Monday, June 29, 2020
संघर्षाची स्मरणगाथा ..श्री.संजय सदाशिव जोशी
Saturday, June 20, 2020
बाप नावाचा माणूस...
बाप नावाचा माणूस.........
२०१०-११ चे वर्ष, तारीख निश्चित आठवत नाही. शाळेच्या कामानिमित्ताने, मी मुंबई येथे गेलेलो होतो . परतीच्या प्रवासात कसारा घाटाजवळ असताना ,आईचा माझ्या मोबाईलवर फोन आला. दाटल्या आवाजात ,"तुझ्या पप्पांना बरे नाही", असे तिने सांगितले. गाडी घाटात असल्यामुळे मोबाईल ला फारशी रेंज नव्हती. फारसे गंभीर नसावे, असे समजून ,मी नाशिकला आल्यावर फोन करतो, असे सांगितले.नाशिकला परत येईपर्यंत रात्र झाली. घरी आलो. घरात वैशाली आणि मोनू.. दोन वर्षाचा असेल ! नेहमीपेक्षा वैशालीच्या चेहर्यावर गंभीर भाव होते. काय झाले ? असे मी तिला विचारताच, ती मला बिलगुन रडायला लागली ! माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली !! आईने मला तसे काही सांगितले नव्हते. मी तसाच खोलीत गेलो. दरवाजा बंद केला आणि आईला फोन केला. रडता रडता, तिने पप्पांना हार्ट अटॅक आला आहे, असे सांगितले. क्षणभर मी काय ऐकतो आहे, याच्यावर माझा विश्वास बसेना. मी पुरता गांगरून गेलो ! भावनांचा कल्लोळ दाटून आला. मी आईला धीर देण्याच्या ऐवजी ,आई मला फोन वरून धीर द्यायला लागली.कारण शब्दांच्या ऐवजी माझे हुंदके तिला फोन वरून ऐकू येत होते. माझ्या संवेदनशीलतेची आणि भावनिकतेची कल्पना घरातल्या सर्वांनाच आहे.
मोठा भाऊ, निलेश दादाने सटाणा येथे नवीन घर घेतले होते. आणि आई पप्पांना अजमीर सौंदाणे येथील शेतातून सटाण्याच्या घरी रहायला आणले होते. तरीदेखील पहाटे उठून पप्पा शेतात जायचे. गाईचं दूध स्वतः काढून ,शेतीच्या कामाची रुजवात लावून, घरी यायचे. दुपारचं जेवण करून पुन्हा ते शेतात जायचे. रात्री झोपण्यासाठी पुन्हा सटाण्याला येत. हा त्यांचा नित्यक्रम. मला आठवते तसं ते पायी किंवा सायकलने प्रवास करायचे. आता आता कुठे सचिन, म्हणजे माझ्या लहान भावाने त्यांना एक लुना घेऊन दिलेली होती. असेच एके दिवशी शेतातून घरी आले. जेवणं आटोपली .जो तो आपापल्या खोलीत झोपी गेले. साडे अकरा बारा वाजेच्या दरम्यान अचानक पप्पांच्या छातीत दुखायला लागले. कळा येऊ लागल्या. संपूर्ण अंग घामाने चिंब झाले. ते जमिनीवर गडबडा लोळत होते. सर्वजण जागे होऊन काय झाले ? म्हणून बेचैन झाले. दादाच्या ते पटकन लक्षात आले. त्याने शेजारी राहणाऱ्या एका मित्राला बोलावले. इतक्या रात्री ॲम्बुलन्स वगैरे मिळणं तसं कठीण होतं. लवकरात लवकर उपचार मिळणं अत्यंत आवश्यक होतं. काय करावे सुचेना. तेव्हा त्याच्याकडे चार चाकी गाडी नव्हती. त्याने हिंमत दाखवली. दुचाकी गाडीवर तो चालवायला बसला, मध्ये पप्पांना बसवले आणि त्याचा मित्र पप्पांना धरून बसला. "थ्री इडियट" सिनेमातल्या कथेप्रमाणे ,त्यांनी मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये पप्पांना ऍडमिट केले. अटॅक येऊन गेल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत पप्पांना वैद्यकीय उपचार मिळाले. त्यांचा पुनर्जन्म झाला ! दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे भाऊ आणि सर्वजण तातडीने हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेलो.आय.सी.यू.मध्ये डॉक्टरांनी जाऊ दिले नाही. काचेतून मी पप्पांना पाहिले. माझ्या कडेवर मी मोनुला घेतले होते. आमची नजरा नजर झाली. मी भावनिक होऊन डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत होतो. मोनूचा चेहरा पाहून पप्पांच्या चेहर्यावर स्मित हास्य उमटले ! घरी जाऊन आईला आधार दिला. ईश्वराने आमच्यावरची मायेची पाखर शाबूत ठेवली होती !! माझ्या जीवनातील आतापर्यंतचा घाबरवून सोडणारा आणि गलितगात्र करणारा पहिला आणि भयंकर प्रसंग होता तो !!!. आजही तो प्रसंग आठवला ,की मन व्याकूळ होते. आपल्या जीवनाची जडणघडण करण्यास, त्याला आकार देण्यास कारणीभूत ठरणारे वडील, आजपर्यंत कधीही दवाखान्यात ऍडमिट झालेले पाहिले नव्हते. काबाडकष्ट करणारे शरीर आज पर्यंत निरोगी राहिले होते. हे अचानक असे कसे झाले? निश्चित कारण नाही. परंतु हार्टअटॅक येऊन गेला हे मात्र वास्तव होते!
स्वभावाने अत्यंत कडक,बळकट शरीर, उंचपुरा देह, गोरेपान, चांगल्या चांगल्या ना लाजवील, असे व्यक्तिमत्व, चालण्या-बोलण्यात रुबाब ! ईश्वराची देणगी जणू !! याबाबत अनेकांना त्यांचा हेवा वाटे. परंतु परमेश्वर सर्वच चांगल्या गोष्टी एकाला प्रदान करीत नाही. त्यात काहीतरी उणीव ठेवतो ! सर्वच गोष्टी जर माणसाला देवाने दिल्या ,तर लोकांना देवाची किंमत कळेल का?
श्री. काळू नारायण पाटोळे उर्फ आप्पा व श्री गजमल नारायण पाटोळे ऊर्फ तात्या हे दोन भाऊ होते. कमी वयातच दोघांची लग्न झालेली. काळू आप्पांना श्री. देवराम, श्री.शंकर ,श्री .पुंडलिक व मंजुळाबाई ही चार अपत्ये. तर गजमल तात्यांना श्री.दिनेश , श्री.जीवन व रंजना अशी तीन अपत्ये होती. काळू आप्पांचा संसार तुलनेने लवकर फुलला. गजमल तात्यांना त्यामानाने वाट पहावी लागली. कुटुंबातील सदस्यांची संख्या भरपूर.परिस्थिती अत्यंत नाजूक. मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका करीत असत. अजमीर सौन्दाने या गावात छोटीशी झोपडी बांधून गावाच्या वेशीजवळ राहत असत. गावात फारसा कामधंदा मिळत नसे. अशावेळी आप्पा आणि तात्या काम शोधण्याच्या निमित्ताने पंचवीस तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगाव शहरात गेले. तेथे एक मुसलमान सद्गृहस्थ भेटले. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय ते करत असत .मुंबईहून कच्चामाल ने आण करीत असल्याने ,मुंबईच्या मार्केटमध्ये देखील त्यांची ओळख पाळख होती. "चप्पल आणि बूट तयार करण्याचे काम कराल का?", असे त्यांनी आप्पांना विचारले. आम्हाला सफाईदार काम येत नाही ,असे आप्पांनी कबूल केले. त्याने तुम्हाला काम शिकवतो. चांगले काम यायला लागल्यावर मजुरी देईल .तोपर्यंत फुकट काम करावे लागेल, असे सांगितले. आप्पा आणि तात्यांनी होकार दिला आणि आणि चप्पल बूट तयार करण्याच्या मूळ व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. प्रशिक्षित कारागिरांकडून हळूहळू कौशल्य त्यांनी प्राप्त केलं. मालक खुश व्हायला लागले. आप्पा आणि त्याची तीन मुले तसेच गजमल तात्या , असे पाच जण त्या मुसलमान गृहस्थाकडे काम शिकले. त्यांच्या कामावर खूष होऊन त्या सद्गृहस्थाने ,"तुम्ही मुंबईला का येत नाही?", म्हणून आप्पांना विचारणा केली. सर्व प्रकारची मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली. सर्व कुटुंबकबिला सौंदाणे येथेच ठेवून, काळू आप्पांनी मुंबई गाठली. बूट तयार करण्याची कला पाहून, मुंबई सेंट्रल भागातील' भेंडी बाजार' परिसरात एक कारखानदार त्यांच्यावर खूप खुश झाला. चांगल्या आणि सफाईदार कामामुळे मालकाचा भरपूर फायदा होऊ लागला. काळू आप्पांनी एक ' पगडी' देऊन मुंबईच्या परेल भागात घर भाड्याने घेतले. भरपूर मेहनत केली. रात्रंदिवस काम करून पै - पै जमवला. दोन पैसे गाठीशी आल्यानंतर त्याच मुसलमान सद्गृहस्थाने," तुम्ही स्वतःचे दुकान का टाकत नाही?", म्हणून काळू आप्पांना सुचविले. घरचेच पाच उत्तम कारागीर हाताशी असताना आपला व्यवसाय छान चालू शकेल, याचा आत्मविश्वास आप्पांना आल्यावर त्यांनी ' माहीम'येथे स्वतःचे दुकान घेतले. सर्व भावांनी मिळून स्वतःच्या मेहनतीने, जिद्दीने दुकान नावारूपास आणले. काळू आप्पांच्या दुकानात तयार होणारे चप्पल आणि बूट अल्पावधीतच प्रसिद्धीस पावले ! आमचे आजोबा ,श्री. देवराम दादा आम्हाला नेहमी मुंबईच्या गमतीजमती सांगायचे. दुकानाच्या प्रसिद्धी बद्दल सांगताना ते नेहमी जुन्या "वक्त "या सस्पेन्स चित्रपटातील राजकुमार यांच्या पायातील पांढऱ्या रंगाच्या बुटाचे उदाहरण हमखास देत असत ! कारण राजकुमार यांच्या पायातील ' तो' बूट खास काळू आप्पांच्या दुकानात तयार झाला होता! हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असे. फिल्मिस्तान स्टुडिओ कडे जाणारा रस्ता दुकानावरून जाई. चित्रपटातील अनेक नट-नट्या त्या रस्त्याने जाताना पाहिल्याच्या आठवणी दादा नेहमी सांगत. त्याकाळात इम्पोर्टेड वस्तूची दुकाने फारसी नसायची. त्यामुळे प्रसिद्धी पावलेल्या काळू आप्पांच्या दुकानावर नट-नट्या देखील अधून मधून चोखंदळपणे खरेदी करायचे. हळूहळू व्यवसायात वृद्धी झाली. बक्कळ पैसा मिळू लागला. काळू आप्पांनी गावाकडून अनेक लोकांना कामासाठी मुंबई येथे आणले.. त्यांना कारागिरांकडून उत्तम पद्धतीने प्रशिक्षण दिले. त्यांच्या राहण्या-खाण्याची ,कुटुंबाची, ची सर्व व्यवस्था केली. हा काळ म्हणजे काळू आप्पांचा आणि त्यांच्या एकत्रित परिवाराचा" सुवर्णकाळ" होता !!
त्याकाळी "जे.जे. अँड सन्स" या नावाचे, एका गुजराती व्यापाऱ्याची पाच चप्पल बुटांची दुकाने होती. मुंबई सेंट्रल ,ग्रँड रोड ,मरीन लाईन्स ,चर्नी रोड आणि प्रार्थना समाज. या पाचही दुकानांना माल सप्लाय करण्याची ऑर्डर काळू आप्पांच्या दुकानाला मिळायची. हलक्या वजनाचे आणि उत्तम दर्जाचे बूट फक्त याच दुकानात, त्याकाळी तयार होत असत. एका मुसलमान गृहस्थाचा बोट धरून मुंबईला आलेले काळू आप्पा आता एका गुजराती व्यापार्यांच्या हातात हात घालून फिरू लागले होते !! मोठ्या जिद्दीने आणि हिंमतीने त्यांनी आपलं साम्राज्य निर्माण केलं. परंतु आपण ज्या परिस्थितीतून इथपर्यंत आलो ,त्याची जाणीव काळू आप्पांना आणि त्यांच्या परिवाराला होती. गावाकडून दवाखान्याच्या निमित्ताने मुंबईला जर कोणी आले, तर त्यांची सर्व प्रकारची जबाबदारी काळू आप्पांचा परिवार उचलत . त्यामुळे गावोगावी काळू आप्पांच्या नावाची महती पसरली.
चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू लागल्यावर, काळू आप्पांनी अजमीर सौंदाणे या आपल्या गावी शेती घ्यायचा धडाका सुरू केला. गावामध्ये शेती विकण्यासाठी काढली की, आप्पा त्याचा सौदा करीत. मुलाबाळांची लग्न झाली. काळू आप्पा आणि गजमल तात्या यांच्या संसाराची वेल बहरू लागली.
माझ्या पप्पांचा जन्म ,मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये १९४९ मध्ये झाला. घरची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम होती. इयत्ता पाचवी पर्यंत त्यांचे शिक्षण परेलच्या" मुन्सिपल हायस्कूल" मध्ये झाले. संपूर्ण कुटुंब एकत्र नांदत होते. परंतु गावाकडे शेतीचा व्याप वाढल्यामुळे पप्पांचे आई-वडील म्हणजे दादा आणि मोठी माय अजमीर सौंदाणे येथे परतले. शिक्षणासाठी पप्पांना परेल येथे ठेवले. परंतु तेथेआई-वडिलांच्या शिवाय त्यांचं मन काही लागलं नाही. किंबहुना मोठ्या कुटुंबात घुसमट होऊ लागली. आईवडिलांकडे ते परत आले. सातवीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतले .आठवी ते पी. डी.पर्यंत सटाण्याच्या मराठा हायस्कूल येथे प्रवेश घेतला. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात प्रवेश घेऊन पदवी शिक्षण "राज्यशास्त्र" या विषयात पूर्ण केले. मालेगाव येथे होस्टेलमध्ये राहून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
१९६४ दरम्यानच्या कालावधीत काळू आप्पांच्या झोपडीचे रूपांतर महाला सारख्या भासणाऱ्या मोठ्या घरात झाले! झोपडी पाडून मोठे आठ खणी घर काळू आप्पांनी उभारले.त्याकरिता पिंपळनेर येथून पाच ते सहा ट्रक सागवानी लाकूड आणले गेले.जवळपासच्या गावातील लाकूड काम करणारे सुतारांना बोलविण्यात आले. पंधरा दिवस या सुतारांना घेऊन मुंबईतील चांगली घरे दाखविण्यात आली. त्यामध्ये गावातील श्री. काशिनाथ मिस्तरी ,ओंकार मिस्तरी ,शंकर आणि दामू मिस्तरी, पंडित शिंदे यांचा समावेश होता. साधारणपणे एक वर्षभर सागवानी लाकडात विविध पशुपक्षी - डिझाईन्स ,कलाकुसर, करण्यात कारागीर दंग होते. त्यातून भव्य असे घर उभे राहिले. जवळपासच्या गावातील अनेक श्रीमंत लोक काळू आप्पा चे घर पाहण्यासाठी खास येत असत. पैसा आणि मन दोन्ही अंगाने श्रीमंत असणारे काळू आप्पा स्वतःच्या हिमतीने प्रसिद्धीस पावले. आल्यागेल्या सर्वांचीच खातरदारी,पाहुणचार होत असे. अडल्यानडल्या ना मदत करीत असे. केलेली मदत या कानाची त्या कानाला कळू देत नसे. लोकही अत्यंत प्रामाणिक होते. शेतीचा व्यवसाय आणि मुंबईच्या दुकानाचा व्यवसाय यामुळे काळू आप्पा आणि परिवाराची भरभराट झाली. पाच-पन्नास लोकांचे कुटुंब काळू अप्पांनी बांधून ठेवले होते. एकतेचे बळ काय असते, हे त्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिले होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात काळू आप्पांना पैसेवाली असामी समजले जात होते ! समाजबांधवांमध्ये त्यांच्या शब्दाला किंमत होती. काळू आप्पांचा शब्द प्रमाण ठरू लागला. काळू आप्पांच्या शेतात उसाचं पीक पाहून लोक आश्चर्याने तोंडात बोटे घालत . काळू आप्पांवर लक्ष्मी प्रसन्न झाली होती!त्यांच्या कष्टाचा आणि प्रामाणिकपणाचे फळ त्यांच्या पदरात पडलं होतं. रावळगाव शुगर फॅक्टरी चे मालक अधून मधून काळू आप्पांना भेटण्यासाठी निमंत्रण धाडत असत. नाशिक मधील आयुर्विज्ञान संस्थेचे त्याकाळात काळू आप्पा शेअर होल्डर होते ! चांगल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये त्यांची ऊठबस होती. मुंबईत जसा कारखाना भरात होता तशी गावाकडे शेती !! चार-पाच सालदार ,अनेक बैलजोड्या, उसाचे शेत ,कापूस ही सर्व प्रगती थक्क करणारी होती. त्यांनी केवळ पैसा कमावला नाही ,तर माणुसकीने लोकसंग्रह केला. त्यांच्या चलतीच्या काळात श्री.खंडू शिवराम पाटोळे आणि पांडुरंग शिवराम पाटोळे यांच्या वडिलांचे लवकर निधन झाले .त्यांच्या आई गं. भा. वारूबाई तारुण्यातच विधवा झाल्या.. श्री काळू आप्पांनी त्यांना आधार दिला. मुलांचा सांभाळ केला. काळू आप्पांच्या शेतात ते काबाडकष्ट करीत. आप्पांनी त्यांची लग्न करून दिली आणि त्याचा मोबदला म्हणून दोन्ही भावांना पाच - पाच एकर शेती कसण्यासाठी दिली. अशी मदत त्यांनी अनेकांना केली. काहींनी त्याची जाणीव ठेवली तर काहींनी सोयीस्करपणे विसरणे पसंत केले.
दिवसा मागून दिवस गेले. व्यवसायाबरोबरच कुटुंबाचा विस्तारही वाढत गेला. काळू आप्पांची प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खूपू लागली. त्यांच्या भरल्या संसाराला दृष्ट लागली! श्री. काळू आप्पा आणि श्री.गजमल तात्या या दोघांची विभागणी झाली ! प्रगतीला खीळ बसली. या गोष्टीचे काळू आप्पांना प्रचंड वाईट वाटले.
श्री.देवराम दादा आणि त्यांच्या भावांची देखील कालांतराने विभागणी झाली. घरा दारा बरोबर मने दुभंगली! कुटुंब विस्कळीत झाले.
देवराम दादांना आठ अपत्ये होती. आई वडील, भावा- भावांच्या विभागणीत वाट्याला आलेली शेती आणि कर्जाचा डोंगर ,यामुळे पुन्हा जीवनातला संघर्ष सुरू झाला. परिस्थिती बदलली. सर्व चित्र पालटले. दादांच्या वाट्याला थोडीफार शेती आली. त्यावर आता भागत नसे. खाणारी तोंडे भरपूर आणि उत्पन्नाचे स्त्रोत मात्र कमी. आप्पा आणि दादांनी पुन्हा घरीच बसून चप्पल सांधण्याचे काम सुरू केले. काळाचा महिमा शेवटी काय!
पप्पांची आई, म्हणजे आमची आजी. सौ.भागाबाई अत्यंत साधी आणि सहनशील महिला होती. परिस्थिती नाजूक झाली.त्याकाळात फारसे औषध उपचार उपलब्ध नसत.मोठ्या दवाखान्यात जाऊन उपचार घेणे देखील परवडणारे नव्हते. त्या काळापासून आजीला डोके दुखीचा त्रास सुरू झाला. कधीकधी ती चक्कर येऊन पडे. परंतु आजच्या इतके त्याकाळी महिलांकडे काळजीने पाहिले जात नव्हते. आजीच्या बाबतीतही तेच झाले. पप्पांचे मोठे भाऊ, श्री. दादाजी उर्फ मोठाभाऊ कुटुंबीयांसह मुंबई येथे स्थायिक झाले होते. आईची सतत तब्येत बिघडते, म्हणून माझ्या वडिलांना आईबद्दल चिंता वाटे. आठ मुलांमध्ये पप्पांचा दुसरा क्रमांक. त्या अर्थाने आईची जबाबदारी त्यांच्यावरच होती. घरात सून आणावी, असा विचार सर्वांच्या मनात आला. एफ. वाय. बी.ए.च्या वर्गात असतानाच पप्पांचे लग्न आईची झाले. सासुबाई आणि सुनेचे गुळपीठ जमले. दोघी एकमेकींना धरून राहत. आनंदाने संसार सुरू झाला.
पप्पांचा स्वभाव अत्यंत रागीट .छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना राग येई.परंतु ,एखाद्या गोष्टीवर चार वेळा विचार करून मग ते बोलायचे. स्पष्टवक्ते होते. कोणाचे लांगूलचालन त्यांना कधीच जमले नाही. जे असेल ते तोंडावर स्पष्टपणे बोलत. त्यामुळे त्यांना फारसे मित्र नव्हते. तसे म्हणायला गावातील श्री.नथू मास्तर, त्र्यंबक सहादु पाटोळे, दोधा बापू पाटोळे,भिका भिला पाटोळे, केदा सोनू पाटोळे, निंबा कंडक्टर, महारू पाटोळे हे त्यांचे शाळेतील आणि गल्लीतील मित्र होते. परंतु त्यांचे कोणाशी फारसे पटत नसे. त्यातल्या त्यात श्री.नथू फकीरा पाटोळे उर्फ नथा मास्तर यांच्याशी त्यांचे चांगले ट्युनिंग होते. काही वर्षांनंतर एका नाजूक अशा घटनेमुळे ते नाते तुटले. चारचौघात गप्पा मारत बसणे, त्यांना आवडत नसे. शिस्तीच्या बाबतीत अत्यंत कडक होते. सर्व गोष्टी त्यांना नीटनेटक्या लागत. सर्वजण आईला नेहमी विचारात की," तू हा नवरा कसा सांभाळतेस?" लहानपणापासून पप्पांचे त्यांच्या आईने खूप लाड केले. कारण त्या काळात परिस्थिती चांगली होती. ते म्हणतील ती गोष्ट त्यांना मिळत असे. परंतु,हळूहळू परिस्थिती बदलली. तसा स्वभावात थोड्याफार प्रमाणात बदल झाला. त्यांना घरादारातील सर्व लहान मोठे "जिभाऊ" या नावाने हाक मारतात. भाऊ देखील त्यांना घाबरत असत. ' करड्या'असलेल्या त्यांच्या डोळ्यांची प्रचंड दहशत होती !
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी बऱ्याचदा प्रयत्न केले.पण दरवेळेस यशाने हुलकावणी दिली. १९७४ मध्ये बी.ए. उत्तीर्ण झाले. नाशिकच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून त्यांना "प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर" पदासाठी कॉल आला.इंटरव्ह्यू झाला. परंतु नोकरी मिळू शकली नाही. स्टाफ सिलेक्शन कमिशन ची परीक्षा एकदा पुणे येथून दिली. रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये देखील नोकरीसाठी परीक्षा दिल्या. मुंबईच्या अंधेरी भागातील एम.आय.डी.सी.मध्ये निवड झाली, परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने नोकरीची ऑर्डर ताब्यात मिळाली नाही. एस.टी. महामंडळात क्लर्क म्हणून परीक्षा दिली. तिथेही ही अंतिम सिलेक्शन काही कारणामुळे झाले नाही. एम.पी.एस.सी.ची पोलीस सब इन्स्पेक्टर ची परीक्षा दिली .परंतु नशिबाने हुलकावणी दिली.अनेकदा हातातोंडाशी आलेली संधी काहीना काही कारणांमुळे हातातून निसटून जात होती. शेवटी नोकरी करण्याचे खूळ त्यांनी मनातून काढून टाकले. घरी शेती करण्यासाठी, इतर भावंडे लहान असल्यामुळे पप्पांवर जबाबदारी आली.
आपल्याला नोकरी लागू शकली नाही,याचे दुःख त्यांच्या अंतर्मनात मात्र कायमच राहिले. शेतात त्यांनी प्रचंड कष्ट केले. आपल्याला नोकरी नसल्याचा 'न्यूनगंड' मात्र त्यांना कायम सतावत असे .या विचाराने ते कधीकधी चिडचिड करत. आपल्याबरोबर शिकलेल्या इतर मित्रांना नोकरी मिळाली. ते शहरात राहतात. मौजमजा करतात. आपण आपल्या मुलाबाळांची हौस-मौज करू शकत नाही. कधीकधी या विषयावरून लोक टोचून बोलत. त्यांच्या मनाला ही गोष्ट फार लागत असे.
आई आणि पप्पा तसे दोघेही ही त्या काळात उच्चशिक्षित होते. दोघांनाही नशिबाने खऱ्या अर्थाने हुलकावणी दिलेली होती. परंतु, आपली शिक्षणाची आणि नोकरीची अर्धवट राहिलेली इच्छा आपण मुलांच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो.हे ध्येय दोघांनी पुढे जिद्दीने पूर्ण केले. आई-वडील दोघेही दिवसभर काबाडकष्ट करून, रात्री झोपी जाण्यापूर्वी मुलांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष देत होते. मुलांबरोबर अभ्यासासाठी जागत होते. अभ्यासासाठी आवश्यक वातावरण त्यांनी निर्माण करून दिले. पप्पा म्हणजे फणसासारखे!वरुन स्वभावाने कडक,परंतु आतून अत्यंत निर्मळ आणि प्रेमळ !! वडील म्हणजे उंबराचे झाड! वडील म्हणजे समुद्रातलं जहाज !! वडील म्हणजे वादळातलं घर !!! त्यांचे रागावणे आज आमच्या फायद्याचे ठरले. आईसारखं कधी त्यांना आमच्या डोक्यावरून हात फिरवता आला नाही .परंतु त्यांच्या प्रेमळपणाचा सहवास आम्हाला अखंड लाभला. आम्ही लहान असताना शेतात राहत असल्याने, आमची खूप काळजी घेतली. आई पप्पा आमचा लाड पुरवत. आम्हा भावंडांचे खाण्यापिण्याचे कधीही हाल त्यांनी होऊ दिले नाहीत. आधी अभ्यास, मग शेतीची कामे आम्ही करायचो. वर्षभर स्वतःसाठी पप्पा काहीही खरेदी करत नसत.मुलांना दिवाळीसाठी कपडे घ्यावे लागतील, म्हणून चार महिने आधीच तयारी करत असत. सालदारासारखे शेतात राबूनही आई पप्पांच्या हाती काहीही पडत नसे. तरीदेखील आहे त्या परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले. दुसऱ्यांचा हेवा त्यांनी कधी केला नाही आणि आम्ही केलेलाही त्यांना चालत नसे. त्यांच्या संस्कारांमुळेच आज आमच्या आयुष्याला योग्य वळण मिळाले. आम्ही भावंड नोकरीला लागलो, याचा त्यांना प्रचंड आनंद झाला. त्यांची अपूर्ण राहिलेली इच्छा श्रीगणराया ने पूर्ण केली.
त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे भाऊ- बहिणी काका-पुतणे त्यांच्यापासून चार हात लांब राहत असत. किंबहुना ,त्यांचे आई आणि वडील देखील त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे थेट त्यांच्याशी न बोलता सुनेच्या म्हणजे माझ्या आईच्या माध्यमातून बोलत असत .आईने हळूहळू त्यांच्या स्वभावावर नियंत्रण मिळविले होते. या गोष्टीचे सासूबाईंना म्हणजे पप्पांच्या आईला ,माझ्या आईचे कौतुक वाटे! पप्पांच्या अशा वागण्यामुळे शेतातील शेजारीपाजारी देखील आमच्या शेतात पाय ठेवताना चार वेळा विचार करत असे. त्यामुळे पप्पा शेतात असेपर्यंत "कुंपण"घालण्याची गरज पडली नाही! दिवसभर शेतात ते मेहनत करत असत. शेतामध्ये असताना गुराढोरांवर खूप प्रेम त्यांनी केलं. मला आठवतं "बंड्या" नावाचा उंच, धिप्पाड कुत्रा आम्ही पाळला होता. रात्रीच्या वेळेस बंड्याने भुंकायला सुरूवात केली, की अंधार भेदत त्याचा आवाज मैलभर अंतरावर पोहोचत असे. पप्पांना त्याचा खूप लळा होता. एखादा अनोळखी मनुष्य शेतातल्या घराकडे येताना दिसला की ,बंड्या कुत्रा धावत जाऊन, त्या माणसाच्या खांद्यावर दोन्ही पाय ठेवून उभा राहत असे! बंड्याचा आवाज आणि त्याचं रूप पाहून समोरच्याची गाळण होत असे. पप्पा जिथे जातील तिथे बंड्या त्यांची साथ करत असे. एकदा पोपटाचे एक लहान पिल्लू आम्ही पाळले होते त्याला" राजू " या नावाने आम्ही हाक मारत असू. तो सतत पप्पांच्या अंगाखांद्यावर खेळत असे. या झाडावरून त्या झाडावर स्वच्छंदपणे विहार करीत असे. पप्पांनी त्याला "राजू "अशी हाक मारली की,पटकन येऊन तो पप्पांच्या खांद्यावर बसत असे. पप्पांची भाषा त्याला कळे. दोघांमध्ये मुक संवाद चालत असे. बऱ्याचदा गाय आणि म्हैस पप्पाच्या शिवाय कोणाला दूध काढू देत नसत. पप्पा घरी नसताना, इतरांना कधीही त्यांनी दूध काढू दिले नाही. गोठ्यातली जनावरे त्यांचा आवाज ओळखत असत. काही निमित्ताने गावात जायला निघाले की, बंड्या आणि राजू रस्त्यापर्यंत त्यांच्यासोबत जात असत. पाळलेली बदके, कोंबड्या, पप्पा शेतात काम करत असताना त्यांच्या अवती भोवतीच घुटमळत असत. बोलू न शकणाऱ्या निष्पाप जनावरांशी त्यांचे असे घनिष्ठ नाते होते. शेतातल्या बैलजोडीची ते अत्यंत काळजीने निगा राखत.
रिकामटेकडेपणा त्यांना कधीच जमला नाही.वाईट संगत कधी त्यांना लागली नाही. कामाशी काम, असा त्यांचा स्वभाव .गावातील ज्येष्ठ मंडळींना त्यांचं कौतुक वाटे. आम्ही चार भावंडं. शाळेतील आमची प्रगती चांगली असल्यामुळे, "अशोकची मुलं "म्हणून आमचं कौतुक व्हायचं. पप्पांच्या अशा स्वभावामुळे त्यांना मित्र कमी आणि द्वेष करणारे लोक जास्त होते. परंतु पप्पांनी त्याची कधी तमा बाळगली नाही.
एकदा शेतामध्ये कापसाचे पीक लावलेलं होतं. नेहमीप्रमाणे फासेपारधी लोक तितर पक्षी धरण्यासाठी शेतात घुसले .पप्पांनी त्यांना अपमानित करून हाकलून दिले. ते निघून गेले. त्यावर्षी आई दिवाळीसाठी माहेरी गेली होती. त्याच काळात पंधरा दिवस एसटीचा संप झाला. टेलिफोन सारखी सुविधा सहज उपलब्ध नसायची. तिकडे अजमीर सौंदाणे येथे पप्पांची प्रचंड तब्येत बिघडली. खूप ताप आला. डॉक्टरांचा गुण आला नाही. गावातील एका मांत्रिकाने उपचार केला. शेतात आलेल्या आणि अपमानित झालेल्या फासेपारधी यांनी काहीतरी करणी केली ,अशी शंका आली. काही केल्या ताप उतरेना.ताप मेंदूत गेला .अंगात आल्यासारखे असंबंध बडबड ते करीत असत. घरातले सगळेच घाबरले होते. त्यांची प्रकृती पूर्णपणे ढासळली होती. त्याच दरम्यान चणकापूर येथील काशिनाथ नावाचे एक गृहस्थ सालदार म्हणून एका शेतकऱ्याकडे कामाला होते. ते मंत्र विद्येत पारंगत होते.त्यांनी एका कागदावर रक्षा घेऊन ती मंतरली. त्यांच्या कपाळाला लावली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर पप्पांचा ताप लगेचच उतरला . पुढे कधी ताप आला नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भाग सोडला ,तरी हा चमत्कार मात्र घडला होता. त्यानंतर अधून मधून साधा ताप सोडला, तर त्यांची प्रकृती ठणठणीत राहिली.
इतर कोणी मित्र त्यांना नसले ,तरी माझे मामा श्री. विजय महाले यांच्याबरोबर त्यांचे नात्यापेक्षा मैत्रीचे संबंध अधिक होते. विजू मामा त्यांना अनेकदा मुंबईला बोलवायचे. पाहुणचार करायचे. मुंबईत फिरवायचे.गप्पा गोष्टी करायचे. मामा पोलीस अधिकारी आणि पप्पा शेतकरी परंतु दोघांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. आमच्या आईच्या वडिलांचे म्हणजे माझ्या आजोबांचे मुंबईला के. इ. एम.हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन झाले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये कोणाला जाण्याची परवानगी नव्हती. सर्वजण दवाखान्याच्या बाहेर थांबले होते. पेशंटला भेटायला जाण्यासाठी मामा पप्पांना घेऊन गेट जवळच्या सिक्युरिटी गार्ड जवळ गेले. ते पी.एस.आय. असलेले ओळखपत्र त्यांनी दाखविले .सिक्युरिटी गार्डने ओळखपत्र पाहिले . त्यांनी पप्पांना आत मध्ये सोडले आणि मामांना आत जाण्यास मज्जाव केला.पप्पांची शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्व पाहून ते पोलिस अधिकारी असावेत, असे त्याला वाटले. त्यानंतर मामा जेव्हा जेव्हा पप्पांना बरोबर कुठे घेऊन जायचे ,तेव्हा तेव्हा ...मी स्वतः पोलीस अधिकारी आहे .असं आवर्जून सांगायचे!! हा किस्सा मामा मनमोकळेपणाने हसत-हसत आम्हाला नेहमी सांगायचे. पप्पांच्याबद्दल त्यांच्या मनात अपार श्रद्धा आणि कौतुक होते. पप्पांच्या कष्टाळू आणि स्वाभिमानी बाण्याचे त्यांना नेहमी अप्रूप वाटे. विजू मामा हयात असेपर्यंत ,त्या दोघांमध्ये कधीही विसंवाद झाल्याचे मला आठवत नाही. कारण मैत्रीच्या नात्यात त्यांनी कधीही व्यवहार येऊ दिला नाही. ज्या नात्यांमध्ये व्यवहार येतो, ती नाती दीर्घकाळ टिकत नाहीत ,हे मात्र सत्य!
पप्पांचा त्यांच्या आईवर खूप जीव होता. परिस्थिती नाजूक असून देखील दर शनिवारच्या बाजारात खरेदीसाठी जाण्यापूर्वी," तुझ्यासाठी काय आणू ?"असे ते आईला प्रेमाने विचारायचे. त्यांच्या आईला आंबे खूप आवडत असत. आईसाठी खूप काही करण्याची इच्छा असून देखील परिस्थितीमुळे त्यांना काही करता येत नव्हते. परंतु अशोकचा संसार, कुटुंब, त्याची मुलं-बाळं ,त्यांचे शिक्षण ,प्रगती पाहून पप्पांची आई ,मात्र मनोमन खुश व्हायची. आईच्या अखेरच्या क्षणापर्यंत पप्पांनी तिला कधी दुखावले नाही.
निधनापूर्वी एक महिना आधी आमच्या आजी ब्रेन ट्यूमर झाल्याने आजारी पडल्या. त्यांच्या तारुण्या पासून असलेली डोकेदुखी , बरा होऊ न शकणाऱ्या ब्रेन ट्यूमर मध्ये बदलली होती. मेंदूत गाठ मोठी झाली होती. डॉक्टरांनी वय आणि आणि आजाराची स्थिती पाहून, ऑपरेशन न करण्याचा सल्ला दिला. प्रयत्न करूनही आई वाचणार नाही. या विचाराने ते हतबल झाले. आपल्याला ब्रेन ट्युमर सारखा दुर्धर आजार झाला आहे, हे आजीच्या लक्षात आल्यावर माझ्या आईच्या गळ्यात पडून ती ओक्साबोक्शी रडली. "रत्ना , माझ्याकडून अनवधानाने काही चुकले असेल ,तर मला क्षमा कर ."अशी विनंती करू लागली . सासू-सुनेचं असं प्रेम यापुढे कधी पहायला मिळेल ,यावर माझा विश्वास बसत नाही. अशी सासू मिळणं आता दुरापास्त झाले आहे.घरात सगळ्यात मोठे असल्याने पप्पांना रडून चालणार नव्हते. स्वतःच्या भावनांना त्यांनी आवर घातली .बरोबर एक महिन्याच्या आत त्यांच्या वात्सल्यमूर्ती ,आईचे देहावसान झाले. तेव्हा पप्पांच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रु तरळताना मी पाहिले! जीवनातील असंख्य चढ-उतार त्यांनी अनुभवले .अनेक वादळे लीलया अंगावर झेलले ! तेव्हादेखील ते डगमगले नाहीत. परंतु जन्मदात्या आईचे कलेवर पाहून ,त्यांचे हृदय पिळवटून निघाले! आई ,आता अनंताच्या प्रवासाला निघून गेली, ही भावनाच त्यांना अस्वस्थ करून गेली. सर्वजण आईला "माय " म्हणून हाक मारीत असत.
आपल्याला दिव्याचा प्रकाश दिसतो.दिव्याची जळणारी वात दिसते.परंतु ,वात जळून प्रकाश देण्यासाठी आवश्यक असलेलं तेल मात्र दिवा पुरवत असतो. त्याच्याही अंगाचा दाह होत असतो. तो आपल्याला जाणवत नाही .आपलं लक्ष केवळ प्रकाशाकडे जाते.बाप म्हणजे प्रकाश निर्माण करणाऱ्या वातिला तेल पुरवणारा दिवा असतो !! हे आपण विसरून जातो. स्वतः जळून मुलाबाळांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे आई - वडील, हेच तर खरे आपली दैवते असावीत !!
पप्पांनी आम्हाला शिक्षण दिले. स्वाभिमान शिकवला .कष्ट करण्याची सवय लावली. प्रामाणिकपणे जे मिळेल ते आपले ,ही भावना रुजवली .लाचारी ,खोटारडेपणा यापासून दूर राहण्यास शिकवले. आत्मनिर्भरतेसाठी खंबीर बनवले.संवेदनशीलता शिकवली .दुर्गुणांपासून लांब राहण्याचा संस्कार दिला. कुटुंबासाठी आवश्यक प्रेम,जिव्हाळा ,आपुलकी शिकवली. जीवन जगण्यासाठी सर्वकाही दिले. आयुष्यभरासाठी पुरून उरणारी संस्कारांची शिदोरी दिली.
मुलगा म्हणून पप्पांचे अनेक अनुभव मजजवळ आहेत. शब्दांमध्ये व्यक्त करता येणे कठीण आहे. आई आणि वडील हे प्रेमाचा कधीही न आटणारा झरा असतो. त्यांचे प्रेम जन्मापासून मरणापर्यंत कधीच बदलत नाही. बाकी इतर नात्यातले प्रेम काळ वेळेनुसार बदलत असतं !
दरवर्षी जून महिन्यातील तिसरा रविवार "फादर्स डे "म्हणून साजरा करण्याची पद्धत अमेरिकेने जगाला दिली. आता त्याचे अंधानुकरण आपण करून ,जो तो आपापल्या कुवतीप्रमाणे या फादर्स डे चा उत्सव करीत असतो. मोबाईलच्या माध्यमातून आभासी फुलांची देवाण-घेवाण होते. खरंच बापाच्या प्रेमात एवढी कृत्रिमता असते?
बाप ...म्हणजे कोण असतो?
मुलांसाठी झटताना आपलं दुःख लपवून ठेवणारा हा देव माणूस म्हणजे....बाप!
मुलांचे कोडकौतुक करणारा, वेळप्रसंगी धाकात ठेवत, शांत ,प्रेमळ, कठोर ,रागीट असतो तो म्हणजे.... बाप !!
घराचं खरं अस्तित्व , आधार असतो... बाप !
बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला.
हाडाची काडे करून,
आधार देतो तनामनाला !
आमच्या सर्वगुणसंपन्न पप्पांना परमेश्वर दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो आणि आमच्यावरील मायेची सावली निरंतर अशीच राखो, हीच श्री गणरायाजवळ विनम्र प्रार्थना.
पप्पा ,सदैव तुमच्या ऋणात राहू इच्छिणारा....
तुमचामुलगा
शैलेश
. रविवार,ज्येष्ठकृ.१५
नाशिक.
लेख तिसरा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
Wednesday, June 17, 2020
दिवस नवीन इंग्रजी शाळेतले.....
दिवस नवीन इंग्रजी शाळेतले....✍️✍️
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नवीन इंग्रजी शाळा ,ओझर येथे नोकरीची अपॉइंटमेंट ऑर्डर घेऊन, मी एस. टी.ने ओझर येथील खंडेराव मंदिर बस थांब्याजवळ उतरलो. शाळा कुठे आहे? हे माहीत नव्हते .साधारण, माझे दहावीनंतर दोन वर्षांचा डी.एड पदविका शिक्षणक्रम पूर्ण करून आई वडील आणि परमेश्वराच्या कृपेने लगेचच नेमणुकीचे पत्र मिळाले होते. वय साधारण १८ते १९ वर्षांच्या दरम्यान! नोकरी मिळवण्यासाठी फार श्रम पडले नाहीत. ती सहज मिळाली! माझे वडील काही निमित्ताने सटाणा हून नाशिक येथे बसने येत होते. त्यांच्या शेजारी एक गृहस्थ वर्तमानपत्र वाचत होते. त्यात वडिलांना नाशिक एज्युकेशन सोसायटीची जाहिरात वाचायला मिळाली .नाशिकला आल्यानंतर त्यांनी स्वतः रांगेत उभे राहून, फॉर्म घेऊन, भरला. मला घरी येऊन त्यांनी याबाबत सांगितले देखील नव्हते. अर्थात, नोकरी हा विषय गांभीर्याने घेण्याचे माझे वय नव्हते. त्यांच्या पुण्याईने आज माझ्या हातात शिक्षक म्हणून नेमणूक पत्र होते. नेमणूक पत्रावरील पगाराबाबतचे विवरण देखील मला समजत नव्हते.
खंडेराव मंदिर बस थांब्यावर उतरुन, शेजारी एक टपरीवजा हॉटेल होते. तेथे शाळेबद्दल विचारणा केली. महामार्ग ओलांडून शाळेजवळ गेलो.
शाळेच्या दुसऱ्या सत्राची प्रार्थना, वगैरे सुरू होते. गेट जवळ उशिरा आलेल्या मुलांची गर्दी होती .शाळेतील मुले आणि मी ,आमच्यात फारसा फरक नव्हता .मी घाबरत, लाजत, त्या मुलांमध्ये मिसळून गेलो .प्रार्थना आटोपली. गेटवरचे ग्रिल खोलले गेले. सहा फूट उंचीचे, एक धिप्पाड गृहस्थ, तेथे हातात छडी घेऊन आणि गळ्यात थोडी मळकट शबनम अडकवून उभे होते. कोणीतरी पहिलवान असल्याचा भास झाला! मुलांना हातावर खाऊ देत आणि सभ्य शिव्या हासडत त्यांनी मुलांना वर्गात पिटाळले. मी मात्र घाबरत होतो. हळूहळू गेट जवळ सरकलो. त्यांनी मला खुणेनेच बोलावले. काय पाहिजे? ही वेळ आहे का, शाळेत यायची? शर्ट इन करता येत नाही का ?शाळा आहे ,ही धर्मशाळा नाही!! असा तोंडाचा पट्टा सुरू केला. मी अजूनच घाबरलो. ते माझ्या चेहऱ्यावरून त्यांनी ओळखले. मी विद्यार्थी नसल्याचे त्यांना सांगितले. मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून गेटमधून मला आत घेतले. मी या शाळेत शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलो आहे, असे सांगून खिशातले नेमणूक पत्र त्यांना दाखवले .ते फार गांभीर्याने न पाहता म्हणाले," तुला काय येतं ?,"मी गोंधळलो! म्हणजे गायन, वादन ,इत्यादी काही येतं का? असं त्यांना विचारायचं होतं .मी म्हटलं," नाही ".ते म्हटले,"पडली अजून एकाची भर !!" या वाक्याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही. नंतर कळले त्यांना काय म्हणायचं होतं! त्यांच्या अशा प्रश्नांनी पुरता गोंधळलो होतो. परंतु "भर पडली" हा शब्द अंतर्मनाला लागून गेला. त्यांनी मला कार्यालय दाखविले.
मुख्याध्यापक कक्षात विचारणा करून , आत गेलो. नेमणूक पत्र दाखवले. मुख्याध्यापक होते ,श्री. शां. पां.सूर्यवंशी. त्यांनी हिंदी भाषेतून माझी चौकशी केली. मला खूप आश्चर्य वाटले. सरांचे नाव, आडनाव, मराठी भाषक वाटत होते.शाळा मराठी होती. मग हे हिंदीतून का बोलत आहेत ? कालांतराने त्याचा देखील उलगडा झाला. त्यांनी लेखनीकांना बोलावून मला रूजू करून घेण्याबद्दल सांगितले. उद्यापासून सकाळ सत्रात या, चांगले काम करा, अशा सूचना दिल्या.
विद्यार्थी दशा संपवून, शिक्षक म्हणून नवीन प्रवासाला सुरुवात केली होती. प्रारंभी वेळापत्रक मिळाले नाही .रिकाम्या वर्गांवर जावे लागे. फारशी तयारी नसे. मुलांपुढे जाऊन काय बोलायचे? जे बोलायचे, तेच विसरून जायला व्हायचे! हळूहळू "शाळा" समजली !! वरिष्ठ शिक्षकांचे अनुकरण करायला लागलो. तुटपुंज्या ज्ञानाच्या भांडवलावर भागणार नाही, हे लक्षात आले. वर्तमानपत्रे, शाळेतील ग्रंथालय, मासिके, मिळेल ते वाचायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आपण ज्या शाळेत नोकरी करतो आहोत, त्या शाळेबद्दल काही ही वरिष्ठ शिक्षकांच्या कडून कळले .तेव्हा अशा शाळेत, संस्थेत, नोकरी करायची तर स्वतःला सिद्ध करावे लागणार होते. नोकरी सहज मिळाली, असली तरी टिकवणे मात्र तितकेसे सोपे नव्हते! खेडेगावातून आल्यामुळे ज्ञान जुजबी होते.
नाशिक एज्युकेशन सोसायटी, ही संस्था शिक्षकांच्या कर्तृत्वामुळे ओळखली जाते. नवीन इंग्रजी शाळेने देखील शिक्षकांचा सुवर्णकाळ अनुभवला आहे. प्रारंभीच्या काळात ही शाळा ओझर गावात भरत असे. शाळा सुरू करण्यात तत्कालीन नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष खा. कै. गो.ह. देशपांडे, ओझरचे श्री. बापूसाहेब उपाध्ये श्री.वसंतराव उपाध्ये,श्री.रामराव गायकवाड , श्री.शंकरराव कासार, श्री.वल्लभ शेठ भट्टड, श्री.दत्तूशेठ कासार यांनी पुढाकार घेतला होता. श्री.रा.ग विरकर हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक. नंतर सरकारने सध्याची जागा संस्थेला शाळेसाठी दिली. राज्याचे तत्कालीन शिक्षण संचालक डॉ. ए.जी. पवार यांच्या हस्ते नूतन वास्तुच्या कोनशिलेचे अनावरण झाले.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कारभारी मंडळ किंवा कार्यकारी मंडळ, व्यवस्थापन मंडळ यांच्या कुशल मार्गदर्शन व नेतृत्वामुळे उत्तम शिक्षक, नवीन इंग्रजी शाळेला लाभले .त्यामुळे ओझर पंचक्रोशीत शाळेचा लौकिक, मेहनती व होतकरू शिक्षकांमुळे प्राप्त झाला .शाळेच्या मुख्याध्यापकांचा व शिक्षकांचा गावकऱ्यांशी सतत संपर्क असे .लोकांमध्ये शाळेबद्दल आपुलकी होती. शाळा ही खऱ्या अर्थाने समाजाचे आणि गावाचे प्रतिबिंब होती. शिक्षक गावकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत. अनेक नामवंत वकील, इंजीनियर्स, डॉक्टर्स, राजकीय नेते- पुढारी ,प्रगतिशील शेतकरी, व्यापारी आणि सुज्ञ नागरिक या शाळेने घडविले. क्रीडा क्षेत्रात नवीन इंग्रजी शाळेने विशेष नैपुण्य दाखविले. शिक्षकांनी जीव तोडून केलेल्या मेहनतीमुळे शाळेला नाव मिळाले. केवळ पैसा मिळवण्याचे साधन म्हणून शिक्षकी पेशाकडे कोणी पहात नसे. सर्वजण एकोप्याने काम करीत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संस्था आणि शाळेचा लौकिक यासाठी वाटेल ते श्रम करण्याची आणि वेळ देण्याची तयारी शिक्षकांची, मुख्याध्यापकांची असे.
मा.धुं.शा.देशपांडे, मा.म.ल. जोशी, मा.श्रीमती सिंधुताई परांजपे, मा.रामभाऊ क्षीरसागर, मा. अ. द. लेले, यांसारखे कर्तुत्ववान मुख्याध्यापक या शाळेला लाभले. त्यांनी शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर जिवापाड प्रेम केले. स्वतः शिक्षकांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून कामे केली. गावात जाऊन लोकांशी संपर्क वाढवला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये शाळे बद्दल आपुलकी, जिव्हाळा निर्माण झाला. शाळा नावारूपाला येण्यासाठी उत्तम व सृजनशील उपक्रम शिक्षकांच्या माध्यमातून राबविले.
श्री. रा.गो.क्षीरसागर यांची मुख्याध्यापक म्हणून नवीन इंग्रजी शाळेत बदली झाली होती. त्यांना सर्वजण आदराने" रामभाऊ "म्हणत. सतत हसतमुख असणारे, रामभाऊ कोट -टाय परिधान करून, अत्यंत नीटनेटकेपणाने शाळेत वेळेत हजर असत. त्यांना टापटीपपणा आवडत असे. शिपायापासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना ते आपुलकीने वागवत. त्यांचे काम सांगणे इतके विनम्रपणाचे असे की, समोरच्या व्यक्तीला ते टाळणे शक्यच नव्हते. लोकांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती असायची. अल्पावधीतच त्यांनी शालेय प्रशासनावर पकड घेतली. रामभाऊ स्वतः उत्तम लेखक ,कवी होते. साहित्याची त्यांना आवड होती. सर्वांनी एकदिलाने काम केले पाहिजे,असे ते सांगत. शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी एक गीत लिहिले,..
या शाळेचे सुपूत्र आम्ही
शाळा आपली माय असे
या इथे , या इथे ,
तव ,जीवन बनवू सुंदरसे ...
त्यांचे हेच गीत पुढे शाळेची" प्रार्थना "झाली. शिक्षक- कर्मचारी झपाटून काम करत. शाळेच्या अडीअडचणी किंवा चांगल्या बाबीदेखील ते गावात जाऊन लोकांपुढे मांडत. गावकरी त्यांच्या हाकेला धावून येत. ओझर मधील अनेक नामवंत शेतकऱ्यांमध्ये आणि राजकीय पुढाऱ्यांमध्ये त्यांची ऊठबस होती. नवीन इंग्रजी शाळेचा हा सुवर्णकाळ होता ! एच.ए.एल. वसाहतीत एका संस्थेची शाळा असून देखील ,नवीन इंग्रजी शाळेत दोन बस भरून विद्यार्थी येत असत. एअरफोर्स भागातून देखील प्रवेश घेण्यास अनेक पालक इच्छुक असायचे.
नंतरच्या काळात श्री. माळवदकर सर, एक विद्यार्थी व शिस्तप्रिय, व्यासंगी शिक्षक शाळेला लाभले. चित्रकला व हिंदी विषयात त्यांचा हातखंडा होता .ते ओझर गावातच राहत असत. विद्यार्थ्यांना कलेची आवड निर्माण होण्यासाठी विविधांगी उपक्रम ते राबवित. शेती हा विषय शिकवत आणि स्वतः मुलांबरोबर शेती काम करत. विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत प्रिय होते.
नवीन इंग्रजी शाळेत एन.सी.सी. श्री टेंबे सर यांच्या नंतर सांभाळली ,ती श्री.दत्तात्रय शंकर भावसार सर यांनी. शिस्तप्रिय असलेल्या भावसार सरांचा मुलांमध्ये दरारा होता. ते हिंदी विषय विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने शिकवत. ते उत्तम वाचक आणि आणि वक्ते होते. शाळेत कोणताही कार्यक्रम असला की, भावसार सरांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत असायचेच! सत्ययुगातील श्रीराम- कृष्ण यांपासून ते आधुनिक काळातील गोष्टी ते मुलांना रंगवून सांगत. ते स्वतः कधी विनोद करीत नसत. परंतु, त्यांच्यावर अनेकदा झालेले विनोद सरांनी सहज पचवले. शाळेमध्ये काहीजण असे असतात की ,त्यांनी फक्त चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक करायचे असते! ते मनापासून की वरवर हे महत्त्वाचे नसते !! भावसार सरांचे कौतुक करणारे त्यांचे अनेक मित्र होते.त्यामुळे अशा मित्रांना स्टेजवर उभे राहून भाषण करण्याची वेळ कधी येत नसे ! शाळेतील तरुण शिक्षकांशी ते अत्यंत आपुलकीने वागत.मला त्यांच्या व्यासंगाबद्दल फार कौतुक वाटे .एकदा स्टाफ रूममध्ये मधल्या सुट्टीत आम्ही सर्व शिक्षक बसलो असताना, मी,श्री.भावसार सरांचे कौतुक केले. आणि सरांना म्हटले की, "सर, आपले वाचन किती अफाट आहे!" तितक्यात त्यांच्या एका मित्राने त्यावर कोटी करत, स्टाफरूममध्ये हशा पिकवला.ते शिक्षक म्हणाले. त्यात काय एवढं! ते तुला देखील जमेल .मी म्हटलं", कसं?" ते म्हणाले ,"भावसार सर काय करतात, माहिती आहे का ?"मी म्हटलं ,"नाही". "जयंती ,पुण्यतिथी कोणाचीही असो. भाषण तेच करायचे. फक्त नाव बदलायचे.!" संपूर्ण स्टाफ खो-खो हसला. यावर श्री. भावसार सर देखील दिलखुलासपणे हसले. हसण्याचा भाग सोडला तरी श्री.भावसार सर यांचा अभ्यास, वाचन खूप होते. हे नाकारता येण्यासारखे नव्हते.
कोणतेही काम हे सांघिकपणे केले तर त्याची यशस्विता निश्चित वाढते. शाळेमध्ये काही समविचारी शिक्षक होते. त्यांच्या दृष्टीने शाळा सर्व काही होती. तात्विक, वैचारिक वाद व्हायचे. परंतु शाळेवर त्यांचा कधी विपरीत परिणाम त्यांनी होऊ दिला नाही.
ज्यांनी माझ्या नोकरीच्या पहिल्या दिवशी,माझी मान पकडून" तुला काय येतं ?"असं विचारलं होतं, ते श्री.त्र्यंबकराव तिडके सर एक संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. आज पर्यंत मला भेटलेल्या प्रेरणादायी व्यक्तींपैकी एक! श्री. तिडके सर म्हणजे शिस्त. श्री .तिडके सर म्हणजे मुलांचा आधार. कोणताही स्वार्थ नाही. केवळ आपल्या शाळेसाठी आपण जीवतोड मेहनत केली पाहिजे, हा हेतू .असे शिक्षक शाळेला मिळणं सध्या तरी दुरापास्त झाले आहे. साधारणपणे, शाळा ही शिक्षकांची ओळख असते. परंतु, श्री. तिडके सर हे शाळेची ओळख बनले होते. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. जे विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले, ते आजही सरांचं तोंडभरून कौतुक करतात आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होतात!
मला चांगलं आठवतंय, तिडके सर शाळेच्या समोरील आग्रा रोड च्या पलीकडे राहत असत.शाळेत येताना महामार्ग ओलांडून त्यांना यावं लागे. जवळपास सहा फूट उंच, रांगडा देह, खांद्याला थोडी मळकट शबनम अडकवलेले आणि हातात कायम बासरी! असा त्यांचा परिवेश. सामान्यपणे शिक्षकाच्या हातात छडी, पट्टी आपण पाहिली आहे. तिडके सरांच्या हातात बासरी असायची ! बासरी वर एखादं गाणं गुणगुणायला सुरुवात केली की, शाळेच्या पटांगणात खेळत असलेली मुलं मुली तिडके सर यांना घेराव घालत. काही लहान मुलं त्यांचा एक हात धरून शाळेत येत. मुलांचा घोळका शाळेच्या गेटमधून आत येईपर्यंत त्यांच्या भोवती असे .अशावेळी मला, "आया रे खिलोने वाला l खेल, खिलोने लेके आया रे ll "हे गाणं गुणगुणनारा संजीव कपूर आल्याचा भास होई.मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नसे. त्यांच्या बासरीच्या मधुर सुरांनी वातावरण प्रसन्न होत असे.
शाळेचा प्रारंभ परिपाठाने होत. तिडके सरांना मुलांशी बोलताना कधीही ध्वनिक्षेपकाचा आधार घ्यावा लागला नाही. घंटा वाजली की, मुलं मुली प्रांगणात घोळक्याने यायचे. स्टेजवर तिडके सर एकटे! त्यांनी बासरी वाजवायला सुरुवात केली की, आपोआप मुलं आपापल्या वर्गाच्या रांगेत ,एक हाताचे अंतर घेऊन उभे राहायचे! बासरी वरचे गीत संपलं की, मुलं सावधान -विश्राम करत .अशावेळी कोणी विद्यार्थी बेशिस्त वागला तर स्टेजवरून ते खाली उडी मारुन, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून ,त्याला शारीरिक कसरती ची शिक्षा करायचे .म्हणून सहसा आपल्यावर शिक्षेची वेळ येऊ नये ,असे मुलांना वाटे .अत्यंत प्रेमळ असणारे तिडके सर अशावेळी रिंग मास्टर वाटायचे. शालेय आवारात तिडके सर असले की, मुलं बेशिस्त वागायला दचकत. शाळेत कोणी शिक्षक रजेवर असले की,सर स्वतः असे सर्व वर्ग एकत्र करून, मुलांकडून कवायत, व्यायाम पटांगणावर करून घ्यायचे. रिकाम्या वेळी त्यांना कधीही स्टाफ रूममधील गादीवर टेकून बसलेले मी पाहिलेले नाही. त्यांच्यात असलेल्या कलेबद्दल मला खूप नवल वाटे. एकदा माझ्यासाठी एक बासरी ते घेऊन आले. बासरी शिकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु, शिष्य बनण्याची माझी कुवत नसावी !त्यांचा तो प्रयत्न फसला. मला आजही त्या गोष्टीची खंत वाटते. कोणती तरी एक कला आपल्या जवळ असावी, म्हणून मी तबला शिकण्यासाठी क्लास लावला. ति ट कि ट . .तिट .किट.. .तिटकिट धा ...इतकच ! मला तबला शिकवणारे मास्टरजी रोज तबला आणि डग्गा घेऊन ,पहिला धडा गिरवायला सांगायचे. शेवटी व्हायचे तेच झाले! माझी व तबल्याची फारकत झाली !! तिडके सरांकडे पाहून कलेची ऊर्मी जागृत झाली होती. परंतु, ती पूर्ण होऊ शकली नाही.
तिडके सर अत्यंत तळमळीने मुलांना शिकवायचे .ते व्यायामाचे शिक्षक नव्हते, तरीदेखील कवायत ते स्वतः करून घेत. डंबेल्स, घुंगुर काठी ,बासरीच्या सुरात मुलांकडून सराव करून घेत. मुलं रमून जात. अशावेळी सानेगुरुजींचे एक वाक्य मला आठवते..." करील मनोरंजन जो मुलांचे ,जडेल नाते प्रभूशी तयाचे." तिडके सर ,असे परमेश्वराशी नातं सांगणारे एक उत्तम शिक्षक होते.
साधारण, १९५५-५६ सालची गोष्ट असावी.भारताचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू आणि निवृत्त मेजर भोसले साहेब यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील शिस्तीचे महत्त्व लक्षात घेऊन, एन. डी .एस. अर्थात "नॅशनल डिसिप्लिन स्कीम" भारतभर सुरू केली. त्याकरिता शारीरिक दृष्ट्या सक्षम, कलेची आवड असणारे आणि होतकरू तरुणांना प्रशिक्षण देऊन देशभरातील शाळांमध्ये त्यांना शिक्षक म्हणून पाठविले जात असे. नाशिकच्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंज मधून मुलाखत होऊन, तिडके सरांची प्रशिक्षणासाठी निवड झाली.
श्री.तिडके सरांचे मुळगाव निफाड तालुक्यातील कसबे सुकेने .घरची स्थिती अत्यंत हलाखीची होती .सरांचे वडील आपल्याच मेहुण्याकडे सालदार म्हणून ,जानोरी ता. दिंडोरी येथे काम करीत असत. तिडके सरांचे बालपण मामांकडे गेले.सरांचे मामा गर्भश्रीमंत होते. त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून त्यांनी भाच्यांना जानोरी येथेच ठेवून घेतले.परंतु बर्याच वर्षांच्या कालावधीनंतर मामांना मुलगा झाला. नंतर पुढे कौटुंबिक वाद नकोत, म्हणून मामांनी तिडके सर व त्यांच्या कुटुंबियांना थोडीफार शेती कसण्यासाठी देऊन वेगळे केले. अशा परिस्थितीत तिडके सरांनी आपले शिक्षण घेतले. नवीन इंग्रजी शाळेत त्यांचे शिक्षण झाले.कधी शाळा तर कधी गायी -गुरे चारायला जात. इतर गुराखी मित्रांकडून शालेय जीवनातच ते बासरी वाजवायला शिकले. आज तीच बासरी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरली!सरांच्या बासरीचे सूर ऐकून मुलं मंत्रमुग्ध होत असत. कदाचित भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न असावेत! श्रीकृष्णाच्या बासरीची धून ऐकून पशुपक्षी ,प्राणी आणि त्यांचे बालमित्र तल्लीन होऊन जात.तसे तिडके सरांच्या बासरीच्या सुराने नवीन इंग्रजी शाळेचा परिसर भारावून जात असे.
एन .डी .एस .चे प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर त्यांना मुंबईतील माटुंगा भागात ,एका गुजराती माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून पाठविले गेले. गर्भश्रीमंत लोकांची, व्यापाऱ्यांची मुले तिथे शिकत. सर्व मुले महागड्या गाड्यांमधून शाळेत येत. सरांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून अल्पावधीतच ते सर्वांच्या कौतुकाचे विषय ठरले. त्यांच्यातील कलेने सर्व शाळेला ,त्यांनी आपलेसे करून घेतले. मुलांकडून ड्रिल, कवायत, नृत्य ,समूहगीत शिस्तबद्ध रीतीने करून घेत. तिथला अनुभव सांगताना श्री. तिडके सरांची छाती गर्वाने फुलून येते. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री त्या शाळेत आले होते. पाहुण्यांच्या स्वागताची, त्यांना सलामी देण्याची जबाबदारी तिडके सरांवर सोपविण्यात आली. सरांनी अतिशय शिस्तबद्ध संचलन मुलांकडून करून घेतले .डंबेल्स वरील कवायत, घुंगुर काठीची कवायत ,नृत्य हे सारे पाहून शास्त्रीजी खूप खुश झाले . शास्त्रीजी यांनी तिडके सरां जवळ येऊन, या तरुण शिक्षकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली !हे सांगताना तिडके सरांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतात !! अंगावर रोमांच उभे राहतात. इतकेच नाही. तर शास्त्रीजी भाषणाला उभे राहिले, तेव्हा त्यांनी तिडके सरांना व्यासपीठावर बोलावून, स्वतःच्या हस्ते त्यांचा सत्कार केला . तोंडभरून कौतुक केले. जणूकाही शिक्षकी पेशाचा हा सन्मान होता. अशा छोट्या-मोठ्या घटनांमधून प्रेरणा घेऊन तिडके सरांनी न थकता ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू ठेवले. तिडके सर नाशिक जिल्ह्यातील आहेत, हे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्यांची बदली नाशिक मधील बिटको विद्यालयात केली. तेथून म्युचल ट्रान्सफर होऊन शेवटी नवीन इंग्रजी या आपल्या शाळेत तिडके सरांना सेवा करण्याची संधी अखेर प्राप्त झाली! जे त्यांचे पूर्वीपासूनचे स्वप्न होते !! आता स्वप्न साकार झाले. शाळा आणि विद्यार्थी हेच त्यांचे अवकाश होते.त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी पत्नीवर सोपविली .वेळेचा विचार न करता तिडके सर शाळेत रमायचे. भरभरून गप्पा करायचे.अर्थात ,काम न टाळता !निष्ठा शिकावी तिडके सरांकडून. शाळा आणि विद्यार्थी यांच्या बद्दल नकारात्मक बोलणार्यांना ते शब्दांनी फटकारत. ज्या शाळेत आपण शिकलो, त्याच शाळेत आपण सेवा करत आहोत, याचं त्यांना समाधान वाटे.
एकदा कसबे सुकेने येथून सायकल ने ते शाळेत येत होते. त्यांच्या शेतात द्राक्षबाग लावली होती .व्यापाऱ्याने त्यांची द्राक्ष विकत घेऊन दोन लाखांचा चेक सरांना दिला. तो धनादेश त्यांनी पिशवीत ठेवला .ती पिशवी सायकलला अडकवून ते शाळेत यायला निघाले. शाळेत पोहोचले.नेहमीप्रमाणे सायकल स्टॅंडवर लावली. पिशवीतून बासरी काढली आणि बासरी वाजवण्यात, मुलांमध्ये ते तल्लीन झाले .शाळा भरली .त्यांना अचानक दोन लाखाच्या चेक ची आठवण झाली. पिशवीत हात घातला .चेक सापडला नाही. दोन लाख म्हणजे थोडीथोडकी रक्कम नव्हती. त्यांच्या तोंडचे पाणी पळाले .सर्व शिक्षक चेक शोधू लागले. काही जण तर ,ज्या रस्त्याने सर शाळेत आले, त्या रस्त्याने शोधत शोधत जाऊन आले. चेक मात्र सापडला नाही. शाळेकडे येताना रस्त्यालगत एक चिंचेचे झाड होते .त्या झाडाच्या फांदीवर एक कागदाचा तुकडा हवेने फडफडताना दिसला. तो दोन लाखांचा तुकडा म्हणजेच सरांचा धनादेश होता ! वर्दळीच्या रस्त्यावर असूनही चेक सुरक्षित राहिला !! बासरी काढताना चेक जमिनीवर पडला आणि वाऱ्याने उडून तो चिंचेच्या झाडाला फांदीवर अडकला होता. हा चमत्कारच म्हटला पाहिजे ! कदाचित, प्रामाणिक सेवा देणाऱ्या माणसाला परमेश्वराने ही मोठी भेट दिली होती ! परमेश्वराने त्यांचे नुकसान होऊ दिले नाही.
सर अत्यंत कष्टाळू होते. शाळेत मुलांना कार्यानुभव अंतर्गत शेती हा विषय शिकवला जात असे .तिडके सर मुळातच शेतकरी असल्याने, शाळेच्या आवारात कोबी, फ्लॉवर याची शेती त्यांनी केली .मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिला. मुलांनी पिकवलेल्या शाळेतील भाजीपाला लोक आनंदाने विकत घेत. एकदा चित्रकलेचे शिक्षक कागदी फुलांनी शाळेचे आतील खांब सजवत होते. सर त्यांना म्हटले त्यात जिवंतपणा नाही. चित्रकलेच्या सरांना थोडे वाईट वाटले. त्यांनी तिडके सरांना "तुम्ही जिवंतपणा आणा", असा टोला लगावला. तिडके सरांनी ते आव्हान स्वीकारले .न बोलता कामाला सुरुवात केली. सरांनी सर्व खांबांना लागून बोगनवेल आणि फुलझाडे लावली.स्वतः त्यांची मशागत व देखभाल करून, वर्षभरात बोगनवेल चा मंडप खांबाला लागून उभा राहिला. शाळेचे रूपडे पालटले. ते पाहून चित्रकलेचे शिक्षक त्यांच्यापुढे सर्वांसमोर नतमस्तक झाले. त्यांनी सरांची माफी मागितली आणि कौतुक देखील केले.
आई-वडिलांच्या संस्कार बरोबरच शाळेचे ही संस्कार माझ्यावर झाले, असे ते नम्रपणे कबूल करतात . धुं. शां. देशपांडे ,म. ल. जोशी, श्रीमती सिंधुताई परांजपे, श्री. रामभाऊ क्षीरसागर यासारख्या मुख्याध्यापकांनी मला घडविले. प्रेम, जिव्हाळा दिला. आपुलकीने वागवले. वेळोवेळी केलेल्या कामाचे कौतुक केले. विशेष म्हणजे संधी मिळवून दिली.त्यामुळे कधीकधी इतरांच्या द्वेषाला पात्र देखील व्हावे लागले.असे सर सांगतात. परंतु, चांगले काम करताना त्याची तमा त्यांनी बाळगली नाही.
तो दिवस .....मला चांगलाच आठवतो! १९९७ चे वर्ष. तिडके सरांच्या सेवानिवृत्तीचा दिवस. संपुर्ण शाळेतील मुलं अश्रू ढाळत होते. निरागस मने रडताना पाहून ,तिडके सर यांना अश्रू अनावर झाले .मुलांना आता ही बासरी पुन्हा ऐकायला मिळणार नव्हती. सेवानिवृत्ती चा समारंभ संपल्यानंतर ,सर्वांचा निरोप घेऊन तिडके सर घरी जाण्यासाठी निघाले. पाच-पन्नास पोरांचा घोळका त्यांना शाळेतून निरोप देण्यासाठी थांबला होता. मुलांच्या रडण्याचा आवाज ,ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेत होता! तिडके सरांचा देखील कंठ दाटून आला होता. खांद्याला अडकवलेल्या शबनम मधून तिडके सरांनी बासरी काढली. ओठाला लावली .त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एका शिक्षकाबद्दल मुलांचं आणि शिक्षकाचं मुलांबद्दल निस्सीम प्रेम, मी यापूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं! पुढेही असा योग कधी येईल, असे मला वाटत नाही .मनात विचार आला. तिडके सरांमध्ये असलेल्या अनंत सद्गगुणांपैकी एखादा गुण आपल्याला घेता येईल का? तिडके सरांच्या निवृत्तीमुळे शाळेची ओळख हळूहळू पुसली जाऊ लागली. कारण त्यांची जागा पुन्हा कुणी भरून काढली नाही!
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्ण लक्ष शेतीकडे वळविले .तेथे मजुरांबरोबर रमत .त्यांना बासरीवर गाणी ऐकवत .त्यांच्याकडे मजूर आनंदाने कामाला येत. कामावर असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा यामुळे वयाच्या ८२ व्या वर्षी देखील, कोणत्याही आजाराने त्यांच्याजवळ येण्याची हिंमत केली नाही! सर्व प्रकारच्या विकारांपासून ते दूर असल्याने त्यांना औषधाची देखील गरज भासली नाही .तिडके सरांचा सहवास मला लाभला, हा माझ्या जीवनातील अलौकिक आनंदाचा क्षण होता .कथा कादंबऱ्यांमधून एखाद्याच्या कर्तृत्वाचं वर्णन वाचनं वेगळं आणि प्रत्यक्षानुभूती घेणं वेगळं! त्याचा आनंद औरच !! माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी, माझी मानगुट पकडली तेव्हाचे तिडके सर आणि आजचे तिडके सर अनुभूतीत प्रचंड तफावत आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनातला आदर शतपटीने वाढला आहे!धन्य ते तिडके सर !!
. नोकरी करत असतानाच शाळेची परवानगी घेऊन ,एफ.वाय.बी.ए. या वर्गात कॉलेजमध्ये एक्स्टर्णल म्हणून ऍडमिशन घेतले. हळूहळू शाळेसाठी अभ्यास आणि कॉलेजचा अभ्यास सुरू ठेवला .शाळेत सकाळ सत्रात काम करीत असताना श्री. मधुकर नरहर पाठक सर, पर्यवेक्षक होते. त्यांना सर्वजण प्रेमाने व आदराने" तात्या" म्हणत असत.सुरुवातीच्या काळात, मी नाशिक हुन काकांकडून शाळेत ये-जा करीत होतो. नाशिक हुन गरुडेश्वर नांदगाव ही बस वेळेच्या आत पोहोचवत असे. माझ्याआधी श्री. पाठक सर शाळेत हजर असत.शाळेत आले की, पहिल्यांदा स्टाफरूममध्ये यायचे .ते भेटले की त्यांचा एक प्रश्न ठरलेला असे. "हे पोरा, कसा आहेस?त्याठिकाणी." मी नम्रपणे त्यांच्याशी बोलत असे. त्यांच्या बोलण्यात आपुलकी होती. अडीअडचणी विचारायचे .शाळा कशी वाटते? याबाबत अनौपचारिक चौकशी करायचे .काय कर -काय करू नको, असे समजावून सांगायचे. जणू एखादी आपल्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती जिव्हाळ्याने आपल्याशी बोलत आहे, असा विश्वास त्यांच्याबद्दल निर्माण झाला .जाड भिंगाचा चष्मा ,उंचीने तसे ठेंगणे, बोलणे सुस्पष्ट ,उंच आवाज ,नीटनेटके ,गोरेपान असे पाठक सर,शाळेची पायरी चढले की, त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडे." ये पोरा काय करतो ? त्या ठिकाणी ".उंच स्वरात त्यांचं असं बोलणं ऐकून इकडे-तिकडे फिरणारी मुलं-मुली वर्गात निमूटपणे जाऊन बसायची. शिक्षकही आपापल्या वर्गात जायचे! त्यांचे हे बोलणे जणू सर्वांसाठीच असे.सकाळी -सकाळी स्टाफरूममध्ये भेटलेले पाठक सर आणि शाळा भरल्यानंतरचे पाठक सर यांच्यात मात्र फरक होता .एकदम कडक शिस्त. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही खडसावण्याची हिंमत त्यांच्यात होती .प्रारंभीच्या काळात मला वर्ग नियंत्रण फारसे जमत नसे. मी मुलांशी आणि मुलं माझ्याशी गंमत करायची. वर्गात गोंधळाची परिस्थिती निर्माण व्हायची. तात्या लगेच माझ्या वर्गात येऊन, मुलांबरोबरच माझीही शाब्दीक खरडपट्टी काढायचे. मी खूप नाराज व्हायचो. वर्ग नियंत्रणासाठी काय करता येईल? याचा विचार करायचो .ते मला नेहमी म्हणायचे," तू वर्गात काय शिकवतो, हे महत्त्वाचे नाही .वर्गात गोंधळ होता कामा नये," त्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या त्यांनी मला सुचविल्या. काहींच्या वर्गातून शिक्षक आणि विद्यार्थी कोणाचाच आवाज येईना! प्रारंभी मला त्याचे फार अप्रूप वाटे. हळूहळू ती कला मलादेखील उमगली ! परंतु तिचा वापर करणं माझ्या मनाला पटलं नाही !!
श्री. म. न.पाठक सर स्वतः उत्तम शिक्षक होते .मराठी- इंग्रजी या विषयांचा त्यांचा व्यासंग होता. ओझर सारख्या ग्रामीण भागातील शाळेत, त्याकाळात अस्खलित इंग्रजी बोलू शकणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये त्यांची गणना होत असे. मुळात ते फिजिकल या विषयाचे शिक्षक ,त्यामुळे शिस्तप्रिय परंतु स्टाफ रूम मध्ये येऊन विनोद निर्मिती करून वातावरण ते प्रसन्न करीत असत.स्पष्ट उच्चार, कोणतीही गोष्ट ठासून सांगणार. विनोद सांगतांना प्रचंड मोठ्या आवाजात स्वतः हसायचे. रोज सकाळी माईकवरून सूचना देऊन, दिवसभर काय करायचे? याचे नियोजन सांगत. त्यांच्या बोलण्यात "त्या ठिकाणी ", हा शब्द असंख्य वेळा यायचा. कधीकधी त्यातूनही विनोदाची निर्मिती व्हायची .परंतु तात्यांना त्याचे कधी वाईट वाटले नाही.
दिवाळीची सुट्टी संपून शाळा भरायची. पहिल्या दिवशी तात्या स्टाफ रूम मध्ये येऊन सर्वांना सांगायचे," उद्या कोणीही जेवणाचा डबा आणायचा नाही.त्या ठिकाणी ,मी उद्या तुम्हाला सर्वांना फराळ देणार आहे. त्या ठिकाणी". "त्या ठिकाणी", असे ऐकतांना प्रचंड हशा पिकत असे.त्याठिकाणी तात्यांही हसू लागायचे !! त्याठिकाणी, गमतीचा भाग सोडला तर ,पाठक सर अत्यंत प्रेमळ होते. शाळेचा आधारस्तंभ होते. वात्रट मुलं देखील त्यांना घाबरायची. शाळा बुडवून नदीवर पोहायला गेलेल्या मुलांना ते स्वतः धरून आणून त्यांनी शिक्षा केली. नंतर लक्षात आले ती सर्व मुलं गावातील बड्या पुढाऱ्यांची होती! अशा मुलांना ही शिक्षा करताना पाठक सरांनी मागेपुढे पाहिले नाही.माझ्यासारख्या नवागतांना तात्यांचा खूप आधार असे .ते प्रेरणा देत आणि या पेशातील खाच-खळगे समजावून सांगत.
तात्या ओझर गावात, पत्नी आणि चार मुली यांच्यासोबत राहत असत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील वाघाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे मोठे बंधू श्री.सो.न.पाठक हे देखील दोन-तीन महिने आपल्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते पुन्हा जळगाव येथे नोकरीनिमित्ताने निघून गेले. तात्यांना चार मुली. आपल्याला मुलगा नाही, याची खंत कधी त्यांनी बाळगली नाही. मुलींना उत्तम शिक्षण दिलं. तात्यांच्या दोन मुली एल.एल.बी. पर्यंत शिक्षण घेऊन वकिली करतात. एक मुलगी शिक्षिका, तर दुसरी कलेक्टर कचेरीत चांगल्या पदावर नोकरीस आहेत.
ज्या शाळेत आपल्या नोकरीला सुरुवात झाली, तेथेच निवृत्त व्हावे, असे त्यांना मनापासून वाटे .परंतु तसे घडले नाही. उपमुख्याध्यापक पदावर तात्यांना पदोन्नती मिळाली. नाईलाजाने संस्थेला त्यांची बदली दुसऱ्या शाळेत करावी लागली. तात्यांचे स्वप्न अधुरे राहिले. तरीदेखील अधून मधून नवीन इंग्रजी शाळेत येऊन जुन्या आठवणींना तात्या उजाळा द्यायचे. शासनाच्या नियत वयोमानानुसार तात्या सेवानिवृत्त झाले.
२०१७ च्या जुलै महिन्यात तात्यांचं देहावसान झालं .एक सच्चा मार्गदर्शक, मित्र हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
श्री. म.न.पाठक, श्री. दत्ता भावसार ,श्री.ल. झि.भडके, श्री.द .ना.शिंदे, श्री. बाळासाहेब हाडोळे, यासारखे समविचारी आणि शाळेला केंद्रस्थानी ठेवून काम करणारे शिक्षक पुढील काळात होऊन गेले. या सर्वांमध्ये हे साम्य होते की ते ओझर गावात स्थायिक होते. त्यामुळे जनसंपर्क दांडगा होता. श्री.ल. झि. भडके हे शाळेचे माजी विद्यार्थी. इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व होते.स्पष्ट वक्ते आणि शिस्तप्रिय देखील होते.माजी विद्यार्थी ते मुख्याध्यापक असा त्यांचा या शाळेतील प्रवास उल्लेखनीय आहे.
श्री. द .ना. शिंदे यांचा मूळ पिंड शेतकऱ्याचा. शेतकरी शेतात राबून मशागत करून चांगले पीक घेतो, तसे शिंदे सर मुलांसाठी शाळेसाठी श्रमत.त्यांना वाचनाची खूप आवड होती.
त्याकाळात, सौ.माधवी कापसे, सौ.जगताप, सौ.प्रमिला पाटील,सौ. मंगला भार्गवे यांचा स्टाफ रूम आणि शाळेत दरारा होता. अध्यापनात त्या प्रभावी होत्या.
मी, १९९५ ते २००० ही पाच वर्षे नवीन इंग्रजी शाळेत अध्यापनाचे काम केले. त्यादरम्यान, श्री. शां. पां.सूर्यवंशी, सौ.प्रमिला तपासे, सौ.अर्चना दांड, श्रीमती वीणा नवले, श्रीमती सरोजिनी तारापूरकर यासारखे पदाधिकारी होऊन गेले.
उपमुख्याध्यापिका म्हणून, सौ.राधिका राजपाठक काही काळ शाळेत होत्या. परंतु पदाधिकारी पदाचा डौल त्यांनी कधी मिरवला नाही. जवळचे, लांबचे असे कोणाबद्दल केले नाही. मोजक्या लोकांना हाताशी न धरता, सर्वांनाच विश्वासात घेऊन काम केले .त्यांच्या काळात शाळेला विद्यार्थी मिळवणे आवश्यक होते. अनेकांनी अनेक उपाय सुचविले. परंतु, श्रीमती राजपाठक मॅडम यांनी एक अफलातून कल्पना सर्वांसमोर मांडली.ज्या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या बरोबरच शाळेचा विद्यार्थी संख्येचा प्रश्न देखील सुटणार होता. शाळेत "आनंद मेळा" घ्यायचे नियोजन त्यांनी स्वतः केले. ही कल्पना ऐकून अनेकांच्या भुवया वेगवेगळ्या अर्थाने उंचावल्या ! परंतु, ते फारसे मनावर न घेता, भव्य स्वरूपात आनंद मेळ्याचे आयोजन, नवीन इंग्रजी शाळेच्या मैदानात, हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत करून दाखविले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल गावकरी आणि विद्यार्थी खूष झाले. अनेकांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली!त्यामागे ,श्रीमती राजपाठक मॅडम यांची प्रचंड मेहनत होती. वय वर्ष जवळपास ५५, कृश शरीरयष्टी असलेल्या राजपाठक मॅडम मनाने कधी थकल्या नाहीत.तरुणांना लाजवेल असं,त्या काम करत. कधी चिडचिड केली नाही. श्रीमती राजपाठक मॅडम यांचे वडील कै.य.ह. मोहाडकर सर याच विद्यालयात कधीकाळी मुख्याध्यापक होते.त्या स्वतः संस्थेच्या सारडा मंदिर शाळेच्या विद्यार्थिनी .अत्यंत उत्साही, कलेची आवड त्यांना होती. इतिहास, मराठी हे त्यांच्या आवडीचे विषय. त्या उत्स्फूर्त कविता रचत. नाटकांचे लेखन करत. त्या उत्तम नृत्यदिग्दर्शक होत्या. गीत गायनाच्या स्पर्धेसाठी त्या स्वतः गाणं लिहीत. प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांशी त्या आदराने वागत.आमच्यासारख्यांशी त्या प्रेमाने आणि एकेरी नावाने हाक मारत. अशावेळी, जणू आई आपल्याशी बोलते आहे. असा भास होई. स्काउट- गाइड हा त्यांचा आवडीचा प्रांत! कारण,त्या माध्यमातून मुला-मुलींवर उत्तम संस्कार करता येतात. त्यांना व्यवहार ज्ञानाचा अनुभव देता येतो .पर्यावरण, निसर्ग संवर्धनाचे संस्कार करता येतात. असे त्यांचे मत होते. शाळेत सकाळ सत्रात परिपाठ उत्तम झालाच पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. पपेट्स ,बाहुली नृत्य, इ.कला आम्हाला शिकवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. प्रशासन आणि शिक्षण यांची उत्तम सांगड त्यांनी घातली. अत्यंत विनम्र आणि प्रेमळ राजपाठक बाई कायमच स्मरणात राहतील, यात शंका नाही.दुसऱ्याला समजून घेणं काय असतं? ते राजपाठक बाईंनी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून दाखवून दिले .एकदा माझे आई-वडील काही कामानिमित्ताने नाशिकला येत होते. आपला मुलगा ज्या शाळेत शिकतो ,ती शाळा पाहण्याची इच्छा त्यांना झाली .ते ओझर थांब्यावर उतरले. शाळेत येऊन श्रीमती राजपाठक मॅडम यांना भेटले. त्यांना बाईंनी विचारले ,"कोण हवे तुम्हाला ?" ते म्हणाले," शैलेश पाटोळे ".बाई म्हणाल्या," माझ्या पोराला भेटायला आलात !" हे वाक्य ऐकून आईचं मन समाधानाने गहिवरून आलं ! एवढी आपुलकी आणि जिव्हाळा त्यांच्या शब्दात होता . माझ्या हृदयाच्या अत्यंत नाजूक कोपऱ्यात बाईंना स्थान आहे ,ते उगाच नाही !! उत्तम आणि आदर्श शिक्षकांची अनेक उदाहरणे आपण पुस्तकात वाचतो. परंतु ,मी प्रत्यक्ष अनुभवलेल्या राजपाठक बाई मात्र एकमेवाद्वितीयच !!
श्री. रमेश खैरनार ,श्री.मधुकर बंद्रे, श्री. य. भि. चौधरी ,श्री. बा. झि. भडके, श्री.बा. ल.भोज, यासारखे शिक्षक शाळेत होते. सर्वांची नावे मला आता आठवत नाहीत.
नवीन इंग्रजी शाळेने मला काय दिले? याचे उत्तर आहे," सर्व काही ".पोट भरण्यासाठी पगार दिला .शिक्षक म्हणून प्रतिष्ठा दिली. अनेक गुरु दिले ,ज्यांच्याकडून प्रेरणा तर, कधी प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाला. माझ्या मनाच्या कोऱ्या पाटीवर नीतिमूल्यांची ,संस्कारांची धुळाक्षरे याच शाळेत लिहिली गेली. माझे शिक्षण खेडेगावात झाले होते .चार चौघात बोलण्याची फारशी सवय नव्हती. प्रारंभी बोलताना हातापायाला कंप सूटे. डोळ्यांच्या पापण्यांची आपोआप ,अनावश्यक उघडझाप होई. काय बोलायचे, तेच विसरून जात असे ! प्रारंभीचा काहीकाळ असा गेला. तेव्हा उगाचच आपण शिक्षक झालो ,असे वाटायचे!
त्यावेळी ,महिनाअखेरीस शाळा अर्धा दिवस भरे. शेवटच्या दोन तासिकाना शिक्षक विद्यार्थ्यांना पटांगणात बोलावून बोधपर गोष्टी सांगत. एकदा अचानक श्री. पाठक सर मज जवळ येऊन म्हणाले," यावेळी कथा मुलांच्या समोर, तू सांगायची, तयारी ठेव!" नकार देणे ,त्यावेळी शक्य नव्हते .हे वाक्य ऐकताच सर्वांगाला कंप सुटला! एक दोन दिवसानंतर मला गोष्ट सांगायची होती. विचारचक्र सुरू झाले. शाळा सुटल्यावर घरी पोहोचलो.कोणती गोष्ट सांगू? कशी सांगू ?मुलं माझा ऐकतील का ?हसणार तर नाही ना ! एक ना अनेक प्रश्न सतावू लागले. त्याकाळी झी. टी.व्ही.वर 'अकबर बिरबल' ही धारावाहिक पाहताना अचानक सुचलं ! उद्या मुलांना हीच गोष्ट सांगायची. ठरलं! घोकंपट्टी केली .दुसऱ्या दिवशी खोटं अवसान आणून, मुलांसमोर गोष्ट सांगायला सुरुवात केली. संपूर्ण शरीराचा थरकाप उडाला. पापण्यांची उघडझाप आणि पुढचा मुद्दा काही सुचेना .त्यात भर म्हणून, गोष्ट ऐकताना, गोष्टीपेक्षा माझ्याकडे पाहून समोरच्या मुलांचं छान मनोरंजन होत होतं! गोष्ट सांगताना मी मुद्दा विसरलो की, मुले आठवण करून द्यायची !यामुळे ,मी अधिकच गांगरलो. काही मुलं-मुली मनसोक्त हसत होती. कसे तरी ते दिव्य मी पार केले . नंतर काही मुलांनी येऊन सांगितले ,"सर ,ही गोष्ट आम्ही काल टी.व्ही.वर पाहिली होती ".हे ऐकून मी अधिकच खजील झालो! परंतु, त्यातून मी धडा घेतला. ग्रंथालयातून पुस्तक घ्यायला लागलो. वाचायला लागलो. लिहायला, नोंदी करायला लागलो. हळूहळू आत्मविश्वास वाढला.नंतर मात्र, शिक्षकांकडून कौतुक आणि विद्यार्थ्यांकडून टाळ्या मिळवू लागलो. एक शिक्षक म्हणून ,आत्मविश्वास या शाळेमुळे माझ्यात निर्माण झाला.
मी मूळचा सटाणा तालुक्यातील आहे, असे लक्षात आल्यावर आपोआप त्या भागातील वरिष्ठ शिक्षक आपल्या गावाकडचा म्हणून माझ्याशी आपुलकीने वागू लागले. त्यात श्री.दिलीप आहिरे आणि श्री.दिनेश देवरे यांचा विशेष उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे.
श्री. देवरे सर वक्तृत्व कलेत निपून होते. एकतर ते नवीन इंग्रजी शाळेचे माजी विद्यार्थी. त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांसोबत ते आता नोकरी करीत होते. त्यांचे वडील एच.ए.एल. कारखान्यात नोकरी करता करता किर्तन देखील करायचे. त्यामुळे श्री देवरे सरांवर अध्यात्माचे संस्कार वडिलांकडून झाले होते. देवरे सर दोन विषयात पोस्ट ग्रॅज्युएट होते. मी नोकरीला लागलो तेव्हा ते शिकत होते. "नोकरी लागली तरी शिक्षण थांबवायचं नाही", हे माझ्या वडिलांनी आणि मोठ्या भावाने मला खडसावून सांगितलं होतं. त्यात श्री देवरे सरांनी मला खूप प्रोत्साहन दिले आणि मदत देखील केली. शाळेतून पदाधिकाऱ्यांकडून अनेकदा, आपलं काम सांभाळून शिक्षणासाठी सवलत घ्यावी लागत असे. त्याकरिता, श्री.देवरे सर मध्यस्थी करत.त्यामुळेच ,मी न थांबता पोस्ट ग्रॅज्युएट आणि व्याख्याता पदासाठी आवश्यक सेट परीक्षा उत्तीर्ण होऊ शकलो. देवरे सरांची बोलण्याची कला आणि व्यासंग मला नेहमी आकर्षित करीत असे. शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या बाबतीत त्यांच्या पावलावर पाऊल टाकावे, असे मला नेहमी वाटते .उत्स्फूर्त भाषण करण्याची कला त्यांना अवगत होती.विषय कोणताही असो, समोर श्रोतावर्ग कोणीही असो ,देवरे सर भाषणाला सुरुवात करत. त्यांची प्रारंभीची दोन वाक्ये ठरलेली असत. "आज अमृतकांचन योग आहे",किंवा "असे पाहुणे आपल्याला मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे." असे म्हणून व्यासपीठावरील पाहुण्यांना ते खूश करत.ही दोन वाक्य उच्चारल्या नंतर देवरे सर पुढील दहा पंधरा मिनिटे तरी भाषण थांबवणार नाही, याची खात्री असे. कोणतेही कागद, टिपण त्यांना लागत नसे. संतांचे अभंग, ओव्या, त्यांच्या तोंडपाठ असत. ऐकणारा श्रोतृवृंद खुश होऊन जाई. त्यांच्या बोलण्यात माधुर्य होतं! ऐकताना आम्ही सारे मंत्रमुग्ध होऊन जात. मला नेहमी त्यांच्या सारखं कधी बोलता येईल ? याचा विचार माझ्या मनात येत असे. कधीकधी माझे भाषण असले, तर त्याचं समीक्षण मी त्यांना विचारत असे. ते नाउमेद करीत नसत. परंतु ,शैलेश तू असा बदल कर. म्हणजे अधिक उत्तम होईल. असं सुचवायचे. बऱ्याचदा ,मला शाळा सुटल्यावर दुपारच्या स्वयंपाकाचा कंटाळा येई. अशावेळी ,श्री. देवरे सर मला बळजबरीने त्यांच्या दुचाकीवर बसवून घेऊन टाऊनशिप मध्ये ,त्यांच्या घरी नेत.त्यांच्या मातोश्री माझ्यासारख्या आगंतुक आलेल्या साठी गरम गरम पोळी भाजीचे ताट पाटावर वाढत असत. माझा आत्मा तृप्त होत असे .जेवण झाल्यावर पुन्हा, सर मला माझ्या खोलीपर्यंत सोडण्यासाठी येत.मला नेहमी असं वाटतं की, ईश्वराने, अशी अनेक माणसे माझ्यासाठी पाठविली. जेणेकरून मला कधीही परिस्थितीचे चटके फारसे बसले नाहीत. देवरे सर आणि माझे नाते भावासारखे होते. नव्हे अजूनही आहे! देवरे सर, एक दिलदार मित्र! स्वतःपेक्षा इतरांचा विचार त्यांना अधिक असतो. कोणी काही काम सांगितले तेथे हजर असतात. त्यावेळी त्यांच्या पत्नी ओझर परिसरात प्राथमिक शिक्षिका असल्याने किमान इयत्ता पाचवीच्या एका तुकडीचे प्रवेश देवरे सरांच्या माध्यमातून होत. त्यासाठी त्यांनी मुलांच्या वह्या पुस्तकांसाठी, दप्तर आणि गणवेशासाठी पदरमोड केल्याचे मला आठवते.
श्री. खैरनार सर गमतीने ज्यांचा उल्लेख चंगू आणि मंगू म्हणून करत, ते म्हणजे श्री. देवरे सर आणि श्री.अहिरे सर !! हे दोघेही शाळेत आणि शाळेबाहेर ही बराच काळ एकत्र रहात. मी ओझर येथे खोली भाड्याने घेऊन राहत असे .त्यावेळी खोली शोधून देण्यापासून सर्व काही मदत श्री. अहिरे सरांनी मला केली ते वर्तमानपत्रात छंद म्हणून लेख लिहायचे.वार्ताहर म्हणून काम करीत. ते मला बातम्या लिहायला सांगत. त्यांचे अक्षर फार सुंदर होते. चित्रकला शिक्षकाला लाजवेल असे त्यांचे फलकलेखन होतं!कोणीही त्यांच्या या कलेच्या प्रेमात पडेल ! प्रभावी अध्यापन ही त्यांची जमेची बाजू होती. पदाधिकाऱ्यांना ते सर्वतोपरी मदत करीत. शाळेसाठी त्यांनी भरपूर मेहनत केली. ते सूत्रसंचालन फार उत्तम रीतीने करतात. श्री.अहिरे सरांचे अक्षर लेखनाचे अनुकरण करून माझे देखील लेखन वाचनीय झाले! शाळेच्या पाचवीच्या वर्गाच्या प्रवेशासाठी किमान एक तुकडी, अहिरे सर वेगवेगळ्या माध्यमामुळे मिळवत असे..अहिरे सरांनी मला भावनिक आधार दिला. अनेक शालेय उपक्रमात ते मला सहभागी करून घेत. त्याचा मला पुढील काळात खूप उपयोग झाला. श्री.अहिरे सर आणि श्री देवरे सर यांनी मला परकेपणाची वागणूक दिली नाही. उत्तम शिक्षकाच्या अंगी असलेले अनेक गुण त्यांच्या ठायी होते. माझ्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात या दोघांबरोबर मी राहिल्याने कदाचित माझ्या जीवनाची गाडी घसरली नाही. मी सदैव त्यांच्या ऋणात राहणे पसंत करीन.
शाळेतील विद्यार्थ्यांशी माझे ऋणानुबंध पक्के जुळले. सर्व विद्यार्थी शिक्षकांसाठी समान असतात. परंतु त्यातील काहींना हृदयात स्थान असते. असे काही विद्यार्थी माझे सवंगडी होते. महेश रासने ,गणेश लासुरे, कोळपकर , विष्णू पगार,अश्विन थोरात, ऋषिकेश कासार, गणेश तांबट,देवेंद्र तिवारी ,इत्यादी. सर्व नाव आता आठवत नाहीत. माझं वय १८-१९ वर्षे आणि या मुलांचे वय साधारण बारा-तेरा वर्षे .ते विद्यार्थी कमी आणि मित्र अधिक होते. पहिल्या वर्षी या विद्यार्थ्यांना मी पाचवीच्या वर्गाला वर्गशिक्षक होतो .मुलं मला आणि मी मुलांना खूप आवडत असे. कारण माहित नव्हतं. एकदा या मुलांनी मला गावात एका छोट्या हॉटेलमध्ये घेऊन जाऊन मलाई बर्फी खाऊ घातली. मी बिलाचे पैसे देण्यासाठी काउंटरवर गेल्यावर कळले, मुलांनी पैसे आधीच हॉटेल मालकाला देऊन ठेवले होते. मुलांनी थोडे थोडे पैसे एकत्र करून मला पार्टी दिली होती ! आज मला वाटेल तेव्हा गोड-धोड पदार्थ विकत आणून मी खाऊ शकतो .परंतु, माझ्या मुलांनी मला प्रेमाने खाऊ घातलेल्या मलई बर्फी ची सर त्याला कशी येणार !!
शाळा सुटल्यानंतर रोज आम्ही या मुलांबरोबर मनसोक्त क्रिकेट खेळायचो. त्यामुळे माझे आणि मुलांचे नाते अधिकच घट्ट झाले.
वरिष्ठांच्या चांगल्या गुणांचे अनुकरण करत- करत बरा पासून.... चांगल्या पर्यंत माझी प्रगती झाली. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये माझी चांगलीच छाप पडू लागली.आणि... अचानक २००० सालच्या डिसेंबर महिन्यात माझ्यासह काही शिक्षकांच्या बदलीची ऑर्डर आमच्या हातात पडली. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य शाखेत ,म्हणजे पेठे विद्यालयात बदली झाल्याचा आनंद झाला! शेवटच्या दिवशी, रिलीव्ह ऑर्डर घेऊन, मुलांचा निरोप घेताना बालगोपाळांचे हिरमुसलेले चेहरे पाहून ,माझ्यासह इतरांना गहिवरुन आले. "सर, तुम्ही जाऊ नका ना !"अशा ,आर्त विनवण्या हृदय पिळवटून टाकत होत्या !!
मन, नवीन इंग्रजी शाळेतील मुलांमध्ये सोडून जड अंतकरणाने पुढील प्रवासासाठी निघालो...
नवीन इंग्रजी शाळेने मला काय दिले ? खरं म्हणजे वादळात उभे राहण्यासाठी, माझ्या पायांना ताकद दिली. हिम्मत दिली. आनंद कसा आणि कशात मिळवायचा, ते शिकवलं. मोजके, परंतु चांगले मित्र दिले. आदर्शांची शिदोरी दिली. जिव्हाळा ,आपुलकी ,प्रेम ,सर्व..... सर्व काही दिलं .परमेश्वर त्या ज्ञानमंदिरास पुनश्च गतवैभव प्रदान करो, हीच मनोभावे प्रार्थना !!
लेखन
श्री. शैलेश पाटोळे
चौथा लेख✍️✍️😊
“तंबूपासून ताजमहालापर्यंत”
“तंबूपासून ताजमहालापर्यंत” ------------------------ “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...
-
✍️ जागतिक पुस्तक दिन: २३ एप्रिल ✍️ ज्ञान की यह खान हैं होती बहुत महान हैं जीवन इंसान का बदले तभी तो इसकी शान हैं ...
-
सहकारातील तेजस्वी तारा (श्री.भास्कर- आबा कोठावदे) नमस्कार, आज - काल नव्या पिढीच्या समोर आदर्शांची वा...
-
दिवस नवीन इंग्रजी शाळेतले....✍️✍️ नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नवीन इंग्रजी शाळा ,ओझर येथे नोकरीची अपॉइंटमेंट ऑर्डर घे...
-
___________________________ एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व ......श्री एकनाथ कडाळे _____________________________ ...
-
आई ..आठवणींच्या हिंदोळ्यावर सुमारे ४८-४९ वर्षांपूर्वीची गोष्ट, माहेरी लाडाकोडात वाढलेली बेबी आता रत्ना बनून सासरी आली. आ...
-
आनंदाचे डोही l आनंद तरंग ll एका सुंदर सजवलेल्या हॉलमध्ये एका वक्त्याचे भाषण सुरू होते. साधारण शं...
-
हसतेे कट जाए रस्ते.... शुभ संध्याकाळ !! कसे आहात ? मजेत ना .. छान. हसत रहा l आनंदी राहा ll आज जागतिक हास्य दिन. ...
-
श्री.नवीन तांबट आनंदाचा झरा______ पेठे विद्यालयाचे सभागृह. २००८ च्या ऑगस्ट महिन्...