----------------------------
कल्पनांच्या चांदणभुलव्यातून वास्तविकतेचा गुंता सोडवणारे कथाकार,ललित लेखक, एकांकिका लेखक, कवी म्हणून विजयकुमार मिठे साहित्य विश्वात ओळखले जातात.स्वतः ते अतिशय आनंदाने ग्रामीण जीवन ते व्यतीत करीत आहेत. शेतीमातीतील दैनंदिन कामे करत ग्रामीण लोक समाज जीवनाशी एकरूप होऊन ग्रामीण वास्तव साहित्यातून वाचकांसमोर मांडत असतात. आपल्या आठवणीतील गावगाडा आणि बदललेल्या ग्रामीण जीवनाची वास्तविकता त्यांनी विविध प्रकारच्या लेखनातून व्यक्त केली आहे.व्यवसायाने शेतकरी असलेल्या या साहित्यिकाने समृद्ध साहित्य संपदा मराठी वाङ्मयाला प्रदान केली आहे.
ग्रामीण भागात वास्तव्य असूनही घरातूनच त्यांना वाचनाची गोडी लागली. वाचलेल्या लेखकांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग त्यांच्या जीवनात आला.द.मा. मिरासदार , द.ता.भोसले, आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर, अण्णाभाऊ साठे,शंकर पाटील यांचे साहित्य त्यांनी आवडीने वाचलं. त्यांच्या लेखनाचा प्रभाव मिठेंच्या लेखनावर दिसून येतो.
विजयकुमार मिठे हे एक समाजाभिमुख व्यक्तिमत्व आहे.त्यांचा पिंड शेतकऱ्याचा आहे. शेती मातीशी त्यांची नाळ जोडलेली आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. द.ता .भोसले यांनी मिठे यांचे वर्णन करताना, " कृषी संस्कृतीचा भाष्यकार, कृषी संस्कृतीचा अभ्यासक, कृषी संस्कृतीचा उपासक आणि कृषी संस्कृतीचे महाकाव्य जाणारा गायक ",अशा शब्दात केले आहे. ग्रामीण समाज हाच त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे.त्यामुळे वास्तवता त्यांच्या लेखनातून सतत प्रतीत होत असते.त्यांनी लिहिलेल्या व प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखनातून हा समान धागा दिसून येतो.
आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात, वास्तव्यात घडणाऱ्या घटना, भेटलेली माणसं, यांचे स्वभावविशेष अत्यंत – साध्या सोप्या भाषेत परंतु तितकेच प्रभावीपणे, विनोदाची पेरणी करत मांडणी करण्याचे कसब विजयकुमार मिठे यांच्या लेखनात आहे. ग्राम्य भाषेचा वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे.
वास्तव प्रसंग, चपखल ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार खुमासदार ग्रामीण बाज हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल..कधी विनोदी तर कधी वाचकांचे हृदय पिळवटून टाकणारे प्रसंग वर्णन करण्याची शैली विजयकुमार मिठे यांची आहे.
आपल्या जीवनातील रमणीय आठवणी, प्रसंग, घटनांचे शब्दचित्र अत्यंत लालित्यपूर्ण शैलीत मिठे लिहितात. ललित लेखनाचा सर्वोत्तम नमुना म्हणून त्यांचे आभाळओल आणि चांदणंभूल हे ललित लेखसंग्रह ओळखले जातात.
मराठी साहित्यात ललित लेखनाला विशेष असे महत्त्व आहे. वांग्मय प्रकाराच्या दृष्टीने ललित लेखनाचा हेतू स्वतंत्र आहे. केवळ माहिती न पुरवता वाचकाला भावनिक, मानसिक आणि सौंदर्यात्मक आनंद देणे हे ललित साहित्य लेखनाचे उद्दिष्ट मानले जाते. या अर्थाने मिठे यांनी ललित लेखनाला न्याय दिला आहे,असे म्हणण्यास वाव आहे.
वाचकप्रिय ठरलेल्या आभाळओल या ललित लेखसंग्रहानंतर २०१७ मध्ये चांदणभूल हा दुसरा ललित लेखसंग्रह अक्षरवांग्मय प्रकाशन, पुणे यांच्या माध्यमातून मिठे यांनी प्रकाशित केला. अस्सल ग्रामीणत्व हे समान तत्व या ललित लेखसंग्रहात देखील कायम राहिले आहे. यात लेखकाने आपल्या भावना, विचार आणि अनुभवांना सुंदर आणि प्रभावी भाषेत व्यक्त केले आहे. आपल्या भावना आणि अनुभव व्यक्त करताना सौंदर्य आणि कलात्मकतेवर लेखकाचा भर दिसून येतो. या संग्रहात तेरा विविध विषयांवर लेखकाने आपले अनुभव प्रकट केले आहेत. त्यात अनेक सामाजिक,सांस्कृतिक संदर्भांचा समावेश लेखकाने केला आहे. ग्रामीण भागातील श्रद्धा -- अंधश्रद्धा, समज - गैरसमज, प्रथा- परंपरा, लोकसमजुती लेखकाने लेखनात मांडल्या आहेत. योग्य - अयोग्य असे विश्लेषण करण्याच्या फंदात लेखक पडलेले दिसून येत नाही. ललित लेखनात ते अपेक्षित देखील नाही. ललित लेखन प्रकारांपैकी भावचित्रे या लेखन प्रकारात वरील लेखांचे वर्गीकरण करता येऊ शकेल.
चिंतनशील ललितलेख अशा शब्दात ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी या ललित लेख संग्रहाचे वर्णन केले आहे. किंचितसा आत्मकथनाकडे वळणारा तरीही वाचकांना आनंद देणारा हा संग्रह लक्षवेधक ठरतो.
या ललित लेखसंग्रहातील सर्व लेखांमधील आशय हा लेखकाने अनुभवलेल्या ग्रामीण जीवनानुभवाशी संबंधित आहे.
चांदणंभूल ह्या शीर्षक लेखात चंद्र आणि चांदणे, चंद्राशी असलेले बालसुलभ नातं, वयानुसार बदलत जाणारा आनंद लेखकाने अधोरेखित केला आहे. ग्रामीण अवकाशात चंद्राचे महत्व लेखक विशद करतो.चांदण्यांनी भरलेलं आकाश, चंद्राच्या कला, चंद्र प्रकाशात चालणारी शेतकऱ्यांची शेतीची कामे ,तारा तुटणे इत्यादी बाबतीत ग्रामीण भागात असलेल्या लोक समजुती अथवा लोकभ्रम लेखक चपखलपणे वर्णन करतो. बालपणात घेतलेल्या चांदण्यांचा आनंद आता साठी नंतर कमी कमी होऊ लागल्याची खंत लेखाच्या शेवटी व्यक्त करताना लेखक म्हणतो," पण का कोण जाणे, पूर्वी चांदण्यांनी भरलेलं आकाश मला आता रितं रितं वाटू लागलंय ! "
" सोनपिवळ्या फुलांची बाभूळ " मध्ये शेतातील मधोमध उभी असलेल्या बाभळीशी संबंधित अनुभव लेखक मांडतो.काटेरी,ओबडधोबड असूनही त्या झाडाबद्दल लेखकाला वाटणारा स्नेह या लेखात अनुभवता येतो.विविध ऋतूत दिसणाऱ्या या बाभळीचे वर्णन करताना लेखक लिहितो," उन्हाळ्यात वाळल्या काळया गाईगत दिसणारी बाभूळ पावसाळ्यात खाऊन पिऊन अंगीपिंडी पोसलेल्या म्हशीगत गुबगुबीत दिसायची." माणसांच्या, पशुपक्षांच्या दृष्टीने बाभळीची उपयुक्तता लेखकाने अनुभवातून मांडली आहे.
झुबकेदार फुलांचा गुच्छ ल्यालेल्या गुलतुऱ्यांचे सौंदर्य आणि लेखकाचं त्याच्याशी असलेलं भावनिक नातं " गोष्टी रंगल्या ओठी " मध्ये वाचायला मिळते. सलमा आणि लेखकाचं बालसुलभ कुमारवयीन वयातलं गुलतुऱ्या संबंधीचा प्रसंग मनाला चटका लावून जातो.
पूर्वी ग्रामीण भागात सणासुदीचं असलेलं महत्त्व लेखक " दिवाळी त्याच्या डोळ्यातली " मधून अधोरेखित करतो. गरीब श्रीमंतांसाठी सण कसे साजरे होतात,गरिबीमुळे लहान मुलांचा सण, फटाके, कपडे, गोडधोड याबाबत लेखक भावनिक वर्णन करतो. पूर्वी ग्रामीण भागात गरीब - श्रीमंत एकमेकांना सांभाळून घेत सण उत्सव साजरा करत. परंतु अलीकडे तसे चित्र समाजात दिसून येत नसल्याचे लेखक आवर्जून लिहितो.
लेखकाचे वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांनी लेखकाला एकदा "टेरिलीनचा सदरा " आणला. टेरिलिनचा सदरा घालायला मिळावा म्हणून लेखकाने केलेली खटपट ,त्याच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल, अनाठायी खर्चाबद्दलबद्दल आईचे मत,लेखकाने आवर्जून वर्णन केले आहे.
" गुपित बाबाचा डोह " मध्ये ग्रामीण भागात चमत्कारावर लोक कसे विश्वास ठेवतात आणि पुढे भीतीने प्रथा रूढ होत जाते.. याचे वर्णन आले आहे. परंतु शिक्षणामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा भांडाफोड कसा होतो, ते देखील वाचायला मिळते. त्यातून वाचकांचे मनोरंजन होते.
" जुनं ते सोनं" मधून काळ बदलला तरी जुन्याची किंमत कमी होत नाही, ते सायकलच्या उदाहरणावरून लेखकाने पटवून दिले. पूर्वी सायकल बद्दल ग्रामीण भागात किती अप्रूप होतं ते लेखकाने मनोरंजकपणे मांडलं आहे.
शेतकऱ्यांचं आपल्या गाय,बैल इत्यादी मुक्या जनावरांवर किती जीव आणि भावनिक नातं असतं ते गहिवर बैल विकतानाचा या लेखात पहायला मिळतो. शेती कसण्यासाठी ट्रॅक्टर सारखी यंत्रे अलीकडच्या काळात वापरली जाऊ लागली आहेत.नव्या पिढीला बैल हा शेतीसाठी कालबाह्य वाटतो. परंतु ज्या बैलाच्या श्रमातून आपला संसार झाला त्याबद्दल लेखकाच्या मनाततील कृतज्ञता या लेखातून वाचावयास मिळते.
भारतीय शेती ही पावसावर अवलंबून आहे.योग्य वेळी पाऊस पडला नाही तर किंवा अतिरेकी पाऊस पडल्यावर काय घडते ? लहान मुलांचं पावसाशी असलेलं नातं.. भावबंध लेखकाने ,"पावसाचं काही देणं लागतोय " मधून वर्णन केलं आहे.
आंबे, जांभळी,बोरी, भोकर, पेरू, उंबर असा रानमेवा लेखकाच्या लहानपणी त्याच्या गाव शिवारात मिळायचा.शालेय जीवनातील या रानमेव्याची मौजमजा लेखकाने अतिशय परिणामकारक शब्दात वर्णन केली आहे. वर्णन केलेले प्रसंग जणू आपणच अनुभवतो आहोत,असा भास वाचकांना झाल्यावाचून राहवत नाही.
" बिन पैशाचा आनंद " या लेखात खेड्यातील जत्रा खेळ, तमाशा, खाण्याचे विविध पदार्थ आणि त्याचा गरीबीशी असलेला संबंध लेखक वर्णन करतो. बालपणी गरीबी होती तरी जत्रेची मजा होती आज स्थिती सुधारली पण यात्रेचा तो आनंद राहिला नसल्याचे लेखक खिन्नपणे नमूद करतो.
बालपणी फोटो वाल्याचं ग्रामीण भागात असलेलं अप्रूप - आकर्षण " फोटोवाला " मधून लेखक मांडतो. त्यातून आपल्या आयुष्यातील जुन्या आठवणींना उजाळा लेखकाने दिला आहे.
धरणामुळे विस्थापित झालेल्या गावाचं गावपण हरवल्याची खंत लेखकाने " गावपण हरवलेलं गाव " मधून व्यक्त केली आहे.आधुनिक करमणुकीच्या साधनांमुळे माणूस कुठेतरी हरवल्याचं दुःख लेखक व्यक्त करतो. " गाव बदललं की बिघडलं ?" हे वाक्य बदललेल्या ग्रामीण जीवनाचं वर्णन करण्यास पुरेसे ठरतं!
अशा रीतीने या संग्रहातील ललित लेखांचा विषय जरी वेगवेगळा असला तरी ग्रामीण जीवनातील लेखकाचे भावविश्व हे सर्व लेखांचे समान आशयसूत्र असल्याचे दिसून येते.
मिठेंची भाषा नाशिक जिल्ह्यातील दखनीचा बाज लेऊन अवतरली आहे. आशयघन,ओघवती आणि समृद्ध शब्दकळा असलेल्या भाषेचा वापर लेखक करतात.दिंडोरी आणि परिसरात... ग्रामीण, दुर्गम भागात बोलीच्या रूपात वापरले जाणारे बरेचसे शब्द महाराष्ट्रातील इतर वाचकांसाठी अवघड वाटू शकतील. परंतु प्रसंग डोळ्यापुढे उभा करण्याची ताकद त्यांच्या शब्दांमध्ये असल्यामुळे वाचकांना अर्थ समजून घेताना अशा शब्दांची अडचण भासणार नाही असेही वाटते.लेखक शेतीशी संबंधित असल्याने त्याच व्यवसायाशी संबंधित शब्द लेखात चपखलपणे लेखकाकडून वापरले गेले आहेत.त्यामुळे वाचकांना आनंद घेता येतो.उगाच शब्दांची उधार - उसनवारी किंवा शब्दबंबाळपणा लेखकाने टाळला आहे. शेवटी ललित लेखनात शब्द- भाषेपेक्षा भावनेला अधिक महत्त्व असते.
ग्रामीण निसर्गाची रेलचेल या संग्रहात अनुभवास येते. अनुभव समृद्ध शब्दांच्या वारूवर स्वार होऊन मनातील भावनांना लेखकाने वाट करून दिली आहे. " चांदणभूल " म्हणजे लेखकाच्या बालपणीचा अनुभवाचा खजिनाच आहे,असे म्हटले तर वावगे ठरू नये. अनुभव मांडणी, कथन, वाचकांचे मन आकर्षित करून घेते. ग्रामीण जीवनाचे समग्र दर्शन या लेखातून होते.तरीही आधुनिक जीवनशैलीचा प्रसार आता ग्रामीण भागातही झाला आहे. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीत झालेला बदलही लेखकाने अधोरेखित केला आहे.
अनुभव मांडताना उपमा - उत्प्रेक्षा अलंकारांनी नटलेली भाषाशैली लेखक प्राधान्याने वापरताना दिसतो.जसे- "पुनवेचा चंद्र आईनं तव्यावर केलेल्या गोल गरगरीत भाकरीसारखा दिसायचा." " रात्रीन चमचमणाऱ्या चांदण्याची रत्नजडित गोधडीच आपल्या अंगावर पांघरून म्हणून घातली आहे ". (चांदणंभूल). हिरवेगार बाभळीच्या झाडाचं वर्णन करताना लेखक म्हणतो," एखाद्या हिरवी चोळी- पातळ नेसलेल्या पोक्त बाईनं काळ्याभोर वावराच्या मधोमध फथकल मारून बसावं तसं ते दिसायचं." " आईची माया आणि बाभळीची काया या दोघींच्या एकत्रित झालेल्या मायेनं दोन चार दिवसात जखम खपली धरायची."( सोनपिवळ्या फुलांची बाभूळ) रात्रीच्या आकाशाचे वर्णन करताना लेखकाची लेखणी अधिकच चकाकते," काळया लुगड्यावर जरतारीने वेलबुटी काढावी तशी आभाळात चंद्र चांदण्यांची नक्षी काढलेली दिसायची." गावातील पाटील तुकाराम वाघाचं वर्णन फोटोवाला या लेखात करताना लेखक कोटी साधतो."वाघाची जरब मोठी. जंगलातल्या वाघासारखीच ! "
ग्रामीण भाषेत प्रचलित काही म्हणींचा वापर लेखकाने प्रसंगांचं वर्णन करताना केला आहे.जसे- गावातील लोकांचे स्वभाव वर्णन करताना लेखक लिहितो, " भल्याला नही राजी अन् बुऱ्याला पुरक्या वाजी." " बाबाही गेला अन् दशम्याही गेल्या. " (फोटोवाला ).तर काही लेखात कवितांचाही आधार लेखक वातावरण निर्मितीसाठी घेताना दिसतो.
अधून मधून जीवनाचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या वाक्यांची पेरणी लेखकाने केल्याचे आढळते." बदलणे हा तर निसर्गाचा नियम आहे", "भाऊबंद खेळाचे धनी असतात."( गहिवर: बैल विकतानाचा) " रुपया महिना अन वझ का होईना." " जुनं ते सोनं ", " आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे."
यावरून उपमा - अलंकारांनी नटलेला हा ललित लेखसंग्रह आहे,असे ठामपणे म्हणता येते.
अशा रीतीने विविधरंगी आशय, चपखल आणि वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण भाषा,वाचकांना आकर्षित करणारी लेखनशैली,ग्रामीण जीवनानुभव, लेखकाच्या बालपणातील कडू गोड आठवणी, संपूर्ण जीवनपट - प्रसंग वाचकांच्या डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद विजयकुमार मिठे यांच्या लेखणीत आहे.
विविध राज्य पुरस्कारांनी या चांदण भूल ललित लेखसंग्रहाचा सन्मान झाला आहे.
नव्या ,आधुनिक युगात, शहरी वातावरणात कृत्रिम आयुष्य जगणाऱ्या तरुण-तरुणींना ग्रामीण अवकाश किमान वाचनातून या लेखसंग्रहाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. म्हणूनच कदाचित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात चांदणंभूलचा समावेश केला असावा.
सर्व वांग्मयीन वैशिष्ट्यांनी नटलेला " चांदणभूल " हा मराठी साहित्यातील अनेकोत्तम ललित लेख संग्रहांच्या पंक्तीला शोभणारा असाच आहे.
चांदणभूल
लेखक : विजयकुमार मिठे
प्रकाशक : अक्षरवांग्मय प्रकाशन, पुणे
----------------------------------
शैलेश अशोक पाटोळे
नाशिक
९८६०७४९७९०
No comments:
Post a Comment