चन्द्रचन्दनयोर्मध्ये शीतला साधू संगति : ll
चंदनाचा लेप शीतल मानला जातो. चंद्राचा प्रकाश त्यापेक्षा अधिक शीतल असतो. परंतु सज्जन व्यक्तीची संगती आपल्याला शीतलता आणि शांती प्रदान करत असते. अशा शांत, सुस्वभावी, सज्जन ,अत्यंत संवेदनशील, निगर्वी आणि हसतमुख असणाऱ्या आपल्या नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या डी.एस. कोठारी कन्या शाळा नाशिकरोड येथील मुख्याध्यापिका सौ.राजश्री कैलास वैशंपायन संस्थेतील ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मार्चअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.
राजा कालस्य कारणम् या उक्तीप्रमाणे राज्याची प्रगती अथवा अधोगती राजाच्या कर्तुत्वावर अवलंबून असते.त्याच न्यायाने मुख्याध्यापक हा विद्यालयाच्या प्रगती अथवा अधोगतीस कारणीभूत असतो. म्हणजेच शाळेच्या सर्वांगीण विकासास मुख्याध्यापक जबाबदार असतात.यात कोणाचेही दुमत असण्याचे काही कारण नसावे. सौ. वैशंपायन मॅडम यांनी मुख्याध्यापिका म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. शिक्षकांमध्ये आपुलकीचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण केले. मायेच्या ममतेने शाळेतील विद्यार्थिनींवर प्रेम केले. हे करत असताना आपल्यातील उत्तम प्रशासक मात्र त्यांनी कायम जागृत ठेवला. त्यांच्या कार्यकालात डी.एस. कोठारी कन्या शाळेचा शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला ,हे त्याचेच फळ म्हणावे लागेल.
मुख्याध्यापक हा शिक्षक आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. सुवर्णमध्य साधणारा एक महत्त्वपूर्ण घटक असतो. त्यात अनुभवाची, विचारांची परिपक्वता असली तर मुख्याध्यापक शाळेला नंदनवन बनवू शकतात.या दृष्टीने मुख्याध्यापक हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. उत्कृष्ट सारथ्य असेल तर त्या विद्यालयाचा रथ योग्य प्रगती पथावरून ध्येयपूर्तीकडे गेल्याशिवाय राहत नाही. सौ.वैशंपायन मॅडम यांनी या अनुषंगाने शाळेचे उत्तम सारथ्य आणि नेतृत्व केले, असे ठामपणे म्हणावे लागेल.
मुख्याध्यापक विज्ञाननिष्ठ, विद्यार्थीनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, सृजनशील, कल्पक बुद्धीचा, नाविन्याचा ध्यास असणारा,न्यायाची कास बाळगणारा असावा .शिक्षकांना वेळप्रसंगी कौतुकाची थाप देणारा व सौम्य शिक्षा करणारा असावा. मुख्याध्यापक स्वतः नीतिमान, शिस्तप्रिय, वक्तशीर, गुणग्राहक, कलागुणांना वाव देणारा असावा. माझ्या माहिती व अनुभवाप्रमाणे सौ. वैशंपायन मॅडम यांच्या व्यक्तिमत्त्वात वरील सर्व गुण कमी-अधिक प्रमाणात असल्याने शाळा सर्वांगाने प्रगतीकडे नेण्यात त्या यशस्वी ठरल्या.
'अतिपरिचयात अवज्ञा' याप्रमाणे मुख्याध्यापक मनमोकळा असावा. तरीही आपल्या पदाचा आदर राखून सर्वांशी अंतर ठेवून वागणारा असावा. कारण यथा राजा तथा प्रजा. स्टाफ रूम मधील सौ. वैशंपायन मॅडम आणि मुख्याध्यापक कक्षातील सौ. वैशंपायन मॅडम याच्यात निश्चितच फरक होता.
सौ.वैशंपायन बाई या मुळात बी.एड. फिजिकल च्या असल्यामुळे शिस्तप्रिय होत्या. खेळाच्या शिक्षिका म्हणून मुलांमध्ये मुलींमध्ये प्रिय होत्या. अत्यंत सौम्य शब्दात आणि ममत्वाने विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद असे. सतत कामांमध्ये स्वतःला झोकून देऊन, काम कधी पूर्ण होईल याचा त्या विचार करीत.
३१ वर्षांच्या सेवेमध्ये नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या ति.झं.विद्या मंदिर भगूर, सी.डी.ओ. मेरी हायस्कूल, सारडा कन्या विद्यालय, डी.एस. कोठारी कन्या शाळा,नाशिक रोड येथे त्यांनी सेवा केली. त्यांच्या शांत आणि सुस्वभावी वृत्तीमुळे कधीही शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांशी वादविवाद झालेले आठवत नाहीत.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या नामवंत शिक्षक- शिक्षिका यांच्याबरोबर प्रारंभीच्या काळातील सेवाकाल गेल्यामुळे ना. ए.सोसायटीचा संस्कार त्यांचेवर झाला. तो संस्कार त्यांनी आयुष्यभर जपला. कोणासाठीही अनुदार उद्गार त्यांचे मुखातून ऐकावयास मिळाला नाही.
The quality of a leader is reflected in the standards they set for themselves. याप्रमाणे त्यांनी स्वतःला आधी शिस्त लावून घेतली. प्रत्येक प्रकारचे काम,नियोजन त्या स्वतः करीत. त्यामुळे त्यांना कधी इतरांवर विसंबून राहावे लागले नाही. मग ते शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यालयीन किंवा इतर कोणतेही शासकीय काम असो, स्वतः पुढाकार घेऊन ते समजावून घेऊन, काम कसोशीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विशेष म्हणजे आत्मविश्वासाने कोणतेही काम त्या तडीस नेत असत.
Happiness helps relieve tension and makes the environment healthy for working. यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता. म्हणून त्या कामाच्या ताणाने कधीही दुःखी किंवा नाराज झाल्याचे दिसले नाही. सदैव हसतमुख चेहरा ही सौ.वैशंपायन मॅडम यांची ओळख आहे.
अर्थ सहकार्यवाह किंवा संस्थेत शिक्षणाधिकारी म्हणून काम करीत असताना, वेळोवेळी सभा किंवा शाळांच्या भेटीदरम्यान सौ. वैशंपायन मॅडम यांचा सहवास लाभत असे. जे आपल्याला ठाऊक नाही ते आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्यांना विचारण्यात त्यांना कधी कमीपणा वाटत नसे. "मी मुख्याध्यापक" असा त्यांच्या चेहर्यावर कधी भाव नसे. कधी प्रत्यक्ष तर कधी दूरध्वनीवरून त्या सदैव शंका समाधान करून घेत असत. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट करणं, हा त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचा एक चांगला भाग होता. त्यांच्या बोलण्यातील माधुर्य, नम्रता यामुळे ऐकणारा कधीही त्यांचा शब्द ओलांडून जाऊ शकत नव्हता.
शाळांच्या भेटीदरम्यान किंवा शासकीय कार्यालयात जात असताना अनेकदा डी.एस. कोठारी कन्या शाळेत जाण्याचा योग आला. कार्यालयात गेल्यानंतर कळायचे सौ. वैशंपायन मॅडम नववी-दहावीच्या वर्गावर शिकवायला गेलेल्या असत. असे दृश्य आज-काल शाळांमध्ये फारसे पाहायला मिळत असेल, असे वाटत नाही.
शाळांमधील गरीब आणि होतकरू विद्यार्थिनींची पालक म्हणून जबाबदारी घेणे हा त्यांचा एक आवडीचा छंद! परंतु , त्याचा कधी बोभाटा त्यांनी केलेला आठवत नाही. बऱ्याचदा स्वतःची पदरमोड करून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा त्यांनी पूर्ण केल्या. विद्यार्थ्यांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
माझ्या माहितीनुसार शाळेच्या परीक्षा समितीमध्ये त्यांनी अनेक वर्ष उत्तम काम करून स्वतःच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
त्यांच्याबाबत विशेषत्वाने अधोरेखित करण्यासारखी गोष्ट ही आहे की, त्यांनी आपल्या स्टाफ मधील सर्वांशी समान संबंध ठेवले. खास अशी मैत्री त्यांनी कोणाशी केली नाही. कोणाचा राग, द्वेष, मत्सर, तिटकारा कधीही केला नाही.
सुस्वभावी आणि मितभाषी असलेल्या सौ. वैशंपायन मॅडम ह्या अजातशत्रू आहेत.
निस्वार्थ सेवेचा कुटुंबाचा वारसा त्यांना मिळाला असावा. मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी वाटेल ते श्रम आणि मेहनत सौ. वैशंपायन मॅडम यांनी केली. त्यांचा मुलगा आपल्या पेठे विद्यालयाचा गुणवंत माजी विद्यार्थी असून एम.टेक ची पदवी संपादन करून सध्या आय.आय.टी.गांधीनगर येथून पी.एचडी. चा अभ्यास करीत आहे. त्यांची कन्या पुणे येथे स्थायिक झाली असून चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे.
विशेष म्हणजे त्यांनी कधी इतरांना कमी लेखले नाही. सर्व स्टाफला विश्वासात घेऊन काम करून घेण्याची हातोटी सौ.वैशंपायन मॅडम यांच्याकडे होती.
एकदा एक गुलाब होता, त्याला आपल्या सौंदर्यावर खूप गर्व होता. त्याला एकच दुःख होते की तो काटेरी कॅक्टस शेजारी वाढत होता. दररोज गुलाब त्या कॅक्टसचा दिसण्यावरून अपमान करीत असे, पण कॅक्टस शांत असे, बागेतल्या इतर रोपट्यांनी गुलाबाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण गुलाब स्वतःच्या सौंदर्याबद्दल खूपच जागरूक होता. एकदा उन्हाळ्यात बागेतली झाड़े कोरडी पडली. गुलाब कोमेजू लागला. गुलाबाने पाहिले एक चिमणी तिची चोच पाण्यासाठी कॅक्टस मध्ये डुबवत होती. गुलाबाला खूप लाज वाटली. तरीसुद्धा त्याने कॅक्टस ला विचारले,"मला पण पाणी मिळेल का?" दयाळू कॅक्टस लगेच "हो" म्हणाला.
आपल्या दयाळू आणि प्रेमळ स्वभावाने सौ. वैशंपायन मॅडम यांनी सर्वांच्या हृदयात स्थान मिळविले आहे.
शासनाच्या नियत वयोमानानुसार त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे एक संस्कारशील, उपक्रमशील ,विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षिका, तसेच उत्तम प्रशासक संस्थेतून निवृत्त झाल्यामुळे निश्चितच उणीव भासणार आहे.
सेवानिवृत्तीनंतरही श्री. व सौ.वैशंपायन दाम्पत्यास निरामय आरोग्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री.शैलेश पाटोळे
उपशिक्षक
पेठे विद्यालय नाशिक
दि.३१/३/२०२१
नाशिक.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
7 comments:
छान माहिती दिली आहे, मॅडम बद्दल
अनेक पैलू उलगडून दाखवणारा लेख चंदणासारखा परिमल पसरविणारा आहे.
Excellent!!!what a reward to the administrator for her dedicated tenure.
Patole Sir..... Selfless work has been beautifully compiled in the words by you. Wonderful Gratitude 👍👍
Mrs Pendse
Excellent!!!what a reward to the administrator for her dedicated tenure.
Patole Sir..... Selfless work has been beautifully compiled in the words by you. Wonderful Gratitude 👍👍
Mrs Pendse
फारच छान माहिती दिली शब्द रचना अतिशय सुंदर आहे
छान माहिती सर👌👍🙏
खूप छान👌 कमी शब्दात अतिशय मार्मिक माहिती !
Post a Comment