Monday, June 8, 2020

तीर्थस्वरूप नाना व काकीस.....✍️✍️


ती.स्व.
       नाना काकी यांस........✍️✍️
हो ,आठवतंय मला !१९९२ सालची गोष्ट .दहावी अकरावी नंतर डीएड शिक्षणासाठी नाशिकच्या इंदिरा गांधी अध्यापक विद्यालयात माझा नंबर लागला. मोठा भाऊ निलेश त्याच अध्यापक विद्यालयात पुढच्या वर्गात शिकत होता.       आई-वडील शेतात राबायचे. शेत वाडवडिलांचे असले तरी ,हातात पैसाअडका मात्र नसायचा. त्यामुळे नाशिकसारख्या शहरात मुलं कुठे राहणार, याची चिंता आई-वडिलांना होती .नुकतंच लग्न झालेले आमचे सुनील काका ज्यांना आम्ही नाना म्हणतो, मोठा भाऊ त्याच्याकडे  नाशिकला राहतअसे. नाना इंदिरानगर च्या परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत असे. एका बंगल्याच्या मालकाने बंगल्याला लागून छोटीशी पत्र्याची खोली काढली होती. त्यात नाना,काकी, निलेश दादा, लहानगी ऋतुजा ,नानांचा लहान भाऊ म्हणजे श्याम काका राहत असत. या छोट्याशा खोलीत नानांनी मोठा संसार थाटला होता
     पप्पांनी नानाला विचारले शैलेशला राहण्यासाठी एखादे हॉस्टेल उपलब्ध होईल का? नाना म्हटले ,"जिभाऊ तुम्ही असे का म्हणता ?"आपली खोली आहे. शैलेश तिथेच राहील. तो हॉस्टेल मध्ये जाणार नाही. वडिलांना धीर आला .आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या भावाचा मोठा आधार  वाटला. माझा नाशिकमध्ये राहण्याचा प्रश्न तूर्तास सुटला होता.
      छोटसं किचन. त्याला लागून असलेली एक खोली, अशा नावाला दोन खोल्या. सातशे रुपये प्रति महिना नाना एका बिल्डरकडे नोकरी करायचे .घर भाडे, किराणा ,दवाखाना ,प्रवास खर्च, इतर सर्व खर्च त्यातच भागवावा लागे. आम्ही दोन्ही भाऊ नानांकडे शिकत असल्यामुळे वर्षातून धान्य वगैरे थोडेफार मिळत असे.परंत इतर सर्व खर्च करताना नानांची ओढाताण होत असे. परंतु तरीही नाना- काकी यांनी कधी चिडचिड केली नाही. आमचे त्यांना ओझे झाले आहे, असे कधी जाणवू दिले नाही. अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने ते आमच्याशी वागत .आमचे आई-वडील अजमीर सौंदाने येथे राहत.परंतु परमेश्वराने नाना- काकीच्या रूपात आम्हाला आई-वडिलांची कधी उणीव भासू दिली नाही. सामान्यतः स्वतःच्या मुलाबाळांव्यतिरिक्त इतर लोक कोणाला घरात सहन होत नाहीत. परंतु नाना आणि काकी अपवाद होते. एक वेळ नानाचे ठीक होते. त्यांचे आमच्याशी रक्ताचे नाते होते. परंतु काकी....! काकी आणि आमचे पूर्वजन्माचे काही ही सख्य असावे. आमच्या पडत्या काळात आम्हाला खरा भावनिक, आर्थिक आणि सर्वच अर्थाने त्यांनी आधार दिला. स्वतःच्या घासातला घास आम्हाला भरवला. कधी कंटाळा केला नाही.तुसडेपणाने वागविले नाही. चेहऱ्यावर नाराजी नाही. मला नेहमी इतरांच्या तुलनेने काकी च्या सकारात्मक वागण्याचं कौतुक वाटे. आईसारखी ती आमची काळजी घेई.
    मला चांगलं आठवतंय ,मी नववीत असताना नाना आणि काकींचे शुभमंगल झाले. धुळे जिल्ह्यातील म्हसदी तालुक्यातील ककाणी, हे डोंगरदऱ्यात लपलेले छोटेसे गाव, हे काकीचे माहेर. श्री. एलजी फुला सोनवणे यांची ती सर्वात लहान कन्या. वडिलांना सर्वजण आप्पा म्हणत.
अत्यंत गरिबीची परिस्थिती.ते गावात काबाड कष्ट करीत असत. त्या मोबदल्यात गावातील लोकांकडून वर्षाकाठी थोडेफार धान्य मिळत असे. आप्पांना पाच मुली व पाच मुले अशी दहा अपत्ये होती. त्यामुळे कुटुंबाची एकूणच परिस्थिती ,उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे हलाखीची होती. काकीची आई शिवणकाम करून संसाराच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करत होती. त्यांनी गावातच जिल्हा परिषद शाळेत मुलांना जुजबी शिक्षण दिलं.परिस्थिती नसल्यामुळे मोठ्या मुलींचे शिक्षण अर्धवट राहून त्यांची लग्न झाली.  मोठा मुलगा श्री.केवळ याने मात्र परिस्थितीवर मात करून आपले शिक्षण एम. ए. पर्यंत पूर्ण केलं. जिल्हा बँकेत अकाउंटंट म्हणून नोकरी मिळविली. पगार फारसा नव्हता.तरीही कुटुंबाला त्याचा फार मोठा आधार होता.काकीचे शाळेतील नाव जिजाबाई .सर्व अपत्यांमध्ये ती लहान होती .सर्वांची लाडकी . इतर मुलांपेक्षा तिचे सर्वात जास्त लाड व्हायचे. आई तिच्यासाठी स्वतः फ्रॉक शिवत असे. आई, वडील ,भाऊ, बहिनी परिस्थितीप्रमाणे तिची हौस मौज करीत असत. दिवसांमागून दिवस जात होते. गावात सातवीपर्यंत शिक्षण जिजाबाईचे झाले. नंतर आठवीपासून पुढचे शिक्षण घेण्यासाठी, नगाव धुळे येथे श्री. अण्णा पाटील वसतिगृहात व शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला. लाडकी असलेली जिजाबाई वस्तीगृहातील वातावरणाला कंटाळली. ज्वारीची भाकरी ,सर्व प्रकारच्या डाळीची भाजी पूर्ण आठवडाभर खावे लागे. दहावी झाल्यानंतर अकरावी बारावी चे शिक्षण घेण्यासाठी म्हसदी या तालुक्याच्या गावी ,कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.  म्हसदी ते ककानी हे पाच किलोमीटरचे अंतर मैत्रिणींबरोबर पायी चालून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
      मुलीचे लग्न करावे कि शिक्षण ?अशा द्विधा मनःस्थितीत आई-वडील होते. जिजाबाईंची देखील शिकण्याची मनापासून इच्छा होती. जिजाबाईची आई अत्यंत कष्टाळू होती. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती कामे करीत असे. रस्त्याची कामे,  धरणावर कामाला जाणे, यासारखी कामे करून ती कुटुंबाला आधार देत होती. आई-वडिलांचे कष्ट जिजाबाई उघड्या डोळ्यांनी पाहत होती. परंतु केवळ शिक्षण नसल्यामुळे आपल्या कुटुंबाची अशी अवस्था झाली आहे, हे तिच्या लक्षात आले. शालेय जीवनात श्री.पाटील सर व श्री.अहिरे सर यांचा प्रभाव तिच्यावर पडला. श्री.अहिरे सर हे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून नोकरीच्या निमित्ताने ककाणी येथे आले होते. ककाणी या गावात इयत्ता सातवी पर्यंत फक्त मुलींच्या शिक्षणाची सोय होती. स्वतःच्या घरी कंदिलाच्या उजेडात श्री.अहिरे सर कोणताही मोबदला न घेता गावातील मुला-मुलींना शिकवत असत. मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत. "जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी ",असे सांगून सतत शिक्षणासाठी प्रेरित करत असत . परिस्थितीवर मात करायला आपण शिकले पाहिजे, असे ते नेहमी सांगत. म्हणून कदाचित जिजाबाई ला देखील पुढे शिकावं, असं वाटत होतं .मोठ्या भावाकडे तिने कॉलेज शिक्षणाचा आग्रह धरला. शेवटी भावाने धुळे येथील जय हिंद महाविद्यालयात जिजाबाई ला प्रवेश घेऊन दिला. परंतु नियतीला ते मान्य नसावे. एस. वाय. बी.ए. च्या वर्षाला असतानाच जिजाबाई चा नानांशी शुभविवाह झाला आणि पदवीधर होण्याचे तिचे स्वप्न ...स्वप्नच राहिलं !! आज तिच्याकडे पदवी प्रमाणपत्र नाही! परंतु आयुष्यात माणुसकीने वागून नातलगांचा गोतावळा मात्र तिच्या खाती खूप जमा आहे !! फार कमी लोक असे असतात, ज्यांना चंदनासारखे झिजून दुसऱ्याच्या जीवनात सुगंध निर्माण करता येतो. काकी चा समावेश अशा लोकांमध्ये होतो. 
         परमेश्वर लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधत असतो ,असं म्हणतात. दूर दूर पर्यंत नाना आणि काकी यांच्या कुटुंबीयांचा संबंध आणि संपर्क नव्हता.जिजाबाईचे मामाचे गाव सटाणा तालुक्यातील पारनेर हे होय.नानांचे वडील श्री. देवराम दादा यांचे काहीतरी निमित्ताने पारनेर येथे जाणे झाले. जिजाबाईचे मामा श्री. राघोबा पाटोळे, श्री एकनाथ पाटोळे, श्री श्रावण पाटोळे यांनी दादांना मुलाच्या लग्नाबद्दल विचारणा केली. दादा म्हटले, मुलगा ड्राफ्ट्समन आहे. परंतु एका बिल्डरकडे नोकरी करतो .पगार फार मिळत नाही. तुम्हाला चालणार असेल ,तर बघा. नोकरीपेक्षा श्री देवराम दादा यांची ख्याती सर्वदूर पसरली होती. वडिलांचा म्हणजे कै. काळू आप्पा यांचा वारसा ते पुढे चालवत होते .
    झाले...दोन्हीकडच्या निरोपांची देवाणघेवाण झाली .परंतु जिजाबाई चे वडील श्री.अाप्पा यांनी स्थळास नकार दिला कारण.... आपली आर्थिक परिस्थिती नाही. एवढ्या मोठ्या घरात सोयरीक करायची म्हणजे तेवढा खर्च देखील करावा लागेल .परंतु जिजाबाई च्या आईने आग्रह धरला. तसेच जिजाबाईंच्या मामांनी देखील हे स्थळ स्वीकारण्याचा आग्रह धरला. आपण प्रयत्न तर करून पाहू ,असे त्या म्हणाल्या. येणेप्रमाणे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ककाणी येथे संपन्न झाला. दादांनी होणाऱ्या सुनेला काही जुजबी प्रश्न विचारले .वधू परीक्षा म्हणून एक पत्र वाचायला दिले .मुलीचे विचार ऐकून दादांना सून पसंत पडली. अर्थात नानाही चोरून मुलीकडे पाहून तिच्या प्रेमात पडले ,हे वेगळे सांगायला नको!! मनोमन नानाने देखील तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
    लग्नाची बोलणी झाली .लग्न मुलाकडे करायचे, असे ठरले .सर्व खर्च दोन्ही बाजूच्या लोकांनी निम्मा निम्मा करायचा, असे ठरले. खर्चाचा अंदाज आल्यावर मात्र जिजाबाईच्या वडिलांनी डोक्याला हात लावला. साधारण बारा हजार रुपये खर्च म्हणून वधू पक्षाला द्यावा लागणार होता. जिजाबाई च्या आईने त्यावर एक तोडगा काढला.आपली मुलगी लग्न होऊन मोठ्या घरी जाईल. तिचं कल्याण होईल .यापेक्षा आपल्याला अजून काय हव आहे? असा विचार त्यांनी मांडला. त्यांच्या दारात गाईची दोन ताजीतवानी खोंड होती आणि चार-पाच शेळ्या बांधल्या होत्या. आपल्या लक्ष्मीचं कल्याण होणार असेल तर या दारातल्या लक्ष्मी वर त्यांना पाणी सोडावं लागणार होतं. भाऊ श्री केवळ यांनी अर्धी रक्कम कष्टातून उभारली.थोडीफार हात उसनवार करून  रक्कम जमवली .लग्न समारंभ आटोपला.चि.जिजाबाई आता सौ.गायत्री बनून सासरी नांदायला आली.
      सासुबाई सौ.भागाबाई . तिने सासुरवास केला नाही. सुनेला प्रेम दिलं. माया दिली. भागाबाईचं मन आभाळाइतकं मोठं होतं. त्यामुळे नवख्या असलेल्या सौ.गायत्री ची भीती पळून गेली.
     नाना नाशिकला नोकरीनिमित्ताने राहत असल्याने, काकी देखील तीन चार महिन्यांनी नाशिकला आली. नानांचे लग्न झाले म्हणून त्यांच्या साहेबांनी त्यांचा पगार पाचशे रुपयांवरून सातशे रुपये केला. लग्नात भेट म्हणून एक छोटासा पोर्टेबल टी.व्ही. संच दिला. नाना बिकट परिस्थितीतून आज जे स्वत:च्या पायावर उभे आहेत ,त्याचं सारं श्रेय श्री.अशोक जामदार , आर्किटेक्ट यांना जातं. नाना त्यांच्याकडेच काम करीत होते. नानांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता. साहेब त्यांच्या ऑफिस ची जबाबदारी नानांवर सोपवत असत. नानांच्या एकूणच परिस्थितीची त्यांना जाणीव होती.
     दिलदार ,मोठ्या मनाच्या नाना- काकीचा छोटासा संसार सुरू झाला.  दरवर्षी भाड्याची खोली बदलावी लागे. आई-वडिलांची परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यांच्याकडून आशीर्वादा पलीकडे काही मिळणे अशक्य होते. हजार रुपयांमध्ये शहरात कुटुंब कसे चालेल? यामुळे आई-वडील नेहमी चिंता करीत असत. नानांचे काही भाऊ शासकीय नोकरी करीत परंतु त्यांनादेखील काही मर्यादा होत्या. त्यांना त्यांचा संसार होता. अशाही परिस्थितीत नाना काकींनी हार मानली नाही. पगाराव्यतिरिक्त दोन पैसे कष्टाने कमवावे ,असा विचार करून ,मिळेल ती कामे करायला त्यांनी सुरुवात केली. काकीने घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.
    वर्षभराच्या आत नाना काकीच्या संसार वेलीवर ऋतुजा नावाची एक कळी फुलली. पहिले अपत्य, त्यात मुलगी! मुळातच नानांना बहिण नसल्यामुळे मुलींबद्दल विशेष प्रेम होतं. आमची बहिण आरती वर ही त्यांनी असेच प्रेम केलं. मुंबईला कपड्यांचा व्यवसाय करीत असताना, दुकान मालकाकडून उचल घेऊन आरती साठी नवनवीन फ्रॉक कपडे आणत असत. तिची हौस पुरवत असत. तिचे लाड करीत असत. दरवर्षी दिवाळीला तिला नवीन कपडे, खेळणीआणत. आरती चे लग्न ठरवण्या पासून ते लग्न समारंभाचे सगळे सोपस्कार नानांच्या पुढाकाराने संपन्न झाले.
         आता तर परमेश्वराने त्यांना ऋतुजाच्या रूपाने धनाची पेटी बहाल केली होती. संसाराचा गाडा दोघेही आनंदाने ओढत होते. दोन तीन वर्षांच्या अंतराने या दाम्पत्याच्या पोटी आकाश चा जन्म झाला .नाना काकींच कुटुंब आता चौकोनी झालं होतं. या चौकोनी कुटुंबाच्या भोवती आमच्यासारख्याचं वलय होतच !! जीवनाचा संघर्ष सुरू होता. यादरम्यान एक आनंदाची घटना नाना -काकीच्या आयुष्यात घडली. आई वडिलांची पुण्याई म्हणा ,मुलांचा पायगुण म्हणा, वयाच्या तिसाव्या वर्षी नानांना नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये ड्राफ्ट्समन किंवा आरेखक म्हणून नोकरी मिळाली. सर्व कुटुंबियांना खूप आनंद झाला .नोकरीचे पेढे वाटताना मात्र नानांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याचं कारणही तसंच होतं! दोन महिन्यांपूर्वी नानांच्या वडिलांचं निधन झालं होतं. दादांना नाना बद्दल सतत चिंता असायची. ही चिंता दादांच्या चिते बरोबर गेली होती. दादा हयात असताना मला नोकरी का मिळाली नाही? याची नेहमी नानांना खंत वाटे. कदाचित त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असती.
     शिक्षण संपल्यावर ,मी पुन्हा अजमीर सौंदाणे येथे गेलो.
    योगायोगाने मला नाशिक एज्युकेशन सोसायटी च्या नवीन इंग्रजी शाळा, ओझर येथे नोकरी मिळाली. पुन्हा मी राहण्यासाठी नानांकडे नाशिकला आलो. सुरुवातीला जवळपास सहा महिने पगार मिळत नव्हता. तेव्हा नाना सिडको परिसरात राहत असे. सिडको - सीबीएस - ओझर पुन्हा सिडको ,असा प्रवास मला करावा लागे. जवळपास रोज वीस रुपये मला प्रवासाला लागत. नानांनी कधीही पैसे मागायची वेळ येऊ दिली नाही. एकदाच त्यांनी मला सांगितले, पैसे हवे असले की ,माझ्या शर्टच्या खिशातून काढून घ्यायचे ! इतका त्यांचा आमच्यावर विश्वास होता. आम्ही देखील कधी त्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. वीस रुपयांपेक्षा कधीही जास्त पैसे खिशातून काढण्याचा मोह झाला नाही. आमच्या आई-वडिलांचा संस्कार येथे उपयोगी पडला. नाना काकींनी कधीही परकेपणा जाणवू दिला नाही.
    नानांनी नोकरी करून, बांधकाम व्यवसायिक म्हणून छोटी-मोठी कामे देखील केली .कधी स्वतंत्र तर कधी पार्टनरशिप मध्ये. श्री विजय शिरसाठ म्हणून नानांचे ओळखीचे एक बांधकाम व्यावसायिक होते. नानांचे त्यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते. स्वतः बांधकाम व्यवसायामध्ये आपण स्वतंत्र रित्या कामकाजाला सुरुवात करावी असे नाना वाटे. त्यांनी अकरा हजार रुपये खर्च करून एका प्लॉट मालकाशी व्यवहार केला. त्यासाठी लागणारे अकरा हजार रुपये देखील श्री. जामदार साहेब यांनीच दिले होते. श्री जामदार साहेब खऱ्या अर्थाने दिलदार होते.काही तांत्रिक अडचणीमुळे तो व्यवहार फसला. त्याकाळात झालेल्या नुकसानीची भरपाई करणं नानांना अजिबात शक्य नव्हतं. त्यावेळेस शिरसाट साहेब नानांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी त्यांच्या पत्नीचे दागिने सोनाराकडे गहाण ठेवून नानांना नव्वद हजार रुपयांची मदत केली. ओळख नसताना देखील त्यांनी अशी अनमोल मदत नानांना केली, हे सांगताना नानांना आजही गहिवरून येतं! धन्य ती मैत्री !धन्य ते श्री. शिरसाट साहेब !!रुताली अपार्टमेंट, सिद्धिविनायक अपार्टमेंट, गायत्री अपार्टमेंट अशा तीन बर्यापैकी मोठी कामे नानांनी पार्टनरशिप मध्ये पूर्ण केली. .सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते कामात व्यस्त असायचे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील त्यांना वेळ नव्हता. खाणेपिणे वेळेवर होत नसे. साधारणपणे वयाच्या पस्तिसाव्या वर्षातच त्यांना मधुमेह व ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला. आज जवळपास पंचवीस वर्षे हे आजार त्यांच्या सोबतीला आहेत.  दोन पैसे हातात खेळू लागले. तरी नानांच्या स्वभावात मात्र बदल झाला नाही. नाना अत्यंत संवेदनशील. कुटुंबियांच्या व्यतिरिक्त जरी कोणी दुःखात असले तरी नाना त्यांच्या मदतीस धावून जात. गावाकडून कामाच्या निमित्ताने येणाऱ्या मुलांना नाना एक आधार वाटे.मृदू भाषिक ,मदतीसाठी सदैव तत्पर आणि कोणत्याही कामात व्यस्त असणे, ही नानांची काही स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या संवेदनशीलतेचा अनेकांना लाभ झाला, तर काहींनी गैरफायदा देखील घेतला. तरीदेखील नानांनी कोणाबद्दल मनात आकस ठेवला नाही. आठ भावंडांमध्ये नाना शेवटून दुसरे. त्यांची आर्थिक परिस्थिती आता भक्कम झाली .ते आता इतरांचे आधार बनले. त्यांनी कष्टाने पैसा कमावता कमावता लोकांचे आशीर्वादही कमावले. पैसा, धन, संपत्ती ही कायम टिकणारी गोष्ट नाही, याच्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणून त्यांनी पैशापेक्षा माणुसकीने नातीगोती जपायला अधिक महत्त्व दिले. घरात नवीन काही करायचे तर नानांचा सल्ला घेतला जात होता.नाना केवळ सल्ला देत नव्हते, तर आर्थिक मदत देखील करायचे. त्याचा त्यांनी कधी हिशोब ठेवला नाही. "नेकी कर और दरिया मे डाल" , असे त्यांचे वागणे होते. पत्नी म्हणून काकीने , तुम्ही कोणाला किती मदत केली? असे नानांना विचारले नाही आणि नानांनीही कधी तिला सांगितले नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आपली अडचण नानांना सांगावी आणि आणि ती अडचण जणू माझीच म्हणून नानांनी ती सोडवण्यासाठी तन, मन ,धनाने उडी घ्यायची ! भावा भावांची विभागणी झाली होती. परंतु नाना मनाने कधी विभागले गेले नाहीत. त्यांच्या शब्दकोशात सख्खे, चुलत ,जवळचा, लांबचा ,शत्रु -, असे शब्द नव्हते. सर्वांसाठीच ते नाना होते. सुखदुःखात पैसा उपयोगाला येत नाही ,तर नातीच कामी येतात. हे मला ते नेहमी सांगायचे.
   शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने मी नाना- काकूंकडे खूप काळ राहिलो. मी त्यांच्या कुटुंबाचा सदस्य झालो होतो. नानांची दोन्ही मुले माझ्या अंगाखांद्यांवर खेळली. नाना काकींशी माझे नाते रक्तापेक्षा भावनिक अधिक होते. नाना आणि माझ्यात एक साम्य होतं. आम्ही दोघेही खूप संवेदनशील! आई वडील हा विषय आमच्या दोघांसाठी वीक पॉईंट आहे. अशा विषयावर बोलताना आमचा कंठ कधी दाटून येईल, याचा नेम नसतो. माझ्या आई-वडिलांचे संस्कार जसे माझ्यावर बालपणात झाले, तसे तरुणपणात नाना काकी यांना आदर्श मानले. 
    नाना आणि काकी एक आदर्श पती -पत्नी. चार चौघात नानांनी कधी काकीचा अपमान केला नाही आणि नवरा म्हणून काकीने कधीही नानांचा उपमर्द केला, असे मला आठवत नाही. नानांनी कधी काकीचे कौतुक केले ,असे झाले नाही. परंतु मनामध्ये तिने दिलेल्या साथीबद्दल कृतज्ञता असायची.
      तू नेहमी साथ दिलीस
       स्वप्न माझी रंगवायला.
       तू नेहमी घेतलस ओंजळीत
        खचलेल्या माझ्या मनाला.
   नानांना काकीचा असा आधार असायचा.
दोघेही समविचारी. काम आणि जबाबदारी याव्यतिरिक्त नानांना दुसरं जग नव्हतं. त्यांनी कधी कोणाशी वाद- विवाद ,भांडण-तंटे केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. जिथे जातील तिथे मैत्रीपूर्ण संबंध नानांनी निर्माण केले. या अर्थाने नानांचा स्वभाव हे एक अजब रसायन होय!!सातपूरच्या एका कामांमध्ये नानांना प्रचंड नुकसान झाले. जवळपास दहा लाखांचे गुंतवलेले भांडवल नानांचे त्यात बुडाले. कधीही भरून न येणारे नुकसान झाले. दरम्यानच्या कालावधीमध्ये नानांनी छोट्या मोठ्या उलाढाली करून स्वतःचं घर, गाळा घेतलं. परंतु सातपूरच्या त्या कामांमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करून देताना कर्जाचा डोंगर उभा राहिला. त्यातून नानांना सावरताना खूप कष्ट पडले. आर्थिक ओढाताण झाली. असलेली प्रॉपर्टी विकावी लागली. तरीदेखील नाना खचले नाहीत.
   नानांच्या अशा स्वभावाचे मला नेहमी अप्रूप वाटे .त्यांचा स्वभाव इतका संवेदनशील असण्याची कारणे जाणून घेण्याचा, मी नेहमी प्रयत्न करी. शालेय जीवनात जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून नानांनी नाशिक येथे आयटीआय मधून ड्राफ्टस्मन ,म्हणजे आरेखक ट्रेड पूर्ण केला. तरीदेखील त्यांना जॉब मिळाला नाही. नानांनी सौंदाणे ला परत येणे ऐवजी नाशिकला थांबून जॉब शोधण्याचा प्रयत्न केला. एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये तात्पुरतं काम देखील शोधलं होतं. लॉजवर राहून स्वतःची गुजराण करण्यापुरतेच पैसे त्यांना मिळत होते. आपण असेच काम करीत राहिलो, तर काही उपयोग होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी मुंबईत ,दादर येथे राहणाऱ्या आपल्या मावशीकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिला सर्व हकीकत सांगितली. मुंबईला जाऊन काय करायचे? हे ठरलेले नव्हते. मावशीची मुले फुटपाथवर कपडे विकत असत. नानांनी नातेवाईकाकडे राहून फुटपाथवर कपडे विकण्याचा व्यवसाय सुरू केला. दिवसभर उन्हातानात कपडे विकून पंधरा रुपये मिळायचे. त्यापैकी बारा रुपये रोज जेवण आणि राहण्यासाठी द्यावे लागत होते.दोन तीन रुपये स्वतःसाठी राहत असत. त्यातून इतर खर्च भागवावा लागे. गावी परत यायचे तर मालकाकडून उचल म्हणून काही पैसे घ्यावे लागत होते.अत्यंत कष्टात दिवस काढले .नातेवाईक असले तरी मुंबईसारख्या शहरात राहण्याचा प्रश्न बिकट होता. राहण्याची सोय झाली असली, तरी खाण्यापिण्यासाठी खर्च मात्र करावाच लागत होता. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त... नाना कशीबशी गुजराण करीत होते. काही दिवस मुंबईत असणाऱ्या भाऊ आणि वहिनी कडे राहिले. काहीही झाले, कितीही कष्ट पडले तरी आता पुन्हा गावाकडे परत जायचे नाही, असे त्यांनी मनोमन ठरविले. मुंबईत राहून त्यांना लोकांचे स्वभाव शिकायला मिळाले.
     काही नाती असतात
     लांबुनच आपले म्हणणारी
      जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी !!
असा अनुभव नानांना आला.
 तिरस्कार आणि तुसडेपणा अनुभवायला मिळाला. यातूनच जिद्द त्यांच्यात निर्माण झाली. आयुष्यातले कठीण प्रसंग माणसाला धैर्याने जगणं शिकवतात, तसे नानांच्या बाबतीत झाले. सकाळी टपरीवर मिसळ- वडापाव किंवा छोट्याश्या हॉटेलात दुपारचं जेवण, अशा जेवणाचा त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाला. मुंबईसारख्या शहरात माणुसकी पेक्षा पैशाचे मूल्य अधिक!
      दुसऱ्याकडे रोजंदारी ने काम करण्यापेक्षा आपण स्वतः व्यवसाय करावा म्हणजे आपल्याला अधिक नफा मिळवता येईल असा विचार नाना करू लागले. मावस भाऊ श्री देविदास यांच्याजवळ त्यांनी ही कल्पना बोलून दाखवली. साधारण दहा हजार रुपये सावकारी कर्ज एका सरदारजी कडून श्री देवीदास यांनी नानांना काढून दिले. नानांनी स्वतःचा माल खरेदी केला. आणि विक्रीला सुरुवात केली. परंतु नशिबाने त्यांना साथ दिली नाही. त्याकाळात मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी श्री गो.रा. खैरनार यांची नियुक्ती झालेली होती. त्यांनी मुंबईमध्ये अतिक्रमण काढण्याचा धडाका लावला. फुटपाथ वरची सर्व बेकायदेशीर दुकाने त्यांनी हटवली. फुटपाथवर कपडे आणि इतर वस्तू विकणार्‍यांना मनाई केली. नानांनी घेतलेला सर्व माल अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त करून नेला. डोक्यावर कर्ज झाले. नाना पुन्हा रोजंदारीने कपडे विकू लागले.
   कामावर असताना एकदा अचानक त्यांच्या पोटात दुखायला लागले. जवळच असणाऱ्या एका डॉक्टरने त्यांची तपासणी केली. एका लिफाफा मध्ये चिठ्ठी देऊन, त्यांनी तातडीने त्यांना के.ई.एम. हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले. रात्री साडेनऊ वाजता के.ई.एम. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून लगेच स्ट्रेचर वर त्यांना झोपवले.आणि आणि ऑपरेशनची तयारी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता भूल उतरल्यावर त्यांना शुद्ध आली. वेदना जाणवायला लागल्या. तेव्हा नर्स कडून कळले की, नानांचे अपेंडिक्स चे ऑपरेशन झाले होते. ऑपरेशननंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. नाईलाजाने त्यांनी काही दिवस गावी येण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत आई-वडील आणि कुटुंबियांना त्यांनी ऑपरेशनची कल्पना देखील दिली नव्हती. यालाच कदाचित "आत्मनिर्भर", असे म्हणत असावे ! जवळचे नातेवाईक मुंबईत असतानादेखील आपला त्यांना त्रास नको म्हणून नानांनी त्यांना कळविले नाही. अर्थात इतरांनी ते जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही! ही गोष्ट वेगळी!!
    गावी आल्यानंतर थोडे दिवस त्यांनी विश्रांती घेतली. खिशातले पैसे संपले होते. मुंबईला जाण्यासाठी प्रवासाला देखील त्यांच्याकडे आता पैसे नव्हते. आई-वडिलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. काय करावे हे त्यांना सुचेना. हळूहळू त्यांना नैराश्य येत चालले होते. दरम्यान ठाणे येथे शिक्षक म्हणून नोकरी करणारे श्री. विलास पाटोळे उर्फ वक्रा मास्तर काही निमित्ताने गावी आले होते. नानांच्या आईने श्री. विलास पाटोळे यांना मदत करण्याविषयी विनविले. त्यांनी तीनशे रुपयांची मदत केली. त्यांच्या मदतीने नानांच्या पुढील आयुष्याला कलाटणी मिळाली. कदाचित अशी मदत मिळाली नसती तर..... कल्पना न केलेलीच बरी! तीनशे रुपये घेऊन नाना नाशिकला आले. त्यातून महिनाभराचा रोजचा खर्च केला. खानावळीची मासिक फी दिली. श्री .मानकर म्हणून नानांचे वर्गमित्र त्यांना भेटले. त्यांनी नानांना श्री. अशोक जामदार अँड असोसिएट्स या फर्मचे मालकांना म्हणजे जामदार साहेबांना विनंती करून दीडशे रुपये महिना पगाराची नोकरी मिळवून दिली. नाशिकला येईपर्यंतचा नानांचा हा प्रवास ज्या लोकांच्या मुळे झाला. त्यांचे ऋण कधीच फेडता येणार नाही असे, नाना कृतज्ञतापूर्वक नेहमी सांगतात. श्री. जामदार साहेबांचा विश्वास संपादन केला. नानांचे कष्ट आणि प्रामाणिकपणा पाहून हळूहळू पगारात जामदार साहेब वाढ करीत असत. अधून मधून आर्थिक मदत करीत असत. हवं-नको ते विचारत असत.
      माझा मोठा भाऊ निलेश दादा, मी आणि लहान भाऊ सचिन आम्ही तिघेही नानांकडे शिकलो. तिघांना नोकरी मिळाली. आई-वडिलांना आनंद झाला. नानांना त्यांच्या आयुष्यात सर्वात आनंदाची गोष्ट हीच वाटते की, आम्ही तिघे भाऊ स्वतःच्या पायावर उभे राहिलो.
        जीवनात नाती तशी
               अनेकच असतात.
         पण ती जपणारी लोक
                फार कमी असतात.
 नाना काकींशी आमचे नाते हृदयापासून ...हृदयापर्यंत चे!!
      परंतु नाना आणि माझ्या संबंधांना एकदा दृष्ट लागली होती, हे मला खेदाने सांगावे लागते. निलेश दादाच्या लग्नामध्ये कोणीतरी ही संधी साधून प्रेमाचा हा पाझर अडवण्याचा यशस्वी  प्रयत्न केला होता. पण ते फार काळ टिकले नाही. नानाचे अनंत उपकार आमचे वर होते. ते विसरणे मला शक्य नव्हते. आमच्या दोघांमध्ये पाच सात महिने अबोला राहिला. शेवटी मोठ्या मनाच्या नानांनी अश्रूंना वाट करून दिली. त्यांच्या अश्रूंमध्ये माझ्या मनातला खोटा राग आणि अहंभाव वाहून गेला! तेव्हापासून ते आजतागायत नाना आणि माझे नाते अतूट राहिले आहे.
      माझ्या लग्नाचे दिवस मला आठवतात. नाना आणि काकी माझ्या आई-वडिलांना घेऊन मुली कडे लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले. काही केल्या वर पक्ष आणि वधू पक्ष यामध्ये एकमत होत नव्हते. मी काकीला नाशिकहून फोन करून सांगितले की, काही झाले तरी मला त्या मुलीशी लग्न करायचे आहे. लग्नाची बोलणी फिसकटली आहे, हे लक्षात आल्यावर काकीने नानांच्या कानावर ही गोष्ट घातली. नानांनी कौशल्याने हे लग्न जुळवून आणले. लग्नाच्या दिवशी मंगलाष्टक सुरु असताना माझ्या आईची अचानक तब्येत बिघडली. तिला नाशिकला दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. सर्वजण नाशिकला परत आले. नाना आणि काकी यांनी लग्नाचे सर्व सोपस्कार माझे आई-वडील म्हणून पूर्ण केले, यापेक्षा भाग्याची गोष्ट दुसरी कोणती असू शकते!
   माझ्या वाट्याला आलेल्या माणसांच्या,
   सौम्य सुखदायी आठवणी आठवताना,
जाणीव होते..... नाना काकींसारख्या व्यक्तिमत्त्वाची ! आठवण होते, त्यांनी केलेल्या प्रेमाची !! जाणीव होते, त्यांच्या कष्टाची !!!
     आमच्या बरोबरच इतरांवरही नानांनी केलेल्या उपकारांमुळे नानांचे समाजातील स्थान उच्च राहिले आहे. ऋतुजा चे आता लग्न झाले आहे. ती आनंदात संसार करते आहे. आकाश सिव्हिल इंजिनिअर झाला आहे.
     दुसऱ्यांच्या आयुष्यात दिवा बनवून प्रकाश निर्माण करणाऱ्या नाना काकींना उदंड आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
    नाना काकींच्या सदैव ऋणात राहू इच्छिणारा,
                                       तुमचा,
                                   भाई ( शैलेश )
       
      


   

7 comments:

Unknown said...

खूपच छान लिहिले आहेस त्याचे आम्ही दोघेही (बारस्कर काका आणि काकू ) जवळून बघितले आहे नाना आणि काकीन बद्दल कृतंज्ञता व्यक्त केलीस धन्यवाद आताच्या जमान्यात असं दुर्मिळ होत आहे. पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

Shailesh blog said...

😔

Shailesh blog said...

बारस्कर काका धन्यवाद .🙏
तुम्ही दोघेही साक्षीदार आहात.

दिपक पुं कडाळे said...

जो माणूस दुसऱ्याचे उपकार कधीही विसरत नाही ना तोच खऱ्या अर्थाने मानव म्हणवून घेण्यास लायक आहे असे मला वाटते कारण उपकारांची जाणीव न ठेवणाऱ्या काय म्हणावे हेच मला सुचत नाही
आजच्या काळात सुद्धा काका तुमच्यासारखी माणस आहेत आणि उपकारांची जाणीव ठेवणारी मुलही आहेत शैलेश सारखी हे ही या लेखनातून प्रभावीपणे स्पष्ट होत
अत्यंत सुंदर मांडणी करून भावनांना वाट करून देणाऱ्या शैलेशला शुभेच्छा!!!

Shailesh blog said...

बापू,आपण इंदिरा गांधी अध्यापक विद्यालयात एकत्र शिकत होतो. तुला आणि मला एकमेकांच्या घरच्या परिस्थितीची जाणीव होती. तू याचा साक्षीदार आहेस.
धन्यवाद 🙏😊🤗

Unknown said...

सुंदर लेख आहे सर वाचून जीवन पुर्वी कस असायची कसे आपले पालक जगले त्या काळातील चित्र आज माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा राहिले 🙏🙏🙏

Shailesh blog said...

Thank you 🙏

“तंबूपासून ताजमहालापर्यंत”

                     “तंबूपासून ताजमहालापर्यंत”                   ------------------------   “चरैवेति चरैवेति” असे वेदातील वचन स...