(श्री.भास्कर- आबा कोठावदे)
नमस्कार,
आज - काल नव्या पिढीच्या समोर आदर्शांची वानवा आहे, असे शब्द कायम कानावर पडतात. मात्र समाजात असे अनेक आदर्श आहेत की, ज्यांच्या कर्तुत्वावर नजर टाकली तरी नवी पिढी योग्य मार्गाने उत्कर्ष साधू शकेल. परंतु त्यासाठी आपली नजर पारखी असली पाहिजे. अंत:चक्षू जागरूक असले पाहिजेत. म्हणजे अशा आदर्श व्यक्ती आपल्या सहज नजरेस पडू शकतात. भरकटू पाहणाऱ्या नव्या पिढीला योग्य दिशा दर्शन होऊ शकते. सत्याच्या मार्गावर चालून इतरांची फसवणूक अथवा लबाडी न करता देखील यशस्वी होता येऊ शकते.याकरिता गरज असते ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि आत्मविश्वासाची ! पाच- सात वर्षांपूर्वी अशाच एका कर्तृत्वसंपन्न व्यक्तीशी माझी ओळख झाली.एकंदरीतच त्यांचा अनुभव,आचार विचार, व्यवहार, व्यक्तिमत्व या सर्वांनी मन आकर्षित झाले. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून आशयाचा केवळ अंदाज केला जाऊ शकतो. त्याप्रमाणे मनुष्याच्या केवळ दिसण्याने त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची ओळख होणे शक्य नसते. व्यक्तीच्या संपर्कातून त्याचे अंतरंग जाणून घेण्यास मदत होते.
मी ज्यांच्याविषयी बोलतो आहे, ते म्हणजे सहकार क्षेत्रातील अग्रणी श्री.भास्कर (आबा) कृष्णा कोठावदे !
शून्यातून विश्व निर्माण करणे, ही म्हण साहित्यात ऐकणे आणि प्रत्यक्षात अनुभवणे यात फरक आहे. आबांच्या कार्य कर्तुत्वावर नजर टाकल्यानंतर या म्हणीची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. १५ मे १९४९ रोजी नाशिक जिल्ह्यातील पश्चिम उत्तर भागातील आदिवासीबहुल कळवण तालुक्यातील जुनी बेज या गावी आबांचा जन्म झाला. वडील श्री. कृष्णाजी भिकाजी कोठावदे, हे त्या काळी व्हर्णा क्युलर फायनल परीक्षा उत्तीर्ण झालेले होते. त्यामुळे शिक्षणाचा वारसा जन्मजात त्यांना मिळाला होता. आई सौ.राधाबाई अडाणी असल्या तरी अत्यंत संस्कारी होत्या. आबांचे वडील सावकाराकडे मुनीमजी म्हणून हिशोब लेखनाचे काम करीत. कुटुंबात चार बहिणी तीन भाऊ, आई वडील असा परिवार होता. उत्पन्नाचेेेे दुसरे साधन नव्हते.त्यामुळे घरची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक होती.
आबांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मोठ्या बहिणीकडे अंतापूर ता. बागलाण येथील प्राथमिक शाळेत झाले.पुढे आठवी ते अकरावी पर्यंत शिक्षण मूळ बेज या गावी महात्मा फुले हायस्कूल मध्ये झाले. शिक्षण घेता- घेता एका किराणा दुकानात सकाळ संध्याकाळ काम ते करीत. हळूहळू कुटुंबाच्या गरजा वाढत गेल्या. रोजगार फारसा मिळत नसे. म्हणून रोजगारासाठी त्यांनी गाव सोडायचे ठरवले. जुनी मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी नाशिक गाठले.
नाशिक जिल्ह्याचे ठिकाण, पूर्णपणे अनभिज्ञ शहर, ओळख नाही, परिचय नाही. परंतु काही केले तरी रोजगार मिळवणे कुटुंबासाठी अत्यावश्यक होते. राहण्याची सोय नव्हती. जेवण कुठे मिळेल, कसे मिळेल, मिळेल की नाही, याची शास्वती नव्हती. खिशात दमडी देखील नव्हती. ईश्वराच्या भरवश्यावर आणि स्वतःच्या आत्मविश्वासाने आबांनी नाशिक शहर गाठले.
त्यावेळी, दिवसा ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम शोधत. रात्रीच्या वेळी एस.टी. स्टॅंडवर झोपत असत. कामाच्या शोधात असताना त्याकाळी नासिक मध्ये प्रसिद्ध असलेल्या श्री.वालजीभाई पटेल यांच्या फॅक्टरीत सायकलने घरोघरी साबण पोचविण्यासाठी डिलिव्हरी बॉयची नोकरी मिळाली. त्यातून ५० रुपये महिना मिळत असे. दिवसभर राबराब राबायचे. मिळेल तिथे मिसळ पाव खाऊन रात्री पुन्हा एस.टी. स्टँड वर झोपायला जायचे. नाशिकमधील प्रारंभीचे ६२ दिवस त्यांनी असे काढले. दरम्यानच्या काळात त्याकाळी प्रसिद्ध असलेल्या गावकरी प्रेसचे श्री.दादासाहेब पोतनीस यांनी पहाटे घरोघरी जाऊन पेपर वाटण्याचे काम दिले. पहाटे उठून पेपर टाकण्याचे काम, दिवसभर घरोघरी साबणाची डिलिव्हरी करणे, यामुळे त्यांना प्रचंड थकवा येई. परंतु, आयुष्यात काहीतरी चांगले करून दाखवायचे असेल तर त्यांना थांबून चालणार नव्हते. शरीराने थकत असले तरी मनाने ते ताजेतवाने राहत असत. दरम्यानच्या काळात अकरावी मॅट्रीकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले. मिळणाऱ्या पगारातून संध्याकाळी टायपिंगचा क्लास त्यांनी लावला.
पहाटे एस.टी.स्टॅन्ड वरून उठायचे, पायी चालत वकील वाडी, तेथून रविवार कारंजा, गावकरी प्रेस मधून पेपर टाकण्याचे काम करून गंगेवर जायचे. एकच ड्रेस अंगावर असल्याने आंघोळ झाल्यावर कपडे वाळले की पुन्हा श्री.वालजीभाई पटेल यांच्या दुकानात कामासाठी हजर व्हायचे. असा त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्यातील प्रामाणिकपणा आणि सचोटी या गुणांना हेरून वालजीभाई यांनी साबण विक्रीवर काही प्रमाणात कमिशन द्यायला सुरुवात केली. तरी ते पैसे कुटुंबासाठी पुरेसे नव्हते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढे शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती. परंतु पैशाअभावी ते शक्य नव्हते. म्हणून त्यांनी नाशिक सोडले आणि मालेगाव गाठले.
मालेगाव येथे कापडाच्या एका व्यापाऱ्याकडे नव्वद रुपये महिना नोकरी स्वीकारली. काही मित्र मिळून खोली करून ते राहू लागले. रात्रंदिवस ते मेहनत करीत. मिळेल ते अन्न पोटात ढकलत. सात-आठ महिन्यांच्या काळातच त्यांना अनियमित जेवणामुळे अल्सरचा त्रास सुरू झाला. त्या काळात सुप्रसिद्ध डॉ. बळीराम हिरे यांच्याकडे ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट बरोबर त्यांनी कापड दुकानातील नोकरी सोडण्याचा आपुलकीचा सल्ला देखील दिला. आबा पुन्हा आपल्या मूळ गावी बेज येथे परतले. जुन्या किराणा दुकानात काम करू लागले. आजारी असले तरीदेखील कुटुंबासाठी काम धंदा करणे अत्यावश्यक होते. आता त्यांचे वय १८ वर्षे झाले.
दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन या शासन पुरस्कृत सहकारी संस्थेची रोजगार बाबतची जाहीरात वर्तमानपत्रात आल्याचे कुणीतरी सांगितले. त्याकाळी राजकारणात सुविख्यात असलेले श्री.पंडित धर्माजी पाटील यांनी शब्द टाकल्यामुळे नोकरी मिळाली. नाशिक मधील मालेगाव स्टँड येथे ते कार्यालय होते. रुपये १८५ प्रतिमाह पगार सुरू झाला. नोकरी फिरतीची होती. काही कालावधीनंतर दोन पैशांची आवक सुरू झाली. परंतु दुर्दैव असे १९६८ मध्ये शासनाने ही योजना बंद केली. नोकरी जाण्याची वेळ आली. दरम्यानच्या काळात चुलत भावाच्या ओळखीने गिरणारे येथील राईस मिल वर प्रतिनियुक्तीने नोकरी मिळाली. तेथे श्री. नारायणराव पिंगळे हे मुख्य व्यवस्थापक होते. त्यांच्या हाताखाली काम करीत असताना मार्केटिंग या विषयात रुची निर्माण झाली. श्री.पिंगळे यांनी आबांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.
काही दिवसांनी राईस मिल देखील बंद पडली. त्याकाळी श्री.बाबुराव भारस्कर हे समाज कल्याण मंत्री होते. महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण बोर्डाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी नाशिक मध्ये एक शाळा सुरू केली होती. त्यांच्याकडे नोकरीचा अर्ज आबांनी केला. सुंदर,सुवाच्य अक्षरातील अर्ज पाहून श्री. भारस्कर यांनी लेखनिकाची नोकरी आबांना दिली. सर्व काही आलबेल सुरू होते.
१९६९ मध्ये नाशिकला महापूर आला. सगळीकडे रोगराई पसरली. लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागले. आबांना टायफाईड नंतर न्यूमोनिया झाला. ते शाळेत उपस्थित राहू शकत नव्हते. दरम्यानच्या कालावधीत शाळेत काहीतरी विपरीत घडले आणि त्याचे खापर हितशत्रूंनी आबांवर फोडले. आपल्यावर झालेला खोटा आरोप स्वाभिमानी असलेल्या आबांना सहन झाला नाही. त्यांनी ओळख झालेल्या एका वकिलाकडून कोर्ट केस संस्थेविरुद्ध दाखल करण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराच्या विरोधात केस दाखल करण्याचे धारिष्ट्य आबांनी दाखविले. या गोष्टीचे आमदार श्री. बाबुराव भारस्कर यांना फार कौतुक वाटले. वेगळ्या पद्धतीने केस मागे घेण्यास विनंती केली. त्यानंतर आबांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आमदार भारस्कर यांनी आबांना मुंबईला नेले. त्यांच्या निवासी स्वीय सहाय्यक म्हणून आबांची नेमणूक केली. आबांकडे असलेला प्रामाणिकपणा, हुशारी, अन्याया विरुद्धची चीड, स्वाभिमान या गुणांमुळे आमदार भारस्कर प्रभावित झाले होते. मला अशाच तरुणाची गरज आहे,असे श्री.भारस्कर म्हणाले. श्री भारस्कर यांनी आबांना इंग्रजी बोलण्यासाठी तसेच आवश्यक पत्र व्यवहार करता येण्यासाठी क्लास लावून दिले. मेहनतीने ते शिकले. १९७० ते १९७२ यादरम्यान आबांनी आपल्या कामाने श्री.भारस्कर यांचे मन जिंकले. पत्राचे ड्राफ्टिंग आणि इंग्रजीतून संभाषण यावर त्यांनी कमांड मिळवली.
पुन्हा दुर्दैवाच्या चक्रात आबा सापडले. त्याकाळी झालेल्या निवडणुकीत आमदार भारस्कर यांची आमदारकी गेली. परंतु,श्री.भारस्कर यांनी आबांना नोकरीवरून न काढता नाशिकच्या शाळेत क्लार्क म्हणून पुन्हा पाठविले. स्वीय सहाय्यक म्हणून आमदाराबरोबर काम करत असताना आणि क्लार्क म्हणून शाळेत काम करत असताना आबांना तडजोड करणे शक्य होत नव्हते.
दरम्यानच्या काळात १९७३ मध्ये सटाणा तालुक्यातील अंबासन येथील सौ.मालतीबाई यांच्याशी आबांचा शुभविवाह झाला. गृहलक्ष्मी सुखी - समाधानी आणि आनंदी स्वभावाची होती. काटकसरीची मुळातच त्यांना सवय होती. कमी पगारात उत्तम संसार त्यांनी केला. आबांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. सर्व प्रकारच्या परिस्थितीत विशेष करून वाईट दिवसात देखील आबांना मानसिक आधार दिला.
१९७५ यावर्षी काही कारणामुळे शाळा बंद होण्याच्या स्थितीत आली. कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनामार्फत झाले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या डी.एस. कोठारी कन्या शाळेत क्लार्क म्हणून आबांचे समायोजन झाले होते. परंतु आबांनी आता नोकरी न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. श्री.नारायणराव पिंगळे,आमदार श्री.बाबुराव भारस्कर, काही मित्र परिवार यांचे मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य आणि स्वतःमधला आत्मविश्वास यांच्या जोरावर मालेगाव स्टँड येथे श्री.भास्कर ब्रदर्स- गव्हर्मेंट अँड इंडस्ट्रीज ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन ही स्वतःची फर्म सुरू केली. याकामी स्वतःचा भाऊ त्यांच्याबरोबर होता. दोघांनी मिळून प्रचंड मेहनतीने हे फर्म नावारूपाला आणले. अवघ्या पाच वर्षांच्या काळात ट्रान्सपोर्टसाठी आवश्यक असणाऱ्या नऊ ट्रक आबांनी स्वतःच्या मालकीच्या घेतल्या. व्यवसाय बहरला. दोन पैसे गाठीशी राहू लागले. त्याबरोबर थोडा लौकिकही वाढला. परंतु,दुर्दैवाचे दुष्टचक्र काही थांबेना. ट्रान्सपोर्ट व्यवसायाला उतरती कळा लागली. तोट्यात सर्व गाड्या विकाव्या लागल्या. ट्रान्सपोर्टचा व्यवसाय बंद पडला.
परंतु परिस्थितीपुढे हार न मानणाऱ्या आबांनी श्री.भास्कर ब्रदर्स - जनरल मर्चंट अंड कमिशन एजंट नावाचे दुकान थाटले. साधारण १९९४ पर्यंत हा व्यवसाय ते करीत होते. हा व्यवसाय भरभराटीस आला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये यानिमित्ताने फिरावे लागत होते. हळूहळू वयाप्रमाणे त्यांना फिरणे आता शक्य होत नव्हते. म्हणून भावाकडे या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी देऊन त्यांनी या व्यवसायातून काढता पाय घेतला.
नंतर रियल इस्टेट कन्सल्टंट या व्यवसायाची कल्पना त्यांना आली आणि एक छोटेसे ऑफिस मध्ये त्यांनी रियल इस्टेट कन्सल्टंट म्हणून कामाला सुरुवात केली. स्वतःची हुशारी आणि चिकाटी या गुणांमुळे या व्यवसायातही त्यांना उत्तम आर्थिक लाभ झाला. तसेच विविध व्यवसायांच्या निमित्ताने नाशिक आणि जिल्हाभरातील अनेक लोकांशी संपर्क वाढला. त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व लोकांना आपलेसे वाटत होते.
१९९९ यावर्षी त्यांचा मोठा मुलगा श्री. लक्ष्मीकांत डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग पूर्ण करून नाशिक मध्ये महिंद्रा कंपनीत नोकरीस लागले. मुलाला नोकरी मिळाल्यामुळे आबांना आधार वाटू लागला. २००२ मध्ये दुसरा मुलगा श्री.हितेंद्र बी.ई.मेकॅनिकल पूर्ण करून पुण्यात नोकरी करू लागला. तिसरा मुलगा श्री.अविनाश यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील डिप्लोमा पूर्ण केला. परंतु बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील वडिलांचे गुण उपजतच त्यांच्यात असल्याने इन्शुरन्स क्षेत्रात श्री.अविनाश यांनी जम बसविला. तीनही मुले स्वतःच्या पायावर उभी राहिली. वडिलांनी केलेले कष्ट, अपार मेहनत याची जाणीव मुलांना आहे. आबांना मुलांचा मोठा आधार मिळाला. सौ.सुवर्णा ही आबांची कन्या बी.सी.एस. पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून,आपल्या कुटुंबाबरोबर ठाणे येथे स्थायिक झाली आहे. आबांनी केलेल्या अपार मेहनतीमुळे त्यांचे कुटुंब आज स्थिरस्थावर होऊ शकले आहे.
स्वतःमध्ये असलेला आत्मविश्वास आणि त्यांच्यामध्ये असलेले संभाषणाचे कौशल्य, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि मारवाडी भाषेवर असलेले प्रभुत्व, मार्केटिंगचा प्रचंड अनुभव, दांडगा जनसंपर्क, काटकसर या सर्व गुणांमुळे आबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. हे करत असताना अनेक समवयस्क मित्रांनी त्यांना प्रोत्साहन दिले. श्री.उखा शंकर पगार, श्री.उत्तम पाटील हे त्यांचे बालमित्र कायम त्यांच्याबरोबर राहिले.श्री.कारभारी जयराम पगार ,श्री.निंबा मोतीराम खैरनार यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने आर्थिक सहकार्य मुक्तहस्ताने केले. श्री.बाबुराव भारस्कर यांचे खूप मोठे योगदान आबांना लाभले.
१९८१ मध्ये आबांनी प्रत्यक्ष बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला . १९८२ साली ना.म.को. बँकेच्या प्रशासक मंडळाच्या सदस्यपदी शासनाकडून आबांची नेमणूक झाली. तेव्हा खऱ्या अर्थाने सहकार चळवळीशी आबा जोडले गेले. १९८९ साली श्री.हुकुमचंद बागमार उर्फ काका यांच्या पॅनल मधून ना.म.को. बँकेची निवडणूक आबा लढले आणि बहुमताने विजयी झाले. तेव्हा पहिल्यांदा ना.म.को.बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणून निवड झाली. १९९४ मध्ये पुन्हा निवडणूक होऊन ना.म.को. बँकेचे चेअरमन पदाची धुरा आबांच्या खांद्यावर पडली. ना.म.को. बँक आणि इतर पतसंस्थांच्या माध्यमातून आबांचे संपर्क क्षेत्र अधिक रुंदावले. राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील जाणकारांशी आबांचे ऋणानुबंध जुळले. मंत्रालयातील संपर्क वाढला. याच दरम्यान त्या काळातील नाशिकचे आमदार श्री. टी.एस.दिघोळे यांनी स्वतःची पतसंस्था काढण्याबाबत पत्र मिळवून दिले.
१ मार्च १९९५ रोजी आबांनी सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड, नाशिक ची मुहूर्तमेढ रोवली. ही पहिली मुख्य शाखा रविवार पेठेत सुरू झाली. सहकार क्षेत्रातील आणि बँकिंग व्यवसायातील अनुभवी लोकांशी असलेला संपर्क यामुळे लवकरच सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था भरभराटीला आली.२००२ सालच्या ना.म.को. बँकेच्या निवडणुकीत आबा पुन्हा चेअरमन झाले. याची परिणीती म्हणून महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन ची निवडणूक लढवण्याची संधी आबांना मिळून,उत्तर महाराष्ट्राच्या चार जिल्ह्यातून प्रचंड संघर्ष करत, अंतर्गत विरोधाला न जुमानता, आबा बहुमताने विजयी झाले. आणि संचालक पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पुढे २००७- २००८ मध्ये महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन चे उपाध्यक्ष तर २००९- २०१० मध्ये फेडरेशनचे अध्यक्षपद आबांनी भूषविले. सध्या आबा या फेडरेशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान ४ जानेवारी २००१ रोजी सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी शाखा पवन नगर, सिडको, नाशिक येथे,२० जून २००४ रोजी त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे तिसरी शाखा, २०१४ मध्ये चौथी शाखा विंचूर येथे तर २०१५ मध्ये सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या पाचव्या शाखेचे उद्घाटन दिमाखात पार पडले. सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त डिव्हीडंट देणारी आणि तीन हजार सभासद असलेली सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्था अग्रक्रमावर आहे.
सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेच्या एकूण नफ्यातील रिझर्व फंडातून म्हणजेच धर्मदाय निधीमधून आबांनी सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत किडझी मॉन्टेसरी स्कूल आणि कॅडेन्स प्राथमिक विद्यामंदिर ही शाळा मुंबई आग्रा महामार्गलगत सुरु केली आहे. विशेष म्हणजे शाळेची जागा एका दानशूर विश्वस्तांनी मोफत दिली. कोणत्याही प्रकारचे कर्ज न घेता शाळेची दोन मजली, सर्व सोयींनी युक्त इमारत उभी आहे. या शाळांच्या रूपाने शैक्षणिक क्षेत्रात देखील आबांनी कर्तुत्व दाखविले आहे.
लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, बोलण्यातील कसब आणि माधुर्य, व्यवसायातला दांडगा अनुभव, बँकिंग क्षेत्रावर असलेली मजबूत पकड आणि आत्मविश्वास या जोरावर आबासाहेबांनी लोकमाणसात आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बँकिंग फेडरेशन मुळे बँकॉक,पटाया, मलेशिया, मकाऊ इ. अनेक देशात पतसंस्थांच्या परिषदांना हजर राहून मार्गदर्शनाची संधी आबांना मिळाली. देशभरातील विविध राज्यांमध्ये बँकिंग क्षेत्रातील जाणकार म्हणून आबांना निमंत्रित केले जाते.
बँकिंग क्षेत्रात आणि पतसंस्थांच्या क्षेत्रात आबांनी केलेल्या गौरवास्पद आणि उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक छोट्या-मोठ्या सामाजिक, आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थांनी आबांना गौरविले आहे. सारस्वत बँकेचे श्री.एकनाथराव ठाकूर स्मृती पुरस्काराने दिल्ली येथे झालेल्या समारंभात आबांना गौरविण्यात आले. नाशिक जिल्ह्याचा मानाचा गिरणा गौरव, संत गाडगेबाबा ट्रस्ट तसेच शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराज ट्रस्टचा जीवनगौरव पुरस्कार देखील आबांना प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे २००२ यावर्षी नाशिक जिल्ह्यातील पतसंस्थांनी बँकिंग फेडरेशनच्या वतीने कालिदास कलामंदिरात तत्कालीन खासदार.श्री.उत्तमराव ढिकले आणि प्रा. सुरेश मेणे यांच्या अध्यक्षतेखाली आबांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
कोणत्याही नवीन क्षेत्रांमध्ये यश मिळवायचे झाले तर प्रोत्साहन देणारे आणि सहाय्य करणारे हात महत्त्वाचे असतात. त्यात बालपणापासून असलेले मित्र आणि मैत्रिणी यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व क्षेत्रांमध्ये आबांचा दांडगा संपर्क आहे. कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेण्याचा त्यांचा स्वभाव आहे. जोपर्यंत यश पदरात पडत नाही तोपर्यंत संघर्ष करीत राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे. म्हणूनच एस.टी. स्टँड वरील संघर्षापासून ते फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष पर्यंतचा प्रवास ते पूर्ण करू शकले आहेत.जीवनातील छोट्या-मोठ्या दुःखाच्या प्रसंगांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिले. खचून गेले नाहीत. शालेय जीवनामध्ये शिक्षकांनी दिलेले उपदेश आयुष्याला कलाटणी देऊ शकतात.यावर आबांचा विश्वास आहे. त्यांच्या श्री.ए.डी.बच्छाव सरांनी म्हटले होते," ध्येय चांगले ठेव. परिस्थितीवर अजिबात जाऊ नको.आज तुझ्या पायात चप्पल नाही. चप्पल घालण्याची इच्छाशक्ती मनात ठेव. परंतु,इतरांकडे भिक मागू नको. जोपर्यंत ध्येय पूर्ण होत नाही. तोपर्यंत थांबू नको." असा दिलेला सल्ला त्यांनी आज पर्यंत मनात जपून ठेवला आहे. बालपणीचे मित्र श्री.नारायण मेतकर, श्री.रामचंद्र पगार यांनी वेळोवेळी अनेक प्रकारचे सहकार्य करून आत्मबल वाढविण्याचा प्रयत्न केला.
आबांच्या ३१ व्या वर्षीच वडिलांचे निधन झाल्यामुळे कुटुंबाची सर्व प्रकारची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. सर्व बहिणींची लग्ने, भावांची लग्ने इ. जबाबदारी आबांवर पडली. आबांंना पुढाकार घेणे क्रमप्राप्त होते.
जोपर्यंत आपल्या खांद्यावर जबाबदारीचे ओझे येत नाही. तोपर्यंत आपण प्रयत्न करायला सुरुवात करीत नाही. असे प्रामाणिक मत आबांचे आहे. आजकालच्या तरुणांनी आई-वडिलांच्या सावलीत आयुष्य आरामात न जगता, व्यवसायाकडे वळले पाहिजे. संघर्ष केला पाहिजे. स्वतःच्या कर्तुत्वाने व्यवसायिक क्षेत्रांमध्ये खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. नोकरीवर विसंबून राहता कामा नये.व्यवसाय स्वतःला सिद्ध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. व्यवसाय करीत असताना त्यातले बारकावे स्वतः अभ्यासले आणि अनुभवले पाहिजे.तरच आपण व्यवसायात यशस्वी होऊ शकतो. केवळ खुर्चीवर बसून , इतरांना आदेश देऊन व्यवसायात यश प्राप्त होत नाही.
आबांनी हे सर्व साम्राज्य स्वकष्टाने उभारले. स्वाभिमानी आणि स्वावलंबी असलेले आबा इतरांचे उपकार मात्र कधीही विसरत नाहीत. ते कायम अशा लोकांच्या ऋणात राहणे पसंत करतात. बँकिंग आणि पतसंस्थांच्या माध्यमातून अनेक गरजू आणि होतकरू तरुणांना आबांनी त्यांच्या पंखात बळ भरले आहे. शक्य तेवढी मदत ते गरजूंना करीत असतात. ज्या कष्ट आणि विपरित परिस्थितीतून त्यांना पुढे यावे लागले, अशी परिस्थिती इतरांवर येऊ नये म्हणून आबा नेहमी प्रयत्न करीत असतात.
सर्वे sपि सुखीन: संतु सर्वे संतु निरामय:
सर्वे भद्राणि पश्यन्तु ,न कश्चित् दुःखम् आप्रूयात l
अर्थात,सर्वजण सुखी असोत. सर्वजण निरोगी असोत. सर्वांचे नेहमी भले व्हावे. कोणालाही दुःख नसावे .अशी उदात्त भावना आबांची या क्षणी आहे.
एक अभ्यासू,जाणकार ,अनुभवी, स्वाभिमानी, स्वावलंबी, कामसू, अंगी चिकाटी असलेले, संकटांचा सामना करणारे, संधीचे सोने करणारे, समदृष्टी असणारे ,आत्मविश्वासू, निर्व्यसनी, दानशूर ,कृतज्ञ, नाविन्याचा ध्यास असणारे,सहकार क्षेत्रातील अग्रणी ,सर्वांसाठी मार्गदर्शक असलेले,श्री.भास्कर (आबा) आज दि. १५ मे रोजी ७३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आपल्याला निश्चितच अभिमान आहे.
सध्या श्री.आबासाहेब, सुवर्णा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन चे संचालक, नामको बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन आणि संचालक, सुवर्णा चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष, सन.२०१७-२०२० व २०२०- २०२३ या कालावधीसाठी नाशिक मधील अग्रगण्य शैक्षणिक संस्था नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत.तसेच नाशिक शहरातील सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर व शिशुवृंद शाळांचे शालेय समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
आबा,आपणास निरामय दीर्घआयुरारोग्य लाभो. आपला माया- ममता रुपी सहवास आणि आशीर्वाद सर्वांना लाभो.याच सदिच्छा!
लेखन :
श्री.शैलेश पाटोळे
पेठे विद्यालय,नाशिक
दि.१४ मे (अक्षय तृतीया)
९८६०७४९७९०
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
3 comments:
आबांचा जीवनप्रवास नवीन पिढीला स्फूर्ती देणारा आहे.थक्क करणारा आहे.सर,नेहमीप्रमाणेच आपला हा आबांच्या जीवनावरील लेख जीवनात हार मानणाऱ्यासाठी नव संजीवनी आहे.....👍👌---
आबांचे कर्तृत्व वादातीत. पाटोळे सर उत्तम लेखन
एखाद्या विषयी ईतकी आपुलकी दाखवुन त्यांच्या खडतर यशस्वी जीवन प्रवास मांडला जो नवीन पीढी ला प्रेरणा देणारा ठरेल
Post a Comment