Monday, May 17, 2021

त्यागमूर्ती : श्रीम.ताराबाई पंढरीनाथ सूर्यवंशी

           
                    ll त्यागमूर्ती ll
        (श्रीम.ताराबाई पंढरीनाथ सूर्यवंशी)

   काळजाचा तुकडा गेल्या काही दिवसांपासून दवाखान्यात दाखल होता. ताराबाई दारातच बसून कोणाची तरी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होती. चित्त थाऱ्यावर नव्हतं. जे ऐकलं त्यावर विश्वास बसेना. परमेश्वराच्या कृपेने जे ऐकलं, ते सगळं खोटं ठरावे.तिचा प्राण कंठाशी आला होता. तेवढ्यात जे नको होतं तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येऊन प्रत्यक्षात उभा राहिला.तिचा मोठा मुलगा दिलीपचं शव दवाखान्यातून ॲम्बुलन्स घेऊन दारात उभी राहिली .तिने हंबरडा फोडला. आईच ती ! ज्या प्रेमानं आई मुला-  मुलींसाठी करते त्याची सर कशालाच येऊ शकत नाही.श्री.दिलीप यांची मुलं,पत्नी साऱ्यांवर दुःखाचााा डोंगर कोसळला. किंबहुना गेल्या अनेक दिवसांपासून त्याची प्रकृती थोडी चिंताजनक होती. मृत्यूची चाहूल लागली होती . दिलीपच्या मृत्युनं ताराबाईवर आभाळ कोसळले. ती धाय मोकलून रडत होती. काही वर्षांपूर्वी तिचं कुंकू असंच आजारपणाने पुसलं गेलं !  त्यानंतर हा दुसरा धक्का! नऊ महिने पोटात वागविलेला आणि त्याचा प्रेमाने बालपणी केलेला सांभाळ. त्याचं दुडुदुडु चालणं, बोबडे बोल,अंगाखांद्यावर घेऊन फिरणं ,त्याचे लाड करणे, कौतुक करणं, त्याच्या सार्‍या गरजा पूर्ण करणे, त्याला भूक लागताच तिला सुटलेला पान्हा ! सार सार काही तिच्या नजरेसमोर तरळून लागलं.त्याच लाडक्या दिलीपचे कलेवर पाहून तिचा श्वास रोखला गेला. घसा कोरडा पडला.नको नको ते विचार त्या क्षणी तिच्या मनात येऊन गेले. काय करावे आणि काय नको, असे तिला झाले.एवढं करूनही लोकांची सहानुभूती बायकापोरानाच ! आईचे कष्ट कोणी पाहिले? तिच्या यातना कोणी जोखल्या? मुलांनी कितीही कृतघ्नता दाखवली तरी आईच्या हृदयातून केवळ प्रेमच पाझरत असते. असे अजब रसायन परमेश्वरानं आईच्या रूपात तयार केले आहे.मुलांच्या असंख्य चुका पदरात घेणारी , काही केले तरी माझा मुलगा निष्पाप आहे, असे छातीठोकपणे सांगणारी आईच असते. ताराबाई आता शून्य नजरेने प्रेताकडे पाहात होती. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवत होती. पदराने त्याचा चेहरा पुसत होती."माझा दिलीप. कुठे रे गेला.. कधी भेटशील ...काय करू तुझ्यासाठी ...तुझ्या ऐवजी देवाने मला का नाही नेले..? तिच्या या सार्‍या प्रश्नांची उत्तरे आता ईश्वर देखील देऊ शकत नव्हता. ज्यावेळी आई बापाच्या आधी मुलाचं अघटित जाणं होतं. यापेक्षा आई-वडिलांच्या आयुष्यात वाईट काय असू शकतं...!! 
        रूढीप्रमाणे अंत्यसंस्काराचे विधी आटोपले. ताराबाईंच्या मन तिला खात होतं. शेवटची त्याची माझी भेट झाली असती, तर बरे झाले असते.. काय बर आवडायचे त्याला ..? त्याची आवड- निवड, त्याचं वागणं - बोलणं .,सारं काही तिला आठवू लागलं. ती गतस्मृतीत गेली...
    नाशिक जिल्ह्यातील पेठ या तालुक्याच्या गावी श्री.पठाडे हे फॉरेस्ट अधिकारी होते. इंग्रजांच्या आमदानीत फॉरेस्ट अधिकारी हे तसे मानाचे पद होते. त्यांच्या अपत्यांपैकी श्री.हरिभाऊ पठाडे हे सर्कल ऑफिसर म्हणून महसूल खात्यात नोकरी करीत. महसूल गोळा करणारा अधिकारी म्हणून त्यांची जिल्हाभरात आणि समाजात मोठा मानमरातब होता. आर्थिक स्थिती तशी भक्कम होती. वडिलांकडून शिक्षणाचा वारसा मिळाला होता. त्यामुळे आपोआपच सर्व मुले शिकली. श्री. हरिभाऊ व सौ.सोजाबाई यांना चार मुले व दोन मुली अशी अपत्ये झाली. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, मागास समाजात जन्म आणि त्यात शिक्षण म्हणजे खूप मोठी, अभिमानाची गोष्ट होती. त्यात ताराबाई या सर्वात मोठ्या. त्यांचा जन्म १९३९ सालचा. ताराबाई दिसायला गोऱ्यापान, रेखीव, सुंदर,मध्यम उंचीअसलेल्या.आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेली ताराबाई  सरकारी शाळेत साहेबांची मुलगी म्हणून शिकू लागली. परंतु शिक्षण जरी मिळालं तरी समाज चालीरीती विसरला नव्हता. मुलगी म्हणून दुजाभावाची वागणूक घरातूनच मिळत होती. मुलगी म्हणजे चूल आणि मूल सांभाळणे एवढेच तिचे काम ! याच विचारांचे तिचे वडील होते. म्हणून इयत्ता चौथी पर्यंत तिचे शिक्षण झालं आणि रुढी परंपरेने तिचं शिक्षण बंद झालं.आता तिचे हात पिवळे केले पाहिजेत. म्हणून सर्वजण तयारीला लागले.शाळा बंद झाली. 
       नोकरीच्या निमित्ताने असलेल्या ओळखीतून,    वयाच्या सोळाव्या वर्षी दिंडोरी तालुक्यातील आंबे वरखेडे येथील एक स्थळ त्यांच्या नजरेस पडले. श्री. मल्हारी सूर्यवंशी हे वरखेडे येथे गावातच गटई काम करून कुटुंबाची गुजराण करीत होते.कुटुंब मोठं होतं. त्यात गरिबी .शिक्षण फारसे नव्हते. अडाणीच म्हणाना !  त्यात तीन बायकांचा प्रपंच! त्यांचा मोठा मुलगा श्री.पंढरीनाथ(जन्म १९३२) सातवी पास होऊन एका धान्य गोदामात डोअरकीपर म्हणून नोकरी करीत होता. त्याकाळी मुलगा सातवी शिकलेला आणि सरकारी नोकरी करतो, हे पाहून परिस्थिती हळूहळू सुधारेल,असे समजून श्री. हरिभाऊ पठाडे यांनी आपल्या मोठ्या मुलीचे म्हणजे ताराबाईंचे लग्न श्री.पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्याशी आंबे वरखेडे येथे लावून दिले.सोळा वर्षीय ताराबाई आणि पंढरीनाथ पंचवीस वर्षाचे होते.संसार सुरू झाला.
     ऊन सावली प्रमाणे आयुष्यात सुख दुःख चालूच असते.श्री.पंढरीनाथ ज्या धान्य गोदामात डोअरकीपर म्हणून काम करीत होते, त्या गोदामाला आग लागून ते जळाले. त्याबरोबरच त्यांची नोकरी गेली.कुटुंबाला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली .परंतु ,त्याकाळी सातवीपर्यंत शिक्षण झाले असल्याने एका सदगृहस्थाच्या ओळखीने एका खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळाली. त्या नोकरीचे आयुष्य सात-आठ महिन्यांच्या पलीकडे गेले नाही.
      दुर्दैवाने नोकरी टिकत नसली तरी पंढरीनाथ यांना शिक्षणामुळे एकामागून एक संधी देखील मिळत होत्या.
   आता नाशिकच्या करन्सी नोट प्रेस येथे त्यांना नोकरी मिळाली. काही दिवस आंबे वरखेड येथे ये - जा  करून नोकरी केली .परंतु जाण्या-येण्याचा खर्च आणि जेवणाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी त्यांनी नाशिक रोड येथे घर भाड्याने घेऊन राहण्याचा निर्णय घेतला. पगार फारसा नव्हता. काही दिवसानंतर प्रेसचे क्वार्टर राहण्यासाठी उपलब्ध झाले. नोकरीच्या पगारातून केवळ घरखर्च भागत असे. अशावेळी आपली उन्नती होणार नाही, हे श्री.पंढरीनाथ यांच्या लक्षात आले. तोपर्यंत त्यांचा संसार बहरला होता. श्री.पंढरीनाथ आणि ताराबाई यांना मंगला, दिलीप, शीला, रोहिणी, माया आणि संतोष अशी सहा अपत्ये झाली. त्याआधी प्रारंभीची दोन अपत्ये योग्य औषधोपचार न मिळाल्याने दगावली होती. खाणारी तोंडे वाढली.परंतु कमावणारे हात केवळ दोनच !  कुटुंबाची ओढाताण होऊ लागली.श्री.पंढरीनाथ हे मुळातच स्वाभिमानी असल्याने त्यांनी कोणाकडे हात पसरले नाहीत. सासरकडची परिस्थिती श्रीमंतीची असूनही कधी त्यांच्या दारात ते गेले नाहीत.
    आपल्या मुलीचे जीवन हलाखीचे आहे. तिला आर्थिक चणचण आहे.हे आई-वडिलांना ठाऊक होते.परंतु आम्ही तुझे लग्न लावून दिले आहे.आता तू आणि तुझे नशीब ! त्यात आम्ही काही करू शकत नाही.असे म्हणून वडिलांनी आपली जबाबदारी झटकली.
    ताराबाईंचे माहेर त्या अर्थाने श्रीमंतीत नांदत होते. वडील सर्कल अधिकारी, भाऊ श्री.अरविंद वकीली करत.श्री.गोपीचंद हे बंधू येवला येथे नोकरी करीत.श्री.बाळासाहेब हे शिक्षक होते. तर धाकटे प्रकाश हे म.न.पा. नाशिक येथे अभियंता म्हणून कार्यरत होते.लहान बहीण सौ.सुलोचना, नांदगाव येथे सुस्थितीत होती. तिचे घरचे रेल्वे स्टेशन तिकीट मास्टर म्हणून नोकरीस होते. या सर्व भावंडांमध्ये ताराबाईंची आर्थिक स्थिती तशी हालाखीची. परंतु पतीचा कडक स्वभाव आणि स्वाभिमानी वृत्ती तिला ठाऊक होती.ताराबाईंनी देखील आपल्या पतीचा स्वाभिमान दुखावणार नाही ,या करिता माहेरी हात पसरला नाही. मिळेल त्यात कुटुंबाचा गाडा ते दोघेही पती-पत्नी ओढत होते.
    स्वतःचे हक्काचे घर घ्यावे, असा विचार श्री. पंढरीनाथ यांच्या मनात आला. परंतु त्यासाठी कर्ज काढूनही पुरेशी रक्कम त्यांच्याकडे नव्हती. अशावेळी पतीची परवानगी घेऊन, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने, काही काळ माहेरची मदत घेण्याचे ताराबाईंनी ठरविले. परंतु तिच्या माहेरच्यांनी याप्रसंगी तिला मदत करण्याचे स्पष्टपणे नाकारले. तू जर कष्टात दिवस काढत असशील, तर मूलबाळ सोडून तू परत माहेरी ये. आम्ही आयुष्यभर तुला सुखात ठेवू. असा  सल्ला देखील दिला. परंतु अशा प्रसंगी ताराबाईंचा स्वाभिमान जागा झाला. रागाच्या भरात ती नाशिकला परत आली. घडलेला प्रकार पतीला कथन केला.आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील आणि कोणत्याही परिस्थितीत आपण स्वतःचे घर घेऊ, अशी हिम्मत पतीला तिने दिली.
     श्री.पंढरीनाथ नोट प्रेस मध्ये आठ ते दहा तास काम करीत. उरलेल्या वेळेत फुटपाथवर गटई काम ते करू लागले.दिवसभर ते मेहनत करीत.आपल्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावं,ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती.त्यासाठी वाटेल तेवढी मेहनत करण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
     ताराबाईंनी देखील नवऱ्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कंबर कसली.श्रीमंतीत वाढलेली ताराबाई आता ...आपलं घरदार ..मुलं-बाळं सांभाळून लोकांकडे धुणीभांडी ,स्वयंपाकाची कामं करू लागली. अशावेळी मंगला आणि शीला या मुली देखील शाळा शिकता शिकता लोकांची धुणीभांडी करून आई वडिलांना मदत करू लागल्या. जेल रोडच्या कोठारी कन्या शाळेत या दोन्ही मुली शिकत असत .शाळेतील मधली सुट्टी झाली की, मंगला आणि शीला दोन घरची धुणी-भांड्याचे काम करून पुन्हा शाळेत हजर होत असत .दिलीप डोक्यावर टोपली घेऊन भाजीपाला, फळे,गल्लीबोळातून विक्री करीत. संपूर्ण कुटुंब वडिलांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटू लागलं. 
    एकीचे बळ फळाला आलं .सर्वांच्या कष्टातून आणि काटकसरी तून स्वतःचे घर श्री. पंढरीनाथ यांनी घेतले. सर्वांना अत्यानंद झाला. परंतु, आपली बहिण लोकांच्या कामाला जाते .हे आई वडिलांना व भावांना आवडले नाही.परंतु कोणाकडूनही भीक मागायची नाही .अस या सर्वांनी ठरवले होते. कामाची कोणतीही लाज ताराबाईने बाळगली नाही.
     दरम्यानच्या काळात श्री.पंढरीनाथ यांनी नोकरी बरोबरच कष्टाने गटईच्या जागेवर एक टपरी करार तत्वावर मिळवली.श्री.दिलीप त्या कामात तरबेज झाले. पै..पै..जमवला. मुला मुलींची लग्न केली.
   नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील श्री.यादवराव त्र्यंबक घोलप यांच्याशी मोठी मुलगी मंगला हिचा विवाह रूढी परंपरेप्रमाणे आणि परिस्थिती अनुरुप लावून दिला. श्री.यादवराव, बॉम्बे मुन्सिपल कॉर्पोरेशन (BMC)मध्ये नोकरी करीत. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईतील भायखळा परिसरात राहात. त्यांचा स्वभाव प्रेमळ होता. जावई म्हणून ते कधी वागले नाहीत.
     दहावीपर्यंत शिकलेल्या शीला या मुलीचा विवाह निफाड तालुक्यातील सुप्रतिष्ठित भागशिक्षण अधिकारी व ओझर येथे स्थायिक झालेले श्री.दादा (मास्तर) गांगुर्डे यांचे चिरंजीव श्री.चंद्रकांत यांच्याशी केला. श्री.चंद्रकांत हे एअर फोर्स मध्ये MES विभागात नोकरी करीत होते. वडिलांच्या शिस्तीत वाढल्यामुळे व मिलिटरी परिसरात वावरल्यामुळे श्री.चंद्रकांत यांचा स्वभाव कडक होता. परंतु ते अत्यंत समजदारसंवेदनशील देखील आहेत.
  जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील व सध्या मुंबई येथे शासकीय तंत्रनिकेतन प्रशिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून नोकरीत असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले प्रा.श्री.राजेंद्र वाघ यांचेशी रोहिणी या मुलीचा विवाह थाटामाटात संपन्न झाला. लग्नापूर्वी रोहिणी यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले होते.
   पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील उद्धट या गावातील प्रसिद्ध शेतकरी व बागायतदार श्री. काशिनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्री.अनिल यांच्याशी माया या मुलीचा विवाह झाला. श्री.अनिल यांचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित, सुसंस्कारित व उच्चशिक्षित आहे. स्वतः अनिल एल. एल. बी. झाले. परंतु पारंपरिक शेती व्यवसायाकडे लक्ष देणारे कोणी नसल्यामुळे शेती व्यवसाय त्यांनी स्वीकारला. आज एक प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी लौकिक मिळवला आहे.
   श्री.पंढरीनाथ व ताराबाई यांच्या दोन मुलांपैकी श्री. दिलीप यांचा विवाह मालेगाव तालुक्यातील मेहुणे या गावी स्थायिक असलेल्या श्री.काळू यमाजी मोरे यांच्या कुटुंबातील सरला यांच्याशी झाला. तर लहान मुलगा श्री.संतोष यांचा विवाह निफाड तालुक्यातील दुगाव येथील श्री. पठाडे यांच्या सविता या मुलीशी झाला. मुला मुलींची लग्न करताना आर्थिक स्थिती पेक्षा सुसंस्कार, सुशिक्षितपणा यांना त्यांनी प्राधान्य दिले. 
   संपूर्ण कुटुंबाने खूप कष्टात दिवस काढले. ताराबाई जेथे धुणी - भांडी करायला जाई. तेथून शिळेपाके अन्न तिला मिळे. त्यावर कुटुंबाची गुजराण होत असे. मुलांना नवीन कपडे फारसे माहीत नव्हते. परिस्थिती हालाखीची असली तरी श्री.पंढरीनाथ यांनी मुलांचे शिक्षण मात्र थांबवले नाही.कामे करून मुले शिकत होती.
    हुंड्याची पद्धत समाजात रूढ होतीच. लग्न खर्च भागवण्यासाठी मोठ्या कष्टाने घेतलेलं घर मुलीच्या लग्नाकरिता सावकाराकडे गहाण ठेवावे लागले ! लग्नानंतर हळूहळू ते पूर्ण कर्ज व्याजासकट त्यांनी फेडलं. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी ते घर त्यांना उपयोगी पडलं.सर्व मुलींची ..मुलांची लग्ने झाली. जावई-  सुना समजदार मिळाल्या. नातवंडे- पतवंडे आली. काळ पुढे सरकत होता. या सर्व काळात एकाच गोष्टीने मात्र त्यांची साथ कधीच सोडली नाही....ती म्हणजे गरिबीने ! त्याचे कारण काहीही असो. कुटुंबाचा पसारा वाढलेला होताच. त्यामुळे गरजा वाढत गेल्या.उत्पन्नाचा स्रोत मात्र वाढला नाही. कुटुंबासाठी बारा चौदा- तास काम श्री.पंढरीनाथ यांना करावे लागे.खाण्यापिण्याची वेळ निश्चित नसायची. अशा कारणांमुळे मधुमेहाने त्यांच्याशी मैत्री केली !  आपल्या नंतर मुलाच्या नोकरीसाठी त्यांनी नोट प्रेस मध्ये उपोषण केले. दिलीपला नोकरी मिळवून दिली.२००५ साली मधुमेहाचा त्रास जडलेला असताना अचानक छातीत त्रास जाणवू लागला आणि श्री.पंढरीनाथ यांनी गरीबीचा अखेर निरोप घेतला ! कुटुंबाचा आधारवड गेला. तोपर्यंत दोन्ही मुलं हाताशी आली होती.श्री.दिलीप नोट प्रेस मध्ये नोकरी करून वडिलांनी शिकवलेलं पारंपरिक गटई काम आणि बॅग रिपेरिंग करी. लहानगा संतोष वडिलांनी थाटलेलं,परंतु मालकीचं नसलेल्या दुकानात व्यवसाय करत आहे.
    आई - वडील होते तोपर्यंत घरावर त्यांचे नियंत्रण होतं. घर एकसंघ होतं. वडील गेले तसेच कुटुंबावर चे नियंत्रणही !  दोन्ही भावांची मनाने वाटणी झाली. शेजारी राहून मन मात्र कोसो मैल दूर गेलं ! ते शेवटपर्यंत एकमेकांशी मनाने जवळीक साधू शकले नाहीत.जेव्हा घरात खायला अन्न नव्हतं, पैसाअडका नव्हता, तेव्हा घर चालवण्यासाठी सर्वांनी घाम गाळला. रक्ताचं पाणी केलं .एकोप्याने नांदले आणि आज दोन पैसे गाठीशी आले तर त्यांच्यातला इगो जागा झाला. तेव्हा,कष्टाची आणि व्यवसायाची लाज वाटली नाही. आज एकमेकांच्या सुखदुःखात सुद्धा तटस्थ राहण्याची बुद्धी देव कशी देऊ शकतो ?  देव जाणे !
     पतीच्या निधनानंतर ताराबाईंचा आधार गेला. आपण आपले सर्वस्व गमावल्याची भावना त्यांना झाली. स्त्रीला शक्तीचं प्रतीक मानलं जातं. तिने स्वतःला सावरलं.लहान मुलावर तिची जबाबदारी आली.श्री.पंढरीनाथ यांचे काही पेन्शन मिळते, तेवढाच कुटुंबाला आधार ! 
    सदैव हसरा चेहरा,दुसऱ्यांना आग्रह करून खाऊ घालण्याचा स्वभाव, पक्वान्न गोड गोड बनवणे तिच्या आवडीचे काम !  अन्नपूर्णा जणूकाही ती !! थकत नाही. मुलीं - नाती यांच्यावर तिचं जिवापाड प्रेम.आज वयाची ८२ वर्षे झाली तरी कोणावर बोजा त्या झाल्या नाहीत.भरपूर गप्पा करणं, हसणं आणि हसवणे याचा त्यांना छंद आहे.
    मुलगी म्हणून आई-वडिलांकडून फारसे प्रेम त्यांना मिळालं नसलं तरी उत्तम संस्कार मात्र मिळाले.त्याचा पतीचा संसार सावरताना खूप उपयोग झाला. ताराबाईंच्या वाईट काळात भावांची फारशी साथ लाभली नसली तरी आई-वडील भाऊ यांच्याबद्दल प्रचंड अभिमान ताराबाईंना आहे. त्यांच्या सर्वांच्या बद्दल त्या कौतुकाने.. भरभरून बोलतात. कधी बोलताना दुखी असल्याचं जाणवत नाही.भावांनीही बहिणीचा स्वभाव समजायला थोडा उशीर केला. आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांचा लहान बंधू श्री.प्रकाश यांनी त्यांना सणावाराला साडीचोळी केली. मान सन्मान दिला.वारंवार विचारपूस करून अडचणीच्या प्रसंगी मदतीसाठी धावून येऊ लागले. आज पर्यंत त्यांनी बहिणीला कधी अंतर दिले नाही.
    पतीने आणि ताराबाईंच्या कुटुंबाने मोठ्या कष्टाने आणि स्वाभिमानाने घेतलेल्या छोटेखानी घराच्या जागेवर आज मोठी इमारत उभी राहिली आहे. याकामी ताराबाई यांचे लहान बंधू श्री.प्रकाश पठाडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट मिळाला. स्वकष्टाने, घाम गाळून विकत घेतलली ही वास्तू ...वडिलांच्या प्रेमाची साक्ष देत आहे.अनेक अडचणींच्या  प्रसंगात या वास्तूनेच त्यांना सहारा दिला आहे. श्री.प्रकाश पठाडे यांच्यामुळे ताराबाई यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली आहे.
     वयोमानाप्रमाणे रक्तदाब आणि मधुमेह यांच्याशी थोडीफार मैत्री ताराबाईंनी देखील केली आहे.परंतु आपल्या आधी पती आणि नंतर मुलाच्या निधनाचे दुःख अंतःकरणात ठेवून चेहऱ्यावर हास्य दाखवत आयुष्याची संध्याकाळ ताराबाई घालवत आहेत.
    काळ बदलला.तशी लोकांमधील विचार करण्याची पद्धत बदलली. सहनशीलता कमी झाली. अलीकडे संस्कृती आणि नीतिमूल्ये देखील काही प्रमाणात लोप पावत चालली आहेत.आई-वडिलांकडे श्रीमंती असूनही नवऱ्याकडे दरिद्री अवस्थेत राहणे ताराबाईनी स्वीकारले. आज असा प्रसंग आला तर इतकी सहनशीलता नव्या पिढीकडे आहे का ? इतके कष्ट करण्याची तयारी आहे का? या प्रश्नांची उत्तरे दुर्दैवाने नकारात्मक असतील !
    श्रीमती ताराबाई यांच्याकडून ही सहनशीलता घ्यावी . संवेदनशीलता घ्यावी  कुटुंब कशाला म्हणतात... ते टिकवण्यासाठी किती श्रम करावे लागतात.. ते त्यांच्याकडून शिकावे. त्या नशिबाला दोष देत बसल्या नाहीत. परिस्थितीतून मार्ग काढायला शिकल्या.संकटे येतात तसे जातातही. काळ कोणासाठी थांबत नाही.
    आज ताराबाईंच्या अंगावर दागिने फारसें नसतील कदाचित... परंतु त्यांचे अवघे जीवन नीतिमूल्यांच्या अलंकारांनी खुलून दिसते.
    श्रीमती ताराबाई यांना ईश्वर दीर्घायुरारोग्य प्रदान करो याच सदिच्छा !

लेखन
श्री.शैलेश पाटोळे
नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...