही त्यांना उत्तम आर्थिक लाभ झाला. तसेच विविध व्यवसायांच्या निमित्ताने नाशिक आणि जिल्हाभरातील अनेक लोकांशी संपर्क वाढला. त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे वाटत होते.
   १९९९ यावर्षी त्यांचा मोठा मुलगा श्री. लक्ष्मीकांत डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण करून नाशिक मध्ये महिंद्रा कंपनीत नोकरीस लागले. मुलाला नोकरी मिळाल्यामुळे आबांना आधार वाटू लागला. २००२ मध्ये दुसरा मुलगा श्री.हितेंद्र बी.ई.मेकॅनिकल पूर्ण करून पुण्यात नोकरी करू लागला. तिसरा मुलगा श्री.अविनाश यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा पूर्ण केला. परंतु बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील वडिलांचे गुण उपजतच त्यांच्यात असल्याने इन्शुरन्स क्षेत्रात श्री.अविनाश यांनी जम बसविला. तीनही मुले स्वतःच्या पायावर उभी राहिली. वडिलांनी केलेले कष्ट, अपार मेहनत याची जाणीव मुलांना आहे. आबांना मुलांचा मोठा आधार मिळाला. सौ.सुवर्णा ही आबांची कन्या बी.सी.एस. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून,आपल्या कुटुंबाबरोबर ठाणे येथे स्थायिक झाली आहे. आबांनी केलेल्या अपार मेहनतीमुळे त्यांचे कुटुंब आज स्थिरस्थावर होऊ शकले आहे.
    स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास आणि त्यांच्यामध्ये असलेले संभाषणाचे कौशल्य, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि मारवाडी भाषेवर असलेले प्रभुत्व, मार्केटिंगचा प्रचंड अनुभव, दांडगा जनसंपर्क, काटकसर या सर्व गुणांमुळे आबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. हे करत असताना अनेक समवयस्क मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिले. श्री.उखा शंकर पगार, श्री.उत्तम पाटील हे त्यांचे बालमित्र कायम त्यांच्याबरोबर राहिले.श्री.कारभारी जयराम पगार ,श्री.निंबा मोतीराम खैरनार यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने आर्थिक सहकार्य मुक्तहस्ताने केले. श्री.बाबुराव भारस्कर यांचे खूप मोठे योगदान आबांना लाभले.
   १९८१ मध्ये आबांनी प्रत्यक्ष बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला . १९८२ साली ना.म.को. बँकेच्या प्रशासक मंडळाच्या सदस्यपदी शासनाकडून आबांची नेमणूक झाली. तेव्हा खऱ्या अर्थाने सहकार चळवळीशी आबा जोडले गेले. १९८९ साली श्री.हुकुमचंद बागमार उर्फ काका यांच्या पॅनल मधून ना.म.को. बँकेची निवडणूक आबा लढले आणि बहुमताने विजयी झाले. तेव्हा पहिल्यांदा ना.म.को.बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली. १९९४ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन ना.म.को. बँकेचे चेअरमन पदाची धुरा आबांच्या खांद्यावर पडली. ना.म.को. बँक आणि इतर पतसंस्थांच्या माध्यमातून आबांचे संपर्क क्षेत्र अधिक रुंदावले. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील जाणकारांशी आबांचे ऋणानुबंध जुळले. मंत्रालयातील संपर्क वाढला. याच दरम्यान त्या काळातील नाशिकचे आमदार श्री. टी.एस.दिघोळे यांनी स्वतःची पतसंस्था काढण्याबाबत पत्र मिळवून दिले.
    १ मार्च १९९५ रोजी आबांनी सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, नाशिक ची मुहूर्तमेढ रोवली. ही पहिली मुख्य शाखा रविवार पेठेत सुरू झाली. सहकार क्षेत्रातील आणि बँकिंग व्यवसायातील अनुभवी लोकांशी असलेला संपर्क यामुळे लवकरच सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था भरभराटीला आली.२००२ सालच्या ना.म.को. बँकेच्या निवडणुकीत आबा पुन्हा चेअरमन झाले. याची परिणीती म्हणून महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन ची निवडणूक लढवण्याची संधी आबांना मिळून,उत्तर महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यातून प्रचंड संघर्ष करत, अंतर्गत विरोधाला न जुमानता, आबा बहुमताने विजयी झाले. आणि संचालक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पुढे २००७- २००८ मध्ये महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन चे उपाध्यक्ष तर २००९- २०१० मध्ये फेडरेशनचे अध्यक्षपद आबांनी भूषविले. सध्या आबा या फेडरेशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान ४ जानेवारी २००१ रोजी सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी शाखा पवन नगर, सिडको, नाशिक येथे,२० जून २००४ रोजी त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे तिसरी शाखा, २०१४ मध्ये चौथी शाखा विंचूर येथे तर २०१५ मध्ये सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या शाखेचे उद्घाटन दिमाखात पार पडले. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त डिव्हीडंट देणारी आणि तीन हजार सभासद असलेली सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था अग्रक्रमावर आहे.
    सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकूण नफ्यातील रिझर्व फंडातून म्हणजेच धर्मदाय निधीमधून आबांनी सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत किडझी मॉन्टेसरी स्कूल आणि कॅडेन्स प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा मुंबई आग्रा महामार्गलगत सुरु केली आहे. विशेष म्हणजे शाळेची जागा एका दानशूर विश्वस्तांनी मोफत दिली. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता शाळेची दोन मजली, सर्व सोयींनी युक्त इमारत उभी आहे. या शाळांच्या रूपाने शैक्षणिक क्षेत्रात देखील आबांनी कर्तुत्व दाखविले आहे.
   लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, बोलण्यातील कसब आणि माधुर्य, व्यवसायातला दांडगा अनुभव, बँकिंग क्षेत्रावर असलेली मजबूत पकड आणि आत्मविश्वास या जोरावर आबासाहेबांनी लोकमाणसात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बँकिंग फेडरेशन मुळे बँकॉक,पटाया, मलेशिया, मकाऊ इ. अनेक देशात पतसंस्थांच्या परिषदांना हजर राहून मार्गदर्शनाची संधी आबांना मिळाली. देशभरातील विविध राज्यांमध्ये बँकिंग क्षेत्रातील जाणकार म्हणून आबांना निमंत्रित केले जाते.
    बँकिंग क्षेत्रात आणि पतसंस्थांच्या क्षेत्रात आबांनी केलेल्या गौरवास्पद आणि उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक छोट्या-मोठ्या सामाजिक, आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थांनी आबांना गौरविले आहे. सारस्वत बँकेचे श्री.एकनाथराव ठाकूर स्मृती पुरस्काराने दिल्ली येथे झालेल्या समारंभात आबांना गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्याचा मानाचा गिरणा गौरव, संत गाडगेबाबा ट्रस्ट तसेच शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराज ट्रस्टचा जीवनगौरव पुरस्कार देखील आबांना प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे २००२ यावर्षी नाशिक जिल्ह्यातील पतसंस्थांनी बँकिंग फेडरेशनच्या वतीने कालिदास कलामंदिरात तत्कालीन खासदार.श्री.उत्तमराव ढिकले आणि प्रा. सुरेश मेणे यांच्या अध्यक्षतेखाली आबांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
   कोणत्याही नवीन क्षेत्रांमध्ये यश मिळवायचे झाले तर प्रोत्साहन देणारे आणि सहाय्य करणारे हात महत्त्वाचे असतात. त्यात बालपणापासून असलेले मित्र आणि मैत्रिणी यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व क्षेत्रांमध्ये आबांचा दांडगा संपर्क आहे. कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. जोपर्यंत यश पदरात पडत नाही तोपर्यंत संघर्ष करीत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच एस.टी. स्टँड वरील संघर्षापासून ते फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष पर्यंतचा प्रवास ते पूर्ण करू शकले आहेत.जीवनातील छोट्या-मोठ्या दुःखाच्या प्रसंगांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. खचून गेले नाहीत. शालेय जीवनामध्ये शिक्षकांनी दिलेले उपदेश आयुष्याला कलाटणी देऊ शकतात.यावर आबांचा विश्वास आहे. त्यांच्या श्री.ए.डी.बच्छाव सरांनी म्हटले होते," ध्येय चांगले ठेव. परिस्थितीवर अजिबात जाऊ नको.आज तुझ्या पायात चप्पल नाही. चप्पल घालण्याची इच्छाशक्ती मनात ठेव. परंतु,इतरांकडे भिक मागू नको. जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही. तोपर्यंत थांबू नको." असा दिलेला सल्ला त्यांनी आज पर्यंत मनात जपून ठेवला आहे. बालपणीचे मित्र श्री.नारायण मेतकर, श्री.रामचंद्र पगार यांनी वेळोवेळी अनेक प्रकारचे सहकार्य करून आत्मबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
   आबांच्या ३१ व्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची सर्व प्रकारची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. सर्व बहिणींची लग्ने, भावांची लग्ने इ. जबाबदारी आबांवर पडली. आबांंना पुढाकार घेणे क्रमप्राप्त होते. 
       जोपर्यंत आपल्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे येत नाही. तोपर्यंत आपण प्रयत्न करायला सुरुवात करीत नाही. असे प्रामाणिक मत आबांचे आहे. आजकालच्या तरुणांनी आई-वडिलांच्या सावलीत आयुष्य आरामात न जगता, व्यवसायाकडे वळले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. स्वतःच्या कर्तुत्वाने व्यवसायिक क्षेत्रांमध्ये खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. नोकरीवर विसंबून राहता कामा नये.व्यवसाय स्वतःला सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. व्यवसाय करीत असताना त्यातले बारकावे स्वतः अभ्यासले आणि अनुभवले पाहिजे.तरच आपण व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. केवळ खुर्चीवर बसून , इतरांना आदेश देऊन व्यवसायात यश प्राप्त होत नाही.
  आबांनी हे सर्व साम्राज्य स्वकष्टाने उभारले. स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेले आबा इतरांचे उपकार मात्र कधीही विसरत नाहीत. ते कायम अशा लोकांच्या ऋणात राहणे पसंत करतात. बँकिंग आणि पतसंस्थांच्या माध्यमातून अनेक गरजू आणि होतकरू तरुणांना आबांनी त्यांच्या पंखात बळ भरले आहे. शक्य तेवढी मदत ते गरजूंना करीत असतात. ज्या कष्ट आणि विपरित परिस्थितीतून त्यांना पुढे यावे लागले, अशी परिस्थिती इतरांवर येऊ नये म्हणून आबा नेहमी प्रयत्न करीत असतात.
   सर्वे sपि सुखीन: संतु सर्वे संतु निरामय:
सर्वे भद्राणि पश्यन्तु ,न कश्चित् दुःखम् आप्रूयात l
  अर्थात,सर्वजण सुखी असोत. सर्वजण निरोगी असोत. सर्वांचे नेहमी भले व्हावे. कोणालाही दुःख नसावे .अशी उदात्त भावना आबांची या क्षणी आहे.
   एक अभ्यासू,जाणकार ,अनुभवी, स्वाभिमानी, स्वावलंबी, कामसू, अंगी चिकाटी असलेले, संकटांचा सामना करणारे, संधीचे सोने करणारे, समदृष्टी असणारे ,आत्मविश्वासू, निर्व्यसनी, दानशूर ,कृतज्ञ, नाविन्याचा ध्यास असणारे,सहकार क्षेत्रातील अग्रणी ,सर्वांसाठी मार्गदर्शक असलेले,श्री.भास्कर (आबा) आज दि. १५ मे रोजी ७३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्याला निश्चितच अभिमान आहे. 
   सध्या श्री.आबासाहेब, सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन चे संचालक, नामको बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन आणि संचालक, सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष, सन.२०१७-२०२० व २०२०- २०२३ या कालावधीसाठी नाशिक मधील अग्रगण्य शैक्षणिक संस्था नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.तसेच नाशिक शहरातील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर व शिशुवृंद शाळांचे शालेय समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
     आबा,आपणास निरामय दीर्घआयुरारोग्य लाभो. आपला माया- ममता रुपी सहवास आणि आशीर्वाद सर्वांना लाभो.याच सदिच्छा! 
    


लेखन : 
श्री.शैलेश पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक
दि.१४ मे (अक्षय तृतीया)
९८६०७४९७९०
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️


Saturday, May 8, 2021

बाळासाहेब : एक आनंदयात्री

           बाळासाहेब : एक आनंदयात्री
 
अपकीर्ती सांडावी l सत्किर्ती वाढवावी ll
विवेके दृढ धरावी l वाट सत्याची ll
    समर्थ रामदासांनी उत्तम व्यक्तीच्या सांगितलेल्या या लक्षणांप्रमाणे काही व्यक्ती तंतोतंत वागत असतात. आपल्या वागण्या बोलण्यातून व्यवहारातून आपल्या कुटुंबाची,समाजाची पत वाढवतात.सद्बुद्धी ने वागतात. सत्याने मार्गक्रमण करतात आणि आपला जन्म सार्थकी लावतात. अशा उत्तम व्यक्तीच्या पंगतीत बसणारे वाय.आर. उर्फ बाळासाहेब ! जणू काही बाळासाहेबांच्या जीवन कार्याकडे पाहूनच वरील श्लोक लिहिला गेला असावा. यातील अतिशयोक्ती भाग वगळता बाळासाहेबांचे कार्यकर्तृत्व खरोखरच वाखाणण्यासारखे होते.
       बागलाण तालुक्यातील सटाणा निवासी श्री. राघोबा खंडेराव पाटोळे यांच्या कुटुंबात मुलांमध्ये शेंडेफळ म्हणून जून महिन्याच्या १० तारखेला १९३० साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात यशवंतांने जन्म घेतला. सर्व भावंडांमध्ये लहान असल्यामुळे सर्वजण लाडाने त्याला बाळू असे म्हणत. पुढे बाळू ते बाळासाहेब हा त्यांचा प्रवास नक्कीच इतरांना प्रेरणादायी आहे.
   सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव हे त्यांचे मामाचे गाव श्री.मोहनराव वाघ त्यांचे आजोबा. तेथे यशवंताचा जन्म झाला.
   श्री.राघोबा दादा आणि सौ.साखरबाई यांना १४ अपत्ये झाली.त्यापैकी सहा अपत्ये बालपणातच या- ना- त्या कारणाने दगावली. आठ अपत्ये ईश कृपेने वाचले. त्यापैकी सर्वात मोठी मुलगी सौ.अनसूयाबाई. ज्यांचे लग्न होऊन तालुक्यातील पारनेर या गावी श्री.झिप्रू थोरातांकडे दिले. तर लहान मुलगी सौ.शकुंतलाबाई या नाशिक मधील कानडे कुटुंबात लग्न होऊन गेल्या.
     स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्यानंतरच्या अगदी प्रारंभीच्या काळात स्पृश्यास्पृश्य भेद तसा समाजात होताच. स्वतः शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्यामुळे मुलांवर उत्तम संस्कार वडिलांकडून  झाले. खेड्यापाड्यात राहून स्वतःच्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे आहेत. राघोबादादांच्या मुलांची ओळख करून घेताना खरोखर आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. राघोबादादांच्या पहिला मुलगा धुळे शहरातील नामवंत वकील ॲड.श्री. मोतीराम पाटोळे उर्फ वकील दादा. वकिलीच्या व्यवसायात त्यांनी मोठे नाव कमावले. मामलेदार होण्यासाठी आवश्यक परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. त्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. धुळे शहरातील त्यांचे घर म्हणजे आंबेडकर चळवळीचे केंद्रस्थान होते.
     दुसरे चिरंजीव श्री.पंढरीनाथ पाटोळे, सटाणा येथील पारंपरिक शेती आणि दुकान सांभाळण्याचे काम करीत. उत्तम बूट कारागीर म्हणून त्यांचा लौकिक होता.पुढे मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांनी आपल्या कुटुंबाचा उद्धार केला. श्री. वामनराव पाटोळे हे कुटुंबासह मुंबई येथे वास्तव्यास होते.हे राघोबादादांचे तिसरे चिरंजीव.
  लालबागच्या BEST  मध्ये नोकरीस असलेले श्री.एकनाथराव पाटोळे (सध्या हयात असून वय वर्षे ९९ आहे.)हे कुटुंबाचा मोठा आधार होते. श्री.नामदेवराव पाटोळे पुण्यात वेधशाळेत नोकरी करीत. यावर्षी ते वयाची ९४ वर्षे पूर्ण करीत आहेत.
   मुलांमध्ये धाकटे असलेले यशवंत उर्फ बाळू काका हे सर्वांचे लाडके. त्यांचे बालपणीचे शिक्षण सटाणा येथील म्युन्सिपल शाळेत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे मोठे बंधू धुळे येथे स्थायिक झाल्याने आई-वडीलांनी लाडक्या यशवंताला धुळे येथे शिक्षणासाठी पाठविले. काही काळ नंदुरबार तसेच अमळनेर येथे देखील शिक्षणासाठी गेल्याचे ऐकिवात आहे. मॅट्रिक नंतर मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये प्री डिग्रीसाठी ऍडमिशन घेतले. सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि ऐकण्याचा दुर्मिळ योग यशवंताला आला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वैयक्तिक लायब्ररीतील सर्व पुस्तके सिद्धार्थ कॉलेजमधील लायब्ररीला भेट म्हणून दिले होते. त्यातून प्रेरणा मिळवून यशवंताला वाचनाची आवड निर्माण झाली. आपणही पुढे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर पुण्याच्या सी.ओ.ई.पी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री मिळवली. साधारण हा काळ १९५२- १९५६ चा असावा. मागास समाजातील एखादा मुलगा अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन इंजिनियर होतो, कदाचित, ते समाजातील नाशिक जिल्ह्यातील पहिले इंजिनियर असावेत ! ही खूप मोठी बाब होती.
   १९५६ यावर्षी इंजीनियरिंग उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्र हातात मिळण्याआधीच मुंबई येथे गोदरेज कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी यशवंतला संधी मिळाली. तोपर्यंत डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठातून घेतलेले देखील नव्हते. परंतु, आत्मविश्वास, हजरजबाबीपणा आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी नामांकित गोदरेज कंपनीत नोकरी मिळवली. इंटरव्यूसाठी पॅनल बसले होते. सर्व प्रश्नांचे सोपस्कार पूर्ण झाले. वैयक्तिक माहिती विचारून झाल्यावर कंपनीचे मालक श्री.नवल गोदरेज यांनी यशवंताला प्रश्न विचारला," या व्यतिरिक्त अजून काय येते?.." अशावेळी वेळेचे भान राखत यशवंताने आपल्याकडे असलेली एक कला इंटरव्यू पॅनल च्या समोर पेश केली. फार कमी लोकांना अवगत असलेली एक कला यशवंताला अवगत होती. ती म्हणजे नखाने कागदावर डिझाईन किंवा ड्रॉइंग काढणे! श्री.नवल गोदरेज यांनी विचारताच यशवंताने एक कागद घेऊन नखाने "गोदरेज " हे नाव कंपनीच्या लोगो प्रमाणे कागदावर काढले. ही कला पाहून श्री.नवल गोदरेज बेहद खूष झाले.त्यांनी उठून उभे राहून यशवंतशी हात मिळवून त्याचे कौतुक आणि अभिनंदन केले.. उद्यापासून कंपनीच्या डिझाईन सेक्शन मध्ये जॉईन व्हा ! असा आदेश दिला. कला माणसाला कुठल्या कुठे नेऊन ठेवेल हे सांगता येत नाही... खरोखर कला असे मानवाशी भूषण ! डिग्री सर्टिफिकेट न पाहता असलेल्या कलेने खुश होऊन यशवंताला नोकरी मिळाली.पुढे त्या कागदाची त्यांना कधीच गरज पडली नाही. आजही ते डिग्री सर्टिफिकेट विद्यापीठात धूळखात पडलेले असणार !
  अभ्यासाबरोबरच नखाने डिझाईन काढणे,ड्रॉइंग काढणे या कलेत ते तरबेज होते. त्याच प्रमाणे जगावेगळा एक अनोखा छंद त्यांना होता.तो म्हणजे उत्तम गाण्याचा. तुम्ही म्हणाल याच्यात जगावेगळे काय? अनेक लोक उत्तम गातात... थांबा सांगतो. यशवंत गायचा.. परंतु गाण्याचे प्रत्येक बोल उलटे म्हणण्याची हातोटी त्यांच्याकडे होती! बहुतांश लोकांना इतरांना उलटून बोलायची सवय असते, तसे नव्हे!
   गाण्याचे प्रत्येक शब्द त्याच लयीत, गतीत, तालात सुरात न अडखळता, अगदी अस्खलितपणे उलट्या पद्धतीने म्हणत उपस्थितांचे मनोरंजन करीत असत. फार कमी लोकांना हे जमत असावे. बुलबुल हे वाद्य ते अत्यंत खुबीने वाजवत. कानडा राजा पंढरीचा हे त्यांचेेेे सर्वात आवडते गीत.याचा अर्थ संगीताशी त्यांचे फार जवळचे नाते होते. कदाचित हेच त्यांच्या निरामय दीर्घायुष्याचे गुपित असावे.
   लहानपणापासूनच ड्रॉईंग मध्ये त्यांना रुची होती. ईश्वराच्या कृपेने त्यांनी नोकरी करत असताना ड्रॉइंग डिझाईन सेक्शन मध्येच काम करण्याची त्यांना संधी मिळाली. हा निव्वळ योगायोग असावा ! नाहीतर अनेकांची आवड-निवड- नोकरी आणि व्यवसाय यांचा ताळमेळ आयुष्यभर जमलेला दिसत नाही!
  आपल्या कामातून ,प्रामाणिकपणातून कंपनीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता. प्रारंभीच्या काळात नोट प्रेस साठी लागणारे कॉइंन मशीन जर्मनीहून मागविले जात. ते नादुरुस्त झाले की जर्मनीहून अभियंते बोलवावे लागत.यासाठी फार खर्च पडे. अशावेळी कंपनीचे मालक श्री.नवल गोदरेज यांनी सदर मशीन भारतीय बनावटीत बनवता येईल का ?असा विचार मांडला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मशीनचे डिझाईन यशवंताने बनवले.पहिले भारतीय बनावटीचे कॉइन प्रेसिंग मशीन बनविण्यात यशवंताचा सिंहाचा वाटा होता. त्यावेळी त्यांच्या कर्तृत्वामुळे सात हजार रुपयांचे इनाम कंपनीला  मिळाले. गोदरेज कंपनीचे चहुकडे कौतुक झाले. एका समारंभात श्री.नवल गोदरेज पुढच्या रांगेत बसले होते. त्याच्या मागील रांगेत यशवंत आणि त्यांचे सहकारी बसलेले होते. पुरस्काराची घोषणा झाली. श्री.नवल गोदरेज यांना पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर आमंत्रित केले केले. पुरस्कार स्वीकारताच या पुरस्काराचे सर्व श्रेय इंजिनीयर श्री.यशवंतराव पाटोळे यांना जाते,असे अभिमानाने आणि गौरवाने श्री.नवल गोदरेज यांनी जाहीर केले. टाळ्यांच्या कडकडाटाने यशवंता चे कौतुक झाले. एका लहानशा खेड्यातून आलेला मुलगा, ज्याच्या कर्तृत्वामुळे गोदरेज सारख्या मोठ्या कंपनीचा लौकिक वाढला होता. यशवंतच्या सर्जनशीलतेची आणि यशाची ती पावती होती. याप्रसंगी यशवंताला आपल्या आई वडिलांची आठवण झाली. हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण होता. मला कृतार्थ झाल्यासारखे वाटले.असे यशवंतराव या प्रसंगाचे वर्णन करताना सांगत.
   कंपनीत कामाच्या जोरावर त्यांना वेगवेगळ्या पदांवर बढती मिळत गेली. कंपनीतर्फे जपान, जर्मनी या देशात जाण्याची संधी देखील मिळाली.
   त्यांना नाविन्याची हाऊस होती. नवनवीन वस्तू बाजारात आल्या की, त्या ते खरेदी करत.स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवीत.टप्प्याटप्प्याने आणि आर्थिक स्थितीनुसार टी.व्ही., स्कूटर, कार,कॅमेरा..या वस्तू त्याकाळी श्रीमंतीच्या व्याख्येत बसणार्‍या होत्या. त्याचा उपभोग त्यांनी घेतला.
   त्या काळात प्राथमिक अवस्थेतल्या कॅमेरा मध्ये रोल असे .त्यातून केवळ पंधरा-सोळा फोटो निघत. फोटोकॉपी डेव्हलप करणं तसे कष्टाचे आणि खर्चाचे देखील होते.कॅमेरा घेतल्यानंतर यशवंतराव, ज्यांच्याकडे जातील आणि जे त्यांच्याकडे येतील अशा सर्व लोकांचे फोटो काढत. त्या माध्यमातून मित्र नातेवाइकांच्या आठवणी ते संग्रही ठेवत. अशावेळी पैशांचा विचार त्यांनी कधी केला नाही. खेड्यापाड्यातील आपल्या नातेवाईकांचे फोटो काढत. अशावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदापुढे पैशाची त्यांना किंमत वाटत नव्हती. त्यांच्या वडिलांचे म्हणजे श्री.राघोबादादांचे १९६३ ला निधन झाले. ते दुर्मिळ फोटो देखील त्यांच्या संग्रही आहेत. नव्या पिढीला त्याकाळी जमलेले लोक ओळखू देखील येत नाहीत. परंतु पन्नास-साठ वर्षांपूर्वी काढलेले ते फोटो आपल्याला गतस्मृतीत घेऊन जातात.त्यांना जुन्या आठवणीत रमायला खूप आवडत असे. नव्हे तो त्यांचा छंद होता. त्यांच्या घरी गावाकडून कोणी नातेवाईक, मित्र ,पाहुणे आले की, त्यांना न कळू देता यशवंतराव टेपरेकॉर्डर वर रेकॉर्डिंग सुरू करत. गप्पा संपल्या की त्यांचा आवाज ते पुन्हा टेपरेकॉर्डर चालू करून ऐकवत. आपला आवाज पुन्हा ऐकून त्या व्यक्तीचा आनंद गगनात मावेना. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची दैवी शक्ती आणि आशीर्वाद त्यांना लाभला होता!
    आई - वडील, काका - काकू, भाऊ - वहिनी, पुतणे, सुना, नातवंडे- पतवंडे,सर्वांची माहिती अगदी देश परदेशात असले तरी त्यांच्याकडे अद्ययावत असे. शक्य असेल त्या सर्व समारंभात यशवंतराव हजेरी लावत. सभामंडपात यशवंतरावांनी प्रवेश करताच वातावरण अगदी प्रसन्न होत असे. सर्वांशी प्रेमाने आपुलकीने ते वागणार. आपण एखाद्या मोठ्या कंपनीत मॅनेजर वगैरे असल्याचा अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नसे.मातीशी नाळ वगैरे जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत अक्षरशः खरे होते. स्वतःहून कोणाशीही ओळख काढणार.आपुलकीने विचारपूस करणार. ख्यालीखुशाली विचारणार. अनोळखी माणसाशी सुद्धा त्यांचा वार्तालाप म्हणजे कोणीतरी रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशी बोलत असल्याचा भास होई. अशावेळी त्यांना वयाचा अडसर नसे. लहान मुलांंशी खेळायला त्यांना खूप आवडे. कानावर असलेला चष्मा खुबीने ते हलवत... मुलांना ती मोठी गंमत आणि चमत्कार वाटे. कधीकधी पत्त्यांची जादू करून दाखवीत. लहान मुलांचे मनोरंजन करण्यात त्यांना मजा वाटे. 
करील मनोरंजन जो मुलांचे 
जडेल नाते प्रभूशी तयाचे... ............
      लहानांसाठी आजोबा, मोठ्यांसाठी बाळू काका, इतरांसाठी बाळासाहेब ते होते ! आपल्या स्वभावाने, प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळविले. लोक त्यांना बाळासाहेब नावाने ओळखत.
   संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या शेगाव निवासी श्री. मरिभाऊ व सौ.पार्वताबाई शेगोकार यांची सुकन्या सौ.चंद्रभागा यांच्याशी १५ मे १९६० रोजी यशवंतरावांचा विवाह झाला.संबंधितांकडून शेगावीचे स्थळ आल्यावर वडील राघोबादादांनी भावकीतील काही जाणकार मंडळी तसेच अजमीर सौंदाणे येथील श्री.काळू नारायण पाटोळे उर्फ आप्पा ,असे आठ - दहा जण शेगावी गेले.
        नावाप्रमाणेच मुलगी सुस्वरूप, शांत, संयमी वाटल्याने लग्नगाठ बांधली गेली. मुळातच शिक्षणाची आवड असलेल्या राघोबादादांना शिकलेली व शिक्षिका म्हणून काम करणारी सून मिळाल्याचा अत्यानंद झाला होता.त्यात देखणी आणि सुसंस्कारी म्हणजे दुग्धशर्करा योग जुळून आला. यथावकाश शेगावी लग्नविधी पार पडला. शेगावी ची आर्थिक स्थिती फारशी उत्तम नव्हती.
   पुढे श्री.यशवंतराव आणि सौ.चंद्रभागाबाई यांचा संसार समंजसपणा, सहनशीलता आणि सुसंस्कार यांमुळे फुलला. बाळासाहेबांनी लग्नानंतर सौ.चंद्रभागाबाई यांचे नाव सौ.सिंधुबाई ठेवले. त्यांच्या संसारवेलीवर बहर आला. त्यांना सौ.नंदा, सौ.मीना आणि श्री.अविनाश ही अपत्ये झाली.
  यशवंतराव मुळातच शांत - सुस्वभावी होते तसेच निर्व्यसनी.पत्नी सासरी आल्यावर केवळ कुटुंबाची जबाबदारी पाहते.
नोकरी करीत नाही. म्हणून त्यांनी पत्नीला कधीही कमी लेखले नाही. घर कामात ते पत्नीला आवडीने मदत करीत.त्यांना स्वयंपाक करण्यात रुची होती. पती-पत्नी दोघांचेही विचार सुसंगत असल्याने कधी त्यांच्यात वादविवाद झाले नाहीत.
     श्री.यशवंतरावांनी कायम सासरकडील नातेवाईक आणि सटाणा येथील नातेवाईक यात कधी भेद केला नाही. नातेसंबंधात समतोल साधला. म्हणुनच दोन्हीकडील नातेवाईकांमध्ये ते बाळासाहेब होते ! कोणालाही त्यांनी परिस्थितीवरून हिणवले नाही.उलट अडीअडचणीत सदैव हात खुला ठेवला. एक आदर्श पती म्हणून त्यांनी आपली भूमिका छान निभावली. सर्वांचे मन ते जपत. स्वतः कष्ट करून इतरांना आनंद देण्यात त्यांना नेहमी समाधान वाटे. स्वतःकडे असलेल्या विनोदबुद्धी मुळे ते सतत इतरांना हसवत ठेवत. घरात कधी गंभीर वातावरण त्यांनी होऊ दिले नाही.
    मुंबईला त्यांच्या घरी सतत गावाकडून येणाऱ्या नातेवाईकांचा आणि मित्रांचा राबता असे. आल्या गेलेल्यांना दोन घास खाऊ घातल्या शिवाय ते कधीही जाऊ देत नसत. त्यांच्या तृप्तीत त्यांना आनंद वाटत असे. इतर नातेवाईक यशवंतरावांच्या घराला यशवंत भोजनालय आणि यशवंत लॉज विनोदाने म्हणत. आणि ते रूढार्थाने खरे होते. असा एकही दिवस जात नसेल यशवंतरावांकडे कोणी जेवायला, किंवा रात्री निवासाला नसतील. गावाकडून येणाऱ्यांच्या हक्काचं ठिकाण म्हणजे बाळासाहेबांचे घर ! अर्थात यामागे खरे श्रेय सौ. सिंधुबाई उर्फ काकू यांना जातं.आल्यागेलेल्यांचे आगत - स्वागत करताना त्यांनी कधीही कंटाळा केला नाही.हसतमुखाने सर्वांना खाऊ घातले.जणू शेगावीच्या महाराजांचा प्रसादच तो !
   वडील म्हणून मुलांशी तेे वागले नाहीत. मित्र म्हणून मुलांशी त्यांनी संबंध ठेवले.नोकरीत व्यस्त असल्याने कधीतरी अभ्यास घ्यायचे. परंतु ,मुलांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. मुलांची सर्व हौस- मौज, लाड - कोड त्यांनी आपल्या कुवतीनुसार केले. मुलांच्या आवडी निवडी जपल्या. त्यांना शिक्षणात नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्राधान्य दिले. स्वतःचे विचार त्यांच्यावर कधीही लादले नाहीत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च करायला कधी मागेपुढे पाहिले नाही. मुलांचा खर्च भागवता यावा याकरिता नोकरी व्यतिरिक्त दुसरे काम देखील त्यांनी केले, हे फार कमी लोकांना माहीत आहे. मुलांच्या शाळेचे गणवेश ते घरी स्वतः शिवत. एक छंद म्हणून तसेच शक्य तेवढी काटकसर करता यावी म्हणून शिलाई मशीन त्यांनी घरी आणले होते. मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवता यावा हा हेतू त्यामागे होता. स्कूटर ,सायकल घरच्या घरी रिपेअर करीत. मुलांना शिकवत.
       एकदा जर्मनीला कंपनीतर्फे जाण्याचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी मुलांना विचारले," तुम्हाला काय आणू ?"त्यांना वाटलं मुले चॉकलेट सांगतील. परंतु, चि.नंदाने ,"डॅडी मला VCR आणा." असे म्हटले.तेव्हा ते फारसे काही बोलले नाहीत.कारण त्या काळात ती महागडी वस्तू होती. असे म्हणून ते जर्मनीला गेले साधारण एक महिना कामाच्या निमित्ताने जर्मनीत होते.कंपनी त्या काळात दोन वेळच्या जेवणासाठी आणि किरकोळ खर्चासाठी पगाराव्यतिरिक्त काही पैसे देत असे. यशवंतरावांनी एक वेळच्या जेवणाचे पैसे वाचवून त्यातून परत येताना VCR मुलांच्या आनंदा करिता घेऊन आले. इतका मोठा त्याग मुलांसाठी केवळ वडीलच करू शकतात!
   आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे,अशी त्यांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी वाटेल ते श्रम करण्याची त्यांची तयारी होती. मुलांनीही त्यांचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे त्यांची तिन्ही मुले वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधर झाले. म्हणजे डॉक्टर ! त्यांना अत्यानंद झाला.आपली मुलगी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाल्यानंतर आनंदाच्या भरात त्यांनी घरात नृत्याचा ठेका धरला होता ! वडील म्हणून ते असे आदर्श होते.असे आई-वडील लाभणे म्हणजे मुलांचे भाग्यच म्हटले पाहिजे !
      सर्वतीर्थमयी माता सर्वदेवमय: पिता l
      मातरं पितरं तस्मात सर्व यत्न्येन पुज्यते ll
  मुलांनी देखील आई-वडिलांच्या आज्ञानुरुप वागून अशा माता-पित्यांची सेवा केली पाहिजे.
       यशवंतराव सुखदुःखात सारखेच असायचे. संकटांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले.इतरांना आधार दिला.
   डॉ. सुधाकर साने, श्री.पी.एन.मोरे, श्री.कहाते हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र. योग बघा २८ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकाराने बाळासाहेबांचे दुःखद निधन झाले. त्या दिवशी रविवार होता. बरोबर आठ दिवसांपूर्वी डॉ. सुधाकर साने त्यांच्या पत्नीसह काही कामानिमित्ताने नाशिकला आले होते. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी त्यांनी पाहुणचार घेतला. दोन्ही मित्रांनी एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारल्या. अनंताच्या यात्रेला जाण्यापूर्वी मित्राशी केलेला तो अखेरचा संवाद ठरला ! आणि पुढच्या आठव्या दिवशी म्हणजे रविवारी बाळासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. 
      आम्ही नातवंडे - पतवंडे नेहमी त्यांना त्यांचे वय विचारायचो. ते म्हणायचे ,"मी शंभर वर्षे जगणार आहे." असे म्हणताना ते दात दाखवायचे. "बघा अजून माझा एक दात देखील पडलेला नाही." खरोखरच वयाच्या ८५ वर्षापर्यंत त्यांचे दात शाबूत होते. असा आत्मविश्वास त्यांच्यात होता. त्याच्या आयुष्यकालात त्यांना कोणत्याही दुर्धर आजाराने ग्रासले नाही. सतत हास्यविनोदाने दुसऱ्यांच्या आनंदाचे कारण ते बनत. संगीत हे त्यांच्या आवडीचे होते. सतत कार्यमग्न ते राहत असत. दुसऱ्याबद्दल चहाडी- चुगली करणे हे त्यांच्या गावी देखील नव्हते. यासारखे असंख्य गुण त्यांच्या निरोगी आणि दीर्घ आयुष्याचे रहस्य असावे. शेवटच्या चार-सहा वर्षांपासून काही अप्रिय घटनांमुळे रक्तदाबाचा त्रास त्यांना होऊ लागला होता. त्याचेच पर्यावसन हृदय विकाराच्या झटक्यात होऊन बाळासाहेबांनी सर्वांचा निरोप घेतला.
    सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बाळू काकांच्या जवळ जास्तीत जास्त नातेवाईकांचे संपर्क नंबर लिहिलेले होते. प्रत्येकाचा वाढदिवस त्यांच्या डायरीत तारीख,वार नुसार लिहिलेले असायचे. मुळातच त्यांच्या दिवसाची सुरुवात ती डायरी चाळून होत असे. त्यांच्या घरी असलेल्या लँडलाईन फोन वरून ज्याचा वाढदिवस असेल, उठल्यावर त्यांना शुभेच्छा ते देत असत. आज-काल घरात असलेली रक्ताची नाती एकमेकांशी अबोल होऊ लागलेली आहेत. परंतु,बाळासाहेब मात्र या सर्वांना अपवाद होते. 
  २०१० च्या ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पाटोळे परिवाराचे रियुनियन त्यांनी नाशिक येथे घडवून आणले. याकरिता प्रचंड मेहनत त्यांनी घेतली. देश-परदेशातील कुटुंबातील सर्व सदस्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क साधून एकत्रित केले. त्यांच्या आयुष्यातील हा अत्यंत आनंदाचा क्षण होता. हाती घेतलेले एखादे काम चिकाटीने आणि नेटकेपणाने करण्याचेे कसब बाळासाहेबांकडेे होते!
        दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा हा गुण आपण सर्वजण त्यांच्याकडून घेऊया. हीच बाळासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल !


श्री.शैलेश पाटोळे
(बाळासाहेबांचा पणतू)
अजमीर सौंदाणे, ता. सटाणा जि.नाशिक
९८६०७४९७९०


    
   

Sunday, May 2, 2021

हसते हसते कट जाए रस्ते..

       हसतेे कट जाए रस्ते....
 शुभ संध्याकाळ !!
कसे आहात ? मजेत ना .. छान.
हसत रहा l आनंदी राहा ll
      आज जागतिक हास्य दिन. त्यानिमित्ताने जगातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषधाची थोडी ओळख करून घेऊया !
  मित्रांनो, आपले दैनंदिन जीवनातील ताणतणाव, वैफल्य जर घालवायचे असेल तर त्यासाठी हास्य हे एक प्रभावी औषध आहे. हास्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण आनंदी आणि उत्साही राहू शकतो.ज्याला कोणत्याही परिस्थितीत खळखळून हसता येतं त्यांच्यासारखा सुदैवी दुसरा कोणीही नाही !
     दुसऱ्याचे स्वागत हसून केल्याने आपला त्या व्यक्तीबरोबर होणारा संवाद... सुसंवाद बनतो. परंतु,एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, हसावे जरूर परंतु कुत्सितपणे हसू नये!
  सततच्या धावपळीच्या जीवनात आपण हसणे विसरतो. त्यात अलीकडच्या काळात कोरोनाची भर पडली आहे. परंतु लक्षात घ्या, हे ही दिवस जातील. आठवतंय ना.. 
     आनेवाला पल जानेवाला है ....
त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. परंतु चिंता करू नका.
 आज-काल कोरोनाच्या परिस्थितीमुळे विनोद या शब्दाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत घरात बंदिस्त असल्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाला विनोदी मालिका पहा,वाचन करा, विनोद ऐका, विनोद ऐकवा, मोबाईल मधील विनोदी व्हिडिओ पहा,.. असे एक ना अनेक मोफत सल्ले देताना दिसतात. 
    खरोखरच आपण हसणे विसरलो होतो का ? या आपत्कालीन परिस्थितीत विनोदाला पुन्हा चांगले दिवस आलेत!
अलीकडे हास्य क्लब स्थापन करून लोक कृत्रिम का होईना हसण्याचा प्रयत्न करतात. कारण हास्य ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हे मुंबईमधील डॉ. मदन कटारिया या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या महाशयांच्या लक्षात आले. त्यांनी लाफ्टर क्‍लब आंदोलन आणि हास्य थेरपी याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. हास्य म्हणजे शारीरिक , मानसिक, भावनिक आरोग्य जपणारे टॉनिक आहे. असे त्यांचे प्रांजल मत आहे. हास्य थेरपीच्या या चळवळीतून जगभरात शांतता आणि बंधुता नांदावी या हेतूने युनायटेड नेशन्स च्या माध्यमातून डॉ. कटारिया यांनी १९९८ पासून जागतिक हास्य दिन साजरा करण्यासाठी पाऊल उचलले. आज जगभरात १०० देश जागतिक हास्य दिवस साजरा करतात. प्रत्येक वर्षी मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा होतो. हास्य विसरलेल्या तुमच्या-आमच्यासारख्या जनतेला हास्याचे महत्त्व यानिमित्ताने कळावे, हा उदात्त हेतू यामागे आहे.
     हास्यामुळे आपल्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित होते. हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. खळखळून हसताना शरीरातून इंडॉर्फिन हे रासायनिक द्रव्य तयार होऊन हृदयाला मजबूत करते. तसेच या प्रक्रियेत अधिकाधिक ऑक्सिजनची निर्मिती शरीरात होते. (आजच्या परिस्थितीत ऑक्सीजन सिलेंडरसाठी किती धावपळ करावी लागते !) खाण्याची लालसा कमी होऊन वजन नियंत्रणात राहते. रक्तातील साखर हसण्यामुळे नियंत्रित राहते. दहा मिनिटे व्यायाम केल्यानंतर हृदय जेवढे सक्षम होते, तेवढे एक मिनिट हसण्याने होत असते. हसण्याने कार्टीसोल हार्मोन्स नियंत्रणात राहते. त्यामुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. रक्तदाब कमी होतो. चेहऱ्याचा टवटवीतपणा कायम राहतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून संसर्ग सोबत लढण्याची प्रणाली सक्षम होते. फक्त हसण्याने इतके फायदे आपल्याला होऊ शकतात. हास्य हे औषध कोणत्या मेडिकल दुकानात विकत घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. गरजेच्या वेळी दाम दुप्पट रक्कम देऊन खरेदी करण्याची वेळ येत नाही. हास्य हे पूर्णपणे मोफत असून ते आपल्यातच असते. पण खरे आहे ...जे मोफत आहे आणि सहज उपलब्ध आहे त्याची माणसाला किंमत नसते हेच खरे ! तुझं आहे तुझपाशी परी, तु जागा चुकलासी !! दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच जागे व्हा ! 
   आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे हास्य माणसाचा अहंकार देखील दूर करते !
  चला तर मग, आज पासून नव्हे.. नव्हे... आत्तापासून निर्धार करूया. कितीही संकटे आली, मन दुःखी झाले, तरी हास्याचं टॉनिक घेऊन मी त्यावर मात करणारच !!
 या महामारीच्या निमित्ताने का होईना आपण सर्वजण घरात आहोत. कुटुंबात आहोत. हास्य आणि आनंद घरात शोधा. घरातील मुला माणसांमध्ये आनंद आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या एका भावगीतात त्या म्हणतात...
    घरात हसरे तारे असता 
    मी कशाला पाहू नभाकडे !
    छकूल्यांची ग प्रशांत वदने
    गोड गुलाबी गाली हसणे
   अमृत त्यांच्या ओठी असता
   कशास मधुघट हवा गडे.. ll 
             गोकुळ येथे गोविंदाचे
            झरे वाहती शांती सुखाचे
             वैभव पाहून मामा सदनीचे
                ढगा आड ग चंद्र दडे ll
    आताचे कोरोनाचे आलेले संकट तात्पुरते आहे. आपण सर्वांनी सहकार्य केल्यास हे संकट फार काळ टिकेल,असे वाटत नाही. याकरिता आपल्याला घरात राहून जे करता येईल ते आपण केले पाहिजे. गर्दी टाळा. मूखपट्टी वापरा. वारंवार हात धुवा. काळजी घ्या. चिंता करू नका कारण सुप्रसिद्ध नाटककार गो. ब. देवल यांच्या एका नाट्यगीतात म्हटल्याप्रमाणे..
     इश् चिंता निवारील सारी
      भाव निश्चलपणे ठेवी तू त्यावरी 
     संकटे शत जरी प्राप्त झाली
      सर्व संभाळूनी योग्य काली
      करील कल्याण तो चंद्रमौली
       पूर्ण विश्वास या विप्रवचन धरी ll
त्यामुळे जग निर्मात्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवू या. सुखाबरोबरच दुःखाला देखील मित्र बनवा. दुःख आपोआप नाहीसे होईल.
      राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुखतो अपना साथी है l
         हेच खरे आहे. जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आरोग्यदायी जीवनासाठी सदिच्छा !
   चला तर मग ..आनंद निर्माण करूया.. आनंद देऊ या... हास्य पसरवू या !!

लेखन
शैलेश पाटोळे
नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...