Wednesday, April 21, 2021

जागतिक वसुंधरा दिन

                 ॥दिनविशेष॥

   

नमस्कार
 कसे आहात? पुन्हा तोच प्रश्न ! मग विचारणार तरी काय !! आपण सर्वजण आनंदात असाल हीच अपेक्षा. 
    रोज नवनवीन आणि नकारात्मक यातनादायी अशा बातम्या कानावर पडत आहेत. ठीक आहे.. दुःखद घटनांचे यातना दायी ढग लवकरच वाहत जाऊन सुखाची प्रभात येईल !
   त्यासाठी बातो बातो मे चित्रपटातील सुंदर असे गाणे सुचवतो. ते जरूर ऐका..
  कहा तक ये मन को,
              अंधेरे छलेंगे,
  उदासी भरे दिन 
            कभी तो ढलेंगे,
कभी सुख कभी दुःख
          यही जिंदगी है
यह पतझड का मौसम 
          घडी दो घडी है...
चला तर मग गाणं ऐकून सकारात्मक ऊर्जा निर्माण करूया.
    पण यानिमित्ताने एका गोष्टीची आपल्याला जाणीव होणे नितांत गरजेचे आहे. जे घडतं आहे, त्याला कारणं वेगवेगळी असली,तरी त्या कारणांच मूळ मानवाच्या पर्यावरणाशी आणि आपल्या भूमातेशी केलेल्या प्रतारनेत दिसून येते. आज जागतिक वसुंधरा दिन आहे त्यानिमित्ताने थोडं हितगुज करावेसे वाटते म्हणून...
     जगण्यासाठीची अनुकूलता फक्त पृथ्वीवर आहे. अन्यत्र कुठेही नाही. ही पृथ्वीची अनन्यता आहे. अनंत विश्वातला पृथ्वी हा एक मोठा अजुबा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांना आपण निसर्ग म्हणतो. 
 आपल्या सात अजुब्यांचं मानवाला मोठं कौतुक वाटतं. पण पंचमहाभूत नामक निसर्गाच्या पाच अजुब्यांपुढे ती फिकी आहेत.
  जल नामक महाभूत तर विश्वनिर्मात्याने फक्त आपल्या लाडक्या लेकीला म्हणजे वसुंधरेलाच आंदण दिले आहे. जलामुळेच तर ती बहुप्रसवा बनली. जैवविविधतेचा हा विस्मयकारी पसारा प्रसवू शकली. विश्वनिर्मात्याची विश्वातील सर्वात समृद्ध प्रयोगशाळा बनू शकली.
       गदिमा विधात्याला वेडा कुंभार म्हणतात. तर गीतकार पं. भरत व्यास त्याला चित्रकार संबोधतात. पृथ्वी हा जणू त्याच्या मूर्त चित्रकारीसाठीचा विशाल कॅनव्हासच! त्यावरच्या चित्रकारीचं त्यांनी खालील गीतात किती सुंदर वर्णन केलं आहे...
हरी हरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन,
के जिसपे बादलों की पालकी उड़ा रहा है पवन।
दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी,
ये किसने फूल फूलपे किया सिंगार है?
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार!
      महामानव, संत, कलावंत, कवी जन्मले ते या वसुंधरेच्या कुशीतच. सुंदर साहित्य, कला, संगीत, नाट्य, शिल्प, स्थापत्य यांचा विलोभनीय मानवीय आविष्कार या भूतलावरच प्रकटला. तेव्हा या भूतलावर जन्माला येण्यासारखं दुसरं भाग्य ते कोणतं.
    अन्नपाणी, औषधं, खनीजं, धातू इत्यादी गोष्टींची पिढ्यानपिढ्या पुरेल एवढी शिदोरी तिने आपल्या उदरात सामावून ठेवली आहे. पण मानवाच्या अतिरेकी संचयवृत्तीमुळे असंख्य लोकांना अभावग्रस्ताचं जीणं जगणे भाग पडत आहे.
    तर स्वार्थी लोकांनी जंगल, खनिजं, जल ही तिची आभूषणं ओरबडून तिला कुरुप बनविले आहे. मानवाच्या हव्यासापायी पंचमहाभूतांचा समतोल बिघडून अवर्षण, अतिवृष्टी, तापमानवृद्धी, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींचा मानवाला नित्य सामना करावा लागत आहे. विनाशकारी प्रदुषणामुळे जीवसृष्टीला गंभीर धोका तर मानवानेच निर्माण केला आहे.
     पृथ्वीवर जीवसृष्टीच्या उदय-विकासासाठीची अनुकूल परिस्थिती ही काही मानवाने निर्माण केलेली नाही. ती निसर्गाने निर्माण केलेली आहे. मानवाकडून अपेक्षा एकच होती की, जीवसृष्टीचा हा अनमोल ठेवा अनादिकाल टिकावा, यासाठी 'जगा आणि जगू द्या' असं पूरक वातावरण तयार करणे. दुर्दैवाने माणसाने त्या अपेक्षेलाच काळं फासलं आहे. जगा नि जगू द्या या ऐवजी, 'बळी तो कान पिळी' हे प्राणीसृष्टीचं तत्त्वच जणू त्याने, बोधवाक्य म्हणून अंगीकारलं आहे. गीतकार शैलेंद्र यांच्या शब्दात सांगायचं तर... 
     दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समाई,
काहे को दुनिया बनाई, तूने काहे को दुनिया बनाई?
   असा पश्चाताप जगन्नियंता परमेश्वराला होण्याच्या आधीच आपण मानव सुधारणार आहोत का?
  काळजी घ्या l घरी रहा l स्वस्थ रहा ll
 सध्या या नियमाचे पालन करा !🌻🌻🌻

आपला
शैलेश पाटोळे
नाशिक
  ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

14 comments:

Shweta Deshpande said...

खरंय सर, खूप छान

Shweta Deshpande said...

छान लेख

Unknown said...

वाह, क्या बात? है? Superb ! ! !

हर्षल पोपटराव कोठावदे said...

छान लेख👍

Unknown said...

आपला लेख वाचताना दिलीप कुलकर्णी यांच्या निसर्गायण या पुस्तकाची आठवण झाली. अशीच लेखणी ओजस्वी होवो.

Heramb Patil said...

वसुंधरा दिन हा मानवजातीचा उत्सव दिन होणे गरजेचे झाले आहे.
सुंदर लेख
--- विवेक पाटील

Unknown said...

सकारात्मक लेख..... छान

Unknown said...

सर तुमच्या लेखनातून सकारात्मक विचार होत आहे असेच लेख आपण करीत रहावे

दिपक पुं कडाळे said...

सांभाळते जी तुला
सांभाळ त्या पृथ्वीला
हो लेकरू गुणाचे
सांभाळ या मातेला!!


छान लेख

Shailesh blog said...

मा. डॉ. संदीप देशमुख सर, विवेक पाटील, दीपक कडाळे, हर्षल कोठावदे आणि इतरही ज्यांनी कॉमेंट्स करून लेखनाबद्दल शुभेच्छा दिल्या त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏🌻🌻

Unknown said...

एक एक शब्द अगदी मोतीतुल्य आहे।
अतिशय सुंदर लेख अप्रतिम मांडणी।
मराठीतील अपरिचित शब्द आपल्या लेखणीतून आम्हाला समजतात। आपला लेख म्हणजे वाचकांना एक मेजवानी असते।असेच लेखन सुरू ठेवा ।
धन्यवाद।

Shailesh blog said...

सौ.श्वेता देशपांडे मॅडम ..मनःपूर्वक धन्यवाद 👍

Shailesh blog said...

काही वाचकांच्या प्रतिक्रिया येत आहेत परंतु नावाचा उल्लेख नसल्यामुळे त्यांना मी मनःपूर्वक धन्यवाद देत आहे 🙏🌻🌻

Poonam Pendse said...

निसर्गाचे इतके सुंदर वर्णन आणि मानवाने आपल्या स्वार्था साठी त्याला आणलेली आवकळा हि खूप सोप्या आणि समजेल अश्या शब्दात आपण लेखनातून छान मांडली आहे. श्री पाटोळे सर खरोखरच आपले लेखन हे वास्तव्वादी तर असतेच त्याचं बरोबर खूप सकारात्मक देखील असते..... फारच छान असेच motivating लेख आपण लिहावे हि अपेक्षा आणि शुभेच्छा देखील.....सौ पूनम पेंडसे 🙏🙏🌹🌹

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...