Wednesday, June 3, 2020

Shailesh blogs.... आई ...... आठवणींच्या हिंदोळ्यावर

        आई ..आठवणींच्या हिंदोळ्यावर
सुमारे ४८-४९ वर्षांपूर्वीची गोष्ट, माहेरी लाडाकोडात वाढलेली बेबी आता रत्ना बनून सासरी आली. आई वडील सुशिक्षित असले तरीही रीतिरिवाज यांचा मोठा पगडा त्यांच्यावर होता. म्हणून परस्पर ठरवलेले लग्न, शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि कुठेतरी लांब खेड्यांमध्ये जाऊन राहावं लागेल ,अशा एक ना अनेक मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी.... वडिलांची पत ,इभ्रत आपल्यामुळे जाऊ नये, केवळ याच एका भावनेने माहेराला अंतर देऊन बेबी आता जबाबदारी स्वीकारण्यासाठी सौ.रत्ना झाली.
    लेकीच्या सुखासाठी,
     मायबाप रागावती.
    परी लेकीचेहि मन,
    का न समजून घेती.
     हा विचार सतत तिच्या मनामध्ये येत होता.
  बेबीचं सासर बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाने गाव ..साधारण तालुक्याच्या गावापासून सात मैल अंतर .परंतु दिवसातून कधीतरी येणारी लाल परी शिवाय कोणतीही प्रवासाची साधने त्या काळामध्ये उपलब्ध नसत. अंग काठीने बारीक असलेली बेबी पहिल्यांदाच सात मैल अंतर पायी चालून गेली ! माहेराहून निघालेली तिची पावलं सासरी पोहोचेपर्यंत जड झाली होती.चार-पाच भावंडं ,नोकरी करणारे आईवडील ,अशा कुटुंबातून आलेली, लाडाकोडात वाढलेली, भावंडांमध्ये दंगामस्ती करणारी आणि कुठलेही घरातलं कामाची जबाबदारी आतापर्यंत न घेतलेली "बेबी "सासरच्या वाटेवरून चालत होती. अंगावर नेसलेली साडी आणि हातात ट्रंक घेऊन आपल्या साथीदाराबरोबर पावलं टाकीत एका नवख्या प्रांतात ती पाऊल टाकत होती.
   अजमीर सौंदाणे आणि पंचक्रोशीत श्री काळू नारायण पाटोळे हे एक समाजातील मोठं प्रस्थ मानलं जात होतं. काळू आप्पा या नावानं ते परिचित होते. अत्यंत गरिबीतून, कष्टातून त्यांनी मुंबई आणि अजमीर सौंदाणे येथे आपले छोटेस साम्राज्य निर्माण केलं होतं. कधीकाळी दुष्काळाच्या परिस्थितीत कुटुंबाला खायला-प्यायला नाही, म्हणून अजमीर सौंदाणे या गावात निर्वासित झालेले, श्री काळू आप्पा यांनी दुसऱ्याकडे काम करून, प्रसंगी तमाशात काम करून लोकांचे मनोरंजन करून ,कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. आज मितीला पंधरा-वीस एकर शेती त्यांच्याजवळ होती. मुंबई येथे दुकान होते. परिस्थिती बेताची होती ,परंतु त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी लोकांवर उपकार केलेले असल्यामुळे, एक देव माणूस म्हणून त्यांची ख्याती सगळीकडे पसरलेली होती. कदाचित बेबी चे वडील श्री.भगवंत मोतीराम महाले उर्फ महाले गुरुजी यांनी काळू आप्पांची ख्याती ऐकून आपली मुलगी या घरात देण्याचे ठरविले असावे. त्याकाळात उच्चभ्रू समाजाला लाजवेल असे बाराखणी घर सागवानी लाकडामध्ये काळू आप्पांनी बांधलेलं होतं. अजमीर सौंदाणे गावात आणि समाजाच्या गल्लीत "मोठं घर" म्हणून काळू आप्पांचं घर ओळखल जात असे. काळू अाप्पा फार श्रीमंत नसले तरी मनाने अतिशय दिलदार होते. अडाणी असलेले काळू अाप्पा व्यवहार ज्ञानात मात्र अत्यंत कुशल होते. ते गल्लीतील समाज बांधवांचे दैवत म्हणून ओळखले जात असे. अडीअडचणीच्या काळात सर्वांना ते मदत करीत असत. अत्यंत प्रामाणिक, व विश्वासू होते. इर्षा द्वेष, मत्सर या पासून कैक मैल लांब 
 काळू आप्पा सर्वांच्या आदरस्थानी होते. काळू अप्पांना तीन मुले व एक मुलगी . श्री देवराम हे थोरले, श्री पुंडलिक हे मधले तर श्री शंकर हे धाकटे सुपुत्र. मंजुळाबाई ही त्यांची कन्या. चि. बेबी या घरात सौ. रत्ना बनवून येण्यापूर्वीच भावाभावांचे विभाजन झालेले होते. श्री. देवराम उर्फ दादा यांच्या पत्नीचे नाव भागाबाई. काळू आप्पांची पत्नी अहिल्याबाई. श्री देवराम व भागाबाई यांना असलेली सात अपत्य! त्यापैकी श्री.अशोक यांच्याशी सौ. रत्ना चा शुभविवाह झाला.
 आजे सासरे.. सासू, सासरा ..सासू, दीर नणंदा जावा, चुलत सासरे -सासू ,चुलत दीर -नणंदा ,जावा असे सर्व मिळून त्या बाराखणी घरात नांदत होते. अशा भरभक्कम संख्या असलेल्या घरात सौ. रत्ना ने प्रवेश केला. एका कुटुंबामध्ये इतके सदस्य एकत्र असू शकतात, हे आताच्या काळातील मुला-मुलींना न पटण्यासारखे आहे. परंतु काळू आप्पा आणि देवराम दादा यांच्या नियंत्रणात हे घर व्यवस्थित नांदत होते. एका सुशिक्षित घरातील शिकलेली मुलगी आपल्या घरामध्ये सून म्हणून आल्याचा निखळ आनंद सासू-सासरे यांच्या आणि काळू आप्पाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नवीन सून घरात आल्यानंतर डोक्यावर पदर घेऊन सगळ्यांच्या पाया पडली. पंचवीस-तीस कुटुंब असलेली गल्ली काळू आप्पाने जागी केली. नव्या सुनेला पाहण्यासाठी गल्लीतील सर्व ज्येष्ठ मंडळी ,पोरीबाळी मोठ्या घरी आली. सर्वांच्या पाया पडत बिचारीचे कंबरडे मोडले. कुठलाही अनुभव नसताना सासूबाईंनी चूल पेटवून सर्वांसाठी चहा ठेवायला सांगितला. नव्या सुनबाई यांच्याहस्ते सर्वांना चहा पाणी झाला. तशी संध्याकाळ झाली. पेटलेली चूल पेटलेलीच राहिली . चहाचं पातेल उतरून भाकरीचा तवा चुलीवर चढला. कधीही माहेरी पोळी न केलेली रत्ना छोट्या-छोट्या नाजुक पोळ्या, वेड्यावाकड्या... जमतील तशा करू लागली. मनातल्या मनात वडिलांना कोसू लागली. पोळी शिजवताना बसलेल्या चटक्या परीस आई-वडिलांना दोष देऊ लागली. पण म्हणतात ना आले या  भोगासी असावे सादर...याप्रमाणे तिने मागे हटायचं नाही ,असा मनाचा निर्धार करून कामाला सुरुवात केली.लाटलेली छोटीशी पोळी टोपलीत पडताच घरातली चिल्लीपिल्ली उचलून हातात धरून खात होती. तीन-चार तास सलग चुलीजवळ बसून पोळ्या ती शिजवत होती. त्यानंतर घरातली मोठी माणसं स्वयंपाक झाल्यावर जेवायला बसली. नवीन सुनबाई आपल्याला जेवायला वाढेल, याचा आनंद प्रत्येक वयस्क लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खरंतर तिची आज परीक्षा होती. काळू आप्पा थोडे वयस्कर झालेले असल्याने तोंडात दात फारसे नव्हते. ताटात वाढलेल्या पोळीचा तुकडा तोडून त्यांनी तोंडात टाकला. पोळी वेडीवाकडी असली तरी मऊ लुसलुशीत झालेली पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाला. दुसऱ्या दिवशी गल्लीतली सगळी माणसं गोळा करून माझी नातसून कशी सुगरण आहे ,हे चहाचा झुरका घेत घेत रंजकतेने सांगत होते. नव्या नात सुनेचे हे कौतुक म्हणजे जणू आयुष्याच्या नवीन प्रवासास अतिशय सुरेख तिने सुरुवात केली, याची ती पावती होती. कदाचित आईचा झालेला अनाहूत संस्कार बेबी मध्ये उतरला होता . सौ रत्नाची आई , सौ. शांताबाई..म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती.
   ....ती पुरणपोळी चा स्वयंपाक करण्यामध्ये निपून होती. साधी भाजी पोळी तिच्या हातची खाणं म्हणजे पंचपक्वान्न समान होते. आले गेलेल्यांची खातर दारी करणे, योग्य तो पाहुणचार करणे, जे काम करू ते मनापासून करणे, रीतिरिवाज नुसार वागणे. नवऱ्याचा शब्द तिच्यासाठी प्रमाण असे.  कजाग आणि रागीट असलेल्या नवऱ्यासमोर ब्र शब्द देखील ती काढत नसे. कुटुंबातील सर्वांचे मन धरून कोणालाही न दुखावता इतरांच्या आनंदात ती स्वतःचा आनंद शोधत असे. लहान वयातच मातृछत्र हरपले होते. वडील आणि सावत्र आई तसेच पारनेर येथे मामा आणि मामी कडे तिला राहावे लागले. मामा नी जुजबी शिक्षण दिल्यानंतर, धुळे येथे राहणारे मामा व पेशाने वकील असलेले श्री. मोतीराम राघोबा पाटोळे उर्फ पाटोळे दादा यांच्याकडे तिला पाठवून सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या कालावधीत श्री. भगवंत मोतीराम महाले यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते. कोणीतरी दूरच्या नातेवाईकाने हे स्थळ शांताबाई साठी सुचविले. आईविना पोरकी असलेल्या या मुलीने न बोलता लग्नास होकार दिला. नवरा स्वतः जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. परंतु स्वभावाने अत्यंत तिखट होते. मी सांगेल तीच पूर्व दिशा, अशा विचारसरणीचे होते. परंतु शिक्षणाचे महत्त्व त्यांनादेखील ठाऊक असावे .म्हणून त्यांनी सौ. शांताबाई यांचे बरोबर विवाह झाल्यानंतर डीएड शिक्षणक्रम नाशिकच्या गव्हर्मेंट गर्ल हायस्कूल येथून  पूर्ण करून घेतला.काही कालावधीनंतर शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी देखील मिळाली. परंतु पगाराचा एक छदाम देखील त्यांच्या हातात पडत नसे. नवरा सर्व वाणसामान घरात आणून देईल तेवढ्या पैशांमध्ये गुजराण करावी लागे. आयुष्यभर काटकसरीने संसार केला. बचतीचे महत्त्व तिला माहित होते. आपली बेबी अभ्यासात हुशार आहे. तिचं शिक्षण पूर्ण करावं. छानसी तिला नोकरी मिळावी, म्हणजे ती आनंदाने संसार करु शकेल ,असे स्वप्न शांताबाईंनी पाहिले होते. परंतु पतीने परस्पर बेबीचे लग्न ठरवले. पतीचा शब्द प्रमाण मानून आपल्या मुलीची समजूत तिने घातली होती. शांताबाई च्या दोन्ही मुली सौ. इंदू व सौ. सिंधू यांचे शिक्षण होऊ शकले नाही .कमी वयात त्यांची लग्न झाली. म्हणून बेबीने खूप शिकावे, नोकरी करावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती. कदाचित नियतीला ते मान्य नसावे. असो.
   सर्वांची जेवणे आटोपली. रत्ना आता पुरती थकली होती. जेवण करण्याचीदेखील तिची इच्छा उरली नव्हती. तरीही  सासूबाई सौ. भागाबाई  यांचा प्रेमळ आदेश प्रमाण मानून दोन घास तिने पोटात ढकलले. उष्टी खरकटी भांडी धूतली. झाडलोट झाली. सौ भागाबाई व शांताबाई या दोन्ही एकमेकांच्या आते बहीणी होत्या. एकमेकांच्या नात्यातल्या असल्यामुळे कदाचित फार भीती सासुबाईंचे वाटली नाही. थकली भागलेली रत्ना रात्री झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला पहाटे पाच वाजता. सासुबाई , जाऊबाई, स्वतः रत्ना पाणी भरण्यासाठी हंडा कमरेवर घेऊन गावाबाहेर नदीवर निघाली. घरातल्या स्त्रीने गावातून जाताना चप्पल घालायची नाही, अशी त्या काळातली रीत. अनवाणी पायाने चालत, रिकामा हंडा घेऊन जाताना फारसे काही वाटले नाही .परंतु पाण्याने भरलेला हंडा घेऊन येताना  खूप त्रास झाला. पायाला कच्चा रस्त्याची खडी टोचत असल्याने डोक्यावर ठेवलेला पाण्याचा हंडा अर्धवट घरी येऊ लागला. न राहून तिने आपल्या पतीला याबाबत सांगितले. त्यांना तिची दया येऊन चप्पल घालून जा .कोणी बोलले तर मी पाहून घेईन, अशी हिंमत दिली. पाण्याच्या दहा-बारा खेपा केल्यानंतर चूल पेटवायची. सगळ्यांना आंघोळीला पाणी काढायचे. सर्वांचा चहापाणी व्हायचा. स्वयंपाक करायचा. जेवण व्हायची. भांडीकुंडी धुतली जायची. तोपर्यंत घरातल्या वयोवृद्धांची दुपारच्या चहाची वेळ व्हायची. त्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. अशारीतीने घरातली चूल सतत धगधगतच राहायची. दिवस उजाडण्यापूर्वीच एखाद्या यंत्राप्रमाणे कामाला सुरुवात व्हायची .घडीचीही उसंत मिळत नसे. चहापाणी, स्वयंपाक, उष्टी खरकटी धुणी-भांडी, असे करत दिवसामागून दिवस जात होते. रोज आईची आठवण येत असे. सर्व सोडून पुन्हा माहेरी निघून जावं आणि आईला बिलगून खूप खूप रडावं असं वाटत होतं. परंतु अशावेळी वडिलांचा रागीट स्वभाव आठवत असे.
      रत्नाचं सासर तसं खेडेगाव. साधारण हजार-बाराशे वस्ती असलेलं गाव. विजेचा लपंडाव तर नित्याचाच. असेच एके रात्री अचानक वीज गेली. रॉकेल वरचे कंदील मोजकेच असल्याने अंधाऱ्या खोलीत ती एकटीच बसली होती. लहानपणापासूनच बारीक अंगकाठी असलेली रत्ना तशी घाबरट होती. अंधाराची तर तिला फारच भीती वाटत असे. परंतु घाबरून सांगते कुणाला? ती आता सासरी होती. माहेरी नव्हे! डोळे बंद करून जमिनीवरच्या बिछान्यावर ती पडून राहिली. तेव्हा तिला आठवले... तिचे बालपण. आई-वडिलांचा सहवास. भावंडांशी उडणारे लडिवाळ खटके. हो, काहीतरी निमित्ताने एक पूजेचा प्रसंग.. जसाच्या तसा आठवतोय. दोन नंबरचा भाऊ अशोक, लोखंडी पलंगावर स्टूल ठेवून, स्टुलावर पाट ठेवून, त्यावर त्याने बेबीला उचलून बसविले होते. ती जोरात आकांत-तांडव करत होती. पडण्याच्या भीतीने रडत होती. आणि भाऊ मात्र हसत होता. अचानक रत्ना स्टूल वरून खाली पडली. गुडघ्याला जखम झाली. काय झाले म्हणून आई पहायला बाहेर आली. आईने अशोकला धो धो  धुतले. त्याच्या अशा कृत्याबद्दल आईने त्याला शिक्षा काय केली माहिती आहे... रोज बेबीला पाठीवरून घेऊन डॉक्टर कडे जायचे व गुडघ्याला बँडेज करून आणायचे!! भाऊही तसा हुशार! तो घरातून निघाला की रस्त्यात तिला पाठीवरून उतरून देत असे. मग बेबी रस्त्यातच भोकाड पसरे. नाईलाजास्तव त्याला तिला पाठ गोळी घेऊन घरी आणावे लागत असे. भावा बहिणीचे लडिवाळ लटके खटके होत असत .परंतु ते तेवढ्यापुरतेच. तरीही बेबी जरा अंग काठीने नाजूक असल्यामुळे सहानुभूती शेवटी तिलाच मिळे. माहेरच्या अशा सुखद आठवणी मध्ये ती रमून गेली. वडील जरी स्वभावाने खास्ट असले तरी मुलांचे खाण्यापिण्याचे लाड ते भरपूर पुरवत असत. आई मात्र मुलांची हौस मौज करीत असे .हे करत असताना मात्र संस्कार देखील तिने खूप चांगल्या पद्धतीने केले. मुलांनी शिस्तीत वागावं,असं तिला नेहमी वाटे.मुलींमध्ये आणि मुलांमध्ये तिने कधी भेदभाव केला नाही.घरातील कामांची वाटणी ही सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात करायची. दोन्ही भाऊ थोडे समंजस असल्यामुळे तशा प्रकारची कामं त्यांना दिली जात असायचे. विजू दादाला नदीवरून कपडे धुवून आणणे, पांढरे कपडे निळात बुडविणे ,कपडे वाळत घालने, अशी कामे करावी लागत असे. मुलींना सडा-रांगोळी घालने ,स्वयंपाकात थोड्याफार प्रमाणात मदत करणे, अशी छोटी-मोठी कामं करावी लागत असे. बेबी ने एकदा  विजू दादा चे काम ऐकले नाही म्हणून त्याने तिला कानशिलात मारले. आईला त्याचा खूप राग आला. त्याला काही दिवस नगरला सावत्र भावाकडे राहायला पाठविले. या आठवणींमुळे कधी डोळ्याला डोळा लागला हे तिला कळले देखील नाही.
 दिवसामागून दिवस जात होते. दसरा नजिक येऊ लागला होता. रत्नाचे डोळे माहेरा कडे लागले होते. आई-वडिलांचा कधी सांगावा येईल याची चातकाप्रमाणे वाट पाहत होती. तसा तो दिवस उजाडला. कोणीतरी नात्यातली एक वयस्क व्यक्ती पहिल्या मुळा करिता माहेरी नेण्यासाठी आली होती. माहेरी जाण्याची लगबग सुरू झाली. आलेल्या मुरहाळी साठी पाहुणचार आंबे रसाचा झाला. लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाणाऱ्या आपल्या सूनेसाठी सासर्‍यांनी रुपये सोळा खर्चून साडी आणली. नवी साडी नेसून रत्ना माहेराच्या वाटेला लागली. कधी नव्हे इतक माहेर दूर वाटू लागलं. रस्ता संपता संपेना....
             माझ्या माहेराची वाट
          जसा झरोका मायेचा
             आनंदाच्या वनांमध्ये
         कल्पवृक्ष हा छायेचा.
माहेराच्या ओढीने तिचे मन व्याकूळ झाले होते.
 एसटीच्या सीटवर बसल्या बसल्या तिचा डोळा लागला. लहानपणापासूनच बेबी खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडी त्रास देत होती. कोणत्याही डाळीच्या भाज्या ती खात नसे. आवडता पदार्थ असला तरच जेवण करी. म्हणून सातवीनंतर आई-वडिलांनी तिला चांगली शिस्त लागावी म्हणून हॉस्टेलवर ठेवण्याचा निर्णय घेतला. इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये असताना धुळ्याच्या वत्सलाबाई नाईक मुलींच्या हॉस्टेल वर तिची सोय करण्यात आली. होस्टेलमध्ये देखील ती जेवण करीत नसे. आठवड्यातून दोनदा तरी आईला पत्र लिहीत असे. मला इथे जेवण चांगले मिळत नाही. मला हॉस्टेलवर राहायचे नाही. असं सांगे. परंतु मुलीला सासरी जायचे असते ,तिला हे सगळं जमलं पाहिजे .म्हणून आई आणि वडील तिच्या या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत असत. अधून मधून वडील ,भाऊ -बहिणी तिला होस्टेलवर भेटायला जात. एक ..दोन रुपये तिला देऊन येत. त्यातून ती डाळ्या मुरमुरे ,गुळ शेंगदाणे खरेदी करून खात असे. परंतु नंतर त्या हॉस्टेलमध्ये खाण्याचे खूप हाल होतात ,असे पाहून इयत्ता नववीच्या वर्गामध्ये असताना धुळ्याच्या इंदिरा गांधी मुलींच्या होस्टेलवर रत्नाची सोय करण्यात आली. अधून-मधून आई  लाडू, रव्याचा शिरा करून मुलीसाठी होस्टेलवर पाठवीत असे.
   दरम्यान विजू दादाचे लग्न ठरले. बेबी चे वडील लग्न ठरवण्यासाठी सटाण्याला आले. तेथे लग्न ठरवून झाल्यानंतर पाहुणे मंडळींची जेवण झाली. गप्पागोष्टी झाल्यानंतर अजमीर सौंदाणे येथील भाऊबंद असलेले श्री. खंडू शिवराम पाटोळे उर्फ भाऊ शेठ आलेले होते. त्यांच्याशी बेबी च्या वडिलांची ओळख झाली. मुलाबाळांच्या चौकश्या झाल्या. तुमची मुलगी आमच्या देवराम दादाच्या मुलाला का देत नाही? अशी विचारणा करून अजमीर सौंदाणे येथे नेले. बेबीला काहीही माहीत नसताना एफ .वाय. बी .ए .ला असणाऱ्या मुलाशी आपल्या मुलीचा विवाह श्री .महाले गुरुजी यांनी ठरवून टाकला. स्थळ नात्यातले आहे .घरंदाज आहे .शेती आहे. मुलगा शिकतो आहे. असा विचार करून आपली मुलगी देण्याचे त्यांनी निश्चित केले व ते कुसुंबा  येथे परतले. त्यावर्षी बेबी इयत्ता दहावीच्या वर्गांमध्ये शिकत होती. परीक्षा झाल्यानंतर तिला घेण्यासाठी तिचा भाऊ धुळे येथे घ्यायला आला होता. त्याकाळी दहावीला असणाऱ्या मुलींकरिता पांढरी साडी आणि पांढरे ब्लाऊज असा, नर्स सारखा गणवेश असे. भाऊ बहीण दोघेही कुसुंबा येथे येण्यासाठी एसटीमध्ये बसले. एसटीत असलेल्या एका माणसाने विचारले की तुम्ही महाले गुरुजींची मुल आहात काय? विचारपूस करता करता त्या माणसाने असे सांगितले की, महाले गुरुजींच्या घरी मुलीचे लग्न आहे. तोपर्यंत बेबीला याची काहीच कल्पना नव्हती. घरी आल्यावर तिला हे सर्व कळले. ज्याच्याबरोबर संपूर्ण आयुष्यभर संसार करायचा त्याचा चेहरा देखील तिने पाहिला नव्हता. शिक्षण अर्धवट राहील म्हणून तिने लग्नास नकार दिला. तिला खूप वाईट वाटले .एक महिनाभर ती कोणाशीही बोलली नाही. शेवटी आईने तिची समजूत काढली .साखरपुड्याची तारीख जवळ येत होती. मोठी बहीण इंदू व सिंधू यांनी देखील भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी आईने वडिलांची इज्जत  जाईल अशी भीती दाखवली आणि बेबी लग्नासाठी तयार झाली. अकरावीची परीक्षा देता येणार नाही .आपले शिक्षण अर्धवट राहील .यामुळे तिला खूप वाईट वाटले. परंतु वडिलांनी दिलेला शब्द खोटा ठरू नये ,समाजात त्यांची अवहेलना होऊ नये, म्हणून तिने लग्नास होकार दिला. २२ मे १९७२ रोजी अशोक व रत्ना यांचा विवाह अजमीर सौंदाणे येथे रितीरिवाजाप्रमाणे संपन्न झाला.
  सौ .रत्ना आता माहेरी पोहोचली. आईला बिलगली. मनसोक्त रडली. आईने समजूत काढली. सासर्‍यांनी घेतलेली सोळा रुपयाची साडी आईच्या अंगावर फेकली. माझ्या आयुष्याचं नुकसान केलं, असं म्हणत वडिलांना दोष देऊ लागली. 
      सणासुदीची घरी येता
    माय करीत असे सय,
     दोन थेंब डोळ्याखाली,
      लेकीसाठी झुरी जाय.
डोळेभरुन आईने बेबीला पाहिले.
दुसऱ्या दिवसापासून मात्र भावंडांमध्ये सर्व विसरून रममाण झाली. गप्पागोष्टी केल्या. श्री.
 महाले गुरुजी यांच्या घरी दसऱ्याच्या निमित्ताने चक्र पूजेची लगबग सुरू झाली. त्यांनी या कार्यक्रमासाठी व्याह्याना निमंत्रण धाडले. विजू दादाचे सासरे बेबी चे सासरे दोघेही चक्र पुजेच्या निमित्ताने व सून बाईंना घेण्याच्या निमित्ताने कुसुंबा येथे आले. पूजा आटोपल्यानंतर व्याह्यांना पाहुणचार झाला. एक दिवस मुक्काम करून उद्या देवराम दादा सुनबाई ना घेऊन परत जाणार असे ठरले.
  इकडे बेबीला मात्र पुन्हा त्या वातावरणात सासरी जायची इच्छा होईना. ती खूप नाराज झाली. अकरावीची परीक्षा मला द्यायची आहे, अशी इच्छा तिने आई आणि भावाजवळ व्यक्त केली. आई धर्मसंकटात पडली. एका बाजूने नवर्‍याचा आदेश मोडता येत नव्हता तर दुसरीकडे मुलीच्या भावनांशी ती एकरूप झाली होती. विजू दादांनी हिंमत दाखवली. दुसऱ्या दिवशी पहाटेलाच कोणालाही न सांगता तिची तयारी करून धुळे येथे होस्टेल ला तो सोडून आला. नंतर बेबी च्या वडिलांना कळल्यावर त्यांनी प्रचंड संताप केला. आई आणि विजू दादावर शिव्यांचा भडिमार केला. सर्वांशी भांडण केले आणि ते रागाच्या भरात नगर येथे आपल्या  मुलाकडे म्हणजे सुभाष दादा कडे निघून गेले. थोडे दिवस गेल्यानंतर दिवाळीचा सण जवळ येत होता. बेबीला परीक्षा झाल्यानंतर सुट्ट्या लागल्या होत्या. बेबीची वहिनी म्हणजे विजू दादा ची बायको कल्पना, तिला माहेरी नेण्यासाठी तिचे वडील आले होते. घरी आल्यावर आईने देवीला स्पष्ट शब्दात सांगितले. तुझ्या वडिलांचा स्वभाव तुला माहिती आहे. या मामांच्या बरोबर तू आता तुझ्या सासरी जा. दिवाळीचा सण आहे मी आता सासरी कशी जाऊ? असा प्रश्न तिने केला. आईने तिची समजूत घातली. दिवाळीचे सार सामान केले.
      काय देऊ, काय नको,
     काय खाते मायबाई
      सुपा एवढ्या मनाची,
     लगबग सुरू होई.
 बेबीची इच्छा नसताना ,तिला धुळे येथे नेऊन बाजारातून कपडेलत्ते खरेदी केले. आणि वहिनी बरोबर तिला दिवाळी असतानादेखील सासरी पाठवले. एसटी अंतर कापत होती. बेबी चे मन मात्र माहेराहून निघायला तयार नव्हतं. आईच्या आठवणीने कंठ दाटून आला. आईची परिस्थिती तिला समजत होती. नवर्या पुढे आईचे काही चालत नव्हते. तिचे आपल्या मुलांवर नितांत प्रेम होतं. शिक्षणात खंड पडून रत्नाचे लग्न झालं, यामुळे तिला देखील खूप वाईट वाटले होते. तिच्या आठवणीने आई देखील रडत असे. बेबी ची आई अत्यंत विचारी स्त्री होती. मुलींना ती नेहमी चांगलंच शिकवीत असे. सासरी असताना मुलीने कसं वागावं, सगळ्यांशी मिळून-मिसळून रहावं, याबद्दल ती आवर्जून सांगत असे. आईचं सर्वात जास्त प्रेम बेबी वर होतं.
     लहानपणी घडलेला एक प्रसंग तिच्या नजरेसमोर तरळला. कदाचित बेबी तिसरी किंवा चौथीच्या वर्गांमध्ये असेल. आईने सर्वांसाठी घरात बुंदी तयार केली होती. पितळेच्या एका डब्यामध्ये बुंदी ठेवून, तो डबा लाकडी कपाटात ठेवला होता. काही कामाच्या निमित्ताने आई बाहेर गेली. लहानगी नंदा ,विजू दादा बाहेर खेळत होते. सुभाष दादा आणि बेबी घरांमध्ये बसलेले होते. घरामध्ये कोणी नाही ,हे पाहून कपाट उघडून डब्यातली बुंदी बेबीने अर्धी संपवली. ते कोणाच्या लक्षात देखील आले नाही .संध्याकाळी आई घरी आल्यानंतर सर्व मुलांनी आईकडे बुंदी देण्याबाबत सांगितले. आई डबा पाहायला गेली, तेव्हा तिच्या लक्षात आलं की डब्यातली अर्धी बुंदी संपलेली आहे. बुंदी कोणी खाल्ली ?असा प्रश्न तिने सर्वांना विचारला बेबीला ही तोच प्रश्न विचारला .बेबी काही कबूल होईना. सुभाष दादाने एक शक्कल लढवली. त्याने बेबीला मांडीवर बसवले आणि तिला म्हटले ज्याने बुंदी खाल्ली असेल ,त्याने जर कबूल केले, तर आई त्याला अधिक बुंदी देईल .तरीदेखील बेबी कबूल झाली नाही. शेवटी तिच्या फ्रॉक च्या खिशात सुभाषने हात घातल्यावर बुंदीचे कण त्याच्या हाताशी आले. तो आईला म्हणाला आई चोर पकडला ! बेबीने बुंदी खाल्ली, यापेक्षा तिने बुंदी चोरून खाल्ली, याचा प्रचंड राग आईला आला. तिने घरातले हँडल असलेले एक पातीले रागाच्या भरात बेबीला मारून फेकले. दरवाजाच्या मागचा झाडू उलटा करून छोट्याशा बेबीला झोडपले. तेव्हापासून सर्वजण बेबीला "दांडीचं पातीलं" किंवा "बुंदी चोर" म्हणून चिडवत असे. त्यानंतर बेबी ने चोरून कधी काही खाल्ले नाही किंवा खोटे कधी बोलली नाही. मारून फेकलेलं दांडी असलेलं ते पातेलं आईने आता तिच्यासोबत सासरी दिलं होतं. जणूकाही ही सासरी असताना देखील, चोरी लांडी लबाडी करू नये, याची आठवण राहावी म्हणून, सोबत दिलं असावं..
     दुःखित होऊन मनी
         त्यजिले मी माहेराला.
         करता गृहप्रवेश,
         सासरी जीव लागला.
याप्रमाणे सौ. रत्ना ने सासरी प्रवेश केला. लेकीबाळी सणासुदीला माहेरी जातात. ही मात्र सणासुदीलाच सासरी आली होती. जणू आपल सासर आणि माहेर आता हेच आहे, हे तिने मनोमन ठरवलं होतं.
    रत्नाची सासुबाई, सौ .भागाबाई अत्यंत प्रेमळ स्त्री होती. सहनशील होती. सासुरवास करणे हा तिचा पिंडच नव्हता. कदाचित आईविना पोरकी असलेल्या व स्वतःला मुलगी नसल्यामुळे सुनेकडे ती मुलींच्या भावनेने पाहत होती. त्यात रत्ना म्हणजे शिकल्या-सवरल्या, मास्तरच्या घरातून आपल्याकडे आली आहे. म्हणून तिच्यावर तिचा थोडा जास्तच जीव होता. सुनांच्या आधी भागाबाई घरामध्ये सर्वात आधी उठत असे. त्यांच्या बरोबरीने किंबहुना अधिक काम करत असे. कोणाला आदेश करणं, हे तिच्या स्वभावात नव्हतं. अत्यंत सहनशील स्वभावाची भागाबाई" मोठी माय" म्हणून प्रसिद्ध होत्या. भागाबाई खऱ्याअर्थाने मोठं मन असलेल्या. इर्षा,राग, द्वेष लोभ ,मत्सर अश्या विकारांपासून त्या लांब होत्या. श्री. देवराम व सौ. भागाबाई या दांपत्यास आठ अपत्ये होती. थोरला मुलगा श्री. दादाजी व त्याची पत्नी सौ. लिलाबाई हे ते मुंबईत राहत असे. दुसरा क्रमांक श्री. अशोक व सौ. रत्ना यांचा होता. तिसरा मुलगा श्री. शिवदास  व त्याची पत्नी सौ. मंगलाबाई. श्री. शिवदास हा सरकारी खात्यांमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरीला लागला होता. चौथे अपत्य  श्री. बाळासाहेब हे तलाठी म्हणून नोकरीला होते. पाचव्या क्रमांकावर होते श्री. दिलीप हे सरकारी खात्यात नोकरी करायचे. सहाव्या क्रमांकावर श्री. सुनील व सातव्या क्रमांकावर श्री. श्याम ,अशी भागाबाई ची मुले होती. सर्व दीर चांगल्या स्वभावाचे होते. दिवसभर वहिनी आपल्याला चांगले खायला देईल या आशेने सर्व मुलं वहिनीशी छान वागायचे. हळूहळू सौ रत्ना ने आपल्या कष्टाने, वागण्या बोलण्याने व सहृदयतेने  कुटुंबीयांचे मन जिंकून घेतले.
       सौ.भागाबाई च्या सासुबाई म्हणजे काळू आप्पांच्या पत्नी सौ. अहिल्याबाई यादेखील घरांमध्ये असायच्या. अत्यंत  शांत ,सुस्वभावी अशी ती महिला होती. अडाणी असली तरीही ही खूप समंजस होती.दिसायला गोरीपान,उंच होती. भावा भावांच्या विभागणीत वडील श्री. देवराम दादांकडे तर आई श्री. शंकर बापूजी यांच्याकडे.. अशी विभागणी झाली होती. तरी अहिल्याबाई चा सर्व ओढा मोठ्या मुलाच्या कुटुंबीयांकडे होता. खाण्यापिण्याची हौस इथेच भागवली जात होती. देवराम दादाच्या हालाखीच्या काळात घडलेल्या एका प्रसंगामुळे अहिल्याबाईंच्या मनावर थोडा विपरीत परिणाम झाला होता. तरीदेखील अहिल्याबाई अतिशय शांत राहत असत. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये ,याची त्या सतत काळजी घेत असत. श्री अशोक .. या नात- वावर तिचं खूप प्रेम होतं. काही हवं नको असल्यास ती अशोकला आवाज देई. सौ. रत्नाच्या हातचा स्वयंपाक खाऊन तिला तृप्तता वाटे. श्री काळू आप्पा व सौ. अहिलाबाई यांना मंजुळाबाई नावाची एक मुलगी होती. काळू आप्पांना आधीपासूनच मुलीचा फार कंटाळा असे. आई मात्र मुलीवर जीवापाड प्रेम करी. मंजुळा बाईंचे आयुष्य म्हणजे एक प्रकारची संघर्षाची कहाणी होती. परंतु वडिलांच्या स्वभावामुळे तिने कधी ते चेहर्‍यावर दिसू दिले नाही. नशिबाला दोष दिला नाही.
   घरातल्या सर्वांनाच सौ. रत्ना बद्दल आपुलकी आणि जिव्हाळा वाटू लागला. घर, गल्ली, गाव अशा सर्वच लोकांमध्ये रत्ना  एक चांगली सून, चांगली वहिनी , चांगली लेक, एक चांगली बहीण, या नात्याने वावरु लागली. घरातील वयोवृद्धांचे आशीर्वाद ,लहानथोरांचं प्रेम तिला लाभलं. सगळीकडे रत्नाचं आता कौतुक व्हायला लागलं. आपसूकच अनेकांना तिचा हेवा देखील वाटायला लागला. घरामध्ये थोड्याफार प्रमाणात कुरबुरी सुरू झाल्या. तेव्हा शेतामध्ये घर बांधायचं ठरलं. सर्व  दिरांनी मिळून शेतात मातीच्या भिंती उभ्या करून उसाच्या पाचटापासून तयार केलेली झोपडी तयार केली. देवराम दादा चे संपूर्ण कुटुंब शेतात रहायला आले.
   हळूहळू रत्नाने शेतीची सर्व कामे शिकून घेतली. निंदणी करणे, कापणी करणे, पेरणी करणे सर्व कामे हळूहळू ती कौशल्याने करू लागली. यामुळे सासु-सासर्‍यांना रत्नाचे कौतुक वाटत असे. शेतात कामाला येणारे मजूर यांच्याशी ती आपुलकीने वागत असे. नवखं असलेलं सासर तिने आपल्या वागण्याने कवेत घेतलं होतं.
   हळूहळू रत्नाचा संसार फुलू लागला. लग्नानंतर दोन वर्षाच्या कालखंडाने चि. निलेश चा जन्म झाला. आणि तिचे अंगण फुलून आले. नंतर क्रमाने शैलेश ,सचिन आणि आरती अशी चार अपत्ये तिच्या पोटी जन्माला आली. सासर बरोबरच माहेरच्या माणसांनाही आनंद झाला. शेतातल्या अंगणात नातू पणतू बागडताना पाहून सासू-सासरे सर्व आनंदी झाले. आपल्या आईने सांगितलेली एक गोष्ट मात्र  रत्नाने कायम लक्षात ठेवली ,ती म्हणजे तुझं अर्धवट राहिलेले शिक्षणाचं स्वप्न तू मुलांना शिक्षण देऊन पूर्ण करू शकते. मुलांच्या शिक्षणात खंड पडू देऊ नको.
   मी ,सौ. रत्ना चा दुसरा मुलगा... शैलेश. दिसायला रंगरुपाने आईसारखा! स्वभाव आईसारखा!
  मातृ मुखी तो सदा सुखी !! 
    सर्व मुलांवर आईचा सारखाच जीव होता. मुलांना तिने सर्व प्रकारच्या कामाची सवय लावली. मुला-मुलींमध्ये तिने कधी भेद केला नाही. दिवसभर शेतात ती राबत असे. मजुरां बरोबर काबाडकष्ट करीत असे. तरीही ही दोन पैशांची प्राप्ती कधी तिला झाली नाही. केवळ आपल्या मुलांचं कल्याण होईल, याच अपेक्षेने ती रात्रंदिवस झटत राहिली. कष्ट करून कितीही थकली असली तरी तिच्या चेहऱ्यावर निस्तेजपणा कधीच नसायचा.कायम चेहऱ्यावर हास्य असायचं.शेतामध्येच राहत असल्यामुळे आम्हा सर्व भावंडांना शेतीच्या कामाची सवय तिने लावली. आम्हाला काम करताना पाहून आमचे आजी आजोबा यांना खूप अप्रूप वाटायचं. तेव्हा मुलांच्या आई-वडिल यांचा आनंद द्विगुणित व्हायचा. आमचे पणजोबा श्री.काळू आप्पा आम्हाला कौतुकाने कुशीत घेऊन झोपायचे. लाड करायचे. कधीकधी आमच्या ऊनाड वागण्यामुळे आई आम्हाला शिक्षा करायची ,तेव्हा पणजोबा तिला रागवायचे. जाता जाता माझ्या अशोकचे कल्याण होईल ,असा कृपाशीर्वाद त्यांनी दिला.
  आईला माझ्या वडिलांची देखील तेवढीच सक्षम साथ होती. त्याकाळात पदवीधर असून देखील नोकरी मिळू शकली नाही. कदाचित नशिबात नसावे. वडिलांना आम्ही पप्पा म्हणतो. स्वभावाने थोडे तिखट परंतु शिस्तप्रिय होते. फणसासारखे.. वरून कडक परंतु आतून मृदू स्वभावाचे. आई आणि वडील दोघांचेही विचार एकमेकांशी जुळत असत. तरीदेखील पुरुष प्रधान संस्कृती प्रमाणे आईने कधी वडिलांचा उपमर्द केला नाही. वडिलांच्या बद्दल मुलांच्या मनामध्ये सतत आदरयुक्त धाक कसा निर्माण होईल, याचा विचार तिने केला. आई आणि पप्पा दोघेही शेतात राबायचे. पप्पा स्वाभिमानी होते. माझ्या आईच्या माहेरची सांपत्तिक स्थिती कालांतराने सुधारत गेली. विजू मामा पोलीस खात्यात इंस्पेक्टर झाले. अशोक मामा चांगल्या बँकेत मॅनेजर झाले. आईच्या दोघीही मोठ्या बहिणी मुंबईसारख्या शहरात राहत असत. धाकटी बहीण नंदा हीदेखील औरंगाबाद मध्ये अतिशय चांगले जीवन व्यतीत करीत होती. परंतु आईने कधीही माहेरच्या लोकांचा बडेजाव सासरच्या लोकांमध्ये मिरवला नाही. सासरच्या लोकांना कधीही कमी लेखले नाही. माझे सासर माझे आहे ,ही भावना तिच्या तना-मनात होती. अडचण असली तरीदेखील माहेरच्या लोकांकडे हात पसरले नाहीत. आईच्या माहेरच्या लोकांना श्री. पाटोळे यांच्या स्वाभिमानी स्वभावाची कल्पना होती. तरीदेखील अधून मधून भाऊ येऊन बहिणीसाठी शक्य तेवढे करत होते. सौ. रत्ना सासरी आता रमली आहे. छान संसार करीत आहे. सासू-सासर्‍यांना आपलेसे केले आहे. संपूर्ण कुटुंबाला तिने बांधून ठेवले आहे. असे पाहून आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे होई. माझ्या मुलीने माझे नाव काढले, असे अभिमानाने श्री. महाले गुरुजी लोकांना सांगत असत. ते कधी बोलून दाखवू शकले नाही. आपण तिच्या मर्जीविरुद्ध तिचे लग्न लावून दिले. याचे शल्य त्यांना बोचत असे. परंतु माझ्या बेबीने हे सगळं निभावले, याचं त्यांना फार अप्रूप वाटे. बेबी बद्दल असलेले प्रेम त्यांना कधी व्यक्त करता आलं नाही.
     बाप बापाच्याच जागी
   चूप न्याहाळते सारं,
    त्याच्या मुक्या डोळ्यातही
    वात्सल्याचं दिसे वारं ...
  
 एका झोपडी मध्ये सर्व कुटुंब एकत्र राहण्यास अडचण निर्माण होऊ लागली. त्याच्यातली काही माणसं गावातल्या घरात जाऊन राहू लागली. पाचटाच्या झोपडीमध्ये आई चुलीवर स्वयंपाक करत मुलाबाळांचा पोषण करू लागली. परिस्थिती अत्यंत नाजूक. रोजच्या किराणा देखील जेवढा  मिळेल तेवढ्यावरच गुजराण करावी लागत होती. त्यातही ती काटकसर करून गूळ, साखर, डाळी बचत करून ठेवी. महिन्यातून मुलांच्यासाठी  बर्फी ,लाडू ,गोडधोड पदार्थ बनवत असे. आपल्या मुलांमध्ये आणि दीर नणंद मध्ये कधीही तिने भेदभाव केला नाही. त्यामुळे सर्व दीर तिच्याकडे येऊन हक्काने जेवत असत. खायला मागत असत. ती सांगेल त्या पद्धतीने सर्व दीर वागत असत, अर्थात लग्न होण्यापूर्वी!! घरामध्ये टीव्ही, मोबाइल यासारखी मनोरंजनाची कुठलीच साधने उपलब्ध नव्हती. एक छोटासा फिलिप्स रेडिओ होता. त्यात सेल असेपर्यंत बातम्या ऐकण्यासाठी त्याचा उपयोग व्हायचा. परंतु आपल्या शिक्षणाचा मुलांना काहीतरी उपयोग झाला पाहिजे, म्हणून आई आणि पप्पा गावातील शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तके वाचण्यासाठी आणत असत. रात्री जेवणानंतर किमान एक तास आई- पप्पा ,कधी विजेच्या बल्बच्या उजेडात तर कधी कंदिलाच्या प्रकाशात वाचन करीत असे. आम्हा मुलांना मग आपोआपच अभ्यासाची गोडी लागली. कुठल्याही कारणास्तव मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी दोघेही अतोनात मेहनत करीत असत.
   आता सारखा त्या काळात मोबाइल किंवा फोन उपलब्ध नसल्यामुळे कोणाशी पटकन संवाद साधता येत नव्हता. आपल्या आईवडिलांची तिला सतत आठवण येत असे. अधून मधून आईची पत्र यायची. तेच तिच्यासाठी माहेरपण होतं!! पत्राच्या अशा देवाणघेवाणीतून मायलेकीचं बोलणं व्हायचं. आईला करावे लागणारे कष्ट, मेहनत होणारा शारीरिक त्रास, हे कधी तिने आपल्या आई-वडिलांकडे बोलून दाखविले नाही. हे केवळ माझ्याच नशिबात नाही, तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या मजूरांकडे पाहून आपलं दुःख हे इतरांच्या दुःखापेक्षा कमी आहे ,असा विचार ती करत असे. शेतामध्ये मिरची, भेंडी ,मेथी कोथिंबीर यासारख्या भाज्या लागवड करून त्यातून दोन पैसे कुटुंबासाठी आई मिळवत असे. आम्हा सर्व भावंडांची कपडे ती घरच्या घरी शिवत असे. शिवणकाम गावातील एका सायरा नावाच्या महिलेकडून तिने शिकून घेतले होते. घर चालवण्यासाठी आई आणि पप्पा दोघांनीही खूप मेहनत केली. कुटुंबातील सर्व दीरांची लग्न हळूहळू आई आणि पप्पांच्या पुढाकाराने संपन्न झाली. बरेचदा सासू आणि सासरे तिचा सल्ला घेण्यासाठी तिच्याकडे जात. कारण पप्पा स्पष्टवक्ते असल्याने त्यांच्या अवतीभवती कोणी फिरकत नसे. पप्पांना काही सांगायचे झाल्यास सासू-सासरे आईच्या माध्यमातून सांगत असत.
आई बद्दलचा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये होता.
   मुलं हसत खेळत शिकत होती. शेतातील थोडीथोडकी काम करत होती. कष्टात परंतु आनंदाने दिवस जात होते. अशातच मायेचं आभाळ आईच्या डोक्यावर कोसळलं. १९८४ ची घटना असावी, एके दिवशी अचानक लहान दिर शाम म्हणजे श्याम काका दुपारी पोस्टाची आलेली तार घेऊन शेतात धापा टाकीत आला. पप्पांनी तार वाचली. आई मजुरां बरोबर काम करून थोडावेळ विश्रांतीसाठी ओसरीत गप्पा मारत बसली होती. आणि .....
 सौ.शांताबाई म्हणजे आमची आजी, आईची आई गेल्याची बातमी तिला समजली. दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला. आपण काय ऐकतो आहोत याच्यावर तिचा विश्वास बसेना. जमा झालेल्या आयाबायांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.  कशीबशी भाड्याचे पैसे जमवून मुंबईकडे जाण्यासाठी आई, पप्पा आणि मोठी माय बसणे निघाले. डोळ्यातून येणारे अश्रू प्रयत्न करूनही थांबत नव्हते. कोणाशीही न बोलता बसमधील सीटवर मान टेकून निशब्द, डोळे मिटून बसून राहिली. 
      रुसणार मी न आता
      जरी बोलशील रागे l
     ये रागवावया ही
      परी येई येई वेगे l......
कधी बरे भेट झाली होती तिच्या आईची आणि तिची... आई आठवू लागली. दोन महिन्यांपूर्वी एका नातेवाईकाच्या लग्नात दोघी मायलेकांची भेट झाली. आजी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापिका होती. दोन महिने निवृत्त होण्यासाठी बाकी होते. निवृत्त झाल्यावर धुळ्यातील बंगला विकून मुलाकडे मुंबईला जाणार असे तिने आईला सांगितले. इकडच्या तिकडच्या प्रेमाच्या गप्पा झाल्या. वयोमानाप्रमाणे गुडघ्यांचा त्रास थोडा रक्तदाबाचा त्रास होताच. धुळ्याचा बंगला विकून डोंबिवलीत स्वतःचा फ्लॅट घेतला. फ्लॅटवर जाऊन राहण्यापूर्वी मुलाच्या घरी असताना रात्रीचं जेवण आटोपल्यावर अचानक हृदयघाताचा झटका येऊन तिने मृत्यूला कवटाळले. जेवणानंतर मृत्यू झालेला असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जास्त वेळ प्रेत ठेवता येऊ शकत नव्हते. आई तिच्या आईच्या अंत्यदर्शनाला पोहोचण्यापूर्वीच तिचा अंत्यविधी पार पडला. जणूकाही दोन महिन्यांपूर्वीच तिने आपल्या लेकीला 'अंतिम दर्शन 'दिले होते. जिने आपल्याला आयुष्यात उभे केले, आधार दिला तीच आज आपल्यातून निघून गेली. हा विचार मनामध्ये येऊन जणू आपल्या जीवनात आता काहीच शिल्लक राहिले नाही ,अशी आईची धारणा झाली. जिच्याजवळ सर्वकाही मन मोकळं करू शकत होतो ,अशी जागा आता हरवली होती. उगम स्थानच हरवल्यानंतर नदी जशी सैरभैर होते तसे आता आईला झाले होते. 
      कुणीच नाही माझे.... आई
     करुणेचे तळहात पोरके ...आई
या दुःखातून सावरायला तिला खूप दिवस लागले. घरी परत आल्यानंतर, कामामध्ये, मुलाबाळांमध्ये ,कुटुंबीयांमध्ये ती हळूहळू विसरून गेली. परंतु क्षणोक्षणी आईची उणीव मात्र तिला जाणवू लागली.
   आई गेल्यानंतर तिला खर्‍या अर्थाने आधार दिला ,तो तिचा लाडका भाऊ विजू मामा याने. त्याला नेहमी असे वाटे की, बेबीच्या आयुष्यामध्ये किती दुःख ,किती कष्ट आहेत. तरी देखील तिच्या चेहऱ्यावर कायम हास्य असते. ती कधीही रडत नाही. नशिबाला दोष देत नाही .उलट आपल्यालाच ती समजावते. तो बेबी मध्ये आई शोधायचा. वर्षातून एकदा तिला खास भेटायला शेतात यायचा. साडीचोळी ,मुलांना कपडे, खाऊ  आणायचा. दोन दिवस राहून जायचा. आईचं त्याला फार कौतुक वाटते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहता येतं, याबाबत त्याला खूप अप्रूप वाटे. कधीकधी आई पप्पांना त्याच्या घरी आग्रहाने बोलून पाहुणचार करी. जेणेकरून आईची उणीव तिला भासू नये, यासाठी तो नेहमी प्रयत्न करी.
    दिवसा मागून दिवस गेले .आईची आम्ही दोघे तिघे मुलं बऱ्यापैकी शिकलो. आई-वडील ,आजी आजोबांची पुण्याई म्हणून लवकर नोकरी देखील मिळाली. बहिणीचेही शिक्षण झाले .तिचे लग्न झाले. आम्हा दोन्ही भावांची देखील लग्न झाली. मामा म्हणून सर्व प्रकारची जबाबदारी विजू मामांनी पार पाडली. आता बेबीचे दिवस पालटले म्हणून विजू मामा खूप आनंदी असायचा. दोन पैसे आता तिच्या गाठीशी राहू लागले होते.कष्टाची जागा आरामाने घेतली. तरीदेखील आई पप्पा शेतात राबत होते. शांत बसून राहणे ,हा त्यांचा धर्म नव्हता. मुळात लेकीसुना नातवंडात ते दोघेही आता रमले होते.
  एकदाआई पप्पांना त्याने आपल्या मुंबईच्या घरी बोलावले. त्याच्या ऑफिस मध्ये पोलीस स्टेशनला नेले. आई पोलीस स्टेशनच्या दारात  असतानाच तिथल्या एका पोलीस अधिकाऱ्याने येऊन विजू मामाचे अभिनंदन केले. साहेब , तुम्हाला प्रमोशन मिळाले आहे ! तुम्ही आता एसीपी झालात!!. त्याने पटकन तिचा हात धरला. आईला खुर्चीवर बसवले. चहापाणी झाला. आणि आई पप्पांना उद्देशून म्हणाला .. बेबी! तुझा पायगुन म्हणून मला प्रमोशन मिळाले. जणू काही आईचा आशीर्वाद बेबीच्या रूपाने त्याला मिळाला होता. त्यानंतर संपूर्ण मुंबई  त्याने आईला फिरविले. हाजीअली, सिद्धिविनायक गणपती,  मुंब्रादेवी, वगैरे .आई आणि पप्पांवर त्याचे नितांत प्रेम आणि श्रद्धा होती. फार कमी भावा बहिणी मध्ये असे नाते पहावयास मिळते. पप्पांशी नेहमी तो मित्राप्रमाणे वागत असे.
    अशाच एका प्रसंगी, काही निमित्ताने विजू मामा सौंदाणे येथे आले. दोन दिवस थांबले. माझ्या बेबीचे कल्याण झाले. त्याचा त्याला खूप आनंद झाला. मामा आईला म्हणाला की, इतके दिवस तू कष्टात काढलेस ,पण कधी रडली नाहीस, याचं मला खूप विशेष वाटतं. आई त्याला सोडण्यासाठी रस्त्यापर्यंत गेली असता , तो आईला म्हणाला बेबी मी मात्र आता तुला रडवणार आहे!. आई त्याला हसत हसत म्हणाली ,"तू कितीही प्रयत्न कर मी मात्र रडणार नाही."
काही कारणास्तव विजू मामा आणि त्याचे वडील यांचे शाब्दिक वाद झाल्यामुळे बोलणे बंद होते. आईचे वडील थोडे दिवस आईकडे राहायला आले होते.परंतु विजू मामाचे आणि वडिलांचे बोलणे झाले नाही .त्याला खूप वाईट वाटले. तो निघून गेल्यानंतर आईने वडिलांची समजूत काढली आणि त्याच्याशी बोलणे बाबत विनंती केली. ते तयार झाले. आईने विजू दादा ला फोन लावला. दोन्ही बाप लेकांचे बोलणे झाले. नंतर तो आईशी फोनवर बोलला. आईला त्याने धन्यवाद दिले. माझ्या मनावर चा बोजा तू कमी केलास. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही....
   आणि अचानक आठ दिवसांनी विजू दादा गेल्याची बातमी आली!! हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने विजू मामा चे निधन झाले. आईला मोठा धक्का बसला. आईचे निधन झाल्यानंतर विजू दादाने आईची उणीव तिला जाणवू दिली नव्हती.
         आक्रोशत होते काळीज तिचे.
          भावासाठी विव्हळत होते,
       दादा ..दादा.. करीत होते,
             चित्कारत होते!!
आधी आई च्या रूपाने आणि आता विजू दादा च्या रूपाने दुःखाचा आघात आईवर झाला होता. आठ दिवसांपूर्वीचे विजू दादाचे शब्द खरे ठरले!! प्रेमळ भावाचे अकाली निधनाने ती दुःखात आकंठ बुडाली.....
    अशी कहाणी माझ्या आईची. बेबी पासून सौ. रत्ना पर्यंतचा तिचा प्रवास. आपल्या संस्कारांनी , आचार- विचारांनी सासरच्यांची मने जिंकणारी माझी आई, संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी, मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणारी, मुलांना स्वाभिमान स्वतःच्या वागण्यातून शिकविणारी, वाटेल ते श्रम करण्याची तयारी असणारी,... माझी आई...
     आई साठी काय लिहू...
     आई साठी कसे लिहू....
    आई साठी पुरतील एवढे
            शब्द नाहीत कोठे.
     आई वरती लिहीण्याइतपत
     नाही माझे व्यक्तिमत्व मोठे...
 आई माझी अशी, खान अमृताची जशी!!
    आज माझी आई कौटुंबिक जबाबदारीतून तशी मुक्त झाली आहे. आयुष्य कुटुंबासाठीओवाळून टाकणारी आई.. आजही तशीच आहे.
   आई बद्दल आज पर्यंत केवळ अनुभव घेतला होता. आज ते अनुभव शब्दरूपाने गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. माझे हे तोकडे शब्द तिच्या जीवनाचा संघर्ष वर्णन करण्यास अपुरे आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने जीवन जगण्याचा मूलमंत्र आमच्या आई व पप्पांनी आम्हाला दिल्यामुळे ,आमचे जगणे मात्र सुकर होत आहे. आम्ही सर्व भावंडे आपापल्या नोकरी-व्यवसायात प्रामाणिकपणे कार्यरत आहोत, याचं श्रेय देखील आई -पप्पांना आहे. त्यांच्या संस्काराची शिदोरी बरोबर घेऊन आम्ही आतापर्यंत वाटचाल करीत आहोत. असे आई-वडील लाभणे हे आपले नशीबच म्हणावे!.. इतर भावंडांच्या तुलनेने आईचे आणि माझे नाते मला नेहमी वेगळे आहे ,असे वाटते. माझ्या लग्नाच्या प्रसंगी आईची अचानक तब्येत बिघडली. तिला दवाखान्यात दाखल करावे लागले. जेव्हा जेव्हा मी माझ्या लग्नाचा फोटो अल्बम पाहतो तेव्हा तेव्हा ही खंत मला नेहमीच वाटते, की आई  या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहू शकली नाही.         समंजसपणा शिकावा तो आईकडून. सहनशीलता शिकावी ती आईकडून. आई म्हणजे अलौकिक प्रेमाचा स्रोत ! आई म्हणजे भावनिक आधार!!
       तिच्याच उदरातून पुन्हा पुन्हा जन्म मिळावा, हीच ईश्वराकडे प्रार्थना.
   आई आणि पप्पांना दीर्घ आयुरारोग्य लाभो हेच दान परमेश्वराकडे मागतो !!
   आई तुझ्या चरणी वैकुंठ
   तूच माझा पांडुरंग.
    आई उच्चाराणेच होई,
    सगळ्या वेदनांचा अंत.........
                                             तुझा मुलगा
                                                  शैलेश

लेख पहिला ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
३ मार्च २०२०________________________


9 comments:

Milind Nerkar said...

🙏🙏 So Nice 🙏🙏 स्वामी तिन्ही जगाचा । आई विना भिकारी ।।

Milind Nerkar said...

🙏🙏 Very Nice 🙏🙏
स्वामी तिन्ही जगाचा ।
आई विना भिकारी ।।

Milind Nerkar said...

🙏🙏

Shailesh blog said...

Thank you Milind 😔🙏

Shailesh blog said...

लेखनाचा श्रीगणेशा ✍️✍️✍️😊

दिपक पुं कडाळे said...

आपल्या आईची आपल्याशी नाळ ही कायमस्वरूपी जोडलेली असते कारण प्रथम मार्गदर्शक प्रथम गुरु असते भावनांचे भांडार,संस्कारांची शिदोरी तिच्याकडून मिळते. अशा आईबद्दल सुंदर लेखन करून एक मुलगा म्हणून सुंदर अशा आठवणींचे पुष्प तिच्या चरणी अर्पण करून शैलेश तो अतिशय उत्तम कार्य आणि पूजा केली आहे असेच मला वाटते अशाच सुंदर लेखनासाठी शुभेच्छा!!

Shailesh blog said...

धन्यवाद,बापू 🙏
तू माझ्या लेखनाची प्रेरणा आहेस.

Bhilkotkar said...

लेखन छान... लेखनाची उर्मी आतून असल्याने प्रसंगोचित बारकावे आणि भावनिक ओलावा जागोजाग दिसतोय...
मस्त !👍👍

Shailesh blog said...

मा. डॉ. पाटील सर,
नमस्कार,
आपण माझा लेख आवर्जून वाचला ,त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. आपल्यासारख्या जाणकार लेखकाने केलेल्या सूचनांचा अवलंब करून अधिकाधिक लेखन करण्याचा मानस आहे.
खूप धन्यवाद🙏🙏

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...