कै. श्रीमती भागाबाई देवराम पाटोळे उर्फ मोठी माय यांचे आज १७ वे पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने त्यांच्याप्रती आठवणींना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न.
अत्यंत सोशिक, सहनशील,भावनाशील, कनवाळू,संवेदनशील, मितभाषी,सतत कार्यात मग्न असणाऱ्या, सर्वांना माया, प्रेम,जिव्हाळा देणाऱ्या, सात्विक विचाराच्या कै. भागाबाई संपूर्ण गावाला आदरस्थानी होत्या. दुसऱ्याचं दुःख पाहून दुःखी होणार्या आणि इतरांच्या सुखात आपलं सुख मानणाऱ्या आमच्या आजी ! कोणी कितीही आपल्या मार्गावर काटे पेरले तरी त्यांच्याविरुद्ध ब्र शब्द न काढणाऱ्या भागाबाई सर्वांच्या कुतूहलाचा विषय होत्या.
अजमीर सौंदाणे, गाव आणि गल्लीत बहुतांश जण त्यांना मोठी माय म्हणून हाक मारत.नाते काहीही असो,त्या खऱ्या अर्थाने सर्वांच्या आई होत्या!
घरी येणारी कोणतीही व्यक्ती, ओळखीची असो अथवा अनोळखी, चहापाणी - जेवण केल्याशिवाय कधी परत गेली नाही. कधी इतरांना पाहुणचार करताना कंटाळा केला नाही. दिवसभर चुलीसमोर राहणारी मोठी माय कधीच थकली नाही.
माहेर हा कोणत्याही स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय!परंतु, आजीला माहेरपणाचा आनंद काही मिळाला नाही. कमी वयातच आईचे निधन झाले आणि त्या स्वतः आईच्या प्रेमाला पारख्या झाल्या. परंतु आपल्याला प्रेम मिळाले नाही म्हणून इतर सुनांना त्यांनी कधीच छळले नाही. उलट आईच्या प्रेमाची बरसात सर्व सुनांवर केली. त्यांचे माहेर मालेगावचे. आई राधाबाई आणि वडील श्री. महारु या दाम्पत्याच्या पोटी भागाबाई चा जन्म झाला. कमी वयात लग्न झाले. मोठ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर पडली. सासर हेच आपले माहेर ,असं म्हणून त्या राहिल्या. त्याबाबत कोणाजवळ कुढल्या नाहीत. उलट सणावाराला आपल्या सर्व सुनांना माहेरी जाण्यासाठी त्या मदत करीत. एकाही सुनेला सासू म्हणून वागणूक त्यांनी दिली नाही. सासुरवास केला नाही .टोमणे मारून दुखविले नाही.अशी सासू यापुढे होणे शक्य होईल ,असे वाटत नाही.
स्वतः अडाणी असूनही नवऱ्याच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुलांचे शिक्षण केले. संपूर्ण काळू आप्पांचं कुटुंब एकत्र ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.सासू-सासर्यांची मनोभावे सेवा केली. आज-काल सुना फक्त शरीराने कुटुंबात नांदतात. परंतु ,सौ. भागाबाईंनी कुटुंब मनाने एकत्र जोडून ठेवले होते. त्यांना आठ अपत्ये. मुलगी नव्हती. परंतु त्याबाबत कधी त्यांनी खंत व्यक्त केली नाही. सर्व सुनांना मुलीं सारखीच वागणूक दिली. असे म्हणतात सासू-सुनेचं नातं कधीही आई आणि मुलीचं नातं होऊ शकत नाही. परंतु मोठी माय त्याला अपवाद होत्या.आई करणार नाही,इतकं प्रेम आणि जिव्हाळा त्यांनी सुनांना दिला. सौ.भागाबाई आणि श्री. देवराम दादा यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची मुले -सुना -नातवंडे -पतवंडे गुण्यागोविंदाने संसारात रममाण झाली आहेत.
आजी म्हणून आम्हा सर्व नातवंडांवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं.घासातला घास त्या आमच्यासाठी ठेवत. स्वतःसाठी त्यांनी कधीही अपेक्षा केली नाही. आमच्या बालपणापासून मी त्यांना केवळ राबताना पाहिले आहे .सकाळी घरातील सर्वांचे अन्न पोषणाची जबाबदारी पार पाडून शेतावर पायी जात. मजुरांबरोबर दिवसभर काबाडकष्ट करीत. संध्याकाळी लाकडाची मोळी डोक्यावर घेऊन,पायी गावातल्या घरी जात. थकल्याचा कोणताही लवलेश त्यांच्या चेहऱ्यावर नसे.सगळ्यांसाठी त्या झटत. खरोखरच मोठी मायचं मन खऱ्या अर्थाने आभाळासारखं मोठं होतं!
अत्यंत सहनशील आणि संवेदनशील असलेल्या भागाबाईंना आयुष्याच्या उत्तरार्धात स्मृतीभ्रंश झाला. साधारण एक महिनाभर त्या अंथरुणावर होत्या. त्यांचे वय आणि आजाराची स्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी घरीच सेवा शुशृषा करण्याचा सल्ला दिला. दिनांक २१ ऑक्टोबर २००३ रोजी साधारण दुपारी एक वाजता त्यांचे देहावसान झाले. सर्वांवर मायेची पाखर घालणाऱ्या मोठी माय इहलोक सोडून गेल्यावर सर्वांना पोरकेपणाची भावना झाली. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र आदरांजली. या नवरात्राच्या निमित्ताने सर्वगुणसंपन्न ,कुटुंबाचा आधार असणारी महाशक्ती म्हणून भागाबाईचा उल्लेख केला, तर ते वावगे ठरणार नाही. आदिशक्तीचा आशीर्वाद त्यांना प्राप्त असावा. म्हणूनच त्या इतक्या सहनशील असाव्यात.
ऋणनिर्देश
शैलेश अशोक पाटोळे
आजीचा ...नातू
अश्विन ,शु.५
🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment