Monday, March 22, 2021

ग्रंथ परीक्षण- तंतुवाद्य

      तंतुवाद्य (सतार शिकण्याचे पहिले पुस्तक)

   "साहित्यसंगीतकलाविहीन:
   साक्षात्पपशु: पुच्छ विषाणहीन: ll "
          भर्तृहरी यांच्या वरील नीतीश्लोकानुसार, जो मनुष्य केवळ दैनंदिन पोट भरण्यापुरताच मर्यादित राहत असेल तर पशूमध्ये आणि त्या मनुष्यात काहीही फरक नाही. मनुष्याचं रूप धारण केलेला तो केवळ पशूच असतो! केवळ खाणेपिणे आणि सुखोपभोग हेच त्याच्या जीवनाचे उद्दिष्ट असते.जो मनुष्य साहित्य, संगीत, कला यापासून लांब असतो, त्याची अवस्था शिंगे आणि शेपटी नसलेल्या पशु सारखी असते. भर्तृहरी यांनी नीतिशतकम् या १०० श्लोक संग्रहात कलेचे महत्त्व विशद करताना वरील विवेचन केले आहे.
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात..
       कला असे मानवासि भूषण
    एरव्ही कोण पुसतो आणिक |
      तुम्ही आहात राव की रंक..
          यासी कोणी पुसेना ||
  कलेचे महत्त्व सांगताना तुकडोजी महाराज म्हणतात की, कला हेच माणसाचे भूषण आहे. आपल्याकडे कोणती तरी कला अवगत असावी. नाही तर ,"प्राणी जन्मला आणि मेला ."
  मानवाचा जन्म वाया गेला 
कला ही आपली खरी ओळख असते. कलेचे मानवाच्या जीवनातील स्थान असे अनन्यसाधारण असते.
    प्राचीन काळापासून राजे -  महाराजांनी कलेला राजाश्रय दिलेला दिसून येतो. त्या सर्वात संगीत कलेला विशेष महत्त्व दिसून येते.
    सध्याच्या काळात संगीत कला जोपासायची अथवा शिकायची असल्यास अनेक साधने, स्त्रोत अथवा शाळा उपलब्ध असतात. प्राचीन काळात मात्र कला शिकण्यात अनंत अडचणी येत.
     मानव हा मुळात गायन प्रिय प्राणी आहे. गायन आणि वाद्य यासारखी मनोरंजन करणारी दुसरी गोष्ट नाही.मनुष्य कितीही व्यग्र असला ,गायन किंवा वादनाने तो आनंदित होतो. केवळ मनुष्यच नव्हे तर पशुपक्षी देखील गायन वादनाने मंत्रमुग्ध होतात.महाभारत काळात श्रीकृष्णाच्या पाव्याच्या मंजूळ स्वरांनी पशुपक्षी तल्लीन होत. सर्वांना मोहिनी घालण्याचे सामर्थ्य संगीतात आहे, हे मात्र नि:संशय.
    दैनंदिन काम करत असताना आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते. प्राचीन काळी या कामी गवय्ये अथवा बज्वैये यांची व्यवस्था राजेरजवाडे करीत. संगीत कलेत गायन आणि वादन यांना तितकेच महत्त्व आहे.
   ब्रिटिश भारतात येऊन गेल्यानंतरच्या कालखंडात संगीत शिक्षण क्षेत्रातही पाश्चात्त्य तंत्रज्ञानाचा प्रभाव पडला. त्यापूर्वीच्या काळात गायन, वादन नृत्य,आदी कला शिकायच्या असल्यास फारशा सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या किंवा त्यावर आधारित मार्गदर्शन पुस्तकाच्या रूपात उपलब्ध नव्हते.
     काही कलासक्त मंडळी मात्र आपापल्या परीने धडपड करताना दिसून येतात.१८७२ यावर्षी प्रकाशित झालेले' तंतुवाद्य' हे सतार शिकण्याचे पहिले पुस्तक वाचनात आले. लेखकाने उल्लेख केल्याप्रमाणे सतार या विषयाला वाहिलेले हे पहिलेच पुस्तक असावे. मुंबईच्या एशियाटिक छापखान्यात हे पुस्तक छापले गेले आहे. पुस्तकाचे लेखन सूर्याची सदाशिव महात्मे आणि विश्वनाथ रामचंद्र वकील या दोन तज्ज्ञांनी केले आहे. विशेष म्हणजे सदर पुस्तक आपल्याला कुठे उपलब्ध होऊ शकेल याचा उल्लेखही पुस्तकात केलेला आढळून येतो.
    मुखपृष्ठानंतर प्रास्ताविकाच्या आधीच तीन नकाशे जोडलेले असून, त्यात चल थाटाची सतार, अचल थाटाची सतार आणि तारा जुळण्याची सतार आकृती, सुचीसह दर्शविली आहे.
   पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ भक्कम अशा पुठ्ठा बांधणीचे आहे. सताऱ् तंतुवाद्य शिकण्याच्या दृष्टीने आवश्यक रचना, बैठक, स्वर, ताल, राग या बाबत सविस्तर माहिती हे पुस्तक आपल्याला देते.
    मुळात सतार हे तंतुवाद्य मूळ पर्शियन असावे. तेराव्या शतकात अमिर खुसरो यांनी हे वाद्य शोधले, असा दावा केला जातो. प्रारंभीच्या काळात तीन तारा असलेले हे वाद्य  त्रितंत्री म्हणून ओळखले जात होते. भारतात आल्यानंतर सात तारा असलेले हे वाद्य सतार म्हणून प्रचलित झाले.
    सतार हे तंतुवाद्य शिकणाऱ्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, त्या सोडविण्याच्या अनुषंगाने हे पुस्तक लिहिलेले आहे.अलीकडच्या काळात सतार वर्ग चालविणाऱ्याचादेखील इतका व्यासंग असतोच,असे नाही. तेव्हा शिकणाऱ्यांना स्वगृही राहून शास्त्रशुद्ध सतार शिकण्याकरिता या पुस्तकाचा लाभ होईल.
    पुस्तकाची पृष्ठसंख्या १२४ इतकी असून, सहा प्रकरणांमध्ये आशयाची विभागणी केली आहे. पहिल्या प्रकरणात, गायनातील ध्वनी किंवा स्वरूप सा रि ग म प ध नि यांची ओळख करून दिली आहे. मुख्य राग त्यांच्या रागीनी म्हणजे भार्या व त्यांची संतती म्हणजे जिल्हे ,यांची ओळख करून दिली आहे . गायनातील आणि वादनातील संज्ञा उदाहरणासह समजावून सांगितले आहेत. थोडक्यात,या प्रकरणातून सतार वादनातील पायाभूत माहिती आपल्याला मिळते.
    दुसऱ्या प्रकरणात सतार वाद्याच्या रचनेची प्रामुख्याने ओळख करून दिली आहे. सतारीच्या तारा ,खुंट्या, घोडी, तारदान ,पडदे, कट ,थाट, चल किंवा अचल यातील भेद स्पष्ट केला आहे. सतार लावणे, सतारीची स्वर सप्तके ,आरोह-अवरोह, याची ओळख या प्रकरणातून होते.
   सतार कशी धरावी? हे विशद करणारे तिसरे प्रकरण महत्त्वाचे वाटते. सतारीच्या तारांवर बोटे कशी फिरवावी, काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन मिळते. सतारीचे बोल, स्वर वाटिका, विविध चिन्हे, तसेच सरावाचे महत्त्व पटवून दिले आहे.
    सतारीच्या वाद्यात पाच प्रकारच्या गमका असतात. त्यांचा कसून सराव झाल्यावाचून पुढील अभ्यास करू नये .असे चौथ्या प्रकरणात आवर्जून सांगितले आहे.
   पाचव्या प्रकरणात सतारीच्या गती, विविध राग, यांचे नोटेशन दिलेल्या आहेत. ती शिकणाऱ्यांसाठी सराव करणेकामी उपयुक्त ठरतात.
  भूप, हमिर, केदार,छायानट, यमन कल्याण,खमाज, मालकंस या रागांच्या गती, आरोह-अवरोह सहाव्या प्रकरणात मांडल्या आहेत.
   अशा रीतीने जणू एखाद्या गुरु कडून आपण प्रत्यक्ष शिकत असल्याचा भास या पुस्तकाच्या वाचनातून होतो. तशी पुस्तकाची भाषाशैली आहे. शास्त्रशुद्ध सतार शिकण्याची इच्छा असणाऱ्यां  करिता हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल.
  सध्याच्या कोरोना लॉकडाउनच्या परिस्थितीत क्लासेसना प्रत्यक्ष जाता न येणाऱ्यांसाठी तसेच ऑनलाईन सतार शिकणाऱ्यांसाठी देखील हे पुस्तक अधिक फायद्याचे आहे, हे नक्की !
  मुळातच लेखक स्वतः सतारवादनात पारंगत आहेत,हे त्यांच्या निवेदनाच्या शैलीवरून लक्षात येते."जे जे आपणासी ठावे l ते ते लोकांशी सांगावे l 
शहाणे करून सोडावे ll सकळ जन ll
हा लेखकांचा उदार दृष्टिकोन या ग्रंथप्रपंचावरून लक्षात येतो.

 श्री.शैलेश पाटोळे
 उपशिक्षक
 पेठे विद्यालय नाशिक
(संदर्भ: न्या.रानडे मोफत वाचनालय,नाशिक)

No comments:

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...