Tuesday, July 28, 2020

खंबीर मनाचा... श्रावण !

                        खंबीर मनाचा ....श्रावण!
जगन्नियंता परमेश्वराने माणसाला पंचज्ञानेंद्रिय व कर्मेन्द्रिय प्रदान करून आयुष्य जगण्यास सुलभ व आनंददायी केले आहे. इतर प्राण्यांच्या तुलनेने ईश्वराने माणसावर केलेले हे उपकारच म्हणावेत.
     शेवटी ज्ञानेन्द्रिय आणि कर्मेन्द्रिय यांचा उपयोग माणूस कसा करून घेतो, हे त्याच्यावर अवलंबून आहे. नाहीतर, सर्व शरीर धड असतानादेखील भीक मागणारी माणसं आपण रस्त्यावर अनेकदा पाहतो. तर शारीरिक अपंगत्व असलेल्या काही व्यक्ती जीवन संघर्षात हिमतीने उभे असल्याचे दिसून येते! 
      शारीरिक अपंगत्व, कधी जन्मतःच तर कधी जन्मानंतर येऊ शकते.जीवन संघर्षात हिमतीने उभे राहण्याचे सामर्थ्य माणसात मुळात असतेच.परंतु,काहीना त्या सामर्थ्याचा शोध लागतो,तर काही स्वतःच्या शोधात हरवलेले असतात!अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभोवती आढळतात.
    अश्या एका व्यक्तीशी माझा परिचय झाला.जन्मानंतर अपघाताने अपंगत्व येऊनही मान आणि स्वाभिमानाने जगता येऊ शकते,याचे ती व्यक्ती मूर्तिमंत उदाहरण आहे.नाहीतर,सारे काही सुस्थितीत असूनही स्वाभिमान गहाण ठेवून,लाचारी पत्करणारी उदाहरणे आपल्या आजूबाजूला असतात.
       शारीरिक व्यंग असणारी माणसे देखील दोन प्रकारची पहायला मिळतात. आपल्या अपंगत्वाचा बाऊ करून, लोकांची सहानुभूती मिळवून, दुसऱ्याच्या आधाराने जगू पाहतात. तर काही मात्र प्राप्त परिस्थितीला शरण न जाता, हरेक संकटाचा मुकाबला करतात. मला भेटलेली ती व्यक्ती दुसऱ्या प्रकारातली ! तिचा जीवन संघर्ष आणि उमेद पाहता आपल्याला आपण धडधाकट असल्याची लाज वाटावी !!
       जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव जवळील तळेगाव या छोट्याशा गावातील, श्री.दयाराम झिप्रू मोरे व सौ. घुमनबाई यांना पाच अपत्ये होती. मुळातच अशिक्षित असलेले हे दांपत्य मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढत होती. त्यात चार मुली आणि एक मुलगा.... श्रावण त्याचे नाव. गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जुजबी शिक्षण करून मुलींची लग्न केली. दोन मुलींनंतर श्रावणचा जन्म झालेला असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. आर्थिक सुस्थिती नसली तरीही छोट्या श्रावणचे लाडकोड आई वडील आणि बहिणी करीत असत.
      गावात सर्वेक्षणासाठी आलेल्या आरोग्य सेविकांनी सांगितल्याप्रमाणे तालुक्याच्या गावी जाऊन चार-पाच वर्षे वय असलेल्या श्रावणला आईवडिलांनी पोलिओची लस देऊन आणली. दुर्दैवाने, लहानगा श्रावण तापात फणफणलेला असताना,पोलिओची लस दिली गेली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधित डॉक्टरांच्या देखील ते लक्षात आले नाही. त्याचा विपरीत परिणाम होऊन श्रावणला एका पायाला पोलिओ होऊन कायमचे अपंगत्व आले. वयाच्या पाच वर्षांपर्यंत दुडूदुडू धावणाऱ्या श्रावणला पुढे आयुष्यभर कुबड्यांचा आधार घ्यावा लागला! अडाणी - अशिक्षितपणाची केवढी मोठी किंमत मोजावी लागू शकते !!         आपल्यामुळे मुलाला अपंगत्व आले ही भावना आई वडिलांच्या मनाला लागून गेली.
       प्राथमिक-  माध्यमिक शिक्षण आपल्या गावातच श्रावणने कसेबसे पूर्ण केले. बारावी कला शाखेमध्ये असताना, आपले ओझे आई-वडिलांवर नको, आपण स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, काय करता येईल? या विचारांनी श्रावण बेचैन झाला. तो शाळा सांभाळून आई-वडिलांना शेती आणि मोल मजुरी करण्यात मदत करीत असे. गावातील एका सद्गृहस्थाने श्रावणला शासनाच्या स्वयंरोजगार योजनेअंतर्गत व्यवसाय प्रशिक्षणाची माहिती दिली. त्यानुसार कॉलेजचे शिक्षण थांबवून, शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या ट्रायसेन योजनेअंतर्गत, गावागावात काम करणाऱ्या वायरमन अर्थात विद्युततंत्री यांना मदतनीस म्हणून सहा महिन्यांचा सहाय्यक विद्युत तंत्री कोर्स चाळीसगाव या तालुक्याच्या गावी जाऊन पूर्ण केला. हा कोर्स पूर्ण करून गावातील वायरमन यांच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करू व शिकू लागला. एका पायाने अधू असलेला श्रावण तब्येतीने काटक आहे. चपळ आहे. इतरांच्या तुलनेने नवीन गोष्ट शिकण्याची त्याची ताकद अफाट आहे. खेड्यातील शेतांमध्ये विजेच्या खांबांवर चपळाईने तो चढत असे. त्यामुळे उंचीचे भय त्याला कधीही वाटले नाही. हळूहळू त्याच्या कामाचे कौतुक आजूबाजूच्या परिसरात होऊ लागले. अपंग म्हणून हेटाळणी करणारे लोक आता त्याच्यासाठी अडून बसत होते. वायरमन करीत असलेल्या कामाचे तांत्रिक ज्ञान आणि अनुभव श्रावण ने  प्राप्त केला. थोड्याफार प्रमाणात केलेल्या कामाचा मेहनताना मिळत असे. कुटुंबाला हातभार लागत असे. परंतु लहानशा खेड्यात नेहमी काम मिळत नसे.
       कुटुंबासाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही भावना त्याला शांत बसू देत नव्हती. लांबच्या नात्यातील एक व्यक्ती नाशिकला कंपनीत काम करीत असे. काही निमित्ताने ते गावी आलेले असताना श्रावणाच्या कामाबद्दल त्यांनी ऐकले. तू नाशिकला येऊन काम कर, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानुसार १९९० मध्ये श्रावण नाशिकच्या सिडको भागात येऊन राहू लागला. एका छोट्याशा इलेक्ट्रिक दुकानात तुटपुंज्या पगारावर कामाला सुरुवात केली. श्रावण अपंग आहे, तो काय काम करू शकेल? म्हणून प्रारंभी त्याला शहरातील लोक काम देण्यास टाळाटाळ करीत. इलेक्ट्रिक दुकान मालकाकडे डेकोरेशनचे काम असायचे. इमारतींवर लाइटिंग करणे, छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या प्रसंगी रोषणाई करणे, सण समारंभाच्या निमित्ताने विविध मंडळांच्या डेकोरेशन साठी लाईट फिटिंग करणे, अशी कामे श्रावण अत्यंत चपळाईने व कुणाचीही मदत न घेता सफाईदारपणे करीत असे. प्रामाणिकपणा आणि कामातील सफाईदारपणा यामुळे हळूहळू श्रावण ला कामे मिळू लागली. याच दरम्यान श्री. लोखंडे नामक एका इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर त्याची ओळख झाली. दुकानाचे काम सोडून कॉन्ट्रॅक्टर कडे श्रावण ने कामाला सुरुवात केली. श्रावणच्या अंगी असलेल्या विविध गुणांना वाव मिळू लागला. जवळपास दहा ते बारा वर्षे श्रावणने श्री.लोखंडे यांच्याकडे लाईट फिटिंग व डेकोरेशनची कामे केली. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर वर्षभर विविध प्रदर्शन भरत असतात. त्यांच्या डेकोरेशन व लाईट फिटिंगची कामे श्रावणने बिनचूक व तंत्रशुद्धपणे केली. निमा आयमा ची भव्य प्रदर्शने सर्वांचेच लक्ष वेधून घेतात. चाळीस-पन्नास फूट उंच खुल्या डोममध्ये ही प्रदर्शने भरतात. अशा अवघड जागी उंचीवर जाऊन लाईट फिटिंगची कामे श्रावण अगदी सहजपणे करतो.
   रामनवमीच्या काळात नाशिकच्या सुप्रसिद्ध काळाराम मंदिर उत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. काळाराम मंदिराच्या परिसरात व मंदिरावर केलेली रोषणाई परिसर आणि वातावरण उजळून टाकत असतो. ही आकर्षक रोषणाई गेली अनेक वर्षे, श्रावण अत्यंत भक्तीने आणि तन्मयतेने करीत आहे. काळा राम मंदिर जमिनीपासून सत्तर ते ऐंशी फूट उंच आहे. कोणाच्याही मदतीशिवाय श्रावण मंदिर रोषणाईचे काम कळसापर्यंत जाऊन करीत असतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ,श्रावण अशा कामातून ईश्वर भक्ती करतो!
      प्रामाणिकपणा, वेळेत काम पूर्ण करणे, नीटनेटकेपणा, अवघड काम ...जे इतरांना जमणार नाही, ते साध्य करण्याची कला, अवघड व उंच इमारतींवर, कोणाच्या आधाराविना काम करण्याची जोखीम पत्करण्याची हिम्मत पाहून ठरलेल्या रकमेपेक्षा ही जास्त रक्कम इनाम म्हणून श्रावणला कधीकधी मिळते.
       अपंग असूनही कामातील चपळपणा, त्याची हिंमत पाहून अनेक लोक तोंडात बोटे घालतात. काळा राम मंदिर संस्थानचे ट्रस्टी आणि पदाधिकारी श्रावणचे तोंडभरून कौतुक करतात. त्याच्या कामावर खूष होऊन, एकदा ट्रस्टींनी पुजेचा बहुमान श्रावणला दिला, यापेक्षा मोठा पुरस्कार आणि भाग्य दुसरे कोणते असू शकते! त्याचेच फळ म्हणून मंदिर इलेक्ट्रिक मेंटेनन्सचे संपूर्ण काम श्रावणवर सोपविण्यात आले आहे. यानिमित्ताने आपल्या हातून ईश्वरी कार्य घडत असल्याचे समाधान श्रावणला वाटते.
      नाशिक मधील पुरातन गजानन महाराज गुप्ते मंदिरावर लाईट फिटिंगचे काम केले. त्याचे कौतुक मंदिराचे ट्रस्टी प्रा.सूर्यकांत रहाळकर यांच्या कानावर गेले. प्रा.रहाळकर सरांनी श्रावणची पूर्ण परिस्थिती जाणून घेतली. समाजातील अडल्यानडलेल्याना कायम मदत करणाऱ्या रहाळकर सरांनी श्रावणला नाशिक एज्युकेशन सोसायटी शाळांच्या इलेक्ट्रिक मेंटेनन्स ची कामे कर ,असे सांगून मानधनावर सेवेची संधी उपलब्ध करून दिली.
    मुळातच नम्रता, कामातले कसब आणि जिभेवर साखर असल्यामुळे लोकांशी त्याचे चांगले संबंध निर्माण होऊ शकले आहेत. लोकांचा विश्वास संपादन केला आहे. एकदा ज्यांच्याकडे काम केले, की पुढच्या वेळेस ते श्रावणलाच कामासाठी बोलवणार ! सुरुवातीच्या काळात अपंग म्हणून काम मिळत नसे, आज मात्र लोक त्याच्याकडूनच कामाची अपेक्षा करतात.
     जाणीवपूर्वक श्रावणने आपल्यासारख्या पोलिओ झालेल्या मुलीशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगा, मुलगी अशी दोन अपत्ये फुलून आली आहेत. आता मात्र त्याने कानाला खडा लावला आहे, आपल्यासारखी परिस्थिती मुलांवर ओढवू नये.म्हणून तो स्वतः मुलांची आरोग्यविषयक काळजी घेतो. आवश्यक असलेले सर्व प्रकारचे लसीकरण आणि वेळोवेळी औषधोपचार मुलांना पुरविले आहेत. कष्ट करून मुलांना शिक्षण देत आहे. मुलांना सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहता आलो पाहिजे, हे त्याचं स्वप्न आहे.
     अपंगत्वावर मात करीत, आज श्रावण स्वाभिमानाने व कष्टाने परंतु ,आनंदाने जीवन जगत आहे. वेळोवेळी त्याच्या कामाचे लोकांनी केलेले कौतुक त्याला प्रेरणा आणि अधिक उत्तम काम करण्यासाठी प्रोत्साहन देते.
    काळा राम मंदिर ट्रस्टच्या वतीने झालेला सत्कार व मिळालेला सन्मान त्याच्या जीवनातील अत्युच्च आनंदाचा क्षण आहे. निमा आयमा कार्यक्रमात नाशिकच्या तत्कालीन महापौरांनी कौतुक करून सन्मान केला होता. अनेक शासकीय कार्यालयांची कामे देखील तत्परतेने श्रावणने केली आहेत.
   आज पर्यंत त्याने केलेल्या कामाचे कौतुक आणि दखल अनेकदा वर्तमानपत्रांनी देखील घेतली आहे. प्राप्त परिस्थितीत आनंदी जीवन कसे जगावे, याचे उत्तम उदाहरण श्रावण शिवाय दुसरे कोणते असू शकेल !!
     समाजाचा अपंग व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी विश्वास दाखविला पाहिजे. धडधाकट शरीर असूनही नोकरी-व्यवसाय, काम धंदा मिळत नाही,अशी ओरड करणाऱ्या सर्व मित्रांसाठी धडधाकट आणि खंबीर मनाचा श्री. श्रावण मोरे ,आदर्श नव्हे का ?
   

लेखन
श्री.शैलेश पाटोळे
नाशिक
२९ जुलै २०२०
✍️✍️✍️✍️✍️✍️
लेख सहावा ✍️✍️✍️

    
    

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...