Tuesday, July 27, 2021

अष्टपैलू : प्रा. दिलीप फडके

                 अष्टपैलू: प्रा. दिलीप फडके

शिक्षण क्षेत्रात अनेक संस्था कार्य करीत असतात. त्यातील काहींना गौरवशाली इतिहास असतो. उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू असतो. नाशिक एज्युकेशन सोसायटी ही अश्या भविष्यासाठी धडपडणारी एक नामवंत शैक्षणिक संस्था आहे. 'विद्या यश: सुखकरी' हे आपले ब्रीद प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या या संस्थेने गेल्या शंभर वर्षात अनेक स्थित्यंतरे अनुभवली १ एप्रिल १९२३ मध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना होऊन ख्रिश्चन मिशनरी सोसायटी कडून ही शाळा काही नामवंत शिक्षकांनी चालवायला घेतली. आज पर्यंत नाशिक एज्युकेशन सोसायटीस माजी विद्यार्थी आणि नामवंत शिक्षक या दोन खांबांचा भक्कम आधार राहिलेला आहे. किंबहुना शाळेचे अस्तित्व या दोन घटकांमुळे टिकून आहे. संस्था मोठी असते एखाद्या व्यक्ती पेक्षा, हे जरी खरे असले तरी संस्थांचे मोठेपण वाढवणारी माणसे देखील तेवढीच उत्तुंग असतात, हे नाकारून चालणार नाही. नाशिक एज्युकेशन सोसायटी माजी विद्यार्थी आणि शिक्षकांना मुळे आज दिमाखात शंभरीकडे वाटचाल करीत आहे.संस्थेने हा प्रवास पूर्ण करताना अनेक चढउतार अनुभवले.परंतु नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे काही मुत्सद्दी व्यक्तींमुळे हा यशोदायी प्रवास सुखकर होऊ शकला, हे आपल्याला मान्य करावे लागेल.
     माजी विद्यार्थी प्रा. दिलीप फडके हे त्यापैकी एक नाव. पेठे विद्यालयातून मॅट्रिक परीक्षा ते उत्तीर्ण झाले. आज प्रा. फडके सर संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.नाशिक एज्युकेशन सोसायटी आणि पेठे विद्यालयाशी या अर्थाने त्यांचा गत ६० वर्षांचा ऋणानुबंध विविध भूमिकांतून आहे. कोणत्याही कारणास्तव पेठे विद्यालयाचा विषय निघाला की,प्रा.फडके सर भावनिक होतात. इतके त्यांचे शाळेच्या बाबतीत हळवे मन आहे. म्हणूनच कदाचित शाळा ही आपली आई असते, असे म्हणत असावेत.
  श्रीगजानन महाराजांच्या वास्तव्याने पावन भूमीतील अत्यंत संस्कारक्षम आणि उच्चविद्याविभूषित कुटुंबात सरांचा जन्म झाला. विदर्भातील बाळापुर या मूळ गावाहून फडके कुटुंब नाशिक पुण्यभूमीत स्थायिक झाले. तीर्थरूप श्री. बाळकृष्ण फडके आणि तीर्थरूप सौ. शकुंतला फडके या दांपत्याच्या पोटी श्री. दिलीप व श्री.सुधीर ही दोन अपत्ये जन्माला आली.
   सरांचे वडील नाशिक जिल्ह्यात सहकार खात्यात मोठे अधिकारी होते. नाशिक आणि परिसरात तीर्थरूप श्री.बाळकृष्ण फडके करारी आणि शिस्तबद्ध अधिकारी म्हणून सुपरिचित होते.
   मातोश्री सौ.शकुंतला फडके पेठे विद्यालयात भाषा विषयाच्या उत्तम शिक्षिका होत्या. त्या मूळच्या नाशिकच्या रानडे परिवारातील.अत्यंत मितभाषी आणि सुस्वभावी. विद्यार्थ्यांवर त्या मातृ वत प्रेम करीत. एक शिस्तप्रिय, संवेदनशील शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता. भाषा विषयांप्रमाणेच बागकाम हे त्यांच्या आवडीचे विषय .त्यांच्या शिकवण्यात औपचारिकता कधीच दिसली नाही.अगदी सहज मुलांवर अभ्यासाचे आणि व्यवहाराचे संस्कार त्या करीत.
   लहान बंधू श्री.सुधीर फडके हे युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी करीत. सध्या ते पुण्यात वास्तव्यास आहेत.
  आई-वडिलांकडून शिक्षणाचा आणि संस्काराचा वारसा फडके सरांना लाभला. शालेय जीवनापासून अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले सर एकपाठी होते. प्रारंभीच्या काळात त्यांचे संपूर्ण बालपण पेठे हायस्कूल च्या परिसरात म्हणजेच मोघे वाड्यात गेले. जणू मुलांनी गल्लीत खेळायला जावे तसे त्यांच्यासाठी शाळा होती. घरातून शिक्षणाचा वारसा असला तरी त्या काळातील पेठे विद्यालयातील कै.ब.चिं.सहस्रबुद्धे, कै. वि.प्र. गुप्ते, कै. म. श्री. मराठे, श्री.परांजपे सर  यांसारख्या नामवंत शिक्षकांचा प्रभाव त्यांच्यावर पडला. अत्यंत चांगले शिक्षक त्यांना लाभले.रोपाला खतपाणी चांगलं मिळालं की, त्याचे भक्कम वृक्षात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. त्याप्रमाणे शिक्षकांचे उत्तम संस्कार त्यांच्यावर झाले. शालेय जीवनात मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांवर त्यांनी प्रभुत्व मिळविले. वक्तृत्व कलेत सर निपुण होते. शालेय जीवनात अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन स्वतःला अनेकदा सिद्ध केले होते. शाळेच्या वार्षिक अंकात ते सतत लेखन करीत. चित्रकलेची विशेष आवड त्यांना होती,तसेच गती देखील !
     पेठे विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आर्किटेक्ट होण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये त्यांनी आर्किटेक्ट साठी प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. परंतु,काही कारणास्तव प्रवेश मिळू शकला नाही.
   सरांचे वडील तीर्थरूप बाळकृष्ण फडके आणि गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सर डॉ.मो.स. गोसावी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाणिज्य शाखेत सरांनी प्रवेश घेतला. बी.वाय.के. कॉलेज मधून बी. कॉम. पूर्ण केले. कॉलेज च्या जीवनात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले. वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्वस्पर्धा गाजवल्या.गुणवंत विद्यार्थी म्हणून लौकिक संपादन केला. एम. कॉम. करीत असताना ट्यूटर म्हणून काम करण्याची संधी सरांना बी.वाय.के. कॉलेज मध्येच मिळाली. शालेय जीवनापासून इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते.याचे खरे तर सारे श्रेय तीर्थरूप आई आणि पेठे विद्यालयातील इंग्रजी विषयाचे अभ्यासू शिक्षकांना जाते. बिनचूक व्याकरणासह इंग्रजी भाषा बोलण्याची पेठे विद्यालयाची एक परंपरा होती. म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इंग्रजीतून कॉमर्स विषय शिकवताना इतरांपेक्षा फडके सर एक वेगळी ओळख निर्माण करू शकले. उत्तम अध्यापकाचे सारे गुण त्यांच्यात उपजत होते. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि आपल्या अमोघ वाणीने श्रोत्यांच्या मनाची ते लगेच पकड घेतात. वक्तृत्व कलेवरची पुस्तके ते कोळून प्यायले असावेत,असे ऐकणाऱ्यांना वाटते. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. अनेकांनी अनेकदा याचा अनुभव घेतला आहे. अनेकदा वादविवादात समोरच्याला आपल्या भात्यातील खास वाग्बाणांनी घायाळ करण्याची ताकद त्यांच्या वाणीत ठासून भरली आहे.
    महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असताना प्रा.आर.जी .शारंगपाणी, प्रा. विनायक गोविलकर, प्रा. एस. डी. काणे,प्रा. श्री.शिंपी, श्री.श्रीकांत रहाळकर,श्री.प्रकाश कर्डिले, प्रा. संजय चपळगावकर यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सर्व प्राध्यापक वर्गांसाठी प्रा. फडके म्हणजे आधारस्तंभ होते. कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर सरांकडे हमखास मात्रा असे. गोखले एज्युकेशन सोसायटीत कार्यरत प्राध्यापकांच्या हक्कांसाठी पहिल्यावहिल्या संघटनेची मुहूर्तमेढ सरांनी रोवली. त्याचा आदर्श आणि उपयोगिता लक्षात घेऊन महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी लढणारी पुक्टो संघटनेची स्थापना झाली. 
     सरांकडे संघटन करण्याची शक्ती आणि युक्ती आहे.  पुक्टो संघटनेत अनेक वर्षे मार्गदर्शनाची भूमिका त्यांनी निभावली.
   महाविद्यालयात काम करीत असताना एक अभ्यासू आणि जिज्ञासू प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. कोणतही काम करण्याची एक स्वतंत्र शैली सरांकडे आहे. लोकांचे संघटन करून त्यातील कोणाकडे कोणती जबाबदारी द्यावी,याचे कौशल्य आणि निरीक्षणाची दांडगी शक्ती त्यांच्याकडे आहे.कोणत्याही कामाचे श्रेय ते स्वतःकडे घेत नाहीत. ज्याचे त्याचे श्रेय ज्याला त्याला देतात .कदाचित त्यामुळेच त्यांच्या बद्दलचा आदर दुणावतो.
   आयुष्याकडे ते अत्यंत सकारात्मकतेने पाहतात. कितीही कठीण, गहन प्रश्न असो. गुंतागुंतीचा प्रसंग असो.सर तो खुबीने सोडवतात.त्यात कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतात.यादृष्टीने ते उत्तम crisis analyser म्हणजे संकट विश्लेषक आहेत. समोर असलेल्या समस्येचा अभ्यास त्यांचा दांडगा असतो. त्यावरील उकल ऐकल्यावर, ही समस्या एवढी मोठी नव्हतीच,असा इतरांना भास होतो. 
   सर एक यशस्वी व्यवस्थापक आहेत. त्यांच्यातील कौशल्यांचा ते कौशल्याने वापर करून घेतात. त्यांच्या अंगी निर्णयक्षमता आहे. या निर्णय क्षमते द्वारा अनेक अवघड आणि गुंतागुंतीच्या समस्या ते सोडवितात. या अर्थाने प्रा. फडके सर इतरांना जादूगर वाटतात ! समस्येची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने ते करत असल्याने त्यांना अचूकता साधते. त्या बाबतीत आवश्यक असलेले सर्वांगीन ज्ञान सर मिळवतात.
    सहकाऱ्यांकडून काम करून घेताना, ते इतरांना समजून घेतात. कधी ते सल्लागार तर कधी सहकारी होतात. काम करणाऱ्या प्रत्येकाला,तो अधिकारी असो अथवा कर्मचारी सर्वांना आदराची वागणूक देतात. कदाचित यामुळेच ते करीत असलेल्या कामाची यशस्विता वाढते.
   महाविद्यालयात काम करीत असताना विद्यार्थी संघटनांशी असलेले तंटेबखेडे त्यांनी खुबीने सोडविले. वाद-विवाद मिटवणे, त्यातील कायदेशीर अडचणी सोडविणे यात सर माहीर होते. महाविद्यालय प्रशासनाला देखील प्रा. दिलीप फडके म्हणजे या दृष्टीने आधार वाटत.
   सरांचा आणखी एक गुण म्हणजे काम करताना त्यांच्यात असणारा प्रचंड उत्साह! एखाद्या तरुणाला लाजवेल असाच ! त्यामुळे इतरांमध्ये ऊर्जा भरते आणि काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होते.
   साधारणपणे समवयस्क आणि समविचारी लोकांमध्ये मैत्री होतांना आपल्याला दिसते. सरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना मैत्री करताना वयाची कोणतीही अडचण येत नाही.कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी ते मैत्री अगदी सहजपणे करतात. केवळ मैत्री करीत नाहीत, तर मैत्रीला जागतात देखील. दिलेला शब्द पाळणार. मैत्रीत ते कमिटेड असतात.
   सर्व कामात पुढाकार घेतात. सध्याच्या कोवीड काळात स्वतःचे वय विसरून त्यांनी अनेकांना मदत केली.कोणाला हॉस्पिटल बेड उपलब्ध करून दिले. कोणाला आर्थिक मदत तर कोणाला मानसिक आधार ! परंतु मदत करताना या कानाची त्या कानाला खबर लागू दिली नाही.कोणालाही मदत हवी असली तरी ते हक्काने सरांशी संपर्क करतात. कारण तेथून रिकाम्या हाताने कोणाला परतावे लागणार नाही,याची सर्वांना खात्री असते.
   हे सगळं करीत असताना कोणावरही अन्याय होणार नाही, याची ते खूप काळजी घेतात.प्रसंगी अन्यायाविरुद्ध बंड करण्याची धमक त्यांच्यात आहे. व्यवस्थेविरुद्ध शड्डू ठोकण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत.जिथे कुठे अन्याय होतो आहे,असे त्यांच्या लक्षात आले की,मग त्याविरुद्ध बंड पुकारण्यात सर कायम अग्रेसर असतात. नुसते बंड करून थांबत नाहीत. तर शेंडी तुटो अथवा पारंबी या न्यायाने त्याचा पाठपुरावा देखील करतात. महाविद्यालयीन स्तरावर त्यांचे सर्व सहकार्‍यांशी आणि वरिष्ठांशी उत्तम संबंध होते. बी.वाय.के. च्या कॉमर्स विभागात कोणत्याही स्वरूपाची अडचण निर्माण झाली की, प्रा. फडके सर त्यावर रामबाण उपाय होते. विद्यापीठ स्तरावर देखील त्यांचा दबदबा कायम होता.अडचणींच्या प्रसंगी त्यांना सन्मानाने बोलावले जाई. सहकारी मग तो जूनियर असो अथवा सीनियर सर्वांनाच त्यांचा आधार वाटे. ते उत्तम मार्गदर्शक होते. अनेक प्राध्यापकांना त्यांच्या नोकरीच्या प्रारंभीच्या काळात उभे करण्याचे श्रेय प्रा.फडके सरांना जाते.
   स्वतःच्या विषयाचा दांडगा व्यासंग,भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांना वर्ग नियंत्रणाचा प्रश्न कधी निर्माण झाला नाही. एखादा कठीण विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांना अवगत होती. हुशार विद्यार्थ्यांबरोबरच टवाळ विद्यार्थ्यांनाही सरांचा आदर वाटे. सर्व प्रकारच्या विद्यार्थी हाताळण्याचे दुर्लभ तंत्र सरांना अवगत होते.
   अखंडीत वाचीत जावे या समर्थांच्या उक्तीप्रमाणे सरांचे वाचन अफाट आहे. आजही सरांच्या बंगल्याच्या प्रत्येक खोलीत टेबलावर, कोचावर, पुस्तक दिसते .नवीन पुस्तक बाजारात येण्याचा अवकाश ,सर पदरमोड करून ते विकत घेऊन वाचतात. साहित्य, अर्थ, वैचारिक, धार्मिक, तात्विक,ऐतिहासिक,राजकीय असे नानाविध विषयांवरील असंख्य पुस्तकांची पारायणे त्यांनी केली आहेत. 
      त्यांना कोणत्याही विषयाचे वावडे नाही. समोरचा श्रोता ज्या पद्धतीचा असेल त्यानुसार त्या विषयावर सर बोलू शकतात. बोलताना संदर्भासह दाखले देतात. नव्या पिढीला काल काय खाल्ले... हे सहजासहजी आठवत नाही.परंतु,सर कधीकाळी वाचलेल्या पुस्तकातील संदर्भ पुराव्यानिशी देऊ शकतात. स्मृतीच्या बाबतीत सर अत्यंत श्रीमंत ! वाचना बरोबरच लेखनाची त्यांना प्रचंड आवड आहे. काही वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात त्यांच्यातील साहित्य अभिरुची दर्शविणारी एक लेखमाला सरांनी लिहिली. अत्यंत दुर्मिळ अशी पुस्तके एका जुन्या वाचनालयातून त्यांनी शोधून त्याचा परिचय करून देणारी लेखमाला वर्षभर लिहिली. आर्थिक बाबींशी त्यांचा संबंध असल्याने त्यावरील चिंतनात्मक लेख ते सतत लिहितात. एका दैनिकासाठी संपादकीय लेख लिहिण्याची जबाबदारी देखील सरांनी यशस्वीपणे निभावली आहे.
   सरांनी केवळ प्राध्यापक म्हणून नोकरी केली,असे नाही.तर नोकरी करत असताना सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, लेखन,वक्तृत्व यासारख्या अनेक क्षेत्रात मुशाफिरी केली. प्रत्येक क्षेत्रातील लोकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. परंतु कायम प्रसिद्धीपासून दूर राहिले.
   प्रा.फडके सरांचे वैशिष्ट्य म्हणजे नवनवीन तंत्रज्ञान ते उत्साहाने आत्मसात करतात. त्यांच्या वयाच्या लोकांना तंत्रज्ञानाच्या वापराची सवय नसते अथवा भीती असते. सर मात्र या सर्वांपेक्षा वेगळे. संगणकावर सर्व कामे स्वतः करतात. मेल करणे, ड्राफ्टिंग करणे, ऑनलाइन सर्व प्रकारचे व्यवहार करणे. सोशल मीडियाचा योग्य व नियंत्रित वापर ते खुबीने करतात. तंत्रज्ञान आत्मसात करतात. त्यासाठी हवा तेवढा खर्च करण्याची त्यांची तयारी असते. नव्या पिढीला माहीत नसलेले तंत्रज्ञानाचे बारकावे सर कोळून प्यायलेले असतात. याचा अनेकदा आम्ही नव्या पिढीतले शिक्षक अनुभव घेत असतो.
   कोविड  मध्ये ऑनलाइन शिक्षणाची ओळख आताच्या पिढीला झाली. सरांनी त्यांच्या कॉलेजच्या जीवनात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कंट्रीवाईड क्लास रूम साठी अनेक व्याख्याने ऑनलाइन स्वरूपात नियोजनबद्ध पद्धतीने घेतली.त्यामुळे नाशिक एज्युकेशन सोसायटी तील सर्व शिक्षकांना, नव्या पिढीला ऑनलाइन शिक्षण देण्यास आणि घेण्यात सर प्रोत्साहित करू शकले. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. प्राध्यापकांच्या रिफ्रेशर कोर्स साठी मार्गदर्शन ते करीत असत.
   कॉलेजमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात डॉ. आर. कृष्णकुमार कुलगुरू असताना प्रा. दिलीप फडके सर विद्यापीठाच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात विविध रोजगारक्षम आणि उपयुक्त शिक्षणक्रमाची निर्मिती त्यांनी केली. त्यात वर्तमानपत्र विक्रेते, सलून व्यवसायिक ,आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्याकरिता रोजगार मिळू शकेल,अशा विविध कोर्सेसची निर्मिती करण्यात सरांनी मोठे योगदान दिले. विद्यापीठातील सर्व संचालक आणि अधिव्याख्याता यांच्याबरोबरच सामान्य कर्मचारी यांच्याशी देखील सरांचे उत्तम संबंध निर्माण झाले. त्यांच्यातील व्यवस्थापनाचे गुण विद्यापीठाच्या गुणवत्तावाढीसाठी उपयोगाचे ठरले.
   त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची दांडगी स्मरणशक्ती! वाचलेले ग्रंथ,पाहिलेल्या व्यक्ती ,केलेले निरीक्षण, घेतलेले अनुभव अगदी जसेच्या तसे त्यांना आठवतात. आणि गप्पांमध्ये ते लोकांपुढे मांडतात देखिल ! जणू तो प्रसंग आपण अनुभवत आहोत. इतका जिवंतपणा त्यांच्या सांगण्यात असतो. 
       एक म्हणजे प्रा. फडके सरांना कोणत्याही विषयाचे वावडे नाही अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत गप्पांमध्ये रममाण होतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व स्तरावर काम करणार्‍या लोकांशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. सर्व विषयांची इत्यंभूत माहिती सरांकडे मिळू शकेल याचा विश्वास प्रत्येकाला असतो.
   सरांना मित्रांचा गोतावळा जमून गप्पांची मैफल सजवायला खूप आवडते.नव्हे तो त्यांचा छंद आहे. आपले मत अत्यंत सडेतोड आणि स्पष्टपणे ते मांडतात. ऐकणार्‍याला काय वाटेल, याचा विचार न करता सत्याची बाजू मांडतात. त्यांच्या स्वभावातील एक गुण जो फार कमी लोकांमध्ये अनुभवायला मिळतो, तो म्हणजे आधी समोरच्याचे बोलणे ते शांतपणे आणि तटस्थपणे ऐकून घेतात. कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. परंतु, स्वतः बोलायला लागले की,मग त्यांचा मुद्दा सप्रमाण मांडून दुसऱ्याचे  म्हणजे ऐकणाऱ्याचे समाधान करतात.
  सत्यप्रियता हा त्यांच्या स्वभावातला गुणविशेष म्हणता येईल. एखाद्याने आपल्या कडून झालेल्या प्रमादाची नेमकेपणाने, खरेपणाने कबुली दिल्यास सरांना ते अधिक भावते. खोटेपणाचा बुरखा पांघरलेल्याना मात्र कसलीही दयामाया सर दाखवीत नाहीत.
   आपली शाळा, संस्था, माता-पिता आणि मित्र यांच्या बाबतीत जिव्हाळा आणि कृतज्ञता त्यांच्या ठाई अनुभवास येतो. त्यांच्याबद्दल अभिमानाने आणि कौतुकाने ते बोलतात.आपले शिक्षक आणि शाळेबद्दल वाईट बोलणार्‍यांना त्यांच्याकडून शाब्दिक फटकारे कायम सहन करावे लागतात.
   सरांचे बोलणे मार्मिक! आपल्या शाब्दिक फटक्यानी अनेकांना धूळ चारण्याची अफाट ताकद त्यांच्या शब्दांमध्ये आहे. एखादा गंभीर प्रसंग विनोदी अंगाने सरच मांडू शकतात.त्याने गंभीर वातावरण हलकं फुलकं करतात. एखादा प्रसंग अथवा किस्सा ऐकावा तो प्रा. फडके सरांकडून, अगदी हावभाव सकट!
" मनस्येकं वचस्येकं कर्मनेक्यं महात्मनाम" या उक्तीप्रमाणे त्यांच्या मन आणि वाणी यामध्ये कोणतीही तफावत दिसून येत नाही.
   सरांचा लोकसंग्रह फार मोठा. परंतु, मित्र फार निवडक.मैत्रीत व्यवहार त्यांनी कधी येऊ दिला नाही प्रा. फडके सर म्हणजे एक दिलखुलास मित्र! असे त्यांचे मित्र म्हणतात.
  सर ,नाशिक एज्युकेशन सोसायटीचे सभासद १९७२ मध्ये झाले. आर्थिक विषयातील जाणकार म्हणून त्यांची संस्था प्रशासनात एन्ट्री झाली. आर्थिक बाबतीत अत्यंत हुशार असल्याने संस्थेला एक मार्गदर्शक त्यांच्या रुपाने लाभला. माजी विद्यार्थी म्हणून त्यांना शाळा आणि संस्थेविषयी अभिमान दांडगा! गेली अनेक वर्षे ते संस्थेची सेवा करीत आहेत. नाशिक एज्युकेशन सोसायटीशी सरांचा विद्यार्थी असल्यापासून आजतागायत संबंध विविध भूमिकांतून आला आहे. संस्थेच्या उंटवाडी शैक्षणिक संकुलाचे कै.श्री.बाळासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या नंतरचे चेअरमन म्हणून जबाबदारी स्वीकारून शाळा नावारूपाला आणण्यात प्रा. फडके सरांचा सिंहाचा वाटा आहे.विनाअनुदानित-  अनुदानित असा पस्तीस वर्षांचा शाळेचा व शिक्षकांचा प्रवास प्रा. फडके सरांच्या मार्गदर्शनाने झाला.म्हणून उंटवाडी शैक्षणिक संकुल हा सरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांशी सरांचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. शिक्षकांच्या सुखदुःखात प्रा. फडके सर मोठा आधार आहेत.
    उंटवाडी शैक्षणिक संकुलाच्या अगदी सुरुवातीच्या काळात शाळा नावारूपाला यावी, लोकांपर्यंत शाळा पोहोचावी, याकरिता शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी कल्याणाचे आणि समाजहिताचे अनेक उपक्रम प्रा. दिलीप फडके सर यांनी शिक्षकांच्या माध्यमातून राबविले. असाच एक प्रसंग ज्यामधून सरांचा शाळा विद्यार्थी आणि संस्था यांच्याबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळा दिसून येतो. स्वातंत्र्य दिनाचा समारंभ नव्या शाळेत रात्री बारा वाजता करावा, असे सरांनी सर्व घटकांना विश्वासात घेऊन ठरविले. ध्वजारोहणाचा समारंभ शाळेच्या आवारात सुरू होता. काही मोजके विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक तिरंगा ध्वजावर फडकत होता.अचानक कोणीतरी समाजकंटकांने उपस्थित गर्दीवर दगड भिरकावला. एका मुलाच्या डोक्याला दगड लागून तो जखमी झाला. क्षणाचाही विलंब न करता रात्रीच्या त्या प्रसंगी सरांनी आपल्या स्वतःच्या नव्या गाडीमध्ये बसवून शहरात दवाखान्यात नेले. त्याच्यावर उपचार करून त्याच्या घरापर्यंत पोहोचविले. नव्या कोऱ्या गाडीपेक्षा मुलावर उपचार करणे सरांना अधिक श्रेयस्कर वाटल्याचे पाहून उपस्थित आश्चर्यचकित झाले.
   उंटवाडी शैक्षणिक संकुलामध्ये सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात पालकांचा प्रारंभी प्रचंड विरोध होता. या विरोधात पालकांनी आंदोलन देखील केले. पालकांच्या जमावाला प्रा. दिलीप फडके सर सामोरे गेले. त्यांनी बोलायला सुरुवात केल्यानंतर अचानक पालकांचा विरोध मावळला. हे पाहून उपस्थित संपूर्ण शिक्षक वर्ग आश्चर्यचकित झाला. समोरच्याची मानसिकता लक्षात घेऊन फडके सरांची संवाद साधण्याची कला अलौकिक आहे. पुढे सेमी इंग्रजी माध्यमामुळे शाळेच्या निकालात आणि एकूणच गुणात्मक दृष्ट्या झालेली वाढ पाहून पालकांनी प्रत्यक्ष येऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
   शाळेतील शिक्षक कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असत. वेळोवेळी सर त्यांना आर्थिक मदत करीत असत. एका प्रसंगी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना नाशिक मधील एका पतसंस्थेकडून आर्थिक मदत किंवा कर्ज देखील सरांनी उपलब्ध करून दिले होते.
    पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी एकदा सर गेले. पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीने सरांना ओळखले. त्याने नमस्कार केला. महाविद्यालयात सर त्याला शिकवायला होते. सरांनी आपुलकीने त्याची चौकशी केली. क्षेमकुशल विचारले." सर माझा भाचा बी.एड. झाला आहे. सध्या त्याला काम नाही. काही करता आले तर पहा." अशी विनंती त्याने केली." कागदपत्रे घेऊन शाळेच्या कार्यालयात पाठवा," असे सरांनी सुचविले. त्या मुलाला सरांनी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी दिली. अशा अनेक होतकरू आणि गरजू लोकांना सरांनी मदत केली आहे.
      नंतरच्या काळात इंग्रजी माध्यमाची धुरा सरांच्या खांद्यावर पडली.अत्यंत हुशारीने सर ती जबाबदारी पार पाडत आहेत.
   नाशिक एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर सर हे त्यांचे बालमित्र दोघांमधील स्नेह आजही टिकून आहे. काही बाबतीत वैचारिक किंवा तात्विक भेद असतीलही. परंतु, शाळा आणि संस्था हित या दोहोंमधील समान धागा आहे.गेल्या पन्नास वर्षात प्रा. रहाळकर सर आणि प्रा. फडके सर यांनी कुटुंब म्हणून संस्था टिकवून ठेवली आहे. दोघांबद्दल शिक्षक आणि कर्मचाऱ्यांत नितांत आदर आहे. अगदी घरगुती अडचणींमध्ये देखील सर्वांना यांच्याकडे आपले मन मोकळे करावेसे वाटते.
   एकदा सभेचे पत्र देण्यासाठी एक कर्मचारी प्रा. फडके सरांकडे आला. दुपारची वेळ असल्याने त्याची आपुलकीने त्यांनी चौकशी केली. पाणी दिले. पत्र देऊन तो कर्मचारी जायला निघाला. सरांच्या लक्षात आले की, तो कर्मचारी एका पायाने लंगडत आहे. सरांनी जवळ जाऊन त्याची चौकशी केली.तेव्हा समजले की, डॉक्टरांनी पायाचे ऑपरेशन सुचवले आहे. परंतु, आर्थिक अडचण असल्याने ते शक्य नव्हते. सरांनी त्याला थांबायला सांगितले. क्षणाचाही विलंब न लावता भरभक्कम रकमेचा चेक सरांनी त्याच्या हातात देत लवकर ऑपरेशन करा आणि अजून काही मदत लागली तर जरूर सांगा. असे आपुलकीने व हक्काने सांगितले अशावेळी डोळ्यांच्या पापण्यातून ओघळणारे अश्रू पुसत तो कर्मचारी कृतज्ञ मनाने जायला निघाला. याची वाच्यता कोणाकडे करू नको, असे वरून सरांनी त्याला बजावले.
   प्रा. फडके सर गरजवंत व्यक्तीला किंवा संस्थांना उदार अंत:करणाने मदत करीत असतात. परंतु, या कानाची त्या कानाला खबर होऊ देत नाहीत. याबाबतीत ते कधीही प्रसिद्धी करीत नाहीत.  नेकी कर दरिया में डाल, असा त्यांचा स्वभाव आहे. कर्मचार्‍यांच्या बाबतीत त्यांना लवकर कणव येते.
   त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे आयुष्य आपोआपच सकारात्मकतेकडे आणि उन्नती च्या दिशेने बदलत गेल्याचा अनुभव आपल्याला येतो.
 सर जितके स्पष्टवक्ते तितकेच क्षमाशील आहेत.  विजूच्या कुटुंबाला पुढील काळात आर्थिक मदत तसेच मुलांच्या शिक्षणासाठी दिशादर्शन सरांनी केले. त्यामुळे त्याची मुलगी एका नामांकित बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून तर मुलगा सध्या इजिप्त येथे अभियंता म्हणून नोकरीस आहे. याचे सारे श्रेय प्रा. फडके सरांना जाते. अर्थात सरांचा विश्वास संपादन करणे तितकेसे सोपे नाही. जाणीव न होऊ देता सर समोरच्याची कसोटी पाहत असतात .विजूच्या अंगी असलेल्या नम्रता आणि सचोटी या गुणांमुळे तो सरांचा विश्वास संपादन करण्यास पात्र ठरला.अर्थात सरांना याबाबतीत सौ.रेखाताई यांची मोठी साथ होती.
    आयुष्यात आपण अनेकांशी अनेक नात्यांनी जोडले जातो. परंतु, आपल्याकडून ते नाते जपले जातेच असे नाही. त्यात काही असतात रक्ताची तर काही केवळ हृदयाची. सरांनी दोन्ही नात्यांना खरा न्याय दिला.
      ऐन तारुण्यात विधवा झालेली, फार शिक्षण न झालेली, खऱ्या अर्थाने निराधार. तीन मुलींची आई असलेल्या आशाबाईना असाच आधार देउन प्रा. फडके दाम्पत्यांनी तिच्या कुटुंबाचा उद्धार केला. आशाबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तिच्या राहण्याच्या जागेपासून ते मुलीच्या शिक्षणाची सर्व सोय सरांनी केली.मुले लहान असताना आजारी पडल्यास स्वत:च्या गाडीने त्याना दवाखान्यात नेत. आर्थिक अडचण असल्यास मदत करीत.तीन मुलींसह राहणाऱ्या एका निराधार स्त्रीला बाहेरच्या टवाळखोरांकडून त्रास देण्याची कोणाची हिंमत सरांमुळे झाली नाही. आशाबाई आणि तिच्या कुटुंबाला परकेपणाची जाणीव त्यांनी होऊ दिली नाही. आशाबाई सरांकडे काम करीत. त्याचा मेहनताना ते तिला देत. परंतु तरीही नोकरांसारखी वागणूक त्यांनी कधी दिली नाही.सौ. रेखाताई यांनी आशाबाईच्या मुलींची लग्ने आणि पुढे मुलींच्या बाळंतपणासाठी सर्व प्रकारची मदत केली. आजच्या काळात सख्खे नातेवाईक करणार नाहीत इतकी मदत फडके दांपत्याने केली. पुढे कर्मचारी म्हणून संस्थेत नोकरीची संधी देखील उपलब्ध करून देऊन कायमस्वरूपी आर्थिक मदत मिळवून दिली.परंतु केलेल्या उपकारांची, मदतीची वाच्यता कोणाकडे केली नाही. त्यांच्यातील दातृत्वाला खरोखर सलाम! अत्यंत निस्वार्थपणे त्यांनी अनेकांना मदत केली.
     २००० च्या जवळपास सरांना हृदयविकाराचा अचानक त्रास जाणवू लागला.त्यांचे बायपासचे ऑपरेशन झाले.ते यशस्वी झाले. त्यानंतर प्रकृती सुधारली . दरम्यानच्या काळात कुलकर्णी नावाच्या एका गृहस्थाला रोजगार मिळवून देण्यासाठी सरांनी मध्यस्थी केली होती. सरांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, अशी भावना कुलकर्णींच्या मनात कायम होती. आजारपणातून बरे झाल्यानंतर एकदा काही कामाच्या निमित्ताने श्री. कुलकर्णी आणि प्रा. फडके सर कोपरगाव च्या जवळपास गेले होते. श्री.कुलकर्णी यांनी सरांना शिर्डीच्या साईबाबा मंदिरात येण्याची विनंती केली. नाईलाजाने सरांनी होकार दिला.दर्शन झाले. मंदिराबाहेर आल्यावर कुलकर्णींनी त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीतून चपलांचा जोड बाहेर काढला. सरांनी विचारले ,"हे काय ? कुलकर्णी अत्यंत भावनिक झाले म्हणाले," सर ,तुमची प्रकृती बिघडली होती. आमच्या सर्वांचे तोंडचे पाणी पळाले. तुमची तब्येत बरी व्हावी म्हणून माझे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना मी नवस केला होता. जोपर्यंत सरांची प्रकृती बरी होत नाही आणि त्यांना शिर्डीला दर्शनासाठी आणत नाही. तोपर्यंत मी अनवाणी फिरेन.असा नवस मी केला होता .सर,गेले दोन वर्षे मी चप्पल घातलेली नाही.आज माझा नवस पूर्ण झाला आहे." आणि ते कुलकर्णी मंदिरा बाहेर उभ्या असलेल्या देवापुढे नतमस्तक झाले!
  रिक्षा ड्रायव्हर असलेल्या तरुण लालजीच्या आयुष्यात उत्कर्षाची पहाट सरांच्या मार्गदर्शनामुळे झाली. जीवनाचे योग्य मार्गदर्शन आणि दिशादर्शन झाल्यामुळे आज लालजी प्रतिष्ठेचे आयुष्य आनंदात उपभोगत आहे.प्रा. फडके सर लालजीसाठी श्रद्धा स्थान ठरले आहेत.
   सरांवरील श्रद्धा आणि प्रेमापोटी अनेकांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट केली. असे त्यांचे कार्य कोणत्याही भौतिक पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे.
  कर्तुत्ववान पुरुषांची वाणी स्वाभाविकपणे उग्र असते. त्याप्रमाणे कधीकधी केलेल्या चुकांबद्दल सर्व भयंकर चिडतात देखील. परंतु, सज्जनांचा क्रोध हा वस्त्रावर पडलेल्या शुद्ध जला सारखा असतो. शाईच्या थेंबासारखा नसतो. त्याची नाराजी क्षणभरच टिकते. त्यानंतर अप्रसन्नतेचा आभासही राहत नाही ! तसे सरांचे आहे.
     कोणत्याही पदाचा, गौरवाचा, कौतुकाचा सरांना अहंकार नाही. त्यांची प्रत्येक कृती ही संस्था हित डोळ्यासमोर ठेवून केलेली असते. मान सन्मानाची आणि पदाची लालसा आणि अपेक्षा त्यांना नसते. त्यांच्या संपर्कातील लोकांचे गुण हेरून त्यांच्यात नेतृत्वगुण तयार व्हावेत, असा सतत प्रयत्न सर करीत असतात. राजकीय दृष्ट्या विरोध करणार्‍यांच्या हृदयात देखील श्रद्धा आणि विश्वास निर्माण करण्याचे सामर्थ्य सरांच्यामध्ये आहे.
   ग्राहक पंचायत या राष्ट्रीय संघटनेत श्री.बिंदुमाधव जोशी यांच्याबरोबर ग्राहक हिताची अनेक कामे सरांनी केली. राष्ट्रीय पातळीवर या संघटनेची अनेक पदे देखील भूषविली आहेत.
    राजकारणात पडण्याचा एक योग अपघाताने त्यांच्या जीवनात आला होता. त्यात स्वतःचे मूल्य देखील सिद्ध केले.परंतु,हे आपले क्षेत्र नव्हे हे त्यांनी वेळीच ओळखले.
    नाशिकमधील अनेक सामाजिक संस्थांवर सरांनी काम केले आहे. त्या संस्थांच्या उत्कर्षासाठी ते कायम निस्पृहपणे प्रयत्नशील राहिले.
  महाराष्ट्र शासनाच्या महारेरा समितीचे सदस्य म्हणून शासनाने सरांची सन्मानाने नियुक्ती केली आहे.
   नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अर्थ विभागाची धुरा समर्थपणे सर सांभाळत आहेत. अर्थ विभाग हा कोणत्याही संस्थेचा कणा असतो. संस्थांच्या सभा, त्यातील प्रत्येक विषयाची सरांनी केलेली मांडणी, ही कौशल्यपूर्ण व अभ्यासपूर्ण असते. अभ्यासोनी प्रकटावे, या उक्तीप्रमाणे शांतपणे, संयमाने विषय मांडण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे ऐकणाऱ्याच्या  मनात कोणताही किंतू उरत नाही. अत्यंत पारदर्शी कारभार हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
     सरांच्या पत्नी दिवंगत सौ.रेखाताई ह्या अत्यंत प्रेमळ आणि सुस्वभावी. लग्नानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. प्रा. फडके सर नोकरी तसेच अनेक सामाजिक आणि इतर संस्थांच्या कामांमध्ये गर्क असत. अशावेळी कुटुंबाकडे लक्ष देण्यास त्यांना फारसा वेळ मिळत नसे.सौ.रेखाताई यांनी मात्र सक्षमपणे कुटुंबाच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या. सर्व नातेवाईक.. नातलगांमध्ये जिव्हाळा कायम ठेवला. कामानिमित्ताने घरी येणारे सरांचे मित्र, नातेवाईक आणि इतरांसाठी योग्यते आगत-स्वागत केले. प्रारंभीच्या काळात त्यांनी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सारडा कन्या विद्यालयात इयत्ता अकरावी मॅट्रिकच्या वर्गासाठी दोन वर्षे अध्यापनाचे काम केले. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बी.वाय.के.कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा दिली. नोकरी, घरदार, नातेवाईक अशी तारेवरची कसरत सौ.रेखाताईंनी यशस्वीपणे पूर्ण केली. अत्यंत मृदू स्वभाव,मितभाषी आणि प्रेमळ असलेल्या सौ.रेखा ताईंना कर्करोगाने गाठले. याकाळात कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा खंबीरपणे त्यांनी सामना केला. इतकेच नव्हे तर या आजारातून बरे होण्यासाठी इतरांनाही प्रेरणा आणि मार्गदर्शन केले. सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही यश पदरी पडले नाही. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, या उक्तीप्रमाणे हा प्रेमळ , आपुलकीचा झरा जीवनाच्या अथांग सागरात विलीन झाला !
     अशा दुःखाच्या प्रसंगी देखील प्रा. फडके सर स्थिर राहिले. मुलींना आणि आप्तेष्टांना त्यांनी धीर दिला.सौ.रेखाताईंच्या आजारपणात सरांनी एक पती-  जीवनसाथी म्हणून पत्नीची सेवा केली. सर सेवानिवृत्त झाले होते. मुळातच त्यांना स्वयंपाकाची आवड होती. तसेच ते उत्कृष्ट खवय्ये आहेत. पदार्थाची चव पारखण्यात पारंगत आहेत.सौ. रेखाताई नंतर किचनची सर्व जबाबदारी त्यांच्यावर पडली. आजही सर एकटे असले तरी स्वयंपाकाचा कधी कंटाळा करीत नाहीत किंवा पार्सल आणणे हे त्यांच्या हिशेबात बसत नाही. स्वयंपाकासाठी लागणारे सर्व वाणसामान संपण्यापूर्वीच ते आणून ठेवतात. आवडीने सर खरेदीसाठी स्वतः दुकानात जातात. किचन मधील सर्व वस्तूंची मांडणी पाहता गृहिणी देखील अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व वस्तू जिथल्या तेथे अत्यंत नीटनेटकेपणाने मांडलेल्या असतात. वडिलांच्या चौकशीसाठी मुलींनी फोन केलाच तर त्यांनी बनविलेल्या भाजीची रेसिपी ते त्यांना ऐकवतात.
    मुळातच सरांची सकाळ भल्यापहाटे होते. स्वतःच्या बागेतील फुले देवाला अर्पण करून यथासांग पूजा ते न चुकता करतात. वाचन आणि लेखन हा त्यांचा नित्यक्रम. ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष सर्व वर्तमानपत्रांचे वाचन केवळ वरवर नव्हे सखोल ते करतात. घरातील सर्व कामे स्वतः करतात. मंद शास्त्रीय संगीताची धून घरात सुरू असते. अशा प्रसन्न वातावरणात सर आवडीने स्वयंपाक करतात. टेलिव्हिजनवरील सर्व न्यूज चॅनेलचे अपडेट सर आवर्जून ऐकतात.
   सरांना फार पूर्वीपासून ड्रायव्हिंगची आवड आहे. काही निमित्ताने पुणे ,मुंबई किंवा बाहेरगावी जायचे झाले तर सोबत ड्रायव्हर असतो. परंतु, गाडी अनेकदा सर स्वतः चालवतात ! त्यांना गाडी अत्यंत नीटनेटकी लागते. अगदी स्वच्छ ! नीटनेटकेपणा हा त्यांच्या अनेक बाबी मधून दिसून येतो. अंगात साधा शर्ट किंवा बऱ्याचदा कुर्ता ते परिधान करतात. मंद सुगंधाच्या अत्तराची किंवा परफ्युमची त्यांना आवड आहे.
   सरांच्या घरी येणाऱ्या जाणार्‍यांचा कायम राबता असतो. घरात सर एकटे असूनही ते कधीही एकटे नसतात. सर प्रत्येकाशी आपुलकीने बोलतात. सल्ला देतात. मार्गदर्शन करतात. एक मात्र खरे की समोरच्या व्यक्तीशी किती वेळ आणि कोणत्या विषयावर बोलावे याबाबत त्यांचे ठाम मत असते. बोलता-बोलता सरांनी 'या मग', असे म्हटले की समोरच्याने जागा सोडावी. हे ठरलेले असते. 
     लोकांचे दोष किंवा दुर्गुण सामान्य माणसे इतरांजवळ म्हणजे त्या व्यक्तीच्या अपरोक्ष सांगतात किंवा कुजबुजतात. परंतु, व्यक्तीचे दोष किंवा दुर्गुण त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगण्याचे धारिष्ट्य सरांकडे आहे.अनेकांना या गोष्टीचा सुरुवातीला राग येत असावा. परंतु, पोटात एक अन ओठांवर एक, असा सरांचा स्वभाव नाही. लांबलचक उपदेश करणं हा त्यांचा स्वभाव नाही. ते थोडे परंतु, मार्मिक बोलतात. स्वतः शिस्तीचे आणि नियमांचे पालन करतात.त्यांच्या ठाई भेदाभेद नाही. शिपाई आणि अधिकारी असा भेद त्यांच्याकडे नसतो. प्रत्येकाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांच्याजवळ आहे. प्रत्येकाशी त्यांचे वागणे बोलणे सहजआत्मीयता पूर्ण असते.
    चौफेर दृष्टी, उत्तम संघटक, व्यवस्थापक, एखादी गोष्ट समजावून देण्याची क्षमता, निरलस वृत्ती, कडक अनुशासनप्रियता,सूक्ष्म निरीक्षणशक्ती त्याचप्रमाणे आईसारखी ममता, साहसी स्वभाव, तल्लख बुद्धी, नवीन गोष्ट शिकण्याची आवड, तीव्र स्मरणशक्ती, दृढनिश्चयी यासारख्या अनंत गुणांनी प्रा. फडके सरांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसते.
   कवी विनायक यांनी म्हटल्याप्रमाणे," पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ ! " प्रा. फडके सरांसारखे गुणी नेतृत्व लाभलेल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीतील सर्व शिक्षकांचा भावी काळ खरोखरच उत्तम राहील यात शंका नाही.
   सरांनी नुकतेच ७१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. सदैव संस्था, शाळा हित जपणाऱ्या या स्वयंसेवकास उदंड आयुरारोग्य लाभो ह्याच सस्नेह सदिच्छा!
    
श्री.शैलेश पाटोळे 
उपशिक्षक 
पेठे विद्यालय,नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
   


  
   
   

No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...