एका सुंदर सजवलेल्या हॉलमध्ये एका वक्त्याचे भाषण सुरू होते. साधारण शंभर लोक भाषण ऐकत होती. तेवढ्यात वक्त्याने अशी उद्घोषणा केली की, मी प्रत्येकाला एक फुगा देणार आहे. त्या फुग्यावर प्रत्येकाने आपले नाव लिहा. नाव लिहून झाल्यावर सर्व फुगे त्याने गोळा केले. संपूर्ण हॉल मध्ये फुगे विखुरले गेले. वक्त्याने मग सर्वांना सूचना केली की, आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःचा फुगा शोधून स्वतःजवळ ठेवा. शंभर फुग्यांमध्ये स्वतःचा फुगा शोधणं जवळपास कोणालाच शक्य झाले नाही. थोड्या वेळानंतर वक्त्याने सांगितले की ,आता मिळेल तो फुगा तुम्ही पकडा आणि त्यावर ज्याचे नाव असेल त्याला तो फुगा द्या. अगदी दोन मिनिटात ज्याचा फुगा त्याला मिळाला.
सर्वजण आपापल्या जागेवर बसले आणि मग वक्त्याने भाषणाचा समारोप करताना म्हटले की, स्वतःचा आनंद शोधतांना विखुरलेल्या फुग्यातून स्वतःचा फुगा शोधणे जसे अवघड गेले, तसे आनंदाचे आहे. त्याऐवजी दुसऱ्याचा फुगा आपल्या जवळ आल्यानंतर ,आपण त्या व्यक्तीकडे तो सुपूर्द केला. त्यातून ,माझा फुगा मला मिळाल्याचा आनंद झालाच परंतु दुसऱ्याच्या आनंदाला आपण कारणीभूत ठरतो आहे.याचा आंतरिक आनंद काही औरच असतो. सुख आणि आनंद यात हाच खरा फरक आहे.
मित्रांनो, तुम्ही म्हणाल, आता ही गोष्ट सांगण्यामागे कारण काय? सांगतो..
दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेमार्फत सन.२०१२ पासून १५६ देशांचा जागतिक आनंद अहवाल जाहीर केला जातो. नुकताच २०२० यावर्षीचा अहवाल प्रसिद्ध झाला . देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, निरोगी जीवन, सामाजिक स्तर ,स्वातंत्र्य, विश्वास आणि उदारता या घटकांचा विचार करून अहवाल तयार केला जातो.
आता तुम्ही म्हणाल यात आपला म्हणजे भारताचा क्रमांक कितवा? अंदाज करा बरं.....!
या अहवालात भारताचा क्रमांक आहे १४० वा...!!
पहिला क्रमांक आहे, फिनलंड या देशाचा. यावरून आपण भारतीय किती आनंदी आहोत,याची कल्पना आपल्याला आली असेलच ! या अहवालाने आपण भारतीयांना आरसा दाखवला आहे, हे मात्र खरे !
केवळ भारतीयच नव्हे तर जगभरातील सर्व देशांचा आनंदी असण्याचा आलेख घसरत चालला आहे. जगात आर्थिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचा क्रमांक देखील एकोणिसावा आहे. ही अधिक चिंताजनक बाब आहे. याचाच अर्थ असा पैसा,धन, संपत्ती असणे याचा आनंदाशी काहीही संबंध नाही.
या वर्षाच्या आनंद दिवसाची थीम आहे," सर्वांसाठी एकत्रित आनंद ".(Happiness for all together ). जागतिक मानव कुटुंबातील ७.८ अब्ज मानवी सदस्यांना म्हणजे पृथ्वीवरील सर्व मानवजातीला कोविड - १९ विरुद्ध लढण्यासाठी एकता आणि दृढ संकल्प करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन यातून केलेले आहे.
आनंद म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना आयुष्यभर पडत असतो. सुख मिळविण्यासाठी सर्वजण धडपड करत असतो. कुणाला तो गवसतो तर अनेकजण खऱ्या आनंदाला मुकतात.
आनंद मिळाला म्हणजे मनुष्य खुश होतो. सुखी होतो .आनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. यामध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शविली जाते .आनंद हा आपली मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो.
सुख आणि आनंद यात काही फरक आहे का?
सुख हे भौतिक गोष्टींशी निगडित आहे आणि आनंद आंतरिक गोष्टींशी. रस्त्यावर चालताना मला दहा रुपये सापडले आणि मी आनंदी झालो. कारण ते माझे नव्हते, तरी ते मला मिळाले. माझ्या मित्राला शेअर मार्केट व्यवसायात एक लाख रुपये मिळाले परंतु,तरीही तो दुःखी कारण त्याची अपेक्षा दोन लाखांची होती.
घरात सर्व सुखसोई, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रिज, फ्लॅट,गाडी,नोकरी, पत्नी-मुले ,इतके असले की, मी सुखी होईल असे सर्वांना वाटते. परंतु, हे सर्व असूनही माणूस आनंदी असतो का?
सापेक्ष आणि निरपेक्ष कर्म या दोन गोष्टी आनंदासाठी कारणीभूत असतात. कोणतेही कर्म करताना अपेक्षा ठेवून कर्म केले की,आनंद मिळण्याची शक्यता कमी होते. त्याउलट निरपेक्ष निस्वार्थ भावनेने कर्म अथवा कार्य करीत गेल्यास आनंद प्राप्तीची शक्यता शतपटीने वाढते.
अपेक्षा या वाढतच असतात. अपेक्षापूर्ती झाली की आनंद आणि अपेक्षा भंग झाला की दुःख! याचा अर्थ सुख मानण्यावर अवलंबून असतं .म्हणजे माझे सुख माझ्या आचार-विचार ,अपेक्षांवर अवलंबून असते .याचा सरळ अर्थ असा आहे की , आपल्याला बाहेरून कोणीही सुखी अथवा दुःखी करू शकत नाही. आपल्या सुखदुःखासाठी आपणच कारणीभूत असतो.
मुलगा किंवा मुलगी झाल्यावर त्याने किंवा तिने आई - बाबा असा शब्द उच्चारल्या नंतरचा जो आनंद असतो, तो खरा आनंद. पहिल्या पावसात मातीचा गंध आल्यानंतरचा आनंद, आपण लावलेल्या झाडाला फळे किंवा फुले आल्याचा आनंद,आपल्या वागण्या बोलण्याने दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आनंद पसरतो तेव्हा आपला आनंद गगनात मावेनासा होतो. सुखाचा आनंदाशी संबंध नसतो. मग आपण का सुखाच्या मागे धावतो?
महागडी- मऊ लुसलुशीत गादी.. हे सुख आणि शांत झोप... हा आनंद ! छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे. तो साठवता आला पाहिजे . आनंद वाटता आला पाहिजे ,हे मात्र सर्वात अवघड असते.
जीवनाचा खरा आनंद निस्वार्थ सेवेत आणि दुसऱ्यांच्या आनंदात लपलेला असतो.
एकदा काही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी खोल समुद्रात बोटीने जातात. परंतु काही कारणामुळे त्यांना दिवसभरात मासे मिळाले नाहीत. परंतु एक देव माशाचे लहानसे पिल्लू त्यांच्या बोटी जवळ पुन्हा पुन्हा येत होते. आपल्या सर्वांना माहीत आहे की, जगभरात देवमाश्याच्या लहान पिल्लांची शिकार करण्याला कायद्याने बंदी आहे. त्यामुळे ते मच्छीमार देवमाशाच्या पिलाला पकडू शकत नव्हते. मात्र,ते पुन्हा - पुन्हा बोटीच्या जवळ येत होते. तेव्हा, मच्छीमारांच्या प्रमुखाला लक्षात आले की, त्या छोट्याशा पिलाच्या शेपटीला एक दोरखंड गुंडाळला गेला होता. त्यामुळे त्याला खोल समुद्रात जाता येत नव्हते. जणू काही मच्छीमार बांधवांकडे ते मदतीची अपेक्षा करत होते. मच्छिमारांनी मोठ्या प्रयासाने त्याच्या शेपटाला गुंडाळले गेलेले दोरखंड बाजूला केले. पिलाला मदत झाली. त्याने शेपटी हलवून आनंदाने सर्वांचे जणू आभार मानले. दिवसभरात फार मासे मिळाले नसले तरी त्या छोट्याशा पिलाला मदत केल्यामुळे, त्याला झालेला आनंद पाहून सर्व मच्छीमार आनंदी झाले. आनंद हा असा असतो. परोपकारात तो दडलेला असतो.
कोणाला सतत एखाद्या कार्यात मग्न राहिल्याने आनंद मिळतो. कोणाला इतरांना काहीतरी मदत केल्याचा आनंद मिळतो.काहींना रोज नवनवीन मित्र जोडले गेल्याने आनंद मिळतो. शिक्षकांना आपले विद्यार्थी यशस्वी झालेले दिसले की,आनंद होतो. एखाद्या गृहिणीला घरातल्या सर्वांना पोटभर खाऊ घातल्याने आनंद होतो.कोणाला ज्येष्ठांची सेवा, लहानांशी मौजमस्तीत आनंद मिळतो. मित्रांशी गप्पा,चेष्टा-मस्करी यात कोणाला आनंद मिळतो.कोणाला वाचन- लेखन- चिंतन यात आनंद मिळतो.तर कोणाला मस्तपैकी सकाळ संध्याकाळ फेरफटका मारल्याने आनंद मिळतो. व्यक्ती तितक्या प्रकृती,या न्यायाने आनंद मिळण्याची कारणे देखील भिन्नभिन्न असू शकतात.
ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आणि राजेश खन्ना यांच्या अभिनयाने नटलेला.. आनंद, आपण सर्वांना खरेतर मार्गदर्शक आहे. असाध्य व्याधीमुळे मृत्यू जवळ दिसत असूनही आपले दुःख जगापासून लपवून,उरलेले दिवस आनंदाने जगणारा आनंद तुम्हा - आम्हाला जीवनानंद शिकवून जातो.
परंतु ,दुसऱ्याला यातना देऊन स्वतःला जर आनंद मिळत असेल, तर ही राक्षसी प्रवृत्ती मानली जाते. अशा कृतीने मिळणारा आनंद चिरकाल टिकत नाही. हा आनंद वरवर आणि तात्पुरत्या स्वरूपाचा असतो.
स्वतःच स्वतःशी जोडलं जाणं म्हणजे आनंद !
आनंद कशात असतो?
प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा असतो आणि तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रकारे होत असतो.ही भ्रामक समजूत लोकांनी करून घेतली आहे.त्यामुळे प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. अगदी साधे उदाहरण बघा ,सुट्टी मिळाली की आनंद होईल.या आशेवर आपण कामाचे दिवस ढकलत असतो.
कुणाला आनंद कशात वाटेल,हे सांगता येत नाही.एखाद्या भिकाऱ्याला पोटभर अन्न मिळालं की आनंद होतो. कुणाला शांत झोप मिळाली की आनंद होतो.कुणाला प्रवासात तर कुणाला आराम करण्यात आनंद मिळू शकतो.
आपण अशाश्वत गोष्टींपासून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो.अशा गोष्टी परिवर्तनशील असतात म्हणून त्यातून मिळणारा आनंद चिरंतन नसतो.
मित्रांनो आनंद कसा मिळवाल?
त्यासाठी इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा. अपेक्षापूर्ती झाली नाही, तर आनंदाची जागा दुःखाने भरली जाते. रोज जीवन जगताना छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा. एखादी छोटीशी गोष्ट आपल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकते. व्यायाम आणि ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करा.कारण निरोगी शरीर आणि आनंद यांचा घनिष्ठ संबंध आहे. वेळोवेळी आवश्यक तेवढे जेवण करा. त्याने मन तृप्त व शांत राहते.
अतिविचार करणे टाळा. ज्यामुळे आनंद मिळण्याऐवजी मानसिक त्रास होण्याची शक्यताच अधिक असते. जीवनात सफलता,मैत्री, प्रेम हे सर्व अनुभव आहेत .जर ते मिळाले तर चांगलेच.अन्यथा वाईट अनुभव म्हणून सोडून द्यायला देखील शिकले पाहिजे.आपल्या जीवनात अनेक संधी आपल्याला मिळत असतात, त्या पकडायला शिका.
खरं तर फार अवघड आहे.. परंतु तरीही खरं बोलायला शिका. कारण जर आपण खोटे बोललो तर ते लपवण्यासाठी अजून शंभर खोटे बोल बोलावे लागतात.
दिवसातील काही वेळ आपल्या आवडीचा छंद जोपासण्यासाठी घालवा. जसे मनपसंत गाणी ऐकणे , नृत्य करणे, पाककला किंवा अजून आपल्या आवडीनुसार...
एक मात्र खरं ,आपलं मन शांत आणि डोकं हलकं होऊ शकेल, अशी कोणतीही एक व्यक्ती आपल्या सान्निध्यात असावी. ज्याचे जवळ आपण निसंकोचपणे सर्व काही बोलू शकू. कुटुंबाचा आणि मित्रांचा सहवास आपल्याला निश्चितपणे आनंदी ठेवतो. त्यांच्यासाठी योग्य वेळ द्या.
शेवटी, आनंदाचे डोही l आनंद तरंग...
परंतु,आजकाल लोकांच्या आनंदाच्या व्याख्या बदलत आहेत.आनंद अनुभवण्यापेक्षा तो दाखविण्याकडे कल वाढत चालला आहे .वाढदिवस पार्ट्या विविध डेज ,लग्न समारंभ, इत्यादी. आनंद साजरा करण्यात बाजारूपणा येत चालला आहे. जणू मी किती सुखी आहे. आनंदी आहे, हे दाखविण्याची स्पर्धा समाजात रूढ झाली आहे.
प्रत्येक माणूस समाजाचा घटक आहे ,हे प्रत्येकाने जाणून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. नाही तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊन समाज व्यवस्था बिघडू शकते. आज कुटुंब व्यवस्था पार कोलमडली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरातील लहान-थोरांवर आपोआप संस्कार होत असत. घरातील सदस्यांना इतरांकडून प्रेम, माया, लळा - जिव्हाळा मिळत असे .काय चांगले, काय वाईट, याची जाणीव होत असे.सर्व निर्धास्त जीवन जगत. कोणताही ताण तणाव त्यांच्या आयुष्यात नसे. आजच्या मुलांना असे जीवन जगण्याची संधी मिळते का ? नाही ! परंतु, आज मन मानेल तेच, स्वैर,स्वच्छंद,धुंद, मस्त जीवन जगण्यात माणसाला रस आहे. यातून एकत्र कुटुंब पद्धती उद्ध्वस्त झाली आणि विभक्त कुटुंब पद्धतीला खतपाणी मिळालं. विभक्त कुटुंबात आई-वडील आणि एखादे मुल.आई-वडील नोकरीत व्यस्त. कामाच्या व्यापाने थकून-भागून आई वडील घरी परततात. मुलांची मानसिक भूक शमविण्याची इच्छा असूनही त्यांना ते शक्य होत नाही .पुढे मुले मोठी होतात. आई-वडिलांऐवजी ते मित्रांमध्ये रमतात. टी.व्ही., मोबाईल किंवा इतर आक्रस्ताळी तंत्रज्ञानाच्या आहारी जातात. त्यावेळी ते नकळत आई-वडिलांपासून दूर लोटले जातात. आई वडील आणि मुलांमध्ये वाद-विवाद ,मतभिन्नता वाढू लागते. पुढे मुलांची लग्न होतात .आई-वडील जेष्ठ नागरिक बनतात आणि आपोआप आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यास मुले धजावतात.अशा रीतीने कुटुंब व्यवस्था पार कोलमडली आहे.कुटुंब सुखी तर समाज सुखी. युनायटेड नेशन च्या अहवालात नमूद भारतीयांची ही सामाजिक परिस्थिती कमीजास्त फरकाने भारतभर सारखीच आहे.
पैशांच्या मागे धावून चिरंतन सुखाला पारखी होण्यात लोक आपली हयात घालवतात. त्यांना पैशामुळे अशाश्वत सुख मिळते. परंतु, आनंदप्राप्ती होत नाही.तेव्हा एकमेकांना जाणून घेऊन, एकमेकांशी जुळवून घेऊन, एकमेकांना सहाय्य करून ,एकमेकांना सुखी करू .हा मूलमंत्र सर्वांनी जपण्याची गरज आहे.
आपल्या जीवनात येणारे सुखाचे क्षण हे आपण आनंदाचे मानतो. त्यामुळे आपल्या मनाला आनंद होतो. काही काळापुरता दुःखाचा विसर पडतो. जीवनात आनंद आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. परंतु ,आपले मन केवळ आनंदाचे क्षण अपेक्षित करते. आनंदा नंतर दुःख येणारच. तेव्हा दुःख देखील आपण सहज भावनेने स्वीकारले पाहिजे .मनाचा समतोल राखण्यासाठी हे आवश्यकच आहे. "सुख पर्वता एवढे दुःख जवापाडे", असे म्हणून जीवनातले आनंदाचे क्षण शोधले पाहिजेत.
जागतिक अहवालानुसार आपल्या देशातील सर्वांचे जीवनमान उंचावेल, अशी अपेक्षा करू या. अनावश्यक चिंता, विविध कारणांमुळे निर्माण होणारी उदासी आणि क्रोधासह नकारात्मक भावनांमध्ये घट होऊन, नकारात्मक अहवाल सकारात्मकते कडे वाटचाल करेल, अशी आशा बाळगू या.
सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात आपण सुरक्षित, एकत्रित व आनंदी रहावे हीच सदिच्छा..!!
आपला,
श्री.शैलेश पाटोळे
२० मार्च २०२१
जागतिक आनंदी दिवसाचे निमित्ताने
नाशिक
🌹🌹🎭🌹🎭🌹📺🌹🎙️🌹🎤🌹🎧
15 comments:
Nice 👌👍
धन्यवाद आनंद देणारा आपला लेख खूप भावला.जागतिक आनंद दिनाची आपली भेट आनंद देणारी ठरली. अभ्यास पूर्ण आणि जीवन मूल्ये संदेश देणारे ! उदाहरणे अगदी समर्पक !
लेखकाचे अभिनंदन त्रिवार !
पुढील लेखनास शुभेच्छा !असा खजिना आम्हला कायम आनंद देणारा मिळत रहो !
अभिनंदन !
L.v kasture
lvkasture@gmail.com
The defination of Happiness is really difficult. But as we proceed to understand what is life then we are approaching the happiness. Anand movie is one of my most favourite movies. Bhutan and Finland are supposed to be the happiest countries in the world.
Let's try to enrich our happiness.
Happy Happiness Day!
Vivek Patil
Thank you Vivek
श्रीमती कस्तुरे मॅडम प्रतिक्रियां बद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पाठविलेल्या एका लेखाचा लेख लिहिण्यासाठी खूप उपयोग झाला. प्रेरणा मिळाली 🙏🙏
सुरेख लेखन सर...!!!म्हणतात ना कि,"Happiness is the only medicine for long and healthy life"
मा.पाटोळे सर... आपला लेख खूप छान होता... मच्छीमार बांधवाचे उदाहरण खूपच छान होतं..🙂
Life will really become beautiful when we start finding happiness in every small things...☺️
आपले लेखन कार्य असेच उत्तमरित्या चालू राहो.. मनःपूर्वक शुभेच्छा..
कु.वैष्णवी राजे 🙏🙏
Thank you Raje madam🙏
ऋषिकेश ,मनःपूर्वक धन्यवाद
मा.पाटोळे सर आपला लेख खुपच छान आहे. सोप्या शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले.आनंद ही शुध्द भावना आहे जी वाईट काळातही निर्माण केली जावु शकते.पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा 👍👍
🌷आनंदाचे डोही आनंद तरंग🌷
मा.पाटोळे सर... आपला लेख खूपच सुंदर👌आहे.आनंद सर्वानाच हवा असतो.. छोट्या छोट्या गोषटींमध्ये कसा अनंद लपलेला असतो आणि तो कसा शोधावा हे या लेखातून तुम्ही खूप छान सांगीतले.😊आपले असेच छान लेख आम्हाला आनंद देत राहतील हिच शुभेच्छा.....🙏🙏
सौ.स्वप्नाली कापसे.
आनंद हे अमृत आहे परंतु हे अमृत प्राप्त
करण्यासाठी मंथन करणे आवश्यक आहे.दु:ख हे दागिन्यासारखे मिरवू नका. वाटता आला तर आनंद वाटा...!!!
दु:ख प्रत्येकाकडे असते. सवर्वजण आनंदाची अपेक्षा करतात.छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानून तुमच्या या लेखाने हसायला शिकवले
धन्यवाद!
भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!
कु . मृणालिनी अनिल बर्वे
मा.सर,
आपला हा लेख अतिशय प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण आहेत. फुग्यांची आणि मासेमारी यांची गोष्ट आपल्याला मदतीचे महत्व आणि आपण मदत केल्याची स्वानुभूती आणि त्यातून मिळालेल्या आनंदाची आठवण करून देतो.हा लेख आपल्यातील आनंद आणि मदत करण्याची भावना जागृत करतो.
असेच उत्स्फूर्त लेखन चालू ठेवावे आणि आम्हाला असेच नवनवीन ज्ञानामृत देत राहावे,त्यासाठी शुभेच्छा!
सौ. साधना बोऱ्हाडे/काळे.🙏🙏
Post a Comment