पेठे विद्यालयाचे सभागृह. २००८ च्या ऑगस्ट महिन्याचा अखेरचा दिवस. भरगच्च सभागृह. प्रमुख अतिथी श्री.का.वि.जोशी सर मनोगत व्यक्त करीत होते. निमित्त होते ... सेवानिवृत्तीच्या समारंभाचे...अखंडित चाळीस वर्षे सेवा करून पेठे विद्यालयाच्या अनेक नामवंत शिक्षकांपैकी, श्री. नवीनचंद्र तांबट उर्फ नवीन भाई आज शासकीय नियमानुसार निवृत्त होणार होते. वयाच्या ५८ व्या वर्षी, तरुणांना लाजवेल,असा सळसळता उत्साह,उमेद,तडफ त्यांच्या कामातून दिसून येत होती. संपूर्ण सभागृह भावुक झाले होते. याप्रसंगी तांबट सरांचा मित्रपरिवार, विविध शाळांमधील शिक्षक, पदाधिकारी यांनी आपल्या भावना शब्दातून तर काहींनी नजरेतून व्यक्त केल्या. समारंभाचे उत्सव मूर्ती ....श्री.व.सौ. तांबट.. परंतु नेहमीच्या सवयी प्रमाणे, तांबट सर खुर्चीवर जास्त वेळ बसू शकत नव्हते. कार्यक्रमात काही उणीव नाही ना? सर्व पदाधिकाऱ्यांना बसायला जागा मिळाली आहे ना ? गाणार्यांचा तबला नीट लागला आहे ना? या आणि यासारख्या अनेक शंका त्यांच्या मनात निर्माण होऊन,अधून मधून कार्यक्रमातून ते उठून जात होते.
शेवटी ,श्री.का.वि.जोशी सरांना सांगावे लागले, "तांबट सर, तुम्ही एका जागेवर बसा." नेहमीप्रमाणे, श्री.का.वि.जोशी सर यांनी तांबट सरांना उदबत्तीचा पुडा भेट म्हणून त्यांच्या हाती सोपविला. ज्याप्रमाणे उदबत्ती स्वतः जळून त्याचा सुगंध वातावरणात पसरवते. त्याप्रमाणे आयुष्य कालातील चाळीस वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे तांबट सरांनी संस्थेला सेवा दिली. त्याचे प्रतिक म्हणजे तो अगरबत्तिचा पुडा असावा ! श्री तांबट सर हे श्री.जोशी सरांपुढे नतमस्तक झाले. संपूर्ण सभागृहाने उभे राहून दोघांनाही मानवंदना दिली. टाळ्यांचा गजर झाला.
आपल्यासाठी कोणीतरी भावुक व्हावं, हे म्हणावं इतकं सोपं नाही ! त्यामागे असते प्रचंड मेहनत, सहनशीलता, संवेदनशीलता, आणि समर्पणाची भावना !
विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात ,तांबट सरांनी बसवून घेतलेल्या परिपाठापासून होत असे. तालासुरात राष्ट्रगीत, प्रार्थना, देशभक्तीपर गीत,प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून म्हणून घेत. त्यांना हवा असलेला ताल-सूर जोपर्यंत मुलांकडून येत नाही, तोपर्यंत कसून सराव करून घेत असत. यासाठी आवश्यक असणारी सहनशीलता तांबट सरांच्या अंगी होती. पाचवीत येणाऱ्या नवागतांचे बँड पथक सर बनवत असत. म्हणजे ती मुले दहावीत जाईपर्यंत उत्तम साथसंगत करीत.
स्टाफ रूम मध्ये ,उत्तम दर्जाचा एक तरी विनोद सर रोज सांगत. स्वतः मनसोक्त हसून ,इतरांनाही आनंद देत असत. शाळा सुरू झाल्यापासूनची त्यांची धावपळ दिवसभर तशीच असे. शाळेच्या सर्व प्रकारच्या नियोजनात, सरांमुळे पदाधिकाऱ्यांना फारसे लक्ष घालावे लागत नसे. हस्तकलेच्या वर्गात तांबट सर आणि बच्चे कंपनी मनसोक्त आनंद घेत असत. नितळ आणि शांत, कमलदले असलेल्या सरोवरात ,शुभ्र बदकांनी मनसोक्त विहार करावा, अगदी असेच सरांच्या तासाला वाटावे! मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद केवळ अवर्णनीय !! स्वयंनिर्मितीचा आनंद....अप्रतिम ! सरांच्या बोलण्यातलं मार्दव,प्रेम,आपुलकी, जिव्हाळा आणि बरंच काही....... अशा वेळी हेवा वाटे. आपल्याला, असे शिक्षक का लाभू नये? मुले म्हणजे देवाघरची फुले.. त्यांच्या नाजूक मनाशी सरांचा अलगद...प्रेमळ संवाद चाले. म्हणून तांबट सरांना कधी वर्गात मुलांवर ओरडावे लागले नाही.
तबल्यावर पडणारी सरांची जादुई बोटे ... त्यामुळे निर्माण होणारा नाद... त्यातून होणारी आनंदानुभूती... सर्वकाही चकित करून सोडणारं!
सरस्वतीच्या या ज्ञान मंदिरात आजही तो नाद घुमतोय ,असा भास होतो. "कला असे मानवाशी भूषण", ही उक्ती तांबट सरांसाठी सार्थ ठरते. कलेतून मनोरंजन करीत मुलांचे शिक्षण होत असे. उपदेश करण्यापेक्षा कृतीतून मुलांना ते शिक्षण देत असत. "करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे."तांबट सरांशी संवाद साधताना हा अनुभव प्रत्येकालाच येत असे.
कोणत्याही कामात नीटनेटकेपणा ,तंत्रशुद्ध नियोजन, टापटीपपणा हे त्यांचे विशेष होत. दैनंदिन शालेय कामकाज असो, सामुदायिक कवायतीचा तास ,एखादा दिनविशेष, सांस्कृतिक कार्यक्रम असो की, स्नेहसंमेलन.. तांबट सरांच्या उत्साहाला उधाण आलेले असे! स्टेजवरच्या नियोजनापासून मुलांच्या बैठक व्यवस्थेपर्यंत, माइकचा आवाज सेट करण्यापासून आवाजाचे भोंगे फिरवण्यापर्यंत ,सर्व काही काळजी तांबट सर करीत. ते खऱ्या अर्थाने व्यवस्थापक होते. स्टेजवरील टेबल, त्याच्यावरचे कापड, फ्लॉवर पॉट, लेखनाचे पॅड, कागद-पेन ,कार्यक्रम पत्रिका, सरस्वती प्रतिमा, तेल- वात ,समई, काडेपेटी, खुर्च्या किती मांडाव्या ..माइक कोणत्या बाजूला असावा... इतके सूक्ष्म नियोजन तांबट सर स्वतः करीत असत. कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व वस्तू पुन्हा जिथल्या तिथे कपाटात घडी करून नीटनेटकेपणाने ठेवत. कार्यक्रम सुंदर झाला.छान झाला. भाषण चांगले झाले. गायन चांगले झाले... असे अभिप्राय देऊन प्रोत्साहित करण्यात त्यांचा पहिला नंबर असे. अर्थात कार्यक्रमाची यशस्विता त्यांच्या उत्तम नियोजनात असे. त्याचं श्रेय मात्र त्यांनी कधी स्वतःकडे घेतले नाही.यासाठी मन आभाळासारखं विशाल असावं लागतं,जे तांबट सरांकडे होतं! शाळा माझी, मी शाळेचा.. अशी त्यांची धारणा.
१४८४ मध्ये गुजरात मधील पावागड हा परिसर परकीय स्वारीमुळे उध्वस्त झाला. तेथे असलेला कंसारा समाज विखुरला गेला. कंसारा म्हणजे कांस्यकार... म्हणजे कांस्य काम करणारे. काहीजण महाराष्ट्रात,ओझर येथे स्थायिक झाले. तेथे पारंपरिक भांडी बनवण्याचा व्यवसाय करू लागले. आताचे ओझर तेव्हा 'ओझर तांबट' म्हणून ओळखले जात असे. तेथून काहीजण नाशिकच्या भद्रकाली परिसरात येऊन राहिले आणि तेथे जुनी तांबट लेन वसली. जुनी तांबट लेन हा परिसर गावाच्या मध्यभागी होता.भांडी बनविण्याचा आवाज येतो म्हणून रविवार कारंजा ते अशोक स्तंभ दरम्यान मल्हार दरवाजा या परिसरात त्यांना जागा देण्यात आली. तेथे नवीन तांबट लेन तयार झाली.
उत्साहाचा हा अखंड झरा , गुलशनाबाद अर्थात नाशिकच्या गोदातीरी २८ ऑगस्ट १९५० रोजी जन्मला.तीन पिढ्यांपासून तांबट कुटूंबीय नाशिक मध्ये वास्तव्यास आहे. सरांचे आजोबा तांब्या-पितळेची भांडी बनवत असत. हाच व्यवसाय सांभाळत सरांचे वडील श्री. रतनलाल तांबट मूर्तिकाम देखील करत असत. श्री. रतनलाल तांबट यांना सहा अपत्ये होती. त्यापैकी नवीनचंद्र हे पाचवे. नाशिक जवळील ओझर मिग हे त्यांचे आजोळ.
मेन रोड जवळील रेड क्रॉस सिग्नल जवळ त्याकाळी असलेल्या बालवाडीत नवीनने शिक्षणाचा श्रीगणेशा केला. घरापासून जवळच असल्यामुळे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या रुंगठा हायस्कूलमध्ये पहिली ते अकरावी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. १९६७ साली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. कुटुंबात वडील, भाऊ मूर्ती काम करीत असत. शाडू माती पासून मूर्ती बनवण्याचा त्यांचा व्यवसाय होता. परंतु वर्षभर हाताला काम नसे.कुटुंब मोठे, उत्पन्नाचे स्रोत कमी यामुळे जेमतेम भागत असे.
घराच्या अगदी जवळ शाळा असल्यामुळे, टोल पडल्यानंतर शाळेत जायला निघत असे.घरात लहान असल्यामुळे बालपण तसे आनंदात गेले. रुंगठा हायस्कूलच्या तालमीत जाऊन सराव करी. तेथे मल्लखांब या खेळाची आवड निर्माण झाली. घारपुरे घाट जवळ असल्याने सुट्टीच्या दिवशी वडील पोहायला घेऊन जात.
नवीनच्या थोरल्या बंधूंना गाण्याचा छंद होता. मुकेश यांची गाणी ते हुबेहूब गात असत. एक भाऊ हार्मोनियम वाजवण्यात तरबेज होते. दिवसभर मूर्तिकाम करून, संध्याकाळी दोघेही भाऊ गाण्याचा सराव करीत असत. तेव्हा नवीन लक्षपूर्वक गाणी ऐकत असे. त्यातून संगीताची त्याला गोडी लागली.
त्याकाळात चित्रपट थिएटरमध्ये लागण्यापूर्वी, त्या चित्रपटाचे पोस्टर एखाद्या हातगाडी वरून ढोल वाजवून मिरवले जातअसे. सर्कल सिनेमागृह जवळच असल्यामुळे आठवड्यातून अनेक वेळा सिनेमाचे पोस्टर घेऊन जाणारी गाडी आणि वाजणारा ढोल त्यांच्या कानावर पडत असे. अनेकदा लहानग्या नवीन सारखी अनेक गल्लीतली मुलं त्या गाडीच्या मागे मागे जात. तो काळ ब्रास बँड चा होता. उपजतच कलेची आवड असणारा नवीन, ब्रास बँड च्या आवाजावरून बँड कोणता हेओळखत असे ! त्याकाळी नाशिक मध्ये प्रसिद्ध असलेले राजकमल ब्रास बँड चे मालक श्री.भाऊराव भट यांनी नवीन च्या भावाला सांगितले की," तुम्ही नवीनला एक चांगला तबला घेऊन द्या." त्यांच्यातली ही कला, गायक श्री.बाळ देशपांडे यांनी देखील ओळखली. या सर्वांच्या सल्ल्याने १९६२ मध्ये विष्णू संगीत विद्यालयात पं.बी.आर.त्रिवेदी यांच्या कडे तबला शिकण्यासाठी नवीनने सुरुवात केली. त्यांच्याकडे चार वर्षे तबल्याचे शिक्षण घेतले. परंतु, केवळ तबला वाजवून पोट भरणार नाही. त्याऐवजी चित्रकलेच्या परीक्षा दे. मूर्तिकाम शिक, असे वडिलांनी सुचविले. आणि तबला क्लास सुटला... इयत्ता दहावीच्या वर्गात असताना, नवीन ने ड्रॉइंग ची परीक्षा दिली. नवीन च्या बहिणीच्या घरी रेडिओ होता. रेडिओ ऐकण्यासाठी तासनतास बहिणीच्या घरी ,नवीन बसून राहत असे. रिकाम्या वेळेत, मिळेल तेव्हा तबल्याचा सराव घरच्याघरी करीत असे. बँडचा आवाज कानावर पडला की, आपोआप नवीनचे पाय तिकडे वळत. त्या आवाजाच्या नादात मिरवणुकीत सामील होऊन जात असे. अशावेळी वडील खूप रागवायचे. काम - धाम सोडून रिकामटेकडे उद्योग करू नकोस, म्हणून ओरडायचे. लग्नसमारंभाच्या सीझनमध्ये जवळपास रोजच ब्रास बँड ची मिरवणूक गल्लीतून जात असे. त्यामुळे नवीनला घरात कोंडून ठेवले जात असे. ब्रास बँड च्या आवाजावरून नवीन ,आज मिरवणुकीत कोणता बँड आहे? हे बरोबर ओळखत असे. त्याकाळी नाशिकमध्ये राजकमल बँड, लोकमान्य बँड, न्यू रॉयल ब्रास बँड, अरुण बँड, साईनाथ बँड, इत्यादी प्रसिद्ध ब्रास बँड होते. वाजणारे वाद्य आणि गाण्याची धून यावरून नवीन, ब्रास बँड चे नाव अचूक ओळखत असे.
कंसारा मंगल कार्यालया शेजारी, श्री. बी. डी. चौरे हे अंध शाळेतील शिक्षक राहत असत. त्यांचा नूतन संगीत ऑर्केस्ट्रा होता. नवीनचा थोरला भाऊ त्या ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलिन वाजवीत असे. त्यांनी भावाला असे विचारले," तबला वाजवू शकेल ,असा एखादा कलाकार आहे का?"चौरे सरांच्या समोर तबल्याची छोटीशी ट्रायल नवीनने दिली. नवीनचा तबला चौरे सरांना भावला आणि नवीन, १९६७ साली नूतन संगीत ऑर्केस्ट्राचा तबला वादक बनला. त्या ऑर्केस्ट्रामध्ये अनेक अंध कलाकार होते. अधून मधून कार्यक्रमांना जावे लागे. विशेष करून गणेशोत्सवात दहा दिवस सलग काम मिळे. पहिल्या वर्षी नवीन ने ८० रुपये कमवून वडिलांच्या हातात ठेवले. हळूहळू छोटेमोठे कार्यक्रम मिळू लागले. नवीनचा तबल्यावर हात बसला. कार्यक्रमांमध्ये त्याचे कौतुक होऊ लागले. क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे बंधू श्री.अविनाश नाडकर्णी ,श्री.सुधीर सराफ यांचे बरोबर ढोलकी - ढोलक वाजविण्यासाठी कार्यक्रमात जाऊ लागले.
१९६७ साली नाशिक मधील सुप्रसिद्ध गझल गायक आणि चित्रपट अभिनेता राजेश खन्ना यांच्यासारखे दिसणारे, हारून बागवान यांच्याशी नवीनची घनिष्ठ मैत्री झाली. एकमेकांच्या कार्यक्रमांना जाण्याबरोबरच, घरी येणे जाणे सुरू झाले. मैत्रीत धर्म कधी आडवा आला नाही. त्यांच्या लेखी संगीत हाच धर्म होता. हारून बागवान आणि नवीन एकमेकांचे जीवश्चकंठश्च मित्र झाले!
दरम्यानच्या काळात १९६८- ६९ मध्ये नाशिक कला निकेतन संस्थेमध्ये नवीन ने डी.टी.सी.(ड्रॉइंग टीचर्स कोर्स ) वडिलांच्या आग्रहास्तव पूर्ण केला. तेथे सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी तुपे ड्रॉइंग शिकवत असत.
एकदा, श्री.अविनाश नाडकर्णी यांचे घरी संध्याकाळी संगीताची मैफल सुरू होती. नवीनचा भाऊ निरोप घेऊन आला. तुला ताबडतोब घरी बोलावले आहे. नवीनच्या वडिलांचे एक मित्र, श्री. रा. ग.विरकर घरी आलेले होते. त्यांनी नवीनला विचारले,"आजचे वर्तमानपत्र वाचले का? त्यात आलेली जाहिरात पाहिली का?" वर्तमानपत्रात नाशिक एज्युकेशन सोसायटी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही नामवंत संस्थांची, शिक्षक पाहिजेत अशी जाहिरात होती. विरकर सरांनी घरात बसूनच अर्ज लिहून घेतला. अर्ज पाकिटात बंद करून स्वतःच घेऊन गेले. श्री.रा.ग.विरकर सर,तेव्हा नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी होते. नवीन देखील नोकरीच्या शोधात होताच. दोन्ही संस्थांमध्ये इंटरव्यू झाला. कॉल लेटर पोस्टमनने घरी आणून दिले. नोकरी कोणती स्वीकारायची यावर घरात चर्चा सुरू झाली. दोन्ही संस्थांचा शहर आणि शहराबाहेरील विस्तार लक्षात घेता, नाशिक एज्युकेशन सोसायटीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणि एक उत्तम कलाकार नाशिक एज्युकेशन सोसायटीला लाभला!
८ जून १९७०,श्री.नवीन तांबट पेठे विद्यालयात ड्रॉइंग टीचर, क्राफ्ट टीचर म्हणून रुजू झाले. त्यांच्याबरोबरच श्री. वि.भा. देशपांडे आणि श्री. मो. रु. ओसवाल देखील रुजू झाले. एकोणीस वर्षाचे वय असताना तांबट सरांना नोकरी मिळाली. अंगापिंडाने तांबट सर कृश, बऱ्याचदा ते विद्यार्थी असावेत ,असे अनेक शिक्षकांना वाटे.महिना अखेरीला संस्थेतील क्लार्क श्री. चं.ना. पाठक एका कंपासपेटीत पगार देत असत. त्याआधी महिनाभरातील सर्व काम पूर्ण झाले आहे याबाबतची शाळेच्या पदाधिकाऱ्यांची चिट्ठी दाखवावी लागत असे.
फार पूर्वीपासून पेठे विद्यालय एक नामवंत शाळा म्हणून प्रसिद्ध होती. अशा शाळेत शिक्षक म्हणून नोकरी आपल्याला लाभली ,याबाबत तांबट सरांना अभिमान वाटे. आपापल्या विषयात पारंगत असलेले शिक्षक पेठे विद्यालयात अध्यापनाचे काम करीत असत. त्यात, श्री.ग. शं.देशमुख, श्री. धुं.शा.देशपांडे, श्री.य. ह.मोहाडकर, श्री.बाळासाहेब सराफ, श्री.आप्पा वाड, श्री. रमेश देशमुख, श्री. बाळ भाटे, श्री.बा.गो. दंडगव्हाणे, श्री.यशवंत पाठक ,श्री. अनंत केळकर, श्री. द. रा. वैद्य, श्री भालचंद्र मनमाडकर, श्री.अ.द.लेले ,श्री.भूधर सर, श्री. सोनार सर,श्री, शिंदे सर ,श्री. सातपुते सर, सौ शकुंतला बा.फडके, सौ मंदाकिनी गोडबोले, सौ प्रतिभा कुलकर्णी, श्री डोंगरे सर, श्री घारपुरे सर यासारख्या उत्तम शिक्षकांमुळे पेठे विद्यालयाचा स्टाफ रूम वजनदार होता.
वरील सर्व शिक्षकांमध्ये गुणग्राहकता होती. नवीन आलेल्या नवीन मधील कला सर्वांनी ओळखली. त्यांना प्रोत्साहन दिले. एक कलाकार म्हणून तांबट सरांनी अल्पावधीतच सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले.
त्यावेळी,इयत्ता दहावीचा रिझल्ट लागल्यानंतर शिक्षकांकडून कॉन्ट्रीब्युशन करून जेवणाचा बेत होत असे. जेवणाचे पदार्थ शाळेत बनविले जात होते. जेवण बनवण्यासाठी भाजीपाला,किराणा आणि स्वयंपाक शिक्षकच करीत असत. मदतीला शाळेतील कर्मचारी असायचे. नाशिक मधील सुप्रसिद्ध भगवंतराव हॉटेल मधील चहा बनविण्यात वाकबगार असलेले श्री.विठ्ठल पाठारे, उत्तम आचारी म्हणून प्रसिद्धीस पावलेले श्री.नाना नाईक, श्री.परशुराम गवारे, फिरता सिनेमा दाखविणारे श्री. चंदेल, यांच्यासारखे विनम्र आणि कार्यकुशल कर्मचारी वर्ग पेठे विद्यालयात,मदतीला सदैव तयार असे. शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक आणि पंगत... सर्वांमध्ये उत्साह निर्माण करीत असे.
तांबट सरांनी ड्रॉइंग आणि हस्तकला या दोन विषयांच्या अध्यापनातून मुलांमध्ये कलेची आवड निर्माण केली. सोबतीला तबला होताच ! अनेकविध उपक्रम राबविले. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, शाळेचे स्नेहसंमेलन, विविध दिनविशेष साजरे करताना विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल ,असे उपक्रम राबविले. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांमध्ये तांबट सर फेमस झाले.
शाळेची नोकरी सांभाळून व्यावसायिक दृष्ट्या संगीताचे कार्यक्रम तांबट सरांनी सुरूच ठेवले होते. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळातील संगीत शिक्षक, श्री.बाळ देशपांडे यांच्याबरोबर संगीत ग्रुपमध्ये तांबट सर काम करीत. श्री. बाळ भाटे, श्री.अनंत केळकर, श्री.मधुकर ब्राह्मणकर यांच्या बरोबर श्री.सुधीर सराफ यांच्या साउंड अँड सिंफनी या म्युझिकल ग्रुप मध्ये तरुण नवीन तांबट तबलावादन करीत असत. या सर्वांचे तांबट सरांच्या कुटुंबाशी मित्रत्वाचे संबंध होते. त्याकाळी बडोदा येथील प्रसिद्ध म्युझिक कॉलेजमध्ये तबला शिकण्याची तांबट सरांची मनस्वी इच्छा होती. प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे तेथे शिकवत. परंतु ,सरांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
शाळेच्या स्टाफ मधील श्री.बाळ भाटे सर, श्री. अनंत केळकर, श्री. वि.भा.देशपांडे यांच्याबरोबर विविध सांस्कृतिक मंडळांच्या समूहगीत स्पर्धांमध्ये भाग घेत असत. एका स्पर्धेत श्री.वि.भा. देशपांडे यांच्यासह ,"खून से लिखते चलो,
कश्मीर हमारा है l"
या गाण्याला पेठे विद्यालयाला प्रथम पारितोषिक मिळाले. तेव्हा झालेले अभिनंदन आणि आनंद अवर्णनीय होता!
यानंतर, शहर आणि जिल्हाभरात होणाऱ्या विविध स्पर्धांना पेठे विद्यालयाला बक्षिसे मिळू लागली. अनेक स्पर्धा पेठे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ,नवीन तांबट यांच्या मार्गदर्शनाखाली गाजवल्या.
श्री.बाळ देशपांडे सर यांनी एका कार्यक्रमात सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी तांबट सरांच्या तबला वादनाचे कौतुक केले. शाळा आणि कला या दोन्हीमुळे तांबट सरांना नवीन ओळख प्राप्त झाली.
उत्तम नियोजन ,नीटनेटकेपणा आणि समदृष्टी अशा गुणांमुळे शाळेच्या महत्त्वाच्या दोन समित्यांमध्ये तांबट सरांनी आपली छाप पाडली... वेळापत्रक समिती आणि परीक्षा समिती.
नोकरीच्या प्रारंभीच्या काळात श्री.अ. द. लेले श्री.वि.भा.देशपांडे, श्री.शं.का.गायधनी, श्री.सोनार सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली, वेळापत्रक समितीत क्राफ्ट टीचर असल्यामुळे, वेळापत्रकासाठी आवश्यक कामे करून देणे, वेळापत्रक आखून देणे इत्यादी कामे करीत असत. या सर्वांची काम करण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आणि नियोजनपूर्वक असे. त्यामुळे काम वेळेत पूर्ण होई. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच म्हणजे शाळा सुरू होण्याच्या एक दिवस आधीच शिक्षकांना त्यांचे वैयक्तिक वेळापत्रक ताब्यात मिळत असे. ही परंपरा आजही पेठे विद्यालयात सुरू आहे. वेळापत्रक बनविण्याच्या क्लिष्ट कामात अनेक क्लुप्त्या, नवनवीन प्रयोग तांबट सरांनी केले. पुढे अक्षर चांगले आणि कामातील नीटनेटकेपणा पाहून श्री. अ. नि. खेडलेकर सरांनी परीक्षा समितीत घेतले. आजच्या काळात वापरली जाणारी आसन व्यवस्थेची पद्धत तेव्हापासून सुरू झाली. शासकीय परीक्षा पद्धतीप्रमाणे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन होत असे.
उत्तम फाइलिंग, नीटनेटकेपणा ,गोपनीयता या सारख्या गुणांमुळे तांबट सरांनी परीक्षा समिती आणि वेळापत्रक समितीत कामाचा ठसा उमटविला. सेवानिवृत्तीपर्यंत या समित्यांमध्ये तांबट सरांनी मार्गदर्शन केले.
तांबट सर म्हणजे राजकारणाची लांबी रुंदी नसलेला सरळ माणूस!
पदाधिकार्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांशी त्यांचे उत्तम संबंध. रोजचे शिकविणे सांभाळून, शाळा आणि संस्थेचे काम शाळेच्या वेळेव्यतिरिक्त करीत. एका मुख्याध्यापकांनी तांबट सरांच्या नियोजनाची परीक्षा पाहण्याचे ठरविले. अडीच दिवसात ४६ तुकड्यांचे वेळापत्रक तयार करण्याची जबाबदारी सोपविली.श्री.दत्ता नागपुरे आणि तांबट सर यांनी दोन दिवसात हे काम पूर्ण करून मुख्याध्यापकांची वाहवा मिळविली! यावरून काम करण्याची त्यांची क्षमता लक्षात येते. शाळेत आणि शाळेबाहेर व्यावसायिक स्तरावर काम करीत असताना श्री.बाळ भाटे सरांचे मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. त्यांचे पाठांतर, गाण्यांना चाली लावण्याची पद्धत, वाखाणण्याजोगी होती. श्री.भाटे सर मुळात इंग्रजी विषयाचे शिक्षक. ते उत्तम नाटककार होते. परिपाठात ते स्वतः प्रार्थना म्हणत. त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केलेली सरस्वती वंदना ही पेठे विद्यालयाची अनेक वर्षे प्रार्थना होती. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ", महन मंगले ज्ञानदेवते प्रणाम तुज माऊली,"या गीतास श्री.भाटे सर यांनी चाल दिली. परिपाठात हे गीत मुलांना ऐकविले जात. श्री.भाटे सर गीत रामायण उत्तम रीतीने सादर करीत. भावगीत गायनात त्यांचा हातखंडा होता. सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार श्री. गजाननराव वाटवे यांचे ते शिष्य होते. रामनवमीच्या काळात श्री.भाटे सर शाळेत रजा काढून गीत रामायणाचे कार्यक्रम मंदिर परिसरात करीत असत. या कार्यक्रमात तांबट सर तबल्यावर साथ करीत.भाटे सरांच्या मुळे श्री.गजाननराव वाटवे यांची भेट तांबट सरांना घेता आली.
प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन शिक्षक झालेले श्री.अनंत केळकर यांची गीत रामायण सादर करण्याची वेगळीच स्टाईल होती. ते स्वतः अत्यंत शिस्तप्रिय गायक होते. शाळेतील समारंभामध्ये स्वागतगीताची जबाबदारी श्री. केळकर सर स्वतः खांद्यावर घेत असत. शाळेच्या विविध समारंभात, गणेश उत्सवात सक्रिय सहभाग घेत. दिंडी पथक कलात्मक दृष्ट्या सादर करत. श्री.द.रा वैद्य ,श्री.बा.गो. दंडगव्हाणे, श्री.चंद्रकांत भालेराव,सौ.तारा रत्नपारखी, सौ.हिरा देवचके यांचादेखील सहभाग वाखाणण्याजोगा असे.
१९७० मध्ये श्री.ग.शं.देशमुख सर ,पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. ते पांढराशुभ्र सदरा आणि पॅन्ट परिधान करत. अत्यंत शिस्तप्रिय होते. स्टाफ रूम मधील शिक्षक त्यांना मामा म्हणत. त्याच काळात श्री. धुं. शा.देशपांडे हे एक नामवंत अभ्यासू शिक्षक होते. त्यांना सर्व शिक्षक काका म्हणत. पेठे विद्यालयात काका आणि मामा यांची जोडी प्रसिद्ध होती.
श्री.व.र. ठकार, इंग्रजी विषयाचे व्यासंगी शिक्षक, साहित्यिक आणि अत्यंत हुशार मुख्याध्यापक होऊन गेले.
१९७३- ७४ या काळात श्री.ब.चिं.सहस्त्रबुद्धे हे एक आदर्श मुख्याध्यापक होऊन गेले. हे वर्ष पेठे विद्यालय आणि नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. संस्कृत आणि इंग्रजी या विषयांचा सरांचा दांडगा व्यासंग होता. अत्यंत स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय, साहित्यिक, कलाप्रेमी म्हणून सहस्रबुद्धे सरांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. नाशिकच्या सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रांमध्ये सहस्रबुद्धे सरांचा लौकिक होता. लोकहितवादी मंडळाचे ते अनेक वर्षे सेक्रेटरी होते. त्याकाळात पेठे विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाटकांच्या तालमी होत. त्याकरिता सहस्त्रबुद्धे सर जातीने हजर असत. नवोदित कलाकारांचे कौतुक करत. त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत.
"मार्शल" या नावाने शिक्षकांमध्ये ओळखले जाणारे एन.सी.सी. चे शिस्तप्रिय शिक्षक, श्री.अ. द.लेले उत्तम प्रशासनासाठी प्रसिद्ध होते. ते मूळचे इंदूरचे असल्याने त्यांच्या मराठी बोलीत हिंदीची लकब जाणवत असे.
मूळचे सांगली - मिरजेचे असलेले, श्री. वि. अ. साठ्ये सर ,व्यायामाचे उत्तम शिक्षक होते. अत्यंत शिस्तप्रिय म्हणून विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा दरारा असे. हलगीच्या तालावर लेझीम पथक, ही त्यांची खास ओळख होती. ते स्वतः उत्तम हलगी वाजवत.
इंग्रजी विषय शिकविण्यात हातखंडा असलेले, शिस्तप्रिय श्री.एस.के. कुलकर्णी सरांनी देखील पेठे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची धुरा काही काळ समर्थपणे पेलली.
श्री. गो. ग. गुजराथी सर १९७४ च्या दरम्यान पेठे विद्यालयात मुख्याध्यापक होते. ते सतत इतरांना मदत करीत असत. विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित करण्यावर त्यांचा कायम भर असे.
नाशिकच्या साहित्यिक परिघात बाळासाहेब या नावाने परिचित असलेले श्री.श्री.शं.सराफ, मराठी विषयाचे व्यासंगी शिक्षक, उत्तम वक्ते व साहित्यिक दर्जा असलेले मुख्याध्यापक होते. पेठे विद्यालयाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी, सुप्रसिद्ध साहित्यिक वा.कृ.चोरघडे आले असताना,त्यांचा परिचय करून देण्याचे काम सराफ सरांकडे होते. एका साहित्यिकाचा परिचय त्यांनी इतक्या उत्तम रीतीने केला की, वा. कृ. चोरघडे यांनी बाळासाहेबांची पाठ थोपटली. एका साहित्यिकाने साहित्यिकाचा परिचय करून दिला, अशा शब्दात सराफ सरांचा गौरव केला.
इंग्रजीचे व्यासंगी आणि शिस्तप्रिय श्री.का.वि.जोशी सर काही काळ पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. एकदा नियोजनाचा कागद दाखविण्यासाठी तांबट सर त्यांच्या कार्यालयात गेले. तयार केलेला कागद त्यांनी सरांच्या पुढे ठेवला. श्री.जोशी सरांनी तो कागद फाडून टाकला. आणि म्हटले," नियोजन जर तू स्वतः केलेले असेल, तर मला पुन्हा तयार करून दाखव."एखाद्याची परीक्षा घेण्याची त्यांची अशी अनोखी रीत होती.
त्याकाळातील पेठे विद्यालयातील टीचर्स रूम मध्ये केवळ कपाटाचे पार्टिशन होते. स्त्री शिक्षिका आणि पुरुष शिक्षक यांचा उत्तम संवाद असे. सौ शकुंतला बा. फडके, या विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये प्रिय असलेल्या शिक्षिका होत्या. स्वभाव अत्यंत प्रेमळ, परंतु स्पष्ट वक्त्या. तांबट सर उत्तम कला शिक्षक होते. याबाबत मातृहृदयी व कलाप्रेमी असलेल्या फडके बाई त्यांचे नेहमी कौतुक करीत असत.श्री.रमेश देशमुख सर मार्गदर्शक म्हणून तांबट सरांना लाभले.
एकाच दिवशी नोकरीला लागलेले श्री.वि.भा. देशपांडे ..एक उत्तम मित्र व अभ्यासू शिक्षक होते. तांबट सरांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी होत. मुलांकडून आखीव-रेखीव कार्यक्रम बसवून घेत. त्यांची स्मरणशक्ती वाखाणण्याजोगी होती. विनोदी स्वभावाचे विद्यार्थीप्रिय गणित व विज्ञानाचे शिक्षक श्री.बा.ज. कपिले, स्टाफ रूम मधले वातावरण हलके फुलके ठेवत.
श्री.रा. दा. रानडे, हे पेठे विद्यालयात चित्रकला व हस्तकलेचे शिक्षक होते. त्यांनी क्राफ्ट टीचर कोर्स तांबट सरांना आग्रहाने करावयास सांगितला. अत्यंत आपुलकी आणि जिव्हाळ्याने नवीन नोकरी लागलेल्या शिक्षकांशी ते वागत.नीटनेटकेपणा आणि उत्तम फाईलींगची कला तांबट सर त्यांच्याकडून शिकले.
श्री.बा.गो.दंडगव्हाणे आणि श्री चंद्रकांत भालेराव यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या एका स्पर्धेसाठी, संपूर्ण शिवचरित्र पेंटिंग च्या स्वरूपात गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल च्या दालनात प्रदर्शन भरविले. असंख्य लोकांनी ते प्रदर्शन पाहिले आणि संपूर्ण जिल्हाभर पेठे विद्यालयाच्या शिक्षकांचा गौरव झाला. सर्व कला शिक्षकांच्या बरोबर गुणगौरव समारंभ, स्नेहसंमेलन याकरिता आवश्यक डेकोरेशन किंवा सजावट तांबट स्वतः करत.
श्री.चंद्रकांत भालेराव आणि श्री.तांबट सर दोघेही कलाशिक्षक असल्याने दोघांची चांगली गट्टी जमली. भालेराव सरांचे अक्षरलेखन ,नीटनेटकेपणा ,उत्साह उल्लेखनीय असे. दोघेही एकमेकांना सहकार्य करीत. श्री.भा रा.सूर्यवंशी, श्री.राठी,श्री.एम.पी.कुलकर्णी, श्री. पां. म. अकोलकर ,श्री.डी.एस.कुलकर्णी, श्री.दि. कृ.गोटखिंडीकर,श्री.मो.रू.ओसवाल,सौ.वृंदा देशपांडे, सौ.शुभदा मुळे, श्री चंद्रशेखर वाड यासारख्या गुरुजनांचे मार्गदर्शन व सहकार्य तसेच प्रेरणा व प्रोत्साहन मिळत असे.
खऱ्या अर्थाने पेठे विद्यालयात उत्तमोत्तम व्यासंगी शिक्षक होते. आपापल्या विषयांबरोबरच कलाक्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, त्यांचे नाव सर्वदूर लौकिकास पात्र होते. गुणग्राहकता, शिस्तप्रिय, नेतृत्वाचे उत्तम गुण, पेठे विद्यालयाच्या शिक्षकांच्या अंगी होते. शैक्षणिक प्रगती बाबत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ख्याती पसरली होती. कला, क्रीडा, वक्तृत्व, शिस्त, संस्कार, स्पर्धा ,शैक्षणिक निकाल, अशा सर्वच बाबतीत पेठे विद्यालय अव्वल होते. यामागे शिक्षकांची मेहनत होती. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची प्रेरणा आणि प्रोत्साहन देखील तितकेच महत्त्वाचे होते.
अशा गुणसंपन्न, गुणग्राहक शिक्षकांच्या सहवासात राहून तांबट सरांवर पेठे विद्यालयाचे संस्कार झाले.. कायमस्वरूपी टिकणारे !
१९७० सालची गोष्ट असावी. ऑर्केस्ट्रा साऊंड अँड सिंफनी मध्ये सुधीर सराफ यांच्याबरोबर श्री. नवीन तांबट काम करीत असत. रोज संध्याकाळी एम.जी. रोड वरील अमर फोटो स्टुडिओ च्या समोर,हारून बागवान आणि मित्र कंपनी सोबत कट्ट्यावरच्या गप्पा रंगत.
गप्पांमध्ये श्री. बाम यांनी," माझी मुलगी छान गाणं गाते. एकदा गाणे ऐकायला तुम्ही घरी याल का ?"असे हारून बागवान यांना विचारले. श्री. बाम यांनी कट्ट्यावरील या कलाकार मित्रांना मुलीचे गाणे ऐकण्यासाठी वकील वाडीतील घरी नेले. मुलीने , चि.शुभदा हिने ,वाणी जयराम यांच्या आवाजातील गुड्डी चित्रपटातील गाणे म्हटले.
" बोले रे पपीहरा , पपीहरा..
नीत घन बरसे, नीत मन प्यासा,."
हार्मोनियम वर हारुण बागवान तर तबल्यावर साथ संगीत श्री.नवीन तांबट यांनी केली. तबल्याचा ताल आणि वाणीचा सूर जुळला ! अधून मधून गाण्याच्या निमित्ताने येणे जाणे सुरु झाले. चार वर्षानंतर प्रेमाचे रुपांतर विवाहात झाले.
सौ.शुभदा बाम- तांबट यांच्या गाण्यात परफेक्शन आहे. एक शिस्तप्रिय गायिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. एका कार्यक्रमात एकाच वेळेस २८ गाणी त्यांनी गायली, हे पाहून श्रोते मंत्रमुग्ध झाले.
श्री.नवीन तांबट यांना दोन अपत्ये, सौ. गीतांजली ही देखील उत्तम गाणी गाते. मुलगा निनाद हार्मोनियम ,पियानो वादनात तरबेज आहे.
प्रारंभीच्या काळात श्री.नवीन तांबट व सौ.शुभदा बाम - तांबट स्वरधारा हा कार्यक्रम करीत असत. आशा भोसले या त्यांच्या आवडीच्या गायिका. आशाबाई यांच्या वाढदिवसाच्या निमित्त १९९३ यावर्षी चांदणे शिंपीत जाशी हा आशाताईंच्या गीतांवर आधारित कार्यक्रम तांबट दांपत्याने केला. तेव्हापासून सलग चाळीस वर्षे देश-परदेशात हा कार्यक्रम सुरू आहे.१९९१ पासून संगीताचे क्लासेस घेऊन श्री.व सौ.तांबट संगीत सेवा करीत आहेत.
मराठी - हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलाकारांबरोबर काम करण्याची संधी श्री. व सौ. तांबट यांना मिळाली. सौ.प्रमिला दातार, विश्वनाथ बागुल, उषा मंगेशकर, नितीन मुकेश, शत्रुघ्न सिन्हा यांच्या बरोबर श्रोत्यांसमोर कार्यक्रम सादर केले. एका कार्यक्रमात पं. हृदयनाथ मंगेशकर यांना तबल्यावर साथ संगत करण्याची संधी अचानक मिळाली. श्री.जयवंत कुलकर्णी, रंजना जोगळेकर ,श्री.गजाननराव वाटवे यांचा कार्यक्रमाच्या निमित्ताने सहवास लाभला. श्री. यशवंत देव, रवींद्र साठे, आनंद मोडक, श्रीनिवास खळे, अनिल मोहिले, सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांच्याशी तबल्याने ओळख करून दिली.
२००८ यावर्षी मॉरिशस येथे नाशिकच्या कलाकारांसोबत मराठी गाणी सादर करण्याची संधी मिळाली.२०१८ मध्ये जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दुबई येथे कार्यक्रम सादर करता आला. भारतात गुजरात, मध्य प्रदेश इत्यादी ठिकाणी सतत कार्यक्रम होत असतात.
संगीताने तांबट सरांना काय दिले? प्रसिद्धी, उत्तम सहचारिणी, श्रोत्यांची वाहवा ,मोठ्या दिग्गज कलाकारांचा सहवास, आत्मिक समाधान आणि प्रचंड लोकसंग्रह !
तीच गोष्ट शाळे बाबतही... पेठे विद्यालयामुळे एक ओळख निर्माण झाली. शिक्षक म्हणून प्रसिद्धी मिळाली. सामान्यपणे अनेकदा कलावंत मंडळी कार्यक्रमानंतर पेल्यात उतरतात !! तांबट सरांचे मात्र तसे झाले नाही. कारण शहरभरात पेठे विद्यालयाचे विद्यार्थी कुठेतरी भेटतातच. आपण शिक्षक आहोत, आपल्याला कोणतेही व्यसन शोभणार नाही. असे त्यांना सतत वाटे. याचे सर्व श्रेय पेठे विद्यालयाला जाते.
म्युझिक मुळे शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले राहिले. कले मुळेच मन निर्मळ राहिले.
सार्वजनिक वाचनालय नाशिक, तसेच लोकहितवादी मंडळ यांच्या विविध समारंभामध्ये काम करीत असल्यामुळे नाशिकला येणाऱ्या पाहुण्यांबरोबर सतत कुसुमाग्रजांची भेट होत असे. कविवर्य कुसुमाग्रज यांचे आशीर्वाद त्यानिमित्ताने लाभत.
श्री.पांडुरंग मनोहर अकोलकर हे श्री.तांबट सरांचे बालमित्र. शाळेत देखील अकोलकर सरांच्या बरोबर काम करताना आनंद मिळत असे.
बालनाट्य,फोटोग्राफी मध्ये माहीर असलेले कै. दत्ता नागपुरे यांच्याशी सरांची घनिष्ठ मैत्री ! १९७० ते २०१८ पर्यंत एकत्र तबलावादन करणारे श्री.सुहास उर्फ नाना खरे ... तांबट सरांचा सच्चा मित्र ! त्यांना तबल्याची खूपच चांगली समज आहे. दोघांना एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी इतकी आहे की, आजही एकमेकांशिवाय त्यांना करमत नाही. कौटुंबिक अडीअडचणीत एकमेकांना सतत मदत करीत असतात. तबला हे एकच वाद्य ते वाजवीत असूनही दोघांमध्ये आजपर्यंत कधीही वाद झाला नाही. नानांचा ताल, सुरांचा प्रचंड अभ्यास आहे. स्वरवंदना या कार्यक्रमाच्या माध्यमातून तांबट सरांची, नाना खरे यांच्याशी ओळख झाली. ती आजतागायत टिकून आहे. सांस्कृतिक महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांचे २०१८ हे जन्मशताब्दी वर्ष. याचे औचित्य साधून नाशिक एज्युकेशन सोसायटीने श्रीमती रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने "शब्द सुरांच्या गाठी भेटी"हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाची धुरा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त असून सुद्धा श्री.तांबट सर यांचे वर सोपवली. कार्यक्रमात नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधील शिक्षक- शिक्षिकांनी गाणी सादर केली. गाण्याच्या निवडीपासून सराव करून घेण्यापर्यंत श्री.तांबट सरांनी प्रचंड मेहनत घेतली. याप्रसंगी ,श्री.नाना खरे यांनीदेखील तांबट सरांना साथ केली. दोघांच्या संगीत संयोजनाने कार्यक्रम वेगळ्याच उंचीपर्यंत जाऊन पोहोचला! श्री.नवीन तांबट आणि श्री.नाना खरे यांच्या तबला वादनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. यावेळी श्रोत्यांकडून मिळालेला टाळ्यांचा कडकडाट दोघांच्याही दृष्टीने कोणत्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ होता! त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर भरभरून दिसत होता!!
अजात शत्रू असलेले ,श्री नवीन भाई तांबट... यांनी आजपर्यंत कधीही कोणाशी वाद-विवाद केला नाही. प्रत्येक गोष्टीत ॲडजस्टमेंट केली. स्वतःचे वय विसरून काम केले. सर्वांना सहकार्य करून कामाचे श्रेय कधी लाटले नाही. तन मन झोकून देऊन विद्यार्थ्यांना शिकविले. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले. सेवानिवृत्तीनंतर देखील तांबट सर सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर यांचे आधारस्तंभ बनले आहेत.
नवीन ,तरुण शिक्षकांनी तांबट सरांकडून हे गुण घ्यायला हवेत. प्रवाहाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे. मेहनत, जिद्द आणि सहनशीलता अंगी बाणली पाहिजे. प्रत्येकात काही ना काही तरी गुण असतातच. कोणालाही कमी लेखू नका ,असे तांबट सर नेहमी सांगतात.
नावाप्रमाणेच नित्यनूतन,तरुण असणाऱ्या कलाप्रेमी ,अजातशत्रू ...श्री.तांबट सरांना विनम्र अभिवादन !
लेखन
श्री शैलेश पाटोळे
नाशिक.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
लेख आठवा.......✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️