ll यमुना ll
"ऑर्डर ...ऑर्डर......प्लीज मेंटेन द सायलेन्स...
दोन्ही पक्षाच्या वकिलांनी कार्यवाही सुरू करावी."ईती न्यायाधीश.
"यमुनाबाई.... हाजीर हो...."
यमुना साक्षीदारासाठी तयार केलेल्या चौकटीत उभी राहिली.
"म्हणा,देवा शपथ खरं सांगेन खोटं बोलणार नाही"
"देवा शपथ खरं सांगेन.मी खोटं कधीबी बोलत न्हाय."
"तुमचं नाव काय?"
"यमनाबाई..."
"तुमचं शिक्षण?"
"अडाणी हाय म्या."
"तुम्ही काय करता?"
" घरकाम ..मजुरी.."
"यमुनाबाई, तुमच्या नवऱ्याचे नाव काय?"
"गंगाधर.."
"ते काय व्यवसाय करतात?"
"शाळा मास्तर ..."
"यमुनाबाई,तुमच्या नवऱ्याचा तुमच्यावर आरोप आहे की,तुम्ही घरातील सर्व दाग दागिने घेऊन माहेरी निघून गेला. तुम्हाला त्यांच्याबरोबर संसार करायचा नाही. खरं आहे का?"
"न्हाई. साहेब, माझ्यावरला आरोप साफ झूठ हाय. म्या चोरी न्हाई केली.माह्या नवऱ्याला दारूचं खूप व्यसन हाय. नशेत तो मला मारझोड करतुया. त्याला मह्याकडून फारकत पाहिजेल हाय. पर म्या फारकत देणार न्हाय. फारकत घेऊन त्याला दुसरे लगीन करायचं हाय."
गंगाधरच्या वकिलांनी उलट सुलट प्रश्नांची सरबत्ती सुरू ठेवून यमुनेला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बेदरकारपणे देत होती.
"ठीक आहे. हे पहा जोपर्यंत दोन्ही पक्षांचे एक मत होत नाही तोपर्यंत फारकत देता येणार नाही. सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी कोर्ट तुम्हाला सहा महिन्यांची मुदत देत आहे. त्यात एक मत झालं तर ठीक अन्यथा कोर्ट सर्व बाबींची शहानिशा करून निर्णय देईल."जज साहेबांनी असा आदेश दिला.
गंगाधर कडून शेटे वकील काम पाहत होते. कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर शेटे वकील यमुनाबाई यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत तिच्याशी बोलत होते.
"यमुनाबाई चला जरा चहा घेऊ"
"नको साहेब..."
"अहो,चला. चहाचे पैसे मी भरतो.तुमच्याकडून नाही घेणार!"
नऊवारी नेसलेली,भरगच्च शरीराची यमुनाबाई कडेवर तान्ह मूल घेऊन भराभरा कोर्टाच्या पायऱ्या उतरत होती. शेटे वकील तिचा पाठलाग करीत तिची मन धरणी करीत होता. तिची इच्छा नसताना शेटे वकील झाडाखाली असलेल्या चहाच्या टपरीवर तिला घेऊन गेला.
" बाळ्या, दोन कटिंग..."
एका हातात पाण्याचा मग आणि दुसऱ्या हातात चहाचे ग्लास घेऊन टपरी वाल्याने दोघांपुढे ठेवले.
"यमुनाबाई पाणी घ्या. थोडं शांत व्हा."
यमुनेंन पाण्याचा मग तोंडाला लावला.गुळण्या केल्या. नंतर दोन घोट पाणी गिळलं. कडेवरच्या पोरीला खाली जमिनीवर मोकळं सोडलं. चोळीला मारलेली पाठीवरची गाठ सैलसर झाली होती, ती गाठ तिने आवळली. डोईवरचा पदर खांद्यावर सरकला. तारुण्याने मुसमुसलेलं तिचं शरीर शेटे वकिलानं चष्म्यातून न्याहाळलं. तिची सुरईदार मान, त्यावर गोंदलेली नाजूक फुलं, तिच्या सौंदर्यात भर घालीत होते. सैलसर झालेला अंबाडा तिनं दोन हात वर करून नव्याने बांधला. चष्म्याच्या काचांवर आलेली गरम चहाची वाफ रुमालानं साफ करीत शेटे वकील तिच्या सौंदर्याने अवाक झाला. अशा रानफुलाचा सुगंध आपल्याला घेता यावा, असं कुणाला बरं वाटणार नाही ! एक टक लावून, शून्य नजरेने शेटे वकील तिच्याकडे पाहत राहिला.गंगाधर का बरं फारकत मागत असावा? असं आरसपाणी सौंदर्य का बरे गंगाधर लाथाडतो आहे ?असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात घोंगावू लागले.
यमुनाने साडी चोळी ठीकठाक करत चहाचा कप तोंडाला लावला.आधीच नवऱ्यानं आपल्यावर केलेल्या आरोपानं तिची डोक्याची नस ताड-ताड उडत होती. आग ओकल्यागत तिचे डोळे भासत होते. व्यवसायांनं लाचार झालेला शेटे वकील तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता.
"यमुनाबाई, असही नवऱ्याकडून तुम्हाला खूप त्रास होतो आहे. त्यापेक्षा देऊन टाका एकदाची फारकत. म्हणजे तुम्ही त्याच्या त्रासापासून मुक्त व्हाल."
"नको साहेब. म्या तरास सहन करीन.पण त्याला फारकत देणार नाही."
"मग असे किती दिवस कोर्टाच्या येरझारा घालत राहाल ? तुम्हाला हवं असेल तर काही पैसे...."
"नको नको साहेब.अशा पापी माणसाचं पैकं घेऊन मला काही माडी बांधायची का ! चुलीत घाला त्याला आणि त्याच्या पैशाला!"
"मग तुमची इच्छा काय? ते तरी सांगा."
"लगीन झाल्यावर नांदायला गेल्यापासून त्यानं जो माहा छळ केला ,माह्यावर अत्याचार केला,माह्या चारित्र्यावर संशय घेऊन माह्या माय बापाची अब्रू चारचौघात घालीवली.माह्या आयुष्याची राख रांगोळी केली.त्याची किंमत पैशात होणार न्हाय. माह्या आत्म्याला झालंली इजा त्याच्या दौलतीनं भरून निघणार न्हाय साहेब ! मह्यावर चोरीचा, छिनालकीचा आरोप करून स्वतः बाहेरख्यालीपणा करणाऱ्या या राक्षसाला देवच काय ती शिक्षा करीन. काही झालं तरी मी या पाप्याला फारकत देणार न्हाय."
शेटे वकिलाला यमुनेची समजूत घालता घालता नाकी नऊ आले. तो तिला जनावरासमान वागणूक देतो. तरीदेखील ती त्याला सोडायला तयार नाही. असं का? हे जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली.
"यमुनाबाई तुमच्या दोघांमध्ये असं झालं तरी काय? कळू द्याल का?"
"अहो, साहेब तुम्ही तर त्यांचं वकील. माझी कर्म कहाणी ऐकून कोर्टात तुम्ही काय माझी बाजू मांडणार व्हय?"
रांगत रांगत लांबवर गेलेल्या तान्ह्या मुलीचा रडण्याचा आवाज अचानक तिच्या कानावर पडला. धावत जाऊन तिने त्या मुलीला उचललं आणि झाडाखाली येऊन बसली. शेटे वकिलाकडे पाठ करून मुलीला पदराखाली झाकलं. दोन पाच मिनिटं शांततेत गेली. मुलीचं पोट भरलं आणि ती निवांत झोपली. शेटे वकील यमुनेच्या बोलण्याची वाट पाहत बसले होते.
"यमुनाबाई तुमच्यात हा वाद कशापायी?"
उन्हाचे किरण डोळ्यावर पडून पोरीची झोप मोड होऊ नये म्हणून पदरानं तिचं तोंड झाकून यमुना बोलू लागली.
भिवापूरच्या टेकडी पल्याड आमची छोटीशी वाडी. तिथल्या येसाजी आणि रखमाबाई यांची मी थोरली पोर. तशी त्यांना पाच मुली आणि चार मुलं. बाप जल्मात आमच्या कैक पिढ्यांनी शाळेचं त्वांड पाहिलं नाही. मोठा पोरवडा.माय बाप मोलमजुरी करीत. गावातल्या सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यात दोघांचंबी आयुष्य गेलं. वर्षातलं सारेच दिवस आमच्यासाठी सारखं. ना दिवाळी ना आखाजी. कोणताच सण आमच्या घरामंधी व्हत नव्हता. आया बायांच्या दारात बसून मिळालेलं उरलं सुरलं गोडधोड हे आमच्या दृष्टीने पाच पक्वान्न होत.
माह्या वेळेला माही माय पोटुशी व्हती, तव्हाची गोष्ट. माही आत्या गौतमाबाई काहीतरी निमित्त काढून वाडीत आली. तिच्या घरची परिस्थिती बेताचीच, परंतु आमच्यापरीस चांगली व्हती.बहिण मेव्हणे आपल्या दारात आल्याने माझ्या बापाला बक्कळ आनंद झाला. त्याच्या परीने, उधार उसनवारी करून वाण्याकडून सारसामान आणलं.पाहुणचार केला. आपल्या भावाचा संसार फुलणार याचा तिलाबी आनंद झाला. माह्या मायचं तिनं कोड कौतुक केलं. रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी ती जायला निघाली. मायनं तिला वाकून नमस्कार केला. मायनं तिला हळदी कुंकू दिलं. त्याच कुयरी मधलं कुंकू तिनं बोटाच्या चिमटीत पकडलं आणि मायच्या पुढे आलेल्या पोटाला लावून म्हटलं, "वहिनी तुला पोरगी झाली तर ती माझी सून व्हईल ! माझ्या बापाला तिनं शब्द दिला. बाप लय खुश झाला. बहिण मेव्हन्याच्या पाया पडून त्यांना निरोप दिला. अनवाणी पायान बाप एस.टी. स्टँड पर्यंत त्यांची थैली हातात धरून खडीचा रस्ता तुडवत गेला.
चार सहा महिन्यांनी माय बाळंतीण झाली. माहा जन्म झाला. बापाला पोराची अपेक्षा. माय सुद्धा माझ्या जन्मानं तशी दुखावली.पण जन्म आणि मरणआपल्या हाती न्हाई. देवानं दिलेला प्रसाद तो गोड मानून घ्यावा. असा समज करून घेऊन चेहऱ्यावर दुःख दिसू दिले नाही.ही आनंदाची वार्ता आत्याला सांगावी म्हणून माझा बाप भल्या पहाटे मिळल त्या वाहनाने बहिणीकडे गेला. बाळंतपणानंतर पंधरा-वीस दिवसांनी मायनं कामाला सुरुवात केली. पाठीवर झोळीसारखं बांधून घेत राबत राहिली. राकट कणखर माहा बाप ऊन पावसात दारिद्र्यात झिजत होता. दरवर्षाला घरात एकेकाची भर पडत गेली. पाचटाच्या झ्यापात मावणार नाही एवढी संख्या झाली. चिल्या पिल्ल्यांबरोबर दारिद्र्यातही वाढ झाली. खाणारी तोंड वाढली. दोघांची कमाई अपुरी पडू लागली. मोठे असलेले आम्ही दोघं- तिघं शक्य तिथे काम करून मदत करू लागलो. पण लहान मुलांना कोणी कामावर घेईना. पोरांना खाऊ पिऊ घालून मायबाप पोटाला चिमटा काढून कसंतरी आयुष्य जगत होते. दिवसामागून दिवस गेले.....
दिवसभराची आवर -सावर झाली. दोन घास पोटात ढकलले. चिल्ली पिल्ली कोपरा धरून निजली. आईन एका रांगेत त्यांना झोपवलं. घासलेटचा दिवा थोडा हलकासा केला. ढोर मेहनत करून थकलेला माहा बाप नेहमीप्रमाणे घस्टी पिऊन घोरत पडला व्हता. झापाच्या बांबूंमध्ये असलेल्या किड्यांची आणि बाहिर रातकिड्यांची किरकिर झोपेचा भंग करीत व्हती. थकलेली भागलेली माही माय अर्धवट झोपेत असेल.अचानक माह्या पोटात दुखाया लागलं. माह्या कन्हण्याने मायला जाग आली. चिल्लीपिल्ली ओलांडून आणि ती जागी व्हऊ नये म्हणून सावध व्हऊन माह्या जवळ आली.
"काय ग, काय व्हतंय?"
"पोटात लई कळ आली बघ.."
"काय खाल्लं सां.. दिवसभर काहीतरी अरबट चरबट खाल्लं की हे असंच व्हणार.."
"नाही ग... मी कायच खाल्लं नाही."
मायनं उभ-आडवं माझं पोट चोळलं. आणि अचानक तिचं लक्ष माह्या हाथरुणाकडं गेलं. ते पाहून तिला घाम सुटला. माह्या छातीचे ठोकं वाढलं. काय झालं ते कळना.
रातीची वेळ व्हती. रक्तांनं माखलेलं हाथरून तिनं गोळा केलं. तिची ईरलेली एक साडी माह्या भोवती गुंडाळली. मला धीर दिला. झापाचा मोडका दरवाजा हळूच किलकिला करून घासलेटचा दिवा घेऊन मला बाहेर न्हेंलं. आंघोळीसाठी केलेल्या आडोशात तिनं मला धुतलं. अनुभवाच्या चार गोष्टी सांगितल्या. सर्वांनाच यातून जावं लागतं, हे ऐकून भ्याव कमी झालं. पोट दुखी वरची कुठलीतरी जाळी मुळी तिने मला खायला दिली. आणि काही वेळानं मला झोप लागली. माय मात्र काहीतरी विचारात रातभर झोपलीच नाही. झापाच्या गळक्या छपराकडे काहीतरी न्याहाळत झोपेचं सोंग करून पडून राहिली.
दिवस उगवला तशी चिल्लीपिल्ली जागी झाली. तिनं चुलीत लाकडं घातली. चूल पेटली. तापलेल्या तव्यावर रगडलेल्या पिठाची चळत ठेवत त्यावर पाणी चोपडलं. चुलीत विस्तव धगधगत व्हता. मुलीच्या विचारानं तिच्या मनात ठिणग्या झडत व्हत्या. बाप कामावर जायच्या तयारीत भाकर झाल्याची वाट पाहत व्हता.
"आवं म्या काय म्हणती. तुम्ही वन्स कडे जाऊन येता का?"
"आता हे काय मधीच तुझं? ना सण ना श्राद्ध.. जाऊन काय करू तिथं?"
"आवं आपली यमुना मोठी झाली "
"अगं पोरं -पोरी भी झाडपाल्यागत असतात. ऊन वारा पावसात खतपाणी मिळालं कि ती आपोआप मोठी व्हत्यात."
"आवं आता कशी काय समजावू मी तुम्हासनी ? खुट्याला बांधलेली गाय वयात आली तर दावं तोडाया पाहती. सोडली तर चार पाय उडवीत रानभर उंडारती."
"सरळ सरळ सांग रखमे, तुला काय म्हणायचे ते .."
यमुनेचा हात पिवळं करायची वेळ आली आहे. काय बी करा अन एकदा वन्स कडे जाऊन या. आठवतंय का तुम्हासनी, त्यांनी माह्या पोटाला कुंकू लावून मुलीला सून करीन ,असा सबूद दिला हाय. तरणीताठी पोरगी गावात सांभाळून ठेवणं लई कठीण आहे बघा. वाहत्या ओहळात
कोण हात धुवून घेईल त्याचा पत्याबी लागणार न्हाई. मंग आयुष्यभर पश्चाताप करावा लागल."
आता कुठे बापाच्या डोक्यात प्रकाश पडला व्हता.
"बरं बरं उद्या पहाटला भाकर बांधून दे.एकदा आक्काकड जाऊन येतो."
ठरल्याप्रमाणे बाप आक्काकडं जायला निघाला. जाताना मायनं राखून ठेवलेले मठ आणि मूग वन्स साठी दिलं. कुर्धान्यात बांधलेली भाकर बापाच्या हातावर ठेवीत "गोड बातमी घेऊन लवकर घरला या,"असं म्हणली.
गोतमाबाई वन्स आणि परसराम दाजी यांचा मुलगा गंगाधर शिकून शाळा मास्तर झाला व्हता. लांब कुठल्यातरी पाड्यावर तो नोकरी करीत व्हता.गोतमाबाई शेतीवाडी सांभाळून व्हत्या परिस्थिती ठीकठाक व्हती.
इकड माझी माय ईमल्यावर इमले चढवत होती. माही यमना आता मास्तरासंगट लगीन करून मास्तरीन हुणार. मोठ्या घरात नांदायला जाणार. माझ्यासारखं तिला लोकांच्या दारी कामधाम करायला जावं लागणार न्हाई. खूप नशीबवान हाय माही पोरगी. मुलीच्या सुखासाठी हर एक आईसारखी ती स्वप्न पाहत व्हती. दिसातून चारदा पडक्या भोकं पडलेल्या झापाच्या खोपटीतून बाहेर येऊन केव्हा बाप आनंदाची वार्ता घेऊन येतो याची वाट पाहत व्हती.
बाप अक्काकडं पोहोचला तेव्हा तिन्ही सांजची वेळ झाली व्हती. गेल्या गेल्या त्यानं अक्का आणि दाजींच्या पायावर डोकं ठेवलं. मायनं दिलेलं मठ -मुगाचं गासोड आक्काच्या हाती दिलं. अक्काला लय आनंद झाला. चाय पाणी झालं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. गंगाधरची नोकरी, त्याचा पगार,त्याचा रुबाब, सारं काही सांगताना अक्काचा आनंद गगनात माईना. बाप मनातल्या मनात खुश झाला. गंगाधर आपला जावई पगार कमवतो. आपली मुलगी आता सुखा -समाधानान आक्काच्या घरी नांदणार, या आनंदात तो होता.
मेव्हणा घरी आल्यामुळे दाजींनं घरी मासं आणून टाकलं. अक्काला स्वयपाक करायला सांगून बापाला भिलाटीत घेऊन गेला. चार फुकटे दारू प्यायला भिलाटीत व्हतीच. परसराम दाजी गावात किती मोठी असामी हाय,हे दारूच्या गुत्त्यावर भिलाटीत बापाला कळलं. रातच्याला चालत डुलत दोघेही घरी आली. आक्कान जेवाया वाढलं.
"अक्का तुझ्या हातचं कालवण लई दिसांनी खातोय बघ. लई झाक झालय जेवण !"
"आरं येसा , आमच्या गावची मासे हाय ती. मग कालवण बी झ्याक होणारच की ! तसबी तुझ्या आक्काच्या हाताला चव हाय म्हणा... ! "
ज्या कामाकरता आपण आलो, तो विषय अजून अक्का आणि दाजीकडे बापानं काढला नव्हता. उद्या भल्या पहाटे वाडीला परत यायचं व्हतं. जेवताना आनंदात गप्पा सुरू व्हत्या. हीच वेळ साधून बाप बोलता झाला....
"अक्का, मी काय म्हणतो...."
"बोल की... का रं थांबलास ?"
"नाही म्हणजे... आपली यमुना आता मोठी झाली."
" व्हय रं.. लय गोड पोरगी हाय बघ."
"तिचं लगीन करून टाकावं म्हणतो आवंदा."
"खरं हाय. फुल उमललं की फार दिवस झाडावर टिकत नाही बघ. एखादं चांगलं स्थळ पाहून लगीन करून टाक."
"अक्का, तुझ्या शब्दाप्रमाण यमनेची आणि गंगाधर रावांची लगीनगाठ बांधून टाकूया."
इतका वेळ रस्स्यावर ताव मारणारं दाजी बापाचं बोलणं ऐकून रागानं लालबुंद झालं....
"येसा, काय म्हणतोयस ते कळतं का तुला. माझ्या गंगाधरला जावई करून घ्यायची ऐपत हाय का तुही... ? का आपली.. उचलली जीभ आन लावली टाळ्याला.. !"
नवऱ्याचा बोलण्याचा रोख अक्काला कळला.
"येसा आरं... किती जुनी गोष्ट घेऊन बसलास तू. चेष्टा मस्करीत सून करून घेईल असं म्हटलं व्हतं. कधी ते आता मला फारसं आठवत पण न्हाई बघ. माझा पोरगा मोप शिकला आणि तुझी पोरगी अडाणी,कसं काय जुळल ? यमना दिसायला लई झाक आहे. पर शिकलेल्या पोराला अडाणी पोरगी केली, तर लोक आमच्या तोंडात शेण घालतील. पोरात काय खोट व्हती का ...असं ईचारतील."
'"गंगाधरचा ईचार मनातून काढून टाक येसा. लई जण हुंडा घेऊन रांग लावून बसल्याती. तुला ते परवडण्यासारखं न्हाई. "माशाचा अडकलेला काटा दातातून काढत परसराम दाजी म्हटलं.
"दाजी ..हुंडा....? माही तर खरंच हुंडा द्यायची ऐपत नाही. माह्या यमुनेला पदरात घे आक्का. लय उपकार व्हतील माह्यावर .... माह्या परीनं चांगलं लगीन लावून देईल. इतकं दिस म्या तुझ्याच भरोशावर व्हतो. लय गुणाची हाय पोरगी माही."
जेवणाचे उष्टे हात त्यानं आक्का आणि दाजी समोर जोडलं. आता जेवण त्याला गोड लागेनासे झालं. आक्का आणि दाजींच्या बोलण्यान तो पार गोंधळून गेला. असाच मी घरी परत गेलो तर,रखमाला काय उत्तर देऊ? माह्या यमनेचं पुढे काय व्हईल? या ईचारांनी त्याला कोरड पडली. एकदा शेवटचा प्रयत्न करून पहावा म्हणून त्यानं तोंड उघडलं.
"दाजी, किती हुंडा द्यावा लागल?"
"येसा, तुझी ऐपत नाही बाबा. तू कशाला या भानगडीत पडतोया. नगद पाच हजार देणारी दोन स्थळ मागच्याच बाजारादिशी येऊन गेली. परवडल का तुला? एकाच पोरीच्या लग्नाला एवढ कर्ज काढशील तर अखी हयात तुझी कर्जफेडण्यात जाईल. तुझा समदा संसार वाऱ्यावर जाईल. त्यामुळे तू आमची बरोबरी करू नको. गंगाधरचा विचार मनात आणू नको."
गावठी दारू त्याच्या मस्तकाला भिनली. आक्का आणि दाजी त्याची ऐपत पुन्हा पुन्हा काढत व्हती. त्याचं डोकं सरकलं.
" दाजी, मी देतो पाच हजार आणि लगीन काढून देतो बघा. यमुनेचं लगीन गंगाधररावांशी लावून द्या."
हुंड्याची रक्कम ऐकून दाजीच्या तोंडाला पाणी सुटलं.
"येत्या वर्षभरात रक्कम आणून दिली तर तुळशीच्या लग्नानंतर यमना आणि गंगाधरच्या लग्नाचा बार उडवून टाकू."
दाजी आणि अक्काच्या मनासारखं झालं. दारूच्या नशेत बापानं यमनेचं लग्न ठरवलं. तांब्याभर पाणी घेऊन भरल्या थाळीत त्यांना हात धुतला. कशीबशी ती रात्र त्यांना तिथे काढली. भल्या पहाटं दाजी आणि आक्काच्या पायावर डोके ठेवून वाडीला यायला निघाला.
वाटेला डोळे लावून बसलेली माय बापाला पाहून लय खुश झाली. तिचा जीवात जीव आला. मैलोन मैल अनवाणी पायानं सडक तुडवत आलेला बाप भीतीला टेकून बसला. कोचं पडलेला तांब्या भरून मायनं त्याच्यापुढे धरला.
"काय व, काय झालं? वन्स काय म्हटल्या.?."असे एक ना अनेक सवाल करून तिन बापाला भंडावून सोडलं. आक्का आणि दाजीं यांनी हुंडा मागितल्याचं न सांगता,"यमनेचं लग्न तुळशीच्या लग्नानंतर ठरवून आलो." एवढं मात्र सांगितलं. मायला आकाश ठेंगणं झालं. लय खुश झाली. मला जवळ घेऊन गोंजारलं. मायची लगबग सुरू झाली.
लगीन तर ठरवलं. पण हुंड्याचा पैका कसा जमवायचा, याची चिंता बापाला सतावू लागली. नानाजी पाटलाकड जावं असा एकानं त्याला सल्ला दिला. हुंड्यासाठी पाच हजार आणि लग्नासाठी कमीत कमी तीन हजार असे एकूण आठ हजार रुपयं नानाजी पाटलांनं उचल म्हणून द्यायचं कबूल केलं. त्या मोबदल्यात बापानं त्याच्याकडे पाच वर्ष साल्दारकी करायची,अशा पेपरवर अंगठा उमटवला. पैशाची तजवीज झाली.
पैकं घेऊन बाप आत्याकडं गेला. पैसे कसे जमवले हे मात्र त्यांनी ईचारले न्हाई. बामनाकडून लग्नाची तारीख पक्की केली. आल्या पावली बाप वाडीला येण्यासाठी परत निघाला.योगायोगाने गंगाधर सुट्टीच्या दिवशी गावी आला होता. त्याची आणि बापाची गाठभेट झाली.
"अक्का, येसा मामा का आले होते?"
"तुझ्यासाठी यमुनेचं स्थळ घेऊन आलथा."
"पण मी यमुनेशी लग्न करणार नाही. मास्तरची बायको अडाणी, हे मला चालणार नाही."
"हे बघ गंगाधर.. दोन बुक शिकून मास्तर झाला म्हणजे लय मोठा शहाणा झाला,असं समजू नगस. गुमान आम्ही सांगतो त्या पोरीशी तुला लगीन करायला लागल."
गंगाधरचा बाप मध्येच तनफणला.
आईनं पोराची समजूत घालण्याचा प्रयत्न केला."अडाणी पोर म्हणजे मुकं जनावर ते, कसं बी हाकला, कुठं बी हाकला! तुझ्या तालावर नाचल. उठ म्हणता उठल आन बस म्हणता बसल.."
शेवटी गंगाधर लग्नाला तयार झाला. सातवी यत्ता शिकून गंगाधर आदिवासी भागात मास्तर म्हणून नोकरीला व्हता. कमी वयातच हाती पगाराचा पैका आला . पगार कमवतो म्हणून घरात आणि गावात तो कौतुकाचा विषय व्हता. महिना पंधरा दिसातून नोकरीच्या ठिकाणाहून तो गावी यायचा. नोकरीच्या ठिकाणी मित्रांच्या संगतीत त्याला दारूची सवय लागली. गावी आल्यावर सुद्धा मित्रांबरोबर रात्र रात्र दारूत घालवत असे. गेले कित्येक दिवस दारूमुळे त्याचं शरीर खंगलं होतं. शिक्षण सोडलं तर यमुना त्याच्यापेक्षा अनेक बाबतीत सरस होती. अंगापिंडानं धडधाकट ,मळकट तरी गोरी गोमटी व्हती.
ठरल्याप्रमाण तुळशी विवाहानंतर यमना आणि गंगाधरचं लगीन लागलं. आक्का आता विहीन झाली व्हती ! . लग्नाआधीची अक्का आणि लग्न झाल्यानंतरची अक्का याच्यात फरक जाणवला. मानपानात कसूर राहिल्याचा बोल तिन मायला लावला. मायनं तिची माफी मागितली. यमुना सासरी निघाली."यमने आता नवऱ्याचं घर हेच तुझं घर,"असं म्हणून काळजावर दगड ठेवून बापान तिचा निरोप घेतला.
नव्याचे नऊ दिवस बरे गेले. दारू पिऊन आलेला गंगाधर तिला अडाणी म्हणून नाव ठेऊ लागला. काहीतरी कारण शोधून तिला मारझोड करू लागला. त्याचे आई-वडील त्याचीच बाजू घेत. सासू-सासरे सुद्धा स्वयंपाकात आणि घर कामात तिच्या चुका काढू लागलं. ईकत आणलेलं जनावर सुद्धा नव्या गोठ्यात रुळायला वेळ लागतो. परंतु यमुनेला मात्र तेव्हढा वेळ सुद्धा मिळाला नाही. आईच्या संस्कारावरून आणि बापाच्या शिस्तीवरून तिला शिव्या खाव्या लागत व्हत्या. दिसभर घरात राबायची. सर्वांचं उन् दुन सहन करायची. भेदरलेल्या यमुने कडून चुका व्हायच्या. परंतु तिला समजून घेणारं या घरात कोणीच नव्हतं.
दिवसा मागून दिवस जात व्हते. महिना पंधरा दिसातून गंगाधर गावी यायचा. गंगाधरच्या प्रेमाला आसुसलेली यमुना डोळ्यात तेल घालून त्याची वाट पाहायची. प्रेम तर सोडाच पण कधी दोन शबूत चांगले गंगाधर तिच्याशी बोलला नाही. आल्या आल्या आई वडील यमनेबद्दल भलतं सलतं सांगून त्याचे कान भरत. रात्री तो भिलाटीतून दारू पिऊन येई. शिव्यांची लाखोली वाही. तिन त्याची कितीही बडदास्त ठेवली तरी त्याची त्याला कदर नव्हती. 'नावडतीचे मीठ अळणी' हेच खरे! उत्तर देण्याचा प्रयत्न केलाच तर लाथा बुक्क्यांचा मार ठरलेलाच . लग्नानंतर चार दोन महिन्यांनी माय आणि बाप भेटायला आलथे. परंतु सारं दुःख मनात ठेवून हसऱ्या चेहऱ्याने यमना त्यांना सामोरे गेली. धुणे धुण्यासाठी तिला नदीवर जावे लागे. परंतु तेथेही कोणाशी बोलण्याची तिला मुभा नव्हती. घोळक्यात उठून दिसणारी यमुना तिच्या सौंदर्यामुळे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत व्हती. गावातले टवाळ तरणी पोरं तिच्यावर नजर ठेवून व्हते. नाकासमोर चालणारी आणि वागणारी यमना गावात सर्वांचाच चर्चेचा विषय व्हती.
आक्काला गावातल्या आयाबाया विचारीत. लग्नाला इतके दिवस झालं, यमनेनं गोड बातमी अजून कशी न्हाई दिली? गोड बातमी द्यायला नवरा म्हणून गंगाधर जवळ तर यायला हवा होता ..! व्यसनात आणि रागात धुंद असलेला गंगाधर कधीच तिचा नवरा होऊ शकला न्हाई. मग पोट -पाणी कसं पिकणार? कोरड्या मातीत नुसतं बी पेरून काय उपेगाचं ? मायेचा ओलावा अन प्रेमाची उब मिळाल्याशिवाय बीजाचं तरी अंकुरण कुठे व्हतं? त्याला संभोगातला 'भोग ' फक्त माहीत व्हता.
अशाच वातावरणात दोन-चार वर्ष निघून गेली. आक्काची नातू खेळवण्याची इच्छा अपुरीच राहिली व्हती. झाडावरची फळ गाभुळती झाली की, वटवाघळ त्या झाडाभोवती घिरट्या घालतात. तशी गावातली टवाळकी पोरं अक्काच्या घराभोवती घुटमळू लागली. त्याचा दोष आक्का यमुनेलाच देऊ लागली. त्यामुळ काही दिस यमनेला गंगाधरकड नोकरीच्या गावी पाठवावं असं ठरलं.
इच्छा नसतानाही गंगाधरन नोकरीच्या गावी भाड्याने खोली घेतली. इथे तर त्याच्या वागण्यावर कोणाचाच नियंत्रण राहिलं नाही. दोन दोन दिस तो घरी परत येत नव्हता. कोणाकडे जातो? कुठे जातो ?अशी विचारण्याची सोय नव्हती. संध्याकाळी उशिरा घरी आलाच तर चार दोन दारुडे मित्र बरोबर असत. त्यांच्या घाणेरड्या नजरा यमुनेवर असत. असं सांगण्याची सोय नव्हती. उपाशी तापाशी कशीतरी ती दिवस काढत व्हती. कधीकधी रात्री बे रात्री तो घरातून तिला बाहेर काढी. अंधारात, थंडीत कुडकुडत ती तशीच पडून राही. लग्नाच्या आधीपासून कोणीतरी एका मास्तरनिशी गंगाधरचं लफडं हुतं. अशी कानघुण तिला लागली व्हती.
आक्का जवळ सांगण्याची तिची हिंमत झाली नाही. गंगाधर कडे पाठवून सुद्धा यमुनेचं पोट पाणी पिकलं न्हाई. म्हणून यमुनेला फारकत देण्याचा खटाटोप आक्कान सुरू केला. त्यासाठी नको नको ते आरोप तिने यमने वर केले. यमुनेचं चाल-चलन ठीक न्हाई,यावर तिने शिक्कामोर्तब केलं. आपल्यावरच्या खोट्या आरोपांनी यमना सैरभैर झाली. यमुना वांझोटी आहे,असा खोटा प्रचार तिने सुरू केला.
सासू-सासरा आणि गंगाधर साऱ्यांनी आता तिने फारकत द्यावी म्हणून प्रयत्न सुरू केला. शक्य तेवढा अत्याचार करून ती स्वतः फारकत घेण्यास तयार व्हईल,असे वातावरण तयार केलं. परंतु फारकत घेतली तर माय -बापाची नालस्ती व्हईल. खानदानाची अब्रू जाईल. म्हणून निमुटपणे सर्व अत्याचार ती सहन करू लागली.
पंधरा ऑगस्टचा तो दिवस. पहाटला उठून गंगाधरन शाळेत जायची तयारी सुरू केली. फारकत देण्यासाठी टुमणं लावलं. यमुनेन काही झालं तरी फारकत देणार नाही, असं ठामपणे सांगितलं. त्यामुळे त्याचा पारा अधिकच चढला.तोंडाचा पट्टा सुरू झाला.नेहमीप्रमाणे यमुनेंनं चहासाठी ईस्टोव्ह पेटवला. त्याची रात्रीची दारू उतरलेलीच नव्हती. त्याच्यातला राक्षस जागा झाला. ईस्टोव्ह समोर बसलेल्या यमुनेवर त्याने घासलेटची बाटली रिकामी केली. काडी पेटवून तिच्या अंगावर फेकली. खिडक्या ,दरवाजा बंद करून निर्लज्जपणे शाळत निघून गेला. जीवाच्या आकांतान यमुना जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत व्हती. थोड्यावेळाने शाळेतली दोन पोरं मुद्दामहून झाडू आणण्याच्या बहाण्याने घरी धाडली. पोरांनी दरवाजा उघडला. समोर असलेलं दृश्य पाहून ती भेदरली. धावत पळत ती थेट घरी गेली. पोरांचे मायबाप धावत मास्तरच्या घरी आली. छातीपासून पोट, मांड्या जळल होतं. जळालेलं यमनेच शरीर त्यांनी घोंगडीत गुंडाळलं. गावच्या पोलीस पाटलाला खबर दिली. यमुनेला सरकारी दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केलं. दुसऱ्या दिशी यमना सुदिवर आली. तिची जबानी घेण्यासाठी पोलीस स्टेशन मधून पोलीस आले. पोलीस पाटलाशी गंगाधरचे बैठकीचे संबंध व्हते. गंगाधरची नोकरी जाऊ नये म्हणून पोलीस पाटलाने पोलिसांना गुंडाळला. ज्या खाटेवर यमुना ऍडमिट व्हती तिथं पोलीस पाटील एकले आले.
"यमुनाबाई, बरं हाय का?"
यमुनेनं फक्त डोळ्यांनी व्हकार दिला.
"बाई, बाहेर पोलीस आलत. खरं काय झालं ते सारं मला ठाऊक हाय. गावची इज्जत जाईल. मास्तरची नोकरी जाईल. झालं गेलं गंगेला मिळालं. मास्तरन चूक केली तर आपणबी चूक करावी का? त्यापरीस मी सांगतो तसं पोलिसांना सांगा;' स्वयंपाक करताना स्टोचा भडका झाला आणि म्या पेटले.. यात कोणाचाबी दोष नाही.. बस्स... ' यातच तुमचं आणि गावचं भलं आहे. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. येतो मी."
असं म्हणून पोलीस पाटील हात जोडून निघून गेले. त्यांच्या बोलण्यात तथ्य होतं. यमुनेनं पाटलांन सांगितल्याप्रमाणे जबानी दिली. गंगाधर बाहेर पोलिसांमध्येच घुटमळत व्हता. केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला नव्हता.
माह्या माय आणि बापाला खरं काय ते शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून कळलं. माझा बाप लई कावला. अक्कावर डाफारला. मी खोटी जबानी दिली म्हणून माझाही राग राग केला. जवळपास आठ ते नऊ महिन यमना दवाखान्यात उपचार घेत व्हती. ना नवरा ना सासु -सासरे कुणीबी दवाखान्यात फिरकलं न्हाई. माय माही मह्यासोबत रात पहाट बसून व्हती.
उपचार झाल्यानंतर माय बाप यमनेला इच्छा नसताना माहेरी घेऊन गेलं. सख्या भाच्यानं आपल्या मुलीवर केलेला अत्याचार बापाच्या जिव्हारी लागला व्हता. आक्का आणि दाजी यांच्या बद्दल त्याच्या मनात भयंकर चीड निर्माण झाली. रोज संध्याकाळी कामावरून परतला की दारू पिऊन त्यांच्या नावानं शिमगा करी. माहेरकड वाडीला गावामध्ये बातमी सगळी दूर पसरली. आयाबाया चर्चा करू लागल्या. टोमण मारू लागल्या. हे सारं सहन करण्याशिवाय यमनेकडे पर्याय नव्हता.
दोन-चार महिने उलटले असतील नसतील तोच सांजच्या वेळेला पोस्टमन टपाल घेऊन आला. आपल्याला कोण पत्र पाठीवणार म्हणून आम्ही सर्वच चकित झालतो. पोस्टमनन मायच्या हातात पाकीट टेकवलं.
"अवं साहेब, कोणाचं हाय टपाल?"
"माहित नाही ताई. त्यावर नाव -गाव - पत्ता लिहिला आहे".
"साहेब, इथे कोणाला वाचता येतेया. वाईस पाणी घ्या आणि तेवढं टपाल वाचून दाखवा. या बसा.."
मायनं पोस्टमनला टेकायला जागा दिली.
"ताई कोर्टाची नोटीस आहे."
कोर्टाचं नाव ऐकताच माय लय घाबरली.
"साहेब ,आम्ही काय गुन्हा केला म्हणून कोर्टान नोटीस पाठिवली !"
"अहो थांबा. समद वाचून दाखवतो,.. यमुनेच्या नवऱ्यानं वकिला मार्फत तिला नोटीस धाडली आहे.कैक दिसापासून ती माहेरी निघून गेली आहे. नांदायला ये नाहीतर फारकत दे,असं काहीतरी लिहिलंय."
असं म्हणून पोस्टमनने घोटभर पाणी घेतलं आणि हे असं ऐकून मायच्या तोंडचं पाणीच पळालं.
सांच्याला बाप घरी आला.मायनं टपालबद्दल बापाला सांगितलं. बाप लय चिडला.
"आयला, चोर तर चोर वरून शिरजोर, माझ्या पोरीला बाद लावून तिला मारायला निघाला हरामखोर... यमुने, तुझा बाप जित्ता हाय. काय झालं तरी तू आता नांदायला जायचं नाही. होऊ दे आता काय व्हायचं ते. तू काय बी चिंता करू नगस." बाप तावातावात बोलून भिलाटीच्या वाटला लागला.
कोर्टाच्या नोटीसीनं घरातलं वातावरण लईच बिघडलं. आधीच चिंतेत असलेली माय आता कोणाशी बोलेनासी झाली. फार काही कळत नसलं तरी घरातली भावंड भेदरली. यमनेला पोलीस पकडून नेतील, असं काहीसं त्यांना वाटलं. रातीला बाप घरी आल्यावर त्याने लय धिंगाणा घातला. जमतील तेवढ्या शिव्या हासडल्या. शांत रहा, असं म्हणून समजवायला गेलेल्या मायेच्या थोबाडीत ठेवून दिली. कारण नसताना तिला मायबापावरून मोप शिव्या हासडल्या. राग काढायचा तर बायकोशिवाय दुसरी सोपी जागा कोणती असती नवऱ्याजवळ !
रातीला यमुना अंथरुणावर पडली. भोक पडलेल्या पाचटाच्या आढ्याकडे पहात ती विचार करू लागली. माझ्यामुळे हे सारं घडतंय. आधीच लग्नासाठी बापानं उचल घेऊन सावकाराकड गहाण पडलाय . मायच्या एकट्या मजुरीनं घर चालतंय. त्यात माझी भर कशाला... त्या परीस आपण नांदायला जावं. जो काही तरास व्हईल तो मुकाटपणे सहन करावा,असं यमुनेला वाटलं. म्या नांदायला जाते ', असं जर बापाला सांगितलं तर तो जाऊ देणार न्हाई. 'इकड आड तिकडं ईहीर ' अशी यमुनेची अवस्था झाली.
दुसऱ्या दिवशी मायबाप कामाला गेलं. घरातल्या भावंडांना नदीवर कापड धुवायला जाऊन येते,असं सांगून घरातून निघाली. नदीवर गेली. नदीच्या पाण्यात पाय टाकून बसली. पाण्याच्या वाहत्या प्रवाहाकड पाहून काहीतरी ईचारात ती गढून गेली. उगमापासून मुखापर्यंत नदी वाहत असती. वाहताना काट्याकुपट्यातून खाचखळग्यातून लई तिला अडचणी येत्यात. पर म्हणून ती काही वाहनं थांबत न्हाई. बाईच्या जल्माच पण तसंच हाय. जन्मापासून दुःखाच्या अनेक खाचगळग्यातून तिला जावं लागतं. म्हणून काय जगणं थांबत काय. झालं गेलं सुखदुःख सगळं विसरून चालत राहायचं,वाहत राहायचं या निर्मळ गंगेसारखं... आज खरंतर यमुना स्वतःला गंगेच्या पाण्यात अर्पण करायला निघाली व्हती. पर गंगेन तिला असं करण्यापासून वाचिवल. इतका तरास, अन्याय सहन केला; अजून एक संधी देऊन पहायला काय हरकत आहे, असं म्हणून यमनेनं नांदायला जायचा निश्चय केला. अंगावरच्या वस्त्रांनीसी यमुना गंगाधरच्या वाटला लागली.
संध्याकाळ झाली तरी यमुना नदीवरून परतली न्हाई म्हणून घरचे सगळेच घाबरले व्हते. कामावरून आलेला बाप तसाच नदीवर सैरावैरा धावत सुटला. बापाचं काळीज ते ! भीतीनं त्याला कापरं सुटलं व्हतं. तोपर्यंत सूर्य अस्ताला गेला व्हता. यमना त्याला कुठच दिसली न्हाई. यमनान पाण्यात जीव दिला की काय .. असं वाटून तो धाय मोकलून जीवाच्या आकांताने रडत.. ...ओरडत सुटला.
"यमुने,यमुने..., असं काय ग केलस.."
बापाचा आवाज ऐकून दामू आण्णानं बापाला हटकलं.
" येसा,अरे काय झालं बाबा..."
"आव, सकाळपासून माझी यमना नदीवर आलती. आता पातुर घरी पोहोचलीच न्हाई. कुठ दिसली का ?"
"सूर्यमाथ्यावर आलता तवा ती मला सडकेला दिसली. मी म्हणलं कुठे चाललीस? तर म्हणली, "सासरला चालली." तुला सांगून नाही गेली का? आरं दारू कमी पीत जा बाबा .."
"व्हय जी..."
दामू आण्णाचं बोलणं ऐकून बापाच्या जीवात जीव आला. येताना भिलाटीतून जाऊन आला. "जाऊ नको असं मी सांगितलं असताना देखील यमनी गेली. जा मर म्हणावं... म्हणजे स्वतःच्या जीवाला आणि आम्हाला देखील घोर लागणार न्हाई. आता जर घरी परत आली तर तिला दारात उभं करायचं नाही. ती मला मेली आणि मी तिला मेलो.".दारूच्या नशेत यमनीला आणि मायला शिव्या हासडत राहिला.
गाठीला रुपया नसताना यमना सडक, काट्याकुपाट्या तुडवत गंगाधरच्या नोकरीच्या गावी दाखल झाली. भल्या पहाटे तिनं दरवाजा ठोठावला. यमुनेला दारात पाहताच गंगाधर दचकला. त्याला वाटलं होतं यमना आता नांदायला येणार न्हाई. त्या ऐवजी तिला नांदायचं नाही, असं कोर्टात सिद्ध करून फारकत घेता येईल. परंतु समोर यमुनेला पाहताच त्याच्या आनंदावर ईरजण पडलं. चेहरा सुरकुतला. चालून चालून थकली भागलेली यमुना नवऱ्याच्या पायावर लवली. धन्य ती भारतीय नारी आणि धन्य तिची सहनशीलता!
घासलेट टाकून यमुनेला पेटवून दिल्याचा कोणताच पश्चाताप त्याच्या मुसड्यावर वर दिसत नव्हता. उलट, नऊवारी साडीतल तारुण्य पाहून त्याची वासना जागृत झाली. सावज टप्प्यात येतंय तोवर पडून राहिल्याचं सोंग करणाऱ्या सर्पाप्रमाण त्यान तिला मिठी मारली. नवऱ्यानं असं जवळ घेतल्याचं पाहून यमना भाळली. त्याची वासना शमली तशी तिच्या प्रेमाची भूक ...
गंगाधरच्या स्वभावात बदल झाला असं पाहून यमना मागचं सारं काही इसरून पुन्हा संसारात रुळली. तिला हुरूप आला. आंग मोडून कामाला लागली.
चार आठ दिस गेले. नवऱ्यासाठी काय करू आणि काय नग करू.. असं तिला झालं. माय बापाला हेआसं पाहून लै बरं वाटलं असतं.पर त्यास्नी न सांगता त्यांच्या मनाविरुद्ध ती नवऱ्याकड निघून आली. त्याचा बापाला लई राग आला व्हता. तसा तो लई मानी.कधी नव्ह तो आज गंगाधर शाळा सुटल्यावर लवकर घरी आलता. आज यमनाबी लय खुश व्हती. कारण तसंच हुतं. ज्या गोष्टीमुळ तिची सासू आणि सासरचे लोक तिला वांझोटी म्हणून घालून पाडून बोलत व्हते. ती गोष्ट आज तिला गावली व्हती. सकाळ धरण तिला चक्कर आणि मळमळत व्हतं.कधी ही बातमी गंगाधरला सांगते,असं तिला झालं व्हतं. गंगाधर आला.पलंगावर पडला.
" आवं, बरं नाही का तुम्हासनी?
"न्हाई.. असं काही न्हाई." यमना त्याच्या पायाशी जाऊन बसली. त्याच्या पायावरून हात फिरवू लागली. त्याने पाय बाजूला घेतले.डोळे बंद करून गंगाधर पडून राहिला.
"म्या काय म्हणती?"
" काय ? "
"मला आज सकाळपस्न कसंतरी व्हतय."
"मग मी काय करू? गुळीबिळी घे.."
"आवं, तसं नव्ह."
"मग कसं..?"
" आपल्या घरी ग्वाड बातमी हाय.देव पावला म्हणाना.."
"काय झालं काय?"
" तुम्ही बाप व्हनार हाय."
"काय..? असं कसं शक्य आहे ? कोणाचं पाप घेऊन आलिया? तुझा माझा कायबी संबंध नसताना असं कसं व्हईल? मला आधीपासूनच शक व्हता.तुझं गावात कोणाशी तरी झंगाट हाय. त्याशिवाय का तू इतक्या दिस माहेरी ऱ्हात व्हतीस..?
"आव ,असं नका म्हणू. पाया पडते मी तुमच्या. तुमच्याशिवाय मी कुणाचा हात सुदीक लागू देत न्हाई. आया मावल्यांची शपथ, हे तुमचंच हाय."
यमुनेनं त्याचे पाय धरले. ती गयावया करत व्हती.त्यान तिला लाथडली.तिच्या केसांचा जुडा धरून तिला भिंतीवर आपाटली.
"आवं,आज पर्यंत म्या तुमचा लई मार खाल्ला.आता पोटातल्या जीवाचा तरी इचार करा. त्याची तरी कीव करा."
"जे माझं न्हाई त्याची मी का कीव करावी ?बाहेर शेण खाऊन माझ्या घरात घाण करायची नाही. चालती हो... माझ्या घरात राहायचं नाही."
"आवं असं नगा करू. काय वाटेल ते करा; पण घरातून बाहिर नका काढू.'
यमना गयावया करत व्हती. परत परत त्याच्या पाया पडत व्हती.त्यानं तिला फरपटत दाराबाहेर काढली.गल्लीत तमाशा नको म्हणून तिन ती रात्र बाहेर काढली.तरीही त्याला तिची किव न्हाई आली.आधी मूलबाळ व्हतं न्हाई म्हून फारकत मागणारा नवरा आता दिस गेलं तरी नादवत न्हाई.याचं काय कारण असू शकेल..? या ईचारात ती रातभर तशीच बाहेर बसून रहायली. मुळात त्याला दुसरीशी लगीन करून संसार करायचा व्हता. यमनेशी फारकत घेण्यासाठी तो निरनिराळी कारण शोधत व्हता. आधी अडाणी म्हणून हिणवलं.नंतर चारित्र्य चांगलं न्हाई म्हणून बे इज्जत केलं. त्यानंतर मूल व्हतं नाही म्हणून वांजुटी म्हणून प्रचार केला. आणि आता छिनालपणाचा खोटा पुरावा समाजापुढे मांडून हा फारकत मागणार... यमनेवर कोण विश्वास ठेवल ? चार-आठ महिने माहेरी नवऱ्याला सोडून रहायलेली यमना गंगाधरकडे आल्यावर गर्भार कशी?अशी सहज शंका लोकांना येईल. आपल्यावर कोणीच विश्वास ठेवणार न्हाई. हे तिच्या लक्षात आलं. आता तिला कळून चुकलं व्हतं की,काही झालं तरी गंगाधरला तिच्याशी संसार करायचा नव्हता. तिन स्वतःला सावरलं. वाटलं होतं विहिरीत जाऊन जीव द्यावा. , पर आता पोटातल्या जीवाचं पातक लागल.म्हणून तिन स्वतःला सावरलं.
दुसऱ्या दिशी पहाटेला तिन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मायबाप माफ करणार नाही. त्यांची इच्छा नसताना देखील, त्यांनी न्हाय सांगून बी यमनी गंगाधरकड आली व्हती.जायचं तरी कुठं? माहेरी...जाऊन तर पहावं, म्हणून रान.. सडक तुडवत...उपाशी तापाशी ती बापाकड पोहोचली.
सायंकाळची येळ व्हती. पोरसोरांना यमना आल्याचा लई आनंद झाला. मायन जीवाभावानं ईचारपूस केली. तिला बरं वाटलं.
" बापान तुला घरी पाहायल तर तुझं बी खरं न्हाई अन् माझं बी खरं न्हाई."
"माय,म्या चूक केली हाय. तर बापाचा रागबी म्या सहन केलं पायजेल.माय, मला दिस गेल हाईत."
"पोरी सांगतेस काय.. लय झाक झालं !"
"पर त्याचं म्हणणं हाय, हे पोर त्याचं न्हाई..! यावरून त्यानं मला काल लय बदडलं. घराबाहिर काढलं. त्याला माझ्या संगट संसार न्हाई करायचा.पोटातलं पोर मला वाढवायचा हाय माय.म्हणून म्या निघून आले."
माय हळहळली. पण नवऱ्यापुढं तिचं काय बी चालत नव्हतं.नेहमीप्रमाण बाप घरी येतानाच भिलाटीतून टाकून आला. वट्ट्यावर मला पाहताच त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांन मायच कायच आयकुन घेतलं न्हाई. "जिला बापाची कदर न्हाई, तिची मला गरज न्हाई. तू आम्हाला मेलीस आम्ही तुला..."
मायन यमनेला घरातून निघून जाण्यासाठी खुणावलं. यमुनाा तशीच वट्ट्यावरून उठली अन् चालती झाली नदीकड. माय माझ्या मागणं धावत आली. तिच्या वळखीच्या सखुबाईकड रातभर राहण्याची माझी सोय तिनं केली.
दुसऱ्या दिशी गावच्या वाटेवर...बाहेर वस्तीत एक छोटसं खोपट भाड्यान घेतलं.
" बाई भाडं तुला भरावा लागल. जमल तसं कामधंद्यावर जा.यापेक्षा मी तुला काही मदत करू शकत न्हाई." नवऱ्यान सोडली.बापान हाकलली. यमुनेची जगायची इच्छाच मरून गेली. पण पोटातलं जीवासाठी जगलं पाहिजे.
यमुना गावात मिळेल ते काम करू लागली. शेतात राबू लागली. विहीर-सडकांवर कामाला जाऊ लागली. पोटातल्या अंकुरासाठी एक एक दिवस कठू लागली. गावात राहून देखील बापामुळे घरी जाता येत नव्हतं.यमना मोलमजुरी करून दोन पैकं गाठीला बांधत व्हती.
दिसा मागून दिस गेलं. यमुनेेन गोंडस पोरीला जलम दिला. चोरून लपून माय येत व्हती. पोरीला हव नको ते पाहत व्हती. तिचं नाव ' सिंधू ' ठेवलं.बापाला वार्ता कळली.नात झाली म्हणून.
"म्या काय म्हणती.?
" हा काय ते..?"
"आपली यमनी बाळातीन झालीया. पोरगी झाली."
"म्हणून मग मी काय खारीक खोबरं घेऊन जाऊ म्हणतेस.." बाप खवळला.
"न्हाई म्या आपल सांगितलं फकस्त.. एकलीच हाय. बिचारीचं कसं हुतं असल.. चिंता वाटतीया ."
बाप ईचारात पडला.बसल्या जागी अंगठ्यानं माती उक्रीत राह्यला.थोड्या येळान म्हणलं,"रखमे मला यमनेची लय आठवण येतय बघ.तु तरी जाऊन ये तिच्याकड. काय हवं नको ते बघ अन् म्या लय कावलय, असं सांग तिला." कनवटीला असलेली पाच रुपयाची नोट काढली. रखमाच्या हाती ठिवून म्हणलं," वाण्याकडून खारीक- खोबरं घिऊन जा. माझ्याकडून पोरीचा मुका घे. माझ्या पोरीला आशीर्वाद दे..." बोलता बोलता धोतराच्या सोग्यान त्यांन डोळ टिपलं. मायला लय बरं वाटलं.
मायचं अधून मधून माझ्याकडे येणं जाणं सुरू व्हतं. आठ महिन्यात त्यानं पुन्यादी कोर्टाची नोटीस धाडली. नांदायला ये नाहीतर फारकत दे... असं त्यांन माझं खेळणं केलं व्हतं. खेळून झालं की अडगळीत टाकून द्यायचं. आज पावत त्याचा लय तरास सहन केला. मार खाल्ला. शिव्या खाल्ल्या.बेअब्रू सहन केली. पर आता ठरीवलं व्हतं , त्याला चांगला धडा शिकवायचा. कायबी झालं तरी याला फारकत द्यायची न्हाई......
यमनी सांगण्यात आणि शेटे वकील ऐकण्यात गुंग झाले होते. सूर्य मावळतीला आला होता.
"साहेब, म्या निंघते. वाडीला जायची शेवटची गाडी गेली तर माझी पंचायत व्हईल."
रुमालानं चष्म्याच्या काचा साफ करत शेटे वकील उठले. जाताना त्यांच्यातला वकील जागा झाला. "यमुनाबाई, तरीही विचार करा. काय द्यायचं- घ्यायचं असेल ते मी पाहतो. तुम्ही फक्त तयार व्हा...."
आग होणाऱ्या डोळ्यांनी यमुनेनं शेटे वकिलाकडे कटाक्ष टाकला.पोरीला काखेला मारली आणि ती स्टँडच्या वाटेला लागली. यमुनेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात शेटे वकील विचार करीत राहिले. यमुनेची कथा ऐकून गंगाधरला त्यांनी मनोमन खूप शिव्या दिल्या. परंतु नीतीमूल्यांनी पोट भरत नसतं.. याची त्यांना आठवण झाली. शेटे वकील हताश होऊन घरी परतले....
सहा महिन्यानंतर पुन्हा कोर्टाची तारीख होती. यमुना पोरीला घेऊन कोर्टात हजर झाली. वारंवार कोर्टाची पायरी चढून ती देखील वैतागली होती.पैसा खर्च होत होता.गंगाधरकडून तिला कशाचीच अपेक्षा नव्हती. नवरा, सासू- सासऱ्याने दिलेला त्रास, सासूने आईवर लावलेला छिनालकीचा आरोप या साऱ्यांनी सुडाची भावना तिच्या डोक्यात भिनली होती. आजच्या कोर्टाच्या तारखेला नवरा, सासू-सासरा सारे उपस्थित होते. कारण आज कदाचित कोर्ट निकाल देऊन गंगाधरला फारकत मिळेल, असे त्यांना मनोमन वाटत होते. कोर्टाची कारवाई सुरू होण्याआधी शेटे वकील यमुनेला भेटला.
" बाई, जरा सबुरीना घ्या.तुमची काय अपेक्षा असेल ती पुरी करतो. बोला... किती भरपाई हवी? पण एकदाचा होकार द्या. असं बी तुमचा काय फायदा आहे? कोर्टाच्या तारखा पडत राहणार. तुम्हाला येरजारा घालत राहावं लागणार. खर्च होणार.फायदा बी काय होणार नाही. त्या परिस तुम्ही फारकत देऊन टाका. थोडाफार काहीतरी झोळी भरायला सांगतो. घेऊन टाका आणि मोकळ व्हा."
"वकील साहेब... मी तुम्हाला सांगितलं ना मला फारकत द्यायची न्हाय अन् त्याचा पैकापण नको हाय. माझ्या पोरीचं पोट भराया मी भक्कम हाय." "यमुनाबाई...शांत व्हा असं किती दिस सुरू ठेवणार आहात? कडेवरची पोरगी लग्नाला येईल.. तोवर का? किती दिवस असा भिजत घोंगडं ठेवाल..? तुमच्या फारकत न देण्याने त्याचं काय झालंय तो तर मजा मारतोय.पोर मोठी होईल...शाळेत जाईल..मग नाव कोणाचं लावाल? तिला समजायला लागल्यावर तिची काय समजूत काढाल..? हा गंगाधर कोण?..असं तिने विचारलं तर काय उत्तर देणार..?"
पोरीला कमरेवर घेऊन उभी असलेली यमुना दगडी खांबाला टेकली. शेटे वकिलाचं म्हणणं तिला कुठेतरी पटू लागलं होतं. विचारांच वादळ तिच्या मनात सुरू झालं, ते तिच्या चेहऱ्यावर दिसू लागलं.
"यमुनाबाई, ऐकताय का.. पोरीसाठी काहीतरी रक्कम द्यायला सांगतो. म्हणजे तिची पर्वरीस होण्यात थोडा हातभार लागेल.विषय मिटवा.बोला किती रक्कम हवी...?"
रक्कम... शब्द ऐकताच तिची तळपायाची आग मस्तकात गेली. ती शेटे वकिलावर चरफडली.
"वकील साहेब... पैका पैका काय करता...पैकातर कोण भी कमविल.पण माझी आणि माझ्या माय- बापाची जी अब्रू गेली, ती परत मिळवून द्याल का..
? माझ्यावर झालेला अन्याय,अत्याचार, जुलूम याची परतफेड होईल का? नीतिमत्ता नसलेल्या अशा माणसाचा पैका घेऊन मी तरी काय करू..? त्याच्या कवडीलाबी म्या हात लावणार न्हाय."
"यमुनाबाई, शांत व्हा. तुमची समधी कथा मला ठाऊक आहे.विचार करा. फारकत देऊन टाका. पुन्हा त्याचं तोंड पाहू नका. विषय संपवा. पैसा नको ...मग तुमची दुसरी काही इच्छा आहे का?"
बराच वेळ शांततेत गेला.... यमुनाबाई काहीच बोलत नव्हती. अंगड टोपडं घातलेली तिची गोंडस पोरगी जमिनीवर तिच्या पायाभोवती खेळत घुटमळत होती.आईच्या आयुष्यात आलेल्या वादळाची त्या पोरीला पुसटशी देखील कल्पना नसावी. विचाराने आणि रागाने यमुनेचे डोळे लालबुंद झाले. शेटे वकिलाच्या चोंबडेपणाची आणि वकिलीची तिला कीव आली. न राहून ती वकिलाला म्हटली.
" वकील साहेब... मी फारकत देईन.पण माझी एक अट हाय."
शेटे वकिलाच्या जीवात जीव आला. कोणाचं काहीही होऊदे..केस मिटली म्हणजे फी मिळणार... राजा मरो की राणी मरो... वकिलाला त्याच काही देणं घेणं नव्हतं.क्षणाचाही विलंब न करता शेटे वकील म्हटले," यमुनाबाई.. बोला तुमची काय अट आहे? मागाल ते मिळवून देतो. पण तुम्ही फारकतीच्या कागदावर तेव्हढा अंगठा मात्र ठेवा."
" हे पहा वकील साहेब... माझी सारी कथा मी तुम्हाला सांगितली हाय. माझा काही दोष नसताना माझी आणि माझ्या आयुष्याची राख रांगोळी झालिया. लई सोसलं म्या.वरून समाजात, गावात माझी आणि माझ्या माय-बापाची अब्रू चव्हाट्यावर टांगली गेली. काय बी केलं तरी त्याची परतफेड व्हणार नाही. ते मला बी कळतंय.पण जज साहेबांच्या समोर माझं पायताण काढून त्याच थोबाड रंगवायचं हाय अन् भर कोर्टात माझ्या सासूच लुगडं फेडायचं हाय...बस निदान माझं मन शांत होईल. पहा हाय का तुमची तयारी.. असं झालं तर .....मी फारकतीच्या कागदावर अंगठा ठेवायला तयार हाय." यमुनाबाईचं असं बोलणं ऐकल्यावर शेटे वकीलला घाम फुटला. खिशातला रुमाल काढून त्यांन घाम पुसला. त्याची बोबडी वळली.. यमुनाबाईचं बोलणं ऐकून वकील थंडगार पडला. काय बोलावं.. ते त्याला सुचेना. त्याला कोरड पडली.कायद्याची बूक वाचलेल्या शेटे वकिलाला यमुनेसारख्या अडाणी बाईनं पेचात टाकलं होतं.
"यमुनाबाई सबुरीनं घ्या.भर कोर्टात तुम्हाला असं नाही करता येणार."
"मग ठीक हाय, मी फारकत नाही देणार. मला काही घाई नाही."
शेटे वकील आता पार घायतळीला आला होता.
" बरं बाई,मी बघतो. थोडा टाईम द्या:मला."
" घ्या,घ्या माझ्याकडे लई टाईम आहे. तुम्हासनी हवा तेवढा टाईम घ्या. पण माझ्या अटीप्रमाणे होणार असल तरच परत माझ्याकडे या." यमुनाबाईच्या निर्वाणीचा शब्द ऐकून शेटे वकील त्याच्या पक्षकाराकडे गेला. शेटे होतील पेचात पडला होता. कोणाशी बोलण्याची सोय नव्हती. कोर्टाची वेळ झाली....
ऑर्डर ऑर्डर...
प्लीज मेंटेन द सायलेन्स... कृपया शांतता राखा. शांतता होतीच; पण तरीही जज साहेबांनी टेबलावर दोनदा हातोडा आदळला. त्याने शांतता भंग झाली. शिरस्तेदारांनं पुकारा केला. "यमुनाबाई हाजीर हो...", यमुनाबाई कठड्यात उभी राहिली.जज साहेबांच्या आदेशानं सुनावणीच्या कारवाईला सुरुवात झाली. वकिलांचे सवाल जवाब सुरू झाले. शेटे वकील, सरकारी वकील यांनी यमुनाबाईंना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कोणालाच दाद देत नव्हती. ती तिच्या निर्णयावर ठाम होती.हे लक्षात आल्यावर शेटे वकीलाने यमुनाबाईला डोळ्यांनी खुणावलं. यमुनाबाई झरझर कठड्यातून बाहेर आली आणि गंगाधर बसलेला होता,त्याच्याकडे गेली. पायातली चामडी वहान काढली आणि तिने दोन तीन फटके त्याच्या थोबाडात ठेवून दिले.भर कोर्टात असं काय घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती. एकच गोंधळ उडाला. महिला पोलिसांनी यमुनेला पकडले आणि पुन्हा कठड्यात उभी केली.
"यमुनाबाई, कोर्टासमोर तुम्ही असं वर्तन केल्याने तुम्हाला शिक्षा होऊ शकते.याची तुम्हाला कल्पना आहे का?"जज साहेब ओरडले.
"व्हय साहेब.माफ करा. पर त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती लाभली नसती. आता म्या फारकत द्यायला तयार हाय."झालेल्या प्रकाराबद्दल यमुनेंन जज साहेबांची माफी मागितली."साहेब पैशाने भरपाई करायची तरतूद तुमच्या कायद्यामध्ये आहे. पण आत्म्याला झालेली इजा भरून काढण्याचा उपाय तुमच्या बुकात नाही; म्हणून मला हे करावं लागलं."
हरकतीची जुजबी प्रक्रिया शेटे वकीलाने पूर्ण केली. गंगाधर, यमुना दोघांच्याही सही - अंगठा झाला. मनानं कधीही जवळ न आलेल्या दोघांची आज कायद्याने फारकत झाली होती. भर कोर्टात चारचौघात चपलेचा मार मिळाला, तरीही फारकत मिळाल्याचा आनंद गंगाधरला होता. सासू -सासरे वरवर खुश झाले होते. सर्वजण कोर्टाच्या बाहेर पडले. आडोशाला उभी राहून यमुना कोणाची तरी वाट पाहत होती.
सासू गोतमाबाई बाहेर पडून पायऱ्या उतरू लागली. यमुनेनं लगबगीने येऊन नऊवारीतल्या सासूच्या काष्ट्यालाच हात घातला आणि क्षणार्धात ती गर्दीत दिसेनाशी झाली. पुन्हा एकच गोंधळ उडाला.शेटे वकील स्तब्ध उभा राहून चष्म्यातून सारं काही पाहत होता. मनोमन तोही खुश झाला होता.... पोरीला बखोटीला मारून यमुना जशी निघाली,तशी ती थेट वाडीला पोहोचली. त्यानंतर तिने कधीही गंगाधर, आत्या, मामाजींना कधी तोंड दाखवलं नाही की त्यांची खबरबात घेतली नाही.
महाभारतात एका अबलेला पणाला लावून तिचे वस्त्रहरण चारचौघात करण्यात आले होते;परंतु आजच्या काळात एका अबला स्त्रीने स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला दुसऱ्या एका स्त्रीचे वस्त्रहरण करून घेतला होता. मंथरेने कान भरल्याने रामाला वनवास भोगावे लागला. तशी गोतमाबाईने पोराचे कान भरल्याने यमुनेला भरल्या ताटावरून उठावं लागलं होतं. परंतु आपल्यावर झालेला अन्यायाचा बदला यमुनेनं अशा रीतीने घेतला.
इतिहास साक्ष देतो की ,स्त्रियाच स्त्रियांच्या अध:पतनाला कारणीभूत ठरल्या आहेत. रामायण, महाभारत या काल्पनिक काव्यातले प्रसंग असो की वास्तवात घडणारे अनेक घरगुती कलह स्त्रीच स्त्रीच्या उत्कर्ष आणि अध:पतनाला कारणीभूत ठरतात.स्त्री ही अबला नसतेच मुळी ! सर्व शक्तींचा स्रोत असतो ती;परंतु योग्य वेळी योग्य ती शक्ती वापरली गेल्यास काहीतरी क्रांतिकारी घटना घडल्याची साक्ष इतिहास देतो.सहनशक्तीची परीसीमा म्हणजेच स्त्री !
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नवरा सासू- सासरे आपल्याला नांदू देतील या अपेक्षेवर यमुनेनं सर्व अत्याचार, अन्याय, जुलूम, जबरदस्ती, आरोप, आळ सहन केले. परंतु सर्वार्थाने चहूबाजूंनी घायाळ झालेली ती वाघीण आज चवताळली आणि कशाचाही विचार न करता कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन समाजव्यवस्थेविरुद्ध ती थेट भिडली. आई-वडिलांची इभ्रत वाचवण्यासाठी तिने हे सारं सहन केलं. काय दोष होता यमुनेचा? अडाणी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला, यात तिचा दोष तो काय? तिचं स्वतःचं शिक्षण झालं नव्हतं याला यमुना जबाबदार होती का? की अन्याय अत्याचार सहन करत राहिली यामुळे तिला अशा रीतीने अपमानित होत राहावं लागलं..? नक्की यात तिचा दोष काय होता? आपली समाज व्यवस्था त्याचे उत्तर देऊ शकेल? ऐन तारुण्यात अशी अवहेलना तिला सहन करावी लागली. आयुष्याची कुत्तरओढ झाली. तिच्या मनाचा कोणी विचार केला का? नवऱ्याच्या थोबाडीत चप्पल मारणारी आणि सासूची साडी फेडणारी कुलक्षणी यमुना सर्वांना दिसली..! परंतु लग्न करूनही चारचौघात बायको म्हणून न वागवणारा, सतत दारूच्या नशेत राहून अत्याचार,मारझोड करणारा , ऐन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी बायकोवर रॉकेल टाकून पेटवून देणारा नराधम नवरा,राजरोस परस्त्रीच्या नादी लागलेला, स्वतःपासून गरोदर राहिलेल्या बायकोला दुसऱ्याचं पाप म्हणून हिणवणारा, केवळ भोग म्हणून बायकोच्या नात्याकडे पाहणारा नवरा आणि यमुना व तिच्या आईवर छिनालकीचा आरोप करणारे, त्याला साथ देणारे सासू-सासरे लोकांना दिसले नाही....?
प्राचीन काळापासून अहिल्या, सीता, तारा, मंदोदरी, सावित्री, मीरा अशी स्त्रियांची आदर्श उदाहरणे दिली जातात.परंतु संघर्ष आणि सहनशीलता त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असावी. तिला परीक्षा द्यायला लावल्याशिवाय तिचे श्रेष्ठत्व समाज मान्य करायला तयार नाही. परीक्षा देता देता तिचे अर्धेदिक आयुष्य पणाला लागतं." स्त्री जन्मा ही तुझी कहाणी
हृदयी अमृत नयनी पाणी"
असं म्हणून नुसतं कसं चालेल..? तिला भोगाव्या लागणाऱ्या वेदना, दुःख कधी नाहीसे होईल ? कुटुंबात समाजात तिची होणारी घुसमट कधी थांबेल? स्त्री ही आदिशक्ती आहे. वात्सल्याचा अखंड झरा आहे. तो वाहतच राहील.फक्त त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. पुरुषी मानसिकतेतून कधी तिची मुक्तता होईल का...? आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या असंख्य यमुनांना न्याय मिळेल का.....?
शैलेश पाटोळे
नाशिक
कथा क्र.८
No comments:
Post a Comment