Saturday, March 21, 2026

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                    “तंबूपासून ताजमहालापर्यंत”
                  ------------------------

  “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन सांगते—चालत राहा, अनुभव घेत राहा; कारण प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे, तर मनाचा, विचारांचा आणि अनुभवांचा विस्तार होय. शाळेच्या चौकटीबाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात जे शिक्षण मिळते, ते पुस्तकांत सापडत नाही. प्रवास म्हणजे अनुभवांची शिदोरी, आठवणींचा खजिना आणि मैत्रीचे रंग अधिक गडद करणारी एक सुंदर प्रक्रिया असते.
हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि मुक्त हवा — या सगळ्यांत एक वेगळाच आनंद असतो.
  नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळांतील स्काऊट आणि गाईडचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि काही समाजाभिमुख, मित्रत्वाने वागणारे शिक्षक यांना अशीच एक सुंदर संधी मिळाली. हरियाणा राज्यातील गद्पुरी येथील स्काऊट आणि गाईड नॅशनल ट्रेनिंग सेंटर येथे निसर्ग निवास शिबिरासाठी जाण्याचा योग आला. संत तुकाराम म्हणतात —
“जग पाहता पाहता, वाढे ज्ञानाची सीमा.”
असा ज्ञान, अनुभव आणि आनंद देणारा हा प्रवास अविस्मरणीय ठरला.
कॅम्पला निघताना एका विद्यार्थ्याने मित्राला विचारले..
“अरे, तिकडे मोबाईल चालेल ना?”
मित्र लगेच म्हणाला —
“मोबाईल चालेल की नाही माहीत नाही… पण आपण मात्र नक्की चालणार!”
आणि मित्रांच्या कंपूत हास्यकल्लोळ सुरू झाला..
प्रवासाची सुरुवात नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरून झाली.स्टेशनवर विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून एका शिक्षकांनी हसत विचारले —
“काय रे, एवढा उत्साह कशाचा?”
एक विद्यार्थी म्हणाला —
“सर, पाच दिवस अभ्यास नाही ना!”
सगळीकडे हशा पिकला.
इतक्यात घोषणा झाली —
“गाडी उशिरा येणार आहे.”
एकाने त्यावर कोटी केली —
“सर, कॅम्प सुरू होण्याआधीच संयमाचा धडा सुरू झाला!”
दुसरा म्हणाला —
“रेल्वे उशिरा येईल म्हणजे आपण स्टेशनचे पर्यटन करूया!”
 प्रवासात थोडा ‘नाट्यमय’ रंग भरला तो रेल्वेच्या उशिरामुळे!रेल्वे उशिरा येणार असल्याची घोषणा झाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडी चिंता उमटली. पालकांच्या चेहऱ्यावर काळजीची रेषा, तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्कंठेची चमक.
“वाट पाहणे ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे” याचा अनुभव त्या दिवशी प्रत्येकाला आला.
स्टेशनवरील प्रत्येक फलक वाचून झाले.
जाहिराती, वेळापत्रक, सूचना — काहीच उरले नाही!
कोणी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे निरीक्षण करत होते.मुलांमुलींच्या गप्पा, विनोद, थट्टामस्करी… सगळे काही झाले.
कोणी जाहिराती वाचत होते.
कोणी प्रवाशांचे निरीक्षण करत होते.
एक विद्यार्थी फलाटावर झोपलेल्या कुत्र्याकडे पाहून म्हणाला —
“बघा, याला मात्र गाडी उशिरा आली तरी काही फरक पडत नाही.”
मित्र म्हणाला —
“तो अनुभवी प्रवासी असावा!”
गप्पा टिंगल टवाळी करून मुलं वेळ घालवत होते...
 स्टेशनवर विद्यार्थ्यांचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता. प्रत्येकाच्या डोळ्यांत नवे स्वप्न, नवा अनुभव आणि नव्या ठिकाणाचे कुतूहल चमकत 
इतक्यात अचानक घोषणा झाली —
“गाडी काही क्षणांत येत आहे.”
क्षणात सगळीकडे धावपळ सुरू झाली. बॅगा उचलल्या, रांगा लावल्या आणि अखेर सगळेजण डब्यात बसले. पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
गाडी हळूहळू पुढे सरकू लागली…
आणि प्रवासाची खरी सुरुवात झाली.
  रेल्वे प्रवास म्हणजे एक छोटासा संसारच असतो. काही तासांतच अनोळखी लोकही ओळखीचे होतात.डब्यात गप्पांची मैफल रंगली.कोणी गाणी म्हणत होते.कोणी पत्ते खेळत होते.
कोणी खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत होते.
खिडकीतून धावत जाणारी शेते, झाडे, लहान गावे — जणू निसर्ग स्वतःच चित्रफीत दाखवत होता.
“प्रवास हा माणसाला नम्र बनवतो” असे म्हटले जाते. कारण प्रवासात माणूस जगाचे विविध रूप पाहतो.
मौज, मजा, गप्पा आणि थोडीशी झोप — अशा वातावरणात कधी प्रवास संपला ते कळलेच नाही.
गदपुरी – निसर्गाच्या कुशीतले सुंदर ठिकाण !
गदपुरी येथे पोहोचल्यावर जणू निसर्गानेच सर्वांचे स्वागत केले.
   शहराच्या गोंगाटापासून थोडे दूर असलेले हे ठिकाण अतिशय निसर्गरम्य होते. शांत, प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण.सुमारे वीस - बावीस एक रात पसरलेला विस्तीर्ण कॅम्पस पाहून सर्वजण थक्क झाले.भक्कम आणि नीटनेटके तंबू पाहून विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. 

हिरवीगार झाडे, शांत वातावरण आणि मोठे कॅम्पस पाहून एका विद्यार्थ्याने म्हटले —
“अरे वा! हे ठिकाण तर अगदी चित्रपटात दाखवतात तसं आहे!”
दुसरा म्हणाला,“हो, पण इथे आपल्यालाच काम करावं लागणार आहे!”
तंबू पाहून काही विद्यार्थ्यांनी विचारले —
“सर, इथेच राहायचं का?”
शिक्षक हसून म्हणाले —“हो, आणि स्वतःची कामे स्वतः करायची!”
एक विद्यार्थी हळूच म्हणाला —“म्हणजे आईची आठवण येणार!”
प्रत्येक तंबू व्यवस्थित, स्वच्छ आणि सुरक्षित होता.कॅम्प साइटवर कार्यरत कर्मचारी वर्ग अतिशय विनम्र आणि प्रेमळ होता. मुलांच्या प्रत्येक गरजेची काळजी ते मनापासून घेत होते. मुला-मुलींसाठी सुरक्षित वातावरण पाहून शिक्षकांनाही दिलासा मिळाला.फेब्रुवारी महिन्याची गुलाबी थंडी आणि सकाळचा गार वारा — वातावरण अधिकच प्रसन्न करत होता.कॅम्पचे प्रभारी अधिकारी मोहंती सर अतिशय शिस्तप्रिय आणि सुस्वभावी होते.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक वेगळेच आकर्षण होते. ते कठोर शिस्त पाळत होते, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवादही साधत होते.
“शिस्त ही यशाची पहिली पायरी आहे” हे त्यांनी आपल्या वर्तनातूनच दाखवून दिले.
कॅम्पमधील स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटके होते.चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पौष्टिक आणि चविष्ट अन्नामुळे मुलांना घरची आठवण फारशी आली नाही.
या सर्वांमध्ये ज्यांनी आम्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले अशी एक विशेष व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील श्री.मच्छिंद्र भाऊ. सर्व मुलांचे मदतनीस. स्वभाव अतिशय प्रेमळ आणि आपुलकीचा होता. मुलांची काळजी ते अगदी घरच्यांसारखी घेत होते.“सेवा हीच खरी पूजा” हे त्यांचे ब्रीदवाक्य असल्यासारखे वाटत होते.
कॅम्पमधील पाच दिवस म्हणजे जणू साहस आणि आनंदाची मेजवानीच होती.
रोप क्लाइंबिंग - उंच दोरीवर चढताना सुरुवातीला थोडी भीती वाटत होती. पण शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे विद्यार्थ्यांनी धाडसाने हा उपक्रम पूर्ण केला.“धाडस केल्याशिवाय विजय मिळत नाही” हे या अनुभवातून शिकायला मिळाले.
रोप क्लाइंबिंग सुरू झाले.दोरी पाहून एका विद्यार्थ्याने विचारले —“सर, ही इतकी उंच आहे का?”
प्रशिक्षक हसत म्हणाले —
“उंच नाही… तुमचं धाडस मोठं असलं पाहिजे!”
पहिला विद्यार्थी वर चढू लागला.खाली उभा असलेला मित्र ओरडला —
“अरे, पडू नको… माझा फोटो अजून काढायचा आहे!” पुन्हा हशा पिकला.
सायकलिंग- कॅम्प परिसरात सायकलिंग करताना जणू स्वातंत्र्याची अनुभूती मिळत होती.गार वारा, हिरवळ आणि मित्रांची साथ — हा अनुभव अविस्मरणीय होता.घोडेस्वारी - घोड्यावर बसण्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच होता. सुरुवातीला भीती वाटली; पण नंतर तोच अनुभव सर्वात आनंददायी ठरला.
घोड्यावर बसताना एक विद्यार्थी थोडा घाबरला.
तो म्हणाला —“सर, हा घोडा शांत आहे ना?”
प्रशिक्षक म्हणाले —“घोडा शांत आहे… पण तू शांत राहा!”
घोडा चालू लागला.विद्यार्थी म्हणाला —
“अरे वा! आता मी खरा रायडर झालो!”
नाईट सफारी - रात्रीच्या अंधारात जंगलातील फेरफटका म्हणजे एक रोमांचक अनुभव होता.चंद्रप्रकाश, शांतता आणि निसर्गाची गूढता — या सर्वांनी वातावरण जादुई बनवले.रात्री जंगलात फेरफटका होता.
एक विद्यार्थी मित्राला हळू आवाजात म्हणाला —
“अरे, आवाज ऐकू येतोय का?”
मित्र म्हणाला,“हो… पण घाबरू नको.”
तो विचारतो —“का?”
मित्र म्हणतो —“कारण मीही घाबरलोय!” अशाही स्थितीत अनेकांना हसू आवरले गेले नाही.
कॅम्पमध्ये अनेक प्रकारचे खेळ आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्व आणि आत्मविश्वास वाढला.
   कॅम्पमध्ये मोबाईल आणि कुटुंबापासून दूर राहावे लागले.सुरुवातीला थोडीशी घरची आठवण आली. पण हळूहळू सर्वजण त्या वातावरणात रमून गेले.
स्वतःची कामे स्वतः करणे, वेळेचे नियोजन करणे आणि इतरांबरोबर मिळून काम करणे — हे सर्व अनुभव विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवत होते.
“स्वावलंबन हेच खरे स्वातंत्र्य” ही म्हण येथे खरी ठरली.
कॅम्प परिसरात अनेक सुंदर ठिकाणे पाहायला मिळाली.हिरवीगार झाडे, फुलांनी सजलेले बगीचे, स्वच्छ रस्ते आणि शांत वातावरण — या सर्वांनी मन प्रसन्न झाले.प्रत्येक ठिकाण जणू निसर्गाच्या कलेचे एक सुंदर चित्र होते.
मुलं मुली नव्या मित्रांना निरोप देताना भावुक झाले होते.शिक्षकांच्या चेहऱ्यावर समाधान होते—कारण या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी केवळ खेळ केले नाहीत, तर जीवनाचे धडे शिकले होते.
  निसर्गनिवास शिबिरादरम्यान गदपुरीहून जवळ असलेल्या अनेक ऐतिहासिक व सांस्कृतिक ठिकाणांना भेट देण्याचा सुंदर योग आला. या प्रत्येक स्थळाचे वेगळे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व आहे.
   उत्तर भारतातील ऐतिहासिक वारसा जपणारे शहर म्हणजे आग्रा. मुघलकालीन वैभव, प्राचीन वास्तुकला आणि इतिहासाच्या आठवणी जपणारे हे शहर भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानले जाते.
या शहरात उभा असलेला ताज महाल म्हणजे जणू प्रेमाचे अमर स्मारकच आहे. शुभ्र संगमरवरी दगडांत घडवलेले हे अप्रतिम सौंदर्य जणू चंद्रप्रकाशात न्हालेल्या स्वप्नासारखे भासते. मुघल सम्राट शहाजहानने आपल्या प्रिय पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ उभारलेली ही वास्तू प्रेम, समर्पण आणि शाश्वत सौंदर्य यांचे प्रतीक मानली जाते. सूर्योदयाच्या मंद किरणांत किंवा संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात ताजमहालाचे रूप जणू स्वर्गीय भासते. म्हणूनच जगभरातील पर्यटक या अद्भुत कलाकृतीचे दर्शन घेण्यासाठी येथे येतात. आग्र्याचा प्रसिद्ध पेठा आणि दही वडा खाल्ल्याशिवाय परतणे अशक्य होते.
   दिल्लीच्या मध्यभागी अभिमानाने उभे असलेले इंडिया गेट हे भारताच्या शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ उभारलेले हे भव्य स्मारक प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि कृतज्ञतेची भावना जागवते.या स्मारकाखाली प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योती जणू राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या वीर सैनिकांच्या स्मृतीचे अखंड तेज दर्शवते. संध्याकाळच्या प्रकाशात इंडिया गेटचे रूप आणखी भव्य दिसते आणि ते पाहताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत होते. 
    भारताची राजधानी असलेले दिल्ली हे शहर इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा अद्भुत संगम आहे. येथे प्राचीन काळापासून अनेक साम्राज्यांनी राज्य केले आणि त्यामुळे या शहरात विविध संस्कृतींचे रंग मिसळले आहेत.दिल्लीतील प्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे चांदणी चौक. मुघलकालीन वैभवाची साक्ष देणारी ही बाजारपेठ आजही उत्साहाने गजबजलेली असते. अरुंद रस्ते, रंगीबेरंगी दुकाने, सुगंधी मसाले, पारंपरिक मिठाया आणि असंख्य लोकांची वर्दळ — या सगळ्यामुळे चांदणी चौक जणू एक जिवंत सांस्कृतिक चित्रच वाटते.
येथे खरेदी करताना आणि फिरताना जणू इतिहासाच्या पानांमध्ये फिरत असल्याची अनुभूती येते.दिल्लीतील आणखी एक भव्य ऐतिहासिक वास्तू म्हणजे कुतुब मिनार. सुमारे ७३ मीटर उंच असलेला हा मनोरा भारतातील सर्वात उंच प्राचीन मनोऱ्यांपैकी एक आहे.लाल आणि पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेला हा मनोरा जणू आकाशाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करीत उभा आहे असे वाटते. त्यावरील नाजूक नक्षीकाम आणि कुराणातील आयतींची कोरीव अक्षरे त्या काळातील वास्तुकलेची उत्कृष्टता दर्शवतात.
कुतुब मिनार केवळ एक मनोरा नसून तो भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचा एक जिवंत साक्षीदार आहे.
वृंदावन
   भगवान श्रीकृष्णाच्या बाल लीलांनी पावन झालेले पवित्र स्थळ म्हणजे वृंदावन ! येथे असंख्य मंदिरे, भक्तीमय वातावरण आणि सतत ऐकू येणारे भजन-कीर्तन यामुळे संपूर्ण परिसर आध्यात्मिक आनंदाने भरलेला वाटतो.येथील मंदिरे, घाट आणि अरुंद गल्ल्या जणू श्रीकृष्णाच्या कथा सांगत असतात. भक्तांच्या श्रद्धेने भारलेले हे ठिकाण मनाला शांतता आणि समाधान देणारे आहे. येथे कांदा-लसूण न घालता देखील स्वयंपाक पौष्टिक आणि चविष्ट होऊ शकतो, याची अनुभूती आली.
   भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ते पवित्र स्थान म्हणजे मथुरा. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी हे एक मानले जाते.येथील मंदिरांचा घंटानाद, भक्तांची गर्दी आणि धार्मिक वातावरण मनाला भक्तिभावाने भारून टाकते. मथुरेच्या पवित्र भूमीत फिरताना जणू हजारो वर्षांचा इतिहास आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मथुरेतील चविष्ट पेढ्यांचा स्वाद चाखण्याचा मोह आवरता आला नाही.
या सर्व स्थळांना दिल्याचा पुरावा म्हणजे सर्वांनी काढलेले मनसोक्त फोटो !
   या सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देताना भारताच्या समृद्ध परंपरेची आणि विविधतेची जाणीव प्रकर्षाने झाली. प्रत्येक ठिकाण जणू इतिहासाची एक जिवंत कथा सांगत होते.
या सहलीमुळे केवळ निसर्गाचा आनंदच नाही, तर भारताच्या महान इतिहासाची आणि सांस्कृतिक वैभवाचीही सुंदर ओळख झाली.

दिल्लीच्या ऐतिहासिक वैभवाचा मुकुटमणी मानला जाणारा लाल किल्ला पाहण्याचा योग या सहलीदरम्यान आला, आणि तो क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरला. लालसर दगडांनी उभारलेली ही भव्य वास्तू जणू भारताच्या वैभवशाली इतिहासाची आणि पराक्रमाची एक जिवंत साक्षच आहे.
सतराव्या शतकात मुघल सम्राट शहाजहानने उभारलेला हा किल्ला केवळ एक संरक्षणात्मक वास्तू नाही; तो भारताच्या राजकीय, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. लाल दगडांच्या उंच तटबंदीवरून फिरताना जणू भूतकाळातील अनेक ऐतिहासिक घटना आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात.
किल्ल्याच्या विशाल प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच त्याचे आखीव-रेखीव बांधकाम, मजबूत तटबंदी, सुंदर कमानी आणि नाजूक कोरीव काम पाहून मन थक्क होते. प्रत्येक भिंत, प्रत्येक दालन आणि प्रत्येक अंगण जणू एखादी ऐतिहासिक कथा सांगत असल्यासारखे भासते.या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ती ऐतिहासिक जागा जिथून भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला स्वर संपूर्ण जगभर दुमदुमला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी याच किल्ल्याच्या भव्य तटावर उभे राहून देशाला उद्देशून पहिले स्वातंत्र्यदिनाचे भाषण केले. त्या ऐतिहासिक क्षणाची आठवण आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमानाची ज्योत पेटवते.
त्या ठिकाणी उभे राहताच जणू इतिहासाचे प्रतिध्वनी कानात घुमू लागतात — स्वातंत्र्याची घोषणा, जनतेचा उत्साह आणि नव्या भारताच्या स्वप्नांची सुरुवात. त्या क्षणांचे स्मरण करताना मनात एक वेगळीच भावनांची लहर उसळते.लाल किल्ल्याची उंच तटबंदी जणू देशाच्या पराक्रमाची आणि स्वाभिमानाची प्रतीकात्मक भिंत आहे. या तटांवरून अनेक साम्राज्यांचे उत्थान-पतन पाहिले गेले आहे. अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत आणि अनेक पिढ्यांनी आपल्या इतिहासाची साक्ष येथे अनुभवली आहे.आजही प्रत्येक वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारताचे पंतप्रधान याच किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित करतात. त्यामुळे लाल किल्ला केवळ ऐतिहासिक स्मारक नाही; तो भारताच्या स्वातंत्र्याची, एकतेची आणि लोकशाहीची जिवंत परंपरा आहे.या भव्य वास्तूचे दर्शन घेताना विद्यार्थ्यांच्या मनात अभिमान, आदर आणि कुतूहल या तिन्ही भावना एकत्र जागृत झाल्या. इतिहासात वाचलेली ही जागा प्रत्यक्ष पाहताना जणू आपणही त्या महान ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झालो आहोत अशी अनुभूती सर्वांना आली.
खरंच, लाल किल्ल्याची भेट म्हणजे केवळ एका किल्ल्याचे दर्शन नाही; ती भारताच्या स्वातंत्र्याचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रीय अभिमानाचा भव्य, तेजस्वी आणि प्रेरणादायी अनुभव आहे.
   दिल्लीतील विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देताना एक असा क्षण आला की,ज्याने संपूर्ण सहलीला जणू एक वेगळेच वैभव आणि अभिमानाचे रूप प्राप्त झाले. तो क्षण म्हणजे भारताच्या राष्ट्रजीवनाचे प्रतीक असलेल्या भव्यदिव्य राष्ट्रपती भवन या वास्तूचे प्रत्यक्ष दर्शन.दिल्लीच्या रायसीना टेकडीवर उभे असलेले हे भव्य भवन पाहताना प्रथमदर्शनीच मनात आश्चर्य, अभिमान आणि आदर या तिन्ही भावना एकाच वेळी जागृत होतात. लालसर दगडांनी उभारलेली ही विशाल वास्तू जणू भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याची आणि परंपरेची जिवंत साक्ष देत अभिमानाने उभी आहे.राष्ट्रपती भवनाच्या परिसरात प्रवेश करताना सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ती काटेकोर सुरक्षा व्यवस्था. देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या राष्ट्रपतींचे निवासस्थान असल्यामुळे येथे असलेली सुरक्षा यंत्रणा अत्यंत दक्ष आणि शिस्तबद्ध आहे. प्रत्येक पावलागणिक जाणवणारी ती सजगता जणू राष्ट्राच्या सुरक्षिततेची शांत पण प्रभावी हमी देत असते.भवनाचे भव्य प्रवेशद्वार ओलांडताच जणू इतिहासाच्या विशाल दरवाज्यातून आपण एका नव्या कालखंडात प्रवेश करतोय असे वाटते. विशाल सभागृहे, उंच कमानी, आणि भिंतींवर केलेले अप्रतिम कोरीवकाम — हे सर्व पाहताना भारतीय वास्तुकलेची सौंदर्यपरंपरा डोळ्यांसमोर उभी राहते.राष्ट्रपती भवनातील प्रत्येक दालन जणू भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाची कथा सांगत असते. भिंतींवर सजवलेली जुनी चित्रे आणि पेंटिंग्ज पाहताना इतिहास जणू रंगांच्या रूपाने जिवंत झाल्यासारखा भासतो. अनेक ऐतिहासिक प्रसंग, राष्ट्रीय चळवळीचे क्षण आणि देशाच्या नेतृत्वाचा प्रवास या चित्रांतून जणू आपल्याशी संवाद साधू लागतो.विशेषतः लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे अशोक मंडप. उंच घुमट, भव्य सजावट आणि गंभीर पण आकर्षक वातावरण यामुळे या मंडपात उभे राहिल्यावर मनात एक वेगळेच दैदिप्यमान भाव निर्माण होतो. येथे अनेक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय समारंभ पार पडले आहेत. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी भारताचे स्वातंत्र्य घोषित केले, हे याच भवनातून... हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले.म्हणूनच या ठिकाणी उभे राहताना जणू इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचे आपणही साक्षीदार झालो आहोत,अशी भावना मनात दाटून येते.
  याच भवनात भारताच्या विविध राष्ट्रपतींनी आपली कार्यकाळे पार पाडली आहेत. त्या सर्वांच्या आठवणी जपणारी छायाचित्रे आणि नोंदी पाहताना देशाच्या लोकशाही प्रवासाचा अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक राष्ट्रपतीने आपल्या कार्यकाळात देशाच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान जणू त्या भिंतींच्या शांततेतही जाणवत राहते.राष्ट्रपती भवनाबाहेरील विस्तीर्ण उद्यान हेही तितकेच आकर्षणाचे केंद्र आहे. रंगीबेरंगी फुलांनी सजलेले ते बगीचे, नीटनेटक्या रगांत उभ्या असलेल्या झाडा-वेली आणि त्यातून वाहणारी मंद हवा — हे सर्व पाहताना जणू निसर्गानेही या भव्य वास्तूच्या सौंदर्यात आपले रंग भरले आहेत असे वाटते. फुलांचा सुगंध आणि शांत वातावरण मनाला प्रसन्नतेची एक अनोखी अनुभूती देतात.या संपूर्ण भेटीदरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात एक विशेष भावना जागृत झाली —
“आपण देशाच्या इतिहासाच्या आणि लोकशाही परंपरेच्या एका जिवंत स्मारकात उभे आहोत.”
इतिहासाच्या पानांत वाचलेले राष्ट्रपती भवन प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव हा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक सहलीचा भाग नव्हता; तो त्यांच्या आयुष्यातील एक अमूल्य, प्रेरणादायी आणि अभिमानाने भरलेला सोनेरी क्षण होता.या भेटीने त्यांच्या मनात देशाबद्दल आदर, इतिहासाबद्दल कुतूहल आणि भविष्याबद्दल प्रेरणा यांची सुंदर ज्योत प्रज्वलित केली.
आणि म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की —
“राष्ट्रपती भवनाचे दर्शन म्हणजे केवळ एका भव्य इमारतीचे दर्शन नव्हे; ते भारताच्या लोकशाही परंपरेचे, इतिहासाचे आणि राष्ट्रीय अभिमानाचे साक्षात दर्शन आहे.”
   पाच दिवस कसे गेले ते कळलेच नाही.कॅम्प सोडताना एक विद्यार्थी म्हणाला —“अरे, परत यायला मिळेल का?”
मित्र म्हणाला —“नक्की… पण आधी घरी जाऊन आईला सांगावं लागेल की,आपण भांडीही धुवू शकतो!”
 परतीच्या प्रवासात प्रत्येकाच्या मनात आठवणींचा खजिना होता.
नवीन अनुभव, नवीन मित्र, आणि निसर्गाशी जुळलेले नाते.संत ज्ञानेश्वर म्हणतात —“विश्वची माझे घर.” त्या भावनेप्रमाणे या प्रवासाने विद्यार्थ्यांचे विश्व मोठे केले.
खरंच—
प्रवास संपतो, पण आठवणींचा प्रवास मात्र आयुष्यभर चालू राहतो.
    हा प्रवास केवळ सहल नव्हता; तो एक जीवनानुभव होता.या पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी धाडस, शिस्त, स्वावलंबन आणि मैत्री यांचे सुंदर धडे घेतले.
पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे —
“आनंद हा शोधायचा नसतो, तो अनुभवायचा असतो.”
गदपुरीतील हा अनुभव प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा ठरला.प्रवास संपला, पण आठवणी कायमच्या मनात राहिल्या.स्काऊटिंग ही केवळ एक चळवळ नाही;ती जीवन घडवणारी एक सुंदर शाळा आहे!


शैलेश अशोक पाटोळे 
नाशिक 
८ मार्च २०२६








Sunday, March 1, 2026

डोंगरकुशीत हरवलेले स्वप्निल क्षण ! M o u n t. A b u

   
          डोंगरकुशीत हरवलेले स्वप्निल क्षण !
               M o u n t. A b u 
   धावपळीच्या आयुष्यातून जेव्हा थोडी विश्रांती किंवा विरंगुळा हवा असतो तेव्हा निसर्गात सामावून जाण्यासारखा दुसरा उत्तम मार्ग नसतो ! 
स्काऊट आणि गाईड निसर्ग निवास आणि एडवेंचर कॅम्प च्या निमित्ताने नॅशनल सेंटर माउंट आबू येथे जाण्याचा योग आला.
  नाशिकच्या पवित्र भूमीहून जेथे गोदावरीच्या तरंगांनी आठवणींची गाणी गात ते राजस्थानच्या एकमेव हिल स्टेशन माउंट आबू पर्यंतचा हा प्रवास म्हणजे सूर्योदयाच्या किरणासारखा उजळून निघणारा अनुभव ! चार चाकी गाडी रस्त्यांवर लाटांसारखी वळण आणि हृदयातून उसळणाऱ्या हास्य विनोदाचा धबधबा... हा प्रवास फक्त अंतर नाही तर मित्रतेच्या अमूल्य धाग्याने विणलेला सुवर्ण तान्हा होता !
  अगदी पहाटे प्रवासाला सुरुवात झाली. मनात आनंदाची लहर उसळली. जणू जीवनाच्या.. अनेक मैलांच्या पलीकडे ...डोंगरांच्या हृदयात दडलेल्या शांततेचा शोध घेण्यासाठी आमचा कंपू कूच करीत होता.
  सूर्योदयाआधीच प्रवासात चहाचा शोध घेता घेता बरोबर आणलेल्या न्याहारीचा आस्वाद घेतला. खानदेशी शेतीची.. सोन्याची पिकं पाहत मन भरून आलं. रस्त्यांवर लाटांसारखी वळण घेत महाराष्ट्राची सीमा सोडून आम्ही गुजरातची सीमा ओलांडली. गुजरातचे रस्ते आणि त्या रस्त्यांवर ट्रकचालकांचा थरार पाहून मन कधी कधी भयचकीत होते. पहिल्यांदाच या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडकी भरल्याशिवाय राहत नाही. हळूहळू रस्ता कापत गुगल वाटाड्याच्या मदतीने पुढे पुढे जात होतो. प्रवासातला रोमांच आणि मित्रांची साथ ! बहुदा हेच जीवन असावे !
  रात्री नऊच्या दरम्यान राजस्थानातील माउंट आबू येथे पोहोचलो. हवेतला गारवा जाणू लागला होता. खास राजस्थानी पद्धतीच्या जेवणावर ताव मारून विश्रांती घेतली. 
  माउंट आबूच्या डोंगराळ भागात वसलेले नॅशनल ट्रेनिंग सेंटर हे भारतातील एक प्रमुख केंद्र आहे. साहसी प्रशिक्षणासाठी आदर्श असलेले हे ठिकाण कॅम्प साइट्स, रॉक क्लाइंबिंग वॉल्स,रोप कोर्सेस, ट्रेकिंगचे रस्ते इत्यादींसाठी सुपरीचीत आहे.१९७० मध्ये स्थापन झालेले हे ट्रेनिंग सेंटर सध्या श्री.जितेंद्र भाटी यांच्या नेतृत्वात प्रभावीपणे कार्य करीत आहे.
गोमुख रोडच्या कुशीत लपलेले हे केंद्र विद्यार्थी आणि युवकांसाठी जीवनाच्या लाटांवर नौका चालवणाऱ्या तरुण योध्यांचे तपोस्थान आहे.जेथे प्रत्येक शिळा नेतृत्वाची गोष्ट सांगते आणि वारा अनुशासनाचे गाणे गातो !
 येथील अनुभव म्हणजे सूर्योदयाच्या किरणांसारखा उजळणारा साहसाचा सैलाब ! सकाळी रॉक क्लाइंबिंगच्या शिळांवर चढताना जणू डोंगराच्या कवचाला आव्हान देणारे तरुण हत्ती तर रोप कोर्सच्या उंच झिपलाईन वरून खाली उतरताना हवेच्या पंखांवर स्वार झालेले गरुड ! कॅम्प फायरच्या तापट गोळ्यात मित्रांच्या हास्याच्या लाटा उसळतात आणि रात्रभर ट्रेकिंग करताना तारकामंडळांनी सजलेले आकाश जणू जीवनाचे रहस्य उलगडते ! स्वच्छ निवास गृहे- तंबू,पौष्टिक जेवण- रोज नवीन मेनू, सहज उपलब्ध मेडिकल सुविधा...जणू आईच्या मायेचे प्रतिबिंब ! हिरव्या गवताच्या बिछान्यावर उभे तंबू...जेथे सकाळी पक्षांचे संगीत जागे करते आणि रात्री झोपवतात...तारकांचे दिवे ! जितेंद्र भाटी येथील प्रभारी अधिकारी ..सहकार्यपूर्ण, प्रेरणादायी आणि तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारे ! त्यांचा स्वभाव हिमनदीसारखा शांत पण शक्तिशाली! विद्यार्थ्यांना आत्मविश्वास प्रदान करतो. स्वावलंबन, शिस्त, सामाजिक सेवा शिकवतो. हे केंद्र म्हणजे साहस, सेवा आणि स्वप्नांचा चिरंतन संनाद !
  माउंट आबू राजस्थानचा एकमेव डोंगराळ भाग.प्राचीन काळी याला अर्बुदांचल म्हणत. पौराणिक कथेनुसार, हिमालयाचा पुत्र अर्बुदा (एक शक्तिशाली सर्प) याने भगवान शिवाच्या वाहन नंदीला खाईतून वाचवले, म्हणून हे नाव पडले.हे अरवली पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर, प्राचीन काळापासून ऋषीमुनींचे तपोस्थान राहिले आहे. ऋषी वशिष्ठांच्या पावनस्पर्श या भूमीला झाला आहे. ऋषी वशिष्ठ हे वैदिक काळातील सप्तऋषींपैकी एक,जे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र मानले जातात. इक्ष्वाकूवंशाचे (सूर्यवंशाचे) राजगुरू आणि भगवान रामाचे गुरु होते.ऋषी वशिष्ठांनी येथे यज्ञ करून अग्नीकुंडातून चौहान ,परमार, सोलंकी आणि प्रतीहार राजवंशाची उत्पत्ती केली. अकराव्या ते तेराव्या शतकात परमार राजांनी दिलवाडा जैन मंदिरे बांधली. १३११ मध्ये चौहान राजांनी यावर विजय मिळवून राजपुताना मुख्यालय आणि उन्हाळी राजधानी केली. जैन धर्माचे प्रमुख तीर्थस्थान म्हणून ओळखले जाणारे माउंट आबू येथील दिलवाडा जैन मंदिरे संगमरवरातील नक्षीकामासाठी जगप्रसिद्ध आहेत. भगवान शिवाने एका भील दांपत्याला दर्शन दिले आणि भगवान महावीर येथे आले अशा पौराणिक कथा याच्याशी जोडलेल्या आहेत. हिंदू आणि जैन मंदिरे, अचलगड किल्ला येथील सांस्कृतिक वारसा जपतात.
   देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर माउंट आबू  बॉम्बे राज्यात म्हणजे गुजरात प्रांताला जोडण्याच्या विरोधात आंदोलन झाले. माउंट आबू हे अरवली पर्वतरांगेतील दक्षिण पश्चिम भागात बाराशे वीस मीटर उंचीवर वसलेले असून गुरुशिखर (१७२२) हे सर्वोच्च पर्वत शिखर आहे. राजस्थान मधील एकमेव हिल स्टेशन म्हणून थंड हवामान, झील, वन्यजीव अभयारण्य आणि पाण्याचे स्रोत असलेले 'रेगिस्तानातील हिरवा भाग' म्हणून प्रसिद्ध आहे. 
  प्रभू श्रीरामचंद्रांचे गुरु वशिष्ठ मुनींचा आश्रम येथे असून तेथे अग्नीकुंड आणि गोमुख कुंड आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गोमुख कुंडातून सतत गाईच्या तोंडा सारखी पाण्याची धारा वाहते, ज्याचा संबंध ऋषी वशिष्ठांनी केलेल्या यज्ञाशी जोडला जातो. पौराणिक कथेनुसार हे पाणी पवित्र असून भगवान शिवाने एका दाम्पत्याला दर्शन देऊन हे कुंड निर्माण केले,असे मानले जाते. येथील जल हिंदू तीर्थयात्रेकरूसाठी पवित्र स्नानाचे स्थान आहे. गोमुख कुंडातील जलस्रोत प्राकृतिक असून वर्षभर अविरत शिवलिंगावर जलाभिषेक करत असते. हे पाणी अत्यंत शुद्ध, थंड आणि पवित्र मानले जाते.
  सातशे एकर क्षेत्रात पसरलेला आशिया खंडातील सर्वोत्तम किल्ला चित्तोडगड येथे जवळच असून १८० मीटर उंचीच्या टेकडीवर वसलेला आहे. हा किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ असून मेवाड राजवंशाच्या शौर्याची आणि जौहर परंपरेचे प्रतीक आहे. सातव्या शतकात मौर्य राजा चित्रांगद मोरी यांनी हा किल्ला बांधला असून आठव्या शतकात बप्पा रावल यांनी येथे मेवाडची राजधानी बनवली. १३०३ मध्ये अलाउद्दीन खिलजी,१५३५मध्ये बहादुर शहा आणि १५६८ मध्ये अकबराने यावर आक्रमण केले. ७ दरवाजे,८४ कुंड, शेकडो मंदिरे आणि १३ किलोमीटर भिंत असलेला हा जलकिल्ला बेराज नदी काठावर आहे.या किल्ल्यातील महल आणि संग्रहालय हे राजपूत वास्तुकला आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. किल्ल्यातील राणा कुंभा महाल हा राणा कुंभा यांनी बांधला असून मीराबाईचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. पद्मिनी महाल देखणा असून यात समर आणि विंटर पॅलेस अशी विभागणी केली आहे. कलाकुसर केलेला रतनसिंह महाल पर्यटकांना आकर्षित करतो. जैन धर्माशी संबंधित प्राचीन वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कीर्ती स्तंभ ! तेराव्या शतकातील साधारण २४ मीटर उंचीचा चार मजली हा स्तंभ आहे.एका जैन व्यापाऱ्याने तीर्थंकर आदिनाथ स्वामींच्या सन्मानार्थ बांधला असून ते दिगंबर जैन धर्माचे तीर्थस्थळ आहे.
त्याचा आकार चौकोनी असून जैन तीर्थंकर आदिनाथाच्या चार दिगांत विशाल मूर्तीसह, विष्णू अवतार, शिव, ब्रम्हा, नृत्यांगना,रामायण- महाभारत दृश्य आणि तत्कालीन सामाजिक जीवन चितारले आहे.स्तंभावर जाण्यासाठी गोलाकार ६९ पायऱ्या आहेत.
  माउंट आबू आणि जवळपासच्या परिसरामध्ये अनेक आकर्षणे आपल्याला खुणावतात. आबू शहराच्या मध्यभागी जगातील सर्वात मोठी खोल नैसर्गिक झील आहे. त्याला नक्की झील असे म्हणतात. जेथे बोटिंग आणि सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहता येते. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर संगमरवरी दिलवाडा जैन मंदिर आहे .अकराव्या ते तेराव्या शतकातील उत्कृष्ट नक्षीकामासाठी ते प्रसिद्ध आहे. १७२२ मीटर उंचीवरील गुरुशिखर या पर्वत शिखरावरून अबू शहराचे विहंगम दृश्य दिसते. येथे गुरु दत्तात्रयाची गुफा मंदिर आणि चरण पादुका असून शांतता आणि निसर्गदृश्यांसाठी प्रसिद्ध असे हे ठिकाण आहे. इस्रोची इन्फ्रारेड वेधशाळा देखील येथे आहे. अबू शहरापासून ११ किलोमीटर अंतरावर अचलगड किल्ला सध्या मात्र भग्नावस्थेत असून प्राचीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी आश्रमातील पीस पार्क हे ध्यानधारणाकरिता प्रसिद्ध ठिकाण आहे. डोंगरदऱ्या आणि टेकड्या यांनी वेढलेला हा परिसर असल्याने अनेक ठिकाणी सनसेट पॉईंट पाहण्यासाठी स्थानिकांची व पर्यटकांची रोजच गर्दी झालेली असते.
  गुजरातच्या सीमेजवळ असल्याने राजस्थानपेक्षा सौम्य आणि थंड हवामान आढळते. ग्रीष्म ऋतूतही थंडावा जाणवतो. दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश आणि रात्री थंडावा असे आल्हाददायक वातावरण आबू शहराचे आहे. मॉन्सून मध्ये सरासरी १३०० मिलिमीटर पाऊस पडतो.हिवाळ्यात सरासरी ३ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली जाते. वर्षभर पर्यटनासाठी अतिशय उत्तम वातावरण असते. आबू शहराची लोकसंख्या साधारण ३५ हजार असून हिंदू, जैन आणि आदिवासी भील संस्कृतीचा संगम दिसून येतो. पर्यटनामुळे आर्थिक दृष्ट्या हा भाग सक्षम असून शहरात साधुसंतांची उपस्थिती वैशिष्ट्ये पूर्ण आहे. घूमर, दांडिया,गैर यांसारखी सांस्कृतिक परंपरा आणि जून महिन्यात होणारा समर फेस्टिवल प्रसिद्ध आहेत. 
  येथील लोक पारंपरिक राजस्थानी पोशाख परिधान करतात.दाल - बाटी चुरमा, गट्टे की सब्जी, रबडी, जाड दुधाची थंड मिठाई, सात चटण्या असलेले मसालेदार पराठे... खवय्यांसाठी यापेक्षा दुसरी मेजवानी काय असू शकते! ज्वारी बाजरी मका आणि चणाडाळ याचा अधिकाधिक वापर जेवणात असतो. दूध आणि दहाचे पदार्थही मुबलक मिळतात. 
  माउंट आबू आणि परिसरात प्रामुख्याने हिंदी भाषा बोलली जाते. मारवाडी आणि स्थानिक बोलींनी युक्त राजस्थानी देखील ऐकायला मिळते. आदिवासी लोक हिंदी मिश्रित भीली बोली बोलतात. तीर्थक्षेत्र असल्याने काही प्रमाणात संस्कृतचा प्रभाव दिसून येतो. परदेशी पर्यटकांसाठी आवश्यक इंग्रजीचा वापरही काही प्रमाणात आढळतो.
  सहा दिवसांचा एडवेंचर कॅम्प संपल्यानंतर संस्कृती,निसर्गाचा अनोखा नजराणा, डोंगरदऱ्या, स्वच्छ सूर्यप्रकाश, आल्हाददायक हवा, तीर्थक्षेत्रे, किल्ले, महाल,सूर्योदय सूर्यास्तासाठी प्रसिद्ध असलेले माउंट आबू शहराचा अनुभव घेतल्यानंतर परतीचा प्रवास.... कधी संपूच नये असा ! आबू शहराच्या प्रेमात पडला नाही असा पर्यटक विरळाच.. परतताना विरहाच्या वेदनांनी मन आतल्या आत रुदन केल्याशिवाय राहत नाही. 
   जर तुम्हाला साहस,आनंद आणि शांती हवी असेल तर मित्रांसोबत निघा...आबू वाट पाहतोय..! 

शैलेश पाटोळे 
नाशिक
 

  

  

Wednesday, May 28, 2025

चांदणंभूल : अनुभवांचा झुला

                    चांदणभूल : अनुभवांचा झुला 
                    ----------------------------
    कल्पनांच्या चांदणभुलव्यातून वास्तविकतेचा गुंता सोडवणारे कथाकार,ललित लेखक, एकांकिका लेखक, कवी म्हणून विजयकुमार मिठे साहित्य विश्वात ओळखले जातात.स्वतः ते अतिशय आनंदाने ग्रामीण जीवन ते व्यतीत करीत आहेत. शेतीमातीतील दैनंदिन कामे करत ग्रामीण लोक समाज जीवनाशी एकरूप होऊन ग्रामीण वास्तव साहित्यातून वाचकांसमोर मांडत असतात. आपल्या आठवणीतील गावगाडा आणि बदललेल्या ग्रामीण जीवनाची वास्तविकता त्यांनी विविध प्रकारच्या लेखनातून व्यक्त केली आहे.व्यवसायाने शेतकरी असलेल्या या साहित्यिकाने समृद्ध साहित्य संपदा मराठी वाङ्मयाला प्रदान केली आहे. 
  ग्रामीण भागात वास्तव्य असूनही घरातूनच त्यांना वाचनाची गोडी लागली. वाचलेल्या लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग त्यांच्या जीवनात आला.द.मा. मिरासदार , द.ता.भोसले, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे,शंकर पाटील यांचे साहित्य त्यांनी आवडीने वाचलं. त्यांच्या लेखनाचा प्रभाव मिठेंच्या लेखनावर दिसून येतो. 
  विजयकुमार मिठे हे एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहे.त्यांचा पिंड शेतकऱ्याचा आहे. शेती मातीशी त्यांची नाळ जोडलेली आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. द.ता .भोसले यांनी मिठे यांचे वर्णन करताना, " कृषी संस्कृतीचा भाष्यकार, कृषी संस्कृतीचा अभ्यासक, कृषी संस्कृतीचा उपासक आणि कृषी संस्कृतीचे महाकाव्य जाणारा गायक ",अशा शब्दात केले आहे. ग्रामीण समाज हाच त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे.त्यामुळे वास्तवता त्यांच्या लेखनातून सतत प्रतीत होत असते.त्यांनी लिहिलेल्या व प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखनातून हा समान धागा दिसून येतो.
  आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात, वास्तव्यात घडणाऱ्या घटना, भेटलेली माणसं, यांचे स्वभावविशेष अत्यंत – साध्या सोप्या भाषेत परंतु तितकेच प्रभावीपणे, विनोदाची पेरणी करत मांडणी करण्याचे कसब विजयकुमार मिठे यांच्या लेखनात आहे. ग्राम्य भाषेचा वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे.
 वास्तव प्रसंग, चपखल ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार खुमासदार ग्रामीण बाज हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल..कधी विनोदी तर कधी वाचकांचे हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग वर्णन करण्याची शैली विजयकुमार मिठे यांची आहे.
  आपल्या जीवनातील रमणीय आठवणी, प्रसंग, घटनांचे शब्दचित्र अत्यंत लालित्यपूर्ण शैलीत मिठे लिहितात. ललित लेखनाचा सर्वोत्तम नमुना म्हणून त्यांचे आभाळओल आणि चांदणंभूल हे ललित लेखसंग्रह ओळखले जातात.
  मराठी साहित्यात ललित लेखनाला विशेष असे महत्त्व आहे. वांग्मय प्रकाराच्या दृष्टीने ललित लेखनाचा हेतू स्वतंत्र आहे. केवळ माहिती न पुरवता वाचकाला भावनिक, मानसिक आणि सौंदर्यात्मक आनंद देणे हे ललित साहित्य लेखनाचे उद्दिष्ट मानले जाते. या अर्थाने मिठे यांनी ललित लेखनाला न्याय दिला आहे,असे म्हणण्यास वाव आहे.
   वाचकप्रिय ठरलेल्या आभाळओल या ललित लेखसंग्रहानंतर २०१७ मध्ये चांदणभूल हा दुसरा ललित लेखसंग्रह अक्षरवांग्मय प्रकाशन, पुणे यांच्या माध्यमातून मिठे यांनी प्रकाशित केला. अस्सल ग्रामीणत्व हे समान तत्व या ललित लेखसंग्रहात देखील कायम राहिले आहे. यात लेखकाने आपल्या भावना, विचार आणि अनुभवांना सुंदर आणि प्रभावी भाषेत व्यक्त केले आहे. आपल्या भावना आणि अनुभव व्यक्त करताना सौंदर्य आणि कलात्मकतेवर लेखकाचा भर दिसून येतो. या संग्रहात तेरा विविध विषयांवर लेखकाने आपले अनुभव प्रकट केले आहेत. त्यात अनेक सामाजिक,सांस्कृतिक संदर्भांचा समावेश लेखकाने केला आहे. ग्रामीण भागातील श्रद्धा -- अंधश्रद्धा, समज - गैरसमज, प्रथा- परंपरा, लोकसमजुती लेखकाने लेखनात मांडल्या आहेत. योग्य - अयोग्य असे विश्लेषण करण्याच्या फंदात लेखक पडलेले दिसून येत नाही. ललित लेखनात ते अपेक्षित देखील नाही. ललित लेखन प्रकारांपैकी भावचित्रे या लेखन प्रकारात वरील लेखांचे वर्गीकरण करता येऊ शकेल. 
 चिंतनशील ललितलेख अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी या ललित लेख संग्रहाचे वर्णन केले आहे. किंचितसा आत्मकथनाकडे वळणारा तरीही वाचकांना आनंद देणारा हा संग्रह लक्षवेधक ठरतो. 
    या ललित लेखसंग्रहातील सर्व लेखांमधील आशय हा लेखकाने अनुभवलेल्या ग्रामीण जीवनानुभवाशी संबंधित आहे. 
  चांदणंभूल ह्या शीर्षक लेखात चंद्र आणि चांदणे, चंद्राशी असलेले बालसुलभ नातं, वयानुसार बदलत जाणारा आनंद लेखकाने अधोरेखित केला आहे. ग्रामीण अवकाशात चंद्राचे महत्व लेखक विशद करतो.चांदण्यांनी भरलेलं आकाश, चंद्राच्या कला, चंद्र प्रकाशात चालणारी शेतकऱ्यांची शेतीची कामे ,तारा तुटणे इत्यादी बाबतीत ग्रामीण भागात असलेल्या लोक समजुती अथवा लोकभ्रम लेखक चपखलपणे वर्णन करतो. बालपणात घेतलेल्या चांदण्यांचा आनंद आता साठी नंतर कमी कमी होऊ लागल्याची खंत लेखाच्या शेवटी व्यक्त करताना लेखक म्हणतो," पण का कोण जाणे, पूर्वी चांदण्यांनी भरलेलं आकाश मला आता रितं रितं वाटू लागलंय ! "
 " सोनपिवळ्या फुलांची बाभूळ " मध्ये शेतातील मधोमध उभी असलेल्या बाभळीशी संबंधित अनुभव लेखक मांडतो.काटेरी,ओबडधोबड असूनही त्या झाडाबद्दल लेखकाला वाटणारा स्नेह या लेखात अनुभवता येतो.विविध ऋतूत दिसणाऱ्या या बाभळीचे वर्णन करताना लेखक लिहितो," उन्हाळ्यात वाळल्या काळया गाईगत दिसणारी बाभूळ पावसाळ्यात खाऊन पिऊन अंगीपिंडी पोसलेल्या म्हशीगत गुबगुबीत दिसायची." माणसांच्या, पशुपक्षांच्या दृष्टीने बाभळीची उपयुक्तता लेखकाने अनुभवातून मांडली आहे.
  झुबकेदार फुलांचा गुच्छ ल्यालेल्या गुलतुऱ्यांचे सौंदर्य आणि लेखकाचं त्याच्याशी असलेलं भावनिक नातं " गोष्टी रंगल्या ओठी " मध्ये वाचायला मिळते. सलमा आणि लेखकाचं बालसुलभ कुमारवयीन वयातलं गुलतुऱ्या संबंधीचा प्रसंग मनाला चटका लावून जातो.
  पूर्वी ग्रामीण भागात सणासुदीचं असलेलं महत्त्व लेखक " दिवाळी त्याच्या डोळ्यातली " मधून अधोरेखित करतो. गरीब श्रीमंतांसाठी सण कसे साजरे होतात,गरिबीमुळे लहान मुलांचा सण, फटाके, कपडे, गोडधोड याबाबत लेखक भावनिक वर्णन करतो. पूर्वी ग्रामीण भागात गरीब - श्रीमंत एकमेकांना सांभाळून घेत सण उत्सव साजरा करत. परंतु अलीकडे तसे चित्र समाजात दिसून येत नसल्याचे लेखक आवर्जून लिहितो. 
  लेखकाचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांनी लेखकाला एकदा "टेरिलीनचा सदरा " आणला. टेरिलिनचा सदरा घालायला मिळावा म्हणून लेखकाने केलेली खटपट ,त्याच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल, अनाठायी खर्चाबद्दलबद्दल आईचे मत,लेखकाने आवर्जून वर्णन केले आहे. 
   " गुपित बाबाचा डोह " मध्ये ग्रामीण भागात चमत्कारावर लोक कसे विश्वास ठेवतात आणि पुढे भीतीने प्रथा रूढ होत जाते.. याचे वर्णन आले आहे. परंतु शिक्षणामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भांडाफोड कसा होतो, ते देखील वाचायला मिळते. त्यातून वाचकांचे मनोरंजन होते.
  " जुनं ते सोनं" मधून काळ बदलला तरी जुन्याची किंमत कमी होत नाही, ते सायकलच्या उदाहरणावरून लेखकाने पटवून दिले. पूर्वी सायकल बद्दल ग्रामीण भागात किती अप्रूप होतं ते लेखकाने मनोरंजकपणे मांडलं आहे.
  शेतकऱ्यांचं आपल्या गाय,बैल इत्यादी मुक्या जनावरांवर किती जीव आणि भावनिक नातं असतं ते गहिवर बैल विकतानाचा या लेखात पहायला मिळतो. शेती कसण्यासाठी ट्रॅक्टर सारखी यंत्रे अलीकडच्या काळात वापरली जाऊ लागली आहेत.नव्या पिढीला बैल हा शेतीसाठी कालबाह्य वाटतो. परंतु ज्या बैलाच्या श्रमातून आपला संसार झाला त्याबद्दल लेखकाच्या मनाततील कृतज्ञता या लेखातून वाचावयास मिळते.
  भारतीय शेती ही पावसावर अवलंबून आहे.योग्य वेळी पाऊस पडला नाही तर किंवा अतिरेकी पाऊस पडल्यावर काय घडते ? लहान मुलांचं पावसाशी असलेलं नातं.. भावबंध लेखकाने ,"पावसाचं काही देणं लागतोय " मधून वर्णन केलं आहे.
  आंबे, जांभळी,बोरी, भोकर, पेरू, उंबर असा रानमेवा लेखकाच्या लहानपणी त्याच्या गाव शिवारात मिळायचा.शालेय जीवनातील या रानमेव्याची मौजमजा लेखकाने अतिशय परिणामकारक शब्दात वर्णन केली आहे. वर्णन केलेले प्रसंग जणू आपणच अनुभवतो आहोत,असा भास वाचकांना झाल्यावाचून राहवत नाही.
   " बिन पैशाचा आनंद " या लेखात खेड्यातील जत्रा खेळ, तमाशा, खाण्याचे विविध पदार्थ आणि त्याचा गरीबीशी असलेला संबंध लेखक वर्णन करतो. बालपणी गरीबी होती तरी जत्रेची मजा होती आज स्थिती सुधारली पण यात्रेचा तो आनंद राहिला नसल्याचे लेखक खिन्नपणे नमूद करतो.
  बालपणी फोटो वाल्याचं ग्रामीण भागात असलेलं अप्रूप - आकर्षण " फोटोवाला " मधून लेखक मांडतो. त्यातून आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा लेखकाने दिला आहे.
  धरणामुळे विस्थापित झालेल्या गावाचं गावपण हरवल्याची खंत लेखकाने " गावपण हरवलेलं गाव " मधून व्यक्त केली आहे.आधुनिक करमणुकीच्या साधनांमुळे माणूस कुठेतरी हरवल्याचं दुःख लेखक व्यक्त करतो. " गाव बदललं की बिघडलं ?" हे वाक्य बदललेल्या ग्रामीण जीवनाचं वर्णन करण्यास पुरेसे ठरतं! 
 अशा रीतीने या संग्रहातील ललित लेखांचा विषय जरी वेगवेगळा असला तरी ग्रामीण जीवनातील लेखकाचे भावविश्व हे सर्व लेखांचे समान आशयसूत्र असल्याचे दिसून येते.
  मिठेंची भाषा नाशिक जिल्ह्यातील दखनीचा बाज लेऊन अवतरली आहे. आशयघन,ओघवती आणि समृद्ध शब्दकळा असलेल्या भाषेचा वापर लेखक करतात.दिंडोरी आणि परिसरात... ग्रामीण, दुर्गम भागात बोलीच्या रूपात वापरले जाणारे बरेचसे शब्द महाराष्ट्रातील इतर वाचकांसाठी अवघड वाटू शकतील. परंतु प्रसंग डोळ्यापुढे उभा करण्याची ताकद त्यांच्या शब्दांमध्ये असल्यामुळे वाचकांना अर्थ समजून घेताना अशा शब्दांची अडचण भासणार नाही असेही वाटते.लेखक शेतीशी संबंधित असल्याने त्याच व्यवसायाशी संबंधित शब्द लेखात चपखलपणे लेखकाकडून वापरले गेले आहेत.त्यामुळे वाचकांना आनंद घेता येतो.उगाच शब्दांची उधार - उसनवारी किंवा शब्दबंबाळपणा लेखकाने टाळला आहे. शेवटी ललित लेखनात शब्द- भाषेपेक्षा भावनेला अधिक महत्त्व असते.
  ग्रामीण निसर्गाची रेलचेल या संग्रहात अनुभवास येते. अनुभव समृद्ध शब्दांच्या वारूवर स्वार होऊन मनातील भावनांना लेखकाने वाट करून दिली आहे. " चांदणभूल " म्हणजे लेखकाच्या बालपणीचा अनुभवाचा खजिनाच आहे,असे म्हटले तर वावगे ठरू नये. अनुभव मांडणी, कथन, वाचकांचे मन आकर्षित करून घेते. ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन या लेखातून होते.तरीही आधुनिक जीवनशैलीचा प्रसार आता ग्रामीण भागातही झाला आहे. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीत झालेला बदलही लेखकाने अधोरेखित केला आहे.
  अनुभव मांडताना उपमा - उत्प्रेक्षा अलंकारांनी नटलेली भाषाशैली लेखक प्राधान्याने वापरताना दिसतो.जसे- "पुनवेचा चंद्र आईनं तव्यावर केलेल्या गोल गरगरीत भाकरीसारखा दिसायचा." " रात्रीन चमचमणाऱ्या चांदण्याची रत्नजडित गोधडीच आपल्या अंगावर पांघरून म्हणून घातली आहे ". (चांदणंभूल). हिरवेगार बाभळीच्या झाडाचं वर्णन करताना लेखक म्हणतो," एखाद्या हिरवी चोळी- पातळ नेसलेल्या पोक्त बाईनं काळ्याभोर वावराच्या मधोमध फथकल मारून बसावं तसं ते दिसायचं." " आईची माया आणि बाभळीची काया या दोघींच्या एकत्रित झालेल्या मायेनं दोन चार दिवसात जखम खपली धरायची."( सोनपिवळ्या फुलांची बाभूळ) रात्रीच्या आकाशाचे वर्णन करताना लेखकाची लेखणी अधिकच चकाकते," काळया लुगड्यावर जरतारीने वेलबुटी काढावी तशी आभाळात चंद्र चांदण्यांची नक्षी काढलेली दिसायची." गावातील पाटील तुकाराम वाघाचं वर्णन फोटोवाला या लेखात करताना लेखक कोटी साधतो."वाघाची जरब मोठी. जंगलातल्या वाघासारखीच ! "
  ग्रामीण भाषेत प्रचलित काही म्हणींचा वापर लेखकाने प्रसंगांचं वर्णन करताना केला आहे.जसे- गावातील लोकांचे स्वभाव वर्णन करताना लेखक लिहितो, " भल्याला नही राजी अन् बुऱ्याला पुरक्या वाजी." " बाबाही गेला अन् दशम्याही गेल्या. " (फोटोवाला ).तर काही लेखात कवितांचाही आधार लेखक वातावरण निर्मितीसाठी घेताना दिसतो.
  अधून मधून जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या वाक्यांची पेरणी लेखकाने केल्याचे आढळते." बदलणे हा तर निसर्गाचा नियम आहे", "भाऊबंद खेळाचे धनी असतात."( गहिवर: बैल विकतानाचा) " रुपया महिना अन वझ का होईना." " जुनं ते सोनं ", " आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे."
यावरून उपमा - अलंकारांनी नटलेला हा ललित लेखसंग्रह आहे,असे ठामपणे म्हणता येते. 
  अशा रीतीने विविधरंगी आशय, चपखल आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण भाषा,वाचकांना आकर्षित करणारी लेखनशैली,ग्रामीण जीवनानुभव, लेखकाच्या बालपणातील कडू गोड आठवणी, संपूर्ण जीवनपट - प्रसंग वाचकांच्या डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद विजयकुमार मिठे यांच्या लेखणीत आहे.
  विविध राज्य पुरस्कारांनी या चांदण भूल ललित लेखसंग्रहाचा सन्मान झाला आहे. 
  नव्या ,आधुनिक युगात, शहरी वातावरणात कृत्रिम आयुष्य जगणाऱ्या तरुण-तरुणींना ग्रामीण अवकाश किमान वाचनातून या लेखसंग्रहाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. म्हणूनच कदाचित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात चांदणंभूलचा समावेश केला असावा.
  सर्व वांग्मयीन वैशिष्ट्यांनी नटलेला " चांदणभूल " हा मराठी साहित्यातील अनेकोत्तम ललित लेख संग्रहांच्या पंक्तीला शोभणारा असाच आहे.


चांदणभूल 
लेखक : विजयकुमार मिठे 
प्रकाशक : अक्षरवांग्मय प्रकाशन, पुणे 
----------------------------------

शैलेश अशोक पाटोळे 
नाशिक
९८६०७४९७९०

Sunday, February 9, 2025

मनाच्या तळीचा पाझर : सुहास केशव वेल्हाणकर

मनाच्या तळीचा पाझर : सुहास केशव वेल्हाणकर

नमस्कार 
बदलते राजकारण,समाजकारण, कुटुंब व्यवस्था इतकेच काय आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकारण यांसारख्या विविध विषयांवर सामान्य माणसाचे देखील त्याचे स्वतःचे एक मत असते. परंतु त्याचे हे मत त्याच्यासारखेच सामान्य वाटून त्याला कुठेच व्यक्त होऊ दिले जात नाही.किमान तशी संधी त्याला मिळत नाही. अगदी चहाच्या कट्ट्यावर, समवयस्कांमध्ये, ऑफिस- कार्यालयात इतकंच काय कुटुंबात देखील अव्हेर करण्याइतके त्याचे मत सामान्य मानले जाते ! मत व्यक्त करण्याबाबत त्याची कुचंबना होतच असते... अशा सामान्यातले असामान्य प्रतिभा असलेले काहीजण व्यक्त होण्यासाठी लेखणीचा आधार घेतात... आणि व्यक्त होतात मनसोक्त ...कागदावर ! व्यक्त झालेल्या या भावना गद्य किंवा पद्याचा आकार घेतात. अशांपैकी काही निवडकांचे व्यक्त होणे पुस्तक किंवा ग्रंथांच्या रूपाने लोकांपुढे येतात.....
   सुहास केशव वेल्हाणकर हे असेच सामान्यातले असामान्य व्यक्तिमत्व!
    अल्पावधीतच प्रकाशनाच्या क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या शब्दमल्हार प्रकाशनने एप्रिल २०२४ मध्ये मनाच्या तळीचा पाझर हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. ७५ कविता, बालकविता, चारोळ्या, दोन-तीन हिंदी रचना या संग्रहात आहेत.
  " सुंदर फुलांच्या बागा जगभर आहेत, म्हणून आपण आपल्या अंगणात बाग फुलवायचीच नाही का..? स्वानंदासाठी केलेल्या कवितांचा हा संग्रह असल्याची पुष्टी प्रस्तावनेत ज्येष्ठ कवी नरेश महाजन यांनी जोडली आहे. 
  शासनाच्या अकाउंट - ऑडिट विभागातून निवृत्त झालेले अधिकारी सुहास वेल्हाणकर यांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी पहिली कविता सुचली आणि आज ८० व्या वर्षात असताना त्यांचा हा कवितांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. खरंतर रोजचे ऑफिसचे काम, अकाउंट ऑडिट सांभाळणं, शासन निर्णयांचं वाचन - अभ्यास, शासकीय पत्रव्यवहार या सर्वांमुळे दैनंदिन कामाचा नक्कीच ताण वाढू शकतो. यातून मुक्त होण्यासाठी वेल्हाणकरांनी कविता करण्याचा जोपासलेला छंद त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दर्शवतो.
  आशयाच्या अंगाने त्यांच्या कवितांचा विचार केला तर त्यामध्ये विविधता आढळून येते. 
   चांदणे हासते,मंदावली पावले, मनातला मधुबन, प्रीत अशी यांसारख्या कविता सखी बद्दलच्या भावना व्यक्त करणाऱ्या अलवार प्रेम कविता आहेत. तो आणि ती च्या संवादाच्या या कविता आहेत. ती चे वर्णन करताना कवी म्हणतो,
      ओठ तुझे तर चुप्पी साधून 
      लज्जा होती घुंघट ओढून 
      डोळ्यांमध्ये भाव अनामिक
      खेळत होते छापा पाणी ll 

   मध्यमवर्गीयांचे जीवन, साहेब-कारकून आणि शिपाई, सामान्य माणूस आणि नोकरदाराच्या पाचवीला पुजलेला दुःख आसवांचे पूर या कवितेत कवी व्यक्त करतो.
      " बरबाद जीवनाचा शोक करणे व्यर्थ होते 
       शोधणे वादळांचे अर्थ तेही व्यर्थ होते."
   राजकारणी लोकांच्या भूलथापा आणि त्यांना बळी पडणारे सामान्य जन पराभूत प्रेषित मधून दिसतात. जीवावर उठले मधून गरिबांची कुचंबना लक्षात येते. सामान्यांवर होणारा अन्याय आणि त्यांची होणारी मुस्कटदाबी जखमी पक्षी मधून व्यक्त झाली आहे. धूर्त राजकारणी, भ्रष्ट अधिकारी, पुढारी यांवर तिखट टीका कवितेतून कवी करतो.
 अनुभवलेला निसर्ग, बदललेले समाज जीवन, व्यक्ती म्हणून आपल्यात झालेला काळानुरूप बदल, इत्यादी विषयांवर अतिशय संवेदनशील, कधी कधी खेळकर --- मिश्किल शैलीत कवीने आशय मांडला आहे.
   बदललेल्या सामाजिक स्थितीची जाणीव करून देताना कधी म्हणतो, 
      पैसाच प्यार आहे 
      पैसाच यार आहे 
      पैशाविना माणसाची 
      सर्वत्र हार आहे.....
    दुःख आणि हास्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या काही कवितांमधून अनुभवता येतो. उदाहरणार्थ: तेव्हा आणि आता, बाथरूम सिंगर या कविता. 
  आपण या समाजाचे घटक आहोत आणि म्हणून समाजाच्या अधोगतीला आपणच कारणीभूत असल्याची जाणीव कवीला होते.मग कवी स्वतःचीच हेटाळणी करतो. कवी जीवनाचे वास्तव सांगतो. 
  काही कविता अतिशय संवेदनशील असून वाचकांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. समाजात घडणाऱ्या अथवा घडवल्या जाणाऱ्या चोरी,भ्रष्टाचार, बलात्कार इ.घटनांचा धिक्कार कवीने केलेला दिसतो.
  मढ्यांची कैफियत, जगण्याचे वर्म, फाटकी झोळी, चंद्रास चटका, विचित्र स्वप्न इत्यादी कवितांमधून कवीचे समाजभान अवतरले आहे.स्वतःच्या अंत्ययात्रेचे वर्णन करणारी त्यांची कविता वाचकांना नि:शब्द आणि अस्वस्थ करून सोडते.
         पौर्णिमेच्या रात्री...
         माझी चिता जळावी 
         शांत शितल चांदण्याने 
         अखेर तरी सहन व्हावी ll
         ज्वाला चीतेच्या....
         उंच आकाशाला भिडाव्या
         माझ्या जाळणाऱ्या व्यथेने 
         चंद्रालाही चटका द्यावा..ll

गहिरा सागर, मोहरली फुलवेल, बळीराजाचे दुःख, देव दिसावा इत्यादी कवितांतून शेतकरी आणि शेतकऱ्याचे दुःख कवी वर्णन करतो. 
  " भिकेस लावी शेतकऱ्यांना उद्योगाची सेझ 
    सत्तेची सुंदरी सजविते धनवंताची शेज"
काही कवितांतून कवीच्या विनोदी आणि मिश्किल स्वभावाची कल्पना येते..
       पाजणार कोणी आहे 
       म्हणून काय पित सुटावी ?
       जनाची नसली तरी 
       मनाची काही असावी ...! 
पेरीत जावे मनामनातून आनंदाचे गाणे असा कवीचा तरल आशावाद कवितांमधून दिसून येतो.
  नवे शतक म्हणून २१ व्या शतकातील तरुण विद्यार्थी कसा दिशाहीन होत चालला आहे.. त्याचं वर्णन एका कवितेत करताना कवी म्हणतो...
   लहानपणीच डोळ्याला ढापण लावून 
   पाठीवरच्या ओझ्याने कमरेत वाकून 
   पहा तो कसा चालला आहे...
   एकविसाव्या शतकाचा सूर्य तो पाहत आहे...
शाळेचे दिवस, नंदूचे स्वप्न, सारख्या अविट गोडीच्या बालकविता या संग्रहात असून लहान मुलांचे भावविश्व कवीने चपखलपणे साकारलं आहे. 
    नंदू ने मारली ढगांवर उडी 
    विजेची मग कडाडली छडी l 
बदललेल्या सामाजिक स्थिती-गतीचे वर्णन करताना कवी म्हणतो... 
    द्रौपदीने बांधलेल्या चिंधीची
    कृष्णाने लज्जा राखली 
    राखीने नेसलेल्या चिंधीची
    मीडियाने मजा चाखली...
  आपल्या आयुष्याचा संध्या -- काल जवळ येत असताना (वयाच्या ८० व्या वर्षी देखील!) कवीला आईची आठवण झाल्या वाचून राहत नाही. 
  सय आईची मध्ये आई बद्दलच्या अव्यक्त भावनांना कवीने वाट करून दिली आहे.
    किती काळ झाला आई 
    भेटायची राहिली आहे.....
    आत्मा म्हणे अमर असतात 
    इथून गेलेली माणसे स्वर्गात असतात....
या संग्रहात विशेष म्हणजे चार हिंदी कवितांचाही समावेश कवीने केला आहे. मैत्रीचं महत्त्व विशद करताना कवी म्हणतो..
       रब तेरी दुनिया में जीना जरुरी है l
       दोस्तो में तनहा रहू भी तो कैसे ll 
उपमा- उत्प्रेक्षा, गेयता, शाब्दिक आणि व्याकरणिक चमत्कृती, कोपरखळ्या, विनोद, इत्यादींचा अंतर्भाव कवितेतून नजरेस पडतो. 
  वृद्धापकाळाकडे झुकलेल्या कवीच्या कवितेची बाग मात्र साऱ्यांचेच मन प्रफुल्लित आणि टवटवीत करते,हे मात्र खरे !

शैलेश पाटोळे 
नाशिक

नाबाद अर्धशतक : श्री व सौ.नांदुर्डीकर

.                    नाबाद अर्धशतक !!

"अहो ,ऐकलं का? " 
"हो.."
" हो.. काय..!
" अगं ,तू काही बोललीस का ?
"तुम्ही काय ऐकलं मग..?"
" काही नाही."
"मग बोलायचे आधीच हो काय..?
" अगं म्हणजे..!
" म्हणजे काय..???
  पाटा खेळपट्टीवर स्विंग होणाऱ्या गोलंदाजांसमोर नांगी टाकून दिलेल्या फलंदाजांप्रमाणे माझी अवस्था झाली. तिच्या खोचक प्रश्नांची सरबत्ती सुरू होताच नेहमीप्रमाणे माझी सारी शस्त्रे खाली टाकून मी सपशेल शरणागती करणे पसंत केले .टीव्हीचा आवाज कमी केला.
  "...अगं काय म्हणत होतीस?"
" जा तिकडेच... तुम्हाला क्रिकेटची मॅच महत्त्वाची ना..? असं म्हणत सौ रागारागात चपातीच्या पिठावर लाटणं फिरवू लागली. आता आपलं काही खरं नाही असं लक्षात आल्यावर मी लाडिकपणे समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागलो. मग कुठे स्वारी ठिकाणावर आली.....
 " काय गं काय सांगत होतीस.?"
" नीट ऐकणार असाल तर सांगते."
" सांग सांग ...बघ टीव्ही देखील बंद केलाय मी." "अहो... नांदुर्डीकरांचा मेसेज होता."
" काय म्हणताय..?"
" त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे." "पन्नासावा..! अगं बाईंचा पन्नासावा वाढदिवस असेल. नीट वाचलास का मेसेज..?"
 " हो.. हो.. लग्नाचाच वाढदिवस..."
"बापरे ..! पन्नास वर्षे आणि तोही लग्नाचा. आश्चर्यच म्हटले पाहिजे.."
" का ..?होऊ नाही शकत का..?"
" तसं नाही... होऊ शकतात.. अगं आजकाल दहा-बारा धावा काढणं कठीण होत असताना श्री व सौ नांदुर्डीकरांनी चक्क अर्धशतक ठोकलं... याचं आश्चर्य वाटतं...
सौ स्वयंपाकात आणि मी क्रिकेटच्या विश्वात रममाण झालो .सोफ्यावर लोळत सामना पाहण्यात दंग झालो. 
      नाबाद ५० ...लग्नाचा सुवर्ण महोत्सव..!म्हणायला सोपं आहे;पण प्रत्यक्षात हे कसं जमलं असेल ….मन भुतकाळात रमलं.श्री व सौ नांदुर्डीकरांची पहिली भेट कधी झाली असेल...? आठवलं... ज्योतिष विषयक सल्ला घेण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांना भेटलो. अतिशय शांत मितभाषी, स्पष्ट उच्चार असलेले श्री.नांदुर्डीकरांशी संवाद साधला. एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झालो. सौ नांदुर्डीकर माझ्या संस्थेतील एका शाळेतून संस्कृत शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.बाई थोड्याशा अघळ - पघळ..पण निर्मळ अंत:करण्याच्या. गप्पा मारणे, आलेल्याचें स्वागत करणे, स्वतः बनवलेली व्यंजने खाऊ घालणं... हा त्यांचा खास छंद!  घरामध्ये तसेच ते दोघेच; परंतु घरातलं वातावरण अतिशय प्रसन्न.खुर्च्या,टीपॉय त्यावर वर्तमानपत्रं, पुस्तकं , सारं कही नीटनेटकं मांडलेलं.बैठकीत एका कोपऱ्यात अतिशय स्वच्छ एकावर एक रचून ठेवलेली तांब्याची भांडी.. येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेणारे.. दरवाज्यापाशी काढलेली रेखीव रांगोळी, स्वतःच्या बागेतली जास्वंद, चाफ्याची फुले फुललेली. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद भरभरून वाहतोय.दुःखाचा लवलेश नाही. खरं म्हणजे पहिल्याच भेटीत या दांपत्याने आपलंसं करून टाकलं. त्यांनी वर्तवलेले अंदाज पुढे खरे ठरले..! विद्यार्थी जसं प्रश्नाचे उत्तर नाही मिळालं की गाईड चाळतात. तसे आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाले की, नांदुर्डीकरांच्या "वरद" बंगल्यात जाऊन उत्तर शोधायची सवयच जडली! त्यांच्या आपुलकीच्या शब्दांत सारी दुःखं विसरायला होतात. शेवटी घरातून निरोप घेताना बाई चाफ्याची चार फुलं ओंजळीत टाकायला कधीच विसरत नाहीत.. थोडक्यात काय..आचार,विचार आणि सहवासाने सुगंधित व्हायला होतं त्यांच्या सहवासाने....!
 हळूहळू परकेपणा कमी झाला. आधार शोधण्याच्या त्यांच्या वयात आम्हालाच त्यांचा आधार वाटू लागला. न चिडता.. रागावता, अतिशय संयमाने, संस्काराने परिपूर्ण श्री व सौ नांदुर्डीकरांच्या लग्नाला पन्नास वर्षे झाली.पन्नास वर्षे एकमेकांशी नातं टिकून राहणं हे खरंतर आजच्या युगात सन्मानजनक आहे. एकमेकांची काळजी करत... समजून घेत, आवड -  निवड जपत, एकमेकांसाठी आयुष्य वेचत जगणं याचा आदर्श म्हणजे श्री व सौ नांदुर्डीकर जोडपं !इतकी वर्षे एकत्र राहणं म्हणजेच एकमेकांच्या स्वभावात परिवर्तन होत असताना एकात दुसऱ्याने मिसळून जाणं .वाटतं एवढी वर्षे लग्न टिकून राहणं म्हणजे एकमेकाला वाढू देणं,बदलू देणं.
    धार्मिक परंपरा, रीतिरिवाज, संस्कार, कुळाचार,  पूजा - अर्चा  उत्साहाने करणारं असं दांपत्य सापडणं कठीण..!  ३६ गुण जुळणाऱ्यांचाही संसार छत्तीसच्या आकड्यासारखाच असतो..! मग श्री व सौ नांदुर्डीकरांचे किती गुण जुळले असतील..? सहज प्रश्न पडतो.आकाशातल्या ग्रहताऱ्यांचा किती परिणाम माणसावर होतो माहित नाही... तो संस्कार असावा लागतो.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा." शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी..." म्हणतात ना.. अगदी तसा. संस्कारशील कुटुंबातून दोघेही असल्याने हा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं  भाग्य त्यांना लाभलं आहे, असे निश्चितपणे वाटतं.
  श्री.प्रकाश नांदुर्डीकर तसे नाशिकच्या निफाड तालुक्यातीलच; परंतु वडिलांच्या साखर कारखान्यातील नोकरीमुळे त्यांचं बालपण आणि शिक्षण नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे गेलं .आई-वडिलांप्रमाणेच शाळेतील गुरुजनांचे उत्तम संस्काराने ते घडत गेले.वाचनाची, शुद्धलेखनाची आवड निर्माण करणाऱ्या गंधे गुरुजी आणि अतिशय मनोरंजक पद्धतीने इतिहास शिकवणाऱ्या ना.वि. जोशी सरांचा पगडा आजही त्यांच्या मनावर कायम आहे. सहा भाऊ आणि दोन बहिणी, आई-वडील असा त्यांचा परिवार. पुढे थोरल्या बंधूंना रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये नागपुरात नोकरी मिळाल्याने श्री नांदुर्डीकरांचे पुढील शिक्षण नागपुरात झाले. फलटणच्या महाविद्यालयात त्यांना शिक्षणाची संधी मिळाली. प्राचार्य राम शेवाळकरांना ,प्राचार्य शिवाजीराव भोसलेंना तसेच अनेक दिग्गज शिक्षकांना ऐकता आलं.पुढे उल्हासनगरच्या महाविद्यालयातून त्यांनी प्राणिशास्त्रातून बी.एससी. पदवी उत्तीर्ण केल्यावर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य विभागात फिशरी स्कूलमध्ये मुख्याध्यापकाची नोकरी त्यांना मिळाली. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या निमित्ताने भ्रमंती करण्याचा योग आला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने काटकसरीची सवय लागली. नोकरीत भ्रमंती करत असताना माणसांचे स्वभाव जवळून अनुभवता आले. "सार सार को ग्रही लै,और थोथा देई उडाय l ", या कबीराच्या वचनाप्रमाणे जे जे चांगले त्याचा स्वीकार व वाईटाचा त्याग त्यांनी केला.अतिशय प्रामाणिक व अभ्यासू अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती. "साधेपणा " हा त्यांच्या सर्वात अनमोल असा गुण.. जो अलीकडच्या अधिकाऱ्यांमध्ये क्वचितच पहायला मिळतो ! नोकरीच्या निमित्ताने भेटलेले वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांशीही त्यांचे स्नेहाचे संबंध राहिले. श्री. सुरेश कुलकर्णी,श्री. श्रीनिवास जडे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी मार्गक्रमण केले. गुरुतुल्य प्रभाकर कुलकर्णी यांचा खरा आधार त्यांना लाभला. नोकरीतल्या खाचा - खोचा  त्यांच्यामुळेच कळल्या... उत्तम आणि प्रामाणिक नोकरीचा संस्कार, त्यांनीच केला. त्यांच्याशी झालेली भेट म्हणजे खरे तर ईश्वरी प्रसादच..! अतिशय कर्तृत्ववान आणि दिशादर्शक असलेले श्री.शेळके साहेब, श्री रांगणेकर, श्री.देसाई यांचे ऋण कधीच न विसरता येण्यासारखे..!  श्री.चव्हाण आणि श्री.पंडोरे  शासकीय वाहनांचे ड्रायव्हर ; परंतु त्यांच्याशी असलेले नाते देखील जिव्हाळा निर्माण करणारे असेच..! " जशी दृष्टी तशी सृष्टी",यानुसार श्री नांदुर्डीकरांना सर्वांमध्ये केवळ चांगलेच दिसते. माणूस जोखण्याची  विवेकबुद्धी त्यांचे जवळ आहे. माणूस आपल्या अवतीभवती असणाऱ्या माणसांमुळे घडत किंवा बिघडत जातो. Man is known by the company he keeps. नुसार ते कायम उत्तमाच्या सानिध्यात वावरले. तसे ते घडत गेले.  "राजा शिवछत्रपती " हे बाबासाहेब पुरंदरेंचं पुस्तक इयत्ता आठवीत असताना त्यांनी वाचलं.विचारांना दिशा देणाऱ्या या पुस्तकाचा विशेष प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला.
  २४ जून १९७४  रोजी श्री.प्रकाश नांदुर्डीकर यांचा विवाह वाईच्या सदावर्ते घराण्यातील कुमुद (शुभांगी) यांच्याशी झाला. सहा बहिणी आणि दोन भावांच्या कुटुंबात कुमुद सर्वात सर्व बहिण भावंड त्यामुळे शिक्षणाचा वारसा त्यांना कुटुंबाकडूनच लाभला होता.एकत्र कुटुंबात वाढलेल्या शुभांगी संस्कारशील,धार्मिक आणि शेतकरी कुटुंबातून आल्या असल्याने जगण्यातील उन्हाळे आणि पावसाळे सहन करण्याची सहनशीलता उपजतच त्यांच्यात होती.त्यांची आई गृहिणी... साक्षात अन्नपूर्णाच ! तोच संस्कार सौ. नांदुर्डीकरांमध्ये अवतरला आहे.सुग्रास, नाविन्यपूर्ण स्वयंपाक ही बाईंची खरी ओळख. पत्नीला एका अर्थाने अर्धांगिनी म्हटलं जातं.त्यानुसार सासरकडच्या मंडळींच्या सुखदुःखात त्या पतीबरोबर समरस झाल्या. नोकरीच्या निमित्ताने बदलीच्या गावी त्यांनी जमेल त्या परिस्थितीत आनंदाने संसार केला. जेथे जात तिथे संसाराला हातभार लावण्यासाठी त्या नोकरी करीत. सासू-सासर्‍यांचे विशेष प्रेम त्यांना लाभलं. त्यांनी सुनेला शिक्षणासाठी कायमच प्रोत्साहन दिलं .मदत केली. सुनेने बी.एड. करावं म्हणून सासर्‍यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी सात-आठ किलोमीटर पायी चालत जाऊन कोल्हापूरला  सुनेचा फॉर्म भरला ! आजकाल असे चित्र पाहायला मिळेल का ? वाईला शाळेत असताना काशीताई नातू या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकेच्या मार्गदर्शनाखाली बाईंची जडणघडण झाली. शिक्षणानंतर १९९० मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीत शिक्षिका म्हणून त्यांना नोकरीची संधी मिळाली.या काळात श्रीमान एस.के.कुलकर्णी, श्रीमान का.विं.जोशी,श्रीमान एम .पी.कुलकर्णी यांचे एक संस्कारशील व अभ्यासू शिक्षिका घडविण्यात मोलाचे योगदान लाभले. मराठी संस्कृत आणि भूगोल या विषयांचे मार्गदर्शन बाई करीत.संस्थेच्य ति.झं. विद्यामंदिर भगूर आणि डी.एस.कोठारी कन्या शाळेत अठरा वर्षे नोकरी करून २००७ साली बाई सेवानिवृत्त झाल्या. घरदार ,सासू-सासरे, मुलगा, शाळा अशी तारेवरची कसरत बाईंनी यशस्वीपणे केली.शारीरिक थकल्या तरी मनाने त्या कधी थकलेल्या वाटत नाहीत .शालेय जीवनापासून त्यांना खेळाची आवड.. नवनवीन पाककृती करणे... स्वयंपाकात नवनवीन प्रयोग हे त्यांचे आवडीचे छंद. लोकांना गरजवंतांना अडचणीच्या काळात मदत करणं, लोकसंग्रह करणे, याची त्यांना खास आवड. सेवानिवृत्तीनंतरही त्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांत सहभागी घेत राहिल्या. गजानन महाराज मंदिर, कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ, संस्कार वर्ग, इत्यादी उपक्रमांत त्या सक्रिय सहभागी होतात. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता. एका सामाजिक संस्थेने त्यांचा आदर्श शिक्षिका म्हणून गौरव केला.इतक्या सर्व कामांमध्ये सक्रिय राहिल्याने त्या सदैव उत्साही दिसत असाव्यात..!  त्यांचा एकुलता एक मुलगा मनीष उच्चशिक्षित असून पत्नी वैशाली आणि मुलगी गौरीसह पुण्यात स्थायिक झाले आहेत.
 सतत वाहणारी नदी जशी स्वच्छ आणि निर्मळ असते तसेच सतत काळांनुरूप, परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये आवश्यक तो बदल करून घेतल्याने श्री व सौ नांदुर्डीकर सुखी, समाधानी, आनंदी,निर्मळ दिसून येतात ! काळाबरोबर चालण्याची नुसती इच्छा असणं आणि प्रत्यक्ष तसं करण यातलं अंतर त्यांनी पार केलं आहे. श्री.नांदुर्डीकर यांचा ज्योतिष शास्त्राचा दांडगा व्यासंग आहे. " जे जे आपणासी ठावे l  तें तें लोकांशी सांगावे l  शहाणे करोनी सोडावे l  सकळ जण l  या उक्तीप्रमाणे आपल्या व्यासंगातून ते लोकांना सहाय्य करीत असतात.
  येत्या २४ जून रोजी त्यांच्या सहजीवनाला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. परिपक्वता, रसरशीतपणा, नाविन्याची ओढ, भावनांचे बंध आणि शारीरिक म्हातारपणास ठामपणे दूर ठेवण्याची ताकद अशा बळकट पायांवर त्यांच्या आयुष्याची बळकट इमारत उभी आहे. श्री व सौ नांदुर्डीकरांच्या स्वभावात अनेक बाबतीत साम्य आढळून येते. वाचन, पूजाअर्चा, धार्मिक व्रतवैकल्ये, स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, लोकसंग्रहाची आवड, इत्यादी अनेक बाबी दोघांच्याही मिळत्या -  जुळत्या आहेत. आकाशस्त ग्रहताऱ्यांच्या मिलनापेक्षा मला वाटते हे साधर्म्य फार महत्त्वाचे असते... नाही का..? विवाहाचा सुवर्ण महोत्सव साजरा केल्याबद्दल उभयतांचे हार्दिक अभिनंदन !  दोघांनाही सहस्रचंद्र दर्शन लाभो हीच सदिच्छा! 
  खरंतर आजकालच्या तकलादू होड्यांना नांदुर्डीकरांच्या होडीकडे बघून जीवनसागर पार करायची जिद्द येओ, ही अपेक्षा...
  " जीवनात ही घडी अशीच राहू दे..
  प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे..." 
  या यशवंत देवांच्या यमन रागातील गीताप्रमाणे श्री व सौ नांदुर्डीकरांचे सहजीवन असेच वृद्धिंगत होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
  पुनश्च एकवार विवाह सुवर्ण महोत्सवाबद्दल उभयतांचे हार्दिक अभिनंदन!

शैलेश अशोक पाटोळे
                   नाशिक
          २४ जून २०२४

Wednesday, December 25, 2024

लडाख : एक अविस्मरणीय सफर !

       लडाख : एक अविस्मरणीय सफर ! 

"उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढवू
अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू.."
  कविवर्य वसंत बापटांच्या या स्फूर्ती गीताचे पारायण आपण सर्वांनीच शालेय जीवनात केले आहे. भारताचा उत्तरेकडील भाग प्रत्येक भारतीयाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. हिमालय पर्वत, पाकिस्तान, अफगाणिस्तान,चीन, नेपाळ, इत्यादी देशांच्या बॉर्डर्स, प्रचंड थंडी, डोंगराळ प्रदेश, बर्फ वृष्टी, सुकामेवा आणि बरंच काही... एका मित्राच्या आग्रहामुळे लडाखच्या सफरीवर जाण्याचा योग आला. सहलीला जाऊन आल्यानंतर आता वाटते... मित्रांच्या आग्रहाला मी प्रतिसाद दिला नसता तर...? पृथ्वीवरचे नंदनवन अनुभवण्याचे राहून गेले असते..! 
  विमान प्रवासाचा फारसा अनुभव गाठीशी नव्हता. विमानतळावर पोहोचल्यानंतर सुरक्षाविषयक सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर खराब हवामानामुळे तासन्तास ताटकळत बसावे लागले. धावपट्टी वरून धावणारी असंख्य विमाने पहात.. आता आपले कधी? या विचारात आम्ही सारे जण वेळ घालवत होतो. एकदाचे विमानात बसलो. या आधीच्या काश्मीरच्या पहिल्यावहिल्या विमान प्रवासाचा अनुभव होता. एअर होस्टेस ने," कुर्सी की पेटी बांधलो.."असा मधाळ आदेश दिल्यानंतर उतावळेपणाने मी शेजारच्यांचीच पट्टी माझ्या कमरे भोवती गुंडाळल्याने थोडा वेळ झालेला गोंधळ आणि त्यामुळे माझे झालेले हसे.. कसे विसरता येईल? विमान एकदाचे आकाशात झेपावले. मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते लदाख अशी फ्लाईट होती. 
   या आधी काश्मीरच्या सहलीचा सुखद अनुभव होता. कडाक्याची थंडी आणि बर्फाने आच्छादलेल्या डोंगररांगा तरीदेखील सुखद आणि आल्हाददायक असे वातावरण.. खरे तर हा चमत्कार म्हटले पाहिजे. काश्मीर आणि लदाख जवळ जवळ असल्याने तोच सुखद अनुभव येईल,असे वाटले होते. 
     लेह विमानतळावर उतरल्यानंतर परिस्थिती अगदी उलट होती. उंचच उंच डोंगर रांगा, खडकाळ प्रदेश, ओसाड जमीन, तुरळक लोक वस्ती.. एवढा प्रवास करून आपण इथे काय पाहायला आलो? असे प्रश्न आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर होते. लेह मध्ये एका लाकडी बनावटीच्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती. हॉटेल छान व नीटनेटके होते. लाकडामध्ये केलेले सुंदर कोरीव काम, भिंतीवर लावलेले लडाखमधील बौद्ध स्तूप, याक, हिमालयाचे विविध फ्रेम केलेले फोटो लक्ष वेधून घेत होते. त्यातही हॉटेलभर भरून राहिलेला मोहरीच्या तेलाचा उग्र वास मात्र नकोसा वाटत होता. प्रवास करून आल्यानंतर खूप थकल्यासारखे जाणवत होते. उत्साह जाणवत नव्हता. दोन पावले अंतर चालण्याची इच्छा नव्हती. आपण फिरायला आलो आहोत आणि अंगात त्राण राहिलेला नाही... अशी परिस्थिती आम्हा सर्वांचीच होती. रिसेप्शन काउंटरवर जाऊन थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. 
   टूर कंपनीने तयार करून दिलेल्या आयटीनरी नुसार सायंकाळी लेह मधील एक प्राचीन बौद्ध स्तूप, आणि लेह मार्केट मध्ये भटकंती करणे ठरले होते. बाहेर पडण्याची अजिबात इच्छा नसताना देखील आम्ही तयारी करून नेमून दिलेल्या वाहनांमध्ये स्थलदर्शनासाठी निघालो...
  लेह हे लडाख केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यालय असून तेथील मोठे शहर आहे. ते हिमालय पर्वत रांगेत सिंधू नदीच्या काठावर साधारणपणे११५०० फूट उंचीवर असून त्याच्या पूर्वेला तिबेटचे पठार आणि पश्चिमेला काश्मीरचे खोरे आहे. येथे लडाखी, बालटी आणि हिंदी भाषा बोलली जाते. येथे मुस्लिम,बौद्ध, हिंदू आणि शीख धर्मीय लोक आहेत.येथून नॅशनल हायवे क्रमांक १ (NH 1) ने श्रीनगरला जाता येते.लेह ते श्रीनगर हे अंतर साधारणत : ५३४ किलोमीटर आहे. येथील संस्कृती ही तिबेटियन संस्कृतीशी एकरूप झालेली दिसते. लडाख या शब्दाचा अर्थ उंचावरची जमीन असा होतो. हे भारतातील सर्वात उंच पठार आहे. 
  पहिल्या दिवशी लेह शहरातील शांती स्तूप ज्याला पीस पॅगोडा असे म्हणतात ते पाहण्यासाठी निघालो. समुद्रसपाटीपासून ११८४१ फूट उंचावरील टेकडीवर ते वसलेले आहे. १९१४ मध्ये जपानी बौद्ध लोकांनी ते बांधले आहे. या टेकडीवरून लेह शहराचे पॅनोरमिक दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ सूर्यप्रकाश, थंड हवा, कमालीची शांतता असूनही उंचावर असल्याने आणि वातावरणाशी जुळवून न घेतल्याने शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते. साधारणपणे पाचशे पायऱ्या या टेकडीला आहेत. सूर्यास्ताच्या वेळी अतिशय मनोहारी दृश्य दिसत होते; शांती स्तूपाच्या अगदी जवळ आम्ही श्वास घेण्यात अडचण येऊ लागल्याने धापा टाकत पोहोचलो. पुढे दोन पावले चालण्याची शरीर आणि मनात ताकद उरली नव्हती. एक पाऊलही पुढे टाकणं अशक्य होते. आम्हा सर्वांचिच परिस्थिती लक्षात घेता स्तूपाच्या दरवाज्यापासूनच पुन्हा हॉटेलवर जाण्यासाठी गाडीत बसलो. जे स्थळ दर्शन करण्यासाठी आम्ही आलो होतो ते न पाहताच सफरीची सुरुवात झाली ! आम्ही निराश झालो. हॉटेलवर गेल्यानंतर आराम करण्याशिवाय पर्याय नव्हता. साधारणपणे रात्रीचे आठ वाजले असावेत, जेवणासाठी आम्ही डायनिंग हॉलमध्ये जमलो. आमच्यापैकी बहुतेकांना बसल्या जागी चक्कर येऊ लागले. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत मदत केली. कुठलीतरी एक गोळी त्यांनी आम्हा सर्वांना दिली. लडाखच्या सफरीची सुरुवात अशी झाली...
   दुसरा दिवस उजाडला. सूर्योदयापूर्वी जाग आली. हॉटेलच्या गॅलरीत जाऊन बाहेरचे दृश्य न्याहाळले. दूर उंच टेकडीवर भारताचा तिरंगा दिमाखात फडकत होता. लांब अंतरावर बर्फाने आच्छादलेले उंचच उंच डोंगर लक्ष वेधून घेत होते. चित्रपटात किंवा वॉलपेपर मध्ये पाहिलेले दृश्य प्रत्यक्ष डोळ्यांनी पहात होतो. कालचा थकवा आणि निरुत्साह अचानक गायब झाला. शक्य तितके निसर्गाच्या मनोहारी दृश्याचे ते क्षण कॅमेरात बंदिस्त केले. भरपेट नाश्ता केल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या स्थलदर्शनासाठी हॉटेल बाहेर ड्रायव्हर गाडी घेऊन तयार होता. 
  प्रवासाला सुरुवात झाली. त्याआधी मेडिकल शॉप मधून ऑक्सिजनचे एक सिलेंडर आणि जीव गुदमरू लागल्यानंतर घ्यावयाची गोळी सोबत घेतली. आज आम्ही लेह पासून कारगिल पर्यंतचा प्रवास करणार होतो. १९९९ चे ऑपरेशन विजय आणि भारतीय सैन्याचा पराक्रम वर्तमानपत्रात वाचला होता. आज या स्फूर्तीदायी आणि अनेक भारतीय सैन्याच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीला स्पर्श करता येईल याबाबत उत्साह मनात होता. उंच उंच डोंगर रांगा, वेडी वाकडी वळणे, अरुंद रस्ते, प्रचंड खोल दऱ्या, इत्यादींमुळे भय आणि आनंद अशा संमिश्र भावना प्रत्येकाच्या मनात होत्या. ड्रायव्हर सरावाचा असल्याने तो खुबीने गाडी चालवत होता. समोरून येणाऱ्या वाहनांना पास देणे, दुसऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला मदत करणे, न चिडता अत्यंत संयमाने गाडी चालवणे याबद्दल तिथल्या ड्रायव्हरचे मला कौतुक वाटले. अर्थात असे न केल्यास हजारो फूट खोल दरीत वाहन पडण्याची शक्यताच अधिक !
    लेह पासून साधारणपणे ५२ किलोमीटर अंतरावर लिकीर मॉनेस्ट्री हा बौद्ध मठ त्याच्या रचनेसाठी आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तेथे जाऊन दर्शन घेतले. आज मात्र ऑक्सिजनची कमतरता फारसी जाणवली नाही. थंड हवा, शांत परिसर, आणि निसर्गाचे अलौकिक सौंदर्य मनाला भुरळ पाडत होते. त्यादरम्यान मॅग्नेटिक हिल ही पृथ्वीवरील चमत्कारिक जागा पाहता आली. गुरुत्वाकर्षणाचा प्रतिकार करणारी ही चुंबकीय टेकडी जेथे गाडी विशिष्ट ठिकाणी आपोआप वरच्या दिशेने ताशी ६० किलोमीटर वेगाने जाऊ लागते.
  लेह ते कारगिल प्रवासादरम्यान ड्रायव्हरने पाथर साहिब (पत्थर साहेब) गुरुद्वारा जवळ गाडी थांबवली. रस्त्याच्या अगदी मधोमध हे ठिकाण आहे. मिलिटरी चेक पोस्ट असल्याने ड्रायव्हरला सुरक्षाविषयक पूर्तता करण्यासाठी थांबावे लागले. तोपर्यंत आम्ही गुरुद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी शिरलो. मी मात्र नेहमीप्रमाणे गुरुद्वाराच्या गेट जवळच घुटमळत राहिलो. "तुम्ही दर्शन घेऊन या. मी बाहेर थांबतो..."असे मी म्हणालो. सवयीप्रमाणे तिथे लिहिलेल्या बोर्डवरची माहिती जी इंग्रजी व हिंदी भाषेत लिहिलेली होती ती मी वाचली. तेथे गुरुद्वारा बद्दलची आख्यायिका लिहिलेली होती... साधारणपणे १५१७ मध्ये शिखांचे धर्मगुरू गुरुनानक देव चीन,भूतान, नेपाळ असा प्रवास करीत करीत लडाख मध्ये आले. त्याकाळी त्या गावात एक दृष्ट राक्षस अथवा दरोडेखोर गावातील लोकांना प्रचंड त्रास देत असे. त्याच्या जाचामुळे गावातील लोक भयभीत झाले होते. गुरुनानक देव एका झाडाखाली साधनेला बसले होते. गावातील लोकांनी त्या राक्षसी वृत्तीच्या माणसाबद्दल गुरुनानकांना सांगितले. "राक्षसाचा बंदोबस्त मी करतो. तुम्ही काळजी करू नका," असे आश्वासन गुरुनानक देवांनी त्यांना दिले. याबाबत डोंगरावर राहणाऱ्या त्या राक्षसाला कळले. त्याने डोंगरावरून एक भला मोठा दगड गुरुनानक देव बसलेल्या दिशेकडे फेकला. तो दगड गुरुनानकांच्या पाठीला लागला. चमत्काराची गोष्ट म्हणजे गुरुनानकांच्या पाठीला दगडाचा स्पर्श झाल्यानंतर दगड आतल्या बाजूला दाबला गेला व तेथे पाठीच्या आकाराचा खड्डा पडला. अशी मान्यता आहे की, गुरुनानक देवांच्या स्पर्शाने तो दगड मऊ झाला. आजही या दगडाचा स्पर्श इतर खडकांच्या तुलनेने मऊ किंवा मुलायम भासतो ! पुढे तो राक्षस गुरुनानकांना शरण आला.... माझ्यातील जिज्ञासा आणि प्रत्यक्ष गुरुनानकांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या त्या भल्या मोठ्या दगडाला स्पर्श करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली आणि मी गुरुद्वारामध्ये प्रवेश केला... मनोभावे दर्शन घेतले. हा परिसर आणि गुरुद्वारा भारतीय सैन्याच्या शिख बटालियन कडे सोपविण्यात आला असून त्यांच्या नियंत्रणात आहे. गुरुद्वारा मधील सर्व प्रकारची व्यवस्था बटालियन मधील सैनिकांमार्फत होते. कदाचित भारतातील हे असे एकमेव ठिकाण असावे !
   हजारो फूट उंचीच्या डोंगर रांगांमधून वळणे घेत रस्ते कसे तयार केले असतील याचे देखील आश्चर्य वाटते. सतत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे डोंगरावर दगड कमी आणि मातीचे किंवा रेतीचे थर साचलेले दिसतात. डोंगरावरील खडक उष्णता आणि थंडीमुळे आकुंचन आणि प्रसरण पावत असल्याने ठिसूळ झालेले असतात. त्यामुळे कधीही दरड कोसळण्याची भीती असते. रस्त्याच्या कडेला खोल दऱ्या असून बचावाची कोणतीही शक्यता नसते.BRO या संस्थेमार्फत आणि भारतीय सैन्यामार्फत रस्त्याची निगराणी व काळजी घेतली जाते. हॉलीवुड ॲक्शनपटामध्ये दिसणाऱ्या , भयकंपित करणाऱ्या उंच उंच डोंगर रांगा आणि त्यातून वळणे घेत झेपावणारी विमाने, हेलिकॉप्टर्स यांचा भास व्हावा असे रस्ते ... प्रवासाचा अद्भुत अनुभव या रस्त्यांवर येतो.
  बहुप्रतिक्षित कारगिलला आम्ही पोहोचलो. कारगिल हे सुरू नदीच्या किनाऱ्यावर वसलेले असून नियंत्रण रेषेजवळील शहर आहे .नॅशनल हायवे क्रमांक एकने जोडलेले हे ठिकाण ८७८० फूट उंचावर आहे. कारगिल युद्ध स्मारकाला आम्ही भेट दिली.१९९९ मध्ये ६० दिवस चाललेल्या कारगिल युद्धामध्ये ५५७ सैनिकांनी बलिदान दिले. स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आत मध्ये प्रवेश करतानाच अंगावर रोमांच उभे राहिले. युद्धामध्ये वापरले गेलेले रणगाडे,तोफा, बंदुका, इत्यादींचे जतन तेथे केले आहे. कॅप्टन विजय बात्रा यांच्या विजयाची गाथा तेथे एका शोमध्ये पाहिली .नियंत्रण रेषेवर असणाऱ्या सैनिकांच्या बद्दल मनामध्ये आदर तर असतोच ; परंतु सैनिकांचे शौर्य पाहून उर अभिमानाने भरून आला! त्या स्मारका जवळ उभे राहून फोटो काढण्याचा मोह प्रत्येकाला होणे स्वाभाविक ! आमच्यात अपवाद माझ्या मुलाचा..ज्याने तिथे एकही फोटो काढला नाही. त्याचे कारण त्या विशितल्या तरुणाकडून ऐकून आम्हाला लाजल्यासारखे झाले."बाबा, ही फोटो काढण्याची जागा नाही. तुम्हाला फोटो काढायचा असेल तर तुम्ही जरूर काढा. अनेक शूरवीर सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीवर आपण आहोत." बलिदान केलेल्या सैनिकांच्या स्मृति तेथे कोरलेल्या आहेत. त्या स्मृतीस्थळावर तो नतमस्तक झाला. आमच्यातल्या दिखाऊ देशभक्तीला जणू त्याने हात घातला होता! वाटले..सहलीचा खरा हेतू सफल झाला. भारतातील अशी स्फूर्तीदायक ठिकाणे तरुणांसाठी तीर्थक्षेत्र व्हावीत ! भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला भीमपराक्रम ऐकून आपण भारतीय असल्याचा गर्व वाटला. -२० अंश सेल्सिअस तापमानात कसे लढले असतील ? स्वतःच्या वजनापेक्षा दुप्पट वजनाचे ओझे पाठीवर घेऊन डोंगरदऱ्या कसे चढले असतील? सलग साठ दिवस शत्रूशी सामना कसा केला असेल? कल्पनेनेच आपल्यासारख्यांना धडकी भरते.शेकडो सैन्यातल्या अधिकाऱ्यांचा मृत्यू.. तेही अगदी तरुण वयात... पुढे त्यांच्या कुटुंबीयांचे काय.. असंख्य प्रश्न मनाला भंडावून सोडतात.. सलाम त्यांच्या शौर्याला..... त्यागाला.. बलिदानाला..देशभक्तीला ! आपोआपच आपले हात भूमीला स्पर्श करतात आणि गुलाल म्हणून ती माती भाळी लावण्याचा मोह आवरता येणे केवळ अशक्यच! पर्यटनादरम्यान असा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेतला होता. पर्यटन म्हणजे केवळ निसर्गदर्शन आणि मनोरंजन एवढाच हेतू नसतो,हे कारगिलला भेट दिल्यावर कळले. प्रत्यक्ष युद्ध लढले गेलेले द्रास सेक्टर,झोझिला पास असा प्रवास करीत पुन्हा लेह येथे मुक्कामासाठी पोहोचलो.
   भरपेट नाश्ता करून आमची गाडी पुढच्या प्रवासासाठी साधारणपणे साडेनऊ ते दहा च्या दरम्यान निघाली. अंगाला झोंबणारा गार वाऱ्यापासून संरक्षण महत्त्वाचे होते. स्वेटर्स, कान टोप्या,ग्लोव्हज इत्यादी अंगावर चढवून आज नुब्रा व्हॅली पाहण्यासाठी निघालो होतो. नुब्रा व्हॅली ही गुलाबाच्या फुलांसाठी प्रसिद्ध आहे. लडाखच्या इतर भागांपेक्षा हा प्रदेश उबदार म्हणून ओळखला जातो. साधारणपणे ६७३० फूट उंचावर हे ठिकाण असून गुलाब आणि पिवळ्या रंगांच्या गुलाबांसाठी ते प्रसिद्ध आहे. म्हणून याला व्हॅली ऑफ फ्लावर्स असे देखील म्हटले जाते. उंच उंच टेकड्यांनी वेढलेले हे ठिकाण लेह पासून १५० किलोमीटर अंतरावर आहे. दुर्दैवाने फुल येण्याचा ऋतू नसल्यामुळे व्हॅलीचे निसर्गदर्शन होऊ शकले नाही. परंतु लांबच लांब पसरलेली वाळू, वाळूचे ढिगारे, निर्जन रस्ते, गोठविणारी थंडी,श्योक नदीचे विस्तीर्ण पात्र, वेगाने वाहणारे थंडगार वारे इत्यादींचा अनुभव घेता आला. नुब्रा व्हॅलीमध्ये राजस्थान मध्ये न दिसणारे पाठीवर दोन उंचवटे(कुबड्या) असलेले, अंगावर भरपूर केस असलेले उंट पाहायला मिळतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उंट सफारी, उंटाची शर्यत, विविध प्रकारचे मनोरंजन करणारे खेळ दाखवले जातात. खारदुंगला पास वरून नुब्रा व्हॅलीपर्यंत जाताना लांबच लांब निर्जन रस्ते, वेडी वाकडी वळणे, डोंगरदऱ्यांमधून जाताना साहसी प्रवासाचा अनुभव येतो. या भागात जरदाळूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.ही व्हॅली फुलांनी बहरलेली असताना येथे भेट देणे म्हणजे एक अविश्वसनीय अनुभव असतो. पृथ्वीवरील स्वर्ग असे या ठिकाणचे वर्णन स्थानिक लोक करतात. हिंदी चित्रपट भाग मिल्खा भाग या चित्रपटाचे काही शूटिंग येथे झाल्याचे स्थानिक लोकांनी सांगितले.रात्रीच्या मुक्कामाची सोय लोकवस्ती असलेल्या ठिकाणी झाली.
  नव्या दिवसाची सुरुवात नुब्रापासून तूर्तुकच्या प्रवासाने झाली. भारत आणि पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ भारतातील उत्तरेकडील सर्वात शेवटचे गाव तूर्तुक १९७२ या युद्धात भारतीय सैन्याने जिंकले होते. दोन देशांतील तणावामुळे २०१० पर्यंत येथे पर्यटकांना प्रवेश नव्हता. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि तेथील लष्कराची सुसज्जता डोळ्यांनी पाहता आली. फोटोशूट आणि प्रत्यक्ष दर्शन असे दिवसभर सुरूच होते. जवळच असलेल्या हंडर या गावात मुक्कामाची सोय होती.
  सकाळी लवकर उठून सूर्योदयाचा आनंद घेता आला. गाडी आता निघाली होती भारत आणि चीन या दोन देशांच्या मध्ये विभागला गेलेल्या प्यांगोंग लेककडे .१३४ किलोमीटर लांबीच्या लेकच्या पन्नास टक्के भागावर चीनचे नियंत्रण असून ४० टक्के भाग भारताच्या ताब्यात आहे. तर १० टक्के भाग आजही विवादित क्षेत्र म्हणून घोषित आहे. प्रचंड थंड असलेले या लेकचे पाणी खारट आहे. या लेकची खोली ३३० फूट आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे नौकाविहारास परवानगी नाही. लेक जवळ जाण्यासाठी इनर लाईन परवानगीची आवश्यकता असते. येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी फोटोशूट करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. थ्री इडियट या चित्रपटातील काही दृश्य येथे चित्रित केली गेली आहेत. लेकचे विस्तीर्ण पात्र, निळेशार पाणी, प्रचंड वेगाने वाहणारे गार वारे, चोहोबाजूंनी उंचच उंच डोंगरांनी वेढलेला परिसर, शांतता, स्वच्छता तन आणि मनाला आनंद देते. निचांकी तापमानामुळे सोबत असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त हॉटेलमधील उबदार पांघरून सुद्धा थंडीला रोखू शकत नव्हते ! लदाखच्या सफरीत सर्वात तीव्र थंडीचा अनुभव येथे आला. दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याचे मनोहारी दृश्य केवळ अविस्मरणीय ! पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या स्फटिकांनी गोठलेल्या लेक वर सूर्याची पिवळी धम्म कोवळी किरणे पडून साऱ्या आसमंताला एक वेगळीच लकाकी प्राप्त झाली होती. एखाद्या सुवर्णनगरीत आपण असल्याचा भास होतो. म्हणूनच या प्रदेशाला पृथ्वीवरील स्वर्ग म्हणत असावेत ! 
  लांबच लांब वेडी वाकडी वळणे घेणारे निर्जन रस्ते, अधून मधून दिसणाऱ्या लष्कराच्या छावण्या पार करत आम्ही प्यांगोंग् पासून लेहकडे प्रवासाला सुरुवात केली. दूर टेकडीवर खुरटे गवत खाणारे याकचे काही कळप नजरेस पडले. केसाळ मेंढ्या, शेळ्यांव्यतिरिक्त इतर प्राणी दिसले नाहीत. बर्फाचे वितळलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी दलदलीची जागा दिसून आली. तेथे काळे - पांढरे बगळे, करकोचे यांसारखे काही पक्षी दृष्टिक्षेपात आले. लष्करी छावण्यांच्या जवळपास विरळ झाडे आहेत. पर्यटन आणि काही प्रमाणात ड्रायफ्रूट विक्री करून येथील लोक उपजीविका करतात. प्रतिकूल हवामानात शेती करणे शक्य नाही. भाजीपाला किंवा खाद्यपदार्थ श्रीनगर किंवा जवळपासच्या प्रांतातून आयात करावी लागते. भारतीय लष्कर स्थानिक लोकांना दैनंदिन परिस्थितीत सहकार्य करताना दिसून येते. उत्तरेकडील वाळवंट असा उल्लेख या प्रदेशाचा केला जातो. येथील लोकांना प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागते. स्त्री आणि पुरुषांमध्ये जन्मतः काटकपणा आहे. शुद्ध हवा,यंत्रांचा कमीत कमी वापर, पायी प्रवास, नैसर्गिक आहार आणि विहार यामुळे या प्रदेशातील लोकांचे आयुर्मान तुलनेने जास्त आहे. 
    प्रचंड थंडीमुळे येथे रोजच्या जेवणात अंडी आणि मांसाहाराला प्राधान्यक्रम असतो. आमच्या सोबत असलेल्या निव्वळ शाकाहारी पर्यटकांची जेवणाची खूप आबाळ झाली. मांसाहारी जेवणाचे आणि मोहरीच्या तेलाचा उग्र वास नाकात भरून राहिल्याने सुरुवातीचे तीन दिवस अशा पर्यटकांना उपास घडला. उर्वरित दिवस नूडल्सवर विसंबून राहावे लागले.
   प्रवासाच्या अंतिम टप्प्यात असताना १७६८८ फूट उंचीवरील लडाख पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वतीय खिंड चांगलापास इथला अनुभव अविस्मरणीय होता. आतापर्यंत लडाखच्या प्रवासात अतिशय थंड हवा, निर्जन रस्ते, स्वच्छ सूर्यप्रकाश, शांत वाहणाऱ्या नद्यांची विस्तीर्ण पात्रे, उंच उंच डोंगर, वळणावळणाचे रस्ते इत्यादींचा अनुभव घेतला होता. चांगलापास जवळ अचानक बर्फवृष्टी सुरू झाली. निसर्गातील अचानक झालेला हा बदल आश्चर्यचकित करणारा होता. सर्वांनी बर्फवृष्टीचा मनमुराद आनंद लुटला. सोबत असलेल्या ड्रायव्हरला पुढील संकटाची जाणीव असल्याने इच्छा नसताना देखील बर्फवृष्टीला आणि आनंदाला अलविदा करावा लागला ! प्रवासात लेह जवळ तारे जमीन पर आणि थ्री इडियट या चित्रपटांत दाखविलेली शाळा व काही दृश्यांचा अनुभव घेता आला. प्रत्येक ठिकाणी यथेच्छ फोटोग्राफी केली. शेवटच्या दिवशी लेह मधील अत्याधुनिक हॉटेलमध्ये राहण्याची सोय होती. सहा दिवसानंतर प्रत्येकाला स्वतःच्या चवीप्रमाणे रात्रीचे जेवण करत आले. पुढल्या दिवशी पहाटे चार वाजता लेह विमानतळावरून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली मन मात्र रेंगाळत राहिले लडाखच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये ! निसर्गाच्या मनोहारी, शांत आणि रौद्ररूपाचा एकाच वेळी अनुभव घ्यावयाचा झाल्यास जीवनात एकदा लदाखला भेट दिलीच पाहिजे !

लेखन✍️✍️
शैलेश पाटोळे 
नाशिक 
  

Friday, July 26, 2024

कर्तव्यपूर्ती

कर्तव्यपूर्ती : सौ.श्रद्धा सतीश जोशी 

 अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे,"The only thing that you absolutely have to know is the location of the library."इतकं शालेय ग्रंथालयांचे महत्त्व विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवनात असते. ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे समाधान करण्याचं तंत्र जर ग्रंथपालांना अवगत असले तर अनेकांची पावलं आपोआप ग्रंथालयाकडे वळतात. मला वाटतं आपल्या पेठे विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ.श्रद्धा जोशी यांच्या दालनात म्हणूनच विद्यार्थी आणि फावल्या वेळात शिक्षकांचा घोळका कायम दिसून येत असतो. आज अचानक ग्रंथालय या विषयावर लेखन का...? पुढे वाचा..
  आपल्या पेठे विद्यालयातील ग्रंथपाल सौ श्रद्धा सतीश जोशी या दिनांक ३१ जुलै २९२४ रोजी शासकीय नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्ती ही अटळ आहे; परंतु दोन गोष्टींसाठी मनाला रुखरूख लागते. एक म्हणजे शासनाची नवीन पदभरती बाबत असलेल्या अनास्थेमुळे १ ऑगस्टपासून शंभर वर्षे जुने व अद्ययावत असलेले ग्रंथालय, शालेय वाचनालय ग्रंथपाल नसल्याने बंद राहणार ! दुसरी बाब म्हणजे विद्यार्थ्यांना वाचनानंद मिळावा,वाचनाचा संस्कार त्यांच्यावर व्हावा म्हणून तळमळीने झटणाऱ्या सौ. श्रद्धा जोशींसारख्या ग्रंथपाल सेवानिवृत्त झाल्याने एक अभ्यासू,ग्रंथालय शास्त्रातल्या जाणकार, मृदभाषी, शांत,संयमी व्यक्ती संस्थेतून जाणार ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे. अशा व्यक्ती संस्थेतून बाहेर पडणं ही खरे तर शाळा आणि संस्थेची मोठी हानी आहे. 
  काही लोक बोलून, गाजावाजा करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतात; परंतु सौ.श्रद्धा जोशींसारख्या व्यक्तींचे अस्तित्व त्यांच्या कृतीतून, कार्यातून सतत जाणवत राहते. त्यांचा स्वभाव- बोलणं- वागणं इत्यादींमुळे ग्रंथालयाचा दरवाजा उघडा दिसला की, पाय आपोआप तिकडे वळतात! 
  मा.कै.श्री. नाना नेऊरगावकर,श्रीमती शिंगणे,श्रीमती हेरकल ,इत्यादी वाचन आणि वाचकप्रिय ग्रंथपालांचा वारसा सौ.श्रद्धा जोशींनी चालवला. 
 अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून सौ.श्रद्धा जोशी १९९३ मध्ये संस्थेच्या टी.झेड.विद्यामंदिर भगूर येथे रुजू झाल्या. परंतु सहा महिन्यांतच संस्थेने त्यांची बदली माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे केली. त्यांच्या कामाची पद्धत, उरक, आवाका लक्षात घेऊन १९९५ मध्ये त्यांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून नियुक्त केले. पुढे २०१२ मध्ये आपल्या पेठे विद्यालयाच्या ग्रंथपाल पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शाळा कोणतीही असो आपले कर्तव्य त्या कधी विसरल्या नाहीत. 
   नाशिक जिल्ह्यात पोलीस खात्यात नोकरीला असणाऱ्या वडिलांच्या शिस्तशीर स्वभावाचा संस्कार त्यांच्यावर झाला असावा.चार बहिणी आणि एक भाऊ सर्व सुशिक्षित आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य बजावून सध्या सेवानिवृत्त झाले आहेत.सौ. जोशी यांचे पती श्री.सतीश जोशी प्रारंभी दैनिक देशदूत मध्ये अर्धवेळ कम्प्युटर जॉब वर्क करायचे.पुढे ते सोडून स्वतःचे पूर्णवेळ संगणक जॉबवर्क ते करत. त्यांनी देखील या कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.एक मुलगी आणि जावई असून ते परदेशात आहेत.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन श्री.व सौ.जोशी कुटुंबीयांनी आपला उत्कर्ष साधला आहे.कमवा आणि शिकाचा संस्कार त्यांच्यावर बालपणापासूनच झालेला असल्याने ग्रंथालयात आलेल्या विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधून,त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात.विशेषतः मुला-मुलींना त्यांच्याशी बोलावेसे वाटते !
  ग्रंथालयात येणाऱ्या वाचकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे समाधान करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे. त्यांच्या स्वभावातील नम्रता, संयम, चिकाटी या गुणांमुळे सौ. जोशींचे व्यक्तिमत्व सर्वांनाच भावते ! 
   वाचनालय, पुस्तके,तिथले वातावरण वाचनासाठी पूरक त्या ठेवतात. आहे त्या सुविधांचा पुरेपूर उपयोग त्यांनी ग्रंथालय नीटनेटके ठेवण्यासाठी करून घेतला. संगणकीय नोंदी देखील त्यांच्या कार्यकाळात करण्याचा त्यांनी कसोशीने प्रयत्न केला. त्यामुळेच सेवानिवृत्ती जवळ येत असताना कर्तव्यपूर्तीचा निर्भेळ आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत आहे.
   प्रतिवर्षी ग्रंथ खरेदी करताना त्यांच्यातील उत्तम ग्रंथपालाची चुणूक दिसून यायची. नवनवीन ग्रंथांची त्या निवड करीत.त्यासाठी शिक्षकांना आणि प्रसंगी विद्यार्थ्यांची आवड ही त्या लक्षात घेत. ग्रंथालय अद्ययावत ठेवत. मध्यंतरी एका वाचनालयातील भिंतीवर लिहिलेला सुविचार माझ्या वाचनात आला, तो असा ," BAD LIBRARIES BUILD COLLECTIONS, GOOD LIBRARIES BUILD SERVICES, GREAT LIBRARIES BUILD COMMUNITIES ! ",मला वाटते आपल्या पेठे विद्यालयाचे वाचनालय हे सौ.श्रद्धा जोशी यांच्यासारख्या ग्रंथपालांमुळे केवळ पुस्तकांचा संग्रह नक्कीच नाही! 
  राम कृष्णही आले गेले... अशा काव्याने आपण आपल्या मनाचे समाधान करून घ्यावे. काळ कोणासाठी थांबत नसतो, हेच खरे.....
   शांत, सुस्वाभावी,मृदूभाषी, संयमी, कर्तव्यनिष्ठ, ग्रंथालय शास्त्राच्या जाणकार, अशा आपल्या विद्यालयाच्या ग्रंथपाल सौ.श्रद्धा जोशी यांना सेवानिवृत्तीनंतर देखील उत्तम आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा! 

शैलेश पाटोळे 
पेठे विद्यालय,नाशिक
२७ जुलै २०२४

Wednesday, July 17, 2024

नंदू.. सबका बंधू

                    नंदू.. सबका बंधू !  
ज्या संस्थेत आपलं शिक्षण झालं ,बालपण गेलं आपलं पालनपोषण झालं अशा संस्थेची सेवा करून तिचं आपल्यावरील ऋण फेडण्याची संधी फार कमी लोकांना प्राप्त होते. सुदैवाने अशी संधी लाभलेले आपल्या संस्थेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री.नरेंद्र गंगाधर जवादे हे जुलै महिन्याच्या अखेरीस शासनाच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.खरंतर नरेंद्र म्हणून त्यांना कोणीच ओळखत नाही. जन्म दाखला आणि कागदोपत्री नोंदी पुरतेच हे नाव सीमित आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्यांना नंदू नावाने ओळखतात आणि समवयस्कांसाठी नाना !
  जवळपास सहा फूट उंची, व्यायामाने कमावलेले शरीर, अतिशय नीटनेटके, हाफ स्लिवहचे रंगीबेरंगी उठावदार शर्ट, पायात कायम बूट मग ते साधे का असेना ! वयाच्या साठीतही ताठ मानेने चालणारे नंदू जवादे सेवानिवृत्त होत आहेत, यावर विश्वास बसत नाही.
  मी पेठेत सेवेला प्रारंभ केला तेव्हा त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाने, नम्र स्वभावाने आणि कार्य तत्परतेने मला आकर्षित केले. सहवासाने आणि अनुभवाने शिक्षक आणि कर्मचारी हा भेद गळून पडला. त्या काळातील आम्ही स्टाफ रूम मधील सर्व शिक्षक शिक्षिका त्याला विनोदाने नंदू ....सबका बंधू असे म्हणत असू. दरम्यान त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षक म्हणून मिरवण्याचा योग आला. नंदू जवादे माझ्यासारख्या शिक्षकांसाठी नाना कधी झाले, हे कळले नाही! 
  नंदूचे वडील श्री.गंगाधर जवादे हे नाशिक मधील प्रख्यात वकील श्री.बाबुराव नाडकर्णी यांच्या सेवेत होते. वकिलीच्या निमित्ताने त्यांना बऱ्याचदा मुंबईला राहावे लागत असे. ॲड.नाडकर्णी त्यांच्या प्रामाणिकपणावर बेहद खुश होते. पुढे नाशिकला आल्यावर नाडकर्णी वकिलांच्या मध्यस्थीमुळे फावडे गल्लीतील त्याकाळी असलेल्या भिकुसा विडीच्या कारखान्यात मॅनेजर म्हणून काम मिळाले. जवादे कुटुंबीयांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. दरम्यान आई सौ.रुक्मिणीबाई या नाशिक शहरातील नामवंत शिक्षक श्री. वसंतराव व सौ.लीलाताई ठकार यांच्या बंगल्यावर काम करीत असत. नम्र आणि प्रामाणिक काम करणाऱ्या रुक्मिणीबाईंवर ठकार कुटुंबीयांचा खास लोभ जडला. श्री.वसंतराव ठकार सरांच्या आशीर्वादाने पुढे सौ.रुक्मिणीबाईंना नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या राजेबहादूर वाड्यात भरणाऱ्या प्रा.शि.मंदिर शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली. पुढे मुलींसाठी शारदा मंदिर ही स्वतंत्र शाळा सुरू झाल्यावर रुक्मिणीबाई तेथे रुजू झाल्या.तेथे श्रीमती परांजपे भगिनींच्या हाताखाली काम करताना शाळेतल्या मुलींशी सेवाभावाने त्या जोडल्या गेल्या. लहानगा नरेंद्र आईचा पदर धरून शाळेत तिच्या अवतीभवती फिरत असे. पुढे थोडा मोठा झाल्यानंतर नरेंद्रला शाळेतील छोटी मोठी कामे करण्यात रस वाटू लागला. 
  नरेंद्रचे शालेय शिक्षण राजे बहादूर वाड्यातील प्रा.शि. मंदिर आणि माध्यमिक शिक्षण पेठे विद्यालयात झाले. तेथे संस्कारांचे बाळकडू मिळाले. शाळेतल्या फडके बाई, धारपुरे सर, बुरकुले सर, गुप्ते सर,साठ्ये सर यांच्या वर्गात बसण्याचा योग आला. परिस्थितीमुळे आठवी नंतर नंदूला मामाकडे मुंबईला जावे लागले. शिक्षणात खंड पडला. तेथे अर्धशिक्षित नंदूला सुपर स्टोव्ह या कंपनीत काम मिळाले. परंतु तेथे त्याचे मन फारसे रमले नाही. नाशिकला परत आल्यावर एका गॅरेजमध्ये त्याला काम मिळाले. अनुभवी कारागिरांच्या हाताखाली गाड्यांची दुरुस्ती, पेंटिंग, वेल्डिंगची कामे तसेच सुतारकाम तो शिकला. आई-वडिलांचा कष्टाळूपणाचा गुण त्याच्यात उपजतच होता. तेथेही अल्पावधीतच मालकाचा विश्वास त्याने संपादन केला. 
  दरम्यान गॅरेज मालकांनी वर्तमानपत्रात आलेली नासिक एज्युकेशन सोसायटीची शिपाई पदाची जाहिरात दाखवून अर्ज करायला सांगितला. धडधाकट शरीरयष्टी, कामातला अनुभव, आणि माजी विद्यार्थी असल्याने नंदूची शिपाई म्हणून नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक झाली. तेथे मुख्याध्यापक श्री.एस के कुलकर्णी आणि उपमुख्याध्यापक म.पु.पंडित यांनी त्याला कामाचे स्वरूप समजावून दिले आणि रात्रपाळीची जबाबदारी दिली. प्रामाणिकपणे नंदू काम करत राहिला. तेथे डांगळे नावाचे वरिष्ठ चतुर्थश्रेणी कर्मचारी कार्यरत होते. नुकताच नोकरीत लागलेल्या नंदू कडून तो त्याच्या वाट्याचे काम करून घेत असे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही त्याला बऱ्याचदा ड्युटी करावी लागत होती.याच काळात नंदूचे लग्न ठरले. रीतसर सुट्टीसाठी त्याने मुख्याध्यापकांकडे अर्ज केला; परंतु शिस्तीचे भोक्ते असलेल्या मुख्याध्यापकांनी नोकरीची नवीनच सुरुवात असल्याने जास्त दिवस सुट्टी देता येणार नाही,असे सांगून केवळ लग्नाच्या दिवसाची सुट्टी मंजूर केली! 
  लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाला हळदीसाठी जाणे भाग होते. काय करावे...? असा प्रश्न त्याच्यापुढे पडला. अशावेळी श्री.डांगळे यांनी," मी तुझ्या ऐवजी शाळेत रात्रपाळीची ड्युटी करीन.तू चार वाजता शाळेतून निघून जा,"असे सांगितले. लग्न झाल्यानंतर नंदू दुसऱ्या दिवशी शाळेत रुजू होण्यासाठी गेला. काय झाले असेल..? विचार करा... डांगळे रात्रपाळीला गेलाच नाही! सबब.. नंदू ड्युटी सोडून न विचारता निघून गेला म्हणून मुख्याध्यापकांनी त्यास रुजू करून घेतले नाही. पुढे दोन-तीन महिने घरी बसावे लागले. अर्ज विनंती केल्यावर,आईच्या कृपेने नंदूला संस्था कार्यालयात काम मिळाले. नोकरीतला हा अनुभव त्याला खूप काही शिकवून गेला. एखाद्याची फसवणूक केल्यास किती वाईट प्रसंग निर्माण होऊ शकतो, याची त्याला जाणीव झाली. पुढे काही काळ रंगुबाई जुन्नरे शाळेत त्याने मानधनावर सेवा केली. 
आतापर्यंत केलेले काम, प्रामाणिकपणा, नम्रता इत्यादींमुळे त्याचे नशीब फळफळले ! १९९२ मध्ये झालेल्या कर्मचारी भरतीत शासनमान्य शिपाई म्हणून ज्या शाळेत नंदू शिकला, खेळला, बागडला त्या पेठेत शिपाई म्हणून रुजू झाला. तेथे सलग वीस वर्षे सेवा करून पुढे सी.डी.ओ. मेरी नंतर माध्यमिक विद्यालय उंटवाडी आणि पुन्हा सीडीओ मेरी हायस्कूल असा नोकरीतला प्रवास करून नंदू आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. 
  पेठेत रुजू झाल्यावर पहिल्याच दिवशी आणखी एक वाईट अनुभव आला.जो नोकरीत तत्पर आणि दक्ष राहण्याची किती आवश्यकता आहे, हे शिकवून गेला. शाळेत एका खांबाला अडकवलेला लाऊड स्पीकर चोरीला गेला होता. कडक शिस्तीच्या श्री.का.विं जोशी सरांनी शिपायांना पटांगणात उभे करून प्रत्येकाची कान उघाडणी केली. स्पीकर परत मिळवून द्या.नाहीतर पैशांची वर्गणी करून नवीन स्पीकर आणून द्या... असे फर्मान काढले. नोकरीचा पहिलाच दिवस असलेला नंदू... वर्गणीचे पैसे कुठून देणार? कसेतरी ते निभावून नेले. वसंतराव कुलकर्णी, नाना नाईक, विठ्ठलराव पठाडे,मधुकर ब्राह्मणकर, रामभाऊ जोशी इत्यादी विविध कामांत तरबेज असलेले कर्मचारी त्याकाळी पेठेत होते. संस्कारशील शिक्षक आणि शाळा म्हणून पेठेचालौकिक भरास होता. पेठेत नोकरी म्हणजे समाजात कौतुकाचा विषय होता! बालपणापासून उत्तम शिक्षक आणि नोकरीच्या काळात उत्तम पदाधिकारी व सहकारी कर्मचारी लाभले म्हणून व्यसनाची हवा नंदूला लागली नाही! अर्थात आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबासाठीची त्यांची ओढाताण त्याने प्रत्यक्ष अनुभवली होती. आपण वाईट वागलो तर आई-वडिलांनी मिळवलेले प्रतिष्ठा धुळीस मिळेल याची त्याला जाणीव होती.
 हो...पण एक व्यसन मात्र त्याला होते. कोणते...? थांबा सांगतो.. शाळेत असताना साठये सरांचा तास नंदूचा अत्यंत आवडीचा. SOUND MIND IN A SOUND BODY सुविचार साठये सर पोट तिडकीने सांगायचे. या विचारांनी तो प्रेरित झाला. शरीर निरोगी ठेवायचे तर व्यायाम महत्त्वाचा ; परंतु व्यायामशाळेत परिस्थितीमुळे जाणे शक्य नव्हते. गंगेवर टाळकुटेश्वर मंदिरासमोरच्या पटांगणात इतर मुलांबरोबर अनेक देशी व्यायाम प्रकार तो शिकला.शरीर पिळदार बनवले.अगदी अलीकडे, म्हणजे आजोबा होईपर्यंत नंदू नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ व्यायाम करीत असे. तुम्ही म्हणाल शरीर पिळदार बनवून फायदा काय झाला..? शिपाईच राहिला ना..? हो, नंदू शिपाईच राहिला ! पण वयाच्या साठीत पदार्पण करीपर्यंत सर्वत्र आढळणाऱ्या शुगर.. डायबिटीस, बी.पी. इत्यादी व्याधी त्याच्या अवतीभोवती देखील फिरकल्या नाहीत ! आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल.. थोडी आर्थिक गणितं जुळवून नंदू ने जुन्या नाशकातलं आपलं विऱ्हाड मेरी परिसरात एका फ्लॅटमध्ये टाकलं. दरम्यानच्या काळात त्याची माध्यमिक विद्यालय उंटवाडी बदली झाली. घरी पोहोचेपर्यंत उशीर होत असल्याने त्याला व्यायामासाठी वेळ देता येत नव्हता. त्यावर उपाय म्हणून शाळा सुटल्यानंतर सिडको ते मेरी हे अंतर तो पायी जात असे! आता याला तुम्ही काय म्हणाल? व्यायामाची व्यसन की वेडेपणा...!
  सेवानिवृत्त होण्याच्या आतच नंदूने त्याच्यावरील सर्व सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. त्याची पत्नी सौ. चित्रा या तितक्याच कष्टाळू आणि सोशिक आहेत.मुलगी आणि दोन्ही मुलांची लग्न झाली असून नातवंड- पतवंड असलेला त्याचा सुखी संसार आहे. या अर्थाने नंदू खरोखरच नशीबवान आहे! 
 शाळेतल्या सर्व घटकांशी त्याचे अगदी सलोख्याचे संबंध. संस्था, शाळा, शिक्षकांबद्दल, वरिष्ठांबद्दल नितांत आदर त्याच्या मनात ठासून भरलेला आहे. एक प्रामाणिक, नम्र, विश्वासू कर्मचारी म्हणून नंदू सर्वांच्या हृदयात स्थान मिळवू शकला! शाळेच्या कोणत्याही कामाला त्याने कधीही नकार दिला किंवा कुरकुर केलेली ऐकिवात नाही. दोन पिढ्यांपासून मिळवलेला विश्वास नंदूने कायम टिकून ठेवला आहे. 
प्रत्येकासाठी धावपळ करणारा, सर्वांशी प्रेमळपणे वागणारा नंदू.. सबका बंधू असाच राहिला! 
 कर्तव्य आणि कर्मालाच भक्ति मानणारा श्री.नरेंद्र तथा नंदू जवादे यांचं आयुष्य सेवानिवृत्तीनंतरही आनंदोत्सवांनी भरून राहो,ह्याच सदिच्छा ! 

✍️✍️✍️
शैलेश पाटोळे 
पेठे विद्यालय, नाशिक 
२७ जुलै २०२४
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Thursday, June 13, 2024

अखंडित वाचीत जावे

ll अखंडित वाचीत जावे ll 

लाख मोलाचा जावई आणि इतर कथा
लेखक: रवींद्र गुर्जर
कथासंग्रह (अनुवादीत)
प्रकाशक: गायत्री साहित्य प्रकाशन,पुणे
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
नमस्कार,
 " शीलं सद्गुणसंपत्ती ज्ञानंविज्ञानमेवच l
   उत्साहो वर्धते येन वाचनं तद्हितावहम "
अर्थात, जाने चारित्र्य,चांगल्या गुणांची संपत्ती, ज्ञान, विशेष ज्ञान आणि उत्साह वाढतो ते वाचन हितकारकच असते. उत्तम पुस्तकांच्या वाचनाने याची प्रचिती कायम येते.
  मराठी साहित्य वर्तुळात अनुवादक म्हणून प्रसिद्धीस पावलेले रवींद्र गुर्जर एक यशस्वी लेखक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ते ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृती याकरिता ओळखले जातात.अनेक कार्यशाळा आणि मार्गदर्शनपर व्याख्यानांतून त्यांनी वाचन चळवळ सुरू ठेवली आहे. आज पावतो जवळपास ४० हून अधिक अनुवादित पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत. हेन्री श्यारियार यांचं बहुचर्चित पॅॅपीलॉन हे त्यांचे वाचकप्रिय अनुवादित पुस्तक म्हणून पहिलं अपत्य म्हणता येईल. त्यानंतर गॉडफादर ,चार्ली चॅप्लिन ,सेकंड लेडी, सिसिलियन, द स्पाय हू केम फ्रॉम द कोल्ड, अकल्पिता, इत्यादी अशी कितीतरी अनुवादित आणि इतरही ग्रंथसंपदा त्यांच्या सिद्ध हस्तलेखनीतून प्रकटली असून चोखंदळ वाचकांची तृष्णा ते भागवत आहेत. पुस्तक हा विषय घेऊन भारत आणि भारताबाहेरही वयाची पंचाहत्तरी उलटलेला हा तरुण सातत्याने भ्रमण करीत असतो. " पुस्तक प्रेमी मनुष्य अत्यंत श्रीमंत आणि सुखी असतो,"असे म्हणतात. गुर्जर त्या अर्थाने अतिशय श्रीमंत आणि सुखी आहेत! 
  नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. नेहमीप्रमाणे गप्पा टप्पा झाल्यानंतर शबनम मधून आकर्षक मुखपृष्ठ असलेले एक पुस्तक खास भेट म्हणून त्यांनी मला दिले. नुकतंच त्यांच्या " लाख मोलाचा जावई आणि इतर कथा " या पुस्तकाचं प्रकाशन गायत्री साहित्य प्रकाशन संस्थेने केले.
  लाख मोलाचा जावई आणि इतर कथा या कथासंग्रहात १६ कथांचा समावेश असून जगभरातील विशेषतः पाश्चिमात्य देशांतील नामवंत कथा लेखकांच्या कथांचा अनुवाद वाचायला मिळतो. ओ हेन्री, मार्क ट्वेन, स्टीफन लीकॉक, साकी, गी द मोपासा याबरोबरच तीन कथा स्वतः रवींद्र गुर्जरांच्या आहेत.
  या कथांतून जगभरातील नामवंत कथा लेखकांच्या कथालेखनाच्या तंत्राची ओळख होते.कथेतील पात्र, वातावरण,संवाद, साधारणपणे एकोणिसाव्या शतकातील आहेत. अनुवाद असूनही वर्णन- कथन कृत्रिम वाटत नाही. कथारूप दृश्य वाचकांच्या डोळ्यापुढे उभे करण्याचे श्रेय जसं मूळ लेखकाचं तसं ते अनुवादक म्हणून गुर्जरांना देखील आहे.
  " दोन ध्रुवांवर दोघे," "नवरदेवाला लग्नाचे निमंत्रण " "कन्या सासराशी जाय"," शिळ्या पावाचा अनर्थ, " यशाचा रस्ता", या कथा विल्यम सिडनी पोर्टर उर्फ ओ हेन्री या प्रख्यात अमेरिकन लेखकाच्या मूळ कथांवर आधारित आहेत. पात्रांच्या अंगी असलेलं बुद्धी चातुर्य आणि धक्का तंत्राचा वापर करत अनपेक्षित शेवट हे त्यांच्या कथेचं खास वैशिष्ट्य या कथांतून अनुभवास येते. प्रेम आणि लग्न याचा वय आणि कर्तृत्वाशी कसा संबंध असतो, याचं तत्त्वज्ञान "दोन ध्रुवांवर दोघे" या कथेत लेखकाने मांडले आहे." नवरदेवाला लग्नाचे निमंत्रण", या कथेत ,"तरुणपणच्या आणि म्हातारपणाच्या दुःखात हाच फरक असतो की, तरुण असताना दुःख इतरांशी वाटलं की कमी होत जातं. म्हातारपणी ते कितीही वाटलं तरी आहे तसंच राहतं,"हे वाक्य वाचकांना विचारप्रवण करते. " शिळ्या पावाचा अनर्थ," मध्ये प्रेम व्यक्त न करता आलेल्या मिस मार्था मीच्याम हिची कथा वाचताना तिला वाचकांची सहानुभूती मिळते.
  आधुनिक लघुकथेचे जनक म्हणून ख्यातीप्राप्त असलेले फ्रेंच साहित्यिक गी द मोपासा यांच्या कथांवर बेतलेल्या "नकली हिरे", "पेचप्रसंग "आणि " मृत्यूशय्येवरील स्त्रीचे रहस्य " या कथा वाचनीय आहेत.
आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या नवऱ्याशी संसार करताना सुंदर असूनही जुळवून घेणाऱ्या स्त्रीची कथा तिच्या मृत्यूनंतर वेगळेच वळण घेते. श्रीमंती- समाधान यांतील फरक लेखकाने "नकली हिरे" या कथेतून अधोरेखित केले आहे. कथेत शेवटी येणारा ट्विस्ट या कथेचं खास वैशिष्ट्य म्हणता येईल. अगदी अशाच स्वरूपाची मृत्यूशय्येवर निद्रा घेत पडलेल्या स्त्रीची अन् तिच्या तरुण मुला- मुलीची कथा आहे. आपल्या मुलांवर अतिशय कडक नीती मूल्यांचे संस्कार करणाऱ्या स्त्रीबद्दल कथेचा शेवट वाचकांना धक्का देतो. " पेचप्रसंग " मधून एका बाहेरख्याली सरदारापुढे त्याच्या पत्नीने ठेवलेल्या पर्यायांमुळे निर्माण झालेले नाट्य वाचकांना भावते. कौटुंबिक नातेसंबंधात परिस्थिती, स्वभाव इत्यादी कारणांमुळे निर्माण झालेला ताणतणाव या कथांतून वाचायला मिळतो.
 " टॉम सायरची साहसं " साठी जगप्रसिद्ध असलेले अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांच्या कथेचा अनुवाद असलेली " व्हीनसचा प्राचीन पुतळा", ही कथा मात्र जुने संदर्भ ठाऊक नसणाऱ्या वाचकांसाठी अनाकलनीय वाटू शकते.
  लुईझा मे अल्कोट या स्त्रीवादी व संस्कारक्षम कथा लेखनासाठी प्रसिद्ध अमेरिकन लेखिकेच्या कथेवर आधारित " नववर्षाची मेजवानी " ही कथा सणसमारंभ कुटुंबात कसे साजरे व्हावे, समाजाप्रती संवेदनशीलता, संस्कारांची देवाण-घेवाण यांसारख्या मूल्यांवर बेतलेली आहे." केवळ सहानुभूती नको.. कृती महत्त्वाची" हे तत्व ही कथा मांडते.मार्क ट्वेन यांच्या, "स्वतः आनंदी राहण्याची उत्तम पद्धत म्हणजे दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे," या विचाराची प्रचिती या कथेतून येते.
  मूळ शिक्षक असलेले कॅनडियन लेखक स्टीफन लि कॉक विनोदी- उपहासात्मक लेखनासाठी प्रसिद्ध आहेत." माझ्या बचतीची कारकीर्द ",ही कथा स्टीफन लीकॉक यांच्या मूळ कथेचा अनुवाद आहे. गोंधळलेल्या एका सामान्य माणसाची ही कथा काहीशा विनोदी थाटात अवतरली आहे.
  आयझॅक असिमोव्ह हे अमेरिकन प्राध्यापक विज्ञान कथा लेखक म्हणून साहित्य जगताला परिचित आहेत. १९४०-५० च्या दशकांत त्यांनी रोबोट आणि मानवी जीवनातील त्याचा वापर यावर कथात्मक लेखन केलेले दिसून येते.त्यांच्या कथेवर आधारित "सहवास सुखाचा ", ही कथा बेतलेली आहे.कथानक वाचताना रोबोट या रजनीकांत आणि ऐश्वर्या राय अभिनित दाक्षिणात्य चित्रपटाची आठवण होते. अर्थात मूळ कथा १९४०-५० च्या दशकांत लिहिली गेली आहे,हे खास करून नमूद करतो.
  " पाहुण्यांचा महापूर ", ही एक विनोदी- विडंबन करणारी कथा या संग्रहात असून ब्रिटिश लेखक साकी यांच्या मूळ कथेवर आधारित आहे. साकी.. आणि ब्रिटिश लेखक असे वाचून कदाचित काही वाचकांना संभ्रम निर्माण होऊ शकतो. परंतु हेक्टर ह्यू मूनरो हे त्यांचे मूळ नाव असून त्यांचा साहित्यिक काळ तत्कालीन ब्रिटिश ब्रह्मदेशात गेल्याने त्यांनी साकी या टोपण नावाने लेखन केले असावे,असा प्राथमिक अंदाज वाटतो.
  उर्वरित कथा स्वतः रवींद्र गुर्जर यांच्या आहेत. त्या सर्व कथा आताच्या काळाशी सुसंगत वाटतात. "आमिष" , ही कथा लोभापाई झालेल्या आर्थिक फसवणुकीची आहे. " चोरावर मोर ", या कथेच्या शेवटी लेखकाने धक्का तंत्राचा वापर केला आहे. तरुण चोराला अनुभवी चोर कसा ठकवतो, हे या कथेत वाचायला मिळते. " लाख मोलाचा जावई ", ही शीर्षककथा वाचकांचे पुरेपूर मनोरंजन करते. बेरोजगार तरुण आपल्या भावी सासऱ्याला व्यवसायाच्या वेगवेगळ्या कल्पना सुचवून आपलंसं करू पाहतो. तर अनुभवी यशस्वी उद्योजक असलेले सासरे त्याची कशी परीक्षा घेतात.. हे वाचून वाचकांना स्वानुभूतीचा आनंद मिळतो. एक मनोरंजक नाट्य असे या कथेचे वर्णन करता येईल.
  लघुकथेची सारी वैशिष्ट्य या संग्रहातील कथांतून दिसून येतात. त्या अर्थाने हा लघुकथा संग्रह आहे.मूळ लेखक आणि अनुवादक दोघांच्याही कौशल्यामुळे कथा, वातावरण, पात्र,प्रसंग, संवाद वाचकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. कथांतून संस्कार, अनुभूती, नीतीमूल्ये, विनोद - मनोरंजन होते.जागतिक कथा सागरातून अनमोल मोती रवींद्र गुर्जरांनी आपल्या साहित्यिक प्रगल्भतेने निवडून लाखमोलाच्या कथांचा हा खजिना वाचकांसमोर पुस्तकाच्या माध्यमातून खुला केला आहे ! 
" लाख मोलाचा जावई आणि इतर कथा", हा रवींद्र गुर्जरांचा कथासंग्रह त्यांच्या इतर पुस्तकांसारखाच वाचनीय आहे,यात शंका नाही.

लेखन
शैलेश पाटोळे
नाशिक

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...