Wednesday, April 21, 2021

जागतिक वसुंधरा दिन

                 ॥दिनविशेष॥

   

नमस्कार
 कसे आहात? पुन्हा तोच प्रश्न ! मग विचारणार तरी काय !! आपण सर्वजण आनंदात असाल हीच अपेक्षा. 
    रोज नवनवीन आणि नकारात्मक यातनादायी अशा बातम्या कानावर पडत आहेत. ठीक आहे.. दुःखद घटनांचे यातना दायी ढग लवकरच वाहत जाऊन सुखाची प्रभात येईल !
   त्यासाठी बातो बातो मे चित्रपटातील सुंदर असे गाणे सुचवतो. ते जरूर ऐका..
  कहा तक ये मन को,
              अंधेरे छलेंगे,
  उदासी भरे दिन 
            कभी तो ढलेंगे,
कभी सुख कभी दुःख
          यही जिंदगी है
यह पतझड का मौसम 
          घडी दो घडी है...
चला तर मग गाणं ऐकून सकारात्मक ऊर्जा निर्माण करूया.
    पण यानिमित्ताने एका गोष्टीची आपल्याला जाणीव होणे नितांत गरजेचे आहे. जे घडतं आहे, त्याला कारणं वेगवेगळी असली,तरी त्या कारणांच मूळ मानवाच्या पर्यावरणाशी आणि आपल्या भूमातेशी केलेल्या प्रतारनेत दिसून येते. आज जागतिक वसुंधरा दिन आहे त्यानिमित्ताने थोडं हितगुज करावेसे वाटते म्हणून...
     जगण्यासाठीची अनुकूलता फक्त पृथ्वीवर आहे. अन्यत्र कुठेही नाही. ही पृथ्वीची अनन्यता आहे. अनंत विश्वातला पृथ्वी हा एक मोठा अजुबा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांना आपण निसर्ग म्हणतो. 
 आपल्या सात अजुब्यांचं मानवाला मोठं कौतुक वाटतं. पण पंचमहाभूत नामक निसर्गाच्या पाच अजुब्यांपुढे ती फिकी आहेत.
  जल नामक महाभूत तर विश्वनिर्मात्याने फक्त आपल्या लाडक्या लेकीला म्हणजे वसुंधरेलाच आंदण दिले आहे. जलामुळेच तर ती बहुप्रसवा बनली. जैवविविधतेचा हा विस्मयकारी पसारा प्रसवू शकली. विश्वनिर्मात्याची विश्वातील सर्वात समृद्ध प्रयोगशाळा बनू शकली.
       गदिमा विधात्याला वेडा कुंभार म्हणतात. तर गीतकार पं. भरत व्यास त्याला चित्रकार संबोधतात. पृथ्वी हा जणू त्याच्या मूर्त चित्रकारीसाठीचा विशाल कॅनव्हासच! त्यावरच्या चित्रकारीचं त्यांनी खालील गीतात किती सुंदर वर्णन केलं आहे...
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन,
के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा है पवन।
दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी,
ये किसने फूल फूलपे किया सिंगार है?
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार!
      महामानव, संत, कलावंत, कवी जन्मले ते या वसुंधरेच्या कुशीतच. सुंदर साहित्य, कला, संगीत, नाट्य, शिल्प, स्थापत्य यांचा विलोभनीय मानवीय आविष्कार या भूतलावरच प्रकटला. तेव्हा या भूतलावर जन्माला येण्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं.
    अन्नपाणी, औषधं, खनीजं, धातू इत्यादी गोष्टींची पिढ्यानपिढ्या पुरेल एवढी शिदोरी तिने आपल्या उदरात सामावून ठेवली आहे. पण मानवाच्या अतिरेकी संचयवृत्तीमुळे असंख्य लोकांना अभावग्रस्ताचं जीणं जगणे भाग पडत आहे.
    तर स्वार्थी लोकांनी जंगल, खनिजं, जल ही तिची आभूषणं ओरबडून तिला कुरुप बनविले आहे. मानवाच्या हव्यासापायी पंचमहाभूतांचा समतोल बिघडून अवर्षण, अतिवृष्टी, तापमानवृद्धी, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींचा मानवाला नित्य सामना करावा लागत आहे. विनाशकारी प्रदुषणामुळे जीवसृष्टीला गंभीर धोका तर मानवानेच निर्माण केला आहे.
     पृथ्वीवर जीवसृष्टीच्या उदय-विकासासाठीची अनुकूल परिस्थिती ही काही मानवाने निर्माण केलेली नाही. ती निसर्गाने निर्माण केलेली आहे. मानवाकडून अपेक्षा एकच होती की, जीवसृष्टीचा हा अनमोल ठेवा अनादिकाल टिकावा, यासाठी 'जगा आणि जगू द्या' असं पूरक वातावरण तयार करणे. दुर्दैवाने माणसाने त्या अपेक्षेलाच काळं फासलं आहे. जगा नि जगू द्या या ऐवजी, 'बळी तो कान पिळी' हे प्राणीसृष्टीचं तत्त्वच जणू त्याने, बोधवाक्य म्हणून अंगीकारलं आहे. गीतकार शैलेंद्र यांच्या शब्दात सांगायचं तर... 
     दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई,
काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई?
   असा पश्चाताप जगन्नियंता परमेश्वराला होण्याच्या आधीच आपण मानव सुधारणार आहोत का?
  काळजी घ्या l घरी रहा l स्वस्थ रहा ll
 सध्या या नियमाचे पालन करा !🌻🌻🌻

आपला
शैलेश पाटोळे
नाशिक
  ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

Saturday, April 17, 2021

सकारात्मक विचार

सुप्रभात,
कसे आहात? काळजी घ्या ! असे आपुलकीचे शब्द देखील सध्याच्या काळात बोथट झाल्यासारखे वाटतात. खरं आहे की नाही? रोज एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करणारे आपण सर्व आभासी पद्धतीने, भले ती कृत्रिम का असेना विचारपूस करीत असतो. परंतु परिस्थिती चे गांभीर्य ओळखून, आहे त्यात समाधान मानणे हे आताच्या काळात योग्य आहे ,असे मला वाटते. घराच्या चार भिंतीत आपलं जग सीमित झालं आहे. परंतु लक्षात घ्या सर्व गोष्टींवर काळ हे उत्तम औषध आहे. गोलमाल चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं हे अर्थपूर्ण व सुमधुर गीत आपल्याला बरंच काही सांगून जातं !
   आने वाला पल जाने वाला है
   हो सके तो इस में ज़िंदगी बिता दो
   पल जो ये जाने वाला है l
       एक बार यूँ मिली, मासूम सी कली  
       खिलते हुए कहा खुश पाश मैं चली
       देखा तो यहीं हैं ढूँढा तो नहीं हैं
       पल जो ये जाने वाला हैं l
       ओ हो आने वाला पल जाने वाला हैं
       हो सके तो इस में, ज़िंदगी बिता दो
       पल जो ये जाने वाला हैं l
एक लक्षात ठेवा परिस्थिती बदलत असते. मग ती चांगली असो किंवा वाईट. दोन्ही परिस्थितीत स्वतःचे शारीरिक-मानसिक स्वास्थ्य टिकवणे आपल्या हातात आहे.
   आताच्या आपत्कालीन परिस्थितीत चिंता करण्यापेक्षा काळजी घेणे जास्त आवश्यक आहे. बेफिकिरीने न वागता, उसने अवसान न आणता काळजीपूर्वक पाऊल उचलणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
     आपल्या भावनांना वाट करून द्या. आप्तस्वकीय यांच्याशी फोनवर संभाषण करा. मित्रमैत्रिणींशी गप्पा करा. कधीकाळी आपल्यामुळे दुखावल्या गेलेल्यांची अगत्याने चौकशी करा. त्यातून आपल्याला आनंद तर मिळतोच, त्यापेक्षा दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ शकतो. चला तर मग सकारात्मकतेने आपल्याबरोबर इतरांचे जगणे ही सुकर करू या ! आनंद निर्माण करूया !!
   थांबा, एक गोष्ट सांगतो ....!
           जंगलात जेव्हा वणवा पेटतो. तेव्हा सगळे प्राणी सैरावैरा पळायला लागतात. सगळीकडे नुसती पळापळ चालू असते. त्यामध्ये सगळ्यात चपळ प्राणी वाघ, सिंह , चित्ता, माकड, इ. चपळ प्राणी वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतात. परंतु ,वणवा मात्र कुणालाच सोडत नाही. संपूर्ण जंगल भस्मसात करून सोडतो. सर्व प्राणी जळून खाक होतात. पण तुम्हाला माहीत आहे. त्याच जंगलात असा एक प्राणी आहे ,ज्याला वनव्याचा अजिबात फरक पडत नाही. त्याला जराही ईजा होत नाही. डोकं चक्रावले ना ! तर होय, त्याच जंगलात असा पण एक प्राणी आहे. ज्याला जंगलातील वनव्याचा काहीही फरक पडत नाही.आणि तो प्राणी म्हणजे उंदीर होय ! कारण जेव्हा वणवा पेटतो तेव्हा तो त्याच्या घरात म्हणजे बिळात असतो. म्हणून त्याला जराही ईजा होत नाही.
   मित्रहो,कोरोनारुपी वणवा सध्या आपल्या मानवी जंगलात पेटला आहे. तर आपल्याला वाघ होऊन काही फायदा नाही. त्यापेक्षा उंदीर व्हा आणि आपल्या(बिळात) घरात रहा. स्वतःला आणि आपल्या परिवाराला, आपल्या समाजाला, आपल्या राष्ट्राला सुरक्षित ठेवा.
धन्यवाद

आपला
शैलेश पाटोळे
नाशिक.
१८ एप्रिल २०२१
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

जागतिक पुस्तक दिन : २३ एप्रिल

     ✍️जागतिक पुस्तक दिन: २३ एप्रिल✍️ज्ञान की यह खान हैं
 होती बहुत महान हैं
जीवन इंसान का बदले 
तभी तो इसकी शान हैं
                   क्या बीता ?क्या होता है?
                   सब का इसमे हिसाब हैं
                   जिंदगी में सबसे अच्छा दोस्त
                    कोई और नही किताब हैं ll
 कबीर के दोहे हैं इसमे
 संतो की इसमे वाणी हैं 
 पढ कर लाभ ही होता हैं 
 होती न कोई भी हानी हैं ll
                        कोई ऐसा प्रश्न नही 
                        जिस का न इसमे जवाब हैं 
                       जिंदगी में सबसे अच्छा दोस्त 
                        कोई और नही किताब हैं ll
 मंजिल पर जो पहुंचाती हैं
 वही तो ये राह हैं 
 हर जिज्ञासू के मन में
 इसको पाने की चाह हैंll 
                      ये तो वो सागर है जिसमे 
                      भरा ज्ञानमय आब हैं
                    जिंदगी मे सबसे अच्छा दोस्त
                     कोई और नही किताब हैं ll
        वरील कवितेत कवीने पुस्तकांचे आपल्या जीवनातील स्थान चपखलपणे वर्णन केलेले आहे.२३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने हे हितगुज !
     मित्रांनो, जागतिक पुस्तक दिन का साजरा केला जातो? हा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्वांच्या मनात निर्माण होऊ शकतो. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक तसेच पुस्तकांचा सन्मान करणे, हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मग यासाठी २३ एप्रिल हाच दिवस का? साहित्यक्षेत्रातील मापदंड ठरलेले जगद्विख्यात लेखक ,नाटककार ,साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिवस २३ एप्रिल (१५६४)आणि मृत्युदिन देखील २३एप्रिल(१६१६), त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. युनेस्को या जागतिक संघटनेच्या माध्यमातून हा दिवस साजरा होतो.जगभरामध्ये १९९५ पासून तर भारतामध्ये २००१ पासून पुस्तक दिन साजरा केला जात आहे.
     लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे ,हा देखील हेतू यामागे आहे. पुस्तक आपल्याला ज्ञान देतात. त्याचबरोबर मनोरंजनही करतात. पुस्तकामुळे आपली भाषा सुधारते. या दिवशी विविध उपक्रमांनी पुस्तक दिन साजरा केला जातो. विनामूल्य पुस्तक वितरित करणे, स्पर्धा आयोजित करणे, रीडिंग मॅरेथॉन, लेखन स्पर्धा ,इत्यादी. त्यानिमित्ताने वाचनसंस्कृतीची चर्चा होते.वाचनाचा हा संस्कार थोरामोठ्यांच्याकडून लहानांवर व्हावा, असेही प्रयोजन यामागे आहे.
     पुस्तक हा मूळ शब्द कोडेक्स या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. प्रारंभीच्या काळात लाकडाच्या ठोकळ्यावर लेखनास सुरुवात पाच हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये झाली. नाईल नदीच्या काठावर उपलब्ध असणाऱ्या पापयरस या वृक्षावर लेखन केले जात असे. या वृक्षाची पृष्ठ एकाखाली एक, एकत्र चिकटवली जाऊन त्याची गुंडाळी तयार होत असे. त्याला कोडेक्स म्हटले जात असे. नंतरच्या काळात टीलिया या वृक्षाचे खोड देखील वापरले जाऊ लागले. त्यास लॅटिन भाषेत लीबर म्हणतात. त्यावरून लायब्ररी या इंग्रजी शब्दाची उत्पत्ती झाली आहे.
     तागाच्या पानांवर लिहिलेले व उपलब्ध असलेले सर्वात जुने हस्तलिखित ,सुप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो द विंची यांचे कोडेक्स ऑफ लेसिस्टर हे ७२ पानांचे पुस्तक जगातील सर्वात महागडे व दुर्मिळ पुस्तक मानले जाते. त्यात लेखकाचे जगाचे सिद्धांत, पृथ्वीवरील पाण्याच्या हालचाली, जीवाश्म, चंद्राची चमक यासारख्या विषयांवर लेखन केलेले आहे. या पुस्तकाची किंमत ३०.८ मिलियन डॉलर म्हणजे २ कोटी ३० लाख भारतीय रुपये इतकी आहे. वरील किंमत मोजून मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा बिल गेट्स यांनी ते खरेदी केले आहे.
   The Adventures of Tom Sawyer हे टाईपराईटर वापरून लिहिलेले पहिले पुस्तक आहे. संपूर्ण जगात आइसलँड या देशातील लोक सर्वाधिक पुस्तके वाचतात. हरी पॉटर, बायबल आणि Quotations from Chairman - Mao Tse Tung ही पुस्तके सर्वात जास्त वाचली गेलेली पुस्तके आहेत.
   भारतात देखील पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या मुबलक आहे.
    भारतीय भक्ती संप्रदायाची दोन मुख्य श्रद्धास्थाने म्हणजे ग्रंथ आणि संत .संतांचे तत्वबोध आपल्यापर्यंत पोहोचतो तो ग्रंथांच्या रूपाने.एका अर्थाने ग्रंथ हेच संतांचे शब्द दर्शन ठरते.
   ज्ञायते अनेन इति ज्ञानम् l
म्हणजे ज्याच्या योगे जाणले जाते ते ज्ञान .संतांनी आपला परमार्थ विचार आणि परमार्थाचा अनुभव हा ग्रंथातून मांडला आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेव म्हणतात...
     माधुर्यो मधुरता l
     शृंगारी सुरेखता ll
     रूढपणा उचिता l
     दिसे भले ll
माधुर्याला मधुरता, सौंदर्याला सुरेखता आणि अर्थालाही रूढता देणारे' ग्रंथ' हेच साधकाचे प्रबोधक आणि सखे आहेत. अशा शब्दात ज्ञानदेवांनी ग्रंथांचे म्हणजेच पुस्तकांचे महत्त्व विशद केले आहे. ग्रंथ हेच परमात्म्याचे तत्व दर्शन,शब्द दर्शन आणि प्रमाण दर्शन आहेत.
   पुस्तके व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. लेखकांच्या लेखणीत सत्तांतरे घडविण्याची आणि सत्ता उलथवून टाकण्याची ताकद असते. म्हणून जगभरातील सत्ताधाऱ्यांना नेहमीच लेखक विचारवंतांची भीती वाटत आली आहे. हे जगाचा आणि भारताचा इतिहास सांगतो.
भारताच्या इतिहासातील अनेक राष्ट्रपुरुष घडविण्यात जागतिक दर्जाच्या लेखकांचा आणि त्यांच्या पुस्तकांचा सिंहाचा वाटा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गांधी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, पंडित जवाहरलाल नेहरू, यासारखी अनेक नावे आपल्याला घेता येतील.
     महात्मा ज्योतिबा फुले यांचेवर थॉमस पेन यांच्या The Right of man या पुस्तकाचा प्रभाव तरुणपणातच पडला होता. तसेच तुकाराम महाराजांच्या अभंगांचा परिणाम त्यांच्यावर झाला. गाथेच्या स्वरूपाची अखंड काव्य रचना महात्मा ज्योतिबा फुले यांनी करून लोक जागृती आणि लोकशिक्षण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. महात्मा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना समर्पित केला. आयुष्याच्या अखेरीस शरीराच्या उजव्या भागाला पॅरॅलिसिस अर्थात अर्धांगवायू झाला तरीदेखील त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचे लेखन कसोशीने पूर्ण केले.
  लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहिले. तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी Discovery of India - भारत एक खोज हा ग्रंथ तुरुंगात असतानाच लिहिला. बहुतेक राष्ट्र पुरुषांनी स्वातंत्र्य चळवळीत तुरूंगवास भोगताना तुरुंगात पुस्तके वाचून क्रांती घडवून आणली असे दिसून येते.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर संत कबीर, गौतम बुद्ध यांचा प्रभाव दिसून येतो. पुढील काळात त्यांनी सुरू केलेल्या मूकनायक पाक्षिकाच्या मुखपृष्ठावर संत तुकाराम महाराजांची वचने लिहिलेली असत. डॉ. आंबेडकरांचे ग्रंथप्रेम अलौकिक होते. त्यांना बालपणापासूनच वाचनाची आवड होती. बालपणी शालेय शिक्षण घेत असताना त्यांना एका परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गौतम बुद्धांचे चरित्र बक्षीस म्हणून मिळाले. त्या पुस्तकाचे मन लावून वाचन त्यांनी केले आणि त्यांच्या पुढील आयुष्याला गती मिळाली. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत, तुम्हाला मिळालेल्या पैशांपैकी निम्म्या पैशात पुस्तके खरेदी करा आणि निम्म्या पैशात भाकरी घ्या. भाकरी तुम्हाला जगायला मदत करील तर पुस्तके, कसे जगावे? हे शिकवतील. अन्न ,वस्त्र निवारा याप्रमाणेच पुस्तके ही देखील आपली मूलभूत गरज आहे.असे डॉ.आंबेडकर आवर्जून सांगत.जगातील अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्वतःला १४ दिवस खोलीत बंद करून घेतले होते. परदेशातून कोण्या एका मित्राने त्यांना बोटीवरून पुस्तके पाठविली होती. दुर्दैवाने बोट बुडाली त्याबरोबर पुस्तके देखील ! पुस्तकांच्या विरहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर दोन दिवस रडत होते! काय अलौकिक ग्रंथप्रेम!! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे स्वतःची वैयक्तिक अशी पंचावन्न हजार पुस्तके होती. त्याकरिता त्यांनी स्वतंत्र बंगला बांधल्याची नोंद आहे. ग्रंथांचे महत्त्व जाणणारे असे महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
     वाचनाचे आणि पुस्तकांचे महत्त्व लक्षात घेऊन बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या प्रदेशात फिरती वाचनालये उभारली.
    थोर क्रांतिकारक भगतसिंग यांना फाशीची शिक्षा इंग्रज सरकारने दिली. त्यांनी तुरुंगात पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून उपोषण केले. फाशी च्या दिवशी सूर्योदयापूर्वी जेलरने त्यांना तुमची अंतिम इच्छा काय? असे विचारले. त्यावेळी भगतसिंग यांचे ग्रंथांविषयीचे प्रेम दिसून येते. भगतसिंग म्हणाले," मला लेनिनच्या चरित्रातील शेवटची दोन पाने वाचायची आहेत, तेवढी संपवू द्या. मग मी तुमच्याबरोबर हसत हसत यायला तयार आहे."
     पुस्तकामुळे आपले पूर्ण जीवन बदलू शकते. केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे पुस्तकामुळेच लोकशाहीर झाले.
    अक्षरशत्रू असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक वाचून मुख्याध्यापिका झाल्या आणि समस्त स्त्री वर्गासाठी आदर्श बनल्या !
   भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल पाकिर जैनालूद्दीन अब्दुल कलाम हे रोज वीस तास वाचनात व्यस्त असत. त्यांच्या म्हणण्यानुसार माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.एक भेटलेली माणसे आणि दुसरे म्हणजे वाचलेली पुस्तके !
     जगाच्या इतिहासात अमेरिकेची राज्यक्रांती, रशियातील आंदोलने, फ्रेंच राज्यक्रांती, अनेक धर्मसत्ता उलथवून टाकण्याचे काम लेखकांच्या लेखणीने म्हणजेच पुस्तकांनी केले आहे.
  म्हणून पुस्तकांचे मानवाच्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण असेच आहे.
     सध्या पुस्तकांची जागा इ - बुक,वाचनालयाची जागा- बुक कॅफे ,ऑडिओ बुक यांनी घेतली आहे. सध्याचे तरुण पुस्तके वाचत नाहीत, असा जरी बोलबाला असला तरी त्यात फारसे तथ्य नाही. आजच्या आधुनिक युगात वाचनासाठी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे जसे, किंडल,ई बुक्स ,जर्नल्स न्यूज पेपर्स उपलब्ध असतात. टेक्नोसॅव्ही मंडळींना ते आवडते. वाचनाची पद्धत, माध्यम आणि जागा मात्र बदलली आहे, हे खरे. त्याचे जसे काही तोटे असले तरी फायदे देखील आहेत. पुस्तके ठेवण्यासाठी जागेची आवश्यकता नसते. हवे ते आणि हवे तेव्हा वाचनाची सोय उपलब्ध होते. जगभरातील बातम्या किंवा लेखन आपल्या सोयीने वाचता येते. डाऊनलोड करून घेता येत असल्यामुळे किंमत कमी मोजावी लागते. पुस्तका सारखे ओझे बाळगावे लागत नाही. आधी पुस्तके मिळण्यासाठी वाट पाहावी लागत असे. आता इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून जगभर सहजपणे पुस्तके उपलब्ध होतात. यावरून वाचन संस्कृती कमी होत आहे ,या ऐवजी ती बहरत आहे असे म्हटले पाहिजे.
      सध्याच्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील वाचनाची आवड असणारे अनेक तरुण विविध उपक्रम राबविताना दिसतात. दरम्यानच्या काळात वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी वाचनात आली. पुण्यातील काही तरुणांनी एक उपक्रम सुरू केला असून आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून ते सर्व मित्र मंडळी एकत्र जमतात. एका विषयावरचे पुस्तक घेऊन सामूहिक वाचनाचा उपक्रम राबवला जातो. एकाने पुस्तक वाचायचे आणि इतरांनी ऐकायचे. अशा उपक्रमांमधून वाचन संस्कृतीचा विकास सुरू आहे.
         स्वतः कवी आणि लेखक असलेले श्री.रवी वसंत सोनार यांनी वाचन संस्कृती वाढावी म्हणून लोकांना पुस्तके भेट देण्याचा अनोखा उपक्रम सुरू करून स्वखर्चातून जवळपास साडेतीन हजार पुस्तके त्यांनी लोकांना भेट दिली आहेत. त्यापैकी लोकांनी पुस्तकातील चार ओळी जरी वाचल्या तरी माझा हेतू सफल झाला, असे ते आत्मविश्वासाने म्हणतात. नाशिक शहरातील नामवंत प्राध्यापक श्री.दिलीप फडके दुर्मिळ पुस्तकांचा शोध घेऊन वाचकांपर्यंत पोहोचवत आहेत. लोकांना वाचनासाठी प्रोत्साहन देत आहेत. वाचन संस्कृती आणि दुर्मिळ ग्रंथांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
   या लॉकडाउनच्या परिस्थितीत अनेक जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना धडपडताना आपण पाहिले आहे. त्यावर उपाययोजना म्हणजे शासनाने जीवनावश्यक वस्तू लोकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. इटली आणि जर्मनी या दोन देशातील सरकारांनी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत पुस्तकांचा समावेश करून लॉकडाउनच्या परिस्थितीत लोकांना दुकानातून पुस्तके खरेदी करण्याची सवलत दिली.नव्हे घरपोच पुस्तकांची सेवा देखील उपलब्ध करून दिली. यावरून पुस्तकांचे आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. साथीच्या महामारी मुळे होणाऱ्या मृत्यूची बातमी ऐकता ऐकता युरोपातील वरील दोन देशांमधील पुस्तकांसंबंधीचे महत्त्व विषद करणारी बातमी मनाला आधार देऊन गेली.
     काहीजण मात्र पुस्तके खरेदी करून कपाटात सजवून ठेवण्यातच धन्यता मानतात. एक जगप्रसिद्ध वाक्य आहे Books are no made for furniture; but there is nothing else that so beautifully furnishes house. सध्याच्या काळात घर सजवण्यासाठी पुस्तके वापरली जातात, ही खेदाची गोष्ट आहे !
   पुस्तके ही आपले मार्गदर्शक असतात. कठीण प्रसंगी सल्ला देतात. ज्ञानाचा अखंड साठा त्यात भरलेला असतो. पुस्तके आपल्यात आत्मविश्वास निर्माण करतात. आपल्यातल्या कल्पनाशक्तीला चालना देतात. कुसंगती किंवा वाईट लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटे राहून पुस्तकांशी मैत्री करावी. पुस्तके आपल्याला फसवत नाहीत. आपली चेष्टा मस्करी करीत नाहीत. पुस्तके आपला राग, लोभ, द्वेष, मत्सर करीत नाहीत. उलट कशाचीही अपेक्षा न करता आपल्याजवळ असलेला समृद्ध ज्ञानाचा साठा आपल्यासाठी सदैव खुले ठेवतात. बोलक्या मनुष्यापेक्षा न बोलता समजावून सांगणारे पुस्तक कधीकधी अधिक जवळचे वाटते. पुस्तक विकत घेऊन वाचावे. वाचनालयात जाऊन वाचावीत. शक्य असेल तेथे जाऊन वाचन करावे.
महात्मा ज्योतिबा फुले आपल्या अखंड या काव्यसंग्रहात म्हणतात..
     थोडे दिन तरी , मद्य वर्ज्य करा l
            तोच पैसा भरा, ग्रंथांसाठी ll
वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन ,लोक नियमित वाचनाचे व्रत अंगीकारतील तेव्हा आपला समाज नुसता साक्षर नाही, तर खर्‍या अर्थाने सुशिक्षित आणि सुधारित होण्याकडे वाटचाल करू लागेल. हेच समाजसुधारकांना अपेक्षित होते.
    पुराणकाळापासून मानवाला ग्रंथांनी ज्ञान समृद्ध केले आहे. हा समृद्ध वारसा अनेक महाराष्ट्रीय लेखकांनी देखील पुढे चालू ठेवला आहे. संत ज्ञानेश्वर,संत चक्रधर स्वामी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत बहेणाबाई, संत मुक्ताबाई, संत रामदास स्वामी ,यासारख्या अनेक संतांनी अभंग, ओव्या, भारुडे इ. माध्यमातून ग्रंथरचना केली. अर्वाचीन काळात अनेक महाराष्ट्रीय लेखकांनी मराठी साहित्याला यशाच्या उच्च शिखरावर पोहोचविले. ग.दि. माडगूळकर,वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे,आचार्य अत्रे, वसंत बापट,ना. सं. इनामदार,चिं.त्र्यं. खानोलकर, इंदिरा संत, शांता शेळके, यासारखी अनेक साहित्यिकांची नावे घेता येतील. कथा, कादंबरी, काव्य, प्रवास वर्णन, अनुवाद, निबंध, टीका यासारख्या अनेक साहित्य प्रकारांनी मराठी ग्रंथ जगत समृद्ध आहे. 
        आपण या समृद्ध साहित्याची जरूर चव चाखली पाहिजे. ग्रंथांशी मैत्री केली पाहिजे. मित्र कोणाला म्हणायचे? ज्याच्याशी मनाची जवळीक असते. जो निस्वार्थपणे केवळ देतच असतो. कठीण समयी उपयोगाला येतो. तोच खरा मित्र. मला वाटते पुस्तकाजवळ हे सारे गुण आहेत !
   माणसे वाचायला तयार नाहीत. विचार करायला तयार नाहीत. विवेकवादी दृष्टीने जगायला तयार नाहीत.अशा वातावरणात मानवी समूहाचे वर्तन हिंसक होत चालले आहे.या हिंसेचे मूळ विचार शून्यतेत आहे आणि विचार शून्यता केवळ पुस्तक वाचत नसल्यामुळे निर्माण झालेली आहे,असे मला वाटते. तरुणाईच्या ऊर्जेला बंधारा घालून योग्य दिशेने वळण देण्याचे काम पुस्तके करतात.
     कवीवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे
ग्रंथ आमचे साथी ,ग्रंथ आमच्या हाती 
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या,अंधाराच्या राती
         वाचनाने खरोखरच मानवी जीवनातील अज्ञानरूपी अंध:कार नाहीसा होऊ शकतो. पुस्तक हे केवळ पुस्तक नसून मित्र असतात. मग ते छापील असो वा डिजिटल. सोशल मीडिया इंटरनेट यामुळे काही क्षणातच हवी ती माहिती अगदी सहज मिळते.मग पुस्तक वाचायचे कशाला? असा काहींना प्रश्न पडतो. परंतु खऱ्या अर्थाने पुस्तक वाचनाने मनाला आनंद मिळतो.
   वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी असे वाटत असेल तर शालेय वयातच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. वाचनाने मन समृद्ध होते. ज्याप्रमाणे सुवर्णालंकारांनी स्त्रीचे सौंदर्य खुलून दिसते तसेच पुस्तकांच्या वाचनाने मनाच्या सौंदर्यात भर पडते.
    दरवर्षी वाढदिवस साजरा करीत असताना इतर खर्चापेक्षा पुस्तके खरेदी करावीत. इतरांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुस्तके भेट द्यावीत. सत्कार समारंभात बक्षीस म्हणून पुस्तके द्यावीत. भलेमोठे पुष्पगुच्छ पाहुण्यांना देण्याऐवजी ग्रंथ भेट द्यावी. इतकेच काय महिलांच्या हळदी-कुंकवाच्या समारंभात पुस्तकच वाण म्हणून भेट देण्याची प्रथा सुरू व्हावी. वाचलेल्या पुस्तकाबद्दल मित्रांना सांगावे. पुस्तकांची एकमेकांमध्ये देवाण-घेवाण व्हावी. वाचनालये मंदिरे व्हावी, म्हणजे पुस्तके घेण्यासाठी वाचनालयात लोकांची रांग लागावी. असे छोटे-मोठे उपक्रम हाती घेतल्यास पुस्तक दिनाचा उद्देश सफल होईल.
   राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत,"पुस्तक वाचनाने वाचकाचे मस्तक सशक्त होते आणि सशक्त मस्तक शक्यतो कोणासमोर नतमस्तक होत नाही."
  पुस्तकातून आपल्याला संस्कार, परंपरा, चांगले आणि वाईट यातील फरक कळतो. पुस्तके हे आपल्याला दिशा देण्याचे काम करतात. बालपणापासून आयुष्यभर पुस्तकांशी आपला संबंध येतो. ज्ञानाबरोबरच ते आपले मनोरंजन देखील करतात.
  अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन l
  अर्थेन ग्रंथ संभार: ज्ञानं लभ्य प्रयत्नत: ll
        म्हणजेच पैसे देऊन औषध मिळते. परंतु, आरोग्य हे पैसे देऊन मिळत नाही. त्याप्रमाणे पैशांनी पुस्तकांची चळत विकत मिळते.परंतु, त्यातील ज्ञान मिळविण्यासाठी पुस्तक वाचून कष्टाने ज्ञान मिळवावे लागते. 
  चला तर मग आपण सर्वजण वाचक होऊ या ! 
      रसिक वाचक असलेल्या आणि वाचक होऊ इच्छिणाऱ्या सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा आणि उत्तमोत्तम ग्रंथवाचनाकरिता सदिच्छा !

श्री.शैलेश पाटोळे
नाशिक.
दिनांक: २३ एप्रिल २०२४
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

  
     

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...