Friday, March 22, 2024

श्री.कैलास पाटील :सेवानिवृत्ती समारंभ

श्री.कैलास पाटील,मुख्याध्यापक पेठे विद्यालय,नाशिक
                  सेवानिवृत्ती समारंभ

   चन्दनं शीतलं लोके , चन्दनादपि चंद्रमा : l
    चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधू संगति : ll

चंदनाचा लेप शितल मानला जातो. चंद्राचा प्रकाश त्यापेक्षा शितल असतो; परंतु सज्जन व्यक्तींची संगती आपल्याला शितलता आणि शांती दोन्ही प्रदान करत असते. या उक्तीप्रमाणे शांत, सुस्वभावी, अतिशय सज्जन, निगर्वी आणि हसतमुख असणाऱ्या आपल्या पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कैलास पाटील दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी नियत शासकीय वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.
   राजा कालस्य कारणम् यानुसार राज्याची प्रगती अथवा अधोगती राजाच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. त्याच न्यायाने मुख्याध्यापक हा शाळेच्या गती अधोगतीस कारणीभूत असतो. आपल्यातील कौशल्यामुळे पाटील सरांनी शिक्षकांमध्ये आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यांच्या मुख्याध्यापक कारकिर्दीत शाळेची सर्वांगाने प्रगती झाली.
  मुख्याध्यापक हा शिक्षक, संस्था, शासन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असतो.त्यांत सुवर्णमध्य साधणारा एक घटक असतो.त्यांच्याकडे अनुभवाची आणि विचारांची परिपक्वता असली तरी मुख्याध्यापक शाळेला नंदनवन बनवू शकतात. उत्कृष्ट सारथ्य असेल तर शाळेचा रथ योग्य प्रगतीपथावरून ध्येयपूर्तीकडे गेल्याशिवाय राहत नाही.या अर्थाने श्री. पाटील सरांनी उत्तम सारथ्य आणि नेतृत्व केले,असे निश्चितपणे म्हणता येते.
  खरे तर श्री पाटील सर अनेक अर्थाने भाग्यवान ठरले.नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सवी वर्षात जवळपास तीन सलग वर्षे पेठे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. १०० वर्षांतील अतिशय नामवंत अशा मुख्याध्यापकांच्या पंक्तीत बसण्याचा योग त्यांना लाभला. स्वतः पाटील सर पेठे हायस्कूलचे माजी विद्यार्थी!  एक माजी विद्यार्थी, एक शिक्षक आणि नंतर शतक महोत्सवी वर्षातील शाळेचे मुख्याध्यापक हा दुग्ध शर्करा योग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी टाकलेल्या विश्वासामुळे जुळून आला. अर्थात हा विश्वास पाटील सरांनी आपल्या मेहनतीने सार्थकी लावला यात शंका नाही! एक माजी विद्यार्थी शतक महोत्सवी वर्षात पेठे विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळवणारे पाटील सर शतकांतील एकमेव उदाहरण असावेत! 
  श्री.कैलास पाटील सर मूळचे देशमुखवाडी (जळगाव)चे; परंतु त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने नाशिकला स्थायिक झाले. त्यांचे वडील कै. रघुनाथराव पाटील हे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या पी.ई. स्कूलमध्ये इंग्रजी विषयाचे व्यासंगी शिक्षक होते.इंग्रजी आणि राज्यशास्त्र या दोन विषयांत पदव्युत्तर पदवी अर्थात एम.ए. त्यांनी केले. प्रारंभी नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नवीन इंग्रजी शाळा ओझर येथे त्यांनी काही काळ तात्पुरती शिक्षकाची नोकरी केली. ते अतिशय व्यासंगी अध्यापक, शिक्षक संघटनांमध्ये सक्रिय कार्यकर्ते, एक विश्वासूमित्र आणि जबाबदार व्यक्ती म्हणून लौकिकास प्राप्त होते. जिल्हा आणि राज्यस्तरावरील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा वावर असे. नोकरी करीत असतानाच आवड म्हणून त्यांनी एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण केले. ते घरजावई म्हणून गेलेले होते.त्यांची आर्थिक स्थिती तशी चांगली होती.
  गोदेचा शांत परिसर, गोरे राम, एकमुखी दत्त इत्यादींच्या सहवासात मुलाबाळांवर उत्तम संस्कार त्यांनी घडविले. मंदिर परिसरात कायमच गुंजणारे भजन कीर्तनाचे ध्वनी कानी पडून मुलं घडत राहिली. त्यांना कैलास, विलास आणि सुहास अशी तीन अपत्ये झाली. पत्नी सौ शकुंतलाबाईंनी त्यांना यथार्थ अशी साथ दिली.
  सारे काही आलबेल असताना २३ जुलै १९८२ ला श्री.कैलास पाटील सर दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे आकस्मित अपघाती निधन झाले. कुटुंबाचा आधारवड हरपला.आई सौ. शकुंतलाबाईंनी घर सावरले. मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. कुटुंबाच्या अशा दुःखाच्या प्रसंगी वडिलांचे मित्र श्री.रमाकांत देशपांडे, श्री.नानासाहेब बोरस्ते इ.नी कधी एकटेपणा वाटू दिला नाही. मदतीसाठी कायमच ते तत्पर राहिले.
  पाटील सरांनी प्रारंभिक सहावी पर्यंतचे शिक्षण रूंग्ठा हायस्कूल मधून घेतले. सातवीत त्यांनी पेठेत प्रवेश घेतला. गुणवत्तेसाठी त्याकाळी पेठे हायस्कूलचा सगळीकडे डंका वाजत होता. येथे त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त खेळ आणि कलेची आवड निर्माण झाली. अनेक खेळांत सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. वेटलिफ्टिंग, सायकलिंग इत्यादी खेळ ते खेळत. विज्ञान गणितासाठी वि.भा. देशपांडे, इंग्रजीसाठी का.विं.जोशी, श्री. गुप्ते सर, श्री. एकतारे सर, चित्रकलेचे सोनार सर यांनी विषयांच्या अभ्यासाबरोबरच शिस्तीचा संस्कार केला. एन.सी.सी.चे श्री.गोरवाडकर सरांचा विशेष प्रभाव सर्व मुलांवर असायचा. कारण पोलीस अधिकाऱ्यांसारखा दिसणारा पोशाखाचे आकर्षण मुलांना होते. गोरवाडकर सर अत्यंत शिस्तप्रिय होते. एन.सी.सी.मुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तसेच निसर्ग भ्रमंतीची आवड निर्माण झाली;  जी पाटील सरांनी आजपर्यंत जपली आहे. एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी उत्तम परेडचे पारितोषिक मिळवल्यावर गोरवाडकर सरांनी मुलांना बक्षीस म्हणून म्हसरूळ.. चामरलेणी परिसरात ट्रेकिंगसाठी, फिरण्यासाठी नेले होते. त्या परिसराने सरांच्या मनात घर केले. योगायोगाने पुढे याच परिसरात पाटील सर राहायला गेले. एन.सी.सी.च्या गोरवाडकर सरांची सायलेंट ड्रिल... केवळ शिट्टीवर कवायत म्हणजे शिस्त आणि संयमाची परीक्षा असायची.अशी ड्रिल  दुर्दैवाने आता पाहायला मिळत नाही. इयत्ता नववीत असताना विद्यार्थ्यांच्या प्रबंधांचे प्रकाशन झाले. त्याचे मुखपृष्ठ चांद्रयान या विषयावर पाटील सरांनी रेखाटले .सर्वांनी त्याचे कौतुक केले होते.
  शाळेच्या गीतमंचात तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये केळकर सर, भाटे सर आवर्जून सहभागी करून घेत. एकदा गृहपाठ केला... असे खोटे बोलल्यामुळे वि.भा. देशपांडे यांनी यथेच्छ चोप दिला होता. त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, गणिताची गोडी निर्माण झाली. पुढे आयुष्यात खोटे बोलण्याची हिंमत झाली नाही. शाळेतील शिक्षक अभ्यासू, अत्यंत कडक शिस्तीचे तसेच गुणग्राहक होते. मुलांवर ते तितकेच प्रेम देखील करीत. अनेक नामवंत विद्यार्थी पाटील सरांच्या बरोबर शाळेत शिकत होते. अनिल बोरा.... जे पुढे अमेरिकेच्या अध्यक्षांचे आर्थिक सल्लागार झाले.साधना मिसळचे श्री.नितीन आमले, सिएट टायर्सचे , श्रीनिवास पत्की , न्यू इरा स्कूलचे अजय बोरा इत्यादी अनेक नामवंत विद्यार्थी पुढे लौकिक प्राप्त झाले.
  अकरावीला बी.वाय.के कॉलेजमध्ये सरांनी प्रवेश घेतला. तेथे सौ.रेखाताई फडके, सौ.जामदार मॅडम यांनी अत्यंत जिव्हाळ्याने मार्गदर्शन केले. कॉलेजला नियमित हजेरी लावत असल्यामुळे ते शिक्षकांचे आवडते विद्यार्थी ठरले. पाटील सरांची प्रकृती नाजूक आणि वडील हयात नाहीत याची शिक्षकांना कल्पना असल्यामुळे शिक्षक त्यांच्याकडे विशेष लक्ष देत. आस्थेने विचारपूस करीत . प्राध्यापकांमुळे अभ्यासाची त्यांना गोडी निर्माण झाली.
  कॉलेज आणि अहिल्याराम व्यायामशाळा असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. व्यायामाची सवय त्यांना झाली होती. बी.कॉम. फायनलला असताना त्यांचा विवाह सौ.लताबाई यांच्याशी झाला. त्याचदरम्यान वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र, सहकारी, पुढे शिक्षक आमदार म्हणून नावारूपास आलेले आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी एन.डी.एस.टी सोसायटीत क्लर्कची नोकरी मिळवून दिली. तेथे शिक्षकांच्या भेटीगाठी होत.त्यातून शिक्षक व्हावे, अशी इच्छा त्यांच्या मनात घर करू लागली. पुढे ती नोकरी सोडून उस्मानाबादच्या कळंब महाविद्यालयात बी.पी.एड साठी कैलास आणि विलास दोन्ही भावांनी प्रवेश घेतला. मुळातच खेळ, संगीत आणि कलेची आवड असल्याने ही पदवी उत्तम रीतीने त्यांनी पूर्ण केली.एकदा रविवार कारंजा परिसरातून घरी जात असताना का.विं.जोशी सर भेटले. काय करतो सध्या? कसे चालले आहे? इत्यादी विचारपूस त्यांनी आस्थेने केली. दोन-तीन दिवसांनी घरी शिपाई त्यांनी पाठवला.त्यावेळचे श्री.साठ्ये सर सहा महिन्यांच्या काळासाठी रजेवर गेल्याने त्यांच्या रजा काळात क्रीडा शिक्षक म्हणून सुवर्णसंधी पाटील सरांना मिळाली. ज्या शाळेत विद्यार्थी होण्यात लोक धन्यता मानत, अशा पेठेत शिक्षक होण्याची संधी त्यांना मिळाली. विश्वास बसत नव्हता. आपल्याच शिक्षकांबरोबर आता आपण सहकारी शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते सहा महिने आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. शिक्षकांची, मुख्याध्यापकांची शाबासकी मिळाली.
    पुढे १९९२ मध्ये माध्यमिक विद्यालय उंटवाडी शाळेत विनाअनुदानित तुकडीवर त्यांची नेमणूक झाली आणि त्यांच्या शिक्षकी पेशाचा श्रीगणेशा झाला. हा ज्ञानयज्ञ अखंडपणे ...आज पर्यंत सलग ३२वर्षे सुरू राहिला.
 प्रशासनात तरबेज असलेल्या सौ.फाटक बाईंच्या काळात शिक्षक म्हणून काम करीत असताना खूप काही शिकायला मिळाले.त्यांच्या प्रशासनाला तोड नव्हती.त्यांनी हार्मोनियमचा क्लास लावण्यासाठी प्रोत्साहित केले. अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रवृत्त केले. मुळातच कलेची असलेली आवड त्यांच्यामुळे वृद्धिंगत झाली.
  वडिलांनी एकदा स्काऊटचे जनक बेडन पॉवेल यांचा फोटो असलेले कॅलेंडर घरी आणले. लहान कैलास त्या फोटोकडे पाहून, हे कोण? काय करतात? वगैरे, वगैरे प्रश्न विचारी. वडील त्याला जवळ बसून बेडन पॉवेल यांच्याबद्दल माहिती देत. कैलासला त्यांच्याबद्दल अप्रूप वाटे.स्काउटिंग, निसर्ग भ्रमंती, कला, संगीत, यांचे शाळेतून झालेले संस्कार या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून श्री.कैलास पाटील... स्काऊट मास्टर चा उदय झाला. क्रीडा शिक्षक अशी फारशी ओळख न राहता निस्पृहपणे कार्य करणारा स्काऊट मास्टर ...ट्रेनर म्हणून पाटील सरांची ओळख सर्वदूर निर्माण झाली.
  सौ.फाटक बाई यांनी पाटील सरांमधील प्रामाणिकपणा, उत्साह, नीटनेटकेपणा इत्यादी गुण हेरले आणि त्यांना स्काऊट मास्टर प्रशिक्षणासाठी पाठविले. एक चांगली संधी म्हणून पाटील सरांनी स्काऊटचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना स्काउटिंगची आवड निर्माण झाली. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांवर स्काऊटचे संस्कार त्यांनी केले. पुढे आवड म्हणून सुट्टीच्या काळात स्काऊटचे मुख्य प्रशिक्षण, राज्यस्तरीय प्रशिक्षण, हिमालय वूड बॅज ,असिस्टंट लीडर ट्रेनर, यासारखी प्रशिक्षणे परिश्रमपूर्वक पूर्ण केली. राज्यभरातील स्काऊट शिक्षकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. स्काऊटच्या विविध ट्रेनिंग सत्रांमध्ये पाटील सरांना आवर्जून बोलावले जाऊ लागले. एक उपक्रमशील स्काऊट मास्टर अशी त्यांची ख्याती संपूर्ण राज्यात निर्माण झाली.
   ओरिसा येथे तेराव्या जांबोरी स्पर्धेसाठी त्यांनी पेठे हायस्कूलचे विद्यार्थी पाठविले होते. चौदावी जांबोरी नाशिक येथे आयोजकांच्या मुख्य टीम मध्ये पाटील सरांची निवड झाली.१५ वी जांबोरी छत्तीसगडमध्ये संपन्न झाली. तेथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पाटील सरांना मिळाली.तेथे जनरल चॅम्पियनशिप राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .२००६ मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय जांबोरीत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून पाटील सर सहभागी झाले. २००७ मध्ये नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून सरांनी नेतृत्व केले. नाशिक येथे संपन्न झालेल्या जांबोरेट राज्यमेळाव्यात त्यांच्या घराशेजारीच आयोजित करण्यात आल्याने अनेकांना त्यांच्या घराचे दरवाजे सतत खुले ठेवले. तत्कालीन स्काऊट आयुक्त/ अध्यक्ष डॉ. वसंतराव पवार आणि तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी पाटील सरांचा खास सन्मान केला होता. पंतप्रधान ढाल स्पर्धेमध्ये पेठे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून देण्यात योगदान दिले. केंद्रीय मंत्री सुखदेवसिंग धिंडसा यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. स्काऊटच्या दिल्ली कार्यालयातून जेव्हा मेडल स्वीकारण्यासाठी स्काऊट मास्टर म्हणून कैलास पाटील यांना फोन आला ,तेव्हा कैलास पाटील यांनी त्यांना अशी विनंती केली की, पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुरस्कार घेण्यासाठी आले तर चालेल का? तेव्हा स्काऊट अधिकाऱ्यांना कैलास पाटील यांच्या स्वभावाचे फार कौतुक वाटले होते. अनेक राज्य आणि राष्ट्र स्तरावरील स्काऊटच्या कॅम्प साठी आयोजक म्हणून, पंतप्रधान ढाल स्पर्धा, राष्ट्रपती स्काऊट स्पर्धा यांच्यासाठी परीक्षक म्हणून, एक निस्पृह निरीक्षक म्हणून अनेकदा स्काऊट विभागाने सन्मानाने कैलास पाटील सर यांना आमंत्रित केले आहे.
  नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये राष्ट्रपती पदक परीक्षेची तयारी पाटील सरांनी सुरू केली.अतिशय मेहनत आणि शाळेव्यतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून या परीक्षांची तयारी त्यांनी करून घेतली. पाटील सरांचे विद्यार्थी स्पर्धेला किंवा परीक्षेला बसले आहेत, असे कळल्यावर सहजच बक्षीस विद्यार्थ्यांना मिळायचे.कारण पाटील सरांच्या मेहनतीबद्दल, कष्टाबद्दल, प्रामाणिक प्रयत्नांबद्दल स्काऊट मध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येकालाच माहिती आहे.
  स्काऊटच्या स्पर्धेत बक्षीस मिळाले की वर्तमानपत्रात नाव यायचे. स्वतःपेक्षा घरच्यांना, आईला मुलाचे नाव फोटो वर्तमानपत्रात आल्याचा आनंद पाहून पाटील सरांना मनस्वी समाधान वाटे. घरच्यांनी त्यांना या कामी खूप मदत केली. स्काऊटचे निवासी शिबिर ,अनेक उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी अनेक दिवस घरापासून लांब राहावे लागे. परंतु घरच्यांनी याबाबत कधी तक्रार केली नाही. शालेय आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील विश्वास टाकून पाटील सरांना अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. स्काऊट मुळे एक प्रामाणिक, विश्वासू,मैत्रीपूर्ण जीवन जगण्याची सवय आणि संस्कार पाटील सरांवर झालेला आहे.
    नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नामवंत शिक्षक- शिक्षिका यांच्याबरोबर प्रारंभीच्या काळातील सेवाकाल गेल्यामुळे ना. ए.सोसायटीचा संस्कार त्यांचेवर झाला. तो संस्कार त्यांनी आयुष्यभर जपला. कोणासाठीही अनुदार उद्गार त्यांचे मुखातून ऐकावयास मिळाला नाही.
Happiness helps relieve tension and makes the environment healthy for working. यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. म्हणून त्या कामाच्या ताणाने कधीही दुःखी किंवा नाराज झाल्याचे दिसले नाही. सदैव हसतमुख चेहरा ही कैलास पाटील यांची ओळख आहे.
 त्यांच्याबाबत विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी गोष्ट ही आहे की, त्यांनी आपल्या स्टाफ मधील सर्वांशी समान संबंध ठेवले. खास अशी मैत्री त्यांनी कोणाशी केली नाही. कोणाचा राग, द्वेष, मत्सर, तिटकारा कधीही केला नाही.
  ३२वर्षांच्या सेवेमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या पेठे विद्यालय, नवीन इंग्रजी शाळा,ओझर, सी.डी.ओ. मेरी हायस्कूल, डी.एस. कोठारी कन्या शाळा,नाशिक रोड, माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे त्यांनी सेवा केली. त्यांच्या शांत आणि सुस्वभावी वृत्तीमुळे कधीही शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी वादविवाद झालेले आठवत नाहीत.
   निस्वार्थ सेवेचा कुटुंबाचा वारसा त्यांना मिळाला असावा. मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी वाटेल ते श्रम आणि मेहनत श्री कैलास पाटील यांनी केली. त्यांचा मुलगा रोहित आपल्या पेठे विद्यालयाचा गुणवंत माजी विद्यार्थी असून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी संपादन करून उत्तम व्यवसाय करीत आहे. त्यांची कन्या अमृता  देखील आपल्या संस्थेचीच माजी विद्यार्थिनी असून एक उत्तम गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबात रममाण झाली आहे.
   श्री.कैलास पाटील यांच्या सेवानिवृत्तीमुळे एक संस्कारशील, उपक्रमशील ,विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षक, स्काऊट मास्टर तसेच उत्तम प्रशासक संस्थेतून निवृत्त झाल्यामुळे निश्चितच उणीव भासणार आहे.
   सेवानिवृत्तीनंतर देखील श्री.पाटील सर अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय राहतील, यात कोणतीही शंका नाही.
   सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच नाशिक एज्युकेशन सोसायटी परिवार आणि पेठे विद्यालयाच्या वतीने सदिच्छा ! 

लेखन :✍️✍️
शैलेश पाटोळे
उपशिक्षक
पेठे विद्यालय,नाशिक
दिनांक: २३/३/२०२४
  
 
 
  

  

No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...