शुभ संध्याकाळ !!
कसे आहात ? मजेत ना .. छान.
हसत रहा l आनंदी राहा ll
आज जागतिक हास्य दिन. त्यानिमित्ताने जगातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषधाची थोडी ओळख करून घेऊया !
मित्रांनो, आपले दैनंदिन जीवनातील ताणतणाव, वैफल्य जर घालवायचे असेल तर त्यासाठी हास्य हे एक प्रभावी औषध आहे. हास्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या आपण आनंदी आणि उत्साही राहू शकतो.ज्याला कोणत्याही परिस्थितीत खळखळून हसता येतं त्यांच्यासारखा सुदैवी दुसरा कोणीही नाही !
दुसऱ्याचे स्वागत हसून केल्याने आपला त्या व्यक्तीबरोबर होणारा संवाद... सुसंवाद बनतो. परंतु,एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, हसावे जरूर परंतु कुत्सितपणे हसू नये!
सततच्या धावपळीच्या जीवनात आपण हसणे विसरतो. त्यात अलीकडच्या काळात कोरोनाची भर पडली आहे. परंतु लक्षात घ्या, हे ही दिवस जातील. आठवतंय ना..
आनेवाला पल जानेवाला है ....
त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या. परंतु चिंता करू नका.
आज-काल कोरोनाच्या परिस्थितीमुळे विनोद या शब्दाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत घरात बंदिस्त असल्यामुळे प्रत्येकजण प्रत्येकाला विनोदी मालिका पहा,वाचन करा, विनोद ऐका, विनोद ऐकवा, मोबाईल मधील विनोदी व्हिडिओ पहा,.. असे एक ना अनेक मोफत सल्ले देताना दिसतात.
खरोखरच आपण हसणे विसरलो होतो का ? या आपत्कालीन परिस्थितीत विनोदाला पुन्हा चांगले दिवस आलेत!
अलीकडे हास्य क्लब स्थापन करून लोक कृत्रिम का होईना हसण्याचा प्रयत्न करतात. कारण हास्य ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. हे मुंबईमधील डॉ. मदन कटारिया या व्यवसायाने डॉक्टर असलेल्या महाशयांच्या लक्षात आले. त्यांनी लाफ्टर क्लब आंदोलन आणि हास्य थेरपी याचे महत्त्व लोकांना पटवून दिले. हास्य म्हणजे शारीरिक , मानसिक, भावनिक आरोग्य जपणारे टॉनिक आहे. असे त्यांचे प्रांजल मत आहे. हास्य थेरपीच्या या चळवळीतून जगभरात शांतता आणि बंधुता नांदावी या हेतूने युनायटेड नेशन्स च्या माध्यमातून डॉ. कटारिया यांनी १९९८ पासून जागतिक हास्य दिन साजरा करण्यासाठी पाऊल उचलले. आज जगभरात १०० देश जागतिक हास्य दिवस साजरा करतात. प्रत्येक वर्षी मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिवस म्हणून साजरा होतो. हास्य विसरलेल्या तुमच्या-आमच्यासारख्या जनतेला हास्याचे महत्त्व यानिमित्ताने कळावे, हा उदात्त हेतू यामागे आहे.
हास्यामुळे आपल्यातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा कार्यान्वित होते. हसण्याने हृदयाचा व्यायाम होतो. खळखळून हसताना शरीरातून इंडॉर्फिन हे रासायनिक द्रव्य तयार होऊन हृदयाला मजबूत करते. तसेच या प्रक्रियेत अधिकाधिक ऑक्सिजनची निर्मिती शरीरात होते. (आजच्या परिस्थितीत ऑक्सीजन सिलेंडरसाठी किती धावपळ करावी लागते !) खाण्याची लालसा कमी होऊन वजन नियंत्रणात राहते. रक्तातील साखर हसण्यामुळे नियंत्रित राहते. दहा मिनिटे व्यायाम केल्यानंतर हृदय जेवढे सक्षम होते, तेवढे एक मिनिट हसण्याने होत असते. हसण्याने कार्टीसोल हार्मोन्स नियंत्रणात राहते. त्यामुळे आपल्याला तणावापासून मुक्ती मिळते. रक्तदाब कमी होतो. चेहऱ्याचा टवटवीतपणा कायम राहतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढून संसर्ग सोबत लढण्याची प्रणाली सक्षम होते. फक्त हसण्याने इतके फायदे आपल्याला होऊ शकतात. हास्य हे औषध कोणत्या मेडिकल दुकानात विकत घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत नाही. गरजेच्या वेळी दाम दुप्पट रक्कम देऊन खरेदी करण्याची वेळ येत नाही. हास्य हे पूर्णपणे मोफत असून ते आपल्यातच असते. पण खरे आहे ...जे मोफत आहे आणि सहज उपलब्ध आहे त्याची माणसाला किंमत नसते हेच खरे ! तुझं आहे तुझपाशी परी, तु जागा चुकलासी !! दवाखान्यात दाखल होण्यापूर्वीच जागे व्हा !
आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे हास्य माणसाचा अहंकार देखील दूर करते !
चला तर मग, आज पासून नव्हे.. नव्हे... आत्तापासून निर्धार करूया. कितीही संकटे आली, मन दुःखी झाले, तरी हास्याचं टॉनिक घेऊन मी त्यावर मात करणारच !!
या महामारीच्या निमित्ताने का होईना आपण सर्वजण घरात आहोत. कुटुंबात आहोत. हास्य आणि आनंद घरात शोधा. घरातील मुला माणसांमध्ये आनंद आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या एका भावगीतात त्या म्हणतात...
घरात हसरे तारे असता
मी कशाला पाहू नभाकडे !
छकूल्यांची ग प्रशांत वदने
गोड गुलाबी गाली हसणे
अमृत त्यांच्या ओठी असता
कशास मधुघट हवा गडे.. ll
गोकुळ येथे गोविंदाचे
झरे वाहती शांती सुखाचे
वैभव पाहून मामा सदनीचे
ढगा आड ग चंद्र दडे ll
आताचे कोरोनाचे आलेले संकट तात्पुरते आहे. आपण सर्वांनी सहकार्य केल्यास हे संकट फार काळ टिकेल,असे वाटत नाही. याकरिता आपल्याला घरात राहून जे करता येईल ते आपण केले पाहिजे. गर्दी टाळा. मूखपट्टी वापरा. वारंवार हात धुवा. काळजी घ्या. चिंता करू नका कारण सुप्रसिद्ध नाटककार गो. ब. देवल यांच्या एका नाट्यगीतात म्हटल्याप्रमाणे..
इश् चिंता निवारील सारी
भाव निश्चलपणे ठेवी तू त्यावरी
संकटे शत जरी प्राप्त झाली
सर्व संभाळूनी योग्य काली
करील कल्याण तो चंद्रमौली
पूर्ण विश्वास या विप्रवचन धरी ll
त्यामुळे जग निर्मात्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवू या. सुखाबरोबरच दुःखाला देखील मित्र बनवा. दुःख आपोआप नाहीसे होईल.
राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुखतो अपना साथी है l
हेच खरे आहे. जागतिक हास्य दिनाच्या निमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आरोग्यदायी जीवनासाठी सदिच्छा !
लेखन
शैलेश पाटोळे
नाशिक
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
17 comments:
सर...हास्य विषयावर खूप छान माहिती...!!!
अप्रतिम लेख सर जी
खूप सुंदर लेख
विशेषतः आजच्या काळात!
-विवेक पाटील
Laughter is the best medicine..... Once again your article has proved it Hon. Shri Patole sir..... Wonderful 👍👍🌹🌹👍👍
Poonam Pendse
Sundar lekh jagtik hasya dinachya Hardik shubhechha जागतिक हास्य दिनानिमित्त शैलेश,,,,माझ्या मित्राने एक अतिशय सुंदर असा लेख लिहिलेला आहे हसण्याचे महत्त्व अगदी कमी शब्दात प्रभावीपणे मांडले...ही त्याची हातोटी आहे छान लेखन... हसता हसता मित्राला हास्य शुभेच्छा!!!👌👌👌👌👌😄😄😄😄😁😁😁😁🌹🌹🌹
Nice one sir
Very nice Sir 👌🙏👍
खूप चांगली माहिती वाचण्यास मिळाली.हसणे आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे या लेखातून समजले.
👍👌🙏🙏
सौ.राजश्री खोडके.
हसते हसते कट जाए रस्ते जिंदगी युही चलती रहे. साधे सरळ मनाला भावेल असे लेखन.
😄🤘🤘👍👍😄
खूपच छान सध्याच्या परिस्थितीमध्ये धैर्याने तोंड देणे आवश्यक आहे. आणि धैर्य म्हणजे काय तर हसत हसत समोरच्या संकटावर मात करणे होय. आणि म्हणूनच हसते हसते कट जाए रस्ते हे शीर्षक अतिशय योग्य आहे.
खूपच छान सध्याच्या परिस्थितीमध्ये धैर्याने तोंड देणे आवश्यक आहे. आणि धैर्य म्हणजे काय तर हसत हसत समोरच्या संकटावर मात करणे होय. आणि म्हणूनच हसते हसते कट जाए रस्ते हे शीर्षक अतिशय योग्य आहे.
सुहास्य वदन मनास मोहीम.हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हासता आहात ना !हासलेच पाहीजे.
हास्य दिनानिमित्त खूपच छान लेख वाचण्यास मिळाला. धन्यवाद !आजच्या सध्याच्या परिस्थितीत त्याची फारच आवश्यकता आहे
हसते हसते कट जाएगें रस्ते !
हास्य म्हणजेच आनंद ज्याला कोणतीही चौकट नाही.दु:ख आले की चातक पक्ष्याप्रमाणे आपण आनंदाचे आभाळ शोधण्यासाठी धडपडतो.हास्य सृष्टीच्या कणाकणात आहे,फक्त शोधा व मोकळ्यापणाने व्यक्त व्हा.
शैलेश मित्रा, छान लेख लिहिलेस.हास्य दिनाच्या हास्यमयी शुभेच्छा
Very well written....nice post sir
खूपच छान हलके फुलके आणि गालावर स्मित आणणारे विचार .प्रेरणादायी ! अभिनंदन !खरेच ह्या संकट काळी हे गरजेचे होते . धन्यवाद ! आपणास ही ईश्वर सतत असेच हसमुख ठेवो .आपल्या मुले इतर ही लोक हसत राहोत .लेख खूप परिपूर्ण.
Post a Comment