पाण्या खालोखाल जगभरामध्ये अधिक लोकप्रिय असलेले पेय म्हणजे चहा ! आपल्या भारतीय संस्कृतीत देखील चहाला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे. चहा हा आळस झटकून तरतरी आणणारे पेय म्हणून ओळखले जाते! चहा प्रेमी चहाला पृथ्वीवरचे अमृत मानतात!! चहा बनवता येणे ही सुद्धा एक कला आहे. ती सर्वांनाच अवगत असते ,असे नाही. एकमेकांना जोडून ठेवणारी बाब म्हणजे चहा! श्रमपरिहार, टाइमपास करताना आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे चहा! स्पेशल ,कटिंग घेता घेता एकमेकांचे सुखदुःख वाटून घेण्यासाठी चहा नक्कीच मदत करतो!!
चहा हा या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅमेलिया सिनेंसिस आहे. त्याच्या पानांपासून बनविलेली भुकटी, उकळलेले पाणी अथवा दूध यापासून चहा हे पेय बनविले जाते. चहा पत्ती वर विविध प्रकारच्या प्रक्रिया करून चहाचे अनेक प्रकार पहावयास मिळतात.
चहा या शब्दाचे मूळ चिनी भाषेत आहे. चिनी भाषेत चहाला छा असे म्हटले जाते. यावरून जगातील बहुतेक भाषांमध्ये चहा, छा, चा, चाय अशी नावे वापरले जातात. दक्षिणेकडील चिनी भाषेत चहाला ते असे म्हटले जाते. त्यावरून युरोपीय भाषेत टी हे नाव प्रचलित झाले.
भारतात चहा चे आगमन ब्रिटिश काळात झाले. त्याआधी प्राचीन काळापासून चीनमध्ये चहाचे सेवन केले जाते.
शांग राजवटीत युनान या प्रदेशात चहा हे औषधी पेय म्हणून त्याचा शोध लागला. साधारणपणे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात चहाच्या नोंदी आहेत.
इसवी सन पूर्व २७३७ मध्ये चीनमधील एक राजा शेन नुग्न याला सत्तेवरून पायउतार करून जंगलात एकांतवासात पाठविण्यात आले होते. तेथे एका झाडाखाली बसून तो गरम पाणी पीत होता .तेव्हा त्यात झाडाची काही पाने पडली. त्या पाण्यामुळे पाण्याचा रंग बदलला आणि त्याला तरतरीत झाल्यासारखे वाटले.नंतर तो त्या झाडाची पाने घालून पाणी पिऊ लागला. त्या राजाच्या असे लक्षात आले की,हे पाणी प्यायल्याने पोट दुखीचा त्रास कमी झाला. हळूहळू चीनमध्ये आणि नंतर जगभर त्याची कीर्ती पसरली. अशा अनेक प्रकारच्या रंजक कथा चहाच्या जन्माबाबत सांगितल्या जातात. प्रारंभीच्या काळात ग्रीन टी स्वरूपात चहा उपलब्ध होता. नंतर त्यावर विविध क्रिया प्रक्रिया करून ब्लॅक टी, येलो टी असे प्रकार तयार झाले. चिनी लोकांची चहाची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाच्या मळ्याची लागवड केली. ब्रिटिशांनी भारतात चीनरी या चहाच्या जातीची आसाम व दार्जिलिंग मध्ये लागवड केली. आज आधुनिक पद्धतीने चहाची शेती भारतातील विविध प्रांतात केली जाते. जगातील चहा उत्पादक देशांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे.जगातील सर्वात महागडा चहा भारतात तयार होतो.
चहाची चव ही त्याचे उत्पादन कुठल्या हवामानात, कुठल्या मातीत झाले, तसेच कुठल्या वेळी चहाची पाने खुडली आहेत आणि त्यावर कुठली प्रक्रिया केली आहे, यावर अवलंबून असते.
जगभरातील प्रसिद्ध चहाचे काही प्रकार खालील प्रमाणे...
हा चहाचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. यावर अगदी कमी प्रमाणात प्रक्रिया केलेली असते. नैसर्गिकरित्या हा चहा गोड असतो. त्याचा रंग सौम्य असतो.
आरोग्यासाठीहा अत्यंत उपयुक्त चहा आहे. आशियाई लोकांमध्ये हा चहा अत्यंत प्रिय आहे. विविध फळे किंवा फुले घालून सेंटेड आणि फ्लेवर्ड ग्रीन टी बनविला जातो.
यात चहाची पाने वापरली जात नाहीत. औषधी वनस्पती, फळे-फुले घालून हे पेय बनवितात. आफ्रिकेत हा चहा रेड टी म्हणून प्रसिद्ध आहे.
चहाच्या झुडपाची पाने विशिष्ट पद्धतीने तोडून वाढविली जातात. वाळलेली पाने विशिष्ट तापमानात आणि बाष्प नियंत्रण कक्षात आंबवण्याची क्रिया होते. त्यानंतर भट्टीत भाजली जातात. म्हणून चहा पत्ती काळया रंगाची दिसते. तिला विशिष्ट रंग ,वास, किंचित कडसर चव प्राप्त होते. ग्रीन टी तयार करताना आंबवण्याची क्रिया होत नाही.
चहा हा दोन प्रकारात उपलब्ध होतो. चहाची पाने आणि डस्ट. चहाची पाने यापासून उच्च दर्जाचा चहा मिळतो. तर चहाच्या पानाची बारीक पावडर तुलनेने कमी दर्जाची समजली जाते.
दिवसातून किती वेळा आणि केव्हा चहा प्यावा? याचे कोणतेही लिखित नियम नाहीत. अति सर्वत्र वर्जयेत या उक्तीनुसार योग्य प्रमाणात चहाचे प्राशन शरीराला फायद्याचे ठरू शकते. दुधा शिवाय तयार केलेला काळा चहा इतर चहाच्या तुलनेने उपकारक ठरतो. काळा चहा योग्य प्रमाणात प्यायल्याने तरतरी आणि उत्साह निर्माण होतो. काम करण्याची क्षमता वाढते. काळा चहा आरोग्यदायी समजला जातो. त्याला एनर्जी बूस्टर असे देखील म्हणतात. योग्य प्रमाणात व योग्य वेळी घेतलेला काळा चहा हृदयरोग,मधुमेह,पोटाचे विकार यामध्ये फायदेशीर ठरू शकतो.
अति चहा प्राशन केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. ऍसिडिटी ,पचनक्रिया बिघडणे तसेच दातांवर डाग येण्याची शक्यता असते.
चहा मध्ये कॅलरीज ,सोडियम, पलाश, कर्बोदके, प्रथिने, कॅल्शियम,मॅग्नेशियम हे घटक असतात.
जगभरात चहाचा प्रसार करणारी द युके टी कौन्सिल ही संघटना कार्यरत आहे. चहा कसा बनवावा, याबाबतीत मार्गदर्शन करणारे A nice cup of tea हे पुस्तक १९४६ मध्ये प्रसिद्ध झाले. त्यात चहा बनविण्याचे अकरा नियम सांगितले आहेत. The classic of tea हे चहाबद्दल सविस्तर माहिती देणारे सर्वात जुने पुस्तक आहे. अलीकडच्या काळात जगभरातील चहाची माहिती देणारे World atlas of tea हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
भारतात प्रसिद्ध असलेले चहाचे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
१) आसाम चहा- आसामच्या परिसरात या चहाचे मळे आहेत. म्हणून त्याला आसाम चहा म्हटले जाते. काळा गडद रंग व कडक चवीसाठी हा चहा जगभरात प्रसिद्ध आहे.
२) दार्जिलिंग चहा- पश्चिम बंगालमधील दार्जीलिंग च्या परिसरात या चहाचे मळे आहेत. जगातील सर्वात महाग चहा म्हणून दार्जिलिंग चहा ओळखला जातो. आवडीने चहा पिणाऱ्या लोकांमध्ये चहा मधील शँपेन म्हणून दार्जीलिंग चहाची ओळख आहे.
३) निलगिरी चहा- निलगिरी पर्वतातील दऱ्याखोऱ्यात या चहाचे मळे आहेत.
४) कहवा अर्थात काश्मिरी चहा - केशर, काश्मिरी चहाची पाने, वेलदोडे, बदाम, दालचिनी इत्यादी पदार्थ घालून पितळी भांड्यात हा चहा बनविला जातो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो.
५) तंदुरी चहा- मातीच्या भांड्यात आले वेलची दालचिनी इत्यादी पदार्थ घालून हा चहा बनविला जातो. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात हा चहा प्रसिद्ध आहे. असे म्हणतात पुण्यातील एका उच्चशिक्षित तरुणाला घरात बनवल्या जाणाऱ्या हळदीच्या दुधापासून तंदुरी चहा बनविण्याची कल्पना सुचली.
६) सुलेमानी किंवा लेबु चहा- चहा पत्ती आणि लिंबू चे विविध प्रकार वापरून कोलकात्यामध्ये हा चहा मिळतो. बिस्किटं बरोबर लेबु चहा पिण्याची सवय या परिसरातील लोकांना आहे. वर्षातील सर्व ऋतूंमध्ये हा चहा हा लोक पितात.
७) हाजमोला चहा- हाजमोला आणि जिरेपूड यांच्या सुगंधाने आले घालून हा चहा बनविला जातो. वाराणसी शहरात हा चहा प्रसिद्ध आहे. या परिसरात राहणाऱ्या बंगाली लोकांचे हे आवडते पेय आहे. जेवणानंतर पचन सुधारण्यासाठी हा चहा पितात.
८) शीर चहा- पाटणा आणि परिसरात हा चहा प्रसिद्ध आहे. बेकिंग सोडा ,मीठ, वेलदोडे, सुकामेवा पदार्थ घालून हा चहा बनवतात. थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहण्यासाठी याचा उपयोग होतो.
९) बुरंश चहा- डेहराडून परिसरातील स्थानिक वनस्पतीची पाने, पुदिना, मध घालून चहा बनविला जातो. भूक वाढविण्यासाठी व पचन सुधारण्यासाठी या चहा चा विशेष फायदा होतो. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील लोक बु रंश चहा आवडीने पितात.
१०) गुलाबी चहा- लखनऊ शहर व परिसरात गुलाबी चहाला लोकांची पहिली पसंती असते. केशर ,दालचिनी ,जायफळ आणि कधी शेंगदाणे घालून हा गोड चहा बनविला जातो. काश्मिरातून उत्तर प्रदेशात या चहाचा प्रसार झाला आहे. पचनासाठी गुलाबी चहा उत्तम मानला जातो.
११) बदाम-पिस्ता चहा- अमृतसर शहरात बदाम पिस्ता आणि इतर सुकामेवा घालून हा चहा बनविला जातो. थंडीच्या दिवसात शरीराला अधिक उष्मांक मिळविण्यासाठी हा चहा प्याला जातो.
चहा ,हे असे पेय आहे जे झोपडीतल्या गरिबापासून पासून ते पंचतारांकित हॉटेलातल्या श्रीमंतांपर्यंत सर्वच पितात.
नासिक हे तसे चहा पिणाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
टपरीवर मिळणारा कटिंग ते सीसीडी मध्ये मिळणारा हाय प्रोफाईल चहा ,अशी कितीतरी प्रकार नाशिक मध्ये चहाचे चाखायला मिळतात. इराणी चाय, मसाला चहा, तंदुरी चहा, नागोरी चाय,कटिंग चाय, पुण्याचे अमृततुल्य ,येवलेकर चहा ,यासारखे अनेक प्रकार नाशिककरांनी डोक्यावर घेतले आहेत. पूर्वीच्या काळात चहाच्या प्रकारापेक्षा विशिष्ट टी हाऊस मधला चहा लोकांना आकर्षित करत असे. सरकारवाडा जवळील भोसले टी हाऊस, चित्रमंदिर सिनेमा जवळील दत्त टी हाऊस, मालेगाव स्टँड जवळील भोसले टी हाऊस, हाजी च्या हॉटेलमधील इराणी चहा, कॅफे हिंद हे तर टाइमपास करत करत चहाचा आस्वाद घेण्याची लोकांची आवडती जागा होती. कॉलेज रोड वरील सलीमचा चहा हा तर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. काळ बदलतो आहे. त्यानुसार चहादेखील अनेक रूपात, प्रकारात लोकांच्या भेटीला येत आहे.
जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने सर्व चहा भक्तांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा !
लेखन
श्री.शैलेश पाटोळे
नाशिक.
१५ डिसेंबर २०२०
15 comments:
सर तुम्ही खुप छान लेखन करतात.
तुमच्या या लेखनाने आम्हाला खुप फायदा होतो व ज्ञानात भर पडते. धन्यवाद सरजी
सर,ज्ञानवर्धन करणारी माहिती...👌चहा पितांना नक्कीच यातील ज्ञानकण आठवत राहतील.....👍
उपयुक्त माहिती.
Thank you Ravi sir,Harashal
खूपच छान सर अप्रतिम लेख
Very insightful article👌👍
Very informative and interesting facts presented in simple language. The tea types and the tea culture section was the most interesting.
छान लेख आहे
खूपच उपयुक्त माहिती या लेखनातून समजली आहे.
लेखन शैलीखूपच छान, सुंदर असते. असेच छान छान विविध विषयांवरील लेख आम्हाला वाचायला मिळतो.👍💐💐
अतिशय सुंदर लेख, चहाचा आस्वाद घेत आपला लेख वाचला आणि चहाची लज्जत अधिकच वाढली
Very nice and useful information sir
सौ.खोडके मॅडम.. मनःपूर्वक धन्यवाद 🙏😂
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद 👍🙏🙏
छान संकलन सर चहा या विषयावर खुपच महत्त्वाची माहिती.
मोहिते सर आभारी आहे🙏🙏🙏
Post a Comment