कोण समय येईल कैसा l
याचा न कळे भरवसा l
जैसे पक्षी दाही दिशा l
उडून जाती ll
एखाद्या झाडावर अनेक पक्षी अलगद विसावले असावेत. वाऱ्याच्या संगतीनं फांदीवर मजेत डोलत असावेत आणि अचानक बंदुकीच्या आवाजाने क्षणार्धात उडून जावेत तसा अंत:काळ असतो. या देहवृक्षावर मजेत विसावणारे पंचप्राणांचे आणि पंचज्ञानेंद्रियांच्या चेतनेचे पक्षी मृत्यू येताच या देहवृक्षाला सोडून भर्रकन उडून जातात.
जीवाचा जन्म होताच त्याचा मृत्यू देखील ठरलेलाच. तो अटळ आहे आणि हेच वास्तव देखील! निसर्गाच्या या नियमाला कुणीही अपवाद नाहीत. चौर्यांशी दशलक्ष योनीतून प्रवास करणारा जीव शेवटच्या टप्प्यात मनुष्य देहात जन्माला येतो. या जन्मात पुण्य कर्म करून आत्म्याला गती... अर्थात मुक्ती मिळण्याची संधी मिळते. पुण्यकर्माचे संचित वाढले की,या चक्रातून जीवाची मुक्ती होऊन स्वर्गसुखाची प्राप्ती होते, असे आपले पुराण सांगते. असेलही.....
मृत्यूनंतर आत्मा मुक्त होऊन शरीर सोडून जातो. हे खरे असले तरी त्याच्या रक्ताच्या आणि जिवाभावाच्या लोकांसाठी त्याची काळीज कुपितली आठवण कायम स्मरणात राहते. मग ती आठवण नात्यांची असो की सगेसोयऱ्यांची ! आठवण ही सतावतेच.. नकळत कॅलेंडरच्या पानांवरून नजर फिरते. तो महिना.. ती तारीख... तो दिवस... तो प्रहर.... सार काही आठवतं. येण्याचा आनंद आणि जाण्याचा दुःख यामधली जागा तुम्ही कशी भरून काढता यावर आठवणींची तीव्रता अवलंबून असते. जाणारी व्यक्ती जर आपले जन्मदाते असले तर.... केवळ कल्पनेनेच कंठ दाटून यावा. मन सैरभैर व्हावं. झाडाच्या फांदीवर आलेलं फुल कोणीतरी बळजबरीने तोडून घेऊन फांदीपासून अलग करतं ...तसं वाटावं. उगमालाच पारखं झालेलं पाणी कुठेतरी जमिनीत मुरून आपलं अस्तित्वच गमावून बसावं ...अशी अवस्था जन्मदाते आपल्याला सोडून गेल्यानंतर व्हावी. शेवटी निसर्गाचा नियम... असे म्हणून मनाचं समाधान करून घ्याव. परंतु प्रश्न उरतोच.. कोण मी? कुठून आलो?...
आयुष्याच्या संध्याकाळी असले प्रश्न मनाला तर आवर्जून सतवतातच. मुलं - नातवंड, सारे आपापल्या कामात व्यस्त. तब्येतीच्या कुरबुरी, गोळ्या -औषध,दवा -डॉक्टर सोबतीला असतात. सारी भौतिक सुख आहेत. खानं -पिनं, कपडे लत्ते ,साडीचोळी कशाची ददात नाही.
आयुष्यभर दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानणाऱ्या आपल्यासारख्यांना भरून आलेलं मन हलकं करण्याची हक्काची जागा हवी असते. सुना नातवांच्या भरलेल्या घरात आणि नात्यात दुर्दैवाने अशी जागा मिळू शकत नाही. मग अशावेळी आवर्जून आठवण होते..."आईची" तिचा एक कटाक्ष आणि अलवार स्पर्श मनाला शांती आणि तृप्ती देऊन जातो.आकाशात दाटून आलेले ढग नाही का पृथ्वीकडे पाहून स्वतःला रीते करून घेत..!
"अगं ऐकतेस का?"
"काय हो...थांबा जरा मी देवघरात पणती लावते. आलेच....
बोला काय हवंय ?"
"भिंतीवरचं ते कॅलेंडर पाहिलस का?"
"हो,कॅलेंडर सारखं कॅलेंडर ते. त्यात काय पाहायचं!"
"अगं,गेली चार-पाच दिवस मी रोज बघतोय एक पाकोळी रोज येऊन एकाच जागेवर बसते य."
"अहो, पावसाळ्याचे दिवस आहेत. पाकोळ्या घरभर दिसणारच. रात्री दिव्यापुढे भिरभिरतात आणि दिवसा बसतात दिवे लागण्याची वाट पाहत!"
मी संवादाला विराम दिला. एव्हाना दुपार भरली. जेवण आटोपले. निवांतक्षणी वामकुशी घेण्यापूर्वी सोफ्यावर टेकून हातात पेपर घेऊन वाचत बसले.यजमान कधी घोरायला लागले ते कळले देखील नाही! माझ्याही डोळ्यांना झोपेची चाहूल लागली.अचानक लक्ष भिंतीवरच्या कॅलेंडरकडे गेले.काळपट करड्या रंगाची ती इवलीशी पाकोळी दिसली. का.. कुणास ठाऊक ती पाकोळी ज्या जागेवर बसली होती...त्यावरून ती मला काहीतरी खुणवत असल्याचा भास झाला. पाकोळी बसली होती ती तारीख बुधवार, सहा ऑगस्ट... गेले चार-पाच दिवस त्याच तारखेवर बसून जणू ती त्या दिवसाची आठवण करून देत असावी... माझ्या दृष्टीने त्या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्व ...अंगावर शहारे उभे राहिले...ती पाकोळी मला छत्तीस वर्षे मागे घेऊन गेली.....
शेतात निंदनीची कामे सुरू होती. मुलं शाळेत गेली होती. दहा-बारा मजुरांबरोबर आनंदाने आम्ही दोघेही राबत होतो.
दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाले बहर
झाली शेतामधी दाटी.
बहिणाबाईच्या ओव्या एकापाठोपाठ म्हणण्यात साऱ्या बाया गर्क होत्या.अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी... गुडघाभर वाढलेलं हिरवगार पीक...सारं काही मनाला आल्हाद देत होतं.त्यापुढे कष्ट कधी जाणवत नव्हतं. वाऱ्यावर डोलणारं पीक उद्याच्या आशा पल्लवीत करीत होतं. दिवस उतरणीला आला.. तसा आयाबायांच्या कामाला देखील वेग आला होता.
लहानगा दिर श्याम धावत पळत गावातून शेतात आला. हातातल्या कागद ह्यांच्या हाती देत म्हणाला,"पोस्टमनने तार दिली आहे." ह्यांनी तार वाचली आणि धीर गंभीरपणे माझ्याकडे पाहिले... तुझी आई सोडून गेली..!
ऐकून काळजात धस्स झालं. विश्वासच बसेना .हातातला विळा तसाच मातीत खूपसलेला राहिला. अंगात त्राण उरला नाही. धायमोकलून रडू लागले.आभाळ फाटलं होतं. हा आघात पचवणं मला शक्य नव्हतं. आकस्मित आईच्या निधनाची वार्ता ...विश्वासच बसेना. आजार नाही, दुखनं नाही, नुकतंच मुख्याध्यापक म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेऊन ती मुंबईला मुलाकडे सुना नातवांमध्ये राहू लागली होती. मग असं अचानक का व्हावं? मनात भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ माजला. आईच्या शेवटच्या दर्शनासाठी दोन -अडीचशे किलोमीटरचं अंतर जावं लागणार होतं. फक्त एसटीचाच पर्याय. कोणाकडून तरी जुजबी पैशांची व्यवस्था केली. जाण्यासाठी सात-आठ तास तरी लागणार होते. दुर्दैवाने तिचे अंत्यदर्शन देखील होऊ शकले नाही. तेव्हा परिस्थिती नव्हती... म्हणून आईचे अंत्यदर्शन होऊ शकलं नाही. आज परिस्थिती चांगली आहे.. पण जिवाभावांच्या नात्यांमध्ये ओढ राहिली नाही...
सहाच्या अंकावर पंख पसरून बसलेल्या पाकोळी जवळ गेले.जणू आईने आपल्या डोक्यावर तिच्या साडीचा पदर टाकल्याचा भास झाला.अलगद बोटांनी तिच्या पंखांना स्पर्श केला. कंठ दाटून आला... तिच्या आठवणीनी...
पारनेरचे श्री.झिपरू दादा आणि सौ. अनसुयाबाई यांच्या पोटी जन्मलेल्या दोन मुलींपैकी शांताबाई... स्वभावाने तितकीच शांत आणि संयमी! पाच वर्षांची असतानाच आईविना पोरकी झालेली... तिचे एक मामा धुळ्याचे मामलेदार होते.त्यांनी शांताला शिक्षण आणि तिचा सांभाळ व्हावा, या हेतूने त्यांच्याकडे नेले.लहानगी शांता घरची सर्व कामे करी.लहान मुलांचा सांभाळ करी. मामांच्या ओळखीतले आणि संबंधातले पेशाने शिक्षक असलेल्या श्री.भगवंतराव यांच्याशी शांताचा विवाह ठरवला.शांता त्यावेळी पाचवीत शिकत होती.मुलीला सातवी शिकवून नोकरी करू देण्याच्या अटीवर मामांनी लग्न ठरवले होते.
सारं काही ठरल्याप्रमाणे झाले. नोकरी लागण्यापूर्वीच इंदूताईचा जन्म झाला. होता तिचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिला काही दिवस पारनेरला ठेवले. खेळण्या- बागडण्याच्या वयात जबाबदारीचे जू खांद्यावर पेलवत ती संसाराचा गाडा ओढत होती. नवऱ्याचा स्वभाव समजून संसार करीत होती. दरम्यान शेहेचाळीसच्या ऑगस्ट महिन्यात सिंधुताईचा जन्म झाला.लागोपाठ दोन मुलींचा जन्म झाला.गुरुजींचा पारा चढला. ते तिलाच दोष देऊ लागले.आई विना पोरकी असलेल्या तिची परमेश्वराला कीव आली असावी... पुढच्या वेळी विजू दादा आणि अशोक दादा अशी दोन मुले उदरी जन्माला आली. नंतर मी आणि नंदा..
लहरी स्वभावाच्या नवऱ्याबरोबर संसार करताना स्त्रीच्या मनाची काय कुचंबना होत असेल,ते आई तुझ्याकडे पाहून कळते.आमच्या सर्वांचा मोठा भाऊ सुभाष दादाला कधी परकेपणाची जाणीव होऊ दिली नाहीस आणि तोच संस्कार आमचे वर केलास.सात अपत्यांच्या आणि तिरसट आणि स्वकेंद्री नवऱ्याबरोबर संसार म्हणजे तुझी सत्वपरीक्षाच ! परंतु कायम हसरा असणाऱ्या चेहऱ्याने तुझं दुःख कधी तू इतरांना दाखवले नाहीस. आम्ही लहान होतो तेव्हा याचे गांभीर्य कळले नाही; परंतु आज वाटते.. कसे मॅनेज केले असशील तू? स्वतःचे सासर- माहेर, मुला- मुलींचे शिक्षण, त्यांची लग्ने, सण-श्राद्ध, सर्वांचा मान-पान हे सर्व प्रामाणिकपणे नोकरी करून करणे म्हणजे तारेवरची कसरत! खरे तर तुझ्या संयमाची परीक्षा होती ती! या परीक्षेत तू खरी उतरलीस . तुझा हाच आदर्श आम्ही सांभाळून आहोत.
इतर मुलींच्या तुलनेत माझे शिक्षण बरे झाले असतानाही मला शेतकरी नवरा मिळाला. त्यामुळे माझी तुला फार चिंता असायची. खरे सांगू..? तुझ्या स्वभावातला संयम आणि प्रत्येक संघर्षाला तोंड देण्याची वृत्ती याचं बाळकडू आम्हाला मिळालं होतं. म्हणूनच मी निभावू शकले.अन्यथा... शेतकामाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्या 'मातीत सामावून जाणं ' अशक्य होतं.अर्थात सासू-सासरे देव माणसं. त्यांनी कधी मला खचू दिले नाही. उलट शिकलेली समजूतदार सून म्हणून त्यांना माझा खूप अभिमान होता. विहिणीच्या निधनाची बातमी कळताच धायमोकलून रडणाऱ्या तीर्थ स्वरूप भागाबाई सारख्या सासू विरळच!
गावातल्या घरी पोस्टमनने आणून दिलेलं.. तुझं पत्र आठवणीने त्या स्वतः घेऊन यायच्या." रत्ना बाईंचं पत्र आलय.." त्यात तू त्यांची ख्याली - खुशाली विचारल्याचं ऐकून काय आनंद व्हायचा त्यांना! शिकल्या नव्हत्या त्या. पण सुसंस्कृतपणा ठासून भरला होता त्यांच्यात. असो..
तू जाऊन बरीच वर्षे झालीत.इकडे आम्ही सर्व क्षेमकुशल आहोत.मुलं सुना नातवंड-पतवंड सारं काही मनासारखं झालंय. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला गोड फळ येतात..अगदी तसं..!
अगं,एक विचारायचंच राहिलं!... विजू दादा भेटला का ग तुला? आईकडे जातो,असे सांगून गेला अजून परतलाच नाही! तुझ्यानंतर आमची 'आई ' बनून राहिला होता.निरोप दे त्याला... तुझीही बाग फुलली आहे म्हणावं..! सतत त्याच चिंतेत असायचा.
श्रावणातल्या बरसणाऱ्या हलक्या अन आल्हाददायक सरींसारखं तू भरभरून साऱ्यांना मुक्तहस्ताने आपुलकीचं,संस्काराचं,संयमांचं,कष्टाचं, समाधानाचं, प्रेमाचं दान दिलं. आता तू जिथे गेलीस तेथेही तू तुझ्या मधाळ स्वभावानं इतरांना आपलंसं करून घेतलं असेल, यात काही शंका नाही.
रोज सायंकाळी देवघरातल्या देवापुढे दिवा लावून ईश्वरापुढे नतमस्तक होण्याचा तुझा संस्कार आजही जपून आहोत. कारण त्या निमित्ताने का होईना त्या तेजोदीपा पुढे डोळे बंद केले की, तू दिसतेस..! देवापुढे डोकं ठेवलं की, तुझ्या मांडीवर पहूडल्याचा भास होतो....
कशी आहेस? आता असे विचारण्यात काय अर्थ.. पण तरीही विचारते.. काळजी घे.
जन्म आणि मृत्यूवर शूद्र मानवाचं नियंत्रण नाही. परमेश्वराला एकच विनंती.. पुढे मनुष्य देहात जन्म मिळाला तर ती कुस तुझीच मिळू दे...!
दीपोत्सवानं श्रावणाचं स्वागत होतं. सारी सृष्टी हिरवाईंना नटते. व्रतवैकल्ये सण-श्राद्ध सुरू होऊन सारे उल्हासित असतात आणि..." तुझं इहलोकीचे कर्तव्य संपले. तुला आता निघावं लागणार."असा परमेश्वराचा सांगावा आला आणि तू आज्ञा निमूटपणे पाळलीस देखील... आपली शेवटची भेट कधी आता नीटसे आठवत नाही.
इहलोकाचा प्रवास संपला की पुढे काय? याचं गुढ स्वतः गेल्याशिवाय कळत नाही. जिथे कुठे असशील ...आनंदी राहा आणि श्रावणातल्या सरींसारखा तुझा कृपाशीर्वाद सतत आमच्यावर बरसत राहू दे...
गेली चार-पाच दिवस सहा तारखेवर ठाण मांडून बसलेली ' ती ' पाकोळी अचानक गायब झाली... पण तुझ्या आठवणीचा पाऊस मात्र संततधारेसारखा बरसतच आहे... आणि तो बरसतच राहील... अखंड... अव्याहत... श्वास असेपर्यंत...!!
सौ.रत्ना
नाशिक.
दि.६ ऑगस्ट २०२२