Monday, June 29, 2020

संघर्षाची स्मरणगाथा ..श्री.संजय सदाशिव जोशी

_____________________________________
              संघर्षाची स्मरणगाथा ..
            श्री.संजय सदाशिव जोशी 
_____________________________________

"हॅलो ,कोण बोलतय?"... मी.
 " नमस्कार, संजय जोशी बोलतोय."
    "बोला ,काय काम आहे?"... मी. (नेहमीच्या तुसडेपणाने मी विचारले.)
   " मला ,प्रा.दिलीप फडके यांनी तुम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगितले आहे. कधी येऊ? हे विचारण्यासाठी फोन केला आहे."
    संदर्भ ऐकून माझा आवाज खालच्या पट्टीत आला. मी म्हटले "ठीक आहे, उद्या दुपारी दोन वाजता या."
   दुसऱ्या दिवशी न चुकता हे गृहस्थ कार्यालयातील माझ्या टेबलाजवळ येऊन बसलेले होते. श्री.संजय जोशी या अनोळखी माणसाशी, माझी झालेली पहिली भेट ! एक तो दिवस आणि एक आजचा दिवस.....
     महिना अखेरचा दिवस. मी काहीतरी कामात दंग होतो. अचानक नेहमीचे शब्द कानावर पडले. "चलो, सायबा निघतो !" भेटू परत कधीतरी !"अगदी सहजपणे श्री.जोशी सर बोलत होते. "माझा,आपल्या कार्यालयाशी झालेला करार संपला आहे. उद्यापासून आपली भेट होईल की नाही सांगता येत नाही." मी उठून उभा राहिलो. मनात इच्छा असून देखील,कोविड मुळे हातात हात घेउन शेकहॅण्ड करू शकलो नाही. दाटलेल्या कंठाने, मी त्यांना निरोप दिला. पहिल्या दिवशी भेटलेले ,श्री.संजय सदाशिव जोशी पासून जोशी सर बनून, त्यांच्या आठवणी मागे सोडून कार्यालयाच्या पायऱ्या उतरून घरी जायला निघाले. कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि मी व्हरांड्यात येऊन त्यांच्या  पाठमोर्‍या आकृतीकडे खिन्न मनाने पहात राहिलो. जोशी सरांनी एकदाही मागे फिरून पाहिले नाही, त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे!कशाचीही पर्वा न करता, सर निघून गेले. गेल्या साडे तीन-चार वर्षांचा काळ माझ्या मनःपटलावर जागा झाला. थोडे वाईटही वाटले आणि रागही आला. एकदा ठरवले कि, ते तसेच करणार........ डबडबलेले, माझे डोळे इतरांना दिसू नये ,म्हणून बेसिन जवळ जाऊन पाण्याचा शिडकावा चेहऱ्यावर मारला. बेसिन जवळच्या आरशात स्वतःला पाहून मनातला असंतोष शांत केला!
      श्री संजय जोशी... अत्यंत साधा माणुस. डोक्यावर विरळ झालेले केस हातानेच सरळ केलेले. साधा शर्ट पॅन्ट. चेहरा तसा रागीट ! पायात नेहमी चप्पल . शरीरयष्टी मध्यम. थोडक्यात सामान्य माणसाची वरवर दिसणारी सगळी लक्षणे त्यांच्यामध्ये होती. या सामान्य माणसातील असामान्यत्व लवकरच माझ्या ध्यानी आले !
     संस्था पदाधिकाऱ्यांनी अकाउंट कन्सल्टंट म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. स्वभाव निद्रिस्त ज्वालामुखी प्रमाणे. सहजासहजी कोणाशी बोलणार नाहीत परंतु, घसरट झाल्यावर कोणाला बोलू देणार नाहीत ! लहानपणी सिंह आणि उंदीर यांची गोष्ट ऐकली होती. झोपलेल्या सिंहाच्या अंगावर उंदीर मनसोक्त खेळत असे. आणि नंतर सिंह जागा झाल्यावर.... मग उंदराचे काही खरे नसे...
 जोशी सरांचे अगदी तसे होते. त्यांच्या शब्दांच्या तडाख्यात सापडलेले अनेक वाचाळवीर नामोहरम झाल्याचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे! इंग्रजीवर प्रभुत्व. शुद्ध मराठी. स्पष्टवक्ते. सत्य असेल ते, कोणाची भीडभाड न ठेवता बोलत. अत्यंत क्षुल्लक चूक देखील, त्यांच्यासाठी भयंकर मोठा गुन्हा होता ! हिशेबात अगदी चोख. त्यांच्या ठाई ,चुकीला माफी नाही ! अशावेळी मध्यस्थी करणाऱ्यांची गय नसे !! अगदी पदाधिकाऱ्यांना देखील," सर तुम्ही म्हणता म्हणून नाही तर...." असे ऐकून घ्यावे लागे. माझ्यासारख्यांच्या दृष्टीने त्यांचा हा स्वभाव अत्यंत खडूस !! कार्यालयात कामानिमित्ताने आलेले कर्मचारी, त्यांना भेटल्यानंतर कधी हसतमुखाने गेलेले मी पाहिले नाहीत ! हिशेबाच्या कागदांचे धांडोळे, ढीगभर झालेल्या चुकांचं ओझं, इतरांसमोर झालेल्या आपल्या बुद्धीचं मूल्यमापन , या सगळ्यांनी,आलेला बिचारा कर्मचारी गलितगात्र होऊन कार्यालयाच्या पायऱ्या उतरत असे. अशावेळी त्या सर्वांचा साक्षीदार मला व्हावे लागे. कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, मी कधी नजरेने तर कधी शब्दांनी करे.
    अर्थात , असे कठोर वागण्यामागे त्यांची भूमिका चुकीची नव्हती. आर्थिक हिशोब हा कुठल्याही संस्थेचा कणा असतो. संस्था पदाधिकारी विश्वासाने आपल्यावर जबाबदारी टाकतात. त्या विश्वासाला आपण पात्र ठरलो पाहिजे. ज्या संस्थेत नोकरी करतो, त्या संस्थेचा उत्कर्ष आणि फायदा आपण पाहिला पाहिजे. असे त्यांना मनापासून वाटे. आज केलेल्या चुकीला क्षमा केली की, लोक पुन्हा पुन्हा चुका करतात, असा त्यांचा अनुभव आणि धारणा होती. हिशेबात खाडाखोड, गिरवलेली अक्षरे आणि अंक म्हणजे जोशी सरांच्या दृष्‍टीने अक्षम्य प्रमाद ! पोलीस ज्याप्रमाणे गुन्ह्याचा तपास करताना समोर येईल त्याकडे शंकेच्या नजरेने पाहतात. तशी जोशी सरांची नजर खाडाखोड करणाऱ्यांवर असे.
    जोशी सरांच्या स्वभावात एवढा तिखटपणा कसा? याबद्दल मला नेहमी प्रश्न पडे. त्यांच्या बोलण्यात नागपुरी मराठी भाषेचा लहेजा होता. ते जाणवत असे. कारण त्यांचा जन्म आणि बालपण हे नागपुरात गेलं. १९६०च्या नोव्हेंबर महिन्यातील २९ तारखेला श्री.सदाशिवराव व सौ.सुशीला जोशी  यांच्या पोटी,संजयचा जन्म झाला. तसं त्यांच्या वडिलांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा होय. नगरच्या ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये सुरुवातीचा काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांच्या वडिलांची बदली मद्रास येथील ऑर्डिनन्स फॅक्टरी येथे बदली झाली. दोन मुलांसह हे कुटुंब मद्रास मध्ये स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मद्रास मधील सेंट्रल स्कूल मध्ये झाले. १९७७ मध्ये मद्रास येथून त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांचे वडिलांचे मोठे बंधू नागपूर येथे रेल्वे खात्यात नोकरीस होते. संजयला वडिलांनी भावाकडे शिक्षणासाठी पाठविले. नागपूरच्या शिवाजी महाविद्यालयात बारावी सायन्स शाखेत त्याने प्रवेश घेतला. १९८१ मध्ये संजयने बी.एस्सी.पदवी संपादन करून १९८१ ते ८३ या दरम्यान न्यूक्लिअर केमिस्ट्री या विषयात एम.एस्सी.पुर्ण केले. १९७८ मध्ये नागपूरला काकांकडे शिकायला असताना,आई-वडिलांपासून लांब त्यांना राहावं लागलं, त्यामुळे त्यांचा स्वभाव बदलत गेला. त्यांच्या वडिलांच्या स्वभावामुळे संजय काहीही बोलू शकत नव्हते.काकांची मुले त्यामानाने वयाने लहान होती. कॉलेजहुन ये - जा करण्यासाठी वडिलांनी एक जुनी सायकल संजयला दिली होती. जर्जर सायकल, तो तशीच वापरत होता. खर्चासाठी पॉकेट मनी अजिबातच नसायचा. आतासारखे मोबाईल किंवा फोनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आई-वडिलांशी संपर्क साधता येत नसे.
       अशा परिस्थितीत संजय मित्रांमध्ये राहणे जास्त पसंत करीत असे. १९७८ साली संजयचे काका सेवानिवृत्त झाले. रेल्वेचे मिळालेले क्वार्टर सोडून दुसरीकडे भाड्याने घर शोधले. नागपूरातल्या तात्या टोपे नगर भागात श्री.अमीन नावाच्या एका श्रीमंत ब्राह्मणाचा मोठा बंगला होता. त्यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती कुंदा श्रीपाद अमीन यांनी बंगल्याचा काही भाग संजयच्या काकांना भाड्याने दिला. घर मालकिणीला शिरीष ,विनय आणि स्वाती असे तीन अपत्ये होती. मालकिणीला अनुकंपा म्हणून नोकरी मिळाली. तेव्हा संजय आणि त्या तीन मुलांचे एकमेकांशी ऋणानुबंध निर्माण झाले. मुलांपेक्षा संजय मोठा असल्याने लहान भावाप्रमाणे त्या मुलांना त्याने जीव लावला. आपल्या मुलांवर भावाप्रमाणे प्रेम करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या संजयला घर मालकिणीने आईचं प्रेम दिलं. त्या कुटुंबाशी त्याचे भावनिक नाते जुळले. कॉलेजमध्ये बोटावर मोजण्याइतके ,परंतु ,जीवाला जीव देणारे काही मित्र संजय ला मिळाले. त्यात श्री.अतुल नारायण देशपांडे ,यांचे मामा सिनेसृष्टीत एक निर्माता म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या भाच्याला पुढे ठाणे शहरात पेंट फॅक्टरी काढण्यास मदत केली. श्री. सुनील पुराणिक ,जे नंतर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये संजय बरोबरच नोकरीस होते. सौ. रजनी पांडे , अशी एक वर्ग मैत्रीण होती की, जिच्याकडे संजय आपलं मन मोकळं करू शकत असे. आजही या मित्रांशी संजय चे पूर्वीइतकेच मैत्रिपूर्ण संबंध टिकून आहेत. श्री.मकरंद देशपांडे नावाचा, अभ्यासात जेमतेम असणारा एक विद्यार्थी, आज त्याची अमेरिकेत फार्मासिटिकल कंपनी आहे. श्री नितीन देशमुख,  तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असणारे श्री.उदय पानसे यासारखे मित्र संजयला लाभले. श्री. संजय कुलट , श्री.विजय शिंगणापूरे , सौ.शुभांगी देशमुख, सौ.स्मिता तातावार, यासारख्या मित्रांबरोबर राहून संजयची वैचारिक जडण-घडण झाली. उत्तम संस्कार त्यांचेवर झाले. अशा मित्रांबरोबर राहून सूक्ष्म निरीक्षण आणि निर्णय क्षमता विकसित झाली. कदाचित अशा मित्रांच्या सहवासाने संजयची बौद्धिक जडण-घडण झाली, असे वाटते. कॉलेजमध्ये असताना एक नाजूक भावनिक घटना देखील संजयच्या आयुष्यात घडली. संजय बी.एस्सी.ला असताना १२ वी सायन्स मध्ये असणारी तरुणी त्याच्या प्रेमात पडली. नुसती पडलीच नाही तर आकंठ बुडाली ! तू माझ्याशी लग्न करशील का? असा थेट सवाल तिने संजयला केला.नोकरी कामधंदा काही नसल्यामुळे संजयने तिला नकार दिला. परंतु, तुझे शिक्षण पूर्ण झाले की, मग नंतर विचार करू .असा सल्ला त्याने तिला दिला.श्रीमंत घरातील त्या तरुणीला डॉक्टर व्हायचे होते. परंतु बारावी सायन्स शाखेत अंतिम परीक्षेत जवळपास सर्वच विषयात ती नापास झाली. ती खूप नाराज झाली. अशावेळी संजयने तिच्या सर्व विषयांची, अभ्यासाची तयारी करून घेऊन तिचे मनोबल वाढविले. आश्चर्य म्हणजे पुढच्या परीक्षेत तिला ९७ टक्के गुण प्राप्त झाले. मेडिकल कॉलेजमध्ये तिचं शिक्षण सुरू झालं. पुढे ती डॉक्टर झाली. रेडिओलॉजिस्ट म्हणून ती नावारूपास आली. परंतु संजय बरोबर संसार करण्याचे तिचे स्वप्न स्वप्नच राहिले!!
   एम.एस्सी. करत असतानाच १९८२ साली बँकिंग सर्विसेस रिक्रुटमेंट बोर्डची परीक्षा संजयने दिली. अभ्यासातील हुशारी मुळे ही स्पर्धा परीक्षा उत्तम श्रेणीत संजय उत्तीर्ण झाला.एका बाजूने एम.एस्सी. उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र १९८३मध्ये मिळाले आणि बँक ऑफ महाराष्ट्रची नोकरीची ऑर्डर देखील हातात पडली. स्वतःबरोबर आई-वडिलांना देखील आनंद झाला.
      नागपूर पासून २७५ किलोमीटर लांब असलेल्या ,गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी या छोट्याशा गावात बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये क्लार्कची नोकरी मिळाली. ८ ऑगस्ट १९८३ रोजी नागपुरातील, त्यांचे कॉलनीतील मित्र ,श्री. उल्हास मनोहर औरंगाबादकर यांच्यासह नोकरीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी गेले. अहेरी आजपर्यंत त्यांनी कधी पाहिले आणि अनुभवले नव्हते. तिथे असलेल्या वनवासी कल्याण आश्रमातील श्री.गोपाळ गंगाधर जोशी यांच्याकडे ते थांबले. कशीही असली तरी नोकरी टिकवणे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते.
      हळूहळू बँकेशी संबंधित व्यवहार प्रत्यक्ष काम करताना संजयने मन लावून शिकून घेतले. तेव्हा संगणकापेक्षा लेखणीने काम अधिक करावे लागत असे. कीर्द,खतावणी, आवक-जावक, रोजचे दैनंदिन व्यवहार,क्रेडिट-  डेबिट चेकचे व्यवहार, रोखीचे व्यवहार, अकाउंटिंग, इ.हळूहळू मन लावून, कौशल्यपूर्वक सर्व व्यवहार खुबीने समजून घेतले. त्या बँकेत श्री.सहारे नावाच्या एका शिपायाने कॅश कशी मोजावी ? याचं तंत्र संजयला शिकवलं ! अहेरी च्या त्या शाखेत श्री.शांतीलाल हरीलाल सेता, या नावाचे एक कॅशियर होते. स्वभावाने अत्यंत प्रेमळ. संजय बरोबर त्यांचं ट्युनिंग चांगलं जमलं. त्यांची अधून - मधून तब्येत बिघडतअसे. एकदा अचानक ते चक्कर येऊन पडले. बँक मॅनेजरने संजयना कॅशियर म्हणून जबाबदारी दिली. कमी कालावधीत परंतु ,अशा अपघाताने संजय बँकेत कॅशियर झाले. बँकेत काम करीत असताना श्री. कांताराव, श्री.वासेकर, श्री.पालीवाल, श्री.मोहन शिरास यांच्याशी खास मैत्री जमली. गावातील श्री.प्रेमानंद जक्कुलवार यांची आजही आठवण येते.
     अहेरी भागातील लोक आदिवासी, अशिक्षित, अडाणी असले तरी अत्यंत प्रेमळ असल्याचा अनुभव संजयला आला.आपुलकी, जिव्हाळा ,प्रेम ...ज्याच्यासाठी संजयचं मन आसुसलेलं होतं ,ते सर्व गावातल्या लोकांकडून संजयला नोकरीच्या ठिकाणी मिळालं. विशेष म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी चे संजयचे त्या लोकांशी असलेले संबंध आजही टिकून आहेत. श्री.किशोर जोशी आणि श्री.दिलीप जोशी या घरमालकाच्या मुलांशी कायमचे ऋणानुबंध जुळले.रोज सकाळी व्हाट्सअप वर गुड मॉर्निंग करणाऱ्यांच्या यादीत या सर्व लोकांचा समावेश आहे , हे विशेष! तेथील घर मालक, त्यांचे कुटुंबीय या सर्वांशी अतूट नाते संजयचे जुळले .गावातील बँकेत येणारे गोरगरीब लोक, सामान्य माणसे, मजूर यांना बँकेचे व्यवहार करताना संजय आपुलकीने मदत करीत असे. त्यांच्याशी असलेली मैत्रीची वीण घट्ट जमली. अधून मधून लग्न समारंभ, वेगवेगळे कौटुंबिक कार्यक्रम , या निमित्ताने त्यांच्याशी संजयचे संबंध टिकून आहेत.
    मुळातच विदर्भातील लोक तिखट पदार्थ जास्त प्रमाणात खातात. या सर्वांमध्ये संजयला आठवण होते, ती गेडाम वहिनींची ! संपूर्ण गाव त्यांना वहिनी म्हणत . गावात त्या  खानावळ चालवत. त्यांच्या पतीला दारूचे व्यसन होते. कुटुंबातील सर्व माणसे मिळून खानावळीत कामात तिला मदत करत असत. संजयला तिखटाचा त्रास होत असे. म्हणून गेडाम वहिनी सर्वांची जेवण आटोपल्यानंतर, घरच्यांसाठी तयार केलेले स्वयंपाक मायेनं वाढत असे. अनेक वर्षांपासून आईच्या जेवणाला पारखा झालेला संजय, गेडाम वहिनींच्या घरगुती स्वयंपाकात आईचं प्रेम, वात्सल्य शोधत असे. नवरा व्यसनी असल्यामुळे आणि आणि गेडाम वहिनी अडाणी असल्यामुळे, बँकेचे व्यवहार तिला फारसे समजत नसे. खानावळीत खर्च वजा जाता मिळणारी रक्कम ती संजय जवळ देऊन बँकेत सुरक्षित कशी राहील, याचा प्रयत्न करीत असे, इतका विश्वास गेडाम वहिनींना संजय बद्दल निर्माण झाला होता. केवळ दोन रुपयात संजयला ती पोटभर खाऊ घालीत असे. आईच्या प्रेमाची भूक गेडाम वहिनी मुळे संजय ची भागत असे. आजही गेडाम वहिनींच्या आठवणीने संजयचा कंठ दाटून येतो. १९८६ मध्ये संजयच्या लग्नासाठी ती खास नागपूरला भारत बंद असताना देखील निघाली होती. कदाचित गेडाम वहिनी आणि संजय यांचे पूर्वजन्मी चे काही नाते असावे. अहेरी सारख्या अनोळखी ठिकाणी, गेडाम वहिनींच्या रूपाने परमेश्वर संजयच्या पाठीशी उभे होते.
   मन लावून आणि अत्यंत प्रामाणिकपणे बँकेची नोकरी संजय करू लागले. गावात स्थानिक लोकांच्या बरोबर ओळखीपाळखी झाल्या. प्रेम, आदर, विश्वास, सहानुभूती यांची देवाण-घेवाण होत राहिली. एकदा, श्री.शंकर नानाजी बेझलवार या सावकाराचा दारू दुकानाचा भरणा बँकेत आला. एका गाठोड्यात चिल्लर भरलेली होती. एक रुपये, दोन रुपये ,५० पैशांची नाणी होती. बँकेच्या नियमाप्रमाणे पूर्ण हिशोब लागेपर्यंत संजय ची सुटका होणार नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती चिल्लर ते मोजत राहिले. चिल्लर मोजून झाल्यावर लक्षात आले,भरण्यात सावकाराचे दोन हजार रुपये जास्तीचे आले होते. संजयने त्याचक्षणी बँकेच्या लँडलाईन फोनवरून सावकाराला फोन करून जास्तीच्या भरण्याची माहिती दिली. सावकार त्यांना म्हटले ,"जास्ती आले तर, राहू दे ना साहेब !"परंतु संजय मोहाला बळी पडले नाही. त्यांनी सावकाराचे पैसे परत केले.  सावकार अहेरी गावातील मोठी असामी होती. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांचे अधून-मधून नागपूरला जाणे होई. त्यांच्या कडे त्याकाळात महागडी फियाट गाडी होती.तेव्हा ,"जोशीसाहेब, नागपूरला चालायचं का ?"असे ते फक्त संजयना विचारत असत. संजयच्या प्रामाणिकपणामुळे सावकार त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. दरवर्षी सावकार त्यांच्या शेतामध्ये पिकलेले तिळ न चुकता संजयसाठी आणून देत . संजयला त्याच्या आतापर्यंतच्या आयुष्यात मिळालेली ,ही सर्वात मोठी भेट होती.जी लोभाला बळी न पडल्यामुळे मिळाली होती!
     नोकरीला लागल्यानंतर देखील काटकसरीत संजयने दिवस काढले. बँकेतून काम आटोपल्यावर घरी एकटे असल्यामुळे ,बराचसा वेळ त्यांना मिळे. या वेळेत श्री.संजय यांनी अकरावी - बारावीच्या विद्यार्थ्यांचे केमिस्ट्री विषयाची ट्युशन्स घेणे सुरू केले. समजावून सांगण्याची त्यांची पद्धती ,यामुळे गावातील मुलं श्री.संजय यांचेकडे शिकवणीसाठी आग्रह धरत. १९८४ ते १९८८ सालापर्यंत त्यांनी ट्युशन्स नोकरी सांभाळून घेतल्या. साधारण पंधरा-वीस मुले त्यांच्या शिकवणी वर्गाला येत असत. नोकरी नंतरच्या पहिल्या गणपती उत्सवात त्यांनी नागपुरात राहात असलेल्या, तात्या टोपे नगर भागात गणपती मंडळाला गणपती मूर्ती दान केली. गणेशोत्सवाच्या काळात गणपती मंडळामार्फत विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम होत असे. त्याप्रसंगी संजयने खामोशी ' चित्रपटातील, किशोर कुमार यांनी गायलेलं ,"वो शाम कुछ अजीब थी ,"हे गाणं गायलं. कॉलेज जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनात अधून मधून त्यांनी गाणी गायली होती. परंतु खामोशी चित्रपटातील या गाण्याने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली! श्रोत्यांमध्ये एक सुंदर तरुणी, संजयच्या गायनावर भाळली !! आणि पुढे.... जे व्हायचे ते झाले !!!
     नागपुरातील, तात्या टोपे नगर भागात राहणारे श्री.मनोहर व सौ.सुमती देशकर यांची ती मुलगी ...कु.वैजयंती...बी. एस्सी. मेरीट होल्डर होती. आई-वडिलांची सांपत्तिक स्थिती उत्तम. वैजयंती च्या लग्नाचा विषय घरात निघाला.तिने श्री.संजय यांच्याशी लग्नासाठी प्रथम प्राधान्य दिले. मुलीच्या इच्छेनुसार श्री.देशकर यांनी संजयच्या काकांकडे विचारणा केली. आपल्या मुलाला असे स्थळ का मिळू नये?असा विचार काकांच्या मनात येऊन गेला. संजयच्या वडिलांनी आलेल्या स्थळाला होकार दिला. मुलीच्या वडिलांनी मुलाच्या वडिलांना, "आमच्याकडून काय अपेक्षा आहेत?" म्हणून विचारले. मुलाच्या वडिलांनी केवळ नारळआणि मुलीची अपेक्षा केली. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी चि.संजय आणि चि. सौ. कां.वैजयंती विवाह बंधनात अडकले. काही कारणामुळे त्या दिवशी भारत बंद पाळण्यात आला होता.
      लग्न झाले त्या वर्षी, सौ.वैजयंती एम. एस्सी.(स्टॅटिस्टिक) फायनलला होत्या. नवविवाहीत जोडपे अहेरी येथे भाड्याची ची खोली घेऊन राहू लागले. दरम्यानच्या काळात सौ.वैजयंती यांचे एम.एस्सी. पुर्ण होऊन त्यांनी नागपूर मध्ये एम. फिल. साठी ऍडमिशन घेतले. वर्षभराच्या आत म्हणजे ५ डिसेंबर १९८६ रोजी, श्रीरंग च्या रूपात वंशवृद्धी झाली. मॅट्रिक शिक्षणानंतर कुटुंबाला पारखा झालेल्या संजयने कुटुंब थाटले होते. सर्वकाही मनाप्रमाणे आणि आनंदात संसार सुरू झाला.
     संजय यांचे मोठे बंधू नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड कॉलेज येथे ते प्राध्यापक म्हणून काम करीत होते. साधारण जून १९८७ यादरम्यान संजय यांच्या वडिलांचे पत्र अहेरी येथे आले. तुम्ही नाशिकला तत्काळ निघून या. कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेल्या भावाच्या संदर्भात एक कौटुंबिक समस्या निर्माण झाली होती. प्रेमप्रकरणातून भावाचे लग्न झाले. वहिनी नाशिक मधल्या श्रीमंत घराण्यातील लाडकी कन्या होत्या. गडगंज संपत्ती, नोकर चाकर ,घरात असल्यामुळे घरातील कामे त्यांना फारशी जमत नव्हती. अशा परिस्थितीत श्री. संजय व सौ. वैजयंती नाशिकला आले.वडिलांच्या आदेशान्वये घर सांभाळण्यासाठी पत्नीला नाशिक येथे ठेवून संजय नोकरीच्या ठिकाणी मनाविरुद्ध निघून गेले. पुन्हा श्री.संजय आणि कुटुंबाची ताटातूट झाली. परंतु आई वडील आणि आपल्या भाऊ वहिनीसाठी श्री.संजय यांनी हा त्याग केला. स्वतःच्या मनाची समजूत काढली. पुन्हा नोकरीच्या ठिकाणी बॅचलर जीवन सुरू झाले. बाहेरचे खानावळीचे व अवेळी जेवण सुरू झाले.
      अनेक महिन्यानंतर श्री.संजय यांना कुटुंबाची आठवण येऊ लागली. बायको आणि मुलाला नोकरीच्या ठिकाणी घेऊन यावे, असे त्यांना वाटू लागले. बँकेत काही कामाच्या निमित्ताने रिटायर पेन्शनर असलेले, श्री.समुद्रलवार गुरुजी आले होते. ज्योतिष पाहण्याचा त्यांचा व्यवसाय होता. इतर सर्वजण त्यांना आपले भविष्य विचारत होते. श्री.संजय यांनादेखील मनापासून इच्छा झाली. आपली पत्रिका त्यांनी गुरुजींना दाखवली. गुरुजी म्हणाले अजून किमान दहा वर्षे तरी तुम्ही आपल्या बायका मुलांसोबत राहू शकत नाही, असे तुमचे ग्रह सांगतात! श्री.संजय यांचा विश्वास बसेना. परंतु, ज्योतिषाने सांगितलेली गोष्ट त्यांच्या मनात वैचारिक कल्लोळ निर्माण करून गेली. ते तडक नाशिकला आले. घरच्यांना फारसे न विचारता, न जुमानता आपल्या कुटुंबाला अहेरी येथे घेऊन गेले. ज्योतिषाचे भाकीत आपण चुकीचं ठरवलं, याचा आनंद त्यांना मनोमन झाला होता. परंतु नियतीला ते मान्य नव्हतं... आठवड्याभराच्या आतच नाशिकहून मोठ्या भावाचा टेलिग्राम आला. गोखले एज्युकेशन सोसायटी मध्ये प्राध्यापकाची जागा रिक्त आहे. तुझ्या पत्नीला सहज नोकरी मिळू शकेल. असा निरोप पाठवला. इच्छा नसताना देखील आर्थिक हातभार कुटुंबाला लागेल, या हेतूने मुलाला घेऊन वैजयंती नाशिकच्या आर.वाय.के. कॉलेजमध्ये विनाअनुदानित तुकडी वर नोकरीस लागल्या. पगार फारसा मिळत नसे. परंतु शिक्षण घेतल्याचा काहीतरी फायदा होत आहे याचा आनंद होता.
       श्रीरंगला घेऊन, सौ.वैजयंती ,नाशिकला पुन्हा एकत्र कुटुंबात राहू लागल्या. कुटुंबाची सर्व प्रकारची जबाबदारी आणि नोकरी ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागत असे. काही दिवसानंतर त्यांची बदली ओझर टाऊनशिप येथे झाली. घरापासून रोज पन्नास किलोमीटर प्रवास करावा लागे.
     १९८८ च्या जून महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्राची एक शाखा, मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी येथे सुरू झाली. नवीन शाखेत आणि ग्रामीण भागात कोणी स्वेच्छेने जायला तयार नव्हते. परंतु श्री.संजय यांनी ही संधी साधून स्वेच्छेने वडनेर खाकुर्डी येथे येण्याची इच्छा दर्शवली. मॅनेजमेंटने त्यांची बदली केली. किमान आठवड्यातून एक दिवस तरी कुटुंबासोबत राहायला मिळेल, याचा त्यांना आनंद झाला.शनिवार-रविवार ते नाशिकला आपल्या कुटुंबासोबत राहू लागले.
     वडनेर खाकुर्डी येथे नोकरी करीत असताना जेवणाचा डबा सकाळच्या वेळेस बँकेतील शिपाई कर्मचारी बाळू अर्जुन देसले आणून देत असे. पैसा कमावणे हा त्याचा हेतू नव्हता. मुळात संजय एकटे राहत, यामुळे सहानुभूतीने तो त्यांना जेवणाचा डबा पुरवीत असे. अर्थात संजय देखील त्याचा मोबदला देत असत. सणावाराला पुरणपोळ्या, आंबे रस ,केवळ दोन रुपयात देत असे. त्याचे जास्तीचे पैसे त्याने आकारले नाही. त्याची पत्नी साक्षात अन्नपूर्णा होती. कुटुंबातील सदस्यांसारखी त्यांनी श्री. संजय यांना वागणूक दिली.  सन्मान केला. त्यांच्याकडील भाकरीचा गोडवा आजही जिभेवर तसाच आहे!
   २२ सप्टेंबर १९९१ रोजी गौरांग या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. यावेळी या दांपत्यास मुलगी होईल असे वाटले होते ,नव्हे मनापासून इच्छा होती. परंतु ,"आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना!"
    दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर सौ.वैजयंती यांना संधिवाताचा प्रचंड त्रास सुरू झाला.तो आजतागायत त्यांच्या सोबतीला आहे. एकत्र कुटुंबात राहून देखील लहान मुलांना सांभाळण्यास घरच्यांनी असमर्थता दर्शविली. काय करावे? हे त्यांना कळेना. नोकरी आणि मुलं दोन्हीही तितकेच महत्त्वाचे होते. पाळणा घराची शोधाशोध सुरू झाली. 
      कंपनीत झालेल्या टाळेबंदी मुळे नोकरी गमावलेले, श्री.शशिकांत रानडे ,हे पाळणाघर चालवत. जोशी कुटुंबीय त्यांच्या संपर्कात आले.गौरांग अडीच महिन्यांचाअसेल,तेव्हापासून रानडे काकांनी त्याला सांभाळले. त्याला खूप जीव लावला.आई-वडिलांचे प्रेम दिलं. आई आणि वडील दोन्ही नोकरी करीत असल्यामुळे विशेष करून गौरांगला ,त्यांचा सहवास फारसा लाभला नाही. त्यातच घरी  पाहुण्यांचा राबता असे. मुलांसाठी त्यामुळे त्यांना वेळ देता येत नसे. त्यामुळे की काय, चि. गौरांगचा स्वभाव पुढेपुढे थोडा एकलकोंडा झाला.
     एकत्र कुटुंबात कोंडमारा झाल्यासारखे वाटू लागले. शरीराने एका ठिकाणी राहून मनाने अंतर वाढत गेले. अशावेळी, श्री.जोशी यांनी कर्ज काढून स्वतंत्र घर घेण्याचा निश्चय केला. १९९३ मध्ये स्वतंत्र घर घेतले.नातेवाईकांपेक्षा अधिक जवळचे वाटणारे, ठोंबरेप्रभा देशमुख यांच्यासारखे सख्खे शेजारी मिळाले!त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच होती.परंतु,मन मात्र आभाळा एवढे मोठे होते! दोघेही नोकरीच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असत.सौ. प्रभा देशमुख यांनी कशाचीही अपेक्षा न करता मुलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. मायेच्या ममतेने मुलांना खाऊ पिऊ घातले. रक्ताच्या नात्यातील लोकांपेक्षा शेजाऱ्यानी अडचणीच्या काळात,जोशी कुटुंबीयांना मदत केली.सौ. प्रभा देशमुख यांनी कधीही उपकार केल्याची जाणीव होऊ दिली नाही. असे शेजारी मिळणं ही खऱ्या अर्थाने भाग्याची गोष्ट!
     नवीन वास्तूमध्ये प्रवेश केल्यानंतर वास्तुशांत पूजा केली. वास्तूचा पायगुण अन् श्रीगुरुकृपा यामुळे, सौ.वैजयंती यांना आर.वाय.के.महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापकाची नोकरी मिळाली. त्यामुळे पगारात वाढ होऊन, घराला हातभार लागला. दुसरी एक आनंदाची गोष्ट घडली. महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापक मंडळाने एक वर्षाच्या डेप्युटेशनवर, परशुराम सायखेडकर नाट्यगृह समोरील शहर शाखेत श्री.संजय यांची बदली केली. त्यामुळे अनेक वेळा घरापासून ताटातूट झालेल्या श्री.संजय यांना बायको मुलांबरोबर एकत्र राहता येईल, याचा आनंद झाला. प्रामाणिक आणि नीटनेटके कामाच्या पद्धतीमुळे श्री .संजय यांनी आपली चांगली ओळख निर्माण केली. पण हे फार काळ टिकले नाही. बँकेत हितशत्रू तयार झाले. मुख्य शाखेतून अंबड शाखेत बदली झाली. मॅनेजरशी अत्यंत चांगले संबंध होते. परंतु, डेपुटेशनचा कालावधी संपल्यामुळे १९९६ च्या अखेरीस पुन्हा मूळ बदलीच्या ठिकाणी ,म्हणजे वडनेर खाकुर्डी येथे जावे लागले. 
   यावेळी ,मात्र तिथे मन रमलं नाही.तरीही वर्ष सव्वा वर्ष नोकरी केली. अर्ज विनंती करून ,पत्नीच्या आजारपणाचे कारण सांगून ,मुलांच्या देखभालीची गरज लक्षात आणून देऊन ,काहीही उपयोग झाला नाही. शेवटी विविध कारणे सांगून रजा घ्यायला सुरुवात केली. याच काळात त्यांच्या शरीरात मधुमेहाने घर केले. आयुष्यभर खाण्यापिण्याचे झालेले हाल, वेळी-अवेळी जेवण, खानावळीतले जेवण आणि मानसिक ताण-तणाव यामुळे मधुमेह जडला.
       ७ एप्रिल १९९६ रोजी श्री.संजय यांचे सख्खे मामा श्री .शशिकांत मधुकर पाठक उर्फ अण्णा त्यांना भेटले. काय करतोस ?किती दिवस अप-डाऊन करणार? तू नोकरी सोड .मी सांगतो ,ते काम करायची तयारी आहे का? असा प्रस्ताव त्यांनी संजय समोर ठेवला.त्यांनी होकार दर्शवला. त्यावेळी नाशिकमध्ये श्री.प्रभाकर शिवराम जोगळेकर उर्फ मामा जोगळेकर हे एक इस्टेट एजंट म्हणून बडं प्रस्थ होतं. "सख्या मामांनी दुसऱ्या मामांशी गाठ घालून दिली!" ओळखीमुळे नोकरी मिळाली. प्रति दिवस कामाचे दहा रुपये मिळत असत. हळूहळू कामात प्रगती व्हायला लागली. कामाचे कौशल्य पाहून मामा जोगळेकर श्री.संजय वर खुश झाले. सहा महिन्यात पगार तीन हजार रुपयांपर्यंत वाढविला. त्यामुळे बऱ्यापैकी खर्च सुटू लागला होता. बँकेत जायची आता इच्छा होत नव्हती. बँकेकडून हाऊसिंग लोन घेतलेले असल्यामुळे ,नोकरीचा लगेच राजीनामा देता येत नव्हता. शेवटी बँकेनेच पाच फेब्रुवारी २००० साली राजीनामा द्यावयास भाग पाडले. मामा जोगळेकर यांच्या फर्ममध्ये उत्तम ट्यूनिंग जमलं होतं. एकदा, मामांनी त्यांच्या हातातील खाकी बॅग श्री.संजय यांना देऊन पैसे मोजायला सांगितले. त्यात जवळपास अडीच लाखांपर्यंतची रक्कम भरली. त्या रकमेचे चार भाग करायला सांगितले. एक भाग श्री. संजय यांच्या हातात ठेवत ,तू आज पासून माझ्या व्यवसायात पार्टनर झालास!,अशी खुशखबर दिली. पासष्ट हजाराची रक्कम एकावेळी आपल्याला मिळालेली पाहून, श्री.संजय यांचा आनंद गगनात मावेना. हातात पैसा खेळू लागला. मुलांचे शिक्षण सुरू होते.हातात आलेल्या पैशातून स्थावर आणि जंगम मालमत्तेत इन्व्हेस्टमेंट श्री.संजय यांनी सुरू केली.
     काही दिवसांच्या कालावधीनंतर मामांनी स्वतंत्र व्यवसाय कर, असे सूचित केले.आणि श्री. संजय यांनी मामा जोगळेकर यांचे फर्म सोडले. व्यवसायात मात्र अनेकदा चढ-उतार अनुभवले. निश्चित असे उत्पन्न अन्न मिळत नव्हते.
      २००१ सालच्या जानेवारी महिन्यात प्रा. दिलीप फडके यांची ,थोरल्या भावाच्या माध्यमातून प्रत्यक्ष भेट झाली. तेव्हा प्रा.फडके सर सी .एच. एम. ई.एस. संस्थेत विश्वस्त म्हणून कार्यरत होते. श्री.संजय यांना घरी बोलावून ,मी सांगतो तेथे काम करशील का?असा प्रश्न विचारला. संजय यांनी होकार दिला. त्यांनी बँकेतील अनुभव लक्षात घेता, संस्थेच्या नॉन ग्रांटेड विभागाकरिता ऑफिस  सुपरिटेंडेंट म्हणून संजयची नेमणूक केली. तेथे संजय यांनी उत्तम रीतीने, प्रा. दिलीप फडके यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. नेहमीच्या शैलीत काम करताना स्वतःची ओळख निर्माण केली. कौशल्य पणाला लावून संस्था पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. संजयच्या कामावर खूष होऊन प्रा. दिलीप फडके यांनी त्यांना परशुराम नागरी पतसंस्थेत हिशोब पाहायला जावे लागेल ,असे सांगून, पार्ट टाइम नोकरी मिळवून दिली. उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत प्रा. फडके यांच्या माध्यमातून मिळाला. श्री.संजय यांच्या मुळे पतसंस्थेच्या प्रशासनातील बऱ्याचश्या खाचाखोचा प्रा.फडके यांच्या लक्षात आल्या. अशावेळी संजय मधील दूरदर्शीपणा, सूक्ष्म निरीक्षण, चिकित्सक वृत्ती ,फडके सरांच्या नजरेतआली. काम करण्यातील चिकाटी आणि हातोटी दोन्हीमुळे संजयची ओळख निर्माण झाली. प्रा.फडके सरांनी त्यांना परशुराम पतसंस्थेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सुचित केले. याच काळात ,श्री.व सौ.संजय जोशी यांनी खुटवड नगर भागात स्वतःचे टुमदार घर बांधले.
        नेहमीच्या लहरी स्वभावामुळे, फडके सरांचा आदर राखून संजयने हे काम करण्यास असमर्थता दर्शविली. कालांतराने समज-गैरसमजातून सी.एच.एम.ई .एस .संस्थेच्या ऑफिस सुपरिटेंडेंट पदावरून संजय दूर गेले.
        दरम्यानच्या कालावधीत, कॉलनीतील मित्र असलेले, श्री. जयंत वसंत चोपडे यांची भेट झाली. त्यांनी नागपूर येथे स्वतःची आय.टी. कंपनी सुरू केली होती. मित्राने, नागपूरला माझ्या कंपनीत येतोस का? असे आग्रहाने विचारले.
  आज पर्यंत अनेकदा एकत्र कुटुंबात राहण्यासाठी श्री. संजय यांनी प्रयत्न केला. परंतु, काही ना काही कारणामुळे पुन्हा पुन्हा ते कुटुंबापासून लांब जात होते. यावेळी देखील त्यांनी कुटुंब नाशिकला सोडून नागपूरला जाणे पसंत केले. यावेळी मात्र त्यांच्या पत्नीने दोन वर्षांची बिगर पगारी रजा टाकून नागपूरला, श्री.संजय यांची सोबत केली. वयाच्या ४५ व्या वर्षी नव्या नोकरीसाठी ते पुन्हा नागपुरात दाखल झाले.
   दरम्यानच्या कालावधीत २००३ मध्ये आपल्या कुटुंबासह श्री. संजय, तिरुपती बालाजी ,हैदराबाद येथे सहलीला गेले. हैदराबादच्या एन.टी.आर. गार्डन मध्ये फिरताना, लहान मुलगा गौरांगला रोमाटिक फीवर चा त्रास झाला. संपूर्ण अंग ताठरले. हजारात एखाद्या व्यक्तीला हा आजार होतो. अचानक मुलाला झालेला त्रास पाहून जोशी दांपत्य हादरले. २००२ मध्ये मोठा मुलगा, श्रीरंगची दहावीची परीक्षा सुरू असताना ,अचानक इंग्रजीच्या पेपर च्या दिवशी रक्ताच्या उलट्या त्याला होऊ लागल्या. कारण कळले नाही . त्यातून श्रीगुरुकृपेने श्रीरंग वाचला! अनेक संकटे आजपर्यंत श्री.संजय यांनी अंगावर लीलया पेलली होती. परंतु दोन्ही मुलांच्या बाबतीत घडलेल्या या प्रसंगामुळे,श्री संजय, हळवे झाले.आणि त्यांनी नागपूरला मित्राच्या कंपनीत जाण्याचा निर्धार केला. २००५ ते २०१० या पाच वर्षाच्या कालावधीत ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून काम केले. पार्टनरशिप मध्ये असलेली कंपनीची ची काही कारणामुळे अधोगती होऊन कंपनी बंद पडली आणि संजय पुन्हा बेरोजगार झाले !
   २०१० साली नागपूर पासून ३० किलोमीटर अंतरावरील बुटीबोरी येथे अनोकॉन नावाची केमिकल फॅक्टरी आहे. तेथे नोकरी केली.२०१२ पर्यंत ही नोकरी त्यांनी सोडली.
    शेवटी, नाईलाजाने नागपूर सोडून नाशिकला परत येण्याचा निर्णय घेतला. शालेय जीवनापासून वयाच्या पन्नाशी पर्यंतच नोकरी व्यवसाय करायचा, असे ठरवले होते. नाशिकला आल्यानंतर पुढची तीन वर्षे कुठेही काम धंदा नोकरी केली नाही. सौ.जोशी ,महाविद्यालयात नोकरी करीत. श्री.जोशी कुटुंबाची इतर सर्व जबाबदारी सांभाळत. अनेकदा जवळचे नातेवाईक किंवा काही मित्र त्यांना नाव ठेवू लागली. परंतु त्यांनी त्याची तमा बाळगली नाही. वाकयुद्धात श्री.संजय जोशी कोणालाही जिंकू देत नाहीत! अत्यंत हजरजबाबी !! अशावेळी टीका करणार्‍यांची तोंड शाब्दिक वाकबाणांनी बंद करीत. इंग्रजी भाषेत एक म्हण प्रचलित आहे, "Behind every successful man there is woman " जोशी सर हे वाक्य बदल करून टीकाकारांवर फेकून मारत .ते असे,"Behind every successful woman there is a man !"पत्नीचे आजारपण,घराचा रेशन, किराणा ,भाजीपाला सर्वकाही कामे त्यांनी केली. त्यामुळे सौ.जोशी यांना घर कामात फारसे लक्ष घालावे लागले नाही. आयुष्यात कधीही एका ठिकाणी त्यांना स्थिर राहता आले नाही. सतत संघर्ष करून प्रत्येक ठिकाणी नव्याने सुरुवात करावी लागली. असं म्हणतात, ज्याच्यात क्षमता असते त्याच्यावरच संकटे येत असतात. परंतु, श्री जोशी सरांचे आयुष्य म्हणजे संकटे आणि संघर्षाची परिसीमा होय.
      पुन्हा एकदा ,२०१५ च्या जानेवारी महिन्यात प्रा. दिलीप फडके यांचा फोन आला."संजय,काय करतोय सध्या?" तांदूळ महोत्सवाला मदतीसाठी त्यांनी श्री संजय यांना बोलावले. तांदूळ महोत्सवाचे हिशोबाचे काम चोखपणे बजावले. जाताना प्रा.फडके सरांनी रुपये ५००० ₹ मानधनाचे पाकीट त्यांच्या हातावर ठेवले.
      सात-आठ महिन्यांच्या कालावधीनंतर ऑगस्ट २०१५ मध्ये प्रा.फडके सरांनी निरोप देऊन,श्री. संजय यांना घरी बोलावले. नाशिक एज्युकेशन सोसायटीत सध्या अकाउंट कन्सल्टंट म्हणून मी तुला नेमतो आहे.नेहमीप्रमाणे, तू उत्तम काम करशील याची मला खात्री आहे. अशी शाबासकी देऊन कामाला सुरुवात करावयास सांगितले.प्राध्यापक फडके सरांची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री जोशी, नासिक एज्युकेशन सोसायटीत १० ऑगस्ट २०१५ रोजी दाखल झाले ते आज ३०जून २०२० पर्यंत
     अकाउंट कन्सल्टंट म्हणून काम करत असताना, संस्थेच्या सर्व प्रकारच्या हिशेबाची घडी त्यांनी प्रा. फडके सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्थितीत आणली. हिशेब लेखन ,तपासणी सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार उत्तम रीतीने पाहिले. प्रसंगी अनेकांचा रोष त्यांनी पत्करला. तरीदेखील कामात कुचराई होऊ दिली नाही. अत्यंत शिस्तबद्ध आणि नीटनेटकेपणाने त्यांनी काम केले. त्यांचे वागणे आणि बोलणे मधाळ नसल्यामुळे अनेकांना त्यांचे शब्द जिव्हारी लागत. चूक लक्षात आली की दुरुस्त करून आणल्याशिवाय हिशेब ते स्वीकारत नसत. यामागे लोकांना त्रास देण्याचा त्यांचा हेतू नसून व्यवहारात सुसूत्रता आली पाहिजे, हे कळायला अनेकांना उशीर झाला. अनेकदा शुल्लक चुकीबद्दल बोलण्याचा अतिरेक श्री.जोशी सर करत. परंतु त्यामागे लोकांना दुखावण्याचा त्यांचा हेतू नसे. हळूहळू त्यांचा स्वभाव आणि हेतू लक्षात आल्यानंतर, अनेक कर्मचारी त्यांच्याशी मैत्री करू लागले. डोंगराजवळ गेल्याशिवाय त्याची भव्यता कळत नाही, तसे श्री.जोशी सरांचे व्यक्तिमत्व होते.
      कामातून वेळ मिळाला की,जोशी सर कार्यालयातील सर्वांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असत. आपुलकीने चौकशी करत. अडीअडचणींत मदत करत. वैचारिक वादात त्यांना कोणी हरवू शकत नसे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे त्यांच्याशी ऋणानुबंध जुळायला उशीर लागला. मी सांगतो, तेच खरे. असे त्यांचे कधीही म्हणणे नसे. काय करायला हवे? याबाबत ते सुचवत. परंतु, तेच केले पाहिजे ,असा आग्रह धरत नसत. गतवर्षी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित कॉन्ट्रीब्युशन करून, जोशी सरांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. त्यावेळेस अनेकांच्या लेखी पाषाणहृदयी असलेल्या श्री.संजय जोशी यांचे डोळे भरून आले होते! स्वतःच्या सांपत्तिक आणि आर्थिक स्थितीचा त्यांना गर्व नसे. ते अत्यंत साधेपणाने परंतु नीटनेटकेपणाने राहत. श्री. संजय जोशी आणि शैलेश पाटोळे जोडगोळी म्हणून प्रसिद्ध झाली. संस्थेत शाळांमध्ये विविध कामांसाठी ऑडिटर कडे आम्ही बरोबर जात असू. प्रा. फडके सर आम्हाला नेहमी," तुम्ही जोडीने का येता? एकटे जायची सवय लावा." असे म्हणत. श्री.जोशी सर यांच्याबरोबर साडे तीन-चार वर्षांचा कालखंड माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतला सुवर्णकाळ होता!
     मी ,त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असूनही बऱ्याचदा त्यांना लोकांशी कडू न बोलण्याबद्दल सांगत असे. त्यावर त्यांचे उत्तर ठरलेले असायचे,"मला संस्थेने लोकांचे मन राखण्यासाठी नोकरीला ठेवलेले नाही. संस्थेच्या हिशेबासाठी मी जबाबदार आहे". नेहमी मला त्यांच्यापुढे माघार घ्यावी लागत असे. परंतु, श्री.जोशी सरांच्या पुढे माघार घेताना अपमानाची भावना झाली नाही. त्यांचे अंतःकरण निर्मळ होते. आर्थिक व्यवहाराची सर्व जबाबदारी त्यांनी उत्तमपणे पार पाडली. एकदा त्यांच्या आणि माझ्या मैत्रीत हितशत्रूंनी मिठाचा खडा टाकला. आमच्यातील अबोला फार काळ टिकला नाही. संस्था वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात स्टेजच्या मागे त्यांनी मला बोलावून झालेली चूक लक्षात आणून दिली. स्वतः माफी मागून, गैरसमज लोकांनी पसरविल्याचे कबूल केले. इतका मोठेपणा श्री.जोशी सरांच्या अंगी होता. श्री.जोशी सर आणि माझे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. खरे तर याचे श्रेय प्रा.दिलीप फडके सर यांना द्यावे लागेल.कारण त्यांच्यामुळेच श्री.जोशी सर व माझी ओळख झाली ! त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा मला प्रचंड लाभ झाला. त्याबद्दल ,मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन.
    श्री.जोशी सरांचा थोरला मुलगा श्रीरंग ,लहानपणापासून अत्यंत हुशारसमजूतदार ! त्याच्यावर आईचा प्रभाव. उत्तम गुण मिळवून सर्व ठिकाणी त्याने मेरीटवर ॲडमिशन मिळविले.मुंबईच्या के. जे. सोमय्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.ई. ची पदवी त्याने संपादन केली आणि कॅम्पस इंटरव्यू मध्येच २००९ साली ॲक्सेंचर कंपनीत उत्तम जॉब त्याला मिळाला. पुढे नोकरी करीत असतानाच पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमधून एम.टेक.ची पदवी त्यांनी संपादन केली.
    लहानगा गौरांग मात्र बापाच्या वळणावर गेला! म्हणजे लहरी स्वभाव! स्वतःच्या मनाला वाटेल तेच करणार! पण,तसा मुळात हूशारच आणि समजूतदार देखील !! इतरांशी सहजासहजी बोलत नाही. अभ्यासाची देखील फारशी गोडी त्याला लहानपणापासून नव्हती. त्याला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते. मित्रांसारखे कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचे होते. परंतु आईने समजावल्यानंतर आणि मामांनी आग्रह केल्यामुळे बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन , इंजिनियरिंग पूर्ण केले.पुढे चेन्नई येथून कम्प्युटर सायन्स मध्ये एम.टेक ची पदवी संपादन केली.गौरांग आज एका मल्टिनॅशनल कंपनीत उत्तम पगाराची नोकरी करीत आहे. आई बाबांबद्दल दोन्ही मुलांना कृतज्ञता वाटते. श्रीरंगचे लग्न झाले असून, सुनबाई सौ.शलाका देखील सासुबाईं प्रमाणे, नोकरी करून घर सांभाळत आहे.
     श्रीगुरूंच्या आदेशानुसार अमरावती येथील चि. हर्षल चौधरकर नोकरीच्या निमित्ताने नाशिकला जोशी कुटुंबीयांकडे राहत असत. गुरुबंधू या नात्याने सौ. जोशी यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध जुळले. तो मुलाप्रमाणे सौ.जोशी यांची काळजी घेत असे आणि सौ.जोशी यांनी त्याला आईची उणीव भासू दिली नाही. जणू हर्षल आपला तिसरा मुलगाच आहे, असे ते मानत. आजही ते ऋणानुबंध तसेच टिकून आहेत.
       श्री.संजय यांना त्यांच्या नोकरीच्या कालखंडातील जास्तीचा काळ नागपुरात व्यतीत करावा लागला. त्यांचे सासर नागपूरचे असल्याने, सासू आणि सासरे यांनी त्यांना आधार दिला.ते अत्यंत प्रेमळ होते. जावयाचा मानमरातब ते नेहमी ठेवत असत.
    श्री.संजय जोशी यांच्या सुविद्य पत्नी ,सौ. वैजयंती उर्फ प्रा. जोशी मॅडम यांच्याबद्दल संजय यांना ,पत्नी म्हणून खूप आदर आहे. १९९८ सांली पत्नीच्या आग्रहास्तव गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांनी प.पू .श्रीमनोहरनाथ महाराज यांचा अनुग्रह घेतला.अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील श्रीमनोहरनाथ महाराज यांच्यावर या दांपत्याची नितांत श्रद्धा आहे. प्रारंभी ,पत्नीच्या समाधानाकरिता ते गुरुगृही गेले. परंतु, तिथे गेल्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन होऊन श्रीगुरुबद्दल श्रद्धा दृढ झाली. आजही, दर गुरुवारी जवळच्या केंद्रात प्रार्थनेसाठी श्री.जोशी सर नित्यनेमाने जातात. आजारपणामुळे त्यांच्या पत्नीला प्रार्थनेसाठी नेहमी जाणे शक्य होत नाही. सद्यस्थितीत ,अंजनगाव सुर्जी येथे प.पू. श्री जितेंद्रनाथ महाराज पीठाधीश आहेत. त्यांच्या कृपाशीर्वादाने सर्वकाही ठीक झाले, ही भावना जोशी कुटुंबीयांना सुखावते.
    सौ. वैजयंती या प्रचंड सहनशील आणि बुद्धिमान आहेत. त्यांनी घेतलेले शिक्षण जोशी कुटुंबाला आधार देऊन गेले. संघर्षाच्या काळात कुटुंबाचा भक्कम आधार सौ. वैजयंती बनल्या. कुटुंबाची सर्वतोपरी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. कौटुंबिक मान-अपमान सहज पचवला. कुटुंबासाठी जेवढे काही करता आले तेवढे केले.शांतपणे दिव्या सारख जळत राहिल्या. श्री.संजय यांच्या पायाला सतत भोवरा असे .परंतु सौ.वैजयंती यांच्यामुळे कुटुंबाला स्थिरता आली. कुटुंबाचा आर्थिक, भावनिक आधार त्या बनल्या. मुलांना उत्तम शिक्षण आणि संस्कार दिले. त्यामुळेच आज मुलांची प्रगती दिसून येते.
   अभ्यासू आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका म्हणून त्यांचा लौकिक महाविद्यालयात आहे. महाविद्यालयात निवडक असा त्यांचा मित्रपरिवार आहे. त्यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध आहेत.
    मुलांसाठी त्या एक आदर्श आई आहेत. आजही ही मुलं तिचा शब्द प्रमाण मानतात.
    श्री. संजय यांचे  मुलांशी वडील कमी ,मित्र म्हणून संबंध अधिक आहेत. मुलांशी मोकळा संवाद ते साधू शकतात. मुलांना त्यांनी स्वावलंबी बनविले आहे.पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान त्यांनी मुलांना शिकविले. जगाची रीत शिकवली.
     आज श्री.व सौ .संजय जोशी यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती, त्यांनी केलेल्या संघर्षामुळे मजबूत आहे. आपल्याला एक मुलगी हवी होती, ही त्यांची इच्छा, त्यांनी वेगळ्या पद्धतीने पूर्ण केली आहे. त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या गरीब कुटुंबातील एका मुलीचा ,२००५ पासून संपूर्ण शिक्षणाचा ग्रॅज्युएशन पर्यंतचा खर्च जोशी दाम्पत्याने केला. आजही एका शाळेतील दोन मुलींचा दहावी पर्यंतचा खर्च ते पुरवतात. वाढदिवस साजरा करताना गोरगरिबांना मदत करतात. अलीकडेच त्यांनी एका मंदिरात गाईसाठी निवारा शेड बांधून दिले.
      आयुष्याच्या या क्षणी श्री.व सौ. जोशी खूप समाधानी आहेत. आर्थिक सुबत्ता आहे. मुलगा व सून सुस्थितीत आहेत. पत्नीने आयुष्यभर साथ केली. सौ. वैजयंती यांच्याबद्दल श्री.संजय यांना कृतज्ञता वाटते. पत्नीची अशीच साथ आयुष्यभर लाभो,तिचे आरोग्य चांगले राहो, हीच मनिषा त्यांच्या ध्यानी मनी असते.
    आयुष्याच्या प्रत्येक अडचणींच्या प्रसंगी प्रा.दिलीप फडके मदतीला धावून आले. संजयच्या दृष्टीने ते एक देव माणूस, ज्यांनी संजयला आयुष्यात उभे करण्यासाठी मदत केली. संजय मधील गुणांची पारख प्रा. फडके यांनी केली. संजयने देखील  त्यांचा शब्द प्रमाण मानला. संजय कधी बोलून दाखवत नाही. परंतु, संजयच्या जीवनात प्रा. फडके यांना सर्वोच्च स्थान आहे.
    नाशिक एज्युकेशन सोसायटी मध्ये काम करीत असताना, संस्थेचे अध्यक्ष प्रा.सूर्यकांत रहाळकर सर यांनीदेखील श्री.संजय यांच्या गुणांचे कौतुक केले. संजय त्यांना उत्तम नेतृत्वगुण असणारे लीडर मानतात.
    २०१५ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून,श्री. संजय जोशी आणि माझी ओळख झाली. साधारण आठ दिवसात आम्ही एकमेकांना ओळखले. त्यांच्या अनुभव आणि ज्ञानापुढे मी शून्य होतो. संस्थेचे अर्थ सहकार्यवाह पदाची जबाबदारी माझे वर पदाधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु केवळ खुर्चीवर बसण्या इतकेच ज्ञान माझ्याजवळ होते. श्री.संजय जोशी सरांनी हे ओळखले. अगदी मनापासून, काहीही राखून न ठेवता ,जोशी सरांनी मला आर्थिक बाबींची ओळख करून दिली. अक्षरशः आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या शब्दांचे अर्थ विस्तृत स्वरूपात समजावून सांगितले. मी ,शाळेत तासिका घेऊन मुलांना शिकवीत असे.नंतर संस्था कार्यालयात आल्यावर श्री.जोशी सर मला शिकवीत असत. मी देखील मन लावून त्यांच्याकडून अनेक बाबी समजावून घेत असे. तेरीज पत्रक म्हणजे काय?ते कसे वाचावे? जमा आणि खर्च कसे नोंदवावे? बँकेची विविध प्रकारची खाती, फिक्स डिपॉझिट, ठेवी ,फायलिंग, डीलिंग,अंदाजपत्रक, क्रेडिट डेबिट, याबाबत जोशी सरांनी मला शिकविले. हिशेब कसे तपासावे? कसे लिहावेत ?हे समजावून सांगितले. वाउचर तपासणे, मंजूर करणे, चेक तपासणे, इत्यादीतील खाचाखोचा समजावून सांगितल्या. ऑडिट संबंधी सूक्ष्मातिसूक्ष्म बाबी लक्षात आणून दिल्या. कीर्द-  खतावणी मधला फरक समजावून सांगितला. थोडक्यात माझ्या कोऱ्या पाटीवर "अर्थ" संबंधित धुळाक्षरे, श्री.जोशी सरांनी लिहिली. अल्पावधीतच श्री. संजय जोशी आणि माझ्यात गुरू-शिष्याचे नाते निर्माण झाले. ते एक मित्र आणि मार्गदर्शक बनले. मराठी भाषेचा सामान्य शिक्षक ते ऑडिट रिपोर्ट सादर करू शकणारा अर्थ सहकार्यवाह अशी माझी प्रगती प्रा. दिलीप फडके आणि जोशी सरांमुळे झाली.प्रा. फडके सरांनी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. अनेक वेळा मला तशी संधी उपलब्ध करून दिली.
      श्री.संजय यांच्या आयुष्यात तीन अण्णांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे सख्खे मामा,श्री. शशिकांत मधुकर पाठक उर्फ अण्णा , ज्यांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. दुसरे अण्णा म्हणजे, श्री.संजय यांचे काका , श्री.गोविंद गंगाधर जोशी, ज्यांनी मॅट्रिक नंतरचा पुढील काळात आधार दिला. तिसरे अण्णा म्हणजे ,श्री. संजय यांचे सासरे, श्री. मनोहर दत्तात्रय देशकर,ज्यांनी कन्यादान करून संजयच्या आयुष्यात प्रकाश निर्माण केला. संजयच्या आयुष्यातील हे तीन अण्णा म्हणजे साक्षात दत्त - त्रिमूर्ती होत!
     येत्या नोव्हेंबर महिन्यात श्री.संजय जोशी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आयुष्यभर संघर्ष करीत करीत ,कोणापुढेही न झुकत, स्वाभिमानाने, प्रामाणिकपणाने, मिळेल ते काम चोखपणे करीत, त्यांचा जीवन प्रवास आजही सुरू आहे. वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल .परंतु ,आपल्या तत्वांशी कधीही तडजोड त्यांनी केली नाही. कोणाचेही लांगुलचालन, चोंबडेपणा त्यांनी केला नाही. अधिकारी ,पदाधिकारी यांच्या मागेपुढे फिरले नाही. पगाराव्यतिरिक्त एका दमडीची अपेक्षा कोणाकडून केली नाही. लोभापासून सदैव दूर राहिले. कदाचित या सगळ्या गुणांमुळेच एका नोकरीत ते जास्त काळ टिकू शकले नाहीत! स्वाभीमानाने नोकरी करता येऊ शकते, हे जोशी सरांनी सिद्ध करून दाखविले आहे.
     ऊस डोंगा l परी ,रस नव्हे डोंगा l
     चोखा डोंगा l परी,भाव नव्हे डोंगा  l 
      काय भुललासी  l वरलिया रंगा l l
संत चोखामेळा यांच्या या अभंगाप्रमाणे जोशी सर निर्मळ अंतःकरणाचे आहेत.
 ईश्वर त्यांना दीर्घ आयुरारोग्य प्रदान करो, श्री गुरुचरणी हीच प्रार्थना !!

आपला कृपाभिलाषी
श्री शैलेश पाटोळे
नाशिक.
_____________________________________
लेख पाचवा ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
______________________________________

     
     

16 comments:

दिलीप फडके said...

छान लिहिलंय !!

Shailesh blog said...

सर ,मनःपूर्वक धन्यवाद 🙏
या सर्व अनुभवामागे योगदान तुमचेच !

हर्षल पोपटराव कोठावदे said...

सर,आपल्या सहवासातील प्रिय व्यक्तीबद्दल उदार अंतःकरणाने लिहिण्याची आपली शैली वाचकाला भुरळ पाडणारी व प्रेरित करणारी आहे👌👌👍

Shailesh blog said...

Thank you Harshal 🙏🤗

Unknown said...

छान लेख आहे

Lalit Pawar said...

छान लिहिलं आहे.

काही ठिकाणी तर तुम्ही आमच्या जोशी सरांना डोळ्यासमोर उभं केलत..धन्यवाद..

आयुष्यात थोड्या वेळासाठी का होईना
पण आम्हाला जोशी सरांची सावली लाभली...

कोण कुठला माहीत नाही आम्हाला
पण आयुष्यभरासाठी देऊन गेला जिव्हाळा...

हां, हल्लीच्या धावपळीच्या जीवनात, नाही होत सहसा बोलणे. कधी आला तर एक मेसेज आणि गेला तर एक मेसेज...

पण प्रयत्न जरूर करणार भेटण्याचे ह्या सुंदर व्यक्तीला आणि असेच ऋणानुबंध टिकवण्याचे...

जोशी सर...तुमच्या सारखे तुम्हीच

��������

Shailesh blog said...

सर नमस्कार,
आपली ओळख नाही.परंतु आपण लेख वाचून काव्यमय अभिप्राय दिलात.धन्यवाद.आपल्या डोळ्यासमोर श्री.जोशी सर उभे करू शकलो.त्यातून लेखनाची प्रेरणा मिळाली.पुन्हा एकदा धन्यवाद.🙏🙏

Shailesh blog said...

मनःपूर्वक आभार 🙏🙏

Unknown said...

श्री शैलेश पाटोळे, You have very well written this blog about Mr Sanjay Joshi Sir, really appreciate that you noticed all the good things about him and which are not normally noticed and appreciated.
Mr Sanjay Joshi is in fact my brother (Mame bhau) and few things which you mention are unknown to us also. But overall you described him very well and correctly. He is like that person only and I am proud of him. Thank you have very nice skill of writing the blog. thanks, regards
Satish Joshi, Chennai

Unknown said...

खूपच छा न लीहिले आहे आपले अहेरी अल्लापल्ली चे सुंदर दिवस आठवले आपन तिकड़े एक family sarkhe rahat gothot

Unknown said...

खूपच छा न लीहिले आहे आपले अहेरी अल्लापल्ली चे सुंदर दिवस आठवले आपन तिकड़े एक family sarkhe rahat hoto

Shailesh blog said...

Sir, thanks for the appreciation.🙏

Shailesh blog said...

🤗🙏🤗

Unknown said...

खूपच छान लिहिले. श्री संजय राव आणि सौ वैजू ,त्यांचे पूर्ण आयुष्य च डोळ्यासमोर येत या लिखाणा मूळे जे की आम्ही स्वतः बघितले आहे.👍

दिपक पुं कडाळे said...

Great....bs evhadach👌👌👌👌👌

Shailesh blog said...

Thank you Bapu 🙏😊

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...